Wednesday, December 27, 2017

हाथसे छुके इसे रिश्तोंका इल्जाम तो दो...

मुळात माणसाला खुश राहण्यासाठी काय हवे असते? या वीस अक्षरांचे कोडं ज्याला उलगडलं त्याला कदाचित आयुष्य जास्त कळले असं म्हणता येईल. माणसात राहून एकटी राहणारी माणसे आहेत तशीच एकटेपणात सहवास शोधणारी माणसे आहेत, खाण्यात आनंद शोधणारी माणसे आहेत तिथेच खिलवण्यात आनंद मानणारी लोकं आहेत, पैशात आनंद मोजणाऱ्या माणसांबरोबरच देण्यात आनंद मानणारी माणसे आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्येकाचे आनंद मानण्याचे, शोधण्याचे रस्ते वेगळे आहेत. पण प्रत्येकाचा प्रयत्न आयुष्यात जास्तीत जास्त आनंद सुख मिळवण्याचा असतो एवढे मात्र खरे.
जगात तसे दोनच प्रकार, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. दोघंही मुळातूनच वेगळे. त्यांच्या अपेक्षा वेगळ्या, मार्ग वेगळे. आता या दोन प्रकारांचे लाखो उपप्रकार येतात, आणि मग जग रंगीबेरंगी होऊन जाते. अशाच रंगीबेरंगी जगातले ते दोघं, स्त्री पुरुषांनी एकत्र राहणे ही खरं तर निसर्गाची गरज, मग त्याला लग्नाचं नाव देऊन ती गरज भागवली जाते. एकत्र राहणारे सगळेच एकसारखे नसतात, स्वतःला थोडंफार बदलवून, थोडाफार जुळवून घेऊन गाड ढकलत असतात.
रोजचं सगळ काम सुरूच असतं. बाई माणसाला सुट्टी अशी कधी नसते. सुट्टी असली तर जादाची कामं निघतातच. घरचे दारचे सगळे खुश झाले की तिचाही जीव सुखावतो. काड्या काड्या जमवून बांधलेलं घरट भरलं की तिला समाधान वाटत असतं. अशी समाधानी सुखी बाई ती पण काय बिनसलं होतं तिचं कोणास ठाऊक. 
आजूबाजूला माणसं असताना, सुखाची हक्काची, एका हाकेला धावून येणारे सखे सोबती असताना, जीवाला जीव देणारा सहचर असतानाही, बयाबाईला काहीच नको वाटत होतं. आपलं कोणी नाही, आपण कोणाचे नाही असे जाणवत राहत होतं. हसण्यात जीव नव्हता  आणि रडण्यात रस नव्हता एखाद्या मोठ्या सहज वाहणाऱ्या नदीसमोर अचानक चिंचोळे वळण यावे आणि तिने स्वतःला आक्रसून घ्यावे असे काहीसे झालं होते, मुळात वाहत्या नदीला बंध घातला तर ती काही क्षण वाहणं विसरून जाते आणि नंतर नव्या जोमाने पुढे जाते. नदी स्वतःचा मार्ग शोधते पण माणसांचे काय? तिला कळतंच नव्हतं कशी फोडायची ही कोंडी. आतल्या आत घुसमटणाऱ्या तिला एखाद्या अंधाऱ्या गुहेत हरवून जाऊन,’कोई नही है फिर भी है मुझको ना जाने किसका इंतेजार’ असं उगाच म्हणावस वाटत होतं.
रात्री गादीवर पडल्या पडल्या झोप लागणाऱ्या नशीबवान लोकांपैकी ती होती. पण छे त्यादिवशी झोपही जणू तिच्यापासून लांब लांब पळत होती. मग उगाच नदी, हरवणारे रस्ते, मध्येच रस्ता बंद करणारी गुहा असे काय काय डोळ्यासमोर तरळत होते. जंगलात आपण हरवून गेलोय, बर्फाच्या खाली अडकलोय, खोल दरीत लोंबकळत आहोत उगाच भास आभास लपाछपीचा खेळ खेळत बसले होते. डोळे बंद असूनही झोप नव्हती, आणि शरीर थकले असूनही विश्रांती घेत नव्हते, मनाचे खेळ सुरूच होते.
अचानक गार झुळूक यावी असं वाटलं, गुहेत प्रकाशाची तिरीप दिसली, जंगलात ओळखीची खून सापडली असं काय काय वाटायला लागलं, हात जरा लामाब सरकवला तर तो तिच्या शेजारीच तिच्या केसातून हात फिरवत होता. त्याचा स्पर्श जसजसा खाली झिरपत होता, तसतसा तिचा मार्ग मोकळा होत होता, नदीला परत वाहायचा मार्ग मिळाला होता, थांबलेला रस्ता सुरु झाला होता, हरवलेला प्रकाश परत समोर येऊन उभा राहिला होता.
त्याच्या स्पर्शात ती विरघळून जात होती, जगण्याला नव्याने भेटत होती. स्पर्शाची ताकद नव्याने अनुभवत होती. साधी सहज गोष्ट आयुष्य किती सोप्प करू शकते, त्याचा हात अजूनच स्वतःपाशी लपेटून घेऊन, दुसऱ्या हाताने स्वतःलाच थोपटवून घेऊन ती स्पर्शाच्या दुलईत कधी झोपून गेली तिला कळलंच नाही. त्याक्षणी स्पर्शसुख हीच तिची ख़ुशी होती.वीस अक्षरांचं कोडं तिच्यासाठी तरी सुटलं होतं.  
मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment