Sunday, September 10, 2017

काकूची पुतणी की ... ???

ते घर तसं नेहेमीचं होतं, पण तरीही त्या दिवशी त्या घरी जाताना उगाचच भीती वाटत होती. आज जे काही बोलणं होईल त्यामुळे सगळी नाती बदलतील, आणि माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा. आज मी काही एकटी नव्हते, सोबत आई बाबा पण होते. गेली तीन चार वर्ष मी या घराच्या पायऱ्या चढत आहे, तेव्हा कधी वाटलंही नव्हतं, पुढे असं काही होईल...
चैतन्यची आणि माझी मैत्री म्हणजे अक्ख्या कॉलेजला पडलेला प्रश्न होता. तो असा चिकणा चुपडा आणि मी जरा मुलांच्यासारखी. नावाला मुलगी पण बाकी सगळं मुलांसारखचं. आणि चैतन्य एकदम पढाकू, घरातला कोणी तरी वाटावा असा गोड. तो कायम पुढच्या बेंचवर, सगळी उत्तरं देणारा, आणी मी धापा टाकत के टी लावत पास होणारी. खरंतर आम्ही चुकूनही एकमेकांच्या वाटेला गेलो नसतो पण ती अंताक्षरी आडवी आली. म्हणजे मी पण नाव दिल आणि त्यानी पण नाव दिलं. आणि ड्रॉ मध्ये आमची दोघांची टीम निघाली. आम्ही दोघांनी एकमेकांकडे शक्य तेवढ्या तुच्छतेने पाहिलं, पण मग बोलता बोलता समजलं दोघेही कच्चे लिंबू नाहीत, म्हणजे मी सी अर्जुन म्हणायच्या आत हा मला त्याचे चित्रपट गाणी सांगायचा, तर मी कोणतं गाणं कोणावर चित्रित झालंय, कोणत्या वर्षी हे त्याला डोळ्याचं पातं लवायच्या आत सांगायचे. अर्थात  अंताक्षरी आम्हीच जिंकली. मग काय संगीताच्या पायावर सुरु झालेली मैत्री पुढे नेण्यासाठी खुप गोष्टी होत्या. ट्रेक, पुस्तकं आणी जोडीला अभ्यास, कोण कोणामुळे बदलत होतं माहीत नाही, पण माझा त्यावर्षीचा निकाल कोणत्याही के टी शिवाय लागला, पण चैतन्य चा पहिला नंबरही हुकला नाही. स्मार्ट अभ्यास करायला शिकवलं होतं त्यानी मला.
मग काय आधी ग्रुप मध्ये असणारे आम्ही हळू हळू दोघं च फिरायला लागलो. we are just friends म्हणत दिवसरात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मात्र फिरत होतो. कॅम्पस सिलेक्शन मधे दोघांना दोन वेगळ्या कंपनी मधे नोकरी मिळाल्यावर मात्र  त्याची ट्यूब पेटली आणि पठ्ठ्यानी मला सरळ सांगितलं आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात आहोत, हे तुला कळेल तेव्हा मला तरी आत्ता कळलंय. आता विचार बिचार करून केस पांढरे करू नकोस, आपण घरी सांगूया, दोन तीन वर्षात लग्न करून मोकळे होऊया. मी टोटल बोल्ड झाले होत्या त्याच्या त्या बॉल वर. मग काय रात्री विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं नेहेमीसारखा या वेळी पण तूच बरोबर. मग ही आजची बैठक ठरली होती. त्याच्या आई बाबांना मी माहित होते, माझ्या आई बाबांना तो माहित होता, पण माझ्या आईबाबांना त्याचे आई बाबा माहित नव्हते. म्हणून ही औपचारिकता.
‘अग आज तरी साडी नेस.एवढा दाखवण्याचा कार्यक्रम ना आज ’
‘आई प्लीज काकूंनी मला इतक्या वेळा बघितलंय आता हे साडी वगैरे काय? आणि हा काही दाखवण्याचा कार्यक्रम नाही, तुमची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणून आज जातोय आपण भेटायला.’
मला आधीच टेन्शन आलं होतं आणि आई ते अजून वाढवत होती. काकूंच्या कडे जायचं म्हणून तिनी मिठाई चे बॉक्स, काहीतरी गिफ्ट काकांसाठी पुस्तक (ते मीच सांगितलं होतं) असं काय काय घेतलं होतं. मला बाबांना हज्जार सूचना दिल्या होत्या, असं बोलू नका, तसं बोलू नका. थांबतच नव्हत्या तिच्या सूचना. शेवटी त्यांच्या घरापाशी गाडी पोहोचली तेव्हा कुठे तिच्या सूचनांची टेप थांबली.
मग घरात शिरताना मला वेगळंच वाटत होतं, म्हणजे उगाचच दडपण वगैरे. पण काका काकू, आई बाबा असे काही गप्पा मारायला लागले जणू काही ते एकमेकांना खूप आधी पासून ओळखतात, म्हणजे तसं झालंही, आत्या, आणि काका एकाच कॉलेज मध्ये होते, काकूंची बहिण पूर्वी आईच्या ब्रँच मध्ये होती. मग काय गप्पांना नुसता उधाण आलं होतं. काकूंनी मला आवडतात म्हणून खास दडपे पोहे केले, होते. काकू नेहेमीच माझे लाड करायच्या, कधी आवडले म्हणून कानातले आण, कधी कुर्ता आण, कधी माझी आवडीची भाजी केली कि खास फोन करून घरी बोलवायच्या. म्हणजे जेव्हा आम्हाला दोघांना माहित नव्हतं, पुढे काय होणार आहे, तेव्हाच काकूंनी सगळं ओळखलं होतं.
‘काकू नेहेमीसारखे मस्त झालेत दडपे पोहे.’
‘अग काकू काय म्हणतेस, म्हणजे एवढे दिवस ठीक होतं, पण आता आई म्हणायची सवय कर  बर का?’ माझ्या आईनी मला सांगितलेल्या सुचनांमधली महत्वाची सूचना मी विसरल्याची आठवण करून देत डोळे मोठे करत मला सांगितलं.
‘अग आई आता हे काय नवीन? गेली चार पाच वर्ष मी काकूंना काकू म्हणतीये, आता एकदम आई?’ आईनी मोट्ठे केलेलं डोळे अजूनही मोट्ठेच होते. पण तरीही मला काही पटत नव्हतं, शेवटी काकूच मदतीला धावून आल्या.
‘राहू द्यात हो, कितीही केलं तरी मी काही आईची जागा घेऊ शकणार नाही, मग उगाच कशाला नाटक करायचं. मुळात शब्दांमध्ये काय आहे, तुमची लेक एक व्यक्ती म्हणून माझा आदर करते, मला समजून घेते, माझ्या घरात सहज सामावून जाते. गेल्या चार वर्षांपासून बघतीये ना मी. मध्ये एकदा मला बरं नव्हतं, तर स्वैपाक करून गेली. छोट्या छोट्या गोष्टीतून ती आपलेपण दाखवते, मग आई या नावाची मी सक्ती का करू तिच्यावर? माझा लेक पटकन म्हणेल का तुम्हाला आई, मग तीच अपेक्षा मी सुनेकडून का करावी?’
काकू मला नेहेमीच आवडायच्या. म्हणजे त्या स्पष्ट बोलायच्या, न आवडलेली गोष्ट देखील शांतपणे सांगायच्या. आणि आज तर त्यांनी मला अवघड वाटणारा प्रश्न इतका सहज सोडवला होता की मी पटकन त्यांचा हात हातात घेतला, आणि म्हणलं,
‘हुश्श काकू केवढा मोठ्ठा प्रश्न सोडवला तुम्ही, आता मी खास तुमच्यासाठी म्हणून वेलची वाली कॉफी करते.’

आत जाणाऱ्या पाठमोऱ्या मला काकूंचं बोलणं अस्पष्ट ऐकू येत होतं, कोणतीही गोष्ट लादली की त्याचा त्रास होता, तिनी मनापासून मला अहो आई ऐवजी ए आई हाक मारली तर आवडणारच आहे, पण ए आई म्हणताना आईवर गाजवणारा हक्क तिनी माझ्यावर गाजवला तर माझ्यातल्या सासूला कितपत आवडेल माहीत नाही, त्यापेक्षा हे काकूच बरं. कोणत्याही अपेक्षांच्या लेबलाशिवाय!   

No comments:

Post a Comment