Thursday, October 20, 2016

निखळ आनंदाचा मंत्र

दसरा आणि दिवाळी मधल्या पंधरा दिवसांची मजाच वेगळी असते. एकीकडे नवरात्र, दसऱ्यातून मोकळं होता होता वेध लागत असतात, फटाके, आकाशकंदील, पणत्या, किल्ला, फराळ, नवीन कपड्यांचे. पूर्वी फराळाचे सगळं दिवाळी सोडून क्वचितच वर्षाकाठी केलं जायचं, त्यामुळे दिवाळीला ते करण्यातलं आणी खाण्यातलं नावीन्य टिकून राहिलेलं असायचं. आता वर्षभर दिवाळी असल्यामुळे नवीन कपडे आणि लाडू, चिवडा, चकली, अनारसं चं फारसं कौतुक उरतच नाही. नशिबानं रोजच आकाशकंदील लावत नाही किंवा पणत्या लावत नाहीत म्हणून त्याचं तर ओत्सुक्य अजून टिकून आहे. किल्ला देखील अनेक प्रशिक्षित बालसंगोपनतज्ञांच्या मुलांनी मातीत, पाण्यात खेळल्यामुळे त्यांची मानसिक जडण घडण नीट होण्यास मदत होते  असं ठासून सांगितल्यामुळ परत ‘डिमांड’ मध्ये आले. तरीही माती कुठून मिळणार, सगळं घाण होईल त्यापेक्षा आपण विकत किल्ला आणूया म्हणणारे ही असतातच.

दिवाळी साठी घर साफसूफ करताना अगदी माळे सुद्धा आवरायला काढले. या माळ्यांमध्ये एक जादूची पोतडी असते. अनेक आठवणी, अडगळी, मोसमी सामान शेजारी शेजारी दाटीवाटीन गुण्यागोविंदान राहत असतं. कधी खोक्यात कधी गाठोड्यात असलेल्या या सामानात अनेक तुटक्या, फाटक्या वस्तू असतात. खरंतर आठवणी पुसता येत नाहीत, विसरता येत नाहीत पण आपल्याला उगाच वाटत असतं या गोष्टींशी निगडीत आठवणी विरून जातील, हरवून जातील जर आपण हे टाकून दिलं तर... मग जुनी सांगाडा उरलेली बाहुली, कुठल्यातरी मैत्र दिनाला मिळालेली छोटेशी पोर्सेलीनची भेट वस्तू,  कुठल्यातरी प्रदर्शनातून आणलेल्या काही शोभेच्या वस्तू, जुनी हस्तलिखित, आजीच्या, आजोबांच्या जपून जपून ठेवलेल्या गोष्टी, जुन्या पाईपचा एक तुकडा, कुठला तरी बॉक्सचा उरलेला थर्माकोलचा तुकडा, एक्स्ट्रा म्हणून वर ठेवलेली बादली, फिरायला गेल्यावर तिकडून कोणी तरी आणून दिलेले शंख, आणि असंच काय काय, अजून जपून ठेवलेली शाळेतली कंपासपेटी, भेट म्हणून मिळालेल्या देवी देवतांच्या मुर्त्या, कशाकशावर फ्री म्हणून मिळालेल्या टिनपाट गोष्टी सारी अडगळ दर वर्षी उघडली जाते, प्रत्येक गोष्टीवरून हात फिरवला जातो, काही आठवणींचा उजाळा केला जातो, आणि मग नावापुरत्या दोन चार गोष्टी बाहेर काढून टाकून, झाडू फिरवून घेऊन , आवश्यक तिथं पुसून घेऊन उठत असताना, लेक आला. त्याच्या दृष्टीने हा सारा खजिनाच होता. आजवर त्याला या साऱ्या पसाऱ्या पासून लांब ठेवलं होतं. पण आज त्यांनी घुसखोरी करून प्रवेश मिळवला होता. आणि हा हल्ला परतवण अवघडच नव्हे तर अशक्य होतं. त्याच्या छोट्या डोळ्यात मला जणू विश्वाचं दार उघडल्याचा आनंद दिसत होता. तिथला रिकामं खोकं, पाण्याचा पाईपचा तुकडा, मुर्त्या, काही डबे, काठी, थर्माकोल जुने तुटके आकाशकंदीलकाय काय तरी त्यांनी उचललं त्यानी आणि मी नको नको म्हणत असताना खेळायला घेतलं. खरं तर तो कचराच पण मला टाकवत नव्हता आणि ठेववत ही नव्हतं. पण मुलानी तो प्रश्न काही सेकंदात सोडवला होता. मुलांसाठी आयुष्य किती साधं सरळ असतं. त्यांना कधीच कुठे कचरा दिसत नाही. जे काही मिळेल त्यातून ते नवा खेळ मांडतात. महाग मोलाची खेळणी त्यांना जेवढी प्रिय असतात तेवढीच ही टाकाऊ खेळणी.

थोड्यावेळानी मुलांनी त्या कचऱ्यातून वसवलेलं एक गाव बघून वाटलं. आपल्या मनातल्या कचऱ्यातून, द्वेषातून, रागातून आपण असंच काही का नाही करू शकत? किती गोष्टी धरून ठेवतो. मनाचा माळा भरून वाहत असतो, आपण उगाचच अपमानाचे, भांडणाचे क्षण मनात धरून ठेवून बसलेलो असतो. कधी तरी ते साफ करावे लागतात, नाहीतर जाळी जळमट साचून, धूळ बसून मनाचा पोट माळा भरून रहाटू, तिथे मग चांगल्या आठवणी, भारलेले क्षण, कौतुकाची फुलं काही काही ठेवायला जागाच शिल्लक राहत नसते. मग या दिवाळीला हा मनाचा माळा साफ करायला सुरुवात करूया? कदाचित ही अशी साफसफाई केल्यावर मिळणारा दिवाळीचा आनंद हा निखळ आनंद असू शकेल.  


No comments:

Post a Comment