Thursday, September 21, 2017

पिवळा चाफा...

ती मला साधारण रोज भेटते, एखाद दिवशी ती दिसली नाही तिचा आवाज ऐकला नाही तर मला चुकचुकल्या सारखे होते. सकाळी 8 च्या सुमारास तिच्या गाडीचा, तिचा किंवा तिच्या मुलांचा आवाज ऐकून आम्ही सगळे हुश्श करतो. वेळेत एक पाच दहा मिनिटांचा फरक पडला तर आम्ही इगाच बाहेर येरझाऱ्या घालत बसतो, किंवा उगाचच गाडीच्या आवाजाचा कानोसा घेत बसतो.
ती असेल पन्नाशी आसपास, तसं वाटत नाही तिच्याकडे पाहून पण तीच एकदा बोलता बोलता म्हणाली माझा नातू आहे तुमच्या मुलाच्या वयाचा तेव्हा मी तिच्या वयाचा उगाचच एक अंदाज बांधला. मध्यम चणीची, गव्हाळ रंगाची, ती रोज व्यवस्थित साडी नेसून येते, कुरळ्या केसांची वेणी घातलेली असते, क्वचित त्यावर कधीतरी फुल, साडीवर शर्ट घालून, हातात ग्लोव्हज घालून ती जेव्हा जेव्हा सगळ्यांच्या घरातला कचरा गोळा करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर राग, किळस नसते, तर असते प्रसन्न हसू... 
वर्षाहून जास्त झाले असेल ती तिची मुलं आमच्या भागात कचरा गोळा करण्याचे काम करतात. पण तिचे नाव विचारण्याची गरजच पडली नाही मावशी म्हणून हाक मारणं पुरेसं होत. 
एकदा कधीतरी घरातल्या कचऱ्यातली काचेची बाटली आम्ही वेगळी ठेवली होती आणि मावशींना तसं सांगितलं, तर त्यावर हातावरची पट्टी दाखवत म्हणाल्या तुमच्यासारखा सगळ्यानी विचार केला तरी बरं होईल. हे सगळं बोलताना सुद्धा त्यांच्या आवाजात राग नव्हता, चीड नव्हती, साधी एक माणुसकीची अपेक्षा होती.
एकदा असेच दहा पंधरा दिवस त्या नाही दिसल्या तेव्हा मी त्यांच्या सोबत येणाऱ्या मुलांकडे चौकशी केली, तर ती मुलं म्हणाली ती गांवाला गेलीये, मग मीही फारशा चौकशीच्या फंदात नाही पडले. जवळपास महिन्या भरानी त्या दिसल्या, मग दोन तीन दिवसांनी त्यांना सावकाश विचारलं मावशी कुठे गेला होता दिसला नाहीत? तर हसून म्हणाल्या जरा चारधाम, हरिद्वार हृषीकेश फिरून आले. त्यांच्या पायातल्या स्पोर्ट्स शूज कडे बघत मी म्हणाले, अच्छा पण मग हे शूज कसे काय एकदम, तर म्हणाल्या तिकडे थंडी खूप होती आणि चालायचे होते म्हणून विकत घेतले, खूप सोयीचे आहेत बघा वापरायला. मग मला सांगत होत्या, त्या एका भजनी ग्रुपच्या सदस्य आहेत, तर एका नेत्याने त्यांना सोबत म्हणून नेले होते, अट एकाच की या लोकांनी रोज भजने गायची आणि नाममात्र शुल्का मध्ये सगळं फिरवून आणलं. आधीच हसमुख असलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे तेज झळकत होते.
एकदा कधीतरी कचरा देताना मी सहज म्हणले मावशी आज सण आहे तरी आलात? ताई आम्हाला कसली सुट्टी, एक दिवस सुट्टी घेतली तर दुसऱ्या दिवशी दुप्पट काम पडतं त्यामुळे एक नवरात्री मधल्या अष्टमीची सोडली तर आम्ही शक्यतो सुट्टी नाही घेत. मला त्यांच्या बद्दल वाटणारा आदर अजून वाढला. 
एकदा असंच त्या बोलता बोलता म्हणाल्या ताई दुसरं काम करायला काही हरकत नाही, पण हे काम करून चांगले पैसे मिळतात, आणि त्याशिवाय समाधान मिळते समाजातली घाण दूर करायचं, कोणतं तरी काम करायचं आहे ना मग काय हरकत आहे हे काम करायला? यात कसली लाज बाळगायची?
रोज स्वतः घाणीचा वास सहन करून, त्या घाणीत हात घालून कचरा वेगळा करण्याचं काम करणाऱ्या आमच्या मावशी मला खऱ्या अर्थाने स्वच्छता लक्ष्मी वाटतात.
आमच्या मावशींसाठी पिवळं धम्मक चाफ्याचे फुल!
मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment