Thursday, December 26, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा २६

‘सौंदर्याच्या काही व्याख्या, मानके असू शकत नाहीत. कारण सौंदर्य हे बघणाऱ्यांच्या ‘डोळ्यात’ असते, तरीही दर वर्षी ‘मिस युनिव्हर्स’, ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धा होतच असतात. या सौंदर्य स्पर्धामागची गणिते खूपच वेगळी असतात हे आत्तापर्यंतच्या स्पर्धामधून दिसून आले आहेच, पण तरीही या स्पर्धाचा जनमानसावरचा प्रभाव पुसता येत नाही. या वर्षी दक्षिण आफ्रिकेची झुझीबिनि टुंझा ही कृष्णवर्णीय सुंदरी विजेती ठरलेली आहे. आजवरच्या ६८ वर्षांच्या जगतसुंदरीच्या स्पर्धेमध्ये केवळ सहा कृष्णवर्णीयांना जगतसुंदरीचा मान मिळालेला आहे. झुझीबिनीचे अजून एक खास वैशिष्टय़ म्हणजे तिचे केस. आखूड, कुरळे, विरळ केस ही खास आफ्रिकन वैशिष्टय़े असलेली झुझीबिनी ही पहिली जगतसुंदरी ठरलेली आहे.
या स्पर्धेतली आणखी एक घटना म्हणजे ‘मिस म्यानमार’ने दिलेली कबुली. म्यानमार हे बौद्धबहुल राष्ट्र. समलैंगिकता हा तेथे गुन्हाच समजला जातो, पण ‘मिस युनिव्हर्स’मुळे मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून मिस म्यानमार, स्वे झिन हातेत हिने ती समलैंगिक असल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये कुणी ही बाब जाहीर करण्याची पहिलीच वेळ होती. २०१३ मधल्या दुसऱ्या क्रमांकाची विजेती पॅट्रिशिया युएना रॉड्रिग्ज हिने तिचा कार्यकाल संपता संपता ती समलैंगिक असल्याचे जाहीर केले होते. स्वे झिन ही स्पर्धा न जिंकताही लक्षात राहील. तिने नोव्हेंबरमध्ये ही बाब जाहीर करतानाच सांगितले, की ‘माझ्या देशात समलैंगिक असणे हा गुन्हा समजला जातो. त्याविरुद्ध लढा देण्यासाठीच मी या व्यासपीठावर ही कबुली दिली आहे. याचा माझ्या देशातल्या ‘एलजीबीटी’ चळवळीला खूप मोठा फायदा होणार आहे.’ सौंदर्य स्पर्धामध्ये सौंदर्याबरोबरच बुद्धीचासुद्धा विचार केला जातो. त्यामुळेच स्पर्धक काय उत्तर देतो यावर अनेकदा विजेतेपद ठरवले जाते. झुझीबिनीने ‘मुलींना काय शिकवले जावे असे तुम्हाला वाटते,’ या प्रश्नावर, ‘मुलींना नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे,’ असे सांगितले. तर स्वे झिनने मिळालेल्या संधीचा फायदा घेत, आपण लेस्बियन आहोत, हे सांगून ही स्पर्धा बाह्य़ सौंदर्याच्या दिखाव्याची नाही, इथे स्त्रीविषयक नवनवीन प्रश्नांचा, घटनांचा उहापोह व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सौंदर्यस्र्पोचं व्यासपीठ स्त्रीच्या आशाआकांक्षांवर, विविध विषयांवर चर्चा  करणारं होवो, अशी अपेक्षा हे वर्ष सरता सरता करायला काय हरकत आहे?
तिची संगीतिका
व्हिएन्ना ही काही फक्त ऑस्ट्रियाची राजधानी किंवा मोठे शहर म्हणून प्रसिद्ध नाही. या शहराची वेगळी ओळख आहे, ती म्हणजे संगीताचे शहर. मोझार्ट, बीथोवेन, फ्रांझ शुबर्ट, जोहान्स ब्राह्म्स, रॉबर्ट स्टोल्झ, जोहान स्ट्रोस अशा अनेक मान्यवरांनी इथे संगीतसाधना केलेली आहे. इथल्या ‘सिटी ऑपेरा हाऊस’ला दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र गेल्या दीडशे वर्षांत न झालेली गोष्ट आता तिथे होणार आहे. लवकरच तिथे ओल्गा न्यूवर्थ या ऑस्ट्रियामधल्याच स्त्री संगीत दिग्दर्शकाने बसवलेल्या ऑपेराचा प्रयोग होणार आहे. व्हर्जिनिया वूल्फ यांनी १९२८ मध्ये लिहिलेल्या ‘ओरलॅंडो’ या कादंबरीवर आधारित ही संगीतिका असेल. अर्थात, ही कथा एकविसाव्या शतकाच्या अनुषंगाने बदललेली आहे. ऑपेराच्या दिग्दर्शक स्त्री असणं हे काही नवीन नाही. अगदी सतराव्या शतकापासून स्त्रियांचे या क्षेत्रातील कर्तृत्व बघायला मिळते, पण तरीही त्यांना हक्काचे व्यासपीठ मात्र आजवर सहजासहजी मिळाले नाही. न्यूयॉर्कमधल्या ऑपेरा हाऊसमध्ये स्थापना झाल्यानंतर ११३ वर्षांनी, २०१६ मध्ये, कैजा सारीआहो यांचा प्रयोग झाला, जो त्या ‘ऑपेरा हाऊस’मधला स्त्री दिग्दर्शकाने सादर केलेला पहिला ऑपेरा होता. आजही स्त्री कलाकारांना सहजासहजी कामाच्या संधी मिळत नाहीत. एका स्त्री दिग्दर्शकाने तिचा अनुभव सांगितला होता, जो अगदीच प्रातिनिधिक म्हणावा लागेल. तिने जेव्हा तिच्या रचना दाखवल्या, तेव्हा ‘अरे हे तर अगदीच सोपे आहे,’ असे म्हणून लोक तिच्या कामाला निकालात काढत होते, पण तिने ‘ते गाऊन बघा आणि मग सांगा, सोपे आहे की अवघड,’ असे स्वत:चे म्हणणे रेटून नेले तेव्हा त्या इतर कलाकारांनी गाऊन बघण्याचा प्रयत्न केला. अर्थातच, हे सोपे नसल्याचे त्यांच्या लगेचच लक्षात आले.
केवळ तुलना म्हणून नाही, पण आपल्याकडच्यादेखील शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या चित्रपटसृष्टीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच स्त्री संगीत दिग्दर्शक बघायला मिळतात. केवळ गुणवत्ता नाही म्हणून नाही, तर संधीचा अभाव हे त्यातले एक महत्त्वाचे कारण असू शकते. जात्यावर बसल्या बसल्या गाणी रचणाऱ्या, कोणतेही काम करताना सोबत गाणे गुणगुणणाऱ्या, अनेकजणी पूर्वीही होत्या, आताही आहेत आणि पुढेही असतील. संगीत हे निव्वळ स्वरांची बांधिलकी मानते, त्यात स्त्री-पुरुष असे भेद नसतात. त्यामुळेच ‘व्हिएन्ना सिटी ऑपेरा हाऊस’मध्ये यापुढे अनेक स्त्री दिग्दर्शित ऑपेरा बघायला मिळतील. केवळ तिथेच नव्हे तर जगभर जिथे जिथे ऑपेरा आहेत तिथे स्त्रियांना समान संधी मिळतील. प्रत्येक वेळी केवळ समानतेसाठी म्हणून नव्हे, तर संधी लवकर आणि सहज मिळाल्या तर भविष्यात असे प्रासंगिक लिहिण्याची वेळच येणार नाही.
तरीही स्त्री उभी राहते
आजचा या सदराचा हा शेवटचा लेख. वर्षभर हे सदर लिहीत असताना, जगभरातल्या स्त्रीविषयक बातम्या बघताना, अनेकदा विविध साम्यस्थळे सापडायची. संस्कृती, भाषा, धर्म, वेगळे असले तरीही त्यांच्यासमोरचे प्रश्न थोडय़ाफार फरकाने सारखेच आहेत. त्यांच्या अपेक्षा, आनंद, दु:ख, व्यक्त होण्याच्या जागा, पद्धती, सारख्याच आहेत, हे लक्षात येत होतं. ‘मी टू’चे अमेरिकेत सुरू झालेले लोण कधी जगभर पसरले, कळलेच नाही तसंच.
बलात्कार हा तिरस्करणीयच असतो. जबरदस्ती ही कोणत्याही पद्धतीची असो, वाईटच असते. जगभर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती बघायला मिळतात, त्यामुळेच अमेरिकेत, आफ्रिकेत, मध्य पूर्वेत, ऑस्ट्रेलियात, सगळीकडे स्त्रियांवर बलात्कार होतच असतात. तिने तोकडे कपडे घातले होते, ती रात्री-अपरात्री एकटी फिरत होती, अशी कोणतीही तथाकथित कारणे नसतानाही स्त्रियांवर, मुलींवर जबरदस्ती होतच असते. कधी त्यांच्याबद्दल वाच्यता केली जाते तर कधी ते दडपून ठेवले जातात. भारतामध्ये ‘निर्भया’वर झालेल्या बलात्कारामुळे पूर्ण देश ढवळून निघाला होता. तसेच काहीसे समाजमन ढवळून निघाले हैदराबाद येथे ‘दिशा’वर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्या समोर आली तेव्हा. तिच्या बलात्कारातील संशयितांना पोलिसांनी कथित चकमकीमध्ये ठार केले, पण या घटनेतून उभे राहिलेले प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत. सामाजिक मानसिकता बदलत नाही तोवर हे सुरूच राहणार आहे. चिली देशामध्ये अशाच एका बलात्काराच्या घटनेनंतर स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे एक गाणे रचले. मग चार जणींच्या सोबतीला चारशे आल्या आणि हे गाणे दणक्यात गायला लागल्या. त्यांनी एकत्र नाचत ताल धरला. स्वत:ची सगळी चीड, राग त्यात ओतला. त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येकीलाही ते तिचेच गाणे वाटत होते. साहजिकच या गाण्याचे लोण चिलीतून, मेक्सिको, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड सगळीकडे पसरले.
डॉ. मुग्धा कर्णिक यांनी केलेला या गीताचा मराठी स्वैर अनुवाद वाचून तुम्हालाही नक्की वाटेल, या तर माझ्याच भावना आहेत.
‘इथे करते न्याय आमचा बापसत्तेची नीती
जन्मा येताच ठरवून टाकतो पोरींची नियती
रोज-रोज होते शिक्षा दिसत नाहीत वळ, व्रण
मोकळे जगणे मुश्कील करते बापसत्तेची नीती
मारतात इथे बायांना, मारणाऱ्यांना कवच आहे
करतात गायब बायांना, त्यांनादेखील कवच आहे
बळजबरीचा भोग घेतात, त्यांनादेखील कवच आहे
बाईचीच चूक, बाई कुठे होती,
बाईचीच चूक, बाई काय नेसली होती
बाईची चूक नसते हे काही बापसत्तेला मान्य नाही.
म्हणूनच सांगतो आता बापसत्ताच बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
बापसत्तेचे पाईक कोण –
पोलीसही आहेत त्यात
न्यायाधीशही असतात त्यात
वकील, डॉक्टर, पत्रकारही
सारे सरकार आहे त्यात
संस्कृतीवादी राष्ट्रप्रमुखही
संस्कारघोटय़ा संघटनाही
जुलमी सरकार बलात्कारी
जुलमी प्रशासन बलात्कारी
तुम्ही आहात बलात्कारी
तुम्ही सारे बलात्कारी
झोप बाळे झोप शांत
चोरडाकूची चिंता नको
– अंगांगावर आहेत लक्ष ठेवून
सारे प्रेमळ शौकीन बाप !
जेव्हा-केव्हा गरज पडते, स्त्री उभी राहते, हा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि हेच भविष्यदेखील असेल. ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ सदरासाठी लिहिताना हेच ठळकपणे जाणवले. अंधार आहे पण त्यातून मार्ग काढणाऱ्या, साहसाचे काजवे चमकवणाऱ्या, हक्कांसाठी आग्रहाच्या मशाली लावणाऱ्या, तुमच्या-माझ्यासारख्या अनेकजणी आहेत. हेच होते माझ्या ‘पृथ्वी प्रदक्षिणे’चे फलित..
(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग २१ डिसेंबर २०१९ 

पृथ्वी प्रदक्षिणा २५

काही आठवडय़ातच २०२० हे वर्ष सुरू होईल. या शतकातल्या दुसऱ्या दशकाची समाप्तीदेखील या वर्षांअखेर होईल. अमेरिकेतल्या ‘बाल्टिमोर म्युझियम ऑफ आर्ट्स’ने काही दिवसांपूर्वी त्यांची २०२० ची उद्दिष्टे जाहीर केली आणि जगासमोर एक महत्त्वाचा आदर्श ठेवला.
मेरिलँड राज्यातील बाल्टिमोर येथील संग्रहालयाला शंभरहून अधिक वर्षांचा वारसा आहे. १९१४ ला हे संग्रहालय सुरू झाले. या संग्रहालयाने पहिली स्त्रीनिर्मित कलाकृती १९१६ मध्ये विकत घेतली. आज शंभरहून अधिक वर्षे झाल्यानंतर संग्रहालयाकडे ९५००० हून अधिक कलाकृती आहेत. जगभरातील वेगवेगळ्या देशांतल्या, वेगवेगळ्या शैलीतल्या अनेक कलाकारांच्या कलाकृती या संग्रहालयात प्रदर्शनाला ठेवलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी बऱ्याच काळापासून असलेल्या काही कलाकृती विकून नवीन कलाकारांसाठी जागा करण्याचे संग्रहालयाच्या संचालक मंडळाने ठरवले होते. त्याचवेळी असेही लक्षात आले, की इतकी जुनी परंपरा असलेल्या या संग्रहालयात आजमितीला फक्त चार टक्के स्त्री कलाकारांच्या कलाकृती आहेत. हे प्रमाण वाढवले पाहिजे म्हणून संग्रहालयाने पुढील वर्षी केवळ स्त्रियांच्याच कलाकृती विकत घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘२०२० मध्ये स्त्री कलाकारांच्या कलाकृतींचे प्रमाण वाढवावे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.’ असे संचालकांनी जाहीर केले आहे. मुळात आपल्या भवतालातही स्त्री कलाकारांची संख्या कमीच असते, किंवा दिसते. त्यामागे कारणेही अनेक आहेत. अनेकदा स्त्रियांना घरूनच प्रोत्साहन मिळत नाही, तर कधी त्याची दखलच घेतली जात नाही. म्हणूनच कलाकारांचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नोमुरा अ‍ॅवॉर्ड्स’ सुरू करण्यात आले आहेत.
पहिल्याच वर्षी हा पुरस्कार कोलंबियाच्या कलाकार डोरिस सालकॅडो यांना मिळालाय. पुरस्काराची रक्कम दहा लाख डॉलर्स अशी घसघशीत आहे. डोरिस यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे, जगभर त्यांची मांडणशिल्पं अर्थात, ‘इनस्टॉलेशन्स’ नावाजली जातात. रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी वापरून केलेली ही मांडणशिल्पं विचारांना चालना देतात. डोरिससारख्या अनेकींना कलेची प्रदर्शने कधी प्रत्यक्ष बघायला मिळाली नव्हती, केवळ पुस्तकातून ती त्यांनी पाहिली होती. तरीही, त्या पुढे आल्या आणि आज त्या जगावर त्यांच्या कलाकृतींमधून छाप सोडत आहेत.
बाल्टिमोरच्या संग्रहालयाचा केवळ स्त्री कलाकारांच्या कलाकृती घेण्याचा निर्णय नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो. यातून अनेक दमदार स्त्रियांच्या कलाकृतींना प्रदर्शनासाठी जागा मिळू शकते. त्यातूनच नवीन कलाकार पुढे येतील, जगाच्या जाणीव समृद्ध करतील.
आत्महत्यांना ‘ऑनलाइन’ रोखताना
सध्याचे जग दिवसेंदिवस अधिकच ‘स्मार्ट’ होते आहे. स्मार्टफोनमधले स्मार्ट अ‍ॅप्स सगळ्यांनाच जणू शहाणे करून सोडत आहेत. कधीकधी या सगळ्यांमुळे जग जवळ असल्यासारखे, अंतर मिटल्यासारखं वाटतं. ‘व्हर्चुअल मत्री’ एवढी बहरते, की तेच जग खरं वाटायला लागते. या सगळ्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. आपल्या सगळ्यांचे आयुष्य या अ‍ॅप्समधून कोणीतरी सतत पाहत असते, त्याचा अभ्यास करत असते. जणू आपल्या आयुष्याचा पाठलागच कोणीतरी करत असते. जेवढे आपण स्वातंत्र्य जपण्याच्या गोष्टी करतो, तेवढेच आपण आपले स्वातंत्र्य अनोळखी लोकांच्या हाती देतो आहोत. अर्थात कधी-कधी या सगळ्याचा एक चांगला परिणामदेखील होतो, तो म्हणजे काही गुन्हे घडायच्या आधीच थांबवता येतात.
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा ठिकाणी आपण काय मांडतो, लिहितो, काय ‘सर्च’ करतो, हे सगळे आपल्या कळत नकळत अनेकजण वाचत असतात, आणि मानसशास्त्रीयदृष्टय़ा त्या वागण्याचे अर्थही काढत असतात. नॉर्वेमधील २२ वर्षांची इंजेन्बर्ग ब्लाइन्डहेम ही अशीच काही इन्स्टाग्राम अकाउंट्स फॉलो करते आणि लोकांना जीवनदान देते. काही महिन्यांपूर्वी इंजेन्बर्गला इन्स्टाग्रामवर छायाचित्रं बघता-बघता लक्षात आले, की काही जण आत्महत्या करण्यापूर्वी त्या आशयाच्या काही पोस्ट आणि छायाचित्रं शेअर करत आहेत किंवा तत्सम ‘हॅशटॅग’ फॉलो करायचे. मग यातूनच तिनं ठरवलं, की अशा लोकांपर्यंत पोचत त्यांना मदत करायची.
तेव्हापासून इंजेन्बर्ग असे हॅशटॅग फॉलो करत असलेल्या लोकांचा शोध घेत राहते. ते ‘प्रायव्हेट अकाऊंट’ असले तरी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ‘फॉलो’ करत राहते. तेवढय़ावरच न थांबता जेव्हा ते आत्महत्येसंदर्भात काही छायाचित्रं किंवा पोस्ट टाकतात तेव्हा ती लगेच पोलिसांना कळवते आणि एक आत्महत्या होण्यापासून वाचवते. आजपर्यंत तिने पन्नासहून जास्त आत्महत्या थांबवलेल्या आहेत. दुर्दैवाने आत्महत्या करू पाहणाऱ्यांमध्ये तरुणींचे प्रमाण जास्त आहे.
इंजेन्बर्गला आता हे असे आत्महत्या थांबवायचे जणू व्यसनच लागले आहे. ती सांगते, ‘‘मी आता दिवस-रात्र अशा ‘ब्लॅक प्रोफाईल्सचा’ विचार करत असते. अगदी मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांबरोबर असतानादेखील. ती म्हणते, ‘तिला कधी कधी वाटते, ती झोपली असताना अचानक कोणी तरी आत्महत्या केली तर?’ हा विचार तिच्या मनात घर करून असतो. त्यामुळे ती सतत त्याच्या शोधात असते.
समाजमाध्यमांवर लोक खरे आयुष्य टाकण्यापेक्षा स्वप्नवत आयुष्य टाकून अतृप्त इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातून वास्तव आणि स्वप्न यातले अंतर अधिकच वाढत जाते किंवा इतरांचे समाज माध्यमांवरील दृश्य आयुष्य पाहून आपल्या आयुष्याबद्दल नराश्य वाटायला लागते. एक ना अनेक कारणे असतात नराश्याची, उदासीन वाटण्याची. त्याचेच पुढचे पाऊल पडते स्वत:ला संपवण्याकडे. हे अर्थातच
चुकीचे पाऊल असते. अशावेळी कोणीतरी समजून घेण्याची, समजावून सांगण्याची गरज असते. इंजेन्बर्ग करत असलेलं काम करणाऱ्या लोकांची संख्या जेवढी जास्त वाढेल तेव्हा आत्महत्यांची संख्याही नक्कीच कमी होईल. तोच या समाजमाध्यमाचा सर्वात महत्त्वाचा फायदा.
पक्षपाती मशीन?
स्त्रियांना अनेकदा वेगळ्या पातळ्यांवर भेदभावाचा सामना करावा लागतो. अगदी समान शिक्षण असूनही कमी पगार किंवा समान अनुभव, कर्तृत्व असूनही बढती न मिळणे, हे अगदी सहज बघायला मिळते. आता यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे क्रेडिट कार्डवरचे लिमिट. तीन महिन्यांपूर्वी, ‘अ‍ॅपल’ कंपनीने ‘गोल्डमन सॅक’ कंपनीच्या मदतीने नवीन अ‍ॅपल कार्ड्स बाजारात आणली आहेत. खास अ‍ॅपलच्या विश्वासू ग्राहकांसाठी म्हणून ही कार्ड बाजारात आणलीत. ‘अ‍ॅपल पे’ अजून सुलभ व्हावे हासुद्धा एक हेतू होताच.
मात्र नोव्हेंबरपासून काही जणांनी या क्रेडिट कार्डसचे लिमिट हे स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळे आहे हे दाखवून द्यायला सुरुवात केली. अगदी ‘अ‍ॅपल’ कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोझ्नीअ‍ॅक यांनीसुद्धा जाहीर केले, की त्यांची आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता व उत्पन्न सारखे असूनही त्यांच्या पत्नीला त्यांच्यापेक्षा दहापट कमी क्रेडिट लिमिट मिळाले. आता कळीचा मुद्दा असा आहे की ‘गोल्डमन सॅक’ सुरुवातीला हे मान्य करायला तयारच नव्हते. मात्र अनेक पुरावे समोर यायला लागले तेव्हा त्यांनी हा ‘अल्गोरिदम’मधला दोष आहे असे सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अल्गोरिदम बदलता येऊ शकतो, पण जर या चुकीला अल्गोरिदम नसून मानसिकता कारणीभूत असेल तर मात्र ती कशी बदलायची?
आजही कोणतीही नवीन मालमत्ता घेताना ती पुरुषांच्या नावावरच घेतली जाते, अगदीच जेव्हा कर चुकवायची वेळ येते तेव्हा मात्र ती स्त्रियांच्या नावावर घेतली जाते, केली जाते. अजूनही नवऱ्याच्या मालमत्तेवर पत्नीचा हक्क असतो हे मान्य केले जात नाही. त्यामुळेच क्रेडिट कार्ड, कर्ज, किंवा जिथे नंतर हप्ते भरायचे असतात अशा व्यवहारांमध्ये स्त्रियांकडे दुय्यम नजरेने बघितले जाते. स्त्रियांमध्ये पैसे परत करण्याची किती क्षमता असू शकेल याचे ढोबळ ठोकताळे लावले जातात आणि मग त्याच्याच आधारावर कमी रकमेचे कर्ज, कमी क्षमतेची क्रेडिट कार्ड्स स्त्रियांना दिली जातात. यावर बँकेचा पवित्रा सावध असतो, पण त्याचा तोटा अनेक हुशार, होतकरू स्त्रियांना नक्कीच होतो.
‘अ‍ॅपल’ कार्डच्या निमित्ताने स्त्री-पुरुष आर्थिक विषमतेचा मुद्दा परत एकदा चच्रेला आला, ट्विटरवर ‘अ‍ॅपल’ची, ‘गोल्डमन सॅक’ची यथेच्छ टिंगल उडवली गेली, पण त्यातूनच नक्कीच नवीन अल्गोरिदम लिहिला जाईल. पुढे अशी कोणतीही नवीन कार्ड्स आणताना त्याचा अल्गोरिदम स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही ना, याचीदेखील चाचणी घेतली जाईल. ‘मशीनदेखील कधी-कधी चुका करू शकते.’ असे म्हणत तूर्तास तरी ‘गोल्डमन सॅक’ आणि ‘अ‍ॅपल’ला संशयाचा फायदा घेऊ दिलाच पाहिजे. कारण चुकांमधूनच नवीन इतिहास घडत असतो.

(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग ७ डिसेंबर २०१९

Thursday, December 5, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा २४

एखाद्या मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यालय ज्या गावात असते, त्या गावाची ओळखच त्या कंपनीच्या नावाने होत असते. असेच काहीसे झालेले आहे सिएटल शहराचे. ‘अ‍ॅमेझॉन’ या बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय याच शहरात आहे. या शहरातील मोठय़ा लोकसंख्येला या कंपनीमुळेच रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत, पण याच गोष्टीची दुसरी बाजूदेखील आहे. या कंपनीमुळे इथल्या जमिनींचे, घरांचे भाव वाढलेत. त्यामुळे अनेकांना घरं घेणे परवडतच नाही. एकूणच शहरात राहणे सगळ्याच अर्थाने महाग झाले आहे. अर्थात, हा सगळा विचार करून तिथले काही लोक या सगळ्यासाठी लढा देत आहेत. या लढय़ाचा आणि महाराष्ट्राचा एक वेगळाच संबंध आहे. या दोन वेगळ्या गोष्टींना जोडणारा दुवा आहे क्षमा सावंत. तसेही समाजसुधारणा आणि मराठी माणसांचा त्यातला सहभाग ही काही नवीन गोष्ट नाही.
पुण्यात जन्मलेल्या, मुंबईत वाढलेल्या आणि लग्न करून अमेरिकेत गेलेल्या क्षमा सावंत नुकत्याच तिसऱ्यांदा सिएटलच्या सिटी कौन्सिलमध्ये निवडून आल्यात. संगणक क्षेत्रातली पदवी घेऊन, लग्न करून त्या अमेरिकेत गेल्या खऱ्या, पण संपत्तीचे असमान वितरण, गरिबी यामुळे त्यांनी अर्थशास्त्रातले शिक्षण घ्यायचे ठरवले. पुढे त्यांनी अर्थशास्त्रातली पीएच.डी.देखील मिळवली. विवेक सावंत यांच्याबरोबर लग्न करून त्या अमेरिकेत आल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, पण त्यांनी आडनाव कायम ठेवले. २०१५ मध्ये त्या केल्विन प्रीस्ट यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली समाजवादी पक्षाच्या झेंडय़ाखाली, पण त्या ती निवडणूक हरल्या. तरीही त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. त्याचेच फळ म्हणून २०१३ मधल्या सिटी कौन्सिलच्या निवडणुकीत डिस्ट्रिक्ट ३ मधून त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१५ मध्येदेखील त्या निवडून आल्या. मोठय़ा कंपन्यांमुळे स्थानिक लोकांवर अन्याय होतो, त्यांचे राहणीमान महाग होते. त्यामुळे या कंपन्यांवर अतिरिक्त कर लावला पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका होती, आहे.
हा हेड टॅक्स ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर लावण्यात त्या यशस्वीदेखील झाल्या होत्या. मात्र तो निर्णय परत फिरवला गेला. तरीही ‘अ‍ॅमेझॉन’सारखी कंपनी सावंत यांनी केलेला विरोध विसरली नव्हती. त्यामुळेच या वेळच्या निवडणुकांमध्ये सावंत यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या इगन ओरायन यांना ‘अ‍ॅमेझॉन’ने भरभक्कम आर्थिक मदत केली होती. सावंत निवडून येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रचारदेखील केला. अमेरिकेत कंपन्या राजकीय पक्षांना उघडपणे आर्थिक मदत करतात. त्यामुळे ‘अ‍ॅमेझॉन’चा सावंत यांना असलेला विरोध त्यांच्या पथ्यावरच पडला आणि त्यांना मागच्यापेक्षा जास्त मते या वेळी मिळाली.
क्षमा सावंत यांनी समाजवादाकडे झुकणारी त्यांची विचारसरणी कधीच लपवली नाही. त्यामुळेच एका पूर्णपणे वेगळ्या गावात, देशात त्या स्वत:ची ओळख तयार करू शकल्या. एखाद्या शहरात बाहेरून येणारे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी थांबत तिथे राहत नसतात. काहीजण स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्याविरुद्ध आवाजदेखील उठवतात. कितीही विरोध होवो, आर्थिक दबाव येवो, प्रामाणिकपणे आपले काम करतात. त्यामुळेच ते तिथल्या मातीतले कधी होऊन जातात ते त्यांनाही कळत नाही. त्यामुळेच परकी मातीही त्यांना आपलीशी करून घेते. क्षमा सावंत यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
हवे मानवी संशोधन
कोणतेही संशोधन होत असताना त्याचे परिणाम मोजण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. बहुतेकदा हे प्रयोग प्राण्यांवर होतात, ते तिथे यशस्वी झाले, की मग माणसांवर केले जातात; पण क्वचित कधी-कधी हे माणसांवरचे प्रयोग जीवघेणे ठरू शकतात. असाच काहीसा अनुभव स्वीडनमधल्या शास्त्रज्ञांना आला आणि त्यांनी त्यांचे संशोधन मुदतीपूर्वीच थांबवले. गर्भारपणाचा वैद्यकीय कालावधी ४० आठवडे मानला जातो. त्यानंतरची प्रतीक्षा कदाचित बाळाच्या, आईच्या जिवाला धोका ठरू शकते, म्हणून ‘इंडय़ुस’ (कळा येण्याची औषधं देऊन) करून प्रसूती केल्या जातात. मात्र अनेक देशांमध्ये ४० आठवडय़ांनंतरही वाट पाहिली जाते, कधी कधी अगदी बेचाळिसाव्या आठवडय़ापर्यंतदेखील.
स्वीडनमध्ये २०१६ ला अशाच एका प्रयोगाला सुरुवात झाली. ४० आठवडय़ां नंतरच्या गर्भवती स्त्रियांचे दोन गट पाडले आणि त्यातल्या एका गटातल्या स्त्रियांची ४१ आठवडय़ांनंतर इंडय़ूस करून प्रसूती केली, तर दुसऱ्या गटातल्या स्त्रियांची आणखी एक आठवडा वाट पाहून बेचाळिसाव्या आठवडय़ानंतर प्रसूती केली. या जास्तीच्या दिवसांचा अर्भकांवर, स्त्रियांवर काय परिणाम होतो हे बघितले जात होते. मात्र हा प्रयोग मागच्या वर्षी एकाएकी थांबवला गेला. काही दिवसांपूर्वी या प्रयोगावरचा शोधनिबंध सादर केला गेला तेव्हा याची माहिती जगासमोर आली. हा प्रयोग थांबवण्याचे कारण म्हणजे या प्रयोगातल्या दुसऱ्या गटात पाच जन्मत:च मृत झालेली, तर एक जन्मल्यानंतर मृत झालेले अर्भक होते. या सहा पालकांनी त्यांचे मूल गमावले होते. त्यामुळे हा प्रयोग मधूनच गुंडाळला गेला होता. या सगळ्यात या सहाही मातांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही त्रासांना सामोरे जावे लागले असणार.
अति तिथे मातीच. त्यामुळे जशी लवकर जन्मणारी बाळं बहुतेक वेळा वैगुण्य घेऊन जन्माला येतात तशीच उशिरा जन्माला येणारी बाळंदेखील वेगळे प्रश्न सोबत घेऊन जन्माला येतात. निसर्गाला आपण गृहीत धरून चालू शकत नाही. आपल्याकडे हेळसांड झाल्यामुळे नवजात अर्भके मरण पावतात, तर प्रगत देशांमध्ये संशोधनामुळे काहींना जीव गमवावा लागला. अर्थात, आपल्याकडच्या मृत्युदराची तुलना अशा प्रगत देशातल्या मृत्युदराशी करता येणार नाही. संशोधन करत राहिलेच पाहिजे, मात्र त्यात माणसांचा जीव जाता कामा नये. माणुसकीशी बांधिलकी राखून संशोधन झाले तरच ते खरोखरीच सर्वाच्या भल्याचे असणार आहे.
भाषा जिवंत राहावी म्हणून..
‘भाषा टिकते ती स्त्रियांमुळेच’ असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. कारण स्त्रियांना बोलायला विषय अपुरे पडत नाहीत आणि संवादातून भाषा जगली, तगली तरच भाषा समृद्ध होत असते. पेरूमध्ये रोक्साना क्युस्पे कोलान्तेस हिने असेच केचुआ भाषेच्या संवर्धनासाठी अतिशय मोठे पाऊल उचलले आहे.
केचुआ ही इंका लोकांची भाषा आजही दक्षिण अमेरिकेतील जवळपास ८० लाखांहून जास्त लोक बोलतात. केचुआ ही जरी खूप जुनी भाषा असली तरी तिला स्वत:ची लिपी नाही. हिचे स्वरूप मुख्यत: बोलीभाषेसारखेच राहिले होते, पण १९७५ पासून पेरूमधील सरकारने प्रयत्न करून रोमन लिपीतून या भाषेचे लिखित रूपात पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. मुळात ही भाषा समृद्ध आहेच, मात्र स्वत:ची लिपी नसल्याने किंवा ती लुप्त झाल्याने या भाषेत लिखित साहित्य सापडत नाही. आजघडीला या भाषेतले साहित्य या प्रकारातले सगळ्यात मोठे पुस्तक म्हणजे बायबलच म्हणता येईल. थोडीफार दोन-तीन शतकांपूर्वी लिहिलेली नाटके, कविता असे अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, असे साहित्य असताना, रोक्साना हिने तिचा पीएच.डी.चा प्रबंध केचुआ भाषेत लिहून सादर करत एक नवीन इतिहास रचला आहे. पेरू आणि लॅटिन अमेरिकेतील साहित्य आणि त्यातील केचुआ कविता हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. लिमामधल्या सॅन मार्कोस विद्यापीठाच्या ४६८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी स्थानिक भाषेत प्रबंध सादर केला. रोक्सानाने तब्बल ७ वर्षे अभ्यास करून तिचा प्रबंध लिहिला. तिच्या मते तिची भाषा एवढी समृद्ध आहे, की तिला दुसऱ्या भाषेतले शब्द वापरावे लागले नाहीत. आपल्या भाषेची ही श्रीमंती जगापुढे आणण्यासाठीच तिने तिचा प्रबंध केचुआ भाषेत लिहिला. पेरू त्यांच्या देशातील स्थानिक भाषांच्या संवर्धनासाठी युनायटेड नेशन्सचीदेखील मदत घेत आहे. जवळपास दोन हजारहून अधिक बोलीभाषांचे जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाषा जिवंत राहिली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर इतिहास जिवंत ठेवला जात असतो.
भाषा हे संवादाचे माध्यम आहे. स्त्रीमध्ये उपजतच सगळे सांभाळून ठेवण्याची ऊर्मी असते त्यामुळेच आपली भाषा टिकवण्यासाठी रोक्सानाने हे पाऊल उचलले यात काही शंकाच नाही. आज आपल्या देशातही अशा अनेक बोलीभाषा आहेत, ज्या केवळ लिपी, लिखित स्वरूपात नसल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडेदेखील अशा रोक्साना तयार होवोत, जेणेकरून त्या भाषा जिवंत राहतील.
(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग 
नोव्हेंबर २३

पृथ्वी प्रदक्षिणा २३

दूरचित्रवाणी हे आजही मनोरंजनाचे मोठे साधन समजले जाते. वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिकांपेक्षा रिअ‍ॅलिटी शोज्ना जास्त प्रेक्षकवर्ग लाभतो, हे लक्षात आल्यावर सर्वच वाहिन्या असेच कार्यक्रम करण्याच्या मागे लागतात. ही काही फक्त भारतातली गोष्ट नाही. ऑस्ट्रेलियामध्ये २०१३ पासून ‘हाऊस रुल्स’ नावाचा असाच एक रिअ‍ॅलिटी शो लोकप्रिय आहे. यामध्ये घरांची, बागेची सजावट करायची असते आणि जी जोडी हे चांगले करते त्यांना बक्षीस दिले जाते. २०१७ मध्ये आलेला या कार्यक्रमाचा पाचवा सीझन वेगळ्याच कारणासाठी गाजला होता. निकोल प्रिन्स आणि फिओना टेलर या दोन मत्रिणींची जोडी त्या भागात होती.
हा कार्यक्रम सुरू असतानाच या दोघींवर खूप टीका होत होती, कारण त्या सतत त्यांच्या प्रतिस्पर्धी स्पर्धकांवर शेरेबाजी करताना दिसायच्या. इतर स्पर्धकदेखील त्यांच्याशी तुटक वागत होते. सतत नकारात्मक बोलण्यामुळे त्यांच्याबद्दलचे जनमत अजिबात चांगले नव्हते. जेव्हा ही गोष्ट निकोल आणि फिओना यांना कळली तेव्हा त्या दोघींच्या दृष्टीने हा खूप मोठा धक्का होता. कारण त्या वाहिनीने त्यांच्या संभाषणातला नकारात्मक भाग तेवढाच दाखवला होता, बाकीचा संवाद दाखवलाच नव्हता. हे एक प्रकारचे ‘शोषण’च होते. या सगळ्यामुळे या दोघींना अनेक ठिकाणी द्वेष, रोषाला सामोरे जावे लागले. निकोलला या सगळ्याचा मानसिक त्रास झाला आणि त्यातून तिचे दारू पिण्याचे प्रमाणही वाढले. नंतर तिला यातून सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. ‘वाहिनीने आपली केवळ सोयीस्कर बाजू कार्यक्रमातून दाखवून आपल्याला त्रास दिला’ हे कारण देत तिने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर खटला दाखल केला. ‘ती केवळ एक स्पर्धक आहे, त्यामुळे आम्ही तिला कोणतीही नुकसानभरपाई देऊ शकत नाही’ असा निर्मात्यांचा पवित्रा होता. मात्र ‘ती जरी कंपनीत कामाला नसली तरीही ती तिचे काम सोडून या कार्यक्रमात सहभागी झाली होती, त्यामुळे तिला इतर नोकरदारांसारखेच वागवले पाहिजे’ अशी न्यायालयाने भूमिका घेतल्यामुळे आता वाहिनीला निकोल आणि फिओनाला नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.
पूर्वी म्हणायचे, की कानाने ऐकलेल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे; पण आताच्या काळात तंत्रज्ञानाने इतके काही आभास निर्माण करता येतात, की नक्की कशावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न पडतो. आपण अनेकदा टीव्हीवर जे बघतो, ते सगळेच स्क्रिप्टमध्ये लिहिल्याप्रमाणेच होत असते, अगदी ‘रिअ‍ॅलिटी शो’सुद्धा. कोणता स्पर्धक कधी रडेल, कधी हसेल, ज्यामुळे जास्त प्रेक्षक लाभेल अशी सगळी गणिते मांडून सगळे काही दाखवले जात असते. जे डोळ्यासमोर दिसते, त्यापेक्षा किती तरी वेगळे वास्तव असते. किती जणांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण होते याची गणनाच नसते.
एखादीच निकोल यावर स्पष्ट बोलते, नुकसानभरपाई मागते, कारण ती केवळ मनोरंजन क्षेत्रात काम करणारी एक अभिनेत्री नाही. तिचा स्वत:चा वेगळा पेशा आहे. मात्र ज्यांना याच क्षेत्रात करिअर करायचे आहे, असे अनेक जण मूकपणे हा अन्याय सहन करत असतात. कारण त्यांना माहीत असते, जर त्यांनी काही बोलण्याची हिंमत केली, तर आत्ता जे काही मिळते आहे तेसुद्धा मिळणार नाही. तर अनेकदा हा सगळा चोरीचा मामला माहीत असतो; पण त्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळणार असेल, पैसे मिळणार असतील तर ते सहन करण्याचीदेखील काही जणींची/ जणांची इच्छा असते. ‘तेलही गेले, तूपही गेले’सारखे होण्यापेक्षा स्वत:ला त्रास करून घेत उद्याची वाट बघणारे कमी नाहीत. आपल्या देशातही अशी एखादी निकोल नक्कीच असू शकते. कदाचित हे वाचून तीसुद्धा तिच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडेल, अशी अपेक्षा बाळगूया.
मातृत्वाचे कोडे
मागच्या वर्षी ‘बधाई हो’ हा चित्रपट आला तेव्हा काहींना हे अतिरंजित वाटले, तर काहींना ती त्यांचीच गोष्ट वाटली;  अशीच घटना घडली चीनमध्ये. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये एका सदुसष्ट वर्षांच्या स्त्रीने मुलीला जन्म दिला. तिआन या त्यांच्या नेहमीच्या तपासण्या करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना कळले, की त्या गर्भवती आहेत. या वयात ही जबाबदारी झेपेल का आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ासुद्धा?’ असा प्रश्न त्यांना त्या वेळी पडला. शिवाय त्यांना दोन मुले आहेत. त्यातला एक जण ‘एकच मूल’ कायदा येण्याआधी जन्माला आलेला, तर दुसरा त्यानंतर; पण त्यांनी आणि त्यांच्या नवऱ्याने, हुयांग यांनी, हे मूल होऊ द्यायचे ठरवले. त्यामुळे ते दोघेही नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊन आई-वडील झालेले चीनमधले वयोवृद्ध पालक बनलेले आहेत.
१९७९ पासून चीनमध्ये ‘एकच मूल’ सक्ती राबवण्यात आली होती. या सक्तीचे लोकसंख्येच्या दृष्टीने काही चांगले परिणाम झाले; पण त्याच वेळी दूरगामी, घातक परिणामही बघायला मिळाले. लोकसंख्येतील तरुणांचे प्रमाण घटले, उत्पादनशील वयोगटातील लोकसंख्या कमी झाली. स्त्रियांवरही याचे शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक परिणाम झाले. याचे सामाजिक परिणामदेखील हितावह नव्हते. २०१६ मध्ये सरकारने ही ‘एकच मूल’ सक्ती उठवली आणि ‘हम दो हमारे दो’ धोरण अवलंबले. दशकभरापूर्वी सरासरी चोविसाव्या वर्षी स्त्रिया मातृत्वाची जबाबदारी घ्यायच्या. तेच प्रमाण आता सव्विसाव्या वर्षांपर्यंत घसरले आहे. २०१६ नंतर ज्या प्रसूती झाल्या त्यात पहिलटकरणींपेक्षा दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तिआन यांच्या प्रसूतीमुळे या सगळ्यावरसुद्धा परत चर्चा झाली. ‘आई होण्यासाठी वयाची धास्ती बाळगण्याची गरज नाही’ असा विश्वास यातून अनेकींना मिळाला असणार. त्यात सरकारनेदेखील ‘दोन मुलं’ धोरण राबवल्यामुळे अनेक जणी दुसऱ्या अपत्याचा परत विचार करू शकतात. लोकसंख्या नियंत्रण गरजेचे आहे, परंतु त्याच वेळी सामाजिक, आर्थिक समतोलदेखील राखला गेला पाहिजेच.
मातृत्व ही केवळ शारीरिक जबाबदारी नसते. ती तेवढीच मानसिक, आर्थिक जबाबदारीपण असते. सदुसष्टाव्या वर्षी नैसर्गिक गर्भधारणा हे खरं तर एक आश्चर्यच आहे; प्रगत विज्ञानालादेखील कोडय़ात घालणारे. आपण विज्ञानात कितीही प्रगती केली, तरीही निसर्ग आपल्यासमोर नवीन कोडे सादर करतोच. कदाचित या कोडय़ांमधून आपण नवीन काही शोध घेऊ शकू म्हणूनही असेल. तिआन आणि हुयांग यांच्या नवजात लेकीने असेच काही प्रश्न जन्मताच जगासमोर उभे केले आहेत. कदाचित त्यातल्या काहींची उत्तरे मिळतील. काही प्रश्नांच्या उत्तरातून नवीन ध्येयधोरणेही राबवली जाऊ शकतात.
‘रि-होमिंग’ बघावं करून
प्रत्येक लग्नात किंवा कौटुंबिक समारंभात स्त्रियांचं सगळ्यात जास्त लक्ष इतर स्त्रियांच्या कपडे-दागिन्यांवर असतं. पुन्हा पुन्हा तीच साडी घातली, तेच दागिने घातले तर ‘अरे परत तेच’ असं कधी डोळ्यांनी तर कधी शब्दांनी हिणवलं जातं. मात्र प्रत्येक समारंभासाठी वेगळी साडी घ्यायला, एक साडी एकदाच नेसायला सगळेच जण काही अतिश्रीमंत नसतात. गंमत म्हणजे हा प्रश्न काही फक्त भारतातलाच आहे, असं नाही. पाश्चात्त्य देशांतही हा प्रश्न थोडय़ाफार वेगळ्या परिस्थितीत का असेना आहेच. जसं की, पार्टीला जायचं आहे, जवळच्या मत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे किंवा मुलाखतीसाठी जायचं आहे. बरं या सगळ्यामध्ये त्या-त्या वेळेच्या हवामानानुसार कपडे घालावे लागतात. मग जर असं प्रत्येक समारंभाला वेगळे कपडे घालायचे ठरवलं तर दिवाळं नक्कीच निघणार. पण मग काय करायचं? स्त्रियांसाठी महत्त्वाच्या बनलेल्या या प्रश्नाचं उत्तर अनेक प्रगत देशांनी जे शोधून काढलं आहे ते आपल्या समाजात थोडंफार पूर्वीपासूनच अस्तित्वात होतं.
अमेरिका, ब्रिटन, याचबरोबर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये कपडे, पस्रेस इत्यादी भाडय़ाने देणारे पोर्टल्स, दुकानं नव्याने सुरू झाली आहेत. ब्रॅण्डेड कपडे महाग असतात पण ते तुमचं सामाजिक/ आर्थिक स्थानसुद्धा दाखवतात. त्यामुळेच ‘हुर’, ‘रेनेथरनअवे’, ‘माय वॉर्डरोब’, ‘फ्रंट रो’सारखी संकेतस्थळं जे काम करतात तेच काम ब्रिटनमध्ये टॅश आणि मेरी या दोन मत्रिणींनी करायला सुरुवात केली. या दोघींनी त्यांचे जुने कपडे, पस्रेस, शूज, भाडय़ाने द्यायला सुरुवात केली. त्यांच्या मते, ही अशी सेवा सध्याच्या काळात अत्यंत गरजेची बनली आहे. स्त्रियांकडे, खास करून लहान मुलं असणाऱ्यांकडे, स्वत:च्या कपडे खरेदीसाठी वेळ नसतो. अनेकदा वाढलेल्या वजनामुळे जुने कपडे होत नसतात. अशा वेळी परत खरेदी करण्यापेक्षा जर कमी किमतीत चांगले कपडे फक्त एखाद्या कार्यक्रमासाठी भाडय़ाने मिळत असतील तर काय वाईट आहे? त्यामुळे अनेक जण नवीन कपडे घेण्याऐवजी असं भाडय़ाने कपडे घेण्याला पसंती देताना दिसत आहेत.
काही ठिकाणी एखादा ड्रेस एका वेळेसाठी भाडय़ाने घेता येतो, तर काही ठिकाणी महिन्याची ठरावीक रक्कम भरली तर तुम्हाला महिनाभर ठरावीक कपडे घेऊन जाता येतात.
आपल्याकडे पूर्वीपासून मोठय़ांचे छोटे झालेले कपडे लहान भावंडांसाठी वापरले जायचे. आई-आजीच्या जुन्या साडीतून मुलींना कपडे शिवले जायचे.आता हे सगळे जुने झाले आहे असे वाटत असतानाच भारतातही ‘फेसबुक’वरचे काही ग्रुप दिसतात, जिथे स्त्रिया जुन्या साडय़ा, ओढण्या, कधी विकतात तर कधी फुकट/नाममात्र किमतीत भाडय़ाने देतात. काही दुकानंसुद्धा आहेत जिथे वापरलेले कपडे मिळतात. लग्नात घालण्यासाठीचे खोटे दागिने तर अगदी गल्ली-बोळातल्या ब्युटी पार्लरमध्येसुद्धा मिळतात. ‘फेसबुक’वरच्या ग्रुपमध्ये जुनी साडी विकण्यासाठी एक सुंदर शब्द वापरला जातो ‘रि-होमिंग’. याचा अर्थ ‘साडीला नवीन घर देणे.’ मुळात महागामोलाचे कपडे घालणार एकदाच, मग त्यावर भरमसाट खर्च करून नंतर ते कपाटात पडून राहणं काय कामाचं? त्यापेक्षा असे भाडेतत्त्वावर घेतलेले किंवा आधी वापरलेले कपडे वापरणे हे गरिबीचे नव्हे तर शहाणपणाचे लक्षण समजले जाऊ लागले आहे.
(माहिती व छायाचित्रे स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग ९ नोव्हेंबर 

पृथ्वी प्रदक्षिणा २२

फिलिपाइन्स हा बेटांचा समूह असलेला देश. या चिमुकल्या देशाने एक प्रयोग केला आहे. सिक्वजोर प्रांतातील मरिआ हे गाव तिथल्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गावाने पोलीस दलात ठरवून फक्त स्त्रियांची नियुक्ती करण्याचा एक प्रयोग राबवलाय. फिलिपाइन्समध्ये स्त्री-पुरुष समानतेवर विशेष भर दिला जात असल्यामुळे पोलीस दलात स्त्रियांसाठी आरक्षण आहे. त्यामुळे पोलीस दलात स्त्रिया सुरुवातीपासूनच होत्या, पण बहुतांश ठिकाणी त्या बैठे काम करत होत्या.
मरिआ गावच्या गावकऱ्यांनी मात्र गावात जाणीवपूर्वक फक्त स्त्री पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मुळात हे एक समुद्रकिनाऱ्यावरचे गाव आहे, त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण करणं, तस्करीवर लक्ष ठेवणं, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखणं, या सगळ्याच गोष्टी खाकी वर्दीतल्या स्त्रिया जबाबदारीने करत आहेत. स्त्री-पोलिसांमुळे खास करून शहरातील मुलींना, स्त्रियांना पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित वाटत आहे, असं त्यांनी नोंदवलं. तर या काळात गुन्ह्य़ांचं प्रमाण कमी झाल्याचंसुद्धा पाहण्यात आलं आहे. या स्त्री-पोलिसांनीसुद्धा, ‘‘हे काम अवघड आहे. यात ताण आहे, पण आम्हाला हे काम करताना अभिमान वाटतो,’’ असं सांगितलं.
हा एक वेगळा प्रयोग आहे, जो आत्ता तरी फिलिपाइन्सच्या फक्त एकाच शहरात राबवला जातो आहे. परंतु त्याचं यशापयश बघून तो कदाचित इतर शहरांमध्येही राबवला जाईल. स्त्रिया दुबळ्या असतात हा समज तर कधीच मोडीत निघालेला आहे. आता स्त्रिया स्वत:चंच नव्हे तर शहराचं रक्षणही उत्तम करू शकतात हे फिलिपाइन्सच्या धाडसी स्त्रिया जगाला दाखवून देत आहेत.
जिम्नॅस्ट सुवर्णकन्या
बावीस, तेवीस म्हणजे शिक्षण संपवून नोकरी- व्यवसाय सुरू करण्याचं वय. पण जर कोणी त्याच वयात निवृतीची भाषा करत असेल तर त्याला काय म्हणायचं? कदाचित अशी एक वेळ येते, की आता पुढे अजून काय करायचं हा प्रश्न पडतो. असंच काहीसं घडलंय अमेरिकेच्या सिमॉन बाएल्सच्या बाबतीत. स्टुटगार्ट इथे झालेल्या जिम्नॅस्टिक्सच्या जागतिक स्पर्धेनंतर ज्याच्या-त्याच्या तोंडी अवघ्या बावीस वर्षांच्या सिमॉनचंच नाव आहे. जिम्नॅस्टिक्सच्या आजवरच्या इतिहासातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला नावाजलं जात आहे. जागतिक स्पर्धेत आजपर्यंत २५ पदकंमिळवून ती सर्वाधिक पदकं मिळवणारी खेळाडू ठरली आहे. याआधीचा व्हिटली श्रेबो या खेळाडूचा २९ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे, या २५ मधील १९ सुवर्णपदकंआहेत.
सिमॉन, तिच्या दोन बहिणी आणि भावाला सांभाळणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना दत्तक द्यायचं ठरवलं होतं. ही गोष्ट सिमॉनच्या आजोबांना कळल्यावर त्यांनीच त्यातल्या धाकटय़ा दोघींना दत्तक घेतलं, तर त्यांच्या सख्ख्या बहिणीने उरलेल्या दोघांना. अशा प्रकारे, सिमॉनची आई तिची बहीण झाली. ६ वर्षांची असताना तिने तिच्या डे-केअरमध्ये पहिल्यांदा जिम्नॅस्टिक्सचे प्रकार करून बघितले. तिच्यातली गुणवत्ता तिथल्या शिक्षकांनी लगेचच हेरली. आठव्या वर्षांपासून तिने एमी बुर्मन या प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या हाताखाली शिकायला सुरुवात केली. २०१३ मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सिमॉनने पहिल्यांदा वरिष्ठ गटाच्या स्पर्धामध्ये सहभाग घेत पहिलं सुवर्णपदक मिळवलं होतं. तेव्हापासून सुरू असलेली तिची घोडदौड थोडय़ा काळासाठी २०१७ मध्ये थांबली पण त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये तिने परत तिच्या खेळाची चुणूक दाखवून पदकांची लयलूट केली.
या वर्षी स्टुटगार्टमधल्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्ण पदकंमिळवल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं, की २०२० च्या ‘टोकियो ऑलिम्पिक’नंतर निवृत्ती घेण्याचा तिचा विचार आहे. ‘‘आजवर मी खूप पदकं मिळवली. २०-२२ तास सराव केला. माझ्या शरीराने मला खूप साथ दिली. मला त्याला आता जरा विश्रांती द्यावीशी वाटत आहे.’’ कोणत्याही खेळाडूसाठी खेळ, खेळाचं मदान याचं वेगळंच महत्त्व असतं. पण हे सगळं आपण ज्याच्या जिवावर करत असतो त्या शरीराला आपण किती गृहीत धरून चालत असतो हे एखादी जखम/इजा झाल्यावरच लक्षात येतं. सिमॉनच्या आजवरच्या ६-७ वर्षांच्या कारकीर्दीत तिलाही अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. २०१८ मध्ये दोहा इथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या आदल्या रात्री ती पोटदुखीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. त्रासाचं कारण अपेंडिक्स नाही तर मूतखडा आहे कळल्यावर ती औषधं घेऊन दुसऱ्या दिवशी स्पर्धेत आली आणि सुवर्णपदकघेऊन गेली.
कोणताही क्रीडाप्रकार सोपा नसतो. त्यात यशस्वी होण्यासाठी अथक मेहनत हेच एक उत्तर असतं. सिमॉनने अवघ्या सहा वर्षांत ऑलिम्पिकमधली ५ पदकं, जागतिक स्पर्धेतली २५ पदकं, त्यातली १९ सुवर्णपदकंजिंकून अनेक विक्रम रचले आहेत. त्यामुळेच दुखापत करून घेऊन सक्तीने खेळ सोडण्यापेक्षा पुढच्या वर्षीचं ऑलिम्पिक खेळून मानाने निवृत्ती घेण्याची भाषा करणारी सिमॉन पुढच्या अनेक पिढय़ांना नक्कीच प्रेरणा देत राहणार.
धावती सुपरमॉम
ती आली, तिने पाहिलं, ती पळाली आणि तिने जिंकून घेतलं सारं जग.. विसाव्या वर्षांपासून ती वेगवेगळ्या स्पर्धामध्ये पळत आहे, गेली १२-१३ वर्ष यश मिळवते आहे. यशाबरोबर येणारी टीकाही झेलते आहे. तिचे पाय मात्र मैदानात ठामपणे रोवलेले आहेत. बत्तिसाव्या वर्षी ‘पॉकेट रॉकेट’ म्हणून ओळखली जाणारी शेली अ‍ॅन फ्रेजर प्राईस हिने नुकतंच तिचं चौथं सुवर्णपदक जिंकलं. शंभर मीटर धावण्याच्या जागतिक स्पर्धेतलं हे पदक होतं. तिने स्वत:च्या दोन वर्षांच्या लेकासोबत स्टेडियममध्ये हे यश साजरं केलं. ‘‘मी ३२ वर्षांची आहे, तरी अजूनही पळू शकते, जिंकू शकते. मूल झालं म्हणून काहीच थांबलं नाही हेच मला जगातल्या सगळ्या स्त्रियांना सांगायचं आहे. स्वप्न बघत राहा, ती पूर्ण होतात. वय वाढलं, मूल झालं म्हणून बिलकुल काही थांबत नाही, हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे.’’ केस रंगीबेरंगी रंगवलेल्या, मुलाला कडेवर घेऊन फिरणाऱ्या, आत्मविश्वासाने सळसळणाऱ्या शेलीला बघून खरोखरीच अनेकींना प्रेरणा मिळेल.
मातृत्वानंतर परत स्वत:चं करिअर करणं तसं आता काही जगावेगळं राहिलं नाही. खेळाडूंसाठी मात्र ही थोडी वेगळी गोष्ट समजली जात होती. मेरी कोम, सेरेना विल्यम्स, ख्रिस्टी रम्पोन, निया अली, या बॉक्सिंग, टेनिस, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्समधल्या प्रसिद्ध खेळाडूंनीही मातृत्वानंतरही खेळ सुरूच ठेवला. नवनवीन शिखरं गाठली. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झानेदेखील एका पोस्टमधून सांगितलं होतं, की बाळंतपणानंतर तिने चार महिन्यांत २६ किलो वजन कमी केलं. अर्थातच हे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने केलं. पुढील वर्षी जानेवारीत तिला परत तिचा खेळ सुरू करायचा आहे. ही केवळ पटकन समोर येणारी खेळाच्या क्षेत्रातली काही मोठी, ओळखीची नावं आहेत. इतरही क्षेत्रांत अशी अनेक नावं शोधली तर सापडतील. मुळात वय, लग्न, मातृत्व हे आता अडसर राहिलेलेच नाहीत. तुमची जिद्द, सरावातली नियमितता, योग्य प्रशिक्षण हे जुळून आलं तर यश कोणासाठीही कधीच दूर नसतं.
(माहिती व छायाचित्र स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळं)
चतुरंग २६ ऑक्टोबर 

पृथ्वी प्रदक्षिणा २१

स्त्रियांच्या कुस्तीबद्दल समज-गैरसमजच जास्त आहेत. कधी या खेळाकडे धार्मिक दृष्टीने बघून हा खेळ थेट धर्मबाह्य़ समजला जातो. तर कधी याला फक्त पुरुषांचा खेळ म्हटलं जातं. पण फोगट भगिनींनी खेळाच्या मदानातून या सगळ्या धारणांना मोडीत काढले. ‘दंगल’ चित्रपटाने हा संदेश अधिकच प्रभावीपणे दूरवर पोचवला. कुस्ती हा ताकदीचा उपयोग करावा लागणारा खेळ समजला जातो. त्यामुळे स्त्रिया या खेळापासून लांबच असतात, असा एक सोयीस्कर समज सगळीकडेच आहे.
मलेशिया हा देश तरी त्याला कसा अपवाद ठरेल? पण याच मलेशियात नूर फिनिक्स डायना तिचे वडील आणि भावाबरोबर कुस्तीचे सामने बघायची. हा खेळ तिला आवडायला लागला आणि त्याहूनही जास्त तिला तो खेळावासा वाटला. शालेय शिक्षण संपल्यानंतर तिने थेट कुस्तीच्या प्रशिक्षण केंद्राचा रस्ता धरला. या निर्णयात तिला वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. तिच्या आईची नापसंती होती पण तरीही तिने लेकीवर विश्वास ठेवला. दोन महिन्यांतच डायनाने तिचा निर्णय योग्य होता हे दाखवून दिले. ती हिजाब घालून कुस्ती खेळणारी मलेशियातली आणि कदाचित जगातलीसुद्धा पहिलीच स्त्री ठरली. या खेळाचे प्रशिक्षण घेतानासुद्धा तिने ‘हिजाब ठेवूनच प्रशिक्षण घेणार’ हे ठामपणे सांगितले होते. सुरुवातीला तिचे प्रशिक्षकदेखील साशंक होते. पण तिने पहिलाच सामना जिंकून त्यांना चकित केले. अवघ्या एकोणीसाव्या वर्षी केवळ चार वर्षांच्या प्रशिक्षणातून तिची झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे.
नूर फिनिक्स डायनाच्या मते, तिचे स्त्री असणे किंवा आस्तिक असणे तिच्या खेळण्याच्या इच्छेआड येऊ शकत नाही. या दोन्हीसुद्धा तिच्याच निवडी आहेत आणि त्या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ‘हिजाब घालूनच सराव केलेला असल्याने मला खेळताना हिजाब घालूनच खेळणे सोपे वाटते,’ असे ती सांगते. लोकांनी माझ्या खेळाकडे बघावे. केवळ ‘हिजाब घालून खेळणारी कुस्तीपटू’ अशी माझी ओळख न राहता एक चांगली कुस्तीपटू म्हणून मला ओळखले जावे अशी तिची इच्छा आहे. हिजाब घालून खेळते, इस्लाम धर्माविरुद्ध आचरण करते म्हणूनही तिच्यावर बरीच टीका झाली, पण ती सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करते आहे. एक दिवस ‘वर्ल्ड रेसिलग एण्टरटेनमेंट’ (डब्ल्यूडब्ल्यूई) मध्ये साशा बँक या प्रसिद्ध अमेरिकन कुस्तीपटू विरुद्ध खेळण्याचे तिचे स्वप्न आहे. ‘इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, ज्यातून स्वत:ला आनंद मिळतो अशी गोष्ट करा,’ हे सांगणारी नूर फिनिक्स डायना नव्या पिढीची खरी प्रतिनिधी वाटते.
कथा ‘राजकीय’ फोटोची
आपल्याकडे लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. सगळ्या पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचाराचा सगळा नूर आता बदललेला दिसतो. पूर्वी घरोघरी फिरून प्रचार व्हायचा. त्यापेक्षा आता समाजमाध्यमांवरून कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. किंबहुना सोशल मीडिया हे प्रचाराचे एक मुख्य साधन झाले आहे. यात आपल्या उमेदवाराची प्रतिमा तयार करणे, जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही प्रतिमा पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा अनेक माध्यमांचा वापर केला जातो. अनेकवेळा फोटोशॉपमध्ये फोटो एडिट वा संपादित केले जातात. एखाद्या छायाचित्रामध्ये नसलेल्या गोष्टी त्यात घालणे किंवा छायाचित्रातल्या गोष्टी, माणसे बदलणे हे प्रकार सर्रास होतात. जशी एखाद्याची प्रतिमा बनवली जाते तशीच एखाद्याची प्रतिमा खराबसुद्धा केली जाते. असे एडिटिंग करणारे अनेक अ‍ॅप्स आज उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने हे इतके बेमालूमपणे केले जातात, की काय खरे काय खोटे हे अनेकवेळा साध्या डोळ्यांना कळत नाही.
कॅनडामध्ये २१ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. ‘ग्रीन पार्टी’च्या एलिझाबेथ मे या निवडणुकीत उमेदवार आहेत. मे या ‘ग्रीन पार्टी’च्या सगळ्यात लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांनी याआधीची निवडणूकदेखील जिंकली होती. त्यामुळे या निवडणुकीतदेखील त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी मे यांचे एक छायाचित्र पक्षाच्या संकेतस्थळावर होते. त्यात त्यांच्या हातात एक ‘रिसायकलेबल कप (पण प्लास्टीकचा)’, ज्यावर ‘ग्रीन पार्टी’चे बोधचिन्ह (सिम्बल) होते आणि त्यात एक मेटल स्ट्रॉ दाखवला होता. हे छायाचित्र प्रसिद्ध केल्यावर काही काळातच तो फोटोशॉपमध्ये केलेला आहे, हे लोकांनी दाखवून दिले. मूळ छायाचित्रामध्ये मे यांच्या हातात डिस्पोजेबल पेपर कप होता. जेव्हा यावरून टीका व्हायला लागली तेव्हा मे यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली. आपले छायाचित्र असे ‘संपादित’ केले जाईल, याची आपल्याला कल्पना नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘‘मुळात हे आमच्याच पक्षाच्या कोणाचे तरी काम आहे. मात्र त्याने हे कोणत्या भूमिकेतून आणि का केले हे मला माहीत नाही. मी स्वत: पुनर्वापर न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या विरोधात आहे. त्यामुळे मी ते शक्य तेवढे टाळते. कधीही प्लास्टिकची पाण्याची बाटली वापरण्याऐवजी मी पाण्याचा मग घेऊन फिरते. विमानातून जाताना माझी ताटली, चमचा घेऊन फिरते. त्यामुळे माझे ते छायाचित्र फोटोशॉप करायचे काहीच कारण नव्हते.
मे स्वत:ची मूल्ये खासगी आणि सार्वजनिक जीवनातही जपत असल्यामुळे त्यांच्या ‘फोटोशॉप’मध्ये एडिट केलेल्या त्या छायाचित्राबद्दल स्पष्ट बोलू शकल्या. अनेकदा काही जण मात्र सारवासारवी करतात किंवा भलतीच कारणे पुढे आणतात. मे यांच्या पक्षाची पर्यावरणपूरक तत्त्वे आहेत आणि त्या त्याचा हिरिरीने प्रचार करतात. त्याचाच एक भाग म्हणून मे यांनी काही दिवसांपूर्वी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास केला होता. तत्त्वांसाठी आपल्याच पक्षातल्या लोकांवर टीका करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने कमी होते आहे. आपल्याकडे तर ती अगदी बोटावर मोजण्याइतकी राहिलीय. अशा वेळी जगाच्या एका कोपऱ्यात एखादी स्त्री ठामपणे आपली तत्त्वे सांभाळत, आपल्याच पक्षाने केलेल्या घोटाळ्याचे समर्थन न करता त्याचा विरोध करते तेव्हा जगात अजूनही मूल्याधारित राजकारण कुठे तरी अस्तित्वात आहे याचा आनंद होतो.
भविष्यासाठी तरुणाईची साद
सध्या सगळ्याच माध्यमांवर एक नाव गाजते आहे, ग्रेटा थंबर्ग! एका सोळा वर्षांच्या मुलीने सगळ्या जगाला, राष्ट्रप्रमुखांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. मात्र वातावरण बदलाच्या या प्रश्नावर ती काही एकटीच लढत नाहीय. तिने शाळेबाहेर शुक्रवारी सुरू केलेल्या सत्याग्रहाला एक वर्ष उलटून गेले आहे आणि तिच्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ किंवा ‘फ्रायडे फॉर अ‍ॅन अवर’ या संकल्पनेला जगभरातून प्रतिसाद मिळालेला आहे. ‘दर शुक्रवारी एक तास सत्याग्रह’ ही संकल्पना अनेक शाळकरी मुलांनी उचलून धरलीय. त्यातल्या अनेकांनी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे उपाय सुचवलेत. मागील महिन्यात जेव्हा ग्रेटा थंबर्ग अमेरिकेत यूनायटेड नेशनच्या हवामान बदलाच्या परिषदेत सहभागी झाली होती तेव्हा तिच्याबरोबर इतर काही देशांमधील प्रतिनिधीसुद्धा होते. ग्रेटाबद्दल खूप लिहिले जाते आहे. कौतुकाबरोबरच तिच्यावर टीकादेखील होत आहे. मात्र तिच्या कामामुळे प्रेरित झालेल्या लोकांची संख्यादेखील कमी नाही. त्यातल्याच या सात खंद्या आंदोलक.
एला आणि कॅटलिन मॅक्वन या यूके (युनायटेड किंग्डम)मधील दोन बहिणींनी ‘मॅकडोनल्ड’ या प्रसिद्ध फूड चेनला एक पत्र लिहिले आणि विचारले, ‘‘तुमच्या ‘हॅपी मिल’मधून छोटी छोटी प्लास्टिकची खेळणी का देता? त्याऐवजी पर्यावरणपूरक गोष्टी द्या.’’ त्यांच्या या मोहिमेला लाखो लोकांचा पाठिंबा मिळाला. ही चर्चा इतकी गाजली, की टीव्हीवरसुद्धा याबाबत कार्यक्रम सादर केला गेला. यानंतर ‘मॅकडोनल्ड’नेदेखील सकारात्मक प्रतिसाद देत, ‘आम्ही पुढच्या काही महिन्यांमध्ये प्लास्टिक खेळण्यांऐवजी पुस्तके, बोर्ड गेम, सॉफ्ट टॉइज असे पर्याय मुलांना उपलब्ध करून देऊ,’ असे जाहीर केले. तर ‘बर्गर किंग’ या फूड चेनने देखील विषयाचे गांभीर्य समजून घेत जेवणासोबत खेळणी न देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले, की मुलांनी त्यांची जुनी खेळणी आणली तर ते त्याचा उपयोग रिसायकल करण्यासाठी करतील. त्यांच्या रेस्तराँमधून दिल्या जाणाऱ्या ‘टेक अवे’चे पॅकिंगसुद्धा प्लास्टिकऐवजी कार्डबोर्डमध्ये केले जाईल.
अमेरिकेतील चौदा वर्षीय अलेक्झांड्रीया वेलन्सॉर दर शुक्रवारी शाळा बुडवून यूएनच्या बाहेर निदर्शने करते. त्याचबरोबर ‘फ्रायडे फॉर फ्युचर’साठी ती लोकांकडून निधीसुद्धा गोळा करते. लेह नेमगुर्वा ही युगांडामधील चौदावर्षीय मुलगीदेखील युगांडामध्ये ‘फ्रायडे फॉर फ्युचर’साठी आंदोलने करते. फेब्रुवारीपासून दर शुक्रवारी ती ही निदर्शने करते आहे. ‘‘माझ्या या आंदोलनामुळे तरी आमच्या सरकारने पर्यावरणपूरक निर्णय घ्यावेत हीच माझी अपेक्षा आहे,’’ असे ती म्हणते.
लिली प्लाट ही ब्रिटनमध्ये जन्मलेली पण आता नेदरलॅण्ड्समध्ये राहणारी अकरा वर्षांची आंदोलक. तीदेखील शाळेकडून परवानगी घेऊन दर शुक्रवारी तिच्या गावात आंदोलन करते. त्याचबरोबर गेल्या चार वर्षांपासून ती ‘लिलीज प्लास्टिक पिक अप’ या संस्थेच्या माध्यमातून गावात इतरत्र पडलेला प्लास्टिकचा कचरा उचलते. हॉली गीलीब्रंड ही स्कॉटलंडच्या फोर्ट विल्यम गावात राहणारी चौदा वर्षांची आंदोलक आहे. तीदेखील दर शुक्रवारी आंदोलन करते. ती म्हणते, ‘‘स्कॉटिश सरकारने आमचे भविष्य जपण्यासाठी आता तरी योग्य ती पावले उचलावीत. या पंचकन्यांबरोबरच दोन तरुण मुलग्यांनीही या लढय़ाला साथ दिलीय. लेझेन मुतुनकेई या केनियातल्या पंधरावर्षीय मुलाचे वैशिष्टय़ म्हणजे हा फुटबॉल खेळणारा मुलगा त्याने केलेल्या प्रत्येक गोलनंतर एक झाड लावतो. त्याचबरोबर तो त्याच्या आजूबाजूच्या परिसरात, शाळांमध्ये जाऊन त्यांनी पर्यावरणपूरक निर्णय घेतले पाहिजे यासाठी सतत प्रयत्नरत असतो. सोबत आपल्याच भारतातला दिल्लीमध्ये राहणारा चौदा वर्षांचा आदित्य मुखर्जीदेखील हॉटेलमध्ये जाऊन प्लास्टिक चमचे, स्ट्रॉ वा इतर ‘सिंगल युज प्लास्टिक’ वापरू नका ही मोहीम चालवतो. तो फक्त ‘हे वापरू नका’ एवढेच सांगत नाही तर याऐवजी काय वापरता येईल याचीसुद्धा माहिती देतो.
हे सगळे जण केवळ काही प्रतिनिधी आहेत ज्यांच्या कामाची नोंद घेतली गेली आहे, पण याव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूलादेखील असे अनेक छोटे शिपाई नक्कीच असतील जे पर्यावरणबदलाच्या या मोठय़ा लढाईतले पाईक असतील. त्यांचे कार्य कदाचित या सगळ्यांहून मोठे असूनही त्याची नोंदही घेतली गेली नसेल. अर्थात, म्हणून ते काही कमी महत्त्वाचे ठरत नाही. अशा अनेक लढवय्यांचे अनुभव वाचून आपण आपल्या आयुष्यात छोटे-छोटे बदल केले तरी ते त्यांच्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागेल. ते लढत असलेली लढाई फक्त त्यांची नसून आपल्या सर्वाच्याच भविष्याची आहे. तेव्हा आपणही छोटे पर्यावरणपूरक बदल करत या लढाईला हातभार नक्कीच लावू शकतो.
(सदरातील माहिती व छायाचित्र स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळं)
चतुरंग १२ ऑकटोबर 

पृथ्वी प्रदक्षिणा २०

आपले मूल १०-१५ मिनिटे उशिरा घरी आले तर आपण बचन होतो, काही क्षणांसाठी त्याचा संपर्क झाला नाही तर नको नको ते विचार डोक्यात येतात. मग एप्रिल २०१४ पासून ज्यांचा काहीच पत्ता नाही अशा ११२ मुलींच्या आई-वडिलांनी काय करावे? ईशान्य नायजेरियातल्या चिबॉक प्रांतातल्या शाळेतून २७६ मुलींचे अपहरण झाले होते. ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने या मुलींना डांबून ठेवले होते. यातल्या ५७ मुली पळून परत आल्या होत्या. परंतु २१९ मुली मात्र अडकलेल्याच होत्या. सरकारने केलेल्या वाटाघाटीनंतर त्यातल्या १०७ जणींची सुटका झाली. मात्र ११२ मुलींचा आजतागायत काहीच पत्ता नाही. याच घटनेवर जोएल काची बेन्सन या नायजेरियाच्या दिग्दर्शकाने ‘चिबॉकच्या मुली’ (डॉटर्स ऑफ चिबॉक) हा माहितीपट बनवला, ज्याला यावर्षीच्या व्हेनिस महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, या माहितीपटामध्ये ‘व्ही आर’ म्हणजे व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीचा प्रयोग केलेला आहे.
१४ एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या या घटनेनंतर जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नायजेरिया सरकारवर ‘बोको हराम’शी वाटाघाटी करण्याबद्दल खूप दबाव टाकला गेला होता, त्यामुळेच १०७ मुली परत त्यांच्या घरी येऊ शकल्या. पण त्यानंतर मात्र जगाचे लक्ष या गोष्टीवरून दुसरीकडे वळले. त्यामुळे ११२ मुलींच्या सुटकेचा प्रश्न काहीसा दुय्यम ठरला. आज पाच वर्षांनंतरही त्यांचे पालक मुलींच्या प्रतीक्षेतच आहेत. यातल्या अनेक पालकांनी त्यांचे अनुभव ‘चिबॉकच्या मुली’ या माहितीपटात सांगितले आहेत. चिबॉक प्रांतात आजही पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते. त्यामुळे तिथे गरिबीचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यात अनेक घरांमध्ये पाच वर्षांपासून मुलीचा ठावठिकाणा नसल्याचे दु:ख वेगळे. या पालकांना कोणीही भावनिक मदत किंवा समुपदेशनाची मदतसुद्धा केली नाही हे भीषण वास्तव जेव्हा दिग्दर्शक बेन्सन यांना जाणवले तेव्हा तेसुद्धा हादरले. या पालकांमधली एकजणच पुढाकार घेऊन स्त्रियांना एकत्र जमवून बोलते करते, मग त्या सगळ्या मिळून त्यांच्या मुलींसाठी प्रार्थना करतात, हे केल्यामुळे त्यांचे दु:ख हलके होते.
या माहितीपटात व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीचा प्रयोग केला आहे. म्हणजे तुम्ही तो व्हिडीओ बघताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा अनुभव घेता. जगात इतक्या काही गोष्टी घडत असतात, की मिनिटापूर्वीची बातमी शिळी होते, त्यामुळे पाच वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या ११९ जणींचा जगाला विसर पडणे यात काही विशेष नाही, मात्र यांचे कुटुंबीय आजही हे दु:ख घेऊन वावरत आहेत. या बेपत्ता झालेल्या ११९ मुली जिवंत आहेत की नाहीत, असल्या तर कोणत्या स्थितीत आहेत याची काहीच कल्पना नाही. दर महिन्याला लेकीची वाट बघत तिचे कपडे धुऊन ठेवणाऱ्या आईला काय दु:ख होत असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही. पण या माहितीपटातून त्यांच्या दु:खाची जाणीव जगापुढे नव्याने मांडली गेल्यामुळेच या पालकांबद्दल सहानुभूती नक्कीच वाढीला लागेल. कदाचित यानंतर तरी या पालकांच्या दु:खावर फुंकर घालायला संस्था पुढे येतील, त्यांचे समुपदेशन करतील. एवढे झाले तरी या माहितीपटाचा हेतू सफल झाला असे म्हणावे लागेल.
शांततेसाठीची रोशनी
अफगाणिस्तान हा आपला धुमसता शेजारी. पहिल्यांदा शीतयुद्धाचा बळी ठरला आणि नंतर तालिबानच्या हालचालींचा. कोणत्याही युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्त्रिया आणि लहान मुले सगळ्यात जास्त भरडली जातात. अफगाणिस्तानातल्या उत्तरेकडच्या कुंडूज प्रांतात गेल्या दोन दशकांपासून तणावाची परिस्थिती कायम आहे. कधी तालिबानचा जोर असतो तर कधी शांती सेनेचा. ३१ ऑगस्टला परत एकदा तालिबानने या कुंडूज प्रांतातले सगळ्यात मोठे आणि अफगाणिस्तानातले सहावे मोठे शहर असलेल्या कुंडूजवर हल्ला करून आपले बस्तान बसवले. या गोष्टीचा अर्थातच तिथल्या थोडय़ाफार होऊ घातलेल्या सुधारणांवर लगेचच फरक पडतो. त्यामुळेच ‘रेडिओ रोशनी’ चालवणाऱ्या सेदिक सेरझाई यांची काळजी वाढली आहे.
२००८ मध्ये सेदिक यांनी खास स्त्रियांसाठी म्हणून ‘रेडिओ रोशनी’ या नावाने स्थानिक रेडिओ स्टेशन सुरू केले. २००९ मध्ये त्यांच्या स्टेशनवर क्षेपणास्त्रे डागली होती. त्यावेळी त्यांनी सरकारकडे मदत मागितली पण सरकारचा एकूण नूर पाहता त्यांची लढाई त्यांनीच लढायची ठरवली. जेव्हा केव्हा धमक्या मिळत, शहरात अस्थिरता असे, त्या काळात तेवढय़ापुरते रेडिओचे प्रक्षेपण बंद करायचे. शांतता प्रस्थापित झाली, की आपले काम परत सुरू करायचे याची जणू सेदिकसारखीच अनेकांना सवय झाली आहे. त्यामुळेच आज दहा वर्षांनंतरही त्या जिद्दीने टिकून आहेत. २०१५ मध्ये त्यांना पहिल्यांदा फोनवर धमकी मिळाली. तेव्हा त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रेडिओ स्टेशन तसेच टाकून पळ काढला. जीव वाचला पण तालिबान्यांनी जुने रेकॉर्डिंग नष्ट केले, सामानाची नासधूस केली आणि सुरुंगसुद्धा पेरून ठेवले. दोन महिन्यांनंतर त्यांनी सुरुंग निकामी करून घेतली, सामानाची नव्याने जुळवाजुळव केली आणि परत प्रक्षेपण सुरू केले.
सेदिक यांचे कार्यक्रम फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषदेखील ऐकतात. त्यांचे काही कार्यक्रम हे ‘फोन इन’ असतात. त्यामुळे त्यांच्या परिसरातल्या अनेक स्त्रिया त्यांच्या समस्यांबद्दल उघडपणे बोलतात. बहुतांश प्रश्न हे बहुविवाहाच्या चालीतूनच आलेले असतात. एक पत्नी, तिच्याकडून झालेली मुले असतानाही दुसरी, तिसरी पत्नी करून आणली जाते. मग स्त्रियाच स्त्रियांचे कसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषण करतात याची अनेक उदाहरणे सेदिक यांना ऐकायला मिळतात. शिक्षण, आरोग्य असे प्राथमिक हक्कसुद्धा अनेकदा स्त्रियांच्या, मुलींच्या वाटय़ाला सहज येत नाहीत. त्यात सेदिक यांना वेगळीच भीती वाटते. ती म्हणजे, अमेरिकी सरकार आणि तालिबान यांच्यामध्ये चाललेल्या वाटाघाटींमध्ये इथल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा बळी दिला जाऊ नये. अमेरिकी सरकारला लवकरात लवकर तिथून काढता पाय घ्यायचा आहे. त्यामुळे तालिबानला शरिया कायदा लागू करू दिला जाईल अशी त्यांना शंका वाटते. होरपळलेल्या मनांवर सहानुभूतीची फुंकर घालण्याचे काम सेदिक करत आहेत. त्या खरोखरीच अनेकींना त्यांच्या ‘रेडिओ रोशनी’वरून जगण्याची नवी रोशनी दाखवत आहेत. अफगाणिस्तानात, कुंडूज प्रांतात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी तिथल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, नव्याने त्यांच्यात रुजत असलेल्या आत्मभानाचा मात्र बळी दिला जाता कामा नये.
अनंत ‘तिची’ ध्येयासक्ती
सत्त्याहत्तराव्या वर्षी अनेक जण ‘खूप जगून झाले, सगळे पाहून झाले.’ अशा मानसिकतेत असतात. पण जेन सॉक्रेटिस या मात्र त्याला अपवाद ठरल्या आहेत. ३ ऑक्टोबर २०१८ ला त्यांनी कॅनडामधून एकटीने शिडाच्या बोटीतून जगभ्रमणाला सुरुवात केली आणि ३२० दिवसांनंतर कुठेही न थांबता, कोणाच्याही मदतीशिवाय, एकटीने हा प्रवास पूर्ण केला. हे साहस करणाऱ्या सर्वाधिक वयाच्या व्यक्ती म्हणून त्यांची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.
मूळच्या ब्रिटनच्या नागरिक असलेल्या जेन यांनी यापूर्वी देखील शिडाच्या नौकेतून जगभ्रमण केलेले आहे. १९९७ नंतर नवऱ्याच्या जोडीने त्यांनी नौकानयनामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. २००३ मध्ये नवऱ्याचे निधन झाल्यानंतरही त्यांनी एकटीनेच प्रवास करायला सुरुवात केली. २००९ मध्ये त्यांनी एकटीनेच नौकेतून जगभ्रमण करण्याचा पहिला प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. २०१२ मध्येसुद्धा त्यांना यश मिळाले नाही, पण त्यामुळे खचून न जाता त्यांनी २०१३ मध्ये परत एकदा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र त्यांच्या विक्रमाची नोंद ‘एकटीने शिडाच्या नौकेतून प्रवास करणारी सर्वाधिक वयाची स्त्री’ म्हणून झाली. विक्रम नोंदवला असला तरीही जेन यांना नौकानयनाची हौस काही घरात बसू देत नव्हती. २०१७ मध्ये होडीतून पडल्यामुळे त्यांना मानेला, बरगडय़ांना दुखापत झाली होती. त्यातूनही सावरत त्यांनी मागील वर्षी सुरू केलेली त्यांची प्रदक्षिणा यावर्षी पूर्ण केली.
सत्त्याहत्तराव्या वर्षी एकटीने समुद्रात शिडाच्या बोटीतून प्रवास करताना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगलेच असावे लागते. जेन सॉक्रेटिस यांनी हा विक्रम करताना त्यांचे उद्दिष्ट काय होते माहीत नाही. मात्र त्यांनी यामुळे जगासमोर कोणत्याही गोष्टीसाठी वयाचे बंधन नसते याचे उदाहरण ठेवले आहे. आता सगळे झाले म्हणून थांबण्यापेक्षा ‘अरे, अजून बरेच काही आहे, ते करून बघू या.’ या उमेदीने जेव्हा अनेकजण विचार करायला सुरू करतील तेव्हा जेन सॉक्रेटिस यांचा विक्रम फक्त पुस्तकात न राहता समाजात बघायला मिळेल. हेच त्याचे खरे यश असेल.
न्यायाचा परीघ वाढवताना
युनायटेड किंग्डममध्ये ‘वुमेन इक्व्ॉलिटी पार्टी’ (डब्ल्यूईपी) हा नव्याने लोकप्रियता मिळवणारा पक्ष आहे. अर्थातच नावाप्रमाणेच या पक्षाची धोरणे स्त्रीकेंद्रित आहेत. त्यामुळेच त्यांनी पुढच्या सर्वसाधारण निवडणुकांसाठी त्यांच्या ५ सदस्यांची ५ विद्यमान खासदारांविरुद्ध उमेदवारी जाहीर केली आहे. या पाचही जणांवर लैंगिक शोषणाचे आरोप होते वा आहेत आणि त्यांच्याविरुद्ध उभ्या राहणाऱ्या पाचही जणी या बलात्कार, लैंगिक शोषणाच्या बळी आहेत. तसे बघायला गेले तर युकेच्या पुढच्या निवडणुका २०२२ मध्ये आहेत, पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुदतपूर्व निवडणुका पुढील वर्षी घेतील अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळेच ‘डब्ल्यूईपी’ने इतक्या लवकर त्यांचा निर्णय जाहीर केला आहे.
लैंगिक शोषण, बलात्कार या गोष्टींबद्दल आपल्या समाजात मोठय़ाने बोलायचे धाडसदेखील खूप कमी जण करतात. बहुतांश वेळा अशा शोषितांना समाजात अवहेलनेचा सामना करावा लागतो. त्यांनी त्याच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडली यासाठी आधी त्यांनाच दोषी समजले जाते. पाच उमेदवारांमधील सेरेना लेडली, जेन सेल्बी यांची लढत ही राजकारणात मुरलेल्या केल्विन हॉपकिन्स आणि मार्क फिल्ड यांच्याविरुद्ध आहे. इतर तिघींची नावे ‘डब्ल्यूईपी’ने जाहीर केलेली नाहीत.
सेरेना लेडली यांच्यावर सोळाव्या वर्षी बलात्कार झाला. त्यातून त्या सावरतात न सावरतात तोच कॉलेजात, त्या ज्या माणसाच्या प्रेमात पडल्या, त्यानेही त्यांना शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्याकडून त्यांना एक मूलसुद्धा झाले. तरीही जोडीदारात काहीच फरक पडला नाही. उलट त्याने तिचे आर्थिक शोषणसुद्धा करायला सुरुवात केली. नंतर कशाबशा त्या त्याच्या तावडीतून सुटल्या. तरीही त्याने पुढची काही वर्षे तिचा पिच्छा सोडला नाहीच. आत्महत्येच्या विचारापर्यंत जाऊन आता देशातील एका मातब्बर राजकारण्याविरुद्ध लढण्यासाठी उभे राहणे हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण लेडली यांनी ते करून दाखवले. त्या म्हणतात, ‘‘मी का? याऐवजी मी का नाही? असा विचार मी करते.’’ तर सेल्बी यांच्यावरदेखील दोन वर्ष बलात्कार होत होता. त्यांनी त्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला होता. पण पुराव्याअभावी ते सगळेच मोडीत निघाले. या पूर्ण प्रक्रियेत सेल्बी यांना जो अनुभव आला तो मात्र अजूनच उद्विग्न करणारा होता. त्यानंतर त्यांनी मग अनेक सेवाभावी संस्थांबरोबर काम करायला सुरुवात केली. त्या म्हणतात, ‘‘आमच्यातल्या प्रत्येकीकडे स्वत:चे असे एक ठोस कारण आहे लढण्यासाठी. आम्हाला अन्यायग्रस्त स्त्रियांना न्याय मिळवून द्यायचा आहे. ज्या पुरुषांना वाटते, की ते गुन्हा करून, सहज सुटून जाऊ शकतात, त्यांच्याविरुद्ध आम्हाला लढायचे आहे. यूकेमधल्या निवडणुका कधी होतील माहीत नाही. या पाच जणी ज्यांच्याविरुद्ध लढण्यास उत्सुक आहेत ते निवडणूक लढवतील की नाही, तेसुद्धा माहीत नाही. त्या पाच जणींना किती मते मिळतील, किती जणी जिंकतील हेसुद्धा माहीत नाही. मात्र या पाच जणींची हिंमत वाखाणण्यायोग्यच आहे. स्वत:वरच्या अन्यायाच्या निमित्ताने त्या एका मोठय़ा मुद्दय़ाला हात घालत आहेत. त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
(माहिती व छायाचित्र स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग 
२८ सप्टेंबर