Friday, September 28, 2018

मनसूत्र

‘अग वैदेहीच ना तू? केवढी बदलली आहेस तू, ओळखलं का मला?’

वैदेहीच्या पाठीवर हात टाकत अजून एक पन्नाशीच्या आसपासची काकू, मामी कोणीतरी एकदम तिच्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली.

‘अम्म तू कोल्हापूरची मामी ना.’

आईकडचे निम्म्याहून जास्त नातेवाईक कोल्हापूरला असल्यामुळे तिने एक खडा मारून पाहिला.

खुर्ची जवळ ओढत ती चुलत, मामे कोणती तरी मामी खुशीत येऊन म्हणाली,

‘अग्गो बाई, विसरली नाहीस की तू आम्हाला. आग मी प्रमोद मामांची बायको, प्रमिला मामी, तुला माझ्या हातचं लोणचं आवडायचं म्हणून कशी दर सुट्टीत आमच्याचकडे यायचीस आठवतंय ना? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे मला माहितीच होतं, तू खूप मोठी होणार. टीव्हीवर तुझा कार्यक्रम लागला कि आम्ही सगळ्यांना सांगतो, ही आमची भाची बरं का. अग मागच्या महिन्यात माधुरी आली होती ना तुझ्या शो मध्ये, मी वन्सना सांगितलं होतं, की वैदेहीला सांगा माधुरीची सही घेऊन ठेवायला. तुझ्या मामाला तिचं फार कौतुक बाई, ते म्हणतात मी अगदी माधुरीसारखीच दिसते, हो की नाही ग.’

आता वैदेहीची ट्यूब पेटली होती, ही मामी बोलायला लागली की थांबायचीच नाही म्हणून तिचं नाव त्यांनी राजधानी एक्सप्रेस ठेवलं होतं. आता आज हिचा पिच्छा कसा सोडवायचा हेच तिला कळत नव्हतं.

‘अग मी एकटीच काय बोलत बसलीये, बरं ते सगळं जाऊ देत, तुझ्यासाठी की नाही माझ्याकडे एक छान स्थळ आहे, माझ्या मावसबहिणीच्या दिराचा मुलगा, तो पण मुंबईतच असतो, तुझ्यासारखाच पत्रकार आहे, कुठल्याशा टी व्ही मध्ये कामाला आहे.  दिसायला तर तुझ्यापेक्षाही उजवा आहे. त्याला पगार पण चांगला भरभक्कम आहे.’

‘प्रमिला वहिनी, तुझी गाडी जरा थांबवशील का? वैदेहीसाठी स्थळ पाठवून उपयोग नाही, मागच्याच आठवड्यात तर लग्न झालं तिचं, मी प्रमोद दादाला कळवलं होतं, त्याने सांगितलं नाही का तुला.’

फॅब इंडियाच्या साध्याशा कुर्त्यामध्ये वरती गुजराथी पद्धतीचे वर्क केलेल जॅकेट  घातलेल्या, कानात लोंबते कानातले, केसांचा बॉबकट, हातात फिट बीट, गळ्यात एक चेन अशा अवतारात बसलेल्या वैदेही कडे बघत मामी जरा गोंधळातच पडली. नववधूची, किंवा नवविवाहितेची कोणतीच खुण तिच्या अंगावर दिसत नव्हती.

‘वन्स सकाळी सकाळी चेष्टा करायला दुसरी कोणी मिळाली नाही का? वैदेहीचे लग्न झालं आणि तुम्ही आम्हाला बोलावलं पण नाही, एक वेळ ते सोडा, पण अहो मंगळसूत्र पण नाही की हिच्या गळ्यात.’

‘मामी अग आई खोटं कशाला सांगेल, खरेच मी आणि अभिने मागच्या आठवड्यात हे काम संपवलं. कोर्टात जाऊन दोन सह्या ठोकल्या, आणि जोरात हुर्रे ओरडलो, हाय काय अन नाय काय?’

जरा खुर्ची जवळ ओढून घेत मामी म्हणाली, ‘का ग आपल्या जातीचा, धर्माचा नाही का? की परिस्थिती चांगली नाही, काही प्रॉब्लेम नव्हता ना, बघ ही अनु तुझीच सख्खी मामे बहिण, कसे छान सगळे करून घेत आहे, मेंदीला मी नव्हते आले, पण तो पण कार्यक्रम मस्त झाला म्हणे, काल तर सगळे जन काय नाचले, आता पण तिचा लेहेंगा म्हणे ५० हजाराचा आहे, मुलाकडचे पण भारी हौशी आहेत , त्यांनी सगळ्यांनी ठरवून पैठण्या नेसल्या, फिरायला सुध्दा स्वित्झर्लंडला जाणार आहेत. सोनं तर कित्ती घातलंय अंगावर, मंगळसूत्रच म्हणे ६ तोळ्याचे आहे. पोरीने नशीब काढलं बाई.’

हे सगळं ऐकून आपल्या पोरीची प्रतिक्रिया काय होणार हे आईला पक्के माहित होते, त्यामुळे तिने पट्कन,

‘अग वैदू अभि बोलावत होता तुला, जा बघ त्याला काय हवंय, आणि त्याची सगळ्यांशी ओळख करून दे ना.’

आईने तिला अक्षरशः पिटाळलं. आता वहिनीला काय सांगायचे हे मनात ठरवत असतानाच अजून दोन बहिणी आल्या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, काही अडचण होती का, हे असं लग्न का केलं, आणि केलं ते केलं, किमान मंगळसूत्र, जोडवी महिनाभर तरी घालायला हवी होती नवरीने.

वैदेहीच्या आईला घरातला सगळा गोंधळ आठवला, लग्नच करणार नाही वरून रजिस्टर्ड लग्न करण्यापर्यंत तिची मजल गेली होती, त्यामुळे आई बाबा तर खुश होते, आणि राहता राहिला प्रश्न मांगल्याची लेणी घालायचा, तर तो अभिने सोडवला होता. ‘काकू, लग्न आम्ही एकमेकांसाठी करत आहोत, जगाला दाखवण्यासाठी नाही. त्यामुळे तिने मंगळसूत्र घालावं, नाही घालावं , हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. तिने कपडे काय घालावेत, नाव काय लावावं हा निर्णय तिचा तिने घ्यायचा आहे. लग्न मुळात करतात, आयुष्याची सोबत मिळवण्यासाठी.   

लग्न मुळात करतात, आयुष्याची सोबत मिळवण्यासाठी.   एकट्याने आयुष्य सोपं नाही,शरीराच्या देखील काही गरजा असतात, लग्न मुळात करायचं असतं शरीराच्या गरजा भागवण्यासाठी, वंश वृद्धीसाठी, आता आम्हाला आज राहता येतंय, पण अजून 15,20 वर्षानंतर काय? वंश वृद्धी करायची की नाही हा भविष्यातला प्रश्न आहे, आत्ता तरी आम्हाला दोघांना एकत्र आयुष्याची मजा लुटावीशी वाटत आहे, मग त्यासाठी मंत्र, पूजा, होम , मंगळसूत्र या सगळ्याची खरेच गरज  वाटत नाही. सप्तपदी, वचने या म्हणलं तर फॉर्मालिटीज,तुमचा विश्वास असो नसो बाकीच्या लोकांना हे सगळं करून छान वाटतं, नात्याला नवा अर्थ दिल्याचं समाधान मिळतं तर मिळू देत, आम्हा दोघांना नाही वाटत गरज या कशाचीही तर मग आम्ही कशासाठी हे सगळं करायचं?

जे वैदेही ओरडून सांगायची तेच अभि शांत समजावून सांगायचा.

या लग्नाला येण्याची तिची बिलकुल इच्छा नव्हती, पण लोकांना टाळणं म्हणजे नवीन प्रश्नांना जन्म घालणं होतं, आपल्याला जे आवडत नाही ते इतरांना सुद्धा आवडू नये असा अट्टाहास करणं देखील हे देखील चूकच. आपण नकोच जायला या लग्नाला ,सगळे जण विचारतील, वैदेही नकोच म्हणत होती या लग्नाला यायला, पण अभिने तिला सांगितलं तू आली नाहीस तरी मी जाणार आहे.

'वैदेही ताई ये ना अनूला मंगळसुत्र घालणार आहे तिचा नवरा. ' एक कोणती तरी करवली येऊन सांगत होती.

'वै चल ना, बघू तरी ते काय सांगतात.' अभिला उत्सुकता होती ते गुरुजी विवाहाचा अर्थ काय सांगतात याचा.



मंगळसूत्राची पूजा करत, त्याला हळद कुंकू लावून गुरुजी म्हणाले, ‘ मांगल्यम तंतूनानेन मम जीवना हेतूना, कंठे बधनामी सुभगे त्वं जीवा शरदः शतम्.’ मग त्यांनी अनुच्या नवऱ्याला मंगळसूत्राचं ताट हातात धरायला सांगून, श्लोकाचा अर्थ सांगायला सुरुवात केली,

‘पूर्वापारपासून विवाह सोहळे होतच आलेले आहेत, दोन वेगळ्या घरातले स्त्री पुरुष एकत्र येऊन नवीन संसार मांडतात, यापुढंच त्यांचे आयुष्य सोबत असेल, पण या आधी त्यांनी जे काही पुण्य मिळवलं असेल त्याचे काय? आता तुमची पत्नी माहेरून अन्नपूर्णा घेऊन येते, ते तिच्या हातात अन्नपूर्णा वसेल असा अर्थ दाखवण्यासाठी, बायको चांगलं चुगल खायला घालेल, पण त्यासाठी ती सुद्धा व्यवस्थित सुदृढ राहिली पाहिजे, खूप वर्ष जगली पाहिजे, आजवर जे काही ज्ञान मिळवलं आहे, साधनेचं पुण्य मिळवलं आहे ते सुध्दा मग तिच्याबरोबर वाटून घेतलं पाहिजे ना, म्हणून हे मंगल बंधन, हे सोन्यात, हिऱ्यात आपण अडकवतो, मूळ श्लोकात केवळ धागा अभिप्रेत आहे. आजवर मला जे काही ज्ञान प्राप्ती झाली आहे, ती मला तुझ्याबरोबर वाटून घ्यायची आहे, तुला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून मी हा धागा तुझ्या गळ्यात बांधतो. असा मंगळसूत्राचा साधा सरळ अर्थ अभिप्रेत आहे. कुठेही हे पतीच्या जिवंत असण्याचे लक्षण वगैरे म्हणलेले नाही. आज पासून मी जे काही करेन त्यात तुझा ही समान वाटा असेल, मी तुला माझ्या  बरोबरीने वागवेन हे सगळं सूचित करण्यासाठी म्हणून हे मंगलमय सूत्र. आता पाच बायकांनी याची पूजा करा मग नवरदेव तुम्ही हे पत्नीच्या गळ्यात घाला. ‘

‘वै बघ अजूनही विचार कर, हवंय का? एक दागिना समजून घाल.’

उगाच तिला पीडत अभि म्हणाला.

ती काही बोलणार तेवढ्यात अनुची वैदुडी अशी खणखणीत हाक आली, अख्खा हॉल तिच्याकडे बघत होता.

‘अग लग्नाच्या दिवशी तरी जरा हळू बोल, ‘

‘ऐक ना, तू पण याची पूजा कर ना, तुझ्या सारखा चाकोरीबाहेरचा विचार मला नाही करता येत, पण तुझा हात लागला तर कदाचित काही वेगळा विचार करण्याची हिम्मत जमवू शकेन. गुरुजी ही माझी बहिण, मागच्याच आठवड्यात लग्न झालंय तिचं, ती पण पूजा करेल याची.’ आजू बाजूच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी झेलत, वैदेही म्हणाली, ‘ अनु हे माझं काम नाही ग, वर्षानुवर्षे संसार टिकवलेले अनेक जण आहेत इथे, त्यांच्या अनुभवी हाताने अजून बळ येईल तुझ्या या मंगळसूत्रात.जे मी घालत नाही, ज्यावर माझा विश्वास नाही ते मी दुसऱ्या कोणाला घालायला कसं देऊ.पण बघ तू हा विचार बोलून दाखवायची तरी हिम्मत दाखवलीस ना, अशीच पुढे कोणत्याही  नात्यात जे काही चूक बरोबर आहे ते स्पष्टपणे मांडण्याची तयारी ठेव. नाती फुलतात सच्चाईवर हे नक्की लक्षात ठेव.’

 आजुबाजुच्या बायका बरं झालं हिने पूजा नाही केली म्हणत मनोमन खुश होत होत्या, आणि आपण अभिसारखं शांतपणे समोरच्याला आपलं म्हणणं सांगू शकतो या अनुभवाने वैदेही खुश होती.

गळ्यातली चेन हातात धरत ती अभिला म्हणाली,’ अभ्या गळा ओकाबोका चांगला वाटत नाही म्हणून मी ही चेन वापरायला सुरुवात केली, मग तू अंगठी दिलीस ती यातच पेंडट म्हणून वापरायला सुरुवात केली, काळे मणी घातलेला नेकलेस हाच काय तो इतर हार आणि मंगळसुत्राताला फरक किमान मी असे मानते, आपल्याकडे बाईचे लग्न झाले की नाही हे बघण्याचे सोप्पा मार्ग म्हणजे तिच्या गळ्याकडे बघा, पण मग पुरूषांच काय रे? तू बांधून घेशील गळ्यात काही?’

‘तुझ्यासारखी धोंड गळ्यात बांधून घेतली आता अजून काही बांधून घ्यायला जागा नाही किमान या जन्मात तरी.’

गर्दीत देखील त्या दोघांनी त्यांचे बेट तयार केलं होतं आणि ते त्यावर जगत होते.

त्या दोघांच्या त्या केमिस्ट्री कडे बघत अनु गळ्यात मंगळसूत्र घालून घेत होती, आणि आपल्या दोघांमध्येही असेच नातं फुलू देत असं नवऱ्याला डोळ्याने सुचवत होती.   


मानसी होळेहोन्नुर
पूर्व प्रसिद्धी :सनविवि (स्त्री सूक्त)

No comments:

Post a Comment