Thursday, October 27, 2016

दिन दिन दिवाळी....

त्यांच्या भावकीतलं कोणीतरी गेलं म्हणून त्यांच्या घरी यंदा दिवाळी नव्हती एवढंच त्याला कळल होतं. तसंही दिवाळीला बापाकड पैसा असला, तो प्यायला नसला , त्याचा मूड बरा असला तर नवा कपडा यायचा, नाहीतर मामा शहरातल्यांचे कपडे आणायचे तेच त्याचे नवीन कपडे. आई चिवडा, लाडू क्वचित शंकरपाळे करायची, पण गावभर उंडारायला मिळायचं, कोणाच्याही घरी गेलं तर काही तरी खायला नक्की मिळायचं त्यामुळं त्याला दिवाळी आवडायची. त्यात किल्ला करण्यात त्याचा कोणी हात धरायचं नाही. प्रत्येकाला वेगळ काही तरी तो करून द्यायचा त्यामुळे त्याला खास भाव होता. मग त्या बदल्यात कधी दोन चार टिकल्यांची बंडल, नाग गोळ्याचं पाकीट, फराळाचा जादा खाऊ असं काही काही तो वसूल करायचा. बघून बघून आकाश कंदील पण करायला शिकला होता, यावर्षी त्यांच्या घरावर तो स्वतःच केलेला आकाशकंदील लावणार होता, पण सगळंच फिस्कटल होतं.

गणपतीत त्याला १३ पूर्ण झाली होती. मामाकडे शहरात जायची त्याला खूप इच्छा होती. मामा दर वेळी त्याच्या सोसायटीच्या गंमती सांगायचा, तिथल्या मुलांबद्दल सांगायचा तेव्हा त्याला कित्येकदा वाटायचं, मामा ढील सोडतोय. पण मग मामा जुने कपडे, पुस्तक आणायचं तेव्हा त्याचा विश्वास बसायचा. त्याला ते जगच वेगळ वाटायचं. या सुट्टीत तरी मामाकडे जायचंच त्यानी मनाशी खुणगाठ बांधली होती. आणि आत्ता दिवाळीच्या निमित्ताने ती संधी पण चालून आली होती.
शहरात पैसे कमवायला गेलेला त्याचा मामा मुंबईमध्ये  एका सोसायटीमध्ये कामाला होता. एक छोटीशी खोली पण दिली होती त्या लोकांनी त्याला राहायला. गावात छोटी मोठी कामं करून साचवलेल्या पैशातून या सुट्टीत मुंबईला जायचंच त्यानी पक्क केलं होतं, त्यामुळे सण नाही हे त्याच्या पथ्यावर पडलं होतं. आईचा प्रश्न नव्हता, बापाला कसं पटवायचं हा खरा प्रश्न होता. नशेत असलेल्या बापाचे पाय दाबून त्यानी हळूच प्रश्न सोडून दिला होता, बाप आपण कशाला हो म्हणतोय हे कळण्याच्या धुंदीतच नव्हता. सकाळी त्यानी बापाला आठवण करून दिली त्याच्या शब्दाची तेव्हा चक्क तो शुद्धीत असूनही हो म्हणाला तेव्हा त्याच्या त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता.

जेव्हा त्यानी मुंबईचे मोठे रस्ते, लोकच लोकं पाहिली तेव्हा त्याला अगदी सशासारख वाटलं. तो भांबावलेल्या नजरेनीच सगळं पाहत होता. आपण इथं हरवलो तर त्यांनी मामाचा हात अजून घट्ट पकडून ठेवला. मामाच्या कामाच्या ठिकाणी तर त्या मोठ्या इमारती , मोठ्या गाड्या पाहून त्याला आपण दुसऱ्याच कुठल्या जगात आलो की काय असे भास होत होते.  सगळ्यांच्या घराची रोषणाई, झगमगणारे दिवे, आकाशकंदील त्याला प्रत्येक गोष्टीचं अप्रूप वाटत होतं. रात्री जेव्हा सारे जण फटाके उडवायला खाली आले तेव्हा तर त्याला वाटलं सगळ्या गावातले फटाके इथे आलेत की काय.

फटाक्यांचे इतके प्रकार त्यानी कधीच पाहिले नव्हते. दिवाळीला शकून म्हणून फटके उडवायचे, शहरातलं पाहून पाहून भुईनळी, भुईचक्र, बाण असे काय काय मिळायचं. पण इथं तर बघावा तो प्रत्येक फटका त्याला नवीन वाटत होता. त्याला हे सारं कधी घरी जाऊन सांगेन सगळ्या मित्रांना सांगेन असं झालं होतं. ती फटाक्यांची रोषणाई बघत बघत तो कधी पुढे गेला होता त्यालाच कळलं नव्हतं. मामानी फटके लांबून बघ सांगितलं होतं, पण संमोहित झाल्यासारखा तो वर बघत समोर बघत फटाके उडवतात त्या जागेपाशी जाऊन पोहोचला होता. खरं तर ती जागा मोठ्या माणसांची, त्यांच्यासारख्या नोकर माणसांची नाही, मामानी सांगितलं होतं, पण ते फटाक्यांच्या आवाजात कुठेच विरून गेलं होतं. त्याला तिथल्या काही फटाक्यांना हात लावायचा मोह होत होता. मामानी फटाके आणून देईन सांगितलं होतं पण मनाला धीर कुठे असतो, आकाशात जाऊन वेगवेगळ्या रंगाची उधळण करणारा बाण असतो तरी कसा बघावा म्हणून त्यानी बिचकत बिचकत तिथल्या एका लांब नळीच्या बाणाला हात लावला.

‘कोण रे तू?’ कोणीतरी हटकलेच.
‘मी ..’ त्याची बोलतीच बंद होत होती. खरं बोलावं की खोटं बोलावं संभ्रम सुटता सुटत नव्हता. तो मान खाली घालून मामाचा धावा करत होता.
धावा ऐकल्यासारखं मामा तिथं पळत आला.
‘ माफ करा हा माझा भाचा आजच गावावरून आलाय. त्यांनी कधी हे असे मोठे फटाके पाहिले नाहीत म्हणून चुकून हात लावला असेल.’
‘लेका अरे आणतो म्हणालो होतो ना मी, आधी त्यांना सॉरी म्हण. परत असं नाही ना करणार?‘
तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो सॉरी म्हणाला आणि मान खाली घालून तिथेच उभा राहिला.
‘बाबा माझे हे रॉकेट मी याला देऊ, आम्हाला शाळेत सांगितलंय, you should spread happiness by giving. मी खुप फटाके उडवलेत, यानी अजून काहीच उडवले नाहीत ना.’


ते वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पसरला होता. जेव्हा त्यानी पहिल्यांदा त्या नवीन दोस्ताच्या मदतीने पहिल्यांदा तो मोठ्ठा बाण आकाशात सोडला तेव्हा त्याला सगळं आकाश त्याच्या आनंदात न्हाहून निघाल्यासारखं वाटतं होतं. त्या नवीन दोस्तानी आणि यानी मिळून अजून काही फटाके उडवले आणि दिवाळीचे दिवे एकमेकांच्या हृदयात लावले होते.       

No comments:

Post a Comment