Wednesday, April 17, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा ३


ग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेमधला एक देश. कोणाच्याही अध्यात ना मध्यात. आपण बरे नि आपले काम बरे अशा मनोवृत्तीचा. खरे तर या देशाला वारसा आहे समृद्ध अशा माया संस्कृतीचा. हजारो वर्षांपूर्वीपासून या भागामध्ये समृद्ध अशी माया संस्कृती नांदत होती; पण १६व्या शतकात तिथे स्पेनचे व्यापारी आले आणि हळूहळू त्यांनी इथल्या लोकांवर राज्य करायला सुरुवात केली. जेव्हा परदेशी शासक एखाद्या भूभागावर राज्य करतात तेव्हा काय होते हे आपल्याला- भारतीयांना नव्याने सांगायची गरज नाही. या अशा आक्रमणांमध्ये सगळ्यात जास्त भरडली जाते ती तिथली पारंपरिक व्यवस्था. इंग्रजांच्या काळात ओहोटीला लागलेला हस्तोद्योग, कुटिरोद्योग महात्मा गांधीजींमुळे तग धरू शकला आणि आता इंटरनेटच्या मदतीने परत उभा राहू शकत आहे. हे सगळे लिहिण्याचे खरे कारण आहेत ग्वाटेमालामधल्या धाडसी मूलनिवासी स्त्रिया. काही शतके स्पेनची वसाहत म्हणून राहत असल्यामुळे इथल्या मूळ मायन लोकांवर अर्थातच स्पॅनिश संस्कृतीचा प्रभाव न पडता तर विशेष होते. अशा परिस्थितीत इथल्या काही लोकांनी, खास करून बायकांनी त्यांची माया संस्कृती जपण्यासाठी म्हणून ‘असोसिएशन फेमेनिना पॅरा एल देसारोलो दे सकातेपेकीज’ (आएऊएर) ची स्थापना केली आहे. मायन लोक त्यांच्या संस्कृतीचे निदर्शक असलेले कपडे घालतात आणि त्यावरून त्यांना हिणवलेदेखील जाते. अनेकदा त्यांचे कपडे बघून त्यांना हलक्या दर्जाची कामे सांगितली जातात; पण हेच असे कपडे जेव्हा बाजारात विकायला येतात, गोरे लोक वापरतात तेव्हा मात्र या सगळ्याची किंमत अचानक वाढते. जो कपडा हस्तकारांकडून ३ युरोला विकत घेतला जातो, त्याची किंमत विकताना ३०० युरो होते. यातही, या मायन हस्तकारांच्या शैलीची सर्रास नक्कल केली जाते. त्यांच्या कपडय़ांसारखेच दिसणाऱ्या पण हलक्या प्रतीच्या कपडय़ांची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर केली जाते. त्यामुळे ‘एएफईडीईएस’चा त्यांच्या वस्त्रशैलीचे ‘इंटलेक्चुअल राइट’ म्हणजे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातले एक पाऊल म्हणजे तिथल्या कोर्टाने केवळ मायन समूहालाच मायन शैलीची वस्त्रे तयार करण्याचे हक्क असावेत अशा धर्तीचा काही कायदा करता येईल का याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. वर्षांनुवर्षे पूर्वजांकडून मिळवलेले ज्ञान वापरून या स्त्रियांनी त्यांची वस्त्रसंस्कृती जतन केलेली आहे. त्यामुळे अर्थात त्यावर सगळ्यात जास्त त्यांचाच हक्कआहे. जर त्यातून अर्थप्राप्ती होत असेल तर त्याचा योग्य तो मोबदलादेखील या स्त्रियांना मिळालाच पाहिजे. अर्थात आयपीआरबद्दलचे जागतिक कायदे आणि त्यातली लढाई यात या स्त्रिया कितपत यशस्वी होतील माहीत नाही; पण किमान त्यांना स्वत:कडे असलेल्या कौशल्याची किंमत कळली, त्याचे आर्थिक मोल आणि त्याहून जास्त सांस्कृतिक मोल कळले. ‘‘आम्ही जपलेली आमची वस्त्रसंस्कृती हे आमचे ज्ञानाचे भांडार आहे, जे आमच्यावर राज्य करणाऱ्या कोणत्याही शासकांना तोडता, फोडता, जाळता आले नाही,’’ असे अंजेलिना अस्पुअक अभिमानाने सांगतात तेव्हा ही प्राचीन संस्कृती कालौघात अशी सहजासहजी लुप्त होणार नाही याची खात्री पटते.
५२ किनारे स्वच्छ
बघता बघता जानेवारी महिना संपलासुद्धा. २०१९ च्या वर्षांतला दुसरा महिना सुरू झाला. अनेकांनी वर्षांच्या सुरुवातीला केलेले संकल्प कदाचित मागच्या महिन्यातच राहिले असतील. काहींचे संकल्प या महिन्यातही सुरू असतील. प्रत्येक पूर्ण केलेल्या अपूर्ण असलेल्या संकल्पाची एक गोष्ट असते. संकल्प सुरू करण्यामागेसुद्धा काही कारण असते. ब्रिटनमधल्या कॉन्रेलजवळ राहणाऱ्या पॅट स्मिथ यांनी २०१८ मध्ये संकल्प केला, की त्या दर आठवडय़ाला एक किनारा स्वच्छ करणार. हा त्यांचा संकल्प किती दिवस त्या पाळू शकतील अशी त्यांच्यासह अनेकांना शंका होती, कारण हा संकल्प केला तेव्हा स्मिथ यांचे वय होते अवघे ७० वर्षे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला रोज चालत जायचा संकल्प १० दिवस टिकत नाही, पण या ब्रिटनच्या आज्जींनी वर्षभर त्यांचा संकल्प पाळून एक, दोन नव्हे, तर तब्बल ५२ किनाऱ्यांची सफाई केली. कॉन्रेल हा ब्रिटनच्या नर्ऋत्य किनाऱ्याकडचा भाग. तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या भागातले किनारे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत; पण या सौंदर्याला काळा डाग लागत होता तो त्या किनाऱ्यांवर असणाऱ्या कचऱ्याचा. त्यामुळे या आज्जींनी ठरवले की,आपण आपल्याला जसे जमेल तसे हे किनारे स्वच्छ करायचे. त्यामुळे त्या दर आठवडय़ाला हातात रबरी मोजे घालून मोठय़ा पिशव्या, झाडू घेऊन जवळपासच्या किनाऱ्यांवर जायच्या. कधी एकटीने, तर कधी इतरांच्या मदतीने, पण चिकाटीने त्यांनी ५२ आठवडे हे काम केले. लोक रोजच्या वापरातल्या गोष्टीसुद्धा इथे टाकून तसेच जातात. हा असा वारसा मी माझ्या मुलांना, नातवंडांना पुढच्या पिढीला देऊ इच्छित नाही, म्हणून त्यांनी किनारे स्वच्छ करायचा संकल्प केला, असे त्या म्हणतात. एक वर्षभर संकल्प पाळला आणि अजूनही माझ्या किनाऱ्यांना माझी गरज आहे. त्यामुळे मी हे काम थांबवणार नाही, असे त्या म्हणतात. किनारे स्वच्छ करतानाच त्या लोकांमध्ये प्लास्टिकच्या गैरवापराबद्दल जनजागृती करत आहेत. स्वच्छ प्रदूषणरहित किनाऱ्यांचे महत्त्व इतरांना कळून तेही त्यासाठी प्रयत्न करतील, असा त्यांना विश्वास आहे. वयाच्या ७०व्या वर्षीदेखील पॅट स्मिथ यांनी केलेली संकल्पपूर्तीची ही बातमी अनेकांना त्यांचे संकल्प या वर्षी तरी पूर्ण करण्यास नक्कीच मदत करतील.
हार्ड’ मेटल
लेबनॉन हा मध्यपूर्व आशियातला देश, याचे शेजारी युद्धामध्ये पोळून निघत असताना या देशाने अजून तरी शांतता टिकवून ठेवली आहे. इस्रायल, सीरिया या देशांमधल्या अस्थिर धगीची झळ या देशालाही लागते. पूर्णपणे मुस्लीम नाही, पण मुस्लीमबहुल असलेल्या या देशातही त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर निर्बंध आहेत. कदाचित जेव्हा परिस्थिती पूरक नसते, तेव्हाच काही तरी करून दाखवण्याची ऊर्मी जास्त तीव्र असते. त्यामुळेच ज्या देशात ‘हार्ड रॉक’, ‘मेटल’ या संगीत प्रकाराकडे उपेक्षेनेच बघितले जाते, त्याच देशात काही मुली एकत्र येऊन स्वत:चा हार्ड मेटलचा बँड सुरू करतात हे विशेषच म्हटले पाहिजे ना. शेरी, लिलास, माया, अल्मा, तात्याना या पाच मुलींनी मिळून त्या देशातला पहिला ‘फिमेल ओन्ली, स्लेव्ह टू सायरेन’ हा बँड सुरू केला आहे. २०१५ मध्ये सुरू झालेला हा बँड आजही लेबनॉनमध्ये ठिकठिकाणी त्यांचे शो करीत आहे. त्यांचा पहिला अल्बम या वर्षी तरी येईल अशी त्यांना आशा आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला त्यांचा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. ज्या देशात ‘मेटॅलिका’, ‘निर्वाणा’ यांसारख्या जगप्रसिद्ध बँडवर बंदी आहे, त्या देशात पाच मुलींनी स्वत:ची ओळख हार्ड मेटल बँड चालवणाऱ्या मुली अशी तयार केली आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे माध्यम वेगळे असते. मुलगी आहे म्हणजे नाजूक, सौम्य संगीत ऐकले पाहिजे, गायले पाहिजे हे समज मोडून काढणे या पाचही जणींना नक्कीच सोपे गेले नसणार, पण त्या ते करून दाखवत आहेत. त्या प्रत्येकीची स्वत:ची एक गोष्ट आहे. आठवडय़ातून दोन दिवस त्या भेटतात, एकत्र सर्व करतात, ड्रम्स, गिटारमध्ये बुडून जातात. हिरव्या रंगाचे केस, ओठ, कान, नाक जिथे कुठे शक्य आहे तिथे त्यांनी टोचून घेतले आहे, वेगवेगळे टॅटू काढले आहेत. ही फक्त बंडखोरी नाही तर त्यांना ते करण्यात आनंद वाटतो म्हणून त्या हे करतात. आम्हाला कोणालाही काही दाखवून द्यायचे नाही, कोणाविरुद्ध काही करायचे नाही, आम्हाला फक्त गायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे. हे वाचत असताना मला राहून राहून ‘व्हिलेज रॉक स्टार’ची आठवण येत होती. अशीच एका मुलीच्या संगीतप्रेमाची कथा असलेल्या या चित्रपटाला मागच्या वर्षी सर्वोत्तम चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले होते. चित्रपटातली कथा कदाचित वास्तवावर आधारित असेल किंवा नसेल; पण लेबनॉनमधल्या ‘स्लेव्ह टू सायरन’च्या मुली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवत आहेत हे नक्कीच बदलत्या जगाचे लक्षण आहे.
प्लॅटॉनिक पालकत्व
इला आणि व्हॅन ही दोन गोंडस मुले अमेरिकेत एकत्र राहत आहेत, पण त्यांचे आईबाबा एकत्र राहत नाहीत. आता यात तसे काही फार वेगळे वाटायचे कारण नाही. घटस्फोटामुळे वेगळे राहणारे आई-बाबा, दोन्ही आईच किंवा दोन्ही बाबाच असणारी घरंदेखील आता काही नवीन नाहीत. मग इला आणि व्हॅनच्या आईबाबांचे असे काय वेगळेपण आहे? इला आणि व्हॅन यांचे आईवडील ‘प्लॅटॉनिक पॅरेन्टस्’ आहेत. म्हणजे त्या दोघांनी लग्न केलेलं नाही किंवा ते एकत्रही राहत नाहीत. केवळ आपले स्वत:चे मूल असावे या भावनेतून दोन अनोळखी माणसे एका वेबसाइटवर माहिती टाकतात, नंतर भेटतात आणि ठरवतात आपण दोघे मिळून आपले मूल या जगात आणू या, त्याला वाढवू या. मग आयव्हीएफच्या मदतीने त्यांना जे मूल होते त्यामुळे यांचे आगळेवेगळे कुटुंब सुरू होते. आई वेगळ्या घरात, वडील वेगळ्या घरात आणि मुलं आईवडील दोघांच्या बरोबर वाढत असतं. इला आणि व्हॅन आता २ वर्षांचे आहेत, आठवडय़ातले ३ दिवस आई, ३ दिवस बाबा आणि १ दिवस एकत्र किंवा ज्याला वेळ आहे तो त्यांना सांभाळतो. या मुलांच्या आईवडिलांना तुम्ही हा असा निर्णय का घेतला, असे विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्हाला मूल हवं होतं. कदाचित दत्तक घेऊनही ही भूक भागवता आली असती, पण ही अशी सह-पालकत्वाची सोय जेव्हा कळली तेव्हा आम्ही हे करून बघायचे ठरवले.’’ या मुलांच्या आईने सांगितले की, ‘‘अनोळखी माणसावर विश्वास ठेवून मुलांना जन्म देणे ही तशी खूप जोखमीची गोष्ट होती, पण जर त्या माणसाने ऐन वेळी हात झटकले, आर्थिक किंवा सामाजिक जबाबदारी झटकली तरीही मी समर्थ होतेच, त्यामुळे मी माणसांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून हे सह-पालकत्व करायचे ठरवले. स्पर्म घेऊन मला एकटी आई होता आले असते, पण जर मुलांना वडीलही मिळत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे.’’ या विचारातून अमेरिकेत असे सह-पालकत्व (को-पॅरेंटिंग) किंवा प्लॅटॉनिक पालकत्व हा पर्याय अनेक जण वापरत आहेत. ‘मोडामिली’ ही वेबसाइट सुरू करणाऱ्या इव्हान फॅटोव्हीक यांच्या मते आजपर्यंत १०० अशी बाळे नक्कीच जन्माला आलेली आहेत.

मानसी होळेहोन्नूर
(स्त्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग, लोकसत्ता २ फेब्रुवारी २०१९
 

No comments:

Post a Comment