Sunday, November 1, 2026

बेंगलोर डायरी २

 बेंगलोर की बंगळुरू? सदराचे नाव ठेवतानापण मला प्रश्न पडला होता; पण जरी कागदोपत्री नाव बदलले असले तरी तोंडी बसलेले नावच ठेवू म्हणत ‘बेंगलोर डायरी’ हे नाव ठेवले. या शहराच्या या नावाबाबतपण एक आख्यायिका आहे. बाराव्या   शतकातील होयसळ  राजा वीर बल्लाळ दुसरा हा शिकारीहून येताना रस्ता चुकला; तेव्हा त्याला एक झोपडी दिसली.  राजाला भूक लागली होती म्हणून त्याने तिथल्या म्हातारीला काही खायला आहे का विचारले. तेव्हा म्हातारीने त्याला उकडलेले चणे खायला दिले. त्यावरून त्याने बेंदीत-काळू-ऊरु (बेंदीत म्हणजे उकडलेले, काळू म्हणजे खरेतर कोणतेही कडधान्य आणि ऊरु म्हणजे गाव) म्हणजे ‘उकडलेल्या चण्याचे गाव,’ असे नाव या गावाला दिले – ज्याचा अपभ्रंश होऊन आजचे बेंगळुरू झाले असे म्हणतात; पण त्याचवेळी नवव्या शतकात बांधलेल्या बेगूर येथील नागेश्वर मंदिराच्या शिलालेखावर मात्र बंगळुरू असा उल्लेख आहे.

आज जे शहर बंगळुरू म्हणून ओळखले जात आहे, ते  विस्ताराने एवढे मोठे आधी नव्हतेच. छोटी छोटी गावं, वस्त्या – ज्यांना स्वतंत्र ओळख होती – त्या सगळ्यांचे मिळून हे गाव बनले आहे. हळ्ळी म्हणजे गाव त्यामुळेच आजही बेंगलोरमध्ये कोडीगेहळ्ळी, बोम्मनहळ्ळी, मार्थहळ्ळी, मावल्ली अशी अनेक गावं गावपण विसरून या शहराचा भाग झाली आहेत. गमतीची गोष्ट अशी की जरी ही गावं आता शहराचा भाग झाली असली तरीही गावच्या म्हणून असलेल्या काही खास प्रथा आजही पाळल्या जातात; किंबहुना गावचे उत्सव तितक्याच उत्साहाने मूठभर टिकून असलेल्या स्थानिक रहिवाशांकडून आजही साजरे केले जातात. असाच एक  अनेक शतकांची परंपरा असलेला मेळावा  दरवर्षी कार्तिक महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी साजरा केला जातो – ही ‘कडले परिषे’ बंगळुरूची ओळख आहे. 

बुल टेंपल किंवा दोड्ड बसवा टेंपल ही बेंगलोरची एक ओळख आहे. पूर्वी गावाबाहेर असलेला बसवनगुडी हा भाग आता अगदी शहराचा मध्यवर्ती भाग झाला आहे. (मालगुडी डेजमधले मालगुडी म्हणजे (मल्ले)श्वरम+बसवन(गुडी) असे आलेले आहे) बेंगलोरमध्ये काय बघावे या यादीत अग्रस्थानी असलेल्या या जागेजवळ दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ‘कडलेकाई परिषे’ भरते. कडलेकाई म्हणजे भुईमुगाच्या शेंगा आणि परिषे म्हणजे मेळावा. खूप पूर्वी या देवळाच्या आसपासची जी गावं होती तिथल्या शेतांमध्ये शेंगदाण्याची शेतं होती; पण दर महिन्यात पौर्णिमेला एक वळू  यायचा आणि शेतांची नासधूस करून जायचा; त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी बसवाच्या देवळात म्हणजे नंदीबैलाच्या देवळातल्या नंदीला साकडे घातले, की आम्ही आमच्या शेतातली पहिली कापणी तुला वाहू; पण आमची शेते वाचव आणि त्यानंतर अचानक शेतात होणारा हा वळूचा उपद्रव थांबला. त्याचेच प्रतीक म्हणून कार्तिक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हा मेळा भरतो असे म्हणतात. इसवी सन १५३७  सालापासून ही परिषे भरत आहे. या परिषेच्या निमित्ताने बसवाला शेंगांचा प्रसाद दाखवला जातो. तेथील बसवाची मूर्ती दरवर्षी थोडी थोडी वाढायची आणि या वाढत्या मूर्तीमुळे देवळाला धोका होऊ नये म्हणून त्या मूर्तीच्यावर त्रिशूळाच्या रूपात खिळे ठोकले आहेत. या सोमवारच्या मागचे पुढचे दोन दिवस बुल टेंपल रोड हा फक्त शेंगाच नव्हे तर इतर अनेक गोष्टींनी भरलेला असतो. या वर्षी ११ डिसेंबरला  शेवटचा सोमवार आहे. हा परिषेचा मुख्य दिवस आहे.  

पूर्वीच्या काळी तर या परिषेच्या निमित्ताने शाळेला एक दिवसाची सुट्टी  दिली जायची. भुईमुगाच्या शेंगा, भाजलेले दाणे, फुटाणे हे या परिषेचे प्रमुख आकर्षण असते. एखाद्या छोट्या यात्रेसारखे इथे रस्त्यावर शेतकरी, विक्रेते त्यांच्या मालाची विक्री करतात . मुलांसाठी खेळणी, छोटे आकाशपाळणे अशा अनेक गोष्टींनी रस्ता भरून वाहत असतो. एक वेगळीच ऊर्जा असते त्यावेळी. याच धर्तीवर स्थानिक लोकांच्या आवडीच्या अवरेबेळे म्हणजे वालाच्या शेंगांचासुद्धा मेळावा जानेवारीमध्ये भरतो. व्ही. व्ही. पुरम भागात तिंडी बिदी म्हणजेच खाऊ गल्ली (बेंगलोरची खाद्य यात्रा इथे भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही.) भागात हा मेळावा भरतो. या भागातील वासवी कोंडीमेंट या दुकानाच्या मालकीण के. एस. गीता शिवकुमार यांनी २००० सालच्या आसपास हा मेळावा सुरू केला. 

स्थानिक लोकांचे वालाच्या शेंगांवर इतके प्रेम आहे, की थंडीच्या दिवसांत अनेक घरांत डाळीचे सांबार  न करता फक्त या वालाच्या शेंगांचेच सांबार करतात. भाजीमध्ये, सांबारामध्ये, घट्ट सार करण्यासाठी शक्य तितक्या पद्धतीने वालाच्या शेंगा वापरल्या जातात. पूर्वी घरोघरी दुपारी बायका बसून या शेंगा निवडण्याचे काम करायच्या. आताशा सोललेले दाणेदेखील मिळतात. नंतर साले रस्त्यावर फेकली जायची, मुद्दाम लोकांनी पायदळी तुडवावी अशा पद्धतीने, कारण जितके जास्त लोक ही सालं  तुडवतील, तितकी जास्त चव साराला येते अशी एक खुळचट कल्पना आजही अनेक जण बाळगून आहेत. मी हे स्वानुभवातून सांगत आहे. असेच  रस्त्यावर फेकलेल्या सालांवरून झालेले एक भांडणदेखील मी पाहिले आहे. 

 अवरेबेळे परिषेमध्ये सबकुछ अवरेबेळे / काई असते. म्हणजे डोसा, इडली, थालीपीठ, चित्रन्ना  या तर अगदी मामुली गोष्टी झाल्या; पण या मेळाव्याच्या निमित्ताने, वालाच्या शेंगांची जिलबी, गुलाबजाम, बर्फी, पुरणपोळीदेखील केली जाते. एका वर्षी आईस्क्रीमसुद्धा केले होते म्हणे. बाकी फरसाणासारखे प्रकार तर असतातच. काही वेळा दोन-तीन वेगवेगळ्या जागांवरसुद्धा हा मेळावा भरवला जातो. तुलनेने खूप नवीन असला हा मेळावा; तरीही याला दरवर्षी भरभरून प्रतिसाद मिळत असतो. वालाच्या शेंगा – त्यांवरचे इतके ओसंडून वाहणारे प्रेम हे बेंगलोरच्या कन्नडीगा, तेलगू, तमीळ या सगळ्यांना जोडून ठेवणारा  एक धागा आहे म्हणले तर ते चुकीचे ठरणार नाही.    

असाच बेंगलोरमधला आणखी एका महत्त्वाचा मेळा म्हणजे मँगो मेळा! दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लालबाग आणि कबन पार्क या बेंगलोरमधल्या बागांमध्ये हॉर्टीकल्चर विभागाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले जात असते. यात आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. आंब्यांबरोबरच फणसांचीदेखील विक्री होते आणि हो, इथे गरे विकत घेण्याऐवजी लोक अख्खा फणस विकत घेऊन तो घरी कापून खाणे जास्त पसंत करतात. फणस कोकणपट्ट्यात जितका आवडीने खाल्ला जातो, तेवढ्याच प्रेमाने इथेपण खाल्ला जातो. खीर, इडली, नुसते गरे किंवा मध घालून गरे तर खाल्ले जातातच; पण नंतर त्या आठळ्यांचादेखील वापर खूप नजाकतीने केला जातो. 

 बेंगलोरचे एक खूप मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे महानगर असले तरीही याने ग्रामीण चेहरा कायम ठेवला आहे आणि त्यामुळेच एखाद्या मोठ्या गेटेड  कम्युनिटीच्या शेजारीच एखादे मोठे शेत, गोठा बघायला मिळतो; किंवा विमानतळाच्या रस्त्यावर दोनशे  एकरांत कृषिविद्यापीठ वसलेले असते. या कृषिविद्यापीठात (GKVK  गांधी कृषिविज्ञान केंद्र)देखील दरवर्षी नोव्हेंबरमध्ये कृषीमेळा  भरतो. हा मुख्यत्वे शेतकऱ्यांसाठी असतो; मात्र शहरातील लोकदेखील मोठ्या हौसेने तिथे जातात. 

 बेंगलोर, बंगळुरू किंवा आमच्या भाषेत ऊरु/ लुरू अनुभवायचे असेल तर या अशा परिषे किंवा मेळ्याला नक्की भेट द्या. आधुनिक होताना जुनी मुळे सोडण्याची गरज नसते याचा प्रत्यय नक्कीच तुम्हांला येईल!!         

(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर,माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)


पूर्वप्रसिद्धी- इ-अंतर्नाद

बेंगलोर डायरी १

 एखादे गाव आपसूक आपल्या ओंजळीत येऊन पडते आणि आपल्याही नकळत आपण त्या गावावर प्रेम करायला लागतो. १४  वर्षांपूर्वी असेच बेंगलोर माझ्या वाट्याला आले आणि आता ते माझे गाव झाले आहे; इतके जास्त प्रेमाचे की मला बेंगलोरचा जाज्वल्य अभिमान वाटतो. माझ्या या शहराच्या अस्मिता अतिशय अणकुचीदार आहेत. मुळात हे सगळे केव्हा होते; जेव्हा आपली नाळ त्या जागेशी – शहराशी-  जोडली जाते तेव्हा. पूर्वी फक्त विवाहामुळे बायकांनाच घर, गाव बदलता यायचे किंवा बदलायला लागायचे; पण आता मात्र नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरे  नित्याची झाली आहेत.  एकाच गावातसुद्धा अनेक घरे बदलली जातात आणि नोकरीच्या निमित्ताने गाव, राज्य  किंवा देश बदलणे तर आता सररास बघायला मिळते. अशीच आपल्या लग्नसंस्थेची लाभार्थी होऊन मी बेंगलोरला  आले तेव्हा आडनाव सोडले तर माझा आणि कन्नड भाषेचा काहीच संबंध नव्हता. ते दिवस – ते  आज कन्नड भाषेत सहज संवाद साधणारी मी – हा प्रवास करताना आधी या शहराने मला आपलेसे केले आणि मग मी त्याला !


बघून सवरून  केलेल्या लग्नात या कन्नड घरात मराठी बोलतात ही गोष्ट माझ्यासाठी पुरेशी होती. उलट या अशा मराठी बोलणाऱ्या घरात  आल्याने  कदाचित आपल्याला आपली ‘मातृभाषा’ पुन्हा एकदा नव्याने शिकायला मिळेल हा माझा समज नव्याने कात टाकणाऱ्या   बेंगलोरने मोडीत काढला. येथे ज्या सहजतेने हिंदी इंग्रजीमध्ये  संवाद व्हायचे ते बघून मी कन्नड शिकायचा प्रयत्न सोडूनही दिला होता तो सुरू केला ते भारत सोडल्यावर! अमेरिकेत ज्या शहरात राहत होतो तेथे नवऱ्याचे अनेक जुने मित्र होते आणि त्यातील बहुसंख्य कन्नडीगा होते. बेंगलोर, मैसूरकडच्या या मित्र-मैत्रिणींमुळे कानडी हा योग्य शब्दप्रयोग  नाही तर तो कन्नड असा आहे  हा पहिला धडा शिकले आणि नंतर इतकी कन्नडीगा झाले की आता आपसूक त्यांच्याबरोबर कन्नडमध्येच बोलले जाते.  अशीच नवी नवी ओळख असताना अचानक  एक दिवस हे सर्वजण लाल पिवळ्या रंगाचे  कपडे शोधू लागले आणि कर्नाटकाचा नकाशा, झेंडा यांबद्दल चर्चा सुरू झाली.  मी विचारले, “हे काय असते नोव्हेंबरला?” तेव्हा ‘ये pspl नही जानती’ या जाहिरातीतल्यासारख्या सगळ्यांच्या माना माझ्याकडे वळल्या आणि सगळे एका सुरात म्हणाले, “कर्नाटका राज्योस्तव असतो १ नोव्हेंबरला!”  मी आपली मुंडी हलवून गप्प बसले. मग तो आयताकार लाल पिवळा झेंडा हातात घेऊन बघत असताना एकदम नवऱ्याने विचारले ‘महाराष्ट्राचा झेंडा कसा आहे?’ आणि मी गोंधळात पडले. असा राज्याचा झेंडा असू शकतो हीच गोष्ट मुळात मला नवीन होती आणि हो, कर्नाटक हे भारतातील एकमेव राज्य आहे, ज्याचा  स्वतःचा अधिकृत झेंडा आहे. 

भाषावार प्रांतरचना झाली आणि १  नोव्हेंबर १९५६  रोजी मैसूर राज्याची रचना प्रत्यक्षात आली. कन्नड भाषिकांचे राज्य तयार झाले. अर्थात बेळगाव, निपाणी, बिदर यांसारख्या गावांचा प्रश्न अजूनही अनिर्णित आहे; पण बहुसंख्य भाषिकत्वाचा विचार करून या राज्याची निर्मिती झाली आणि १९७३ साली मैसूर राज्याचे नामकरण ‘कर्नाटका’ असे झाले. त्यामुळे या वर्षी या नामकरणाची पन्नाशी साजरी करण्यात येत आहे. करूनाडू वरून पडलेले नाव कर्नाटका अशी लोकमान्यता आहे. करू म्हणजे काळी माती आणि नाडू म्हणजे जागा – काळी माती असलेला प्रदेश – असे जरी नावात असले तरी इथे काही फक्त काळी माती नाही; किंबहुना तुंगभद्रेच्या खाली लाल मातीच जास्त बघायला मिळते.  

३१  जिल्हे व ४ विभाग यांत हे राज्य विभागलेले आहे. इथल्या प्रत्येक विभागातील कन्नड वेगळी आहे असे म्हटले तरी चालेल; पण कन्नड अस्मिता मात्र एकसारखीच आहे. ही कन्नड अस्मिता राज्याच्या झेंड्याच्या रूपातून दाखवली जाते. रिक्षेवर, रिक्षेच्या आत – बाहेर छोटे स्टीकर किंवा झेंडा नसला तर बहुतेक त्यांना त्यांच्या संघटनेचे सभासदत्व मिळत नसेल इतक्या मोठ्या प्रमाणावर रिक्षेमध्ये झेंडे बघायला मिळतात. या झेंड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे काही मानक नाही. आयताकार आणि वरचा भाग पिवळा आणि खालचा भाग लाल रंगांमध्ये रंगवला की झाले! या पिवळ्या-लाल रंगाचे वेड इतके भिनलेले असते की हारांपासून ते पताकांपर्यन्त सगळीकडे फक्त हे दोनच रंग भरून राहिलेले असतात. घरांवर, दुकानांवर, गाड्यांवर जिथे शक्य आहे आहे तिथे सगळीकडे हे पिवळे लाल रंग नोव्हेंबर महिनाभर दिसत असतात.

सरकारी पातळीवर हा दिवस मोठ्या झोकात साजरा होतो; शिवाय तो घराघरांत  साजरा होतो; पण मला सगळ्यात जास्त आवडतो तो रिक्षास्टँडवर साजरा होणारा कोणताही सण. गणपती  असो,  सत्यनारायण पूजा असो किंवा कर्नाटका राज्योत्सव साजरा करणे असो – त्यातला उत्साह खूपच मोठा असतो – ती स्टँडची जागा सजवणे, छोटासा मंडप घालणे ,फुलांची सजावट, खाण्याची सोय करणे सगळे काही बिनबोभाट सुरू असते. भाडी नाकारणारे बहुतांश रिक्षावाले या अशा ठिकाणी मात्र अगदी घरचे कार्य असल्यासारखे वावरत असतात.     

माझ्या आजवरच्या येथील वास्तव्यात मला कळलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एखादा सण त्याच दिवशी करायचा असेही काही ठरलेले  नसते. नाही जमले त्या दिवशी तर तो सण आपल्या सोयीने करायचा. म्हणजे गणपती भाद्रपद चतुर्थीलाच बसवायचा असे नसते.  भाद्रपद महिन्यात जेव्हा जमेल तेव्हा सकाळी, दुपारी गणपती बसवायचा आणि संध्याकाळी विसर्जन करायचे इतके साधे सोपे नियम इथल्या सार्वजनिक ठिकाणच्या समारंभासाठी असतात. त्यामुळेच कर्नाटका राज्योत्सव हा फक्त १  नोव्हेंबरला साजरा करायचा असे काही नसते. हा महिनाभर ज्यांना जसे जमेल तसे ते साजरा करतात. कन्नडीगा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरीही ते हा दिवस साजरा करतातच. कन्नड भाषा तिच्या वेगवेगळ्या बोलींसह – बेळगाव, धारवाड, चामराजनगर, विजापूरपासून ते मेंगलोरपर्यन्त सगळ्यांना जोडून ठेवते. त्यात आमच्या बेंगलोरमध्ये  या सगळ्यांचे प्रतिनिधित्व बघायला मिळतेच. त्याचबरोबर बाहेतरून येऊन इथे स्थायिक झालेले काही जण इथली भाषा शिकतात; तर काही जण भाषा न शिकताही   या गावाला आपलेसे करतात. हे सर्वजण  केवळ सुट्टी असते म्हणून नाहीतर  कर्नाटकाच्या  मिठाचे ऋण जाणण्याचा एक मार्ग म्हणून हा राज्योत्सव साजरा करतात. 

पूर्वप्रसिद्धी -इ-अंतर्नाद

Thursday, December 26, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा २६

‘सौंदर्याच्या काही व्याख्या, मानके असू शकत नाहीत. कारण सौंदर्य हे बघणाऱ्यांच्या ‘डोळ्यात’ असते, तरीही दर वर्षी ‘मिस युनिव्हर्स’, ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धा होतच असतात. या सौंदर्य स्पर्धामागची गणिते खूपच वेगळी असतात हे आत्तापर्यंतच्या स्पर्धामधून दिसून आले आहेच, पण तरीही या स्पर्धाचा जनमानसावरचा प्रभाव पुसता येत नाही. या वर्षी दक्षिण आफ्रिकेची झुझीबिनि टुंझा ही कृष्णवर्णीय सुंदरी विजेती ठरलेली आहे. आजवरच्या ६८ वर्षांच्या जगतसुंदरीच्या स्पर्धेमध्ये केवळ सहा कृष्णवर्णीयांना जगतसुंदरीचा मान मिळालेला आहे. झुझीबिनीचे अजून एक खास वैशिष्टय़ म्हणजे तिचे केस. आखूड, कुरळे, विरळ केस ही खास आफ्रिकन वैशिष्टय़े असलेली झुझीबिनी ही पहिली जगतसुंदरी ठरलेली आहे.
या स्पर्धेतली आणखी एक घटना म्हणजे ‘मिस म्यानमार’ने दिलेली कबुली. म्यानमार हे बौद्धबहुल राष्ट्र. समलैंगिकता हा तेथे गुन्हाच समजला जातो, पण ‘मिस युनिव्हर्स’मुळे मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून मिस म्यानमार, स्वे झिन हातेत हिने ती समलैंगिक असल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये कुणी ही बाब जाहीर करण्याची पहिलीच वेळ होती. २०१३ मधल्या दुसऱ्या क्रमांकाची विजेती पॅट्रिशिया युएना रॉड्रिग्ज हिने तिचा कार्यकाल संपता संपता ती समलैंगिक असल्याचे जाहीर केले होते. स्वे झिन ही स्पर्धा न जिंकताही लक्षात राहील. तिने नोव्हेंबरमध्ये ही बाब जाहीर करतानाच सांगितले, की ‘माझ्या देशात समलैंगिक असणे हा गुन्हा समजला जातो. त्याविरुद्ध लढा देण्यासाठीच मी या व्यासपीठावर ही कबुली दिली आहे. याचा माझ्या देशातल्या ‘एलजीबीटी’ चळवळीला खूप मोठा फायदा होणार आहे.’ सौंदर्य स्पर्धामध्ये सौंदर्याबरोबरच बुद्धीचासुद्धा विचार केला जातो. त्यामुळेच स्पर्धक काय उत्तर देतो यावर अनेकदा विजेतेपद ठरवले जाते. झुझीबिनीने ‘मुलींना काय शिकवले जावे असे तुम्हाला वाटते,’ या प्रश्नावर, ‘मुलींना नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे,’ असे सांगितले. तर स्वे झिनने मिळालेल्या संधीचा फायदा घेत, आपण लेस्बियन आहोत, हे सांगून ही स्पर्धा बाह्य़ सौंदर्याच्या दिखाव्याची नाही, इथे स्त्रीविषयक नवनवीन प्रश्नांचा, घटनांचा उहापोह व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सौंदर्यस्र्पोचं व्यासपीठ स्त्रीच्या आशाआकांक्षांवर, विविध विषयांवर चर्चा  करणारं होवो, अशी अपेक्षा हे वर्ष सरता सरता करायला काय हरकत आहे?
तिची संगीतिका
व्हिएन्ना ही काही फक्त ऑस्ट्रियाची राजधानी किंवा मोठे शहर म्हणून प्रसिद्ध नाही. या शहराची वेगळी ओळख आहे, ती म्हणजे संगीताचे शहर. मोझार्ट, बीथोवेन, फ्रांझ शुबर्ट, जोहान्स ब्राह्म्स, रॉबर्ट स्टोल्झ, जोहान स्ट्रोस अशा अनेक मान्यवरांनी इथे संगीतसाधना केलेली आहे. इथल्या ‘सिटी ऑपेरा हाऊस’ला दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र गेल्या दीडशे वर्षांत न झालेली गोष्ट आता तिथे होणार आहे. लवकरच तिथे ओल्गा न्यूवर्थ या ऑस्ट्रियामधल्याच स्त्री संगीत दिग्दर्शकाने बसवलेल्या ऑपेराचा प्रयोग होणार आहे. व्हर्जिनिया वूल्फ यांनी १९२८ मध्ये लिहिलेल्या ‘ओरलॅंडो’ या कादंबरीवर आधारित ही संगीतिका असेल. अर्थात, ही कथा एकविसाव्या शतकाच्या अनुषंगाने बदललेली आहे. ऑपेराच्या दिग्दर्शक स्त्री असणं हे काही नवीन नाही. अगदी सतराव्या शतकापासून स्त्रियांचे या क्षेत्रातील कर्तृत्व बघायला मिळते, पण तरीही त्यांना हक्काचे व्यासपीठ मात्र आजवर सहजासहजी मिळाले नाही. न्यूयॉर्कमधल्या ऑपेरा हाऊसमध्ये स्थापना झाल्यानंतर ११३ वर्षांनी, २०१६ मध्ये, कैजा सारीआहो यांचा प्रयोग झाला, जो त्या ‘ऑपेरा हाऊस’मधला स्त्री दिग्दर्शकाने सादर केलेला पहिला ऑपेरा होता. आजही स्त्री कलाकारांना सहजासहजी कामाच्या संधी मिळत नाहीत. एका स्त्री दिग्दर्शकाने तिचा अनुभव सांगितला होता, जो अगदीच प्रातिनिधिक म्हणावा लागेल. तिने जेव्हा तिच्या रचना दाखवल्या, तेव्हा ‘अरे हे तर अगदीच सोपे आहे,’ असे म्हणून लोक तिच्या कामाला निकालात काढत होते, पण तिने ‘ते गाऊन बघा आणि मग सांगा, सोपे आहे की अवघड,’ असे स्वत:चे म्हणणे रेटून नेले तेव्हा त्या इतर कलाकारांनी गाऊन बघण्याचा प्रयत्न केला. अर्थातच, हे सोपे नसल्याचे त्यांच्या लगेचच लक्षात आले.
केवळ तुलना म्हणून नाही, पण आपल्याकडच्यादेखील शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या चित्रपटसृष्टीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच स्त्री संगीत दिग्दर्शक बघायला मिळतात. केवळ गुणवत्ता नाही म्हणून नाही, तर संधीचा अभाव हे त्यातले एक महत्त्वाचे कारण असू शकते. जात्यावर बसल्या बसल्या गाणी रचणाऱ्या, कोणतेही काम करताना सोबत गाणे गुणगुणणाऱ्या, अनेकजणी पूर्वीही होत्या, आताही आहेत आणि पुढेही असतील. संगीत हे निव्वळ स्वरांची बांधिलकी मानते, त्यात स्त्री-पुरुष असे भेद नसतात. त्यामुळेच ‘व्हिएन्ना सिटी ऑपेरा हाऊस’मध्ये यापुढे अनेक स्त्री दिग्दर्शित ऑपेरा बघायला मिळतील. केवळ तिथेच नव्हे तर जगभर जिथे जिथे ऑपेरा आहेत तिथे स्त्रियांना समान संधी मिळतील. प्रत्येक वेळी केवळ समानतेसाठी म्हणून नव्हे, तर संधी लवकर आणि सहज मिळाल्या तर भविष्यात असे प्रासंगिक लिहिण्याची वेळच येणार नाही.
तरीही स्त्री उभी राहते
आजचा या सदराचा हा शेवटचा लेख. वर्षभर हे सदर लिहीत असताना, जगभरातल्या स्त्रीविषयक बातम्या बघताना, अनेकदा विविध साम्यस्थळे सापडायची. संस्कृती, भाषा, धर्म, वेगळे असले तरीही त्यांच्यासमोरचे प्रश्न थोडय़ाफार फरकाने सारखेच आहेत. त्यांच्या अपेक्षा, आनंद, दु:ख, व्यक्त होण्याच्या जागा, पद्धती, सारख्याच आहेत, हे लक्षात येत होतं. ‘मी टू’चे अमेरिकेत सुरू झालेले लोण कधी जगभर पसरले, कळलेच नाही तसंच.
बलात्कार हा तिरस्करणीयच असतो. जबरदस्ती ही कोणत्याही पद्धतीची असो, वाईटच असते. जगभर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती बघायला मिळतात, त्यामुळेच अमेरिकेत, आफ्रिकेत, मध्य पूर्वेत, ऑस्ट्रेलियात, सगळीकडे स्त्रियांवर बलात्कार होतच असतात. तिने तोकडे कपडे घातले होते, ती रात्री-अपरात्री एकटी फिरत होती, अशी कोणतीही तथाकथित कारणे नसतानाही स्त्रियांवर, मुलींवर जबरदस्ती होतच असते. कधी त्यांच्याबद्दल वाच्यता केली जाते तर कधी ते दडपून ठेवले जातात. भारतामध्ये ‘निर्भया’वर झालेल्या बलात्कारामुळे पूर्ण देश ढवळून निघाला होता. तसेच काहीसे समाजमन ढवळून निघाले हैदराबाद येथे ‘दिशा’वर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्या समोर आली तेव्हा. तिच्या बलात्कारातील संशयितांना पोलिसांनी कथित चकमकीमध्ये ठार केले, पण या घटनेतून उभे राहिलेले प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत. सामाजिक मानसिकता बदलत नाही तोवर हे सुरूच राहणार आहे. चिली देशामध्ये अशाच एका बलात्काराच्या घटनेनंतर स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे एक गाणे रचले. मग चार जणींच्या सोबतीला चारशे आल्या आणि हे गाणे दणक्यात गायला लागल्या. त्यांनी एकत्र नाचत ताल धरला. स्वत:ची सगळी चीड, राग त्यात ओतला. त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येकीलाही ते तिचेच गाणे वाटत होते. साहजिकच या गाण्याचे लोण चिलीतून, मेक्सिको, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड सगळीकडे पसरले.
डॉ. मुग्धा कर्णिक यांनी केलेला या गीताचा मराठी स्वैर अनुवाद वाचून तुम्हालाही नक्की वाटेल, या तर माझ्याच भावना आहेत.
‘इथे करते न्याय आमचा बापसत्तेची नीती
जन्मा येताच ठरवून टाकतो पोरींची नियती
रोज-रोज होते शिक्षा दिसत नाहीत वळ, व्रण
मोकळे जगणे मुश्कील करते बापसत्तेची नीती
मारतात इथे बायांना, मारणाऱ्यांना कवच आहे
करतात गायब बायांना, त्यांनादेखील कवच आहे
बळजबरीचा भोग घेतात, त्यांनादेखील कवच आहे
बाईचीच चूक, बाई कुठे होती,
बाईचीच चूक, बाई काय नेसली होती
बाईची चूक नसते हे काही बापसत्तेला मान्य नाही.
म्हणूनच सांगतो आता बापसत्ताच बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
बापसत्तेचे पाईक कोण –
पोलीसही आहेत त्यात
न्यायाधीशही असतात त्यात
वकील, डॉक्टर, पत्रकारही
सारे सरकार आहे त्यात
संस्कृतीवादी राष्ट्रप्रमुखही
संस्कारघोटय़ा संघटनाही
जुलमी सरकार बलात्कारी
जुलमी प्रशासन बलात्कारी
तुम्ही आहात बलात्कारी
तुम्ही सारे बलात्कारी
झोप बाळे झोप शांत
चोरडाकूची चिंता नको
– अंगांगावर आहेत लक्ष ठेवून
सारे प्रेमळ शौकीन बाप !
जेव्हा-केव्हा गरज पडते, स्त्री उभी राहते, हा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि हेच भविष्यदेखील असेल. ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ सदरासाठी लिहिताना हेच ठळकपणे जाणवले. अंधार आहे पण त्यातून मार्ग काढणाऱ्या, साहसाचे काजवे चमकवणाऱ्या, हक्कांसाठी आग्रहाच्या मशाली लावणाऱ्या, तुमच्या-माझ्यासारख्या अनेकजणी आहेत. हेच होते माझ्या ‘पृथ्वी प्रदक्षिणे’चे फलित..
(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग २१ डिसेंबर २०१९ 

पृथ्वी प्रदक्षिणा २५

काही आठवडय़ातच २०२० हे वर्ष सुरू होईल. या शतकातल्या दुसऱ्या दशकाची समाप्तीदेखील या वर्षांअखेर होईल. अमेरिकेतल्या ‘बाल्टिमोर म्युझियम ऑफ आर्ट्स’ने काही दिवसांपूर्वी त्यांची २०२० ची उद्दिष्टे जाहीर केली आणि जगासमोर एक महत्त्वाचा आदर्श ठेवला.
मेरिलँड राज्यातील बाल्टिमोर येथील संग्रहालयाला शंभरहून अधिक वर्षांचा वारसा आहे. १९१४ ला हे संग्रहालय सुरू झाले. या संग्रहालयाने पहिली स्त्रीनिर्मित कलाकृती १९१६ मध्ये विकत घेतली. आज शंभरहून अधिक वर्षे झाल्यानंतर संग्रहालयाकडे ९५००० हून अधिक कलाकृती आहेत. जगभरातील वेगवेगळ्या देशांतल्या, वेगवेगळ्या शैलीतल्या अनेक कलाकारांच्या कलाकृती या संग्रहालयात प्रदर्शनाला ठेवलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी बऱ्याच काळापासून असलेल्या काही कलाकृती विकून नवीन कलाकारांसाठी जागा करण्याचे संग्रहालयाच्या संचालक मंडळाने ठरवले होते. त्याचवेळी असेही लक्षात आले, की इतकी जुनी परंपरा असलेल्या या संग्रहालयात आजमितीला फक्त चार टक्के स्त्री कलाकारांच्या कलाकृती आहेत. हे प्रमाण वाढवले पाहिजे म्हणून संग्रहालयाने पुढील वर्षी केवळ स्त्रियांच्याच कलाकृती विकत घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘२०२० मध्ये स्त्री कलाकारांच्या कलाकृतींचे प्रमाण वाढवावे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.’ असे संचालकांनी जाहीर केले आहे. मुळात आपल्या भवतालातही स्त्री कलाकारांची संख्या कमीच असते, किंवा दिसते. त्यामागे कारणेही अनेक आहेत. अनेकदा स्त्रियांना घरूनच प्रोत्साहन मिळत नाही, तर कधी त्याची दखलच घेतली जात नाही. म्हणूनच कलाकारांचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नोमुरा अ‍ॅवॉर्ड्स’ सुरू करण्यात आले आहेत.
पहिल्याच वर्षी हा पुरस्कार कोलंबियाच्या कलाकार डोरिस सालकॅडो यांना मिळालाय. पुरस्काराची रक्कम दहा लाख डॉलर्स अशी घसघशीत आहे. डोरिस यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे, जगभर त्यांची मांडणशिल्पं अर्थात, ‘इनस्टॉलेशन्स’ नावाजली जातात. रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी वापरून केलेली ही मांडणशिल्पं विचारांना चालना देतात. डोरिससारख्या अनेकींना कलेची प्रदर्शने कधी प्रत्यक्ष बघायला मिळाली नव्हती, केवळ पुस्तकातून ती त्यांनी पाहिली होती. तरीही, त्या पुढे आल्या आणि आज त्या जगावर त्यांच्या कलाकृतींमधून छाप सोडत आहेत.
बाल्टिमोरच्या संग्रहालयाचा केवळ स्त्री कलाकारांच्या कलाकृती घेण्याचा निर्णय नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो. यातून अनेक दमदार स्त्रियांच्या कलाकृतींना प्रदर्शनासाठी जागा मिळू शकते. त्यातूनच नवीन कलाकार पुढे येतील, जगाच्या जाणीव समृद्ध करतील.
आत्महत्यांना ‘ऑनलाइन’ रोखताना
सध्याचे जग दिवसेंदिवस अधिकच ‘स्मार्ट’ होते आहे. स्मार्टफोनमधले स्मार्ट अ‍ॅप्स सगळ्यांनाच जणू शहाणे करून सोडत आहेत. कधीकधी या सगळ्यांमुळे जग जवळ असल्यासारखे, अंतर मिटल्यासारखं वाटतं. ‘व्हर्चुअल मत्री’ एवढी बहरते, की तेच जग खरं वाटायला लागते. या सगळ्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. आपल्या सगळ्यांचे आयुष्य या अ‍ॅप्समधून कोणीतरी सतत पाहत असते, त्याचा अभ्यास करत असते. जणू आपल्या आयुष्याचा पाठलागच कोणीतरी करत असते. जेवढे आपण स्वातंत्र्य जपण्याच्या गोष्टी करतो, तेवढेच आपण आपले स्वातंत्र्य अनोळखी लोकांच्या हाती देतो आहोत. अर्थात कधी-कधी या सगळ्याचा एक चांगला परिणामदेखील होतो, तो म्हणजे काही गुन्हे घडायच्या आधीच थांबवता येतात.
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा ठिकाणी आपण काय मांडतो, लिहितो, काय ‘सर्च’ करतो, हे सगळे आपल्या कळत नकळत अनेकजण वाचत असतात, आणि मानसशास्त्रीयदृष्टय़ा त्या वागण्याचे अर्थही काढत असतात. नॉर्वेमधील २२ वर्षांची इंजेन्बर्ग ब्लाइन्डहेम ही अशीच काही इन्स्टाग्राम अकाउंट्स फॉलो करते आणि लोकांना जीवनदान देते. काही महिन्यांपूर्वी इंजेन्बर्गला इन्स्टाग्रामवर छायाचित्रं बघता-बघता लक्षात आले, की काही जण आत्महत्या करण्यापूर्वी त्या आशयाच्या काही पोस्ट आणि छायाचित्रं शेअर करत आहेत किंवा तत्सम ‘हॅशटॅग’ फॉलो करायचे. मग यातूनच तिनं ठरवलं, की अशा लोकांपर्यंत पोचत त्यांना मदत करायची.
तेव्हापासून इंजेन्बर्ग असे हॅशटॅग फॉलो करत असलेल्या लोकांचा शोध घेत राहते. ते ‘प्रायव्हेट अकाऊंट’ असले तरी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ‘फॉलो’ करत राहते. तेवढय़ावरच न थांबता जेव्हा ते आत्महत्येसंदर्भात काही छायाचित्रं किंवा पोस्ट टाकतात तेव्हा ती लगेच पोलिसांना कळवते आणि एक आत्महत्या होण्यापासून वाचवते. आजपर्यंत तिने पन्नासहून जास्त आत्महत्या थांबवलेल्या आहेत. दुर्दैवाने आत्महत्या करू पाहणाऱ्यांमध्ये तरुणींचे प्रमाण जास्त आहे.
इंजेन्बर्गला आता हे असे आत्महत्या थांबवायचे जणू व्यसनच लागले आहे. ती सांगते, ‘‘मी आता दिवस-रात्र अशा ‘ब्लॅक प्रोफाईल्सचा’ विचार करत असते. अगदी मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांबरोबर असतानादेखील. ती म्हणते, ‘तिला कधी कधी वाटते, ती झोपली असताना अचानक कोणी तरी आत्महत्या केली तर?’ हा विचार तिच्या मनात घर करून असतो. त्यामुळे ती सतत त्याच्या शोधात असते.
समाजमाध्यमांवर लोक खरे आयुष्य टाकण्यापेक्षा स्वप्नवत आयुष्य टाकून अतृप्त इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातून वास्तव आणि स्वप्न यातले अंतर अधिकच वाढत जाते किंवा इतरांचे समाज माध्यमांवरील दृश्य आयुष्य पाहून आपल्या आयुष्याबद्दल नराश्य वाटायला लागते. एक ना अनेक कारणे असतात नराश्याची, उदासीन वाटण्याची. त्याचेच पुढचे पाऊल पडते स्वत:ला संपवण्याकडे. हे अर्थातच
चुकीचे पाऊल असते. अशावेळी कोणीतरी समजून घेण्याची, समजावून सांगण्याची गरज असते. इंजेन्बर्ग करत असलेलं काम करणाऱ्या लोकांची संख्या जेवढी जास्त वाढेल तेव्हा आत्महत्यांची संख्याही नक्कीच कमी होईल. तोच या समाजमाध्यमाचा सर्वात महत्त्वाचा फायदा.
पक्षपाती मशीन?
स्त्रियांना अनेकदा वेगळ्या पातळ्यांवर भेदभावाचा सामना करावा लागतो. अगदी समान शिक्षण असूनही कमी पगार किंवा समान अनुभव, कर्तृत्व असूनही बढती न मिळणे, हे अगदी सहज बघायला मिळते. आता यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे क्रेडिट कार्डवरचे लिमिट. तीन महिन्यांपूर्वी, ‘अ‍ॅपल’ कंपनीने ‘गोल्डमन सॅक’ कंपनीच्या मदतीने नवीन अ‍ॅपल कार्ड्स बाजारात आणली आहेत. खास अ‍ॅपलच्या विश्वासू ग्राहकांसाठी म्हणून ही कार्ड बाजारात आणलीत. ‘अ‍ॅपल पे’ अजून सुलभ व्हावे हासुद्धा एक हेतू होताच.
मात्र नोव्हेंबरपासून काही जणांनी या क्रेडिट कार्डसचे लिमिट हे स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळे आहे हे दाखवून द्यायला सुरुवात केली. अगदी ‘अ‍ॅपल’ कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोझ्नीअ‍ॅक यांनीसुद्धा जाहीर केले, की त्यांची आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता व उत्पन्न सारखे असूनही त्यांच्या पत्नीला त्यांच्यापेक्षा दहापट कमी क्रेडिट लिमिट मिळाले. आता कळीचा मुद्दा असा आहे की ‘गोल्डमन सॅक’ सुरुवातीला हे मान्य करायला तयारच नव्हते. मात्र अनेक पुरावे समोर यायला लागले तेव्हा त्यांनी हा ‘अल्गोरिदम’मधला दोष आहे असे सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अल्गोरिदम बदलता येऊ शकतो, पण जर या चुकीला अल्गोरिदम नसून मानसिकता कारणीभूत असेल तर मात्र ती कशी बदलायची?
आजही कोणतीही नवीन मालमत्ता घेताना ती पुरुषांच्या नावावरच घेतली जाते, अगदीच जेव्हा कर चुकवायची वेळ येते तेव्हा मात्र ती स्त्रियांच्या नावावर घेतली जाते, केली जाते. अजूनही नवऱ्याच्या मालमत्तेवर पत्नीचा हक्क असतो हे मान्य केले जात नाही. त्यामुळेच क्रेडिट कार्ड, कर्ज, किंवा जिथे नंतर हप्ते भरायचे असतात अशा व्यवहारांमध्ये स्त्रियांकडे दुय्यम नजरेने बघितले जाते. स्त्रियांमध्ये पैसे परत करण्याची किती क्षमता असू शकेल याचे ढोबळ ठोकताळे लावले जातात आणि मग त्याच्याच आधारावर कमी रकमेचे कर्ज, कमी क्षमतेची क्रेडिट कार्ड्स स्त्रियांना दिली जातात. यावर बँकेचा पवित्रा सावध असतो, पण त्याचा तोटा अनेक हुशार, होतकरू स्त्रियांना नक्कीच होतो.
‘अ‍ॅपल’ कार्डच्या निमित्ताने स्त्री-पुरुष आर्थिक विषमतेचा मुद्दा परत एकदा चच्रेला आला, ट्विटरवर ‘अ‍ॅपल’ची, ‘गोल्डमन सॅक’ची यथेच्छ टिंगल उडवली गेली, पण त्यातूनच नक्कीच नवीन अल्गोरिदम लिहिला जाईल. पुढे अशी कोणतीही नवीन कार्ड्स आणताना त्याचा अल्गोरिदम स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही ना, याचीदेखील चाचणी घेतली जाईल. ‘मशीनदेखील कधी-कधी चुका करू शकते.’ असे म्हणत तूर्तास तरी ‘गोल्डमन सॅक’ आणि ‘अ‍ॅपल’ला संशयाचा फायदा घेऊ दिलाच पाहिजे. कारण चुकांमधूनच नवीन इतिहास घडत असतो.

(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग ७ डिसेंबर २०१९

Thursday, December 5, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा २४

एखाद्या मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यालय ज्या गावात असते, त्या गावाची ओळखच त्या कंपनीच्या नावाने होत असते. असेच काहीसे झालेले आहे सिएटल शहराचे. ‘अ‍ॅमेझॉन’ या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय याच शहरात आहे. या शहरातील मोठय़ा लोकसंख्येला या कंपनीमुळेच रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत, पण याच गोष्टीची दुसरी बाजूदेखील आहे. या कंपनीमुळे इथल्या जमिनींचे, घरांचे भाव वाढलेत. त्यामुळे अनेकांना घरं घेणे परवडतच नाही. एकूणच शहरात राहणे सगळ्याच अर्थाने महाग झाले आहे. अर्थात, हा सगळा विचार करून तिथले काही लोक या सगळ्यासाठी लढा देत आहेत. या लढय़ाचा आणि महाराष्ट्राचा एक वेगळाच संबंध आहे. या दोन वेगळ्या गोष्टींना जोडणारा दुवा आहे क्षमा सावंत. तसेही समाजसुधारणा आणि मराठी माणसांचा त्यातला सहभाग ही काही नवीन गोष्ट नाही.
पुण्यात जन्मलेल्या, मुंबईत वाढलेल्या आणि लग्न करून अमेरिकेत गेलेल्या क्षमा सावंत नुकत्याच तिसऱ्यांदा सिएटलच्या सिटी कौन्सिलमध्ये निवडून आल्यात. संगणक क्षेत्रातली पदवी घेऊन, लग्न करून त्या अमेरिकेत गेल्या खऱ्या, पण संपत्तीचे असमान वितरण, गरिबी यामुळे त्यांनी अर्थशास्त्रातले शिक्षण घ्यायचे ठरवले. पुढे त्यांनी अर्थशास्त्रातली पीएच.डी.देखील मिळवली. विवेक सावंत यांच्याबरोबर लग्न करून त्या अमेरिकेत आल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, पण त्यांनी आडनाव कायम ठेवले. २०१५ मध्ये त्या केल्विन प्रीस्ट यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली समाजवादी पक्षाच्या झेंडय़ाखाली, पण त्या ती निवडणूक हरल्या. तरीही त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. त्याचेच फळ म्हणून २०१३ मधल्या सिटी कौन्सिलच्या निवडणुकीत डिस्ट्रिक्ट ३ मधून त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१५ मध्येदेखील त्या निवडून आल्या. मोठय़ा कंपन्यांमुळे स्थानिक लोकांवर अन्याय होतो, त्यांचे राहणीमान महाग होते. त्यामुळे या कंपन्यांवर अतिरिक्त कर लावला पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका होती, आहे.
हा हेड टॅक्स ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर लावण्यात त्या यशस्वीदेखील झाल्या होत्या. मात्र तो निर्णय परत फिरवला गेला. तरीही ‘अ‍ॅमेझॉन’सारखी कंपनी सावंत यांनी केलेला विरोध विसरली नव्हती. त्यामुळेच या वेळच्या निवडणुकांमध्ये सावंत यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या इगन ओरायन यांना ‘अ‍ॅमेझॉन’ने भरभक्कम आर्थिक मदत केली होती. सावंत निवडून येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रचारदेखील केला. अमेरिकेत कंपन्या राजकीय पक्षांना उघडपणे आर्थिक मदत करतात. त्यामुळे ‘अ‍ॅमेझॉन’चा सावंत यांना असलेला विरोध त्यांच्या पथ्यावरच पडला आणि त्यांना मागच्यापेक्षा जास्त मते या वेळी मिळाली.
क्षमा सावंत यांनी समाजवादाकडे झुकणारी त्यांची विचारसरणी कधीच लपवली नाही. त्यामुळेच एका पूर्णपणे वेगळ्या गावात, देशात त्या स्वत:ची ओळख तयार करू शकल्या. एखाद्या शहरात बाहेरून येणारे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी थांबत तिथे राहत नसतात. काहीजण स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्याविरुद्ध आवाजदेखील उठवतात. कितीही विरोध होवो, आर्थिक दबाव येवो, प्रामाणिकपणे आपले काम करतात. त्यामुळेच ते तिथल्या मातीतले कधी होऊन जातात ते त्यांनाही कळत नाही. त्यामुळेच परकी मातीही त्यांना आपलीशी करून घेते. क्षमा सावंत यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
हवे मानवी संशोधन
कोणतेही संशोधन होत असताना त्याचे परिणाम मोजण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. बहुतेकदा हे प्रयोग प्राण्यांवर होतात, ते तिथे यशस्वी झाले, की मग माणसांवर केले जातात; पण क्वचित कधी-कधी हे माणसांवरचे प्रयोग जीवघेणे ठरू शकतात. असाच काहीसा अनुभव स्वीडनमधल्या शास्त्रज्ञांना आला आणि त्यांनी त्यांचे संशोधन मुदतीपूर्वीच थांबवले. गर्भारपणाचा वैद्यकीय कालावधी ४० आठवडे मानला जातो. त्यानंतरची प्रतीक्षा कदाचित बाळाच्या, आईच्या जिवाला धोका ठरू शकते, म्हणून ‘इंडय़ुस’ (कळा येण्याची औषधं देऊन) करून प्रसूती केल्या जातात. मात्र अनेक देशांमध्ये ४० आठवडय़ांनंतरही वाट पाहिली जाते, कधी कधी अगदी बेचाळिसाव्या आठवडय़ापर्यंतदेखील.
स्वीडनमध्ये २०१६ ला अशाच एका प्रयोगाला सुरुवात झाली. ४० आठवडय़ां नंतरच्या गर्भवती स्त्रियांचे दोन गट पाडले आणि त्यातल्या एका गटातल्या स्त्रियांची ४१ आठवडय़ांनंतर इंडय़ूस करून प्रसूती केली, तर दुसऱ्या गटातल्या स्त्रियांची आणखी एक आठवडा वाट पाहून बेचाळिसाव्या आठवडय़ानंतर प्रसूती केली. या जास्तीच्या दिवसांचा अर्भकांवर, स्त्रियांवर काय परिणाम होतो हे बघितले जात होते. मात्र हा प्रयोग मागच्या वर्षी एकाएकी थांबवला गेला. काही दिवसांपूर्वी या प्रयोगावरचा शोधनिबंध सादर केला गेला तेव्हा याची माहिती जगासमोर आली. हा प्रयोग थांबवण्याचे कारण म्हणजे या प्रयोगातल्या दुसऱ्या गटात पाच जन्मत:च मृत झालेली, तर एक जन्मल्यानंतर मृत झालेले अर्भक होते. या सहा पालकांनी त्यांचे मूल गमावले होते. त्यामुळे हा प्रयोग मधूनच गुंडाळला गेला होता. या सगळ्यात या सहाही मातांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही त्रासांना सामोरे जावे लागले असणार.
अति तिथे मातीच. त्यामुळे जशी लवकर जन्मणारी बाळं बहुतेक वेळा वैगुण्य घेऊन जन्माला येतात तशीच उशिरा जन्माला येणारी बाळंदेखील वेगळे प्रश्न सोबत घेऊन जन्माला येतात. निसर्गाला आपण गृहीत धरून चालू शकत नाही. आपल्याकडे हेळसांड झाल्यामुळे नवजात अर्भके मरण पावतात, तर प्रगत देशांमध्ये संशोधनामुळे काहींना जीव गमवावा लागला. अर्थात, आपल्याकडच्या मृत्युदराची तुलना अशा प्रगत देशातल्या मृत्युदराशी करता येणार नाही. संशोधन करत राहिलेच पाहिजे, मात्र त्यात माणसांचा जीव जाता कामा नये. माणुसकीशी बांधिलकी राखून संशोधन झाले तरच ते खरोखरीच सर्वाच्या भल्याचे असणार आहे.
भाषा जिवंत राहावी म्हणून..
‘भाषा टिकते ती स्त्रियांमुळेच’ असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण स्त्रियांना बोलायला विषय अपुरे पडत नाहीत आणि संवादातून भाषा जगली, तगली तरच भाषा समृद्ध होत असते. पेरूमध्ये रोक्साना क्युस्पे कोलान्तेस हिने असेच केचुआ भाषेच्या संवर्धनासाठी अतिशय मोठे पाऊल उचलले आहे.
केचुआ ही इंका लोकांची भाषा आजही दक्षिण अमेरिकेतील जवळपास ८० लाखांहून जास्त लोक बोलतात. केचुआ ही जरी खूप जुनी भाषा असली तरी तिला स्वत:ची लिपी नाही. हिचे स्वरूप मुख्यत: बोलीभाषेसारखेच राहिले होते, पण १९७५ पासून पेरूमधील सरकारने प्रयत्न करून रोमन लिपीतून या भाषेचे लिखित रूपात पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. मुळात ही भाषा समृद्ध आहेच, मात्र स्वत:ची लिपी नसल्याने किंवा ती लुप्त झाल्याने या भाषेत लिखित साहित्य सापडत नाही. आजघडीला या भाषेतले साहित्य या प्रकारातले सगळ्यात मोठे पुस्तक म्हणजे बायबलच म्हणता येईल. थोडीफार दोन-तीन शतकांपूर्वी लिहिलेली नाटके, कविता असे अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, असे साहित्य असताना, रोक्साना हिने तिचा पीएच.डी.चा प्रबंध केचुआ भाषेत लिहून सादर करत एक नवीन इतिहास रचला आहे. पेरू आणि लॅटिन अमेरिकेतील साहित्य आणि त्यातील केचुआ कविता हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. लिमामधल्या सॅन मार्कोस विद्यापीठाच्या ४६८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी स्थानिक भाषेत प्रबंध सादर केला. रोक्सानाने तब्बल ७ वर्षे अभ्यास करून तिचा प्रबंध लिहिला. तिच्या मते तिची भाषा एवढी समृद्ध आहे, की तिला दुसऱ्या भाषेतले शब्द वापरावे लागले नाहीत. आपल्या भाषेची ही श्रीमंती जगापुढे आणण्यासाठीच तिने तिचा प्रबंध केचुआ भाषेत लिहिला. पेरू त्यांच्या देशातील स्थानिक भाषांच्या संवर्धनासाठी युनायटेड नेशन्सचीदेखील मदत घेत आहे. जवळपास दोन हजारहून अधिक बोलीभाषांचे जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाषा जिवंत राहिली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर इतिहास जिवंत ठेवला जात असतो.
भाषा हे संवादाचे माध्यम आहे. स्त्रीमध्ये उपजतच सगळे सांभाळून ठेवण्याची ऊर्मी असते त्यामुळेच आपली भाषा टिकवण्यासाठी रोक्सानाने हे पाऊल उचलले यात काही शंकाच नाही. आज आपल्या देशातही अशा अनेक बोलीभाषा आहेत, ज्या केवळ लिपी, लिखित स्वरूपात नसल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडेदेखील अशा रोक्साना तयार होवोत, जेणेकरून त्या भाषा जिवंत राहतील.
(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग 
नोव्हेंबर २३

पृथ्वी प्रदक्षिणा २३

दूरचित्रवाणी हे आजही मनोरंजनाचे मोठे साधन समजले जाते. वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिकांपेक्षा रिअ‍ॅलिटी शोज्ना जास्त प्रेक्षकवर्ग लाभतो, हे लक्षात आल्यावर सर्वच वाहिन्या असेच कार्यक्रम करण्याच्या मागे लागतात. ही काही फक्त भारतातली गोष्ट नाही. ऑस्ट्रेलियामध्ये २०१३ पासून ‘हाऊस रुल्स’ नावाचा असाच एक रिअ‍ॅलिटी शो लोकप्रिय आहे. यामध्ये घरांची, बागेची सजावट करायची असते आणि जी जोडी हे चांगले करते त्यांना बक्षीस दिले जाते. २०१७ मध्ये आलेला या कार्यक्रमाचा पाचवा सीझन वेगळ्याच कारणासाठी गाजला होता. निकोल प्रिन्स आणि फिओना टेलर या दोन मत्रिणींची जोडी त्या भागात होती.
हा कार्यक्रम सुरू असतानाच या दोघींवर खूप टीका होत होती, कारण त्या सतत त्यांच्या प्रतिस्पर्धी स्पर्धकांवर शेरेबाजी करताना दिसायच्या. इतर स्पर्धकदेखील त्यांच्याशी तुटक वागत होते. सतत नकारात्मक बोलण्यामुळे त्यांच्याबद्दलचे जनमत अजिबात चांगले नव्हते. जेव्हा ही गोष्ट निकोल आणि फिओना यांना कळली तेव्हा त्या दोघींच्या दृष्टीने हा खूप मोठा धक्का होता. कारण त्या वाहिनीने त्यांच्या संभाषणातला नकारात्मक भाग तेवढाच दाखवला होता, बाकीचा संवाद दाखवलाच नव्हता. हे एक प्रकारचे ‘शोषण’च होते. या सगळ्यामुळे या दोघींना अनेक ठिकाणी द्वेष, रोषाला सामोरे जावे लागले. निकोलला या सगळ्याचा मानसिक त्रास झाला आणि त्यातून तिचे दारू पिण्याचे प्रमाणही वाढले. नंतर तिला यातून सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. ‘वाहिनीने आपली केवळ सोयीस्कर बाजू कार्यक्रमातून दाखवून आपल्याला त्रास दिला’ हे कारण देत तिने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर खटला दाखल केला. ‘ती केवळ एक स्पर्धक आहे, त्यामुळे आम्ही तिला कोणतीही नुकसानभरपाई देऊ शकत नाही’ असा निर्मात्यांचा पवित्रा होता. मात्र ‘ती जरी कंपनीत कामाला नसली तरीही ती तिचे काम सोडून या कार्यक्रमात सहभागी झाली होती, त्यामुळे तिला इतर नोकरदारांसारखेच वागवले पाहिजे’ अशी न्यायालयाने भूमिका घेतल्यामुळे आता वाहिनीला निकोल आणि फिओनाला नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.
पूर्वी म्हणायचे, की कानाने ऐकलेल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे; पण आताच्या काळात तंत्रज्ञानाने इतके काही आभास निर्माण करता येतात, की नक्की कशावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न पडतो. आपण अनेकदा टीव्हीवर जे बघतो, ते सगळेच स्क्रिप्टमध्ये लिहिल्याप्रमाणेच होत असते, अगदी ‘रिअ‍ॅलिटी शो’सुद्धा. कोणता स्पर्धक कधी रडेल, कधी हसेल, ज्यामुळे जास्त प्रेक्षक लाभेल अशी सगळी गणिते मांडून सगळे काही दाखवले जात असते. जे डोळ्यासमोर दिसते, त्यापेक्षा किती तरी वेगळे वास्तव असते. किती जणांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण होते याची गणनाच नसते.
एखादीच निकोल यावर स्पष्ट बोलते, नुकसानभरपाई मागते, कारण ती केवळ मनोरंजन क्षेत्रात काम करणारी एक अभिनेत्री नाही. तिचा स्वत:चा वेगळा पेशा आहे. मात्र ज्यांना याच क्षेत्रात करिअर करायचे आहे, असे अनेक जण मूकपणे हा अन्याय सहन करत असतात. कारण त्यांना माहीत असते, जर त्यांनी काही बोलण्याची हिंमत केली, तर आत्ता जे काही मिळते आहे तेसुद्धा मिळणार नाही. तर अनेकदा हा सगळा चोरीचा मामला माहीत असतो; पण त्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळणार असेल, पैसे मिळणार असतील तर ते सहन करण्याचीदेखील काही जणींची/ जणांची इच्छा असते. ‘तेलही गेले, तूपही गेले’सारखे होण्यापेक्षा स्वत:ला त्रास करून घेत उद्याची वाट बघणारे कमी नाहीत. आपल्या देशातही अशी एखादी निकोल नक्कीच असू शकते. कदाचित हे वाचून तीसुद्धा तिच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडेल, अशी अपेक्षा बाळगूया.
मातृत्वाचे कोडे
मागच्या वर्षी ‘बधाई हो’ हा चित्रपट आला तेव्हा काहींना हे अतिरंजित वाटले, तर काहींना ती त्यांचीच गोष्ट वाटली;  अशीच घटना घडली चीनमध्ये. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये एका सदुसष्ट वर्षांच्या स्त्रीने मुलीला जन्म दिला. तिआन या त्यांच्या नेहमीच्या तपासण्या करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना कळले, की त्या गर्भवती आहेत. या वयात ही जबाबदारी झेपेल का आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ासुद्धा?’ असा प्रश्न त्यांना त्या वेळी पडला. शिवाय त्यांना दोन मुले आहेत. त्यातला एक जण ‘एकच मूल’ कायदा येण्याआधी जन्माला आलेला, तर दुसरा त्यानंतर; पण त्यांनी आणि त्यांच्या नवऱ्याने, हुयांग यांनी, हे मूल होऊ द्यायचे ठरवले. त्यामुळे ते दोघेही नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊन आई-वडील झालेले चीनमधले वयोवृद्ध पालक बनलेले आहेत.
१९७९ पासून चीनमध्ये ‘एकच मूल’ सक्ती राबवण्यात आली होती. या सक्तीचे लोकसंख्येच्या दृष्टीने काही चांगले परिणाम झाले; पण त्याच वेळी दूरगामी, घातक परिणामही बघायला मिळाले. लोकसंख्येतील तरुणांचे प्रमाण घटले, उत्पादनशील वयोगटातील लोकसंख्या कमी झाली. स्त्रियांवरही याचे शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक परिणाम झाले. याचे सामाजिक परिणामदेखील हितावह नव्हते. २०१६ मध्ये सरकारने ही ‘एकच मूल’ सक्ती उठवली आणि ‘हम दो हमारे दो’ धोरण अवलंबले. दशकभरापूर्वी सरासरी चोविसाव्या वर्षी स्त्रिया मातृत्वाची जबाबदारी घ्यायच्या. तेच प्रमाण आता सव्विसाव्या वर्षांपर्यंत घसरले आहे. २०१६ नंतर ज्या प्रसूती झाल्या त्यात पहिलटकरणींपेक्षा दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तिआन यांच्या प्रसूतीमुळे या सगळ्यावरसुद्धा परत चर्चा झाली. ‘आई होण्यासाठी वयाची धास्ती बाळगण्याची गरज नाही’ असा विश्वास यातून अनेकींना मिळाला असणार. त्यात सरकारनेदेखील ‘दोन मुलं’ धोरण राबवल्यामुळे अनेक जणी दुसऱ्या अपत्याचा परत विचार करू शकतात. लोकसंख्या नियंत्रण गरजेचे आहे, परंतु त्याच वेळी सामाजिक, आर्थिक समतोलदेखील राखला गेला पाहिजेच.
मातृत्व ही केवळ शारीरिक जबाबदारी नसते. ती तेवढीच मानसिक, आर्थिक जबाबदारीपण असते. सदुसष्टाव्या वर्षी नैसर्गिक गर्भधारणा हे खरं तर एक आश्चर्यच आहे; प्रगत विज्ञानालादेखील कोडय़ात घालणारे. आपण विज्ञानात कितीही प्रगती केली, तरीही निसर्ग आपल्यासमोर नवीन कोडे सादर करतोच. कदाचित या कोडय़ांमधून आपण नवीन काही शोध घेऊ शकू म्हणूनही असेल. तिआन आणि हुयांग यांच्या नवजात लेकीने असेच काही प्रश्न जन्मताच जगासमोर उभे केले आहेत. कदाचित त्यातल्या काहींची उत्तरे मिळतील. काही प्रश्नांच्या उत्तरातून नवीन ध्येयधोरणेही राबवली जाऊ शकतात.
‘रि-होमिंग’ बघावं करून
प्रत्येक लग्नात किंवा कौटुंबिक समारंभात स्त्रियांचं सगळ्यात जास्त लक्ष इतर स्त्रियांच्या कपडे-दागिन्यांवर असतं. पुन्हा पुन्हा तीच साडी घातली, तेच दागिने घातले तर ‘अरे परत तेच’ असं कधी डोळ्यांनी तर कधी शब्दांनी हिणवलं जातं. मात्र प्रत्येक समारंभासाठी वेगळी साडी घ्यायला, एक साडी एकदाच नेसायला सगळेच जण काही अतिश्रीमंत नसतात. गंमत म्हणजे हा प्रश्न काही फक्त भारतातलाच आहे, असं नाही. पाश्चात्त्य देशांतही हा प्रश्न थोडय़ाफार वेगळ्या परिस्थितीत का असेना आहेच. जसं की, पार्टीला जायचं आहे, जवळच्या मत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे किंवा मुलाखतीसाठी जायचं आहे. बरं या सगळ्यामध्ये त्या-त्या वेळेच्या हवामानानुसार कपडे घालावे लागतात. मग जर असं प्रत्येक समारंभाला वेगळे कपडे घालायचे ठरवलं तर दिवाळं नक्कीच निघणार. पण मग काय करायचं? स्त्रियांसाठी महत्त्वाच्या बनलेल्या या प्रश्नाचं उत्तर अनेक प्रगत देशांनी जे शोधून काढलं आहे ते आपल्या समाजात थोडंफार पूर्वीपासूनच अस्तित्वात होतं.
अमेरिका, ब्रिटन, याचबरोबर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये कपडे, पस्रेस इत्यादी भाडय़ाने देणारे पोर्टल्स, दुकानं नव्याने सुरू झाली आहेत. ब्रॅण्डेड कपडे महाग असतात पण ते तुमचं सामाजिक/ आर्थिक स्थानसुद्धा दाखवतात. त्यामुळेच ‘हुर’, ‘रेनेथरनअवे’, ‘माय वॉर्डरोब’, ‘फ्रंट रो’सारखी संकेतस्थळं जे काम करतात तेच काम ब्रिटनमध्ये टॅश आणि मेरी या दोन मत्रिणींनी करायला सुरुवात केली. या दोघींनी त्यांचे जुने कपडे, पस्रेस, शूज, भाडय़ाने द्यायला सुरुवात केली. त्यांच्या मते, ही अशी सेवा सध्याच्या काळात अत्यंत गरजेची बनली आहे. स्त्रियांकडे, खास करून लहान मुलं असणाऱ्यांकडे, स्वत:च्या कपडे खरेदीसाठी वेळ नसतो. अनेकदा वाढलेल्या वजनामुळे जुने कपडे होत नसतात. अशा वेळी परत खरेदी करण्यापेक्षा जर कमी किमतीत चांगले कपडे फक्त एखाद्या कार्यक्रमासाठी भाडय़ाने मिळत असतील तर काय वाईट आहे? त्यामुळे अनेक जण नवीन कपडे घेण्याऐवजी असं भाडय़ाने कपडे घेण्याला पसंती देताना दिसत आहेत.
काही ठिकाणी एखादा ड्रेस एका वेळेसाठी भाडय़ाने घेता येतो, तर काही ठिकाणी महिन्याची ठरावीक रक्कम भरली तर तुम्हाला महिनाभर ठरावीक कपडे घेऊन जाता येतात.
आपल्याकडे पूर्वीपासून मोठय़ांचे छोटे झालेले कपडे लहान भावंडांसाठी वापरले जायचे. आई-आजीच्या जुन्या साडीतून मुलींना कपडे शिवले जायचे.आता हे सगळे जुने झाले आहे असे वाटत असतानाच भारतातही ‘फेसबुक’वरचे काही ग्रुप दिसतात, जिथे स्त्रिया जुन्या साडय़ा, ओढण्या, कधी विकतात तर कधी फुकट/नाममात्र किमतीत भाडय़ाने देतात. काही दुकानंसुद्धा आहेत जिथे वापरलेले कपडे मिळतात. लग्नात घालण्यासाठीचे खोटे दागिने तर अगदी गल्ली-बोळातल्या ब्युटी पार्लरमध्येसुद्धा मिळतात. ‘फेसबुक’वरच्या ग्रुपमध्ये जुनी साडी विकण्यासाठी एक सुंदर शब्द वापरला जातो ‘रि-होमिंग’. याचा अर्थ ‘साडीला नवीन घर देणे.’ मुळात महागामोलाचे कपडे घालणार एकदाच, मग त्यावर भरमसाट खर्च करून नंतर ते कपाटात पडून राहणं काय कामाचं? त्यापेक्षा असे भाडेतत्त्वावर घेतलेले किंवा आधी वापरलेले कपडे वापरणे हे गरिबीचे नव्हे तर शहाणपणाचे लक्षण समजले जाऊ लागले आहे.
(माहिती व छायाचित्रे स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग ९ नोव्हेंबर 

पृथ्वी प्रदक्षिणा २२

फिलिपाइन्स हा बेटांचा समूह असलेला देश. या चिमुकल्या देशाने एक प्रयोग केला आहे. सिक्वजोर प्रांतातील मरिआ हे गाव तिथल्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गावाने पोलीस दलात ठरवून फक्त स्त्रियांची नियुक्ती करण्याचा एक प्रयोग राबवलाय. फिलिपाइन्समध्ये स्त्री-पुरुष समानतेवर विशेष भर दिला जात असल्यामुळे पोलीस दलात स्त्रियांसाठी आरक्षण आहे. त्यामुळे पोलीस दलात स्त्रिया सुरुवातीपासूनच होत्या, पण बहुतांश ठिकाणी त्या बैठे काम करत होत्या.
मरिआ गावच्या गावकऱ्यांनी मात्र गावात जाणीवपूर्वक फक्त स्त्री पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मुळात हे एक समुद्रकिनाऱ्यावरचे गाव आहे, त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण करणं, तस्करीवर लक्ष ठेवणं, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणं, या सगळ्याच गोष्टी खाकी वर्दीतल्या स्त्रिया जबाबदारीने करत आहेत. स्त्री-पोलिसांमुळे खास करून शहरातील मुलींना, स्त्रियांना पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित वाटत आहे, असं त्यांनी नोंदवलं. तर या काळात गुन्ह्य़ांचं प्रमाण कमी झाल्याचंसुद्धा पाहण्यात आलं आहे. या स्त्री-पोलिसांनीसुद्धा, ‘‘हे काम अवघड आहे. यात ताण आहे, पण आम्हाला हे काम करताना अभिमान वाटतो,’’ असं सांगितलं.
हा एक वेगळा प्रयोग आहे, जो आत्ता तरी फिलिपाइन्सच्या फक्त एकाच शहरात राबवला जातो आहे. परंतु त्याचं यशापयश बघून तो कदाचित इतर शहरांमध्येही राबवला जाईल. स्त्रिया दुबळ्या असतात हा समज तर कधीच मोडीत निघालेला आहे. आता स्त्रिया स्वत:चंच नव्हे तर शहराचं रक्षणही उत्तम करू शकतात हे फिलिपाइन्सच्या धाडसी स्त्रिया जगाला दाखवून देत आहेत.
जिम्नॅस्ट सुवर्णकन्या
बावीस, तेवीस म्हणजे शिक्षण संपवून नोकरी- व्यवसाय सुरू करण्याचं वय. पण जर कोणी त्याच वयात निवृतीची भाषा करत असेल तर त्याला काय म्हणायचं? कदाचित अशी एक वेळ येते, की आता पुढे अजून काय करायचं हा प्रश्न पडतो. असंच काहीसं घडलंय अमेरिकेच्या सिमॉन बाएल्सच्या बाबतीत. स्टुटगार्ट इथे झालेल्या जिम्नॅस्टिक्सच्या जागतिक स्पर्धेनंतर ज्याच्या-त्याच्या तोंडी अवघ्या बावीस वर्षांच्या सिमॉनचंच नाव आहे. जिम्नॅस्टिक्सच्या आजवरच्या इतिहासातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला नावाजलं जात आहे. जागतिक स्पर्धेत आजपर्यंत २५ पदकंमिळवून ती सर्वाधिक पदकं मिळवणारी खेळाडू ठरली आहे. याआधीचा व्हिटली श्रेबो या खेळाडूचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे, या २५ मधील १९ सुवर्णपदकंआहेत.
सिमॉन, तिच्या दोन बहिणी आणि भावाला सांभाळणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना दत्तक द्यायचं ठरवलं होतं. ही गोष्ट सिमॉनच्या आजोबांना कळल्यावर त्यांनीच त्यातल्या धाकटय़ा दोघींना दत्तक घेतलं, तर त्यांच्या सख्ख्या बहिणीने उरलेल्या दोघांना. अशा प्रकारे, सिमॉनची आई तिची बहीण झाली. ६ वर्षांची असताना तिने तिच्या डे-केअरमध्ये पहिल्यांदा जिम्नॅस्टिक्सचे प्रकार करून बघितले. तिच्यातली गुणवत्ता तिथल्या शिक्षकांनी लगेचच हेरली. आठव्या वर्षांपासून तिने एमी बुर्मन या प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या हाताखाली शिकायला सुरुवात केली. २०१३ मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सिमॉनने पहिल्यांदा वरिष्ठ गटाच्या स्पर्धामध्ये सहभाग घेत पहिलं सुवर्णपदक मिळवलं होतं. तेव्हापासून सुरू असलेली तिची घोडदौड थोडय़ा काळासाठी २०१७ मध्ये थांबली पण त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये तिने परत तिच्या खेळाची चुणूक दाखवून पदकांची लयलूट केली.
या वर्षी स्टुटगार्टमधल्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्ण पदकंमिळवल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं, की २०२० च्या ‘टोकियो ऑलिम्पिक’नंतर निवृत्ती घेण्याचा तिचा विचार आहे. ‘‘आजवर मी खूप पदकं मिळवली. २०-२२ तास सराव केला. माझ्या शरीराने मला खूप साथ दिली. मला त्याला आता जरा विश्रांती द्यावीशी वाटत आहे.’’ कोणत्याही खेळाडूसाठी खेळ, खेळाचं मदान याचं वेगळंच महत्त्व असतं. पण हे सगळं आपण ज्याच्या जिवावर करत असतो त्या शरीराला आपण किती गृहीत धरून चालत असतो हे एखादी जखम/इजा झाल्यावरच लक्षात येतं. सिमॉनच्या आजवरच्या ६-७ वर्षांच्या कारकीर्दीत तिलाही अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. २०१८ मध्ये दोहा इथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या आदल्या रात्री ती पोटदुखीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. त्रासाचं कारण अपेंडिक्स नाही तर मूतखडा आहे कळल्यावर ती औषधं घेऊन दुसऱ्या दिवशी स्पर्धेत आली आणि सुवर्णपदकघेऊन गेली.
कोणताही क्रीडाप्रकार सोपा नसतो. त्यात यशस्वी होण्यासाठी अथक मेहनत हेच एक उत्तर असतं. सिमॉनने अवघ्या सहा वर्षांत ऑलिम्पिकमधली ५ पदकं, जागतिक स्पर्धेतली २५ पदकं, त्यातली १९ सुवर्णपदकंजिंकून अनेक विक्रम रचले आहेत. त्यामुळेच दुखापत करून घेऊन सक्तीने खेळ सोडण्यापेक्षा पुढच्या वर्षीचं ऑलिम्पिक खेळून मानाने निवृत्ती घेण्याची भाषा करणारी सिमॉन पुढच्या अनेक पिढय़ांना नक्कीच प्रेरणा देत राहणार.
धावती सुपरमॉम
ती आली, तिने पाहिलं, ती पळाली आणि तिने जिंकून घेतलं सारं जग.. विसाव्या वर्षांपासून ती वेगवेगळ्या स्पर्धामध्ये पळत आहे, गेली १२-१३ वर्ष यश मिळवते आहे. यशाबरोबर येणारी टीकाही झेलते आहे. तिचे पाय मात्र मैदानात ठामपणे रोवलेले आहेत. बत्तिसाव्या वर्षी ‘पॉकेट रॉकेट’ म्हणून ओळखली जाणारी शेली अ‍ॅन फ्रेजर प्राईस हिने नुकतंच तिचं चौथं सुवर्णपदक जिंकलं. शंभर मीटर धावण्याच्या जागतिक स्पर्धेतलं हे पदक होतं. तिने स्वत:च्या दोन वर्षांच्या लेकासोबत स्टेडियममध्ये हे यश साजरं केलं. ‘‘मी ३२ वर्षांची आहे, तरी अजूनही पळू शकते, जिंकू शकते. मूल झालं म्हणून काहीच थांबलं नाही हेच मला जगातल्या सगळ्या स्त्रियांना सांगायचं आहे. स्वप्न बघत राहा, ती पूर्ण होतात. वय वाढलं, मूल झालं म्हणून बिलकुल काही थांबत नाही, हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे.’’ केस रंगीबेरंगी रंगवलेल्या, मुलाला कडेवर घेऊन फिरणाऱ्या, आत्मविश्वासाने सळसळणाऱ्या शेलीला बघून खरोखरीच अनेकींना प्रेरणा मिळेल.
मातृत्वानंतर परत स्वत:चं करिअर करणं तसं आता काही जगावेगळं राहिलं नाही. खेळाडूंसाठी मात्र ही थोडी वेगळी गोष्ट समजली जात होती. मेरी कोम, सेरेना विल्यम्स, ख्रिस्टी रम्पोन, निया अली, या बॉक्सिंग, टेनिस, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्समधल्या प्रसिद्ध खेळाडूंनीही मातृत्वानंतरही खेळ सुरूच ठेवला. नवनवीन शिखरं गाठली. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झानेदेखील एका पोस्टमधून सांगितलं होतं, की बाळंतपणानंतर तिने चार महिन्यांत २६ किलो वजन कमी केलं. अर्थातच हे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने केलं. पुढील वर्षी जानेवारीत तिला परत तिचा खेळ सुरू करायचा आहे. ही केवळ पटकन समोर येणारी खेळाच्या क्षेत्रातली काही मोठी, ओळखीची नावं आहेत. इतरही क्षेत्रांत अशी अनेक नावं शोधली तर सापडतील. मुळात वय, लग्न, मातृत्व हे आता अडसर राहिलेलेच नाहीत. तुमची जिद्द, सरावातली नियमितता, योग्य प्रशिक्षण हे जुळून आलं तर यश कोणासाठीही कधीच दूर नसतं.
(माहिती व छायाचित्र स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळं)
चतुरंग २६ ऑक्टोबर