Wednesday, December 28, 2016

दंग(ल) करणारा अनुभव...

सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं कायम म्हणलं, लिहिलं जातं. म्हणजे आपल्याला जे बघायचं आहे ते त्यात दिसतंच पण त्याच वेळी जे नजरेआड आहे ते देखील समोर आणतं. कधी कधी आपल्याला जे मान्य करायचं नसतं ते देखील आरशासमोर उभं राहून आपण मान्य करतो.सिनेमा हा स्वप्नी, आभासी जग जगण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे. तर कधी सिनेमाच आपल्याला आपल्या आयुष्यात न घेतलेल्या वळणाच्या पुढचं आयुष्य कसं असू शकलं असतं दाखवतो. कधी जुन्या आठवणी ताज्ज्या होतात, कधी काही जखमांवर मलम लावलं जातं.
दंगल सिनेमा बघताना असाच काहीसा अनुभव आला. गाणी आणि ट्रेलर मुळे खूपच उत्सुकता होती. सिनेमा, क्रिकेटवेड्या आपल्या देशात खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण मोडणाऱ्या या सिनेमामुळे माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या सिनेमावर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळया माध्यमांवर लिहिलं, पण मला हा पूर्ण सिनेमा पाहताना माझा भाऊ, अहमदनगरमधला सिद्धी बागेतला ज्युदोचा हॉल, धोपावकर सेन्से, आणि खूप काही डोळ्यासमोर तरळत होतं.
एक २० वर्षापूर्वीचा काळ असेल, माझा भाऊ प्रचंड मस्ती खोर, त्याच्या अंगातली रग कमी करण्यासाठी कोणीतरी आई वडिलांना सुचवलं याला ज्युदोच्या क्लास ला घाला. नव्यानं सुरु झाला होता तो. दोन तास पोरगा बाहेर खेळायला जाईल, आपल्याला त्याला बघावं लागणार नाही या सुटकेच्या विचारांनी आई वडिलांनी त्याला वेक दिवशी यंगमेन्स ज्युदो असोशिएशनच्या एका छोट्याशा हॉल मध्ये नेऊन उभं केलं. नव्या पांढऱ्या ड्रेसवर माझा भाऊ खूपच खुश होता. दोन तास तुला इथं खेळायचं आहे , यावर तो अजूनच खुश होता. मग सुरुवातीचा रन अप, एक्सरसाईज सगळं करून मग मॅट वर जाणं ह्याची इतक्या लवकर सवय झाली की एक दिवस सुद्धा सुट्टी आवडायची नाही त्याला. मॅट बघितली की सगळं विसरलं जायचं. स्पर्धांच्या आधी तासनतास केलेली प्रॅक्टिस, वजन कमी जास्त करण्यासाठी घेतलेले कष्ट, आज इतक्या वर्षांनंतरही मला आठवतात. एका वर्षी उन्हाळ्यात आमच्याकडे आंबे आणले नव्हते, कारण माझ्या भावाला वजन कमी करायचं होतं, मग तो आंबा खाणार नाही तर आम्ही त्याच्या समोर कसे खाऊ? हा त्याग नव्हता, आम्ही तुझ्याबरोबर आहोत ही भावना होती. मग एका स्पर्धेच्या आधी परत वजन तेवढंच ठेवण्यासाठी म्हणून तो भाकरी खायचा तर त्याला सोबत म्हणून आई पण त्याच्याबरोबर भाकरी खायची. मग कधी वजन थोडं कमी भरत म्हणून ऐन वेळी खाल्लेली केळी असोत हा सारा खेळाचाच भाग होता.
७, ८वर्षाचा म्हणून त्याला सरावात काही वेगळी सूट सवलत नव्हती. अनेक वेगवेगळ्या वयाची मुलं क्लास मधे होती. सुट्ट्यांमध्ये दहा दहा तास चालणारा सराव मदत करत होता बक्षिस मिळवायला. शहर पातळीवर, मग जिल्हा पातळीवर, त्यानंतर राज्य पातळी मग राष्ट्रीय स्तरावर एकेक नाव गाजत होती. त्यात जेवढा यश ज्युदोकांच होतं, तेवढीच किंवा त्याहून जास्त मेहनत सेन्सेंची होती. नगर सारख्या छोट्या शहरात, जे आजही महानगरपालिका असूनही मोठ्ठ्या खेड्यासारख आहे तिथे २० वर्षांपूर्वी एक आपल्या मातीतला नसलेला खेळ त्यांनी फक्त आणला नाही तर रुजवला, फुलवला. एक दोघांची नावं घेऊन मला उरलेल्यांना विसरायचं नाहीये. शहर, जिल्हा पातळीवर काय हा खेळ खेळणारे कमीच असतात, त्यामुळे बक्षिसं सहज मिळतात, म्हणणाऱ्यांची तोंड बंद झाली जेव्हा राज्य पातळीवर पुण्या-मुंबई, विदर्भ, कोल्हापुरातल्या मुलांना हरवून नगरच्या मुलांनी सुवर्ण पदकांची लय लुट केली. अनेकांना अनेक वर्ष पतियाळाची राष्ट्रीय क्रीडा अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली होती. तेव्हा सुद्धा राष्ट्रीय पदक विजेत्यांना राज्य सरकार कडून फक्त अभिनंदनाचे शब्द ,वृत्तपत्रात फोटो सह नाव एवढंच झळकायचं. त्याच वेळी इतर राज्यांच्या स्पर्धकांना राज्य सरकार कडून आर्थिक मदत देखील करायचे. नगरचे काही ज्युदोका अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत देखील गेले होते.
माझा भावानी जवळपास त्याची दहा वर्ष या खेळासाठी दिली होती, आणि या दहा वर्षात तो खूप जागा फिरला, खूप नवीन शिकला, आपल्याला फक्त जिंकण्यासाठी खेळायचं असतं. आणि त्यासाठी सगळं पणाला लावायची तयारी ठेवायची असते. एका राष्ट्रीय स्पर्धेच्या आधी भावाला पायाला जखम झाली होती, स्पर्धेला तर तो जाणारच होता, पण आईनी त्याला सांगूनही त्यानी मॅच जिंकण्यासाठी त्या पायाचाच वापर केला. पदक जिंकलं, पण त्यापुढचे दहा दिवस ड्रेसिंग ही करून घेतलं. अशा एक ना अनेक आठवणी आहेत. ज्युदो हा त्याच्यासाठी फक्त एक खेळ नव्हता, त्याचं पहिलं प्रेम होतं ते. त्यामुळे अगदी आयर्लंड मध्ये जाऊन सुद्धा त्यानी संधी मिळताच खेळून घेतलं.खेळाची परंपरा नसलेल्या घरातल्या अनेकांना या खेळानी तेव्हा झपाटून टाकलं होतं. तेव्हा त्यात मुलगा, मुलगी असा भेदभाव नव्हता. माझ्या आठवणीतली अनेक घर या खेळानी बांधली गेली होती. अनेक भावा बहिणींच्या जोड्या तेव्हा प्रसिद्ध होत्या. मुलगी म्हणून कमी प्रॅक्टीस असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळेच या खेळानी अनेकांना नोकरी, छोकरी सुद्धा मिळवून दिली. काहींना शिवछत्रपती सुद्धा मिळवून दिला.
कोणताही खेळ हा एकट्याचा नसतो, तो खेळ खेळत असताना एक अख्खं घर त्याच्यामागे उभं असतं. त्या खेळाडूच्या डोळ्यात फुललेलं, फुलवलेलं स्वप्न कधी त्याच्या आई वडिलांचं, मार्गदर्शकाचं असतं, जे नंतर त्याचं होऊन जातं. दुसऱ्या गावात स्पर्धा असताना मुलांना, मुलींना सोबत म्हणून अनेक पालक जायचे, आणि मग त्या स्पर्धेच्या काळात ते सोबतच्या साऱ्याच मुली मुलांचे पालक होऊन जायचे. फक्त आपल्या मुलाचा विचार न करता, त्याच्या सोबत खेळणाऱ्या इतर मुलांची काळजी घेणं, त्याचं तात्पुरतं पालकत्व निभावणं तेव्हा अनेकांकडून अगदी सहज झालं होतं, आणि त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही खेळ सुटला तरी या जुन्या ओळखी, मैत्र, तुटलेले नाहीत. मला आजही आठवतंय आम्ही दिल्ली मध्ये फिरता असताना असाच एक जण अचानक रस्त्यात भेटला आणि माझ्या आईला बघून त्यानी काकू तुम्ही इथं मारलेली उडी त्या तात्पुरत्या पालकत्वातून आलेली होती. आजही आईचे फेसबुकवरचे फोटो पाहून अनेकांच्या त्या जुन्या आठवणी ताज्या होतात.

खूप नावं, आठवणी आहेत, लिहिण्यासारखं खूप आहे. पण दंगल बघताना मला आठवली ती खेळाडू तयार होण्यातली मेहनत. एका रात्रीतून हिरो तयार होत नसतात. हिरो तयार होत असताना अनेक जण कारण ठरत असतात. खेळ म्हणजे फक्त क्रिकेट, हॉकी यापेक्षाही वेगळे असतात, मुलगा मुलगी असे भेदभाव न करता तयार झालेले अनेक ज्यूदोपटू, जुळलेले मित्र मैत्रिणी, कुटुंब. राष्ट्रीय स्तरापर्यंत जिंकलेली पदकं, सर्टिफिकेट आजही कित्येकांच्या घरात आहेत. ती आहेत तोवर सगळ्यांना आठवण करून देत राहतील त्यांनी जगलेल्या त्या वर्षांची. अशा छोट्या गावांमधल्या अनेक जणांच्या प्रवासाची गोष्ट असू शकते दंगल. दंगल चित्रपटा मधले काही प्रसंग, NSA मधल्या प्रशिक्षकाचं केलेलं चित्रण मला व्यक्तिशः आवडलं नसलं तरी स्वप्नांचा प्रवास हा नेहेमीच सुरेख असतो. आणि जेव्हा तो चाकोरी मोडून मिळवलेल्या यशाचा असतो तेव्हा कुठेतरी डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असतो.  


No comments:

Post a Comment