लेखनातील दैवी मध्यम
मानसी होळेहोनूर - रविवार १३ मार्च २०११
शास्त्रीय संगीतात सात स्वर मानलेले आहेत. त्यातला मध्यम हा फक्त नावाने नव्हे तर खरोखर मधला स्वर. बरं नुसताच मधला नव्हे तर जरा हटकेदेखील. म्हणजे इतर स्वर शुद्ध तरी राहतील किंवा स्वत:चे स्थान सोडून खाली तरी उतरतील पण हा एकमेव स्वर स्वत:पेक्षाही मोठा होणारा, अगदी तसेच काहीसे म्हणता येईल. श्री. बा. जोशींच्या ‘उत्तम- मध्यम या पुस्तकाबद्दल!
एक व्यासंगी वाचक, संग्राहक म्हणून श्री. बा. प्रसिद्ध आहेतच, पण वृत्तपत्रांमधील विविध सदरांमधून त्यांनी ही ‘गंगाजळी’ जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. गंगाजळीचे चारही भाग सुज्ञ वाचकांच्या ग्रंथसंग्रहात कधीच जाऊन बसले आहेत, त्याच परंपरेचा वारसा सांगणारं श्रीबांचं पुढचं पुस्तक आहे. ‘उत्तम- मध्यम’. वस्तुत: १९८८ साली श्री.बांनी केलेल्या स्फुटलेखनाचे हे संपादित रूप. पण लेखकाच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘उपवर मोठय़ा मुलीच्या आधी धाकटीचं लगीन जुळून यावं असा सुयोग कधीकधी अनुभवास येतो. तसेच काहीसे या थोरल्या लेकीला उजवण्याबाबत घडून आले. कनिष्ठ ‘गंगाजळीचे’ शुभमंगल अगोदर झाले आणि नंतर ज्येष्ठा ‘मध्यमा’ बोहल्यावर चढली. श्री.बां.चा हा मिस्कीलपणा पूर्ण पुस्तकभर जाणवत राहतो.
पाश्चिमात्य चित्रपटांचे, दूरवाहिनीवरील मालिकांचे भारतीयीकरण हे सध्याचे चलनी नाणे आहे. पण २२ वर्षांपूर्वी श्री.बां.नी लंडन टाइम्समधल्या ‘थर्ड लिडर्स’ च्या धर्तीवर वर्षभर ‘मध्यम’ हे सदर लिहिले होते. जडभारी समस्यांचे विवेचन करणाऱ्या आणि भारदस्त भाषेत रखडलेल्या दोन अग्रलेखांचा भार हलका करण्याचे काम हे ‘थर्ड लीडर्स’ करत असत. नंतर यथावकाश ‘थर्ड लीडर्स’ ‘फोटो लीडर्स’ झाले. या दोन्हीचे संग्रह वाचनात आल्यावर नकळत त्यांच्या प्रेरणेने, त्याच्या धर्तीवर ‘मध्यम’ हे सदर लिहिले गेले. श्री. बा. जोशी त्या काळी कलकत्त्यामध्ये वास्तव्यास होते. पण हे सदर मात्र त्यांनी ‘मधुमंत’ या टोपणनावाने लिहिले होते आणि कोण हा मधुमंत यावर त्या काळी वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. वेगवेगळे तर्क, वितर्कही लढवले जात होते.
एखाद्या विशिष्ट तारखेच्या निमित्ताने, एखाद्या पुरस्काराच्या निमित्ताने कधी किंवा कधी कुठल्याही कारणाशिवाय लिहिलेले असे स्फुट लेख या संग्रहात आहेत. कधी एखाद्या वाचलेल्या लेखाच्या पुस्तकाच्या निमित्ताने श्री. बा. वाचकांना लंडनच्या लायब्ररीत फिरवून आणतात तर कधी टीकेचे, उपेक्षेचे धनी झालेल्या शेवटच्या बाजीरावांबद्दल रोचक माहिती देतात. कधी टिनटिन या जगभर गाजलेल्या कॉमिक्सबद्दल लिहून बालसाहित्य हे फक्त काळापुरते मर्यादित नसते किंवा कॉमिक्ससुद्धा अभ्यासपूर्वक लिहिली जातात हेही त्यानिमित्ताने ते सांगून जातात. एका लेखामध्ये ग्रंथ, ग्रंथसंग्राहक आणि गृहिणी या व्यस्त त्रराशिकाबद्दल सांगताना देशविदेशातल्या अट्टल ग्रंथसंग्राहकांबद्दल सांगून जातात, तर कधी मराठी लोकांच्या विस्मरणात गेलेल्या, पण मराठीच असलेल्या पं. केशवराम भट्ट, तुलसीसाहेब, बापूदेव म्हणजेच एन. नृसिंग सीताराम परांजपे यांबद्दल लिहून या विस्मृतीत गेलेल्यांचा यथोचित सन्मान करतात. वस्तुत: या पुस्तकातील स्फुट लेख, त्या लेखांवरून झडलेल्या पत्रांच्या फैरी हे एका स्वतंत्र लेखाचे विषय होऊ शकतील.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सु. रा. चुनेकर म्हणतात, त्याप्रमाणे ज्ञानकोश आणि शब्दकोश यांच्यामधला हा एक वेगळाच प्रकार आहे. पण हे पुस्तक वाचत असताना प्रत्येक वाक्यागणिक आपल्याला जाणवत राहते श्री. बां. ची माहिती आणि पुस्तकांची श्रीमंती. त्याचबरोबर आपण किती खुजे आहोत, हेही लक्षात येत राहते. स्वत: लेखकाला मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच गुजराथी, बंगालीदेखील अवगत असल्या कारणामुळे त्या त्या भाषेतील संदर्भही सहजगत्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याचबरोबर लक्षात राहते ती श्री. बां. ची ज्ञानशूरता. श्री. बां. मधले परीसत्व, त्यांच्या स्पर्शामुळे दगडाचे सोन्यात रुपांतर होते आणि आपल्याला ‘घरबसल्या’ या सोन्याचा उपभोग घेता येतो. ज्ञानाचा अहंकार बाळगणारे, मिरवणारे अनेकजण असतात पण इतक्या सहजतेने ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या श्री. बां. ना ‘ग्रंथोपजीवी’ हे विशेषण शोभून दिसते.
खरे तर १९८८ हे स्फुटलेखन, पण त्याला वाचकांपर्यंत पोहोचायला उजाडले २०१० साल. जसे माणसांच्या पत्रिकेत ‘उशिरा भाग्योदय’, किंवा ‘कष्टाचे फळ मिळेल पण काही काळाने’ असे लिहिलेले असते, त्याप्रमाणे पुस्तकांची कुंडली मांडायची ठरवली तर ‘उत्तम मध्यम’बद्दल सर्व गुण उत्तम पण तरीही भाग्योदय उशिरा असेच म्हणावे लागेल. ‘मध्यम’ नावाच्या सदराचे पुस्तक येताना ‘उत्तम मध्यम’ झाले; पण तेही एक प्रकारे उत्तमच म्हटले पाहिजे. अनेक लेखांवरील आक्षेप किंवा भलामण करणारी अनेक पत्रे शेवटी छापली आहेत. ती वाचतानाच कळू शकतं या सदराने त्याकाळी वृत्तपत्रसृष्टीतच नव्हे तर जाणकार लेखक वाचकांमध्ये किती धुरळा उडवला होता. पद्मगंधा प्रकाशनच्या अरुण जाखडेंनी केवळ लेखच न छापता ही पत्रेसुद्धा छापून एकप्रकारे श्री. बां.चे, त्यांच्या लेखनाचे ‘मोठेपण’च नीटपणे पोचवले आहे.
गाण्यामध्ये स्वर्गीय, दैवी असा मध्यम लागणे हा साक्षात्कार समजला जातो, अनेकजण या साक्षात्काराचे साक्षीदार झाले असतील. परंतु असा दैव मध्यम लेखनातही लागू शकतो याचा प्रत्यय हे पुस्तक देते.