खरंतर दुपारी मी त्या भागात येणारच नव्हतो, पण आलो,
बाहेरचं खायचे नाही असं स्वतःला बजावत फक्त कॉफी घ्यायची
म्हणून आत बसलो.
असं एकट्यानेच जेवणं, कॉफी पिणे याची तशी आता मला सवय झाली
होती. जर सोबत कोणी असेल तरच उलट अवघडल्या सारखे व्हायचे. त्यामुळे रात्रीच्या
जेवणात सगळे जण जेव्हा एकत्र असायचे तेव्हा मला रोजच अवघडल्यासारखे व्हायचे. मग
नीलाने, माझ्या बायकोने सिरीयल लावायला सुरुवात केली आणि मला अक्षरशः सुटल्यासारखे
वाटायला लागले, इतरांचा वेग बघत, त्यांच्याशी बोलण्यापेक्षा स्वतःचे जेवण संपवून
मग कामाला लागलेले बरे त्यामुळे मी माझे जेवण आवरून सरळ आत जाऊन काहीतरी वाचत बसायचो,
लिहायचो. फेसबुकवर एका फेक आय डी वरून ते
काही बाही लिहिलेलं पोस्ट पण करायचे. मग त्यावरची मजा बघत बसायचो. खरेतर तो आय डी
मी केवळ तिला शोधून काढण्यासाठी केला होता. माझ्या खऱ्या आय डी वरून त्याला तिला शोधायचे नव्हते. कारण रिजेक्शन चे दुःख मला
परत नको होते. तिचे प्रोफाईल बघू, काय चालले आहे तिच्या आयुष्यात हे बघू यासाठी
फक्त तो आयडी होता. ‘ती सध्या काय करते’ हा प्रश्न पिक्चर आल्यापासून तर जास्तच
छळत होता. तसे आयुष्यात सगळे चांगलेच होते. पण तरीही एक उत्सुकता असतेच ना.
नीलाच्या पण आयुष्यात असा कोणीतरी असेलच ना, हा अविचार करून त्याचे मलाच हसू
यायचे. म्हणून मी माझ्या फेक आयडी वरून नीलाच्या प्रोफाईलला सुद्धा भेट द्यायचो,
तिला फॉलो करायचा तिला ते ही माहीत नसणार ही माझी खात्री होती आज सकाळपर्यंत.
मी त्या रेस्टॉरंटच्या आत जाऊन बसलो होतो, पण लक्ष बाकीच्या
लोकांकडेच होते. पहिले दोन ग्लास पाणी प्यायलो, आता अजून वेळ बसायचे असेल तर
काहीतरी ऑर्डर देणे गरजेचे होते, साडे तीन वाजून गेले होते, भूकही फारशी लागली
नव्हती, म्हणून मग फक्त कॉफी सांगितली. खरे तर एखादा ज्यूस, किंवा मिल्क शेक
सांगितला असता तर जास्त वेळ लागला असता, आणि अजून जास्त वेळ बसता आले असते, पण मग
नंतर परत रेस्टरूम शोधावे लागले असते, आणि जास्त गार खाल्ले असते तर लगेच घसा धरला
असता. आज तर नीलाला थाप मारणे सुद्धा शक्य नव्हते.
फोनमध्ये बघायचे नाटक करत करत मी इकडे तीकडे नजर फिरवत
होता, दोन तीन टेबलवर काही बायका दिसत होत्या, ती तिकडेच असेल की काय म्हणून उगाच
ओळखीची काही खूण सापडत आहे का बघत होतो. एम जी रोड च्या जवळ इतकी चांगली चांगली
हॉटेल्स असताना, या बयेने हेच हॉटेल का निवडले होते देव जाणे. एकतर गर्दी खूप
असते, त्यामुळे जास्त वेळ बसता येत नाही, आणि दुसरे म्हणजे पार्किंग पटकन मिळत
नाही, तरी बरं आजच्या पुरता पार्किंगचा प्रश्न सुटलेला होता.
फेसबुकवर हजारेक मित्र मैत्रिणी होत्या तिच्या, त्यातल्या
किती जणांना ही खरेच ओळखत होती, देव जाणे. पण तिच्या त्या पोस्टवर तब्बल १४५ लाईक
आणि ९० कॉमेंट होत्या, मूळ कॉमेंट ४५ होत्या, ४५ तिने दिलेले उत्तरे होती. त्याने
परत एकदा घड्याळ पाहिले, ३.४० झाले होते. वेटरने कॉफी आणून दिली होती. आणि सोबत
बिल पण, खरेतर बाहेर काही वेटिंग नव्हते, पण तरीही उगाच आमच्याकडे किती गर्दी असते
दाखवायचा एक प्रयत्न होता.
नेहेमीच्या सवयीप्रमाणे त्याने ३ मिनिटात कॉफी संपवली असती. पण आज त्याला ती कॉफी किमान
१० मिनटे पुरवायची होती.
ती आज इथे या हॉटेलवर दुपारी ३ वाजता येणारा आहे, असे तिनेच
टाकले होते. पण आता पावणे चार होऊन गेले तरी तिचा पत्ताच नव्हता. तसे तिला शेवटचे
बघितले त्यालाही २० वर्ष नक्कीच झाले होते, पण डीपीवरचा तिचा फोटो बघून आपण तिला
नक्की ओळखू अशी त्याची खात्री होती. ज्या टेबलावरून हसण्याचा जोरात आवाज येत होता,
हात धुवायच्या निमित्ताने तो तिकडे पण जाऊन बघून आला होता, त्या सगळ्या नुकत्याच
कॉलेजातून पास आउट झालेल्या दिसत होत्या, खूपच तरुण होत्या.
हा परतून जेव्हा आला तर चक्क ती त्याच्या टेबलवर होती, बहुतेक
सगळे टेबल भरले होते, आणी याच्या टेबलवर बडीशेपची ताटली बघून तीच तिथे बसली असावी
किंवा वेटरने तिला तिथे बसायला सांगितले असावे. हातातल्या मोबाईलवरून कोणाला तरी
व्हाटस अप करत होती. क्षणभर त्याला काय बोलावे सुचेच ना, डीपीवरचा फोटो आणि
प्रत्यक्षातली ती यात काही किलो, पांढरे केस आणि थोड्याशा मेक अपचा फरक होता. ओळखू येत होती, पण डीपी मध्येच जास्त आकर्षक
दिसत होती एवढे मात्र खरे. बाप रे, आता हिने ओळखले तर, काय बोलायचे कसे बोलायचे.
तसेही इथे आला तरी त्याला तिला भेटायचे नव्हते, फक्त बघायचे होते, पण आता तर ही
थेट समोर येऊनच उभी राहिली होती. जाऊ देत आपली बॅग घेऊन पटकन पळ काढावा असा विचार
करत असताना नेमका फोन वाजला, नीला पण अगदी चुकीच्या वेळेला फोन करते, न राहवून मला
वाटत होते, फोन घेतला नाही तर मी फोन घेईपर्यंत ती फोन करत राहणार, त्यापेक्षा फोन
घेऊन तिला कटवूया असा विचार करत मी हॅलो म्हणालो,
‘ हो हो निघतोय’
एकदम कानावर पडलेलं मराठी ऐकून तिने चमकून वर बघितले,
मी नजर टाळत, फोनवरचे बोलणे संपवले.
‘तुम्ही कुठले हो.’
माझ्याकडे बघत तिने
प्रश्न विचारला आता टाळणे अवघड होते,
‘नासिक’
‘के के वाघ मध्ये होता का हो तुम्ही?’
वाघाचा बकरा झाला होता, खाटीक समोर होता, त्यामुळे स्वतःहूनच
मान पुढे करत मी म्हणालो,
‘हो, पण तुम्हाला कसे माहीत?’
‘अरे खंड्या ना तू? मला नाही ओळखले का, मी जान्हवी, जान्हवी
काळे.’
नाट्यदेवतेला स्मरत मी जमेल तसा कायिक, वाचिक अभिनय करत
म्हणालो,
‘अग तू इथे काय करतेस? माय गॉड माझा तर विश्वासच बसत नाही,‘
मग पंधरा वीस मिनिटात जमेल तशा गप्पा मारल्या, म्हणजे ती
बोलत होती, मी ऐकत होतो.
‘खंड्या तुझे खरे नाव सांग ना, रॅगिंगच्या वेळी तू
किंगफिशरची अॅक्टिंग करताना दारू, तत्सम काही न करता त्यावरच्या पक्ष्याची नक्कल
केली होती आठवतंय ना तुला, तू अजूनही तसाच कोरडा आहेस, की आता तरी किंगफिशर म्हणजे
काय माहित आहे ना?’
‘अग तेव्हा मला खरेच माहित नव्हते, आता जग फिरून आल्यावर
खंड्याच काय पण जगभरातले पक्षी, फुले, फळे माहित झालेत बरं का मिस काळे.’
‘अरे पण त्या खंड्या प्रकरणामुळे मला आजतागायत तुझे नाव
नाही माहीत रे, त्यामुळे तू माझ्या फेसबुकवर सुद्धा नाहीस बघ, अगदीच अपघाताने
भेटलो बघ आपण. तुझा नंबर दे मला मी रिंग देते.’
आणि मग माझा नंबर, माझ्या नावाने तिने सेव्ह केलाच, लगेच
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
मी तिथून बाहेर पडेपर्यंत तरी आम्ही भेटायला नक्की येऊ
म्हणणाऱ्यापैकी कोणीही तिथे आले नव्हते, ती आतच थांबली होती, आत जाऊन तिला
सांगावसे वाटत होते, बाई तेव्हा मी असाच तुझी वाट पाहत होतो, आणि तू बाहेर निघून
गेली होतीस, आता तू जगाची वाट बघत आहेस, आणि जग पार कुठे निघून गेले आहे.
तेवढ्यात तू पळत पळत बाहेर आलीस,
‘अरे खंड्या आपला सेल्फी राहिलाच की रे,
हे बघ ये इकडे, चांगला येईल.’
मग तो सेल्फी फेसबुक, इन्स्टाग्राम अजून कुठे कुठे टाकत तू
रियुनियन म्हणून हॅश टॅग वापरलास खरा, पण तुला दिसणारा मी खरा नव्हतो, की मला
दिसलेली तू खरी नव्हतीस. आपल्याला तरी आपण कुठे भेटलो आहोत अजून. तुझ्यापेक्षा
माझ्या घरची परिस्थिती जरा कमीच होती, त्यामुळे तू मला शेवटच्या वर्षात टाळत होतीस,
माझ्या लग्नाच्या दिवशी मुद्दाम माझी बायको बघायला आली होतीस, मग अमेरिकेला जाताना
मला कळेल अशा मित्राला सांगून गेली होतीस. आज सुद्धा माझ्या गावात आलीस, हे मला
कळावे म्हणून कॉलेजच्या चार पाच जणांना टॅग करत या हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतंस.
अगदी ठरवून, अपघाताने भेटलीस की मला. हा सगळा ट्रॅप होता हे मला माहित नव्हते असे
वाटले का तुला? पण कधी कधी मोहात अडकावे, त्याला शरण जावे.
गाडीतच बसलेल्या बायकोला मी म्हणालो,
‘तुम्हा बायकांचे मला काहीच कळत नाही, मला भेटण्यासाठी ती
इथे आली, पण फक्त मला भेटण्यासाठी हे तिने कुठे जाणवू दिले नाही. ती इथे येणार आहे
हे माझ्या आधी तुला माहिती होते, आणि म्हणून तू जबरदस्ती मला इथे घेऊन आलीस. नक्की
काय मिळवले तिने आणि तू.’
माझ्या डोळ्यात डोळे घालत बायको म्हणाली,
‘त्याची आधीची ती बघितली की त्याची आपल्याकडून काय अपेक्षा
होती, किंवा आहे हे बायकोला कळते, तर खूप वर्षांनी त्याला बघून आपल्या नवरा
यापेक्षा काही वाईट नाही हे तिला कळते. आत्ता जे काही सोबत आहे, ते फार काही वाईट
नाही याची जाणीव होते, and then they lived happily सारखे आपलं आयुष्य पण होणार
असे वाटायला लागते. लोणचं मुरलं आहे याची जाणीव होते आणि आता ते खराब होणार नाही
ही खात्री पटते’
‘नीला, बायको मैत्रीण झाली तर ती सध्या काय करते, हा प्रश्न
पडणार नाही ना ग.’ गाडी सुरु करत तिच्याकडे बघत डोळे मिचकावत तो म्हणाला.
‘हो ना, मग आता तुझ्या फेक आय डीचा पासवर्ड मला दे म्हणजे
मी ‘तो सध्या काय करतो शोधते.’
गाडीचा गिअर बदलत तिरप्या नजरेने तिच्याकडे बघत म्हणालो,
‘तुझेच तर नाव आहे .’
मानसी होळेहोन्नूर
No comments:
Post a Comment