Thursday, October 6, 2016

कथा एका रंगाची...

तिला कायम प्रश्न पडायचा आपल्या आईला माहेर कसं नाही. लहानपणी मामाच्या गावाला जाऊ या हे गाणं ऐकताना तिनी विचारलं होतं, आई माझ्या मामाचं गाव कोणतं? आई काहीच बोलली नव्हती पण तिच्या डोळ्यातला लपलेला अश्रू मात्र तिला आज इतक्या वर्षानंतरही आठवतो. मग कधी तरी एका निबंधात तिनी मला मामा नाहीत आणि माझ्या आईला माहेर नाही असं लिहिलं होतं, तेव्हा बसवून आईनी सांगितलं होतं की तिला पण माहेर आहे, तिलाही भाऊ बहिण आहेत फक्त ते सारे आता दुरावलेत, परत असं कधी लिहू पण नकोस आणि त्या बद्दल विचारू पण नकोस, मला जेव्हा वाटेल की तुला सगळं समजेल तेव्हा मी स्वतःच तुला सांगेन.

बाकीच्या मुलांसारखे आपल्या घरी जास्त नातेवाईक येत नाहीत, क्वचित कधी आले तर वडिलांचेच, बाकी घरी जास्त राबता असायचा मित्र मैत्रीणींचाच, हे जेव्हा तिला आणि तिच्या भावाला लक्षात यायला लागलं तेव्हा ही ते गप्प राहिले होते, कारण त्यांचे आई बाबा बाकीच्या आई बाबांसारखे नव्हतेच. घरात कोणाला कोणाचीही चूक दाखवायचा हक्क होता, लहान मोठे पणा प्रत्येक गोष्टींबाबत केला जात नव्हता. आई बाबाला नावानी हाक मारत होती, आई वर मंगळसूत्र घालायची सक्ती नव्हती, बाबानीच किती तरी वेळा त्यांना अंघोळी घातल्या होत्या, आणि हो आईपेक्षा तोच स्वैपाक चांगला करायचा. आई साड्या, पंजाबी ड्रेस घालायची पण चुकूनही कधी आईकडे पिवळ्या रंगाचे काही नसायचं.

मग आता मुलांना समजेल असं जेव्हा आईला वाटलं तेव्हा आईनी सांगितलं होतं, तिचा आणि बाबाचा प्रेम विवाह होता. दोघांच्याही घरून विरोध होता, पण बाबानी स्पष्टच सांगितलं होतं, तुम्हाला जर हे मान्य नसेल तर तुम्ही अंतर ठेवू शकता, पण बाबाची आर्थिक मदत त्या घराला हवी असल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष अंतर ठेवलं होतं, आईचे मात्र माहेर या लग्नामुळे पूर्णच तुटलं होतं. दोन भावांची लाडकी बहिण होती ती, वडिलांची सगळ्यात लाडकी लेक होती, तिच्या दोन बहिणीपेक्षा हिला कायम प्रत्येक गोष्टीत झुकतं माप मिळायचं, त्यामानाने श्रीमंतीतच वाढली होती, आणि कॉलेज मध्ये बाबा भेटला आणि त्याच्या प्रेमात पडली, प्रेमात पडताना जात, श्रीमंती थोडीच बघितली जाते. तिला वाटलं होतं, तिचे पारंपारिक बाबा तिच्यासाठी बदलतील, पण तिच्या एका निर्णयानी तिचं आयुष्य बदललं पण बाबा नाही बदलले.

लग्नात पिवळी साडी मामा कडून येते, पण तिच्या आई बाबांच्या लग्नात असल्या साऱ्या प्रथा पाळायला कोणीच नव्हतं, तिच्या हट्टाखातर त्याचा विश्वास नसतानाही त्यानी विधी केले होते, पण तेव्हाही त्यांचे काही मित्र मैत्रिणी त्याची आई , आणि लग्न लावणारे गुरुजी इतकेच लोक होते. मग आयुष्यभर आई बाबांची आठवण म्हणून अग्नी सारखाच धगधगता जिवंत असा पिवळा रंग नेसायाचाच तिनी सोडला. आई वडिलांची आठवण विसरली जात नाही पण तरीही आपण आपल्या आनंदासाठी त्यांना दुखावलं याची बोच सलत राहावी म्हणून तिनी स्वतःलाच शिक्षा दिली होती. आईला तिच्या निर्णयाचा कधी पश्चाताप बाबानी होऊ दिला नव्हता पण तरीही एक घर आपल्यामुळे तुटलं याचा त्यालाही त्रास व्हायचा.

तिचं लग्न तिनीच ठरवलं होतं, समाज २०,२५ वर्ष पुढे गेला होता, घरातून विरोधाची शक्यता नव्हतीच बाहेरून कुठून पण तिला फारसे काही ऐकावं लागलं नव्हतं. त्याच्या घरून फक्त एकच अट होती लग्न विधीवत झालं पाहिजे. आपल्याला पटत नाही म्हणून कोणावर आपलं म्हणणं लादणं तिच्या घरी कोणालाच मान्य नव्हतं, त्यामुळे तिच्या बाबानी याहीवेळी माघार घेतली. बायकोला जो त्रास झाला तो लेकीला होऊ नये म्हणून ते जपत होते. तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. आपण लग्नाला पिवळ्या साडीत उभ्या राहू तेव्हा आईच्या जखमेवरची खपली निघेल असं तिला वाटता होतं, तर आईनी एका मानलेल्या भावाला सांगूनही ठेवलं होतं, लेकीला पिवळ्या साडी घेण्यासाठी, आपल्याला जे मिळालं नाही ते लेकीला मिळावं म्हणून.
तिनी जुनं पानं शोधून काढून मामाचा पत्ता मिळवला, मग काहीतरी कारण सांगून त्या गावाला गेली, आणि दत्त म्हणून दारात उभी राहिली. काळ सगळ्या जखमा भरून काढतो, इथं तर व्याज आजीच्या समोर उभं राहिलं होतं. सारं काही विसरायला सगळे तयार होते फक्त प्रश्न होता पुढच्या पावलाचा, जे तिनी तिच्या आईसाठी उचललं होतं. आजोबादेखील मावळले होते. लेकीला भेटायला उत्सुक होते, तिच्या नावाने सोडलेलं तर्पण विसरले होते. मामांच्या घराचा पहिला पाहुणचार घेवून ती तिच्या घरी गेली ती मामाला घरी गेली. आई तर किती तरी वेळ निःशब्द दारातच उभी होती. तिला सुचतच नव्हतं काय बोलावं. ओळख पटली होती पण सुरुवात कुठून करावी हेच माहित नव्हतं.

मग तिच्या लग्नासाठी म्हणून दोन पिवळ्या रंगाच्या साड्या घरात आल्या. आईचा मामा नव्हता पण माहेरची साडी तिनी घेतली आणि त्या धगधगत्या पिवळ्या रंगात तिला सोन्याचं झळाळत सुख मिळालं. बोहोल्यावर जेव्हा ती पिवळ्या साडीत उभी होती तेव्हा तिची आई देखील पिवळ्या साडीत दिमाखात तिच्या आईचा हात हातात धरून उभी होती. एका लग्नात सारं तुटलं होतं, तर दुसऱ्या लग्नात सारं जुळून येत होतं. आयुष्यभर पिवळ्या रंगाची धग आईनी डोळ्यांनी अनुभवली होती, आता पिवळ्या रंगाची उब अंगावर अनुभवत होती.


जाळणारा देखील पिवळा रंगच असतो, आणि सृष्टीचा रथ हाकणाऱ्या सूर्याचा रंग देखील पिवळाच, झळाळणाऱ्या सोन्याचा रंगही पिवळा, पिकल्या गळणाऱ्या पानाचा रंगही पिवळा, हळद ही इवली, डाळही पिवळी, सुर्यफुलही पिवळ, मोहरीचं फुलही पिवळ , पिवळ्या रंगाच्या छटांनी व्यापून राहिलंय आपलं आयुष्य. प्रत्येकीच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सोनेरी होवो असं सांगणारा पिवळा.... !!!!!!!!!!!!!! 

No comments:

Post a Comment