Tuesday, October 2, 2018

लक्ष्मीची पावले


‘बाबा हो आत्ता तुम्हालाच फोन लावणार होते. तुमचे पार्सल सुखरूप पोहोचलं.’
...
‘ हो हो हर्षल त्यांना घ्यायला गेला होता, घरी सोडून तसाच खालच्या खाली ऑफिसला गेला आहे तो, मी मात्र आज घरूनच काम करेन.’
...
‘ हो हो सांगते त्यांना. त्या आत्ता आंघोळीला गेल्या आहेत. आल्या की मग आम्ही दोघी एकत्रच नाश्ता करू. तेव्हा करतो तुम्हाला फोन.’

हर्षलच्या आईपेक्षा हर्षलच्या बाबांशी बोलणे स्वातीला नेहेमीच आवडायचे. सासूबाई कडक लक्ष्मी म्हणूनच प्रसिद्ध होत्या. जरा जास्तच शिस्तीच्या भोक्त्या होत्या. त्यामुळे आत्ता सुध्दा आईंच्या ऐवजी बाबांनी किंवा त्या दोघांनी एकत्र अयावे हे त्यांनी अप्रत्यक्ष सुचवलं होते, पण त्यांचे काहीतरी काम निघाल म्हणून मग सासूबाई एकट्याच पुढे आल्या आणि चार दिवसानंतर ते येतो म्हणाले. आता चार दिवस यांच्याशी जुळवून घेतलं की झाले. तशी ही दोघींचीही पहिलीच वेळ होती, म्हणजे सासूचे स्वतःच्या घरी स्वागत करायची स्वातीची पहिली आणि सुनेच्या घरी जाऊन राहायची तिच्या सासुचीही पहिलीच वेळ होती.

‘घर छान लावलं आहेस की.’ अगदीच गेल्या गेल्या चुका काढायला नको म्हणून सासुबाईंनी सूनबाईंना बरे वाटेल अशी प्रतिक्रिया दिली.

‘आवडले तुम्हाला, हर्षल म्हणालाच होता आईला नक्की आवडेल. आता जरा नाश्ता करू या मी पण थांबली आहे तुमच्यासाठी.’

‘मग बेंगलोर स्पेशल नाश्ता का आज?’

‘ हो ना इडली आणि सांबार केला आहे, बघा बरं तुमच्यासारखा झाला आहे का?’ स्वाती अंदाज घेत घेत बोलत होती.

‘ इडल्या मस्त लुसलुशीत झाल्या आहेत ग, काय प्रमाण घेतलेस? सांबार मात्र थोडा तिखट आणि वेगळा आहे.’ दोन गृहिणी भेटल्यावर बोलतात तशा त्या सासुसुना बोलत होत्या. लग्नाला जेमतेम चार महिने झाले होते. आणि एक दिवसाआड फोन लग्नाच्या वेळेसचा १० दिवसांचे वास्तव्य मध्ये एक दोन दिवसांची धावती भेट इतकाच काय तो त्यांचा आजवरचा संवाद होता. त्यामुळे दोघीही एकमेकींचा अंदाजच घेत होत्या.

‘नाही पीठ मी विकतच आणते, आई. ग्राइन्डर मध्ये पीठ छान होते असे इथल्या मैत्रिणी म्हणतात, पण तोवर हे पीठ खूप सोयीचे पडते, परत आम्ही दोघेच इथे त्यातही निम्मे दिवस हा तरी बाहेर खातो नाहीतर मी तरी, ऑफिस गेट टुगेदर, पार्टी काही ना काही तरी असतेच. ‘ उगाच आपण आळशी आहोत असा ठपका बसायला नको म्हणून सुनबाई सारवासारवी करत होत्या.

‘हो ग माझ्या लेकाला पहिल्यापासून बाहेर खायला खूप आवडते. तुम्ही दोघेही सकाळीच निघता मग कामवाली बाई कधी येते.’
‘लक्ष्मी ती तर सकाळीच ७ वाजता येते आणि काम संपवून साडे सातला जाते पण. हे एवढुसे घर, त्यात राहतो आम्ही दोघेच, भांडी पण फार नसतात. कपडे मशीनला आम्हीच लावतो, आणि वाळत घालतो.’

‘पण या बायका फार वरवरचे काम करतात बर का, त्यांच्यावर जरा लक्ष द्यावे लागते, सांदीकोपऱ्यातून त्याच्याकडून झाडून घ्यावे लागते. तसे करत असावीस कारण फारशी धूळ नाही दिसली घरात.’ आपण एकदम सासू मोड मध्ये जातोय हे लक्षात घेऊन त्यांनी जरा मग थोडा खालचा सूर लावला.

‘हो शनिवारी किंवा मी जर एखाद दिवशी वर्क फ्रॉम होम करत असेल तर मी करून घेते तिच्याकडून नीट कामा, पण रोज मात्र तिच्या कामाकडे बघायला वेळच नसतो.’  

 ‘आता मी आली आहे तर जरा तिच्याकडून काम करून घेऊ का? येईलच ना ती उद्या?’

स्वाती भयंकर गोंधळली होती, सासूला सांभाळावं की कामवालीला,
‘चालेल पण ती आता थेट सोमवारीच येईल. आणि तशी चांगली आहे लक्ष्मी पण तुम्ही शाळेत मुलं सांभाळायचा तसेच तिलाही सांभाळून घ्या.’

‘वाह बोलायला एकदम हुशार आहेस की, तुझी बाई पळून जाणार नाही एवढी काळजी घेऊन मी, पण उद्या परवा का येणार नाही ती? तिला पण तुमच्यासारखा फाईव्ह डेज वीक असतो का ग?’ सासुबाईंनी एकदम टोमणा मारला.

‘फाईव्ह नाही पण सिक्स डेज बरं का आई, इकडे बरेच जण त्यांच्या कामवाल्या बायकांना रविवारी सुट्टी देतात. आता हे कोणी कधी कसे सुरु केले माहीत नाही, पण आम्ही इथे आलो तेव्हाच लक्ष्मीने हे सांगितले. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला काहीतरीच वाटले, रविवार मस्त सुट्टीचा दिवस आणि त्या दिवशी आम्हीच घरी काम करायचे का, पण मग तिच्या दृष्टीकोनातून विचार केला आणि जाणवले, जशी सुट्टीची आम्हाला गरज आहे तशीच गरज तिलाही असेलच ना. आणि या व्यतिरिक्त तिला सुट्ट्या हव्या असतील तर ती व्यवस्थित आधी सांगते, चार दिवसापेक्षा जास्त सुट्टी घेणार असेल तर चक्क बदली कामवाली देऊन जाते. गंमत म्हणजे आई पण जर कोणाकडे रविवारी काही कार्यक्रम असेल तर ही बया स्वतःहून सांगते, या रविवारी मी कामाला येईन पण फक्त तुमच्याकडे. कारण या बिल्डींगमध्येच तिच्याकडे सहा कामे आहेत, आणि पलीकडच्या बिल्डींगमध्ये चार. सकाळी सहा वाजता येते झट झट कामे करून दोन वाजता ही तिच्या घरी. खालच्या मजल्यावरच्या नायर आँन्टीकडे पाच वर्षापासून कामाला आहे ती. त्यांच्या घराची एक किल्ली हिच्याकडे असते, त्या नसल्या तरी ही काम करून जाते. पलीकडच्या बिल्डींगमध्ये एक मराठी फॅमिली आहे त्यांच्याकडे पण ही लक्ष्मी चार वर्षांपासून आहे, पण उगाच माझ्या घरचे तिला सांग, तिच्या घरचे मला सांग नाही हिचे.’

‘स्वाती मी पहिल्यांदाच असे काही ऐकतीये म्हणजे चार वर्षांपूर्वी माझ्या सासूबाई घरातच घसरून पडल्या तेव्हापासून आमच्या घरी कामवाली बाई म्हणजे निर्मला आली. त्या आधी आम्ही दोघी मिळूनच सगळे काही करत होतो. त्यामुळे या बायकांचे नखरे, तोरा मी फक्त इतरांच्या बोलण्यातूनच ऐकायचे. निर्मलाच्या पण काही गोष्टी आहेत, ज्या मला आवडत नाहीत पण आईंना शेवटच्या काळात तिने जेवढे सांभाळले, त्यांचे अगदी हागणेमुतणे काढले आणि तेही तोंडातून चकार शब्द न काढता तेव्हापासून तिच्या न आवडणाऱ्या गोष्टींकडे मी काना डोळा करायला लागले. पण तू म्हणतेस ते ही बरोबर आहे ग. यांना पण वाटत असेलच ना आपण एखाद दिवशी सुट्टी घ्यावी.’
‘आमची लक्ष्मी इतकी छान टापटीप राहते ना आई, तुम्ही बघलाच म्हणा तिला सोमवारी, तोडके मोडके हिंदी बोलते, मला अक्का आणि हर्षलला अण्णा म्हणते. मुलगा पाचवीला आणि मुलगी तिसरीला आहे. हिला तेलगु, कन्नड तर येतेच पण दोन तीन मराठी घरी काम करते त्यामुळे मराठी पण समजते बर का.’

‘ आपण नेहेमी कसा फक्त आपलाच विचार करतो ना, म्हणजे तू आज हे सांगेपर्यंत मला कामवालीला देखील साप्ताहिक सुट्टीची गरज असू शकते याची जाणीवच नव्हती. उलट मी रविवारी निर्मलाकडून जादाची कामे करून घ्यायचे. अर्थात मग माझ्या जुन्या साड्या, ड्रेस, किंवा कधीतरी नाश्ता, काही जास्तीचा घरी आलेला खाऊ, जुना झालेला खाऊ सुद्धा देते. राग येणार नसेल तर एक विचारू का?’
‘विचारी का त्यात काय एवढे?’

‘तुम्ही तिला पगार किती देता ग? तुझ्या सासरेबुवांनी मला अगदी दम देऊन पाठवले होते, त्यांचे घर आहे, त्यांचे खर्च आहेत, तू उगाच तुझ्या खर्चांशी त्याची तुलना करत बसू नकोस, पण तरीही राहवले नाही म्हणून मी विचारतीये.’

 ‘आई बाकीचे किती देतात मी विचारायला गेले नाही, पण आमच्याकडून ही झाडू फरशी आणि भांडी घासायचे दीड हजार घेते. पण नियमितपणे येते, खाली पडलेलं सोन्याचे जरी असले तरी उचलून ठेवते, त्यामुळे मला तरी पटले बाबा तिचे काम. तशा दुसऱ्या पण कामवाल्या आहेत पण तिच्या सारखी दुसरी मिळेल की नाही कोणास ठाऊक. सहज म्हणून सांगते, दोन आठवड्यापूर्वी मला बरे नव्हते, त्यामुळे ही आली त्य दिवशी मी झोपूनच होते, तर हिनेच सकाळी चहा करून दिला आम्हाला दोघांना. खरेतर रांगोळी काढायला मी तिला सांगितले नव्हते पण तरीही रोज नित्य नेमाने तुळशीपुढे रांगोळी काढते. ’ अप्रत्यक्षपणे या बाईला त्रास देऊन पळवून लावू नका असाच सूर होता स्वातीच्या बोलण्याचा.


‘सून बाई आम्ही नाही येणार हा तुमच्या आणि तुमच्या लक्ष्मीच्यामध्ये. तसेही आम्ही चार दिवसांचे पाहुणे आहोत ग, तुमचे घर तुम्हीच सांभाळायचे, उगाच आम्ही येऊन त्याची घडी कशाला विस्काटायची? काळजी करू नकोस.’ सासुबाईंनी सूनबाईंच्या हातावर हात ठेवत एका नव्या नात्याची सुरुवात केली होती. त्यांचा हात हातात घेत स्वाती म्हणाली,

‘हर्षल म्हणालाच होता, आई जराशी कडक, तापट आहे, पण नवीन गोष्टी समजून घेते, आणि एकदा तिला पटलं तर मग उगाच विरोध करत नाही. तरीही तुम्ही येणार म्हणून खूप टेन्शन होते, खोटे कशाला सांगू मी आजची सुट्टीच काढली होती, कारण कामात लक्षच लागले नसते. पण आता खूप मोकळे सुटल्यासारखे वाटत. थँक्स आई आता सुट्टी घेतली असली तरी लॉग इन करून बघते, काही काम असले तर संपवून टाकते.’

‘स्वाती तू जर कामावर येणाऱ्या बाईचादेखील एवढा विचार करत असशील तर घरातल्या माणसांचा नक्कीच विचार करशील. एवढी खात्री मी आता बाळगू शकते. भांड्याला भांडे लागतच, त्याचा आवाज होतोच, पण तो आवाज लांबवर जाऊ न देण्याचे प्रयत्न मात्र दोघीही करूया. आता खूप गोड बोलून तोंड दुखायला लागले बाई, तू जा तुझ्या कामाला, मी हे जसे जमेल तसे आवरते आणि माझे सामान लावून घेते,’

खळखळून हसून स्वातीने आल्यापासून पहिल्यांदा सासूला वाकून नमस्कार केला. तेव्हा तिला ती पावले लक्ष्मीची पावले वाटली.
मानसी होळेहोन्नुर
पूर्वप्रसिद्धी : सनविवी ( ऑगस्ट २०१८)


No comments:

Post a Comment