Saturday, August 5, 2017

'प्रेमाचा भाऊ'

नुकतीच त्या सगळ्यांना शिंग फुटली होती, म्हणजे घरचे, दाराचे, शिक्षक सगळेच तसे म्हणायचे.आरशात त्यांना कधी ती शिंग दिसली नव्हती, पण काही झालं की सगळे हे वाक्य नक्की म्हणायचे. दहावी पास होऊन अकरावी सुरु झाली होती, रोजच्या युनिफॉर्म मधून सुटका झाली होती. शाळेच्या शिस्तीतून मोकाट सुटलेले वळू आहात अस केमिस्ट्रीचे सर म्हणायचे. तशी तेव्हा शहर गावं देखील अजून जास्त हिरवी होती. फोन हातात नाही तर फक्त घरात असायचे. फोटो काढून घेण्यासाठी सगळे जण स्टुडीओ मध्ये जायचे, नाहीतर रिळाच्या कॅमेरानी ३६ किंवा ३७ फोटो काढून ते नंतर धुवून घेऊन बघायचे. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचं अप्रूप होतं. त्यामुळे शाळेतून कॉलेज मधे जाणं म्हणजे एक प्रकारे रंगीत कपडे, थोडी फॅशन कार्याला परवानगी, कॅन्टीन मध्ये खाण्याची मुभा, मुलांशी बोललं तर हरकत घेतली जात नव्हती, किमान छोट्या शहरांमध्ये तरी.
या आधी एखाद्या मुलानी मुलीशी बोलणं म्हणजे त्यांचं नक्कीच काहीतरी अफेअर असणार असं वाटायचं.  कॉलेजमध्ये फिजिक्स केमिस्ट्री चे एकत्र प्रॅक्टिकल्स करताना त्यांच्याशी बोलणं व्हायचं पण  तरीही एक अंतर ठेवूनच सगळं काही चालायचं. अकरावी सुरु होऊन जेमतेम काही दिवस झाले असतील नसतील की फ्रेन्डशिप डे का काय तो आला होता. शाळेमध्ये असेपर्यंत हे फॅड फक्त टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्येच असतं असं वाटायचं म्हणजे मैत्री आहेच मग ती काय फक्त अशी बँड देऊन दाखवायची असं वाटायचं मुळात प्रश्न असायचा हे बँड विकत आणायला घरून ऐसे मिळतील का म्हणून , मग लोकर घेऊन त्याचे घरीच बँड तयार करून अकरावीचा प्रश्न तर संपला होता. मुलींच्या शाळेतल्या तिला अजूनही मुलांच्या हातावर राखीच बांधतात एवढाच माहीत होतं. त्यामुळे तिनी वर्गातल्या तमाम मुलींना फ्रेन्डशिप बँड बांधले पण एकाही मुलाकडे साधं वर करून बघितलं नाही. तशी ती जरा आगाव म्हणूनच ओळखली जायची. कधी कोणाला काय बोलेल याचा कोणालाच नेम नव्हता, भीडभाड न बाळगता  तोंडावर बोलून मोकळी होणारी, शाळेत जरा तरी सुत होती, कॉलेज मधून जाऊन अगदी भूत झाली होती. मुलीच काय मुलं पण घाबरायची.
अशातच कधी तरी तिला जाणवलं तो पिंगट डोळ्याचा मुलगा सारख तिच्याकडे बघायचा. म्हणजे तो वर्गातला अगदीच पपलू. आहे काय आणि नाही काय कॅटेगरी मधला. तिच्या अगदी विरुद्ध, पण तरीही त्याला ती आवडायची. किती तरी वेळा रस्त्यात तिला तो दिसायचा. तसा त्रास त्याचा काहीच नव्हता, पण तो तिच्या मागे आहे हे तिला जाणवायचं. तोवर हा असा अनुभव कधीच आला नव्हता, म्हणजे ही बया काहीही करू शकते या भीती पायी एकही मुलगा तिच्या कधी वाटेल गेला नव्हता. आणि हा डायरेक्ट लाईन मारत होता. आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणीनी सांगून झालं होतं त्याला तू आवडतेस ग, तुझी खूप छान चित्रं काढतो तो. मग एका मैत्रिणीकडून त्यानी एक मस्तस ग्रीटिंग तिच्या वाढदिवसाला पाठवलं. ग्रीटिंग पेक्षा त्याची हिंमत तिला आवडली होती. पण  तीही तेवढ्यापुरतीच.

तसा तो अगदी निरुपद्रवी जीव होता. म्हणजे उगाच समोर घराच्या आसपास घिरट्या घालायचा नाही की फोन करायचा नाही, पण वर्गात एकटक तिच्याकडे बघत बसायचा. एकदा कि दोनदा त्याच्या काही मित्रांनी तिला वहिनी म्हणून चिडवलं त्यावर तिनी त्यांना थांबवून पार त्यांची आई बहिण काढली बिचारे पुढचा एक आठवडा कॉलेज मध्ये आलेच नव्हते. त्याच्यासारखेच त्याचे मित्र पण अगदी पाप्याचं पितर होते, त्याच्या पिंगट डोळ्यात तिला भित्रा ससा दिसायचा. नेहेमी निळ्या किंवा आकाशी रंगाचे शर्ट, टी शर्ट घालायचा, म्हणून हिनीच त्याला नाव पण ठेवलं होतं निळूभाऊ. मग वर्गात जेव्हा फिशपॉड पडायला सुरुवात झाली तेव्हा मात्र ती वैतागली. कशात नाही काही आणि उगाचच तमाशा. त्यावर्षी त्यानी पण बेट लावली होती तिला फ्रेन्डशिप मागूनच दाखवेन.मुळात फ्रेन्डशिप अशी मागून मिळत नसते पण उगाच स्वतःच पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून अशी जबरदस्ती मागून घेतलेली मैत्री म्हणजे प्रेमप्रकरणाची पहिली सुरुवात समजली जायची. तिला पण कुणकुण लागलीच होती या सगळ्याची.

मग काय ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी ती मुद्दाम कुठेही बाहेर पडली नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या दारातच तिला तो आणि त्याचे मित्र दिसले.  
‘कॅन्टीन मध्ये येशील का जरा बोलायचं आहे.’ अगदी हळू आवाजात त्यानी विचारलं. ती मानेनीच हो म्हणली. कॅन्टीन मध्ये गेल्याबरोबर त्यानी खिशातला फ्रेन्डशिप बँड बाहेर काढला आणि तिला म्हणाला मला फ्रेन्डशिप देशील. 
तिनी खिशातली राखी बाहेर काढली आणि,’ म्हणाली माझा भाऊ होशील?’
प्रसंग मोठा बाका होता, पण एकदम कुठून त्याला सुचलं कोणास ठाऊक,
‘तू राखी म्हणून बांध मी फ्रेन्डशिप बँड समजून बांधून घेईन.’
‘अरे दोन वेगळी नाती आहेत ती.’
‘प्रेम तर आहेच ना दोन्ही नात्यांमध्ये.’
कपाळावर हात मारत ती राखीची पक्की गाठ बांधली, आणि म्हणाली, ‘मैत्री, प्रेम असं काही सांगून होत नसतं, कर म्हणून करून घेता येत नसतं. ते आतून जुळून यावं लागतं. मैत्रीचे बंध आपोपाप जुळले जात असतात. पौगंडावस्थेत आकर्षण जास्त असतं, त्यात प्रेम, मैत्री शोधायची नसते. खर प्रेम मैत्री असेल तर ते आपोआप समोर येते. त्याला कोणत्याही दिवसाची, प्रसंगाची गरज नसते. भावाची मात्र नेहेमीच गरज पडू शकते मुलींना. तू माझा प्रेमाचा भाऊ बर का, तुझ्याच भाषेत सांगायचं झाल तर’
बिचारा खाली मान घालून निघून गेला होता.  नंतर फारसं काही त्याच्याबद्दल ऐकलं नव्हतं तिनी.
आज तिची मुलगी म्हणत होती, ‘ममा मी त्या समोरच्या ध्रुवला फ्रेंडशिप बँड ऐवजी राखी बांधणार आहे, तो सारखा मला त्याची  बेस्ट फ्रेंड म्हणतो, पण मला नाही आवडत तो.’
आपले जिन्स अशी सहजासहजी आपली साथ सोडत नाही हेच खरं.
लेकीच्या निमित्ताने तिला परत आठवला तिचा तो ‘प्रेमाचा भाऊ!’

मानसी होळेहोन्नुर 

No comments:

Post a Comment