Monday, August 21, 2017

आई होते मुलगी माझी....

काही चित्रपट मनात घर करून राहतात, तुम्ही त्यात बुडून जाऊन जगत असता तो चित्रपट. त्यातली पात्र फक्त पात्र राहत नाही, तुम्हीच होऊन जाता. आणि मग कित्येक दिवस उतरत नाही तो सिनेमा तुमच्या मानगुटीवरून. इतका भिनून जातो तो की वागताना बोलताना घुमत असतो डोक्यात. अशीच अॅलीस ठाण मांडून बसली आहे माझ्या डोक्यात. ५० व्या वाढदिवस मुलांसोबत साजरा करणारी, अगदी आपल्यातलीच एक कुणीतरी. भाषाविद्यानाची प्राध्यापक असणारी ही बया अगदी साधं सरळ आयुष्य जगत असते आणि अचानक ती बोलता बोलता शब्द विसरते, मग एकदा रस्ताच विसरते. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष न करता ती जाते डॉक्टरकडे.

काय झालं असू शकेल हिला आपण पण विचार करायला लागतो, आणि मग समोर येऊन उभा राहतो अल्झायमर्स चा काळोखाचा बोगदा. सुरुवातीला नाकारलं तरी आपण हे नाकारू शकत नाही कळल्यावर तिनी स्वीकारलेलं वास्तव. मग सुरु होते तिची स्वतःची एक लढाई . अल्झायमर मुळे आयुष्य थांबत नाही. आपण ते थांबवू शकत नाही हे पटवण्याची धडपड. तिला असलेला आजार हा आनुवंशिक आहे हे कळल्यावर तिच्या तीन मुलांपैकी मोठी मुलगी आणि मुलगा टेस्ट करून घेतात, पण धाकटी मुलगी जी बाकी दोघांपेक्षा वेगळी आहे, बंडखोर आहे ती नाकारते. तिचं म्हणणं, टेस्ट करून काय मिळणार आहे. जेव्हा तिच्या मोठ्या मुलीला शक्यता आहे हा रोग होण्याची तेव्हा हताश झालेली अॅलीस मधली आई जणू ती तिचीच चूक असल्यासारखी माफी मागत राहते. मग हळू हळू ती विसरायला लागते आजूबाजूची माणसं, शब्द. जे तिचे कधी काळी सख्खे सोबती होते. तेच आत तिची साथ सोडत होते. आयुष्यात तिनी स्वतःच स्थान निर्माण केलं होत शब्दांच्या जोरावर पण आता धूसर होत जाते तेच शब्द. एकीकडे हे होत असतानाच तिचा नवरा, मुलं मात्र तिला सांभाळून घेत असतात. तिला एकाच गोष्ट चार चार पाच पाच वेळा सांगत असतात, ते ही न कंटाळता, न वैतागता.

यातला एक प्रसंग कायम माझ्या डोळ्याच्या कडा पाणावतो. अॅलीस तिच्या धाकट्या मुलीच्या लिडीयाच्या खोलीत जाते, आणि तिची खोली आवरता आवरता तिला मुलीची डायरी मिळाली, आणि तिनी ती वाचायला सुरुवात केली, आपण काय करतोय हे कळण्या न कळण्याच्या पलीकडे गेलेली अॅलीस मुलीच्या मनातली खळबळ जाणून घेत होती. त्याच दिवशी ती मुलीला त्या अनुषंगाने काही बोलते, तेव्हा तिची मुलगी चिडून तिला सांगते ती माझी खासगी डायरी आहे, ती तू का वाचलीस? त्यावर भांबावलेली अॅलीस म्हणते मला खरंच माफ कर मला कळत नव्हतं मी काय वाचतीये. मला खरंच कळत नव्हतं मी काय करतीये. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट च्या वेळी अॅलीस लीडीयाला विचारते तिच्या नाटकाचा प्रयोग कधी आहे मी नक्की येईन. आणि ती तिच्या डायरीत त्याची नोंद करून ठेवते. बाकीचे सगळे विरोध करत असतानाही ती म्हणते नाही मी नक्की जाईन.  सगळे निघून गेल्यावर ती म्हणते, लिडीया मी काल काहीतरी केलं ज्यामुळे ती चिडली होतीस इतकंच मला आठवतंय, पण मी काय केलं ते आठवत नाहीये. मला माफ कर, तेव्हा लेक म्हणते माझीच चूक होती, मीच माफी मागते. तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू पुसत ती म्हणते ठीक आहे ग. मला कुठे काय लक्षात राहणार आहे. पण हे बोलतानाही कुठेच अगतिकता तिच्या आवाजात नसते. तिच्यातली आई सतत जागी असते. आणि त्यानंतर लिडियाच्या खोलीत जेव्हा ती परत जाते तेव्हा तिला त्याच डायरीवर no secrets लिहिलेलं दिसतं. लेकीची आई होऊ घातली होती.

अॅलीस अल्झायमर्स शी निगडीत एका परिषदेत स्वतःचे अनुभव मांडते, तेव्हाही ती विसरत असते एकेक अनुभव, तिच्या मुलीचा नाटकातला अभिनय बघताना ती विसरून जाते ती तिचीच मुलगी आहे, स्वतःच्या नातीला पहिल्यांदा घेतानासुद्धा ती विसरली असते तिच्या मुलांचं बालपण, एकेक शब्द विसरत असताना ती विसरत असते तिच्या आठवणी, विझून जात असतं तिच्या डोळ्यातलं चैतन्य. जेव्हा कोणी सांभाळायला नसतं तेव्हा तिची तीच हट्टी बंडखोर लेक लिडिया येते तिची काळजी घ्यायला. तिच्या सोबत रहायला. तेव्हा अॅलीस होऊन गेलेली असते एक बाळ. फक्त प्रेम समजू शकणारं, प्रेम करू शकणारं एक लहान मूल. एक निरागस जीव जो पोहोचला असतो सगळ्या भाव भावनांच्यापुढे. आणि तिला समर्थपणे सांभाळत असते तिची लेक!

हा चित्रपट खूप काही शिकवून जातो, एकीकडे हे आई लेकीचं तरल नातं तर दुसरीकडे स्वतःच्या असाध्य रोगाशी लढण्याची दुर्दम्य इच्छा. अॅलीस जेव्हा आजारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असते तेव्हाच इतरांना आपलं ओझं होऊ नये म्हणून आत्महत्या करण्याचा व्हिडीओ करून ठेव स्वतःसाठीच पण भविष्यासाठी. ही लढाई जिंकू शकत नाही हे माहित असूनही तिची लढण्याची जिद्द कुठतरी आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन घाबरून जातो , निराश होऊन जातो याची जाणीव करून देते. अॅलीस तिच्या भाषणात सांगते, मी हरवतीये रोज काही आठवणी, माझं आयुष्य. माझी एकाच इच्छा आहे भविष्यात माझी मुलं किंवा त्यांची मुलं यांच्यावर येऊ नये ही वेळ. या आजारपणामुळे मी शिकतीये क्षणांमधली मजा लुटायला शेवटी आयुष्य काय क्षणांचेच तर आहे. स्वतःला होणारा त्रास मुलांना होऊ नये म्हणून विचार करणारी ही आई खरंच मनात घर करते.!!!   

मानसी होळेहोन्नुर


Still Alis:  https://en.wikipedia.org/wiki/Still_Alice

No comments:

Post a Comment