ही आपली साधी वांगं बटाटा कांद्याची भाजी. आज भाजी जास्त झाली आहे असे वाटतानाच सगळ्यांनी मिळून चाटून पुसून संपवली. काय असे विशेष यात असेही वाटेल. पण या नेहेमीच्या वाटणाऱ्या भाजीला खास बनवलं ते यातल्या 'आईच्या मसाल्याने'.
वांगी, बटाटे कांदे सारख्याच आकाराचे कापून घ्यायचे. फोडणीमध्ये मोहरी तडतडली की कडीपत्ता, थोडासा हिंग, हळद घालायची आणि मग कांदा परतून घ्यायचा. मग त्यातच वांगं बटाट्याच्या फोडी घालायच्या, थोडेसे पाणी घालायचे. भाजी शिजत आली की त्यातच मीठ, तिखट, दाण्याचा कूट, चवीप्रमाणे गूळ, कोथिंबीर घालायची. मग सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ खास आईच्या घरचा मसाला घालायचा. असा काही सुगंध घरभर पसरतो की माहेरीच गेल्यासारखं वाटते. किती वास आठवणींबरोबर जोडले गेलेले असतात ना.
आईच्या हाताच्या मसाल्याची चव आपल्या हाताला येत नाही त्यामुळे त्या भानगडीतही न पडता मी केवळ दर भेटीच्या आधी ताजा मसाला करून तो माझ्यासाठी आणणाऱ्या आईची वाट बघत असते. वास आणि काही पदार्थांशी आपल्या आठवणी इतक्या घट्ट जोडल्या गेलेल्या असतात की त्या दोन गोष्टी एकत्र होऊन जातात. त्यामुळेच की काय मग त्या पदार्थांची गोडी जास्त वाढत असते.
प्रत्येक घराची ओळख असते तिथले जेवण आणि ते जेवण वेगळे ठरवत असते त्या घरातल्या स्वैपाकाची पद्धत, त्या घरातले मसाले. मसाल्याच्या शोधात अनेक देशांचा शोध लागला, आता मात्र हेच मसाले हे अंतरे कमी करायला, आपल्या माणसांना जोडायला उपयोगी पडताहेत. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर नक्की लिहून कळवा.
No comments:
Post a Comment