‘फ्री झालीस की फोन कर.’
जान्हवीने तिच्या BF ला मेसेज केला आणि ती निवांत फोन वर नेटफ्लिक्स बघत बसली. आज कितीतरी महिन्यानंतर छे वर्षांनंतर ती एवढी निवांत बसली होती, की काही सेकंद या मिळालेल्या मोकळ्या वेळेचं काय करायचं हेच तिला कळेना. नवीन चित्रपट ,शोचा तिचा बॅंकलॉग एवढा जास्त होता, की कुठून सुरु करावं हेच तिला कळत नव्हतं. रिया झाल्या नंतर ते आता ती शाळेत रुळली आहे तोपर्यंत तिला असा तिचा वेळ मिळालाच नव्हता. मूल झाल्यावर त्याला किमान वर्ष तरी द्यायचं हे तिने आणि किरण ने आधीच ठरवलं होतं. त्यामुळे रिया झाल्यावर तिने ब्रेक घेतला, पण एक वर्षानंतरही तिला परत कामावर जावसं वाटलं नाही, त्याच वेळी किरणला एक वर्षासाठी लंडन ला जायची संधी मिळाली, मग काय त्या निमित्ताने तिथे ही राहता येईल म्हणत तिने नोकरीचा विचार लांब सारला. वर्षाचा प्रोजेक्ट दीड वर्षाने संपला , तोवर रिया पण मोठी झाली होती, शाळेत अॅडमिशन पण झाली होती. आता आपलं बूड एका जागी स्थिरावलं आहे तर आपण काही तरी सुरु करू या याची जान्हवीच्या मनाने उचल खाल्ली होती.
वन्स अगेन या चित्रपटाबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि मितालीने, तिच्या BF ने पण त्यावर फेसबुकवर पोस्टले होते त्यामुळे आज हा अर्धा तरी बघूया असे म्हणत तिने सिनेमा बघायला सुरुवात केली आणि तेवढ्यात मितालीचा फोन आला.
मिताली आणि तिची मैत्री हा तिलाच नव्हे सगळ्या जगाला पडणारा प्रश्न होता. जान्हवी म्हणजे आपण बरे आपले काम बरे, सतत आजू बाजुच्यांचा विचार करून वागणारी, हसतानासुद्धा माजून मोपून हसणारी. नोकरीच काय आयुष्यात देखील कोणतेही ध्येय न ठेवणारी, सतत सेकंड सीट घ्यायला तयार असणारी. जो पहिला मुलगा बघितला, आई वडीलांना आवडला आणि ती लग्न करून मोकळी झाली. आयुष्य हे सरळ सोट असते आणि ते तसेच जगायचं असतं, हा तिचा आजवरचा फंडा होता. पण कॉलेज मध्ये हा मिताली नावाचा किडा भेटला, आणि ती बदलली नाही पण तिला असे बंडखोरीचेपण एक जग असते याचाही जाणीव झाली. तिने ते जग लांबून बघितले, ती स्वतःला त्या सारखे करू शकली नाही, पण तरीही मिटली, तिच्या गोष्टी ऐकल्या की तिला एक धीर यायचा. कधी कुठला निर्णय घेताना तिला पुरेशी खात्री नसली, विश्वास नसला तर ती सरळ मितालीशी बोलायची, तिच्याशी बोलता बोलताच आपला प्रश्न सुटतो असे जान्हवीला वाटायचं. आजही जेव्हा तिला मोठा निर्णय घ्यायचा होता तेव्हा तिला मितालीशीच’ बोलायचे होते.
‘मीतू तुझा सल्ला पाहिजे मला.’
‘ते तर मला माहीतच होते, तू काम असल्याशिवाय मला कधी फोन लावतेस का?
'पण कामाच्या वेळी तरी मला तुझीच आठवण येते ना. मग झालं की. आता भांडायचं आहे की आधी बोलून घ्यायचं आहे ?'
'बोल बाई बोल, आज मी डस्ट बिन आहे कि, पोस्टाची पेटी आहे की कन्फेशन बॉक्स आहे?'
'नाही गाइडिंग स्टार आहे '
'म्हणजे काय कळले नाही? '
'सोप्पी गोष्ट आहे, मी आता काय करू हे तू मला सांगणार आहेस? म्हणजे रिया आता शाळेत जायला लागली आहे, किरण लपुढचे दीड दोन वर्ष तरी बाहेरचकाही चान्स नाही, जर त्याने नोकरी बदलली तरच काही शक्यता असू शकतात,बाकी आई बाबा येऊन जाऊन असतात. त्यामुळे मला परत काही तरि सुरु करायची इच्छा आहे,मला आता फक्त हाऊस वाइफ व्हायचं नाही आहे. '
'वाह माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर साक्षात्कार झाला की तुला. '
'आता तू हे असेचबोलत राहणार आहेस की काही सल्ला पण देणार आहेस?
'माझी फी माहीत आहे ना, बघ देऊ शकणार असशील तर मी बोलते नाहीतर राहू देते.'
'गर्ल्स नाईट आउट ना, डन तू म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तिथे. पण सांग ना मी काय करू?'
'
'गर्ल फ्रेंड मी सांगते पण मला सांग तुला नक्की काय करायचं आहे?'
'बघ तूच ती, तुझ्याशी बोलताना मला आरशात स्वतःशी बोलल्या सारखे वाटत. खरं सांगू मला इंजिनीअर वगैरेंकही व्हायचं नव्हतं, मला बेकर व्हायचं होतं , केक्स,कुकीज करताना मी अगदी स्वतःला सुद्धा विसरून जातंय,पण बाबा म्हणाले चांगले मार्क्स आहेत हो इंजिनीअर मी झाले इंजिनिअर. पण आता असे वाटतंय देवी तेवी दुसरी समाधी मिळतच आहे तर काय हरकत आहे हेअसे काही करायला. परत हे करताना रियाकडे पण दुर्लक्ष होणार नाही,किंवा दुसऱ्या कोणाचेही रुटीन बिघडणार नाही .’
‘अग जानू तू कधीतरी फक्त स्वतःचा विचार करायला शिकणार आहेस का ग? आता पण काहीतरी करायचं आहे तेव्हाही आधी सगळ्यांचा विचार करून मग त्यातून मिळालेल्या वेळेत काहीतरी करणार.’
‘सोड ग ते सगळं मी नाही बदलू शकणार, मी आहे ही अशीच आहे, मला आवडते सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांच्या बरोबर राहायला. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींना सुध्दा मग मी तयार असते आणि मला त्यात वाईट नाही वाटत.’
‘कधी तरी मला तुझ्यावर चिडावे की तुझे कौतुक करावे हेच कळत नाही. तू किती सॉर्ट आऊट आहेस, तुझ्या अपेक्षा क्लीअर आहेत, उगाच सगळ्याचा हव्यास धरत तू स्वतःलाच हर्ट नाही करत. मला तुझ्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते एवढ्या गोष्टीवर आपले अपोझिट पोल अजूनही एकमेकांना धरून आहेत बहुतेक.’
‘काय हे, मी तुला सल्ला विचारायला फोन केला आणि तू मला हे भलतेच काय ऐकवतेस.’
‘बरं हे कौतुक मी आपल्या नाईट आउट साठी राखून ठेवते. कमिंग बॅक टू युअर प्रॉब्लेम. तुलाच दोन्ही माहित आहे. गो अहेड गर्ल, तुला जे मनापासून करावसं वाटते ते कर ग, मला नाही वाटत किरणला हे आवडणार नाही, आणि नाही आवडले तरीही तुला आवडते आहे ना मग तू कर, तुझा आनंद बघून त्यालाही कदाचित ते आवडेल. अग त्याला स्वतंत्र दुसऱ्या शहरात राहणारी जान्हवी तर आवडली होती, तो कशाला नाही म्हणेल. तू काही लगेच दुकान काढणार नाहीस ना, पहिले होम ऑर्डर्स घेशील जम बसवशील आणि नंतर हा व्याप वाढवशील हो ना. मग तो कशाला नाही म्हणेल. इन्व्हेस्टमेंट पण फारशी नसणार आहे. आणि जर तुला पैसे लागणार असेल तर सांग मी देते. तू मस्त बनवतेस यार केक, पहिली ऑर्डर मीच देते हवे तर. ‘
‘याच साठी मला तुझ्याशी बोलायचे होते बघ, पैशाचा काही प्रश्न नाही ग,आणि किरणशी बोलले तर त्याला काय वाटते ते कळेल ना, मी अजून त्याच्याशी बोललेच नाहीये, त्याच्याशी बोलण्या आधी मला माझा आत्मविश्वास वाढवायचा होता, जो मला या फोन मधून मिळणार होता आणि मिळाला पण. जेव्हा केव्हा सुरु करेन तेव्हा पहिली ऑर्डर तुझीच घेईन बरे का ग ठमे. बाकी कशी आहेस?’
‘मी मजामा गं, आता एक प्रेसेंटेशन आहे, अर्ध्या तासात त्याची तयारी करत आहे.’
‘अग मग माझ्याशी बोलत काय बसलीस, जा काम कर, आणि जेव्हा फ्री होशील तेव्हा फोन कर.’
त्या दोघींनी फोन ठेवला, पण जान्हवीला एक नवा उत्साह या फोन मुळे आला होता. आयुष्यभर जे करायची इच्छा होती, ते करायचे तिने ठरवले होते. बाबांना तिने सांगितलेच नव्हते तिला काय करायचं होते, आता नवऱ्याला सांगून ती तिचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार होती. कोणीतरी तू हे करू शकतेस हे सांगायची गरज होती, आणि तिच्यासाठी हे काम मितालीने केले होते. तिला तिच्याशी भेटवायचे काम याही वेळी मितालीने केले होते. आरसा होऊन स्थिर उभे राहणे म्हणजे पण मैत्रीच असते ना !!!
मानसी होळेहोन्नूर
No comments:
Post a Comment