जानेवारी महिन्यामध्ये आपला शेजारचा देश एका वेगळ्याच कारणाने बातम्यांमध्ये गाजत होता. नेपाळ या हिंदुबहुल राष्ट्रामध्ये आजही अनेक हिंदू प्रथांचे परंपरा-रूढींच्या नावाखाली पालन केले जाते. नेपाळच्या खासकरून पश्चिम भागामध्ये आजही मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्रियांना घराबाहेर, गावाबाहेर एका छोटय़ा खोलीत, ज्याला ‘छोपाडी’ म्हणतात, तिथे जाऊन राहावे लागते. काही जणींना गोठय़ात त्यांचे ‘ते चार’ दिवस काढावे लागतात, तर काही जणी त्यांच्या घराच्या खालच्या अंधाऱ्या जागेत चार दिवस राहतात. आपल्याकडेही आदिवासी समाजात आजही ‘कुमराघर’ आहेत, ज्याची माहिती ‘चतुरंग’मध्येच गेल्या वर्षी आपण वाचली. शहरीभागात गेल्या काही वर्षांत हे चित्र बरेच बदललेले दिसत आहे, पण तरी आजही अनेक घरांमध्ये स्त्रियांना त्या चार दिवसांत स्वयंपाकघरात प्रवेश करू दिला जात नाही. नेपाळमध्ये स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात ‘बाहेर बसणे’ ही वर्षांनुवर्षांपासून चालत आलेली घटना आहे. एखादी स्त्री त्या काळात घराबाहेर गेली नाही तर त्या घरावर संकट येते किंवा कुटुंबप्रमुखावर एखादी आपत्ती तरी येते या समजुतीतून अनेक जणी दर महिन्याच्या चार रात्री अंधाऱ्या जागेत, असुरक्षिततेत घालवतात. नेपाळमध्ये डिसेंबर-जानेवारीमध्ये हाडे गोठवणारी थंडी असते. त्यामुळे अशा थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकदा स्त्रिया/ मुली रात्री शेकोटी लावतात. पण त्याच शेकोटीमुळे त्यांचा घात होऊ शकतो. कार्बन मोनॉक्साइडमुळे श्वास कोंडून अनेकींनी जीवदेखील गमावलाय. या ‘छोपाडी’ गावाबाहेर असल्या तर वन्य प्राण्यांची भीतीदेखील असतेच. मागील वर्षी अशीच एक स्त्री सर्पदंशामुळे मेली. त्यानंतर सरकारने या ‘छोपाडी’ प्रथेवर बंदी घातली आणि जो कोणी याचे पालन करणार नाही त्याला दंड आणि कारावासाची शिक्षादेखील ठरवलेली आहे. पण तरीही त्याने फारसा काही फरक पडलेला दिसत नाही. जानेवारीमध्ये अशा दोन, तीन घटना घडल्यामुळे पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांची नजर यावर गेली.
इतर अनेक धर्मामध्येही अशा प्रथा आहेत. त्यातून स्त्रियांवर मासिक पाळीदरम्यान अनेक बंधने लादलेली आहेत. काही धर्मातही त्या चार दिवसांत स्त्रियांना स्पर्श केला जात नाही. त्यांच्याबरोबर जेवणे, बसणे टाळले जाते. अनेक उच्चविभूषित स्त्रिया आजदेखील या प्रथेचे पालन करतात. स्त्रिया या कोणत्याही भागातल्या, धर्माच्या असोत मासिक पाळीसंदर्भातल्या बंधनांना आजही बळी पडत आहेत हे सत्य आहे.
मासिक धर्माच्या काळात चांगले पौष्टिक अन्न, पुरेसा व्यायाम आणि सोबतीची गरज असते त्याच काळात जर ही अशी वेगळी वागणूक मिळाली तर पाळीचा शारीरिकपेक्षा मानसिक त्रासच जास्त होतो. मासिक पाळी हा आपल्याकडे न बोलण्याचा किंवा कुजबुजत्या आवाजातच बोलायचा विषय आहे. त्यामुळे अनेकदा वयात येणाऱ्या मुलींना त्याची नीटशी कल्पनादेखील नसते. स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी कळतात, पण त्या अगदीच बटबटीत, अर्धवट किंवा किळस वाटण्यासारख्या वाटतात. अनेक शाळांमध्ये सहावी ते दहावीच्या फक्त मुलींना बोलावून काहीवेळा या सगळ्याची माहिती दिली जाते, पण यात मुलींनाच असे वेगळे बोलावून सांगितल्यामुळे ती मुलांसाठी थट्टेची तर मुलींसाठी शरमेची बाब होऊन जाते. या सगळ्याचा अनुभव असल्यामुळेच अदिती गुप्ताने २०१४ मध्ये मुलींना मासिक पाळीची योग्य प्रकारे माहिती देण्यासाठी ‘मेनस्ट्रॉपिडीया’ ही कॉमिक पुस्तके(कांची सीरिज) काढली. ती आणि तिचा पती तुहिन पॉल यांनी आजवर दहा भारतीय भाषांसह नेपाळी, स्पॅनिश, बल्गेरियन आणि रशियन भाषेतदेखील हे कॉमिक काढले आहेत. अतिशय साध्या सोप्या भाषेत मासिक पाळी, त्याचे परिणाम, शरीराची मूलभूत स्वच्छता, त्या काळात घ्यायची काळजी या सगळ्यांबद्दल सांगितले आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातदेखील ही पुस्तके अनेकींच्या मनातल्या शंका, भीती दूर करत आहेत.
वेंधळेपणा ऊर्फ ट्रेण्ड?
माणसाच्या चुका, गफलती, विसराळूपणा यातून काही फॅशन्स वा ट्रेण्डस् सुरू होत असतील यावर विश्वास नसेल तर मेरी यांचे उदाहरण पाहायला हवे. मेरी गे स्केंलोन या अमेरिकेतल्या नवनिर्वाचित सदस्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या असल्यामुळे एकदम जोशात आहेत. सध्याच्या जमान्यात तुम्ही काम किती केलंय याबरोबरच ते किती दाखवलंय हेसुद्धा महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्ड्इन अशा सगळ्या ठिकाणी सतत काहीतरी टाकत राहावे लागते. अशाच एका बैठकीसंदर्भातला फोटो ट्विटरवर टाकला. आणि सोबत लिहिले, ‘लोकं मला कायम ‘डीसी’मध्ये काम कसे असते याबद्दल विचारत असतात. आत्ता दुपारचे चार वाजून गेलेत आणि अचानक माझ्या लक्षात आले, सकाळपासून मी दोन पायात वेगवेगळे शूज घालून फिरत आहे.’ झालं, या त्यांच्या ट्वीटवर प्रतिसाद म्हणून मग अनेकींनी स्वत:चे अनुभव ‘शेअर’ केले. मेरी स्केंलोन यांच्याकडून कामाच्या दबावामुळे नकळत असे झाले खरे, पण अनेक ठिकाणी हा देखील ट्रेण्ड ठरला आहे.
निकोल किडमन, नाओमी हॅरीस यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींनी दोन पायांत वेगवेगळे शूज घालून हा ट्रेण्ड कायम ठेवला होता. याचबरोबर दोन्ही कानांत वेगवेगळे कानातले घालायची फॅशनसुद्धा आहेच. पूर्वी असे काहीतरी करणे हे गबाळेपणाचे, अव्यवस्थितपणाचे लक्षण समजले जायचे. आता त्यालाच ‘नवी फॅशन’ म्हणले जाते. मेरी स्केंलोनसारख्या अनेक जणी आपल्यातदेखील असतातच ज्या ऑफिसला जाताना दोन्ही पायांत वेगवेगळ्या चपला, नाहीतर घरातल्याच चपला घालून गेलेल्या असतात. कधी क्वचित कोणीतरी उलटी सलवार घालून गेलेलं असतं. अशा वेळी आपणच आपल्यावर हसलो आणि त्याची थट्टा केली तर बाकीचे कोणी हसल्याचे काही वाटत नाही. उलट ‘आपण किती कार्यमग्न असतो, म्हणून या अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टी घडतात’ असे म्हणायचे आणि हा धांदरटपणा ‘नवीन ट्रेण्ड आहे’ म्हणत आपणच सेट करायचा.
आहे मनोहर तरीही..
जगात असा एक देश आहे, जिथे ३७ टक्के स्त्रिया नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आघाडी सांभाळत आहेत. याच देशामध्ये ४० टक्के ‘चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स’ (सीईओ) स्त्रिया आहेत, तर ३४ टक्के ‘चीफ फायनान्शिअल ऑफिसर्स’(सीएफओ) स्त्रिया आहेत. या देशामध्ये स्त्रियांच्या उच्चशिक्षणाचे प्रमाण हे पुरुषांच्या उच्चशिक्षणापेक्षा जास्त आहे. अर्थातच हा देश युरोपमधला असणार किंवा अमेरिका असणार असा अनेकांचा अंदाज असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे. हा चक्क एक दक्षिण आशियाई देश आहे. सुंदर रुपेरी वाळूचे किनारे, नितळ पाणी याचबरोबर ‘मसाज पार्लर’साठी प्रसिद्ध असलेला हा देश आहे, थायलंड! थायलंडमध्ये नोकरी-व्यवसायाच्या नाडय़ा स्त्रियांच्या हातीच आहेत असे म्हटले तर चूक ठरणार नाही. इथली कुटुंबव्यवस्था, समाजरचनादेखील स्त्रियांच्या नोकरी, व्यवसाय करण्यासाठी पूरक आहे. पण असे असले तरीही या देशाच्या राजकारणात मात्र स्त्रियांचे अस्तित्व अगदीच नगण्य आहे. राजकीय पक्ष स्त्रियांना त्यांच्या मंचावर आणण्यास उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे २४० जणांच्या संसदेमध्ये अवघ्या १३ स्त्रिया आहेत. जगातल्या सगळ्यात प्रभावी देशात, अमेरिकेतदेखील स्त्री प्रतिनिधींचे प्रमाण जेमेतेम २३ टक्के आहे. आपल्या देशात सध्याच्या संसदेत ६१ स्त्री खासदार आहेत. जे आजवरचे सगळ्यात जास्त प्रमाण आहे.
थायलंडमध्ये पाच वर्षांपूर्वी स्त्री पंतप्रधान होत्या, तिथे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या स्त्रियांनी राजकीय योगदान दिलं आहे. पण स्त्रिया केवळ मोठय़ा पदांवर असून चालत नाही. निर्णयप्रक्रियेमध्येदेखील त्यांना मोठा वाटा मिळायला हवा आणि त्यासाठी कोणत्याही संसदेतील स्त्रियांचे प्रमाण वाढायला हवे. आज या घडीला अनेक देशांच्या पंतप्रधान/ राष्ट्रप्रमुख स्त्रिया आहेत. पण त्याच देशातल्या संसदेत मात्र स्त्रियांचे प्रमाण तेवढे दिसत नाही.
स्त्रिया व्यवसाय चांगला सांभाळू शकतात म्हणून त्यांना व्यवसायात सहज संधी उपलब्ध करून देणाऱ्या थायलंडमध्ये तोच निकष देश सांभाळण्यासाठी लावला जात नाही, हेच वास्तव आहे.
‘मदर्ली संडे’
ब्रिटनमध्ये आणि त्यामुळेच जगामध्येही सध्या चर्चा आहे ती ब्रेग्झिटची. युरोपीन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर निम्मा देश नाखूश असतानाही इतरांसाठी ब्रेक्झीट यशस्वी व्हावे म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे कसून प्रयत्न करत आहेत. लवकरच हा निर्णय घेतला जाईल. पण याच ब्रिटनमध्ये पारंपरिक गोष्टीलाही तितकंच महत्त्व दिलं जातंय.
जेव्हा अमेरिकाधार्जण्यिा सगळ्या देशांमध्ये ‘मदर्स डे’ मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होत असतो, तेव्हा ब्रिटनमध्ये तो मार्चमध्ये, धार्मिक उपवासांच्या काळात होत असतो. या वर्षी तो ३१ मार्चला साजरा होणार आहे. खरेतर हा ‘मदर्ली संडे’ या विचारातून सुरू झालेला आहे. या दिवशी आईला आणि चर्चमध्येसुद्धा फुले देण्याची प्रथा वर्षांनुवर्षे सुरू आहे. आता या वर्षी या फुलांवर ब्रेक्झीटचे सावट आहे. कारण युरोपातून फुले ब्रिटनमध्ये आयात केली जातात. पण व्यापाराच्या अटी, निर्बंध अजून फारसे स्पष्ट झालेले नसल्यामुळे फुलांचा व्यापार करणारे काळजीत आहेत. असे काहीही असले तरी वर्षांतून एकदा केवळ कौटुंबिक नव्हे तर धार्मिक महत्त्व असलेला हा दिवस लोकं साजरा करणारच. अमेरिकेतला मे महिन्यात साजरा होणारा (जो आता आपल्याकडे देखील साजरा होतो)
तो मातृ दिवस असो किंवा आपल्याकडे श्रावणात पिठोरी आमावास्येला साजरा होणारा पारंपरिक मातृ दिवस असो, जोपर्यंत एक दिवस तरी आईसाठी म्हणून साजरा होत आहे तोपर्यंत आपल्यातलं शहाणं मूल जिवंत आहे असे म्हणता येईल.
लोकसत्ता, चतुरंग, #पृथ्वीप्रदक्षिणा
३० मार्च २०१९
३० मार्च २०१९
(स्रोत- इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
No comments:
Post a Comment