‘सौंदर्याच्या काही व्याख्या, मानके असू शकत नाहीत. कारण सौंदर्य हे बघणाऱ्यांच्या ‘डोळ्यात’ असते, तरीही दर वर्षी ‘मिस युनिव्हर्स’, ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धा होतच असतात. या सौंदर्य स्पर्धामागची गणिते खूपच वेगळी असतात हे आत्तापर्यंतच्या स्पर्धामधून दिसून आले आहेच, पण तरीही या स्पर्धाचा जनमानसावरचा प्रभाव पुसता येत नाही. या वर्षी दक्षिण आफ्रिकेची झुझीबिनि टुंझा ही कृष्णवर्णीय सुंदरी विजेती ठरलेली आहे. आजवरच्या ६८ वर्षांच्या जगतसुंदरीच्या स्पर्धेमध्ये केवळ सहा कृष्णवर्णीयांना जगतसुंदरीचा मान मिळालेला आहे. झुझीबिनीचे अजून एक खास वैशिष्टय़ म्हणजे तिचे केस. आखूड, कुरळे, विरळ केस ही खास आफ्रिकन वैशिष्टय़े असलेली झुझीबिनी ही पहिली जगतसुंदरी ठरलेली आहे.
या स्पर्धेतली आणखी एक घटना म्हणजे ‘मिस म्यानमार’ने दिलेली कबुली. म्यानमार हे बौद्धबहुल राष्ट्र. समलैंगिकता हा तेथे गुन्हाच समजला जातो, पण ‘मिस युनिव्हर्स’मुळे मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून मिस म्यानमार, स्वे झिन हातेत हिने ती समलैंगिक असल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये कुणी ही बाब जाहीर करण्याची पहिलीच वेळ होती. २०१३ मधल्या दुसऱ्या क्रमांकाची विजेती पॅट्रिशिया युएना रॉड्रिग्ज हिने तिचा कार्यकाल संपता संपता ती समलैंगिक असल्याचे जाहीर केले होते. स्वे झिन ही स्पर्धा न जिंकताही लक्षात राहील. तिने नोव्हेंबरमध्ये ही बाब जाहीर करतानाच सांगितले, की ‘माझ्या देशात समलैंगिक असणे हा गुन्हा समजला जातो. त्याविरुद्ध लढा देण्यासाठीच मी या व्यासपीठावर ही कबुली दिली आहे. याचा माझ्या देशातल्या ‘एलजीबीटी’ चळवळीला खूप मोठा फायदा होणार आहे.’ सौंदर्य स्पर्धामध्ये सौंदर्याबरोबरच बुद्धीचासुद्धा विचार केला जातो. त्यामुळेच स्पर्धक काय उत्तर देतो यावर अनेकदा विजेतेपद ठरवले जाते. झुझीबिनीने ‘मुलींना काय शिकवले जावे असे तुम्हाला वाटते,’ या प्रश्नावर, ‘मुलींना नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे,’ असे सांगितले. तर स्वे झिनने मिळालेल्या संधीचा फायदा घेत, आपण लेस्बियन आहोत, हे सांगून ही स्पर्धा बाह्य़ सौंदर्याच्या दिखाव्याची नाही, इथे स्त्रीविषयक नवनवीन प्रश्नांचा, घटनांचा उहापोह व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सौंदर्यस्र्पोचं व्यासपीठ स्त्रीच्या आशाआकांक्षांवर, विविध विषयांवर चर्चा करणारं होवो, अशी अपेक्षा हे वर्ष सरता सरता करायला काय हरकत आहे?
तिची संगीतिका
व्हिएन्ना ही काही फक्त ऑस्ट्रियाची राजधानी किंवा मोठे शहर म्हणून प्रसिद्ध नाही. या शहराची वेगळी ओळख आहे, ती म्हणजे संगीताचे शहर. मोझार्ट, बीथोवेन, फ्रांझ शुबर्ट, जोहान्स ब्राह्म्स, रॉबर्ट स्टोल्झ, जोहान स्ट्रोस अशा अनेक मान्यवरांनी इथे संगीतसाधना केलेली आहे. इथल्या ‘सिटी ऑपेरा हाऊस’ला दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र गेल्या दीडशे वर्षांत न झालेली गोष्ट आता तिथे होणार आहे. लवकरच तिथे ओल्गा न्यूवर्थ या ऑस्ट्रियामधल्याच स्त्री संगीत दिग्दर्शकाने बसवलेल्या ऑपेराचा प्रयोग होणार आहे. व्हर्जिनिया वूल्फ यांनी १९२८ मध्ये लिहिलेल्या ‘ओरलॅंडो’ या कादंबरीवर आधारित ही संगीतिका असेल. अर्थात, ही कथा एकविसाव्या शतकाच्या अनुषंगाने बदललेली आहे. ऑपेराच्या दिग्दर्शक स्त्री असणं हे काही नवीन नाही. अगदी सतराव्या शतकापासून स्त्रियांचे या क्षेत्रातील कर्तृत्व बघायला मिळते, पण तरीही त्यांना हक्काचे व्यासपीठ मात्र आजवर सहजासहजी मिळाले नाही. न्यूयॉर्कमधल्या ऑपेरा हाऊसमध्ये स्थापना झाल्यानंतर ११३ वर्षांनी, २०१६ मध्ये, कैजा सारीआहो यांचा प्रयोग झाला, जो त्या ‘ऑपेरा हाऊस’मधला स्त्री दिग्दर्शकाने सादर केलेला पहिला ऑपेरा होता. आजही स्त्री कलाकारांना सहजासहजी कामाच्या संधी मिळत नाहीत. एका स्त्री दिग्दर्शकाने तिचा अनुभव सांगितला होता, जो अगदीच प्रातिनिधिक म्हणावा लागेल. तिने जेव्हा तिच्या रचना दाखवल्या, तेव्हा ‘अरे हे तर अगदीच सोपे आहे,’ असे म्हणून लोक तिच्या कामाला निकालात काढत होते, पण तिने ‘ते गाऊन बघा आणि मग सांगा, सोपे आहे की अवघड,’ असे स्वत:चे म्हणणे रेटून नेले तेव्हा त्या इतर कलाकारांनी गाऊन बघण्याचा प्रयत्न केला. अर्थातच, हे सोपे नसल्याचे त्यांच्या लगेचच लक्षात आले.
केवळ तुलना म्हणून नाही, पण आपल्याकडच्यादेखील शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या चित्रपटसृष्टीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच स्त्री संगीत दिग्दर्शक बघायला मिळतात. केवळ गुणवत्ता नाही म्हणून नाही, तर संधीचा अभाव हे त्यातले एक महत्त्वाचे कारण असू शकते. जात्यावर बसल्या बसल्या गाणी रचणाऱ्या, कोणतेही काम करताना सोबत गाणे गुणगुणणाऱ्या, अनेकजणी पूर्वीही होत्या, आताही आहेत आणि पुढेही असतील. संगीत हे निव्वळ स्वरांची बांधिलकी मानते, त्यात स्त्री-पुरुष असे भेद नसतात. त्यामुळेच ‘व्हिएन्ना सिटी ऑपेरा हाऊस’मध्ये यापुढे अनेक स्त्री दिग्दर्शित ऑपेरा बघायला मिळतील. केवळ तिथेच नव्हे तर जगभर जिथे जिथे ऑपेरा आहेत तिथे स्त्रियांना समान संधी मिळतील. प्रत्येक वेळी केवळ समानतेसाठी म्हणून नव्हे, तर संधी लवकर आणि सहज मिळाल्या तर भविष्यात असे प्रासंगिक लिहिण्याची वेळच येणार नाही.
तरीही स्त्री उभी राहते
आजचा या सदराचा हा शेवटचा लेख. वर्षभर हे सदर लिहीत असताना, जगभरातल्या स्त्रीविषयक बातम्या बघताना, अनेकदा विविध साम्यस्थळे सापडायची. संस्कृती, भाषा, धर्म, वेगळे असले तरीही त्यांच्यासमोरचे प्रश्न थोडय़ाफार फरकाने सारखेच आहेत. त्यांच्या अपेक्षा, आनंद, दु:ख, व्यक्त होण्याच्या जागा, पद्धती, सारख्याच आहेत, हे लक्षात येत होतं. ‘मी टू’चे अमेरिकेत सुरू झालेले लोण कधी जगभर पसरले, कळलेच नाही तसंच.
बलात्कार हा तिरस्करणीयच असतो. जबरदस्ती ही कोणत्याही पद्धतीची असो, वाईटच असते. जगभर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती बघायला मिळतात, त्यामुळेच अमेरिकेत, आफ्रिकेत, मध्य पूर्वेत, ऑस्ट्रेलियात, सगळीकडे स्त्रियांवर बलात्कार होतच असतात. तिने तोकडे कपडे घातले होते, ती रात्री-अपरात्री एकटी फिरत होती, अशी कोणतीही तथाकथित कारणे नसतानाही स्त्रियांवर, मुलींवर जबरदस्ती होतच असते. कधी त्यांच्याबद्दल वाच्यता केली जाते तर कधी ते दडपून ठेवले जातात. भारतामध्ये ‘निर्भया’वर झालेल्या बलात्कारामुळे पूर्ण देश ढवळून निघाला होता. तसेच काहीसे समाजमन ढवळून निघाले हैदराबाद येथे ‘दिशा’वर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्या समोर आली तेव्हा. तिच्या बलात्कारातील संशयितांना पोलिसांनी कथित चकमकीमध्ये ठार केले, पण या घटनेतून उभे राहिलेले प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत. सामाजिक मानसिकता बदलत नाही तोवर हे सुरूच राहणार आहे. चिली देशामध्ये अशाच एका बलात्काराच्या घटनेनंतर स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे एक गाणे रचले. मग चार जणींच्या सोबतीला चारशे आल्या आणि हे गाणे दणक्यात गायला लागल्या. त्यांनी एकत्र नाचत ताल धरला. स्वत:ची सगळी चीड, राग त्यात ओतला. त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येकीलाही ते तिचेच गाणे वाटत होते. साहजिकच या गाण्याचे लोण चिलीतून, मेक्सिको, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड सगळीकडे पसरले.
डॉ. मुग्धा कर्णिक यांनी केलेला या गीताचा मराठी स्वैर अनुवाद वाचून तुम्हालाही नक्की वाटेल, या तर माझ्याच भावना आहेत.
‘इथे करते न्याय आमचा बापसत्तेची नीती
जन्मा येताच ठरवून टाकतो पोरींची नियती
रोज-रोज होते शिक्षा दिसत नाहीत वळ, व्रण
मोकळे जगणे मुश्कील करते बापसत्तेची नीती
मारतात इथे बायांना, मारणाऱ्यांना कवच आहे
करतात गायब बायांना, त्यांनादेखील कवच आहे
बळजबरीचा भोग घेतात, त्यांनादेखील कवच आहे
बाईचीच चूक, बाई कुठे होती,
बाईचीच चूक, बाई काय नेसली होती
बाईची चूक नसते हे काही बापसत्तेला मान्य नाही.
म्हणूनच सांगतो आता बापसत्ताच बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
बापसत्तेचे पाईक कोण –
पोलीसही आहेत त्यात
न्यायाधीशही असतात त्यात
वकील, डॉक्टर, पत्रकारही
सारे सरकार आहे त्यात
संस्कृतीवादी राष्ट्रप्रमुखही
संस्कारघोटय़ा संघटनाही
जुलमी सरकार बलात्कारी
जुलमी प्रशासन बलात्कारी
तुम्ही आहात बलात्कारी
तुम्ही सारे बलात्कारी
झोप बाळे झोप शांत
चोरडाकूची चिंता नको
– अंगांगावर आहेत लक्ष ठेवून
सारे प्रेमळ शौकीन बाप !
जेव्हा-केव्हा गरज पडते, स्त्री उभी राहते, हा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि हेच भविष्यदेखील असेल. ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ सदरासाठी लिहिताना हेच ठळकपणे जाणवले. अंधार आहे पण त्यातून मार्ग काढणाऱ्या, साहसाचे काजवे चमकवणाऱ्या, हक्कांसाठी आग्रहाच्या मशाली लावणाऱ्या, तुमच्या-माझ्यासारख्या अनेकजणी आहेत. हेच होते माझ्या ‘पृथ्वी प्रदक्षिणे’चे फलित..
(फोटो व माहिती स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग २१ डिसेंबर २०१९