Sunday, December 11, 2016

गंध सांगतो काही...

सकाळी सकाळी अलार्म वाजायच्या आधी जाग यावी, मस्त एक आलं घातलेला वाफाळता चहा पिऊन मस्त फिरायला जावं. बाहेर धुकं बिकं पडलेलं असावं, फुलांचे वास सगळीकडे घमघमत असावेत. आपल्याच तंद्रीत सुर्यकिरणांबरोबर पावलं टाकत स्वतःशीच संवाद साधत चालत चालत दिवसाची सुरुवात करावी असं तिला नेहेमी वाटायचं. सकाळची वेळ तिला तिची वाटायची, एका बाजूला स्वैपाकाची गडबड, डबे बांधायची धावपळ पण त्यातही वेळ काढून ती स्वतःसाठी अर्धा तास काढून एक प्रभात फेरी मारून यायचीच. ती प्रभात फेरी चुकली की दिवस सुरूच झाला नाही असं तिला वाटायचं. काही वर्षांची सवय झाली होती ती, अशी जुनी सवय आयुष्याचा एक भागच बनून जात असते मग.

तिला कायम वाटायचं सकाळी उठल्या उठल्या एक प्रसन्नता सगळ्या नसानसांतून फिरत असते, रात्रीच्या झोपेमुळे सारे अवयव, अगदी मेंदू देखील कामाला लागलेला असतो, रात्रीत सुचलेले नवे विचार नव्या दिवसाची झक्कास सुरुवात करून देत असतात. मग फिरता फिरता आज काय काय करायचं याची एक यादी ती मनातल्या मनात तयार करायची, काल करायच्या राहिलेल्या कामांची वेगळी यादी मांडायची, मग त्या कामांचा क्रम सारा दिवस ती मनातल्या मनात आखून टाकायची, मग आजू बाजूला चालणाऱ्या लोकांकडे बघायची, ऐकायची, पहायची. ओळखीच्या चेहऱ्यांना हसू दाखवायची, कुठे ओळख शोधायची. मग आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधायची, असे छोटे मोठे कित्येक गुंते तिनी या सकाळच्या अर्धा तासात संपवले होते.

आज चालता चालता ती एक दोन मिनिटं थबकली, ३, ४ सेकंद अंगावर येऊन धडकलेल्या त्या वासानी ती एकदम काही वर्ष मागे गेली. त्याच्या परफ्युम चा वास तो. कायम त्याच्या आधी तो वासच तिच्यापर्यंत पोहोचायचा. त्याच्याशी मैत्री व्हायच्या आधीच तिची त्या वासाशी मैत्री झाली होती. तसे अनेक वासाचे परफ्युम, अत्तर याआधी हुंगले होते, पण हा गंध खोल आतवर कुठे तरी उतरला होता. कॉलेज मध्ये असताना, त्याच्याशी घट्ट मैत्री व्हायच्या आधी पण त्याच्या वासाचं अस्तित्व ती शोधून काढायची. जेव्हा पुढं ती वासाच्या नंतर त्याच्याही प्रेमात पडली तेव्हा तिनी त्याला सांगितलं पण होतं, काय सुंदर वास येतो रे तुझा, तुझ्या परफ्युम चा. परदेशातून त्याला कोणीतरी आणून दिलं होतं ते. सोबतची प्रेमाची काही वर्ष गेली, थोडे ते दोघेही बदलत होते, बदलला नव्हता तो त्याचा परफ्युम. त्याच्या कारणानी का होईना पण तीही अत्तर वापरायला शिकली होती. खरं तर त्याला खूप आवड होती वेगवेगळे वास लावून बघायची, पण ती अडून राहिली होती त्याच वासावर, म्हणून त्यानी तिला एक दोनदा अत्तरवाल्या गल्लीतून फिरवून आणलं होतं. तिथल्या त्या वासांच्या घमघमाटात तिला भाजी मंडईत ताज्या भाज्या बघून जशास आनंद होतो तसा आनंद झाला होता.

नोकरी सुरु झाली, भेटी कमी होऊ लागल्या आणि मग न आवडण्याची एकेक कारणं समोर दिसायला लागली. इतकी वर्ष जे चालवून घेत होतो, ते सगळं पुढं रेटायला नको असं वाटायला लागलं. एका छान वळणावर एकमेकांच्या हातात हात घेऊन त्यांनी एकत्र घेतलेल्या शपथा, आणा भाका मोडल्या, आणि दोन वेगळ्या रस्त्यानी चालायचं ठरवलं. एकत्र राहणं जमत नव्हतं, तेव्हा हे असं वेगळ राहून पाहूया म्हणत दोघ वेगळ्या वाटेने गेले. सोप्प काहीच नसत, ना नवीन नातं बांधण ना नातं टिकवणं. आयुष्याचा धडा मिळेपर्यंत पार पुढे चालत आली होती. आता माग वळण शक्य नव्हतं, कोणास ठाऊक पुढं भेटेलही तो म्हणत चालत राहिली, मग कधी तरी त्याच्या दोन चार गोष्टींचे भास घडवणाऱ्या एका मित्रासोबत लग्न करून मोकळी झाली. याला सुरुवातीला अत्तर देऊन तिनी जोखलं, पण तो दुकानात पहिले दिसणारा, परफ्युम घेणाऱ्यातला आहे कळल्यावर त्रागा चिडचिड न करता त्याच्या बदलत्या वासांना आपलंसं केलं.

तसं सगळ चाकोरीतल्या सारखं चाललं होतं. कमीत कमी अपेक्षा ठेवल्या की छोट्या छोट्या गोष्टींमधले आनंद अगदी डोंगराएवढे जाणवतात. वळणावरून पुढच्या रस्त्यावर खूप काही शिकायला मिळालं होतं. त्यामुळे आता कोणतही वळण नको सरळ साधा रस्ता धरत ती चालत होती. सुख, दुःख प्रेम सगळे आपलेच असतात, आपल्याच सोबत असतात, आपण त्यांना पाहू शोधू तसे ते आपल्याला सापडतात, प्रत्येक प्रसंगाचा एक गंध असतो, आठवणी उडून गेल्या तर गंध कायम राहतात. दिवाळीतला, उटण्याचा गंध, आईचा साडीचा गंध, पहाटेचा गंध, तव्यावरच्या पोळीचा गंध, नव्या पुस्तकांचा गंध, ओल्या मातीचा गंध, एक ना अनेक, आठवणी, माणसं सारी उरतात गंधापुरती. अशा माणसांच्या सहवासानी तयार होतो नात्यांचा , घराचा गंध. प्रत्येक घराला वेगळ अस्तित्व देणारा असतो हा गंध.


वळणावरती तिचा हात हातात धरून तो म्हणाला होता, प्रयत्न केला तर कदाचित धगून जाईल सारं काही, पण त्यात निखळ आनंदापेक्षा असेल टिकवून ठेवण्याचं दडपण. त्रास करत, भांडत रोज एकमेकांना सोबत करण्याएवजी ठरवून निरोप घेतला तर आपल्या नात्याचा सुगंध कायम राहील. प्रेम असलं तरी नातं टिकवणं अवघडच! आज इतक्या वर्षांनी परत तोच वास, वळून बघेपर्यंत आठवणी, गंध सारंच दूर गेलं होतं. पायांना जबरदस्ती घरी वळवून आणत तिनी सत्यात आणलं, घरी येऊन तिच्या कपाटातल्या अर्धवट संपलेल्या अत्तराच्या डब्यांचा वास श्वासासरशी आत भरून घेत, त्याच्या परफ्युमचा घट्ट डोक्यात बसलेला वास तिनी तिथंच सोडला, आणि घरात कामाला लागली, नव्या गंधाचा भरत नवा दिवस सुरु करायला.  

2 comments: