Friday, September 28, 2018

चिमुटभर

‘आह काय मस्त वातावरण आहे ना, चल ना मस्त भटकायला जाऊ.?’ अंगावरचे पांघरूण बाजूला सुद्धा न करता अमेय ओरडला, त्याला नॉर्मल माणसांसारखे हळू बोलताच येत नाही म्हणून प्रियंका आधी कुरकुरायची आता कितीही सांगितलं तरी हा काही बदलणार नाही कळल्यावर तिने ते ही बोलणे सोडून दिले. हातातला चहाचा मग त्याचा हाताला हळूच लावत ती म्हणाली, ‘आधी त्या मलमली दुलईतून उठून दाखव आणि मग बघ स्वप्न बाहेर फिरायला जायची.’
‘कशी बायको आहेस, नवरा एवढा फिरायला घेऊन जातो म्हणतोय आणि तू त्याला पाठींबा द्यायचा सोडून असे टोमणे काय मारतेस.’
‘बायकोला काम आहे त्याच दिवशी बर तुला बाहेर फिरायचा मूड येतो रे.’
मगातला चहा संपवत तिने  टेबलवरचा लॅपटॉप उचलला आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली.
‘काय हे बायको , खरेच काम आहे तुला आज? चल ना जरा भटकून येऊ मस्त बाहेरच खाऊ आणि मग दुपारी झोपायला मस्त परत घरी येऊ. संध्याकाळी कर की तुझे काय काम आहे ते.’
त्याच्याकडे वळून पण न बघता ती म्हणाली,
‘पूर्ण टीम ऑफिस मध्ये आहे, मला किमान घरून काम करायची तरी परवानगी मिळाली आहे. संध्याकाळच्या आत सगळं काम संपवून पाठवायचं आहे क्लाएंटकडे. ऑन साईटची टीम सुद्धा काम करतीये. त्यामुळे आत्ता नाही पण जर आमचे काम नीट पार पडलं तर आपण संध्याकाळी जाऊ या फिरायला चालेल’
तोंड पाडून पूर्ण जागा होत एकदम उठून बसत तो म्हणाला,
‘ मागचा पूर्ण विकेंड मी काम करत होतो त्याचा वचपा काढतीयेस का?’  
हातातल टायपिंग थांबवत ती एकदम म्हणाली,
‘ बरा आहेस ना, सकाळी सकाळी हे काय सुरु केलेस? काम असे काय ठरवून विकेंडपर्यंत लांबवता येते का? आणि तुझ्यापेक्षाही जास्त भटकायची हौस मला आहे हे सोयीस्कर विसरलास वाटतं. ‘
आता ही चिडली कि चहा पण देणार नाही आधीच मूड खराब झालेला म्हणून जरा बॅंकफूट वर जात तो म्हणाला,
‘तसे नाही ग पियू, पण मस्त पावसाळी हवा, जुळून आलेला शनिवार म्हणून जरा वाटल आणि मी बोललो. जाऊ देत ते सगळं मला किमान तुझ्या हातचा चहा तरी दे ना म्हणजे दिवस कसा मस्त सुरु होईल. आणि नाश्त्याचे काय करायचे?’
 ‘वाटलंच चहासाठी तरी मला मस्का लावशीलच. मावशी येतील १५ मिनिटात त्यांना सांग काय हवंय ते. आणि ९ ते ११ मी कॉल वर असेन तेव्हा बेडरूम बंद करून बसेन प्लीज मध्येच येऊन खुडखुड करू नकोस.’
 चहा येईपर्यंत काहीच तक्रार करायची नाही चहा आला की पुढचे पुढे बघू म्हणत तो उठून बाल्कनीकडे गेला, बेडरूमच्या बाल्कनीपेक्षा हॉलच्या बाल्कनीतून दिसणारा नजारा जास्त चांगला होता, मस्त पैकी पेपर हातात घेऊन तो चहाची वाट बघत अपार्टमेंटच्या आसपासची हिरवळ बघत होता. पाऊस पडून गेलेला होता, काही चुकार मुलं शाळा सुटली तरी शाळेपाशी रेंगाळतात तसे काही काळे ढग अजूनही आकाशात रेंगाळत होते, सूर्य देखील आळसावलेला होता, ढगांच्या दुलईतून मधेच डोकावत होता, मधेच गुडूप होत होता.  एक सुखद गारवा हवेत होता. प्रेम वगैरे होण्यासाठी, प्रकट करण्यासाठी हीच ती योग्य वेळ, हाच तो योग्य दिवस हे सगळं वाटणे एकीकडे आणि पैसा हवा म्हणून नोकरी आणि त्या नोकरीसाठी स्वतःला गहाण ठेवणं ही अपरिहार्यता दुसरीकडे. मागच्या शनिवारी तो काम करत होता, आणि आज ती काम करतीये.
‘घे तुझा चहा, आणि मी पळते माझ्या कामाला. नऊ वाजतच आलेत. मावशी येतील काय हवं ते करून घे. आणि प्लीज मला पण नाश्ता रूममध्येच आणून देशील.
‘चहाचा पहिला घोट घेऊन तरतरी आल्यामुळे, तिच्यापुढे झुकत तो म्हणाला,’ जो हुकुम मेरे आपा’
आता काय बाकीचा दिवस असाच इथे बसून टाईमपास करत घालवावा, आठवड्याचे साचलेले फोन करून घ्यावेत, जमला तर एखादा पिक्चर बघून घ्यावा असा सगळ्या विचारात असतानाच एकदम मावशींचा फोन आला.
मावशींचा फोन फक्त एकाच कारणासाठी येतो, मी येत नाही सांगायला. तेच याहीवेळी झाली. महिनाअखेर होती, आणी या महिन्यातली सुट्टी घेतली नव्हती म्हणून त्या येत नव्हत्या, हे ही त्यांनीच सांगीतले वर परत आज काय ताई असतीलच घरी मग त्या बघून घेतील हे ही आगावपणे ऐकवले.
आता खरा प्रश्न होता, पियु कामात होती, मावशींच्या भरवश्यावर होती. मग आता नाश्ता जेवण बाहेरून आणणे नाहीतर मी करणे एवढे दोनच पर्याय होते. दुसरा पर्याय इतका भयंकर आणि कल्पनेच्या पलीकडचा होता की त्यावर त्याने लगेच फुली काट मारली. पण आता बाहेर जायचे म्हणजे कपडे बदलायचे, मग बेडरूम मध्ये जावं लागेल, ऑर्डर केली तरी तिला लगेच काळे. हे सगळं करताना मावशी आल्या नाहीत हे ही पियुला कळेल मग तिची अजून चिडचिड होईल. नकोच त्यापेक्षा आपणच काहीतरी करून बघू या का? त्याच्या डोक्यात उगाच किडा वळवळायला लागला. करून तर बघुयात आजवर न केलेली गोष्ट करून बघण्यात पण एक थ्रिल असतेच ना. गाडी बुंगाट वेगात पळवताना जेवढा आनंद मिळतो तसाच काहीसा वेगळा आनंद पण स्वैपाक करताना मिळू शकेल असं उगकॅह त्याचे एक मन त्याला पटवत होते, तर दुसर मन अरे आजवर केले नाहीस ते कशासाठी करून बघायचं, सरळ विकत आन, ऑर्डर कर आणि मस्त लोळत एखादा पिक्चर बघ, एकदा करशील आणि फसशील.
पोट, मेंदू, आणि पाकीट यांच्या मारामारीत सरतेशेवटी पोट जिंकल आणि तेही मेंदूला सोबत घेऊन, पाकीट वाचल. मस्त पोहे करून तर बघुयात म्हणून त्याने लगेच फोनवर तुनळी उघडली आणि कांदेपोहे सर्च करायला सुरुवात केली. घराबाहेर तो कधीही राहिला नव्हता, आणि जेव्हा राहिला तेव्हा सोबतच्या लोकांना स्वैपाका करता यायचा, हा आपली भांडी घासायचे काम तेवढे करायचा. तसे किचन फार ओळखीचे नव्हते, पण शोधलं तरीही सापडणार नाही इतकेही अनोळखी नव्हत. आज लग्नानंतर तब्बल वर्षभराने का होईना पण बायकोला काहीतरी हाताने बनवून खायला घालूयात. बाकीच्याना करताना खूप वेळा पाहिले होते, आपण आज स्वतःही करून बघूया म्हणत अमेय चक्क किचन मध्ये घुसला. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते म्हणून त्याने सरळ कांद्याऐवजी बटाटा पोहे करायचे ठरवले. बायकोने सगळ्या डब्यांवर नावे लिहून ठेवली होती त्यामुळे पोहे सापडायला काही वेळ लागला नाही. मध्येच आईला फोन करत शंका निरसन करून घेतले होते. आईला शंका आली पण त्याने काहीतरी बोलून वेळ मारून नेली.
मसाल्याचा डबा, मिरच्या, दाणे सगळे जवळ ठेवत त्याने तूनळी बघत बघत पोहे फोडणीला घातले. अरे हे वाटते तेवढे काही अवघड काम नाही असे म्हणत त्याने तो व्हिडीओ संपायच्या आधीच बंद केला. मग एका प्लेट मध्ये मस्त पोहे काढून ठेवत, त्यावर कोथिंबीर, आणि किसलेले खोबरे , ते ही बायकोने एका डब्यात ठेवले होते ते भुरभुरत त्याने झोकात रुममध्ये एन्ट्री घेतली. फोनवरचा माईक बंद करत ती म्हणाली ‘वाः पोहे. मस्तच. पण मावशींच्या नेहेमीच्या पोह्यांसारखे नाही दिसत आहेत, काही तरी वेगळे केलंय बहुतेक. तू आलाच आहेस तर तुला सांगते बग सुटलाय, त्यामुळे अजून अर्ध्या पाऊन तासात मी मोकळी होऊ शकेन. सकाळी बाहेर जायचे काय म्हणत होतास ते तर अजूनही मूड असला तर जाऊयात.’
स्वतः केलेल्या पोह्यामुळे तो आधीच खुश होता, त्यात बायको बाहेर यायला हो म्हणाली म्हणून अजूनच खुश होता. हसत हसत रूममधून बाहेर पडला.
पोह्याची सजवलेली प्लेट घेतली, आणि परत बाल्कनीत जाऊन बसला.
पहिल्याच घासाबरोबर लक्षात आले मीठच घातल नाही, छ्या एक घास खाऊन मग तिला द्यायला हवे होते. आता परत मीठ घेऊन जावे तर तिचे निम्मे  खाऊन पण  झाले असेल.
मग त्याने पण तसेच बिन मिठाचे पोहे खायला सुरुवात केली तेव्हा आठवले सुरुवातीचे दिवस, तिच्या घरची स्वैपाकाची पध्दत आणि त्याला आवडणारा स्वैपाक खूप फरक होता, त्यावेळी तो भरपूर भडकायचा पण तिने हळूहळू त्याला हवा तसा स्वैपाक शिकून घेतला, रांधायला लागली, तिला तसा स्वैपाक आवडतो की नाही हे पण त्याने कधी विचारले नव्हते, दोघांसाठी काही ते दोन वेगळ्या गोष्टी करणार नव्हती, क्वचित कधी केलेच तर तो लगेच नाक उडवून नापसंती दाखवायचा.  छोट्या गोष्टी तिने कधी मोठ्या होऊ दिल्या नव्हत्या. उद्यापासून कशाला आता ती आली की लगेच या कधीच न उमगलेल्या गोष्टी आपण बोलूया त्याची माफी मागुया  असे त्याने ठरवलं तेवढ्यात तिचा मेसेज आला.
‘स्वतःची ओळख चिमुटभर विसरून नात्यात विरघळल की नातं जास्त बहरतं, तसेच मिठाचे असते, चिमुटभर का होईना पण लागतेच. पहिलाच प्रयत्न झकास होता.’
या मेसेजवर रिप्लाय देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीतच मोबदला आणि बोनस द्यावा म्हणून तो आता आतुरतेने तिची वाट पाहत होता, अळणी झालेलं दोघांचेही  तोंड त्याला आता गोड करायचे होते.
मानसी होळेहोन्नूर 
पूर्व प्रसिद्धी :(सनविवि स्त्री सूक्त)जुलै २०१८

No comments:

Post a Comment