ती
सासू ही नेहेमी अशीच
का असते? सारख्या सूचना दिल्या नाही तर आपले सासूपद काढून घेतील की काय अशी भीती
असते का तिला? लग्नाआधीच आम्ही ठरवले होते वेगळे राहिलेलेच बरे. म्हणजे तेव्हा त्या
ही तसेच म्हणत होत्या. मला तर एकत्र राहणे नकोच होते. कारण अनिकेतचा छोटा भाऊ
तेव्हा अजून शिकतच होता. आम्ही घर बघतानासुध्दा त्यांचाच शब्द शेवटचा ठरला.
पहिल्या मजल्यावरचे घर हे त्यांच्यासाठी योग्य आहे पण आम्ही दोन जिने चढू उतरू
शकतो, त्यामुळे मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरचे घर हवे होते. आता जेव्हा
मुलांचे बॉल गॅलरीमध्ये येतात, कोणाकोणाच्या मांजरी बिनधास्त आमच्या घरात घुसतात
तेव्हा अनिकेतला पटतंय वरच्या मजल्यावरचे घर बरोबर होते.
घर लावतानाची देखील
तीच गोष्ट. प्रत्येक वेळी त्यांच्या दृष्टीनेच, त्यांच्या आवडीनिवडी मधूनच गोष्टी
येत होत्या, लागत होत्या. एका वेळी मी उपहासाने म्हणलदेखील अरे वाह आई तुम्हाला
अजून एक घर लावायची संधी मिळाली, मला कधी माझे घर लावायला मिळेल काय माहीत. तर त्यावर
अनिकेतनेच माझा हात दाबला आणि विषय बदलला. त्याचे म्हणणे तिला आता जे करायचे आहे
ते करू देत नंतर तू तुला हवे तसे लावून घे. पण हे त्यांना का कोणी सांगायचे नाही.
आता आजचीच गोष्ट उद्या
माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. तेव्हा मी ठरवेन ना काय करायचे आहे ते. पण नाही
यांनी मला फोन करून सांगीतले उद्या तुम्ही इकडे या नाहीतर तू फक्त पोळ्या कर चिकन
रस्सा मी बाबांबरोबर पाठवते नाहीतर तुम्ही इकडेच या. मला त्यांच्या एवढे सगळे
चांगले करता येत नसेल पण म्हणून मी कधीच काही करायचे नाही का? मी आमच्या दोघांसाठी
काही ठरवले असू शकते हे यांच्या लक्षातच येत नाही, की लक्षात येऊनही मुद्दाम
करतात. लग्न झाल्यावरही मुलाचा हात न सोडण्याची ही कुठली तऱ्हा देव जाणे. मुलाला
अजूनही बाळच समजतात पण आता हे बाळ ३० वर्षांचे झाले आहे हे बहुतेक विसरतात. आता
उद्या मी मस्त इंचीलाडा, ग्वाकामोली, घरीच करणार होते. पण बहुतेक सगळे कॅन्सल करून
त्या घरी तिखट जाळ रस्सा खावून घरी येऊन जेलुसील घ्यावे लागेल किंवा इथेच आम्ही
दोघेही चिकन खातानाचे फोटो पाठवावे लागतील. त्यापेक्षा मी स्पष्टच सांगेन त्यांना
अनिच्या मित्रांनी पार्टी ठेवली आहे त्यामुळे चिकन विकेंडला खायला येतो आम्ही.
कुठलेतरी जुने फोटो टाकेन फॅमिलीग्रुपवर त्यांच्या समाधानासाठी. पण नवऱ्याचा लग्नानंतरचा
पहिला वाढदिवस मी मला हवा तसाच करेन.
त्या
मुलगी असती तर जास्त
बरे झाले असते. मुलगा म्हणजे काही सांगताही येत नाही आणि सोडताही येत नाही. त्यातही
त्याचे लग्न करून दिल्यावर तर अजून जास्त अवघड होऊन बसते सगळे. अनिकेत लग्न
ठरल्यावरच म्हणायला लागला आई हे घर छोटे पडेल, आम्हाला प्रायव्हसी नाही मिळणार म्हणून
आम्ही वेगळे राहतो. मी पण फारसा काही
विरोध केला नाही, उगाच कशाला पहिल्यापासूनच वाईट बना. तरीही तो म्हणाला एकदा का अमित
बाहेर गेला शिकायला मग आम्ही पण येऊ या घरात परत. पण एकदा घरातून बाहेर गेल्यावर
हे लोक का येतील परत घरी? त्यांना त्यांची सवय झाली की आमची सवय कशी लागेल.
आता आम्हाला अनुभव आहे
म्हणून मी यांना घर शोधायला घर लावायला मदत करायला गेले तर आमच्या सुनबाई आम्हालाच
म्हणाल्या,’ आमचे घर आम्हालाही लावू द्या. सगळे काम तुम्हीच केले तर आम्ही काय
करू?’ त्या दिवसानंतर जावंसंच नाही वाटले त्यांच्या घरी. आमचे लग्न झाले तेव्हा
सासू सासरे गावाकडे होते, पण दर आठवड्याला कोणी न एकोणी पै पाहुणा घरी यायचाच. मला
इच्छा असूनही त्यामुळे नोकरी करताच आली नाही. त्यामुळे घर कुटुंब माझे विश्व झाले.
कोणाला काय आवडते, ते तसे खायला घालणे ही आवड कमी छंद जास्त झाला.
उद्या अनीचा वाढदिवस.
त्याच्या पहिल्या वाढदिवसाला पहिल्यांदा त्याला चिकन चाखावले होते, तेव्हापासून ती
जणू प्रथाच झाली होती त्याच्या दर वाढदिवसाला मी चिकन करायचे. तसे इकडे चिकन करण्यासाठी काही
कारण लागायचे नाही. पण का कोणास ठाऊक त्याच्या वाढदिवसासाठी केलेले चिकन जास्त
चविष्ट बनायचे. मी सुनेला फोन करून सांगितले, बाबांना पाठवते तिकडे किनव तुम्ही
लोकं या इकडे पण फोनवरचा तिचा नूर काही मला बरोबर नाही वाटला.
आता रोजच यांचे हे
असतातच ना, मग वाढदिवस आमच्याबरोबर साजरा केला तर काय बिघडेल? लग्न करून दिले
म्हणजे मुलाला तिच्याकडे सोडून दिले असे होत नाही, आई आहे काळजी, प्रेम वाटणारच! त्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली म्हणून काय
मी माझा हक्क अधिकार पूर्ण सोडून द्यायचा? लेकाला त्याच्या आवडीचे करून देण्यात जो
आनंद असतो तो हिला मूल झाल्यावरच कळेल. हिने काहीही ठरवू दे माझा अनिच तिला म्हणेल
आपण आज आईकडे जाऊ आईने मस्त चिकन केलेलं असेल.
© मानसी होळेहोन्नुर
No comments:
Post a Comment