Saturday, November 24, 2018

पत्रं...

पत्र मुळात पत्र म्हणजे काय असते? कधी मनात राहिलेलं, कधी सांगता न आलेलं किंवा कधी खूप काही बोलायचं आहे पण बोलायची संधीच न मिळालेलं बोलणं. हो ना.
तुला माहीत आहे मला पत्रं किती आवडतात, लहानपणी तर मी माझी मलाच पत्रं लिहायचे. मग कोणतेही कारण मिळालं तर पत्र लिहायला तयार असायचे. शाळेत पत्र लेखन हा इतरांसाठी कंटाळ्याचा पण माझ्यासाठी आनंदाचा प्रश्न असायचा. पत्र कसे भरवू हा प्रश्न पडायचाच नाही, उलट आता अजून जागा कुठून आणू असा प्रश्न पडायचा. सुट्टीत मामाकडे गेलं की छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मला लिहायच्या असायच्या, आई बाबांना कळवायच्या असायच्या, आणि शाळा असताना मग याच सगळ्या गंमती आजीला कळवायच्या असायच्या. मग ऐकलेली नवीन गोष्ट, नवीन गाणे सांगायचे असायचे, ऐकलेली नवीन म्हण, नवा वाक्प्रचार वापरायचा असायचा. एकदा दोनदा तर मी मला कुठे कुठे भेटलेल्या लोकांचे पत्ते गोळा केले होते आणि त्यांना पत्रं पाठवली होती.
नाशिक मध्ये भेटलेल्या आसामच्या मुलीचे मला इतके अप्रूप वाटले होते कि मी तिचे नाव, पत्ता लिहून घेतला होता, एका इन लँडवर तिला जागोजाग पत्र लिहिले होते, तिला ते पत्र पोहोचलेच नाही की तिने ते वाचून रद्दीत टाकले माहीत नाही, मग एका बस मध्ये भेटलेल्या माणसाला कधी तरी पत्र पाठवली होती, काही वर्षे त्याने पण उत्तरे दिली, परत त्याला भेटलो, पण मग ते सगळे का थांबले माहित नाही. एका शिबिरात भेटलेल्या एका मुलाला पत्र लिहिली होती, त्याने पण दोन चार उत्तरं पाठवली, पण मग थांबलं सगळंच. असे एक ना अनेक किस्से. सुरुवातीला ईमेल करणे म्हणजे पण पत्र लिहिणेच की या आनंदात दोन दोन पाने भरून सॉरी टाईप करून मेल पाठवल्या होत्या. मग हळू हळू टाईप करण्याचा कंटाळा या सबबीखाली मेलचे आकार छोटे होत गेले, आणि आता तर कामाच्या शिवाय कोणाला मेल केली तर ते काय म्हणतील असा पहिला प्रश्न पडतो.
पत्र काय मेल काय तो असतो वाचवून साचवून, ठरवून केलेला संवाद, म्हणजे बोलण्याच्या ओघात विसरले गेलेलं खूप काही लिहिता लिहिता आठवतं, आणि ते लिहून झाल्यावर आठवलं तरी परत त्यात घालून वाढवता येते. संवादाचे मात्र तसे नसते, एकदा का कोणत्या तरी रस्त्याला गाडी लागली की परत ती त्याच रस्त्यावर आणणं महा कठीण काम असते, आणि ती गाडी वळवून आणली तरी ते वळण कधीच परत येत नसते, पत्राचे मात्र तसे नसते. एखादे वळण पुरवून पुरवून तिथेच ठेवते येते, त्याच्या भोवती पिंगा घालून त्याला तिथेच थांबवून ठेवता येते.
काहीजण याला एकतर्फी संवाद म्हणून नाकं मुरडतात, पण संवादात दोन माणसं असली म्हणजे कुठे तो दोघांचा संवाद होत असतो. एक जण बोलत असतो, ते दुसरा ऐकत असतो, कधीतरी त्यावर प्रतिक्रिया देत असतो, म्हणजे एकाचाच मुद्दा पुढे जात असतो ना? मग पत्रातून सुद्धा तर तेच होत असतं ना, वाचणारा वाचत असतो, मध्येच थांबून स्वतःला काही तरी सांगत असतो, मनातल्या मनात काहीतरी जोडत असतो. क्वचित कधीतरी लिहिलेल्या अक्षरांवरून हात फिरवून स्पर्शाची उब जाणवून देतं, तर कधी टाईप केलेल्या शब्दांतून दिलेल्या वेळाचे मोल...
पत्रांमध्ये संवाद साधण्याची शक्ती असते, बिघडलेला, बंद पडलेला संवाद सुरु करण्याची ताकद असते.
पत्र फक्त शब्द नसतात, त्यांनाही भावना असतात,
पत्र एकतर्फी नसतात त्यांना त्यांच्या वाटा माहीत असतात
पत्र शिळी होत नसतात, त्यांना एक्सपायरी डेटच नसते.
कोरड्या पत्रावर भिजलेले स्टँप असतातच.ना
पत्रांना पत्ता असतो, स्वतःची ओळख असते
ते कधीच हरवून जात नाहीत,
हरवले तरी कुठल्या तरी पत्त्यावर जाऊन धडकतातच,
पत्र बोलकी असतात, हसरी असतात,
रडकी असतात पण कधीही एकटी नसतात.
© मानसी होळेहोन्नूर

2 comments:

  1. Mam I likt it....th way u structure ur writng itz amazing...i read ur article in chaturang about th women(men) issue.....i automatically searched on google and read ur other writings....keep writing:-)

    ReplyDelete