Monday, January 28, 2019

मिशन बाबा बेबीसिटींग


‘सम्या दोन दिवस सुट्टी टाकतो आहेस, जातो आहेस कुठे गोवा की पॉन्डी?’
‘छे मी मस्त घरात बसून मिकी माउस क्लब हाउस बघणार आहे, कांचन जाणार आहे ट्रीप ला?’
‘कांचन जाणार आणि तू नाही जाणार म्हणजे काय?’
‘कांचन जाणार , मी नाही जाणार म्हणजे मी कांचन एकटी जाणार मी आणि स्पृहा घरीच थांबणार, गरज भासली तर कांचनचे आई बाबा येतील, पण बहुतेक आम्ही दोघेच असू घरी.’
‘मला काही समजत नाही तू काय म्हणतो आहेस ते? ईयरएंड आहे, तो पण सोमवारी, मस्त एक दिवसाची सुट्टी काढली तर चार दिवस सुट्ट्या मिळताहेत, फ्रायडे ऑफ घेतला तर पाच दिवस आणि तू म्हणतोयेस मी घरीच थांबणार आहे, कांचन फिरायला जाणार आहे. बरं मग ३१चि पार्टी तुझ्या घरी करूया मग?’
‘निख्या बायको नाही म्हणजे पार्टी पण नाही, मी बेबीसिटींग करणार आहे, चार दिवस आणि, कांचन इंदोर, मांडू फिरायला चालली आहे.’
‘समीर दादा मला काहीच समजत नाही आहे, मला हे सगळे समजावून सांगाल का?’
निखील भंजाळला, चिडला की हमखास समीरला समीर दादा म्हणून हाक मारायचा. दोघे एकाच गावातले एकाच वयाचे नाही, पण इंजिनीअरींग करताना निखील समीर च्या बॅचला आला होता. त्यानंतर दोघे वेगळ्या कंपनीत होते. पण या कंपनीतून त्या कंपनीत उड्या मारता मारता गेल्या दोन वर्षांपासून दोघे एकाच गावात, एकाच कंपनीत आले होते.
‘अरे सोपे आहे रे सगळे, चल कॉफी पिता पिता समजावतो तुला.’
‘देवा जशी तुमची आज्ञा.’
‘निखील अरे खरे तर ही काही अवघड गहन गोष्ट नाही. कांचन लवकरच कामाला परत सुरुवात करणार आहे. स्पृहा पण आता अडीच वर्षांची झाली आहे. गेली अडीच तीन वर्ष तिचे जग पूर्ण स्पृहामय झाले होते. या तीन वर्षात आम्ही तिघे फिरलो, पण ते बहुतेक वेळा बेंगलोर-पुणे, मुंबई घरगुती, लग्न, कार्यक्रमांसाठीच. नाही म्हणायला एक गोवा, केरळ ची मोठी तरीप बाकी आसपासच्या छोट्या छोट्या ट्रिप्स मारल्या, पण तरीही त्या सगळ्यातही कांचनचे निम्मे लक्ष स्पृहा खात आहे ना, तिचे रुटीन नीट पाळले जात आहे ना यातच होते. तिने त्या सहलींचा आनंद पूर्ण उठवला नाही असे मला वाटले. आपण ऑफिस मध्ये येतो, इथल्या कामाचे प्रेशर आहे, टेन्शन आहे म्हणून मित्रांबरोबर बाहेर जातो, पण बायकोलाही असेच कधीतरी वाटत असू शकेल ना? ती पण पोरगी, घर यात कंटाळून जाता असेलच ना रे. त्यातही नोकरी न करणारी बाई असेल तर झालेच. आपण इतके त्यांना गृहीत धरतो की नंतर नंतर त्या स्वतः सुद्धा विसरतात की त्यांना काही वेगळे हवे आहे. ‘
‘सम्या, हे खरेच भारी आहे रे. मी कधीच असा विचार केला नव्हता. तू म्हणतोस तशीच सिच्युएशन माझ्या पण घरी आहे की रे. म्हणजे अनघा तर नोकरी सांभाळून सोहमकडे पण बघते. मला मुळातच फिरायला आवडत नाही त्यामुळे मी फक्त माझा विचार करून घरात थांबतो. पण मी तिला कधी विचारलेच नाही तिला कुठे जायचे आहे का? तरी बरे, तू आम्हाला जबरदस्ती घराबाहेर काढतोस म्हणून आम्ही जरा तरी इथल्या इथे फिरलो आहोत. ‘
‘तर त्यामुळे मी कांचन साठी सोलो ट्रीप प्लॅनकरून दिली आहे चार दिवसांची. शुक्रवारी जाऊन सोमवारी रात्री ती येईल मग ३१ला आम्ही मस्त घरातच झोपून ईयरएंड सेलीब्रेट करू. चार दिवस स्पृहाची पूर्ण जबाबदारी मी घेणार आहे. बॅंकअप प्लॅन म्हणून कांचनचे आई बाबा आहेतच, तसेही ते तिच्या भावाकडे इथे आलेच आहेत. ‘
‘उगाच नाही कांचन तुझ्या मागे लागली होती.’
‘बाबा रे हे तिच्या समोर बोलू नकोस, तिच्या मते मीच तिच्यामागे लागलो होतो, माझ्यात विचारायची हिम्मत नव्हती म्हणून फक्त तिने विचारले होते.’
‘सम्या पण मानले पाहिजे यार तुला, हे सगळे तुला सुचले, आणि तू ते केलेस.’
‘तू मला किती वर्षांपासून ओळखतोस निखील?’
‘झाली असतील १२, १५ वर्ष.’
‘तरीही तुला वाटते हे मला सुचले असेल?’
‘म्हणजे?’
‘अरे हे सगळे ज्ञान मला अर्थात आमच्या बहिणाबाईंकडून आम्हाला मिळाले. ती मागच्या महिन्यात अशीच चार महिन्याच्या लेकीला आईकडे सोडून मस्त दोन दिवस फिरून आली. आमच्या मातोश्रींनी सुरुवातीला थोडी कटकट केली, पण सुखदाने स्पष्ट सांगितले, आई तू अजून चार आठवडे आहेस, त्यानंतर आम्ही तिघेच आहोत, मला थोडा माझा वेळ मिळू देत. इथे जन्मलेल्या मुलांना अशीच स्वतंत्र रहायची सवय असतेच. मूल हे फक्त आईची जबाबदारी असते का? ती तेवढीच वडिलांची पण जबाबदारी असते ना. आमचे गिरीश राव बिचारे हो ला हो करत मुंडी हलवत होते. आता जावईसुद्धा काही म्हणत नाही म्हणाल्यावर आईने ताणले नाही. आणि मग आमची सखु दोन दिवस एकटीच फिरून फ्रेश होऊन आली. आई सांगत होती, डिलेव्हरी झाल्याच्या ३ ऱ्या दिवसापासूनच ही उभी राहिली, पिल्लू ८ आठवड्याचे झाल्यावर जॉबला पण गेली. घरातले तर करतेच, पण तिच्या दोन मैत्रिणींची डोहाळेजेवण पण केली तिने तिचे पिल्लू सांभाळून. त्यामुळे जर तिलाही थोडा तिचा वेळ हवा असे वाटले तर काय चूक आहे. तर तेव्हा फोनवर तिनेच मला सांगितले कांचनला पण विचार तिला असे कुठे जायचे असेल तर तू स्पृहाची काळजी घेतलीच पाहिजे. आमच्या सखुचे हे एक बरे असते, ती तिची मते दुसऱ्यावर लादत नाही, म्हणजे मी केले म्हणून सगळ्यांची केलेच पाहिजे असा तिचा हट्ट नसतो. म्हणून मी कांचनला सरळ विचारले, तुला जायचे आहे का सोलो ट्रीपला. तिने पण दोन चार दिवस विचार केला आणि मग  स्वतःच सगळे ठरवून मला थेट बुकिंग दाखवले.’
‘तुम्ही सगळेच ग्रेट आहात, इस बात पार आजची कॉफी माझ्याकडून. मी देतो पैसे.’
‘निखील काही म्हण, पण कांचन हे सगळे ठरवल्यानंतर एकदम वेगळीच वाटायला लागली आहे रे. म्हणजे पूर्वीची कॉलेज मधली कांचन झाली आहे. स्पृहाला तिने स्पष्ट खरे खरे सांगितले आहे, त्यामुळे स्पृहाच्या पण मनाची तयारी झाली आहे. आम्ही इथे काय करायचे हे पण तिने ठरवलंय, आम्ही एक दिवस कब्बन पार्कला जाणार, एक दिवस मॉलला जाणार, एक दिवस क्रंची मसाला डोसा खायला जाणार, लिस्ट खूप मोठी आहे. ‘
‘सम्या आता घरी जाऊन मी पण अनघाला विचारणार आहे तिला असे कुठे जायचे आहे का, ती जर हो म्हणाली तर बेबी सिटींग करायला मला मदत करशील ना?’
‘अरे मग तेव्हा आपण बाबा आणि पोरं मिळून मस्त फिरायला जाऊया. आयांना काय करायचे ते करू देत.’
‘बरं तुझ्या मिशन बाबा बेबीसिटींग साठी काही मदत लागली तर नक्की सांग, मी आणि अनघा नक्की धावत येऊ.’
‘चल आता काम संपवतो, म्हणजे कांचन नसताना मला घरत laptop उघडावा लागणार नाही. तसेही कांचनला जसा तिचा वेळ मिळणार आहे तसाच मला पण माझा वेळ मिळणारच आहे ना, घरी सारखे फोन न करता ट्रीप ती एन्जॉय करते की स्पृहाचे हे सापडत नाही, आता काय करायचे हे विचारायला मी फोन करतो यावर आमची पैज लागली आहे, पैजेचा काय निकाल लागतो ते मी तुला २०१९ मध्ये सांगेनच.’
‘मित्रा बायकोला खुश केलेस, २०१९ तुला नक्कीच चांगले जाणार. बायको खुश तर घर स्वर्ग.’
मानसी होळेहोन्नूर

     


No comments:

Post a Comment