Tuesday, February 14, 2017

प्रेमानी जुळलेली नाळ

सुमारे १९५१ च्या वेळेसची गोष्ट आहे. नव्या आलेल्या सून बाईंना सासू बाईनी पोळ्या करायला सांगितल्या होत्या आणि त्या बाहेर गेल्या होत्या. दुसऱ्या मुलखातून आलेली पोरगी, त्या काळी शाळेत जाऊन इंग्रजी शिकलेली वगैरे, पुस्तक वाचायची माहिती, स्वैपाक घरात मात्र जेमतेम कधी तरी पाउल टाकलेलं. भात करता यायचा, पण पहिल्याच दिवशी पोळ्या करायला सांगितल्या, पार दांडी उडली होती. परातीत आधी पाणी घालायचं की पीठ हे ही माहित नव्हतं. घर, घरातली माणसंच काय आजूबाजूची भाषा सुद्धा ओळखीची नव्हती. काय करायचं कसं करायचं काहीच सुचत नव्हतं. फक्त रडू कोसळत होतं. सगळा पसारा मांडून मग ती नवी सून रडत बसली होती. थोड्या वेळानी सासू बाई आल्या आणि सून बाईना अशा रडताना पाहून म्हणाल्या ,सुनबाई काय झालं. रडत रडत सून बाईनी सांगितलं मला पोळ्या कशा करतात माहित नाही. रडणाऱ्या सून बाईंना थोपटत सासूबाई म्हणाल्या, अहो एवढच ना. मग रडता कशाला सांगायचं आम्हाला. आता आम्ही शिकवू हो तुम्हाला पोळ्या करायला. सून बाईंची कळी खुलली आणि त्यांनी सासू बाईंकडून फक्त साध्या पोळ्याच नाही तर पुरण पोळ्या सुद्धा इतक्या सहज शिकून घेतल्या की खाणारा त्याची चव कधी विसरू शकायचा नाही. अहो जाहो म्हणल्यावर अंतर वाटतं असंच नसतं तर ते एकमेकांना आदर देणं असतं, एकमेकांच्या चुकांवर हसण्यापेक्षा त्यांना मदत करणं हा एखाद्या नात्याचा सुंदर पाया असू शकतो हे मी माझ्याच घरात पाहीलं. १९व्या वर्षी लग्न होऊनही ( त्या काळात घोडनवरीच) स्वैपाक न येणाऱ्या माझ्या आजीला तिच्या सासूनी एक नवा माणूस म्हणून घडवलं की आज ती गेल्यानंतरही गावात कोणाच्या ना कोणाच्या घरात , सहज म्हणून, कारणासाठी म्हणून आजीची आठवण नक्कीच निघत असते.

ज्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा नवा प्रघात सुरु झाला आहे त्याच दिवशी आजीचा वाढदिवस असणं हा नक्कीच फक्त एक योगायोग नव्हता. कर्नाटकातून एक दिवस लग्न करून पुण्या जवळच्या एका खेड्यात आली, खेडच ते फक्त फरक एवढाच होता की त्या गावातून रेल्वे लाईन जायची. मराठी बोलता यायचं पण ते ही तोडकं मोडकं, कन्नड मात्र अस्खलित लिहिता वाचता बोलता यायचं. इंग्रजीची देखील ओळख होती, पण आता एक वेगळी भाषा समोर येऊन ठाकली होती. पण तिनी ती भाषाच नाही तर ते गाव तिथली माणसं इतकी सहज आपलीशी केली की जणू ती त्याच मातीत जन्माला आली होती.

आजी म्हणल्यावर ज्या अनेक गोष्टी आठवतात त्यातली एक गोष्ट म्हणजे विष्णू सहस्त्रनाम, गावातल्या विठोबाच्या देवळात सेवा करता करता ती कधी विष्णुदास झाली होती तिलाच कळल नव्हतं. गीतेचे अठरा अध्याय, विष्णू सहस्त्रनाम, तुकोबांचे अभंग तिच्या तोंडी सहज असायचे. ज्ञानेश्वरी, भागवताची किती पारायणं केली होती याची काही गणतीच नव्हती. मी तिला कधीच शांत निवांत बसलेलं पाहील नाही अर्थात शेवटचे दोन वर्ष जेव्हा ती अंथरुणाला खिळून होती तेव्हाचे सोडून. सतत कोणता तरी श्लोक, अभंग, नाहीतर किमान नामस्मरण तर सुरूच असायचं, बसल्या बसल्या फुलवाती तर कर, गजरे, हार गुंफत बस, वृत्तपत्र वाच, नवीन पुस्तक वाच, कोणाला तरी काहीतरी नवीन शिकव, एक ना अनेक गोष्टी पण ती सतत स्वतःला गुंतवून ठेवायची. देवळामध्ये बसून काकडा करताना , किंवा सहज दर्शनाला जाऊन रोजचे अभंग श्लोक म्हणताना ती अगदी तल्लीन होऊन जायची. देऊळ हे काही फक्त तिच्यासाठी देव दर्शन नव्हतं, तिथं येणाऱ्या प्रत्येकाशी दोन वाक्य तरी बोलून प्रत्त्येकाची संवादाची गरज भागवायची. एखाद्या सासुरवाशिणीला मायेनी आईचा आधार द्यायची, कोणाला धीर, कोणाला उमेद, कोणाला प्रेरणा साध्या शब्दातून ती अवघड, अगम्य गोष्टी साध्या करून सांगायची.  त्यामुळेच आजी म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर देवाच्या गाभाऱ्यात शांत तेवणारी समईच डोळ्यासमोर येते.

आजीला वाचनाची दांडगी हौस होती, कोणताही विषय तिच्या वाचनात वर्ज्य नसायचा. माझ्या मामा कडचं पुस्तकाचं वेड हे आजीकडूनच मिळालेलं बाळकडू होतं. नवीन पुस्तक हातात आलं की कधी संपेल याची इतकी घाई असायची की मग त्या वेळी घरात फक्त भात आमटी किंवा खिचडीचा स्वैपाक व्हायचा. आजोबांचं पुस्तकांशी वाकडं नव्हतं, पण त्यांना इतकं पुस्तकांच्या आहारी गेलेलं आवडायचं नाही, त्यामुळे त्यामुळे वादावादी व्हायची पण अशा वेळी आजीला ते काही ऐकूच यायचं नाही. वृत्तपत्र वाचून तिची स्वतःची अशी ठाम मत होती. पूर्वीची कॉग्रेसवासी असलेली आजी हळू हळू जनसंघ मग भाजपा कडे सरकली. पण तरीही कोणी चुकीचे वागतंय दिसलं तर तितकीच बोलूनही दाखवायची. राजकीय पक्षांवर आंधळं प्रेम तिनी कधीच केलं नव्हतं, पण राजकारणाचा अनुभव घ्यावा म्हणून ती एकदा चक्क नगरपालिकेच्या निवडणुकांना देखील उभी राहिली होती, पण नंतर त्या विषयावर कधी विचारलंच तर जाऊ दे गं कधी कधी थोडा वेडेपणा करायचा असतो, सारखं काय शहाण्या सारखं वागायचं.

आजीच्या आठवेन तितक्या आठवणी आहेत, वृत्तपत्र वाचून माझं मत विचारणारी आजी, मी काय लिहिते ते वाचून कधी कधी हे कसं सुचतं विचारणार, एखाद्या ज्वलंत प्रश्नांवर मला काय वाटतं ते विचारणारी, मऊसुत पुरणपोळ्या शिकवणारी, केसांना तेल पाणी करते म्हणत जवळ बसवून घेत तेलानी पार माखून टाकणारी, कधी कधी जुन्या विचारांची भासणारी, भावाला भेटून लहान मुलीसारखी खुश होणारी, कोणतीही साडी कोणत्याही ब्लाऊज वर घालून मला म्हातारीला कोण बघतंय म्हणणारी, होत नसतानाही हौस भागवायची म्हणून पतवंडाला न्हाऊ माखू घालणारी, वय साथ देत नसतानाही जावयासाठी म्हणून अधिक मासाची तयारी करणारी, नवीन मालिका अगदी आवडीनी बघणारी, कोणतीही नवीन गोष्ट करून तरी बघू म्हणणारी, आजी माझी आजी. तिला विमानात बसायची खूप इच्छा होती, मग तिच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाला मी तिला भेट म्हणून विमानाचं तिकीट दिलं होतं. ज्या प्रवासाला तिला १८, २० तास लागायचे तो प्रवास दीड तासात संपला, त्यामुळे उतरताना ती म्हणायची बस संपला पण इतक्यात. मग पुढचे काही दिवस तो छोटासा विमान प्रवास तिच्या सगळ्या गप्पांचा केंद्र बिंदू होता. वय वाढता वाढता तिच्यातली लहान मुलगी अजून जास्त उफाळून वर येताना दिसत होती. शेवटच्या भेटीत ती जेव्हा गाऊन घालून होती तेव्हा मला बघून म्हणाली बघ हे घालायचं राहिलं होतं, आता ते ही घालून पाहिलं.

आज आजी जिवंत असती तर ८५ वर्षांची तरुणी असती. आजीच्या आठवणी हाच एक आयुष्याचा खास ठेवा असतो, तिनी सांगितलेल्या गोष्टी आयुष्यभर पुरवून पुरवून वापरताना तिचं आपल्या आयुष्यात असणं हे देखील सुखावणारं असतं. ती सासू म्हणून आई म्हणून वेगळी असू शकते, चुकू शकते पण आजी बनताना मात्र ती मेणाहून मऊ झालेली होती. वडिलांच्या आईपेक्षा काकणभर माया आईच्या आई वर जास्त असते कारण कुठे तरी नाळेची नाळ जुडलेली असते किमान माझ्या बाबतीत तर असंच होतं ! आजीचं गोष्टी ऐकणं, सांगणं हा देखील एक आनंदच असतो. त्या गोष्टीबरोबर आपण आजचं आयुष्य ताडून बघत असतो, भूतकाळात डोकावणं म्हणजे एक प्रकारे ते परत जगून घेणंच असतं ना. मुलीची मुलगी म्हणून एक खास नातं आधीच तयार झालेलं होतं, असं म्हणतात काही खास अनुवांशिक जनुक ही आईकडून फक्त लेकीला जातात, मला कायम कौतुक वाटायचं आजीच्या सहज कोणतही मिसळून जायचं, स्वतःला विसरून घेऊन  इतरांसाठी काही करण्याचं, जे मी माझ्या आई मध्ये देखील पाहिलं आयुष्यात मी मागितलेलं काही मिळणार असेल तर मला आजीला आजी बनवणारी ती खास जनुक हवी आहेत. कोणत्याही परिस्थितीत समाधान शोधणारी, स्वतःचे आनंदाचे क्षण स्वतः निर्माण करायचे असतात, त्यासाठी कोणावर अवलंबून राहायचं नसतं सांगणारी, सर्वांवर प्रेम करता करता काहींवर थोडं जास्त प्रेम करणारी, माणूस परिपूर्ण कधीच नसतो, तो ही चुकतो, देवच चुकतो तर आपली माणसांची काय बात असं सांगत चुका करण्याचा अधिकार देणारी आजी, माझी आजी !

मला खात्री आहे स्वर्ग वगैरे काही असेलच तर तिथे जाऊन ती तिच्या आवडत्या लेखकांना नक्की भेटली असेल, त्यांनी तिथेही काही नवीन लिहिलं असेल तर त्याचा फडशा तिनी कधीच पाडला असेल. नवीन विद्यार्थी शोधून त्यांना गीतेचे अध्याय, विष्णू सहस्त्रनाम शिकवत असेल. मऊसुत पुरणपोळ्या, खमंग बेसनाच्या लाडवांची कृती कोणाला तरी सांगत असेल, एखाद्या हळव्या जीवाला आधार देत असेल. आणि जर स्वर्ग नसेल तर जिथे कुठे जाईल तिथे ती नवा स्वर्ग तयार करत असेल. प्रेम दिवसाच्या दिवशी जन्मलेल्या माणसाकडून अजून दुसरी काय अपेक्षा करता येईल कारण प्रेम चिरायूच असतं.      

No comments:

Post a Comment