Tuesday, October 4, 2016

ये लाल रंग कब मुझे छोडेगा.....

मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी काही दिवसांची आणि ती खूप साऱ्या वर्षांची होती. तिचं नाव काढल्याबरोबर आमच्या घरात सारे जण जरा सावरूनच बसायचे. तिचा दबाबा म्हणा, आदर म्हणा किंवा भीती म्हणा पण आजोबांपासून ते माझ्यापर्यंत सारेच काहीही बोलताना, वागताना दोन सेकंद विचार करायचे आणि मगच वागायचे. तिच्यामुळे घर सांधल गेलं होतं. तिच्यात आणि माझ्यात तब्बल दोन पिढ्यांचं अंतर होतं. ती गेली तेव्हा मी काही वर्षांची होते, पण तरीही तिची ती लाल साडीतली पिटुकली मूर्ती डोळ्यातून काही हलत नाही.

तिचं लग्न झालं तेव्हा ती १०,१२ वर्षाची होती, त्या काळात त्याच वयात तर व्हायची तर लग्न. तिचं नशीब चांगलं म्हणून तिला वैद्यकीय शिक्षण घेणारा नवरा मिळाला होता. एका छोट्याशा गावात ती आपलं काचापाणी खेळण्यात, शेगडीवर स्वैपाक शिकण्यात, सोवळ ओवळ शिकत असताना साथीच्या तापाचं निमित्त झालं आणि तिच्या कुंकवाचा धनी अचानक गेला. लग्नात फक्त त्याला बघितलं होतं, आणि न्हाण झाल्यावर एक दोन वर्ष सासरी काढली तेवढाच काय संसाराशी तिचा संबंध आलेला. पहिल्यांदा तिचं केशवपन केलं तेव्हा ती १६ वर्षांचीच होती. आज आत्ता हे लिहिताना देखील माझे हात थरथराताहेत आणि तिनी तर आयुष्यभरासाठी लाल साडी जवळ केली होती.

ती खरं तर माझ्या आजोबांची आत्या, पण तिला भविष्यात कोण बघणार म्हणून मग आजोबा तिला दत्तक गेले आणि तिचा भविष्यकाळ सुरक्षित झाला. समाजात स्थान मिळवण्यासाठी ते टिकवून ठेवण्यासाठी आता तिला आधार होता तिच्या सोवळेपणाचाच. शक्य तेवढे उपवास, देवाचं भजन कीर्तन, कमीत कमी जेवण, तीर्थटन( ते ही स्वतःच्याच शिध्यासह , किंवा देवळांमध्ये जेवायच्या सोयीवर ), केशवपन आणि लाल आलवण तर जगण्याचाच एक भाग होता तिच्या. काळ बदलला तरी तिनी बदलणं शक्य नव्हत कारण तिच्या आयुष्यात काही बदल घडणं शक्यच नव्हतं, तो पर्याय जणू तिच्यावरच्या संस्कारांनी कधीच संपवला होता.

निर्जळी एकादशी करणं चातुर्मासाचे नेम पाळणं, नवनवीन भजनं गाणी म्हणणं हाच त्यांच्या आयुष्याचा परिक्रम होता. साधं सात्विक खाताना, आपली साधनशुचिता आजूबाजूच्या साऱ्यांवर लादणं ह्यात त्यांना कधीच काही गैर वाटलं नाही. मला मिळालं नाही म्हणून दुसऱ्यांना मिळू नये असा भाव नव्हता त्यात तर हे असंच जगायचं असतं अशी त्यांची ठाम धारणा होती. या मानलेल्या मुलाचा संसार त्यांनी त्यांचा मानला होता. त्यामुळे त्या संसारासाठी शक्य होईल तेवढी मदतही त्यांनी केली होती, त्यामुळे आश्रिताचं जीवन त्यांच्या नशिबी आलं नव्हतं. त्यांच्या त्या कष्टाची जाण घरातल्या मुलांनीच नव्हे तर घरात येणाऱ्या सुनांनीदेखील ठेवली होती. कुरबुरी थोड्या अनिच्छेनेच पण घरात पणजी असेपर्यंत तिचे सोवळेओवळे, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी घरात पाळल्या जात होत्या. त्या बरोबर होत्या कि नव्हत्या या पेक्षाही त्या सवयी, प्रथा पाळल्या तर पणजीला आनंद होतो म्हणून पाळल्या जायच्या. तेवढा मान तिनी तिच्या त्या लाल अलावण मधून कमावला होता.

आज सांगून खऱ्या वाटणार नाही अशा लाल साडीतल्या बायकांच्याबद्दल मी नंतर कन्नड साहित्यिक अनंतमूर्थी, भैरप्पा यांच्या पुस्तकांमधून वाचलं. तेव्हापासून तो लाल रंग डोक्यातून जाताच नाही. आजही जेव्हा जेव्हा पणजी आजीची जपून ठेवलेली लाल साडी हातात धरते तेव्हा तिचे न सांडलेले अश्रू मला हाताला लागतात. न जगलेल्या आयुष्याचे खरखरीत स्पर्श अंगावर काटा उभा करतात, अपूर्ण इच्छा आकांक्षाचे कढ हाताला लागतात, मारलेल्या मनाचे ओरखडे कुठे कुठे बोचतात. समाजाने भाग पाडायला लावलेल्या या सक्तीच्या आयुष्याची बोचही कुठे कधी जाणवते. पण तरी या सगळ्याला पुरून उरलेलं समाधान मायेच्या उबेनी बाकी सारं झाकून टाकत!


मला लाल रंग कधी मनापासून भावला नाही कारण माझ्या आजूबाजूचा हा लाल रंग मला कायम आठवण करून देतो अशा आयुष्यांची. खरं तर लाल रंग हा उत्तर भारतात अतिशय शुभ मानतात, नव्या जीवनाची सुरुवात समजला जातो. पण याच लाल रंगात आयुष्य संपवणाऱ्या अनेक विधवा, सधवांसाठी आजचा लाल रंग.....!!!!!!!!!!!!   

No comments:

Post a Comment