पुढच्या आठवडय़ात ‘जागतिक महिला दिन’ नेहमीसारखाच जोरदार साजरा केला जाईल. एक दिवस सगळ्या स्त्रियांना महानतेच्या मखरात बसवले जाईल, त्यांची महती त्यांनाच ऐकवली जाईल आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्यांना त्या मखरातून बाहेर काढून त्यांच्या खऱ्या जगात आणले जाईल. तिथे त्यांना दुय्यम वागणूक मिळेल किंवा सौंदर्य, सोज्वळतेच्या अनेक मानकांमध्ये बंदिस्त केले जाईल. लग्न करताना आजही स्त्रीच्या बाह्य़ रूपाकडे सर्वप्रथम पाहिले जाते. मग त्यालाच सौंदर्याची परिमाणे असेही म्हटले जाते. स्त्रियांना स्वत:ला काय आवडते, यापेक्षा हे सौंदर्य कायम पुरुषांच्या नजरेतून ठरवले जाते. लांब केस, गोरा रंग, निमुळती पाऊले, सडपातळ अंगकाठी, कमनीय बांधा, अरुंद जिवणी, नाजूक ओठ, अर्धवर्तुळाकृती भुवया, प्रदेशांगणिक स्त्रियांच्या सौंदर्य मापनाचे निकष बदलत जातात. आफ्रिका खंडातल्या मॉरीटेनिया या देशातल्या काही भागात जाड असणे हा सौंदर्याचा निकष आहे आणि त्यासाठी कुमारवयीन मुलींना जबरदस्तीने खाऊ घालण्याची प्रथा या देशातल्या काही भागांमध्ये आहे.
एका बाजूला सहारा वाळवंट आणि दुसऱ्या बाजूला अटलांटिक समुद्र अशा बेचक्यात हा देश आहे. एक गरीब देश अशीच प्राथमिक ओळख असलेल्या या देशाचा एचडीआय (विकास निर्देशांक) आहे ०.५२०, त्यांचा १५९ वा क्रमांक लागतो. या देशाच्या काही भागांमध्ये, जमातींमध्ये स्त्रीचे सौंदर्य तिच्या वजनावरून ठरवले जाते. कदाचित पोटभर जेवणे ही एक चन असणाऱ्या या लोकांमध्ये त्यामुळेच जास्त खायला घातले तर स्त्री ‘चांगलीच’ दिसणार हा समज असावा. या अशा जाड मुलींना चांगले नवरे मिळतात. तिथल्या मुली, स्त्रिया यांच्यावर समाजाकडून, पुरुषांकडून जाड असण्याची सक्ती केली जाते. स्त्री जाड असेल तर तिचे लग्न लवकर होते, चांगला खात्यापित्या घरचा नवरा मिळतो, संसार सुखाचा होतो. त्यामुळे समाजात आपसूकच ‘फॅट इज ब्युटीफुल’ असा समज पक्का होतो. या कारणाने वयात येणाऱ्या मुलींना जरा जास्तच खायला घालून जाड करवतात. प्रसंगी घरातले बाकीचे उपाशी राहून या मुलींना जास्त खायला देतात. मुलीला जाड करणे हा तसा आखीवरेखीव कार्यक्रमच असतो. या भागात उंट मुबलक असल्यामुळे उंटिणीचे दूध भरपूर असते. ज्या मुलींचे वजन वाढवायचे आहे त्यांना सकाळी न्याहारीमध्ये १ लिटर उंटिणीचे दूध, साखर घालून प्यायला देतात. त्याचबरोबर पेज आणि रव्याचा ‘खुसखुस’ नामक खास पदार्थदेखील खायला देतात. हे एक वेळचे खाणे जवळपास ३००० कॅलरीच्या एवढे किंवा दहा चीज बर्गर इतके असते. त्या मुलींना हे खाणे दोन तासांत संपवावे लागते. त्यानंतर जेवण वेगळे, तेही असेच भरगच्च कॅलरींनी भरलेले. १२-१३ वर्षांच्या मुली एका दिवसात जवळपास १० हजार कॅलरी असलेले अन्न ‘उदरात भरतात’, जे त्यांच्या वयाला एरवी शोभेल अशा आदर्श आहाराच्या पाचपट असते. या वजन वाढवायच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढत वाढत त्यांचा दिवसातला आहार हा अखेर १६ हजार कॅलरी इतका होतो. ही खाण्याची जबरदस्ती इतकी भयंकर असते की, या मुली हे खातात की नाही हे बघण्यासाठीच एक बाई ठेवलेली असते. ती मुलींना काठीच्या धाकावर, जेवढे खायला-प्यायला दिले आहे ते संपवायला लावते. जर त्यांनी ते संपवले नाही तर ती त्यांना बांधून ठेवते. वर्षांनुवर्षे ही प्रथा सुरू आहे. तिथल्या पुरुषांच्या मते जाड स्त्रिया या शय्यासोबतीसाठी चांगल्या असतात, त्यामुळे मुलींनी जाडच असले पाहिजे. मग त्यासाठी हा असा ‘थोडा फार’ त्रास सहन केला तर काय बिघडते?
पूर्वी किमान जास्त खायला देऊन जाड करवले जायचे. आताशा या भागात काही मुली औषधे घेऊन झटपट जाड होण्याचा मार्ग अवलंबवत आहेत, जे वैद्यकीयदृष्टय़ा अधिकच घातक आहे. रस्त्यात भाज्या, फळे विकावी तसे अनेक जण स्टेरॉइड्स विकताना दिसतात, अर्थातच बेकायदेशीरपणे; पण लोकांच्या सौंदर्याच्या(?) भ्रामक कल्पनांमुळे ते सहज खपते. एकीकडे २४-३६-२४ राखण्यासाठी म्हणून न खाणाऱ्या, खाऊन ओकणाऱ्या, वेगवेगळ्या प्रकारची डाएट सांभाळणाऱ्या अनेक जणी जगात आहेत तशाच या जाड होण्यासाठी तडस लागूनही खाणाऱ्या, औषधे घेऊन जाड होणाऱ्यासुद्धा आहेत.
१०-१२ वर्षांच्या वयात सुरू करून लग्न ठरेपर्यंत असे जास्तीचे खाल्ल्याने मॉरीटेनियामधल्या अनेक मुलींना त्रास सहन करावा लागतो. त्याचा परिणाम म्हणून इथल्या स्त्रियांमध्ये हृदयविकार, मधुमेह, मूत्रिपड निकामी होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. दुर्दैवाने या गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही. आपण काय खावे, किती खावे हा साधा सहज अधिकारदेखील इथल्या हजारो मुलींना नाही. सौंदर्याच्या कल्पना आपणच बदलल्या पाहिजेत, आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारता आले पाहिजे. मॉरीटेनियामधल्या मुलींबाबत, समजाबाबत काही सांगू शकत नाही, पण आपण तरी आपल्या सौंदर्यविषयक कल्पनाचा विचार नक्कीच करू शकतो.
शूर सुरुंगशोधक
युद्ध फक्त काही काळापुरते काही लोकांपुरते मर्यादित कधीच नसते. त्याचे दूरगामी परिणाम पुढच्या काही पिढय़ांनाही भोगावे लागत असतात. फक्त सैनिकच नव्हे तर सामान्य नागरिकदेखील या सगळ्यात बळी पडतच असतात. आम्रेनिया आणि अझरबझान या दोन देशांमध्ये १९८८ ते १९९४ या काळात युद्ध सुरू होते, नागोर्नो करबखची लढाई म्हणूनही ते ओळखले जाते. वांशिक भेद आणि भूप्रदेशाच्या वादावरून झालेल्या या युद्धात ५० हजारांहून अधिक लोक मारले गेले. अर्थात हा युद्धकाळातला आकडा आहे. त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कोणी मोजतही नाही आणि विचारातही घेत नाही. आज पंचवीस वर्षांनंतरही या युद्धाचे परिणाम तिथल्या जनतेला भोगावे लागत आहेत. त्या वेळी जमिनीखाली गाडलेले सुरुंग शोधायचे आणि निकामी करण्याचे काम आजही सुरू आहे. हे भू-सुरुंग शोधून निकामी करण्याच्या कामात गेल्या काही वर्षांपासून स्त्रियादेखील सहभागी होत आहेत. एका सामाजिक संस्थेने २०१५ मध्ये स्त्रियांना या कामासाठी खास प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. २०२० पर्यंत हा भाग पूर्णपणे सुरुंगविरहित करून सुरक्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. आजमितीला ११ शूर स्त्रिया हे जोखमीचे काम लीलया करत आहेत.
ख्रिस्तीन काचतर्यन हिने डी-माइनर्स म्हणजे ‘सुरुंगशोधकाची’ नोकरी स्वीकारण्यासाठी शाळेतली अकाऊंटंटची नोकरी सोडली. तीन मुलांची आई असलेली ख्रिस्तीन सांगते, या सुरुंगांनी आमच्या समाजात अनेकांना त्रास झाला आणि म्हणूनच समाजासाठी काही तरी करण्याची मिळालेली ही संधी मला सोडायची नव्हती. आमचे काम अनेकांना जोखमीचे वाटते; पण आम्हाला त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिलेले असते, तर लुसीनचे काका अशाच एका सुरुंगाच्या विस्फोटात मारले गेले, हे दु:ख जवळून पाहिले असल्याने, असे दु:ख इतर कोणाच्याही वाटेला येऊ नये म्हणून ती हे काम करते. सिरन ओहान्यान हिनेदेखील तिची शिक्षिकेची नोकरी सोडून सुरुंगशोधकाचे काम स्वीकारले. या सगळ्यांचे म्हणणे आहे की, बायका उपजत अष्टावधानाने हे काम जास्त चांगले करू शकतात. २०२० पर्यंत ९० टक्क्यांहून जास्त प्रदेश सुरुंगविरहित असेल या विचारानेसुद्धा या सगळ्यांचे हात जोमाने काम करायला लागतात. कोणत्याही प्रसिद्धीपेक्षा या सगळ्या जणींना त्यांच्या पुढच्या पिढीसाठी मुक्त, सुरक्षित प्रदेश हवा आहे, त्यामुळेच गोठवणाऱ्या थंडीचा, भाजून काढणाऱ्या उन्हाचा त्यांना त्रास होत नाही. मुलांनी उद्या मुक्त फिरावे, त्यांना युद्धाची झळ लागू नये म्हणून सुरुंगशोधकाचे काम करणाऱ्या या स्त्रियांच्या धर्याला, धाडसाला खरा सलाम!
८२ वर्षांची विद्यार्थिनी
१० वी, १२ वीच्या परीक्षांचे सध्याचे दिवस आहेत. अनेक आजी-आजोबांनी नातवंडांबरोबर परीक्षा दिल्याच्या बातम्यादेखील आपण नेहमीच बघत असतो. ब्रिटनमधल्या एका आजीनींही वयाला मागे टाकत ८० व्या वर्षी थेट विद्यापीठात जाऊन क्रिएटिव्ह रायटिंगमधले शिक्षण घेतले आणि ८२ व्या वर्षी नर्ऋत्य लंडनमधल्या किंग्स्टन विद्यापीठातून क्रिएटिव्ह रायटिंगमधले मास्टर्स पूर्णदेखील केले. आयुष्यात अनेक वेगवेगळ्या नोकरी, व्यवसाय केल्यानंतर साठीनंतर हिलरी फोर्ड यांनी निवृत्ती घेतली होती. काही दिवस त्या घरी थांबल्यादेखील, मात्र इतके संथ, काम नसलेले आयुष्य त्यांना मानवेना. मग काही तरी नवीन करायचे या ध्यासाने त्यांनी शिकायचे ठरवले. अर्थात या सगळ्यामध्ये त्यांना त्यांच्या मुलींची आणि पतीचीदेखील साथ होतीच.
हिलरी यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांच्या नवऱ्याने वयाच्या ७९ व्या वर्षी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. हिलरींना अर्थात या गोष्टीचा अभिमान आहेच. त्या म्हणतात, तुम्ही निवृत्त झाल्यावर दोन गोष्टी करू शकता. एक तर सगळ्या गोष्टींसाठी रडत बसू शकता किंवा नवीन काही मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. मी दुसरा मार्ग स्वीकारला. या वयात त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत आणि तिसऱ्या पुस्तकाचे काम सुरू आहे. अनेक पाश्चात्त्य देशांत लेखन कसे करावे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. लेखन हादेखील एक पेशा समजला जातो. लेखन ही काही फक्त येता-जाता करण्याची किंवा ज्यांना सुचते त्यांनीच फक्त लिहिण्याची गोष्ट नाही, तर त्याचे तंत्र समजून कोणीही ते करू शकतो. त्यामुळेच अनुभव आणि तंत्र या दोन्हींच्या मदतीने हिलरी फोर्ड ८२व्या वर्षी लेखिका बनू पाहत आहेत. वयाच्या ८२ वर्षीसुद्धा नवीन काही सर्जनशील घडवू शकतो हेच या आजींनी दाखवून दिले आहे.
(स्रोत : इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
लोकसत्ता , चतुरंग २ मार्च २०१९''
No comments:
Post a Comment