हा घ्या तुमचा चहा , असं म्हणत बायकोनी आदळून
जेव्हा चहाचा कप समोर ठेवला तेव्हा त्याला कळलं की पारा अगदी वर गेलाय.
आता यात चिडण्यासारखं काय आहे , त्यानी बोलून
आगीत अजून तेल ओतलं.
मग त्यावर परत काही पुटपुटते वाग्बाण त्याच्या
कानावर पडत होते. पण चहा पिता पिता त्याचे कान बंद होत असल्यामुळे त्याला ते काहीच
ऐकू आले नाही. पण त्याला अजूनही कळत नव्हतं हिचं बिनसलंय तरी काय? शनिवारी निवांत
पांघरूण ओढून झोपावं, सकाळी पेपर चाळत गरम पोहे खात चहाचे किमान दोन कप तरी रिचवावेत,
ते सगळं सोडून हिच सकाळी उठल्यापासूनआवरा आवरा सुरु झालं होतं. मग काय याचा एक बाण
तर दोन बाण, दोनदा तीनदा वाकयुद्ध झालं. मग आंघोळीवरून परत कटकट. तिचा मात्र
तोंडाबरोबर हात ही चालत होते, काय सुरेख वास घरभर पसरला होता. कशाचा वास असावा तो
अंदाज लावत असताना काही तरी पड झड झाली आणि परत तिची चिडचिड सुरु झाली. त्याला
खरंच कळत नव्हतं घर आवरायची काय गरज? मग जरा लक्ष वळवण्यासाठी त्यानी फोन हातात
घेतला तेव्हा १०० हून जास्त मेसेज बघून अंदाज आला आज काहीतरी विशेष दिन असावा
बहुतेक.
सकाळी सकाळी त्यांनी फोन असा हातात घेतला की
पुढचे दोन तास हा व्हाटस अप, फेसबुक यावर वेळ घालवणार हे सांगायला तिला ज्योतिषाची
गरज नव्हती. त्यामुळे तिनी बाहेर येऊन परत तो कसा काहीही कामा करत नाही, पोरानी
सुनेनी तो स्मार्ट फोन घेऊन दिल्यापासून तो कसा सतत त्याच्यावरच वेळ घालवतो, हे आजवर
हज्जारदा सांगितलेलं हज्जार एकदा सांगितलं. अशावेळी तो सोयीस्कर कान बंद करून
घ्यायचा म्हणजे श्रवणयंत्रच काढून ठेवायचा, ते बघून तर तिनी शेवटी सांगितलं आज मी
बोलणारच नाही तेव्हा मात्र त्याला जरा
काहीतरी वाटलं.
मग अगदी शहाण्या बाळासारखं वागून अंघोळ करून,
देव पूजा करून तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला
आज सूनबाईंचा संक्रातीचा सण करायचा आहे ना.
कशाला सगळ घरी करायचा घाट घातलास. चांगलं बाहेर जेवलो असतो, आणि मग सगळे जण त्यांच्या
घरी गेले असते, आपण आपल्या घरी आलो असतो, जे काही द्यायचं घ्यायचं तिथंच करून
टाकलं असतं, उगाच तू कशाला दमून घेतेस.
त्यांनी अगदी समजावणीच्या स्वरात तिला
विचारलं.
घरी स्वतःच्या हातानी गुळपोळी करून लेकाला
खायला घालण्यात वेगळच आनंद असतो हो. थोडं दमायला होईल पण आपल्या माणसासाठी करण्यातला
आनंद हि मिळेल. मी बाहेर सगळं नेउन ठेवलं
आहे बघा जरा., तुमच्या लाडक्या सुनबाईना आवडेल ना ते.
एकुलत्या एका मुलगा सुनेला त्यांनी स्वतःहूनच
सांगितलं होतं, तुमचं ऑफिस आणि हे घर खूपच लांब पडेल तुम्ही कामाच्या जवळच एखादं
घर बघून राहा. त्यात कोणताही राग भांडण नव्हतं, फक्त सोय होती. तसेही ते दोघेही
अजून धडधाकट होते, त्यांच्या त्यांच्या व्यापात होते, उद्या मूल झालं, त्याला
सांभाळायची गरज पडली तर तेव्हा बघून घेऊ हा सगळ विचार होता. जवळ राहून रोज तोंडाला
तोंड लावून आपटबार उडवण्यापेक्षा लांब राहून रोषणाई केलेली परवडली सगळ्यानाच पटलं
होतं ते. लग्नाच्या आधीपासून सून घरी यायची त्यामुळे अवघडलेपण असं कोणातच नव्हतं.
आई आणि बायको च्या मध्ये पोराला आपल्यासारखा त्रास
होऊ नये अशी त्याची मनोमन इच्छा होती, म्हणून त्यानी हा लांब राहायचा त्याचा प्लन
पहिले बायकोच्या आणि मग पोराच्या सुनेच्या गळी उतरवला होता. सुनेसाठी तिनी काळ्या साडी
ऐवजी सुरेख कुर्ता ठेवला होता, आणि हलव्याच्या दागिन्याऐवजी हलके साधे मोत्याचे
दागिने ठेवले होते.
अग हे ग काय?
काळानुसार बदलायला नको का? माझ्या समाधानासाठी घालेल ही कदाचित ती ते
हलव्याचे दागिने, फोटो पुरती नेसेल ही काळी साडी पण ते काहीही मनापासून नसेल, मग
काय अर्थ राहील त्या सगळ्याचा.
त्याला बायकोच्या समजूतदारपणाचं खरं कौतुक
वाटलं. तिच्या या हौशी मौजी कधी झाल्याच नव्हत्या, त्याच्या आईनी त्यांच्या लग्नातला
कसलासा मानपान डोक्यात ठेवून तिला आयुष्यभर छळलं होतं, कोणत्याही सणाला गोडाच्या
आधी भांडणाचा एक घास तिच्या तोंडात पडलाच होता, तिनी तेव्हा त्याबद्दल त्याच्याकडे
तक्रार, चिडचिड, भांडण सगळ करून झालं होतं, पण तो या कानांनी ऐकून त्या कानानी
सोडून देतो कळल्यावर तिनी ते सांगायचं पण सोडून दिलं. नंतर त्या सगळ्याचं काहीच
वाटेनासं झालं आणि लक्षात आलं अपेक्षा ठेवल्याच नाही की दुःख पण कमी होतं.
सून मुलगा तिचे आई वडील, अजून एक दोन चार
नातेवाईक आले, जेवणं झाली मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरु होणार तेवढ्यात तो जरा
आत गेला. तिच्या कपाळावर परत आठी पडली. आताच याला आत जायची काही गरज होती का.
एक पिशवी घेऊन आला, आणि म्हणाला, जरा थांबतेस
आधी हे घे. आणि हळदी कुंकवाचं बोट लावून तिच्या हातात दिलं.
आत हे काय नवीन म्हणत तिनी पिशवी उघडून
बघितली , अय्या चंद्रकळा, कोणासाठी?
गेली तीस वर्ष सोबत आहोत आपण, माझ्या आई मुळे
तुझी कोणतीही हौस मौज नीटशी करू शकलो नव्हतो, लग्ना नंतर कधी तरी तू विचारलं होतंस
तुमच्याकडे काळ्या रंगाचे घालतात का? मला तेव्हा त्याचा संदर्भ काहीच कळला नव्हता,
मग नंतर हळू हळू गोष्टी कळायला लागल्या, पहिल्या संक्रांतीच्या दिवशी तुला नक्की काळी
साडी घेऊन द्यायची असं ठरवलं होतं, पण त्याच दिवशी घरात कशावरून तरी वाद भांडणं
झाली आणि त्या रागाच्या भरात ते सारं विसरून गेलो, आणि मग ते तसंच राहिलं. विचार
केला, मुलाच्या लग्नानंतर आपलंही आयुष्य नव्यानं सुरु झालंच ना, म्हणजे ही तशीच आपली
पण पहिली संक्रांत. मग तेव्हा जे जमलं नाही ते आत्ता करावं.
भरल्या डोळ्यांनी तिनी ती साडी तेव्हाच नेसली
आणि सुनेचा सण केला.
हलव्याचे काटे जिभेला बोचत नाहीत, आणि
तोंडावर विरघळतात, नवरा बायकोमध्येही असंच तर असतं ना, सकाळचं भांडण संध्याकाळी
शिळ झालं असतं, आणि रात्री झोप येत नाही म्हणणाऱ्या बायकोच्या पायाला लावलेलं तेल
सकाळी उडून गेलेलं असतं. तिळगुळ देऊन गोड बोला असं बोलायची गरज पडत नाही बहुदा
काही वर्षानंतरच्या सहवासानंतर!
No comments:
Post a Comment