Saturday, December 30, 2017

अन्नपुर्णेश्वरी, वसे घरोघरी!

स्वयंपाक ही सरावाची आणि हौसेची गोष्ट असं तिचं ठाम मत होतं. नाही म्हणलं तरी गेली १५, २० वर्ष ती स्वयंपाकघरात लुडबुड करतच होती. घरात आईला बघून कधी तरी काहीतरी करावस वाटायचं, मग हळू हळू शाळेत मैत्रिणीनी त्यांचे स्वयंपाकघरातले कारनामे सांगायला सुरुवात केल्यावर अरे आपल्याकडे सांगायला काहीच नाही या ओशाळवाण्या भावनेतून ती जरा तोऱ्यातच स्वयंपाकघरात शिरली होती. शाळेत असतानाची ही घटना. आता शाळेतलं फारसं काही आठवत नाही, पण त्या दिवसात स्वयंपाकघरात घालून ठेवलेले घोळ मात्र अगदी आठवतात.
रवा आणि मैदा यात खरेतर जमीन आसमानाचा फरक पण तेव्हा कुठे कळत होते ते म्हणून मैद्याचे चिकट उपीट कचऱ्यात गेलं होतं. एकदा घट्ट कणिक मळण्यासाठी आईने थोडे तेल सांगितल्यावर पाण्याऐवजी तेलातच अति घट्ट कणिक मळली होती. मोहन म्हणजे काय कळल्यावर अर्धा पाऊन तास नुसतीच हसत होती, कारण तोवर तिला मोहन किराणा दुकानातून आणलेलं तेल किंवा तूप म्हणजे मोहन असेच वाटत होतं. शिऱ्याची तर वेगळीच गंमत तिने केली होती. रवा शिजल्यावर घालायची साखर तिने आधीच घातली आणि पाकात शिजलेला रवा ताटलीत घालून भावाला खायला दिला होता. कधीतरी मसाल्याची अदलाबदल होऊन चव चांगली यायची पण कोणता मसाला आपण घातला होता हेच ती विसरून जायची. नवीन पदार्थ जन्माला यायचे आणि तसेच हरवून जायचे.
स्वयंपाकघरातल्या या विश्वात ती खरेच हरवून जायची. काहीतरी नवीन करून बघितलं पाहिजे, कोणाकडे खाल्लेला पदार्थ आवडला तर आवर्जून करून बघितला पाहिजे या ध्यासाने नेहेमी काहीना काही करत राहायची. स्वयंपाक या गोष्टीत किती कल्पकता सर्जकता दडली आहे याचं तिला प्रत्यंतर अनेकदा येऊन गेलं होतं. कोणताही माणूस मनासारखं खायला मिळालं की खुश होऊन जातो. खाद्यपदार्थ हे कोणत्याही भाषा, संस्कृती खूप सहज ओलांडतात. त्यांच्यावर कोणतीच बंधनं लागू होत नाहीत. एकाच पद्धतीने केलेल्या पदार्थाची चव माणसागणिक बदलते, साहित्य, कृती तशीच ठेवली तरीही फरक पडतोच, कारण प्रत्येकाची हाताची चव वेगळी असते असं आपण म्हणतो, तिच्या मते ती काही फक्त हाताची चव नसते, तर करणाऱ्याच्या मनातल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात पडत असतं. रागात बनवलेला, आजारी असताना दमलेलं असताना तिचा स्वयंपाक तिलाच वेगळा वाटायचा. आईच्या हातची चव आपल्या हातात काही येणार नाही हे कोणीही सांगायच्या आधीच लक्षात आले होते कारण आजीने केलेली आमटी आणि आईने केलेली आमटी ती एका घासात ओळखायची. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या हाताच्या चवीची नक्कल करण्याऐवजी आपणच आपली चव तयार करावी हे तिने कधीच ठरवलं होतं.
लग्न करून दुसऱ्या घरातली खाद्यसंस्कृती तिची आवड निवड या सगळ्याचा मेळ घालून ती स्वतःची अशी एक चव तयार करू पाहत होती. स्वयंपाकाला असा कितीसा वेळ लागतो म्हणत ओढनीची गाठ घालत, किंवा टी शर्ट च्या बाह्या वर करत ती झटझट सगळं काम आवरून टाकायची. बाकीच्या कामाचा कंटाळा आला तरी स्वयंपाकाचा तिला कधीच कंटाळा यायचा नाही. नंतरचा ओटा आवरून किचन स्वच्छ केल्यावर चला आपण आजचा दिवस सत्कारणी लावला असंच तिला वाटायचं. तिच्या हातचं खाताना कोणी दोन घास जास्त खाल्ले की जणू परीक्षेत ९०% मिळाल्याचा आनंद व्हायचा.( तिच्या वेळी ९०% म्हणजेच खूप होते आताच्या सारखे ९९.९९% खूळ अजून सुरु नव्हतं झालं).
सहज असेच आई वडील राहायला आले दोन दिवस त्या दोघांचे राहणे कधी 4 दिवसांवर जायचं नाही, आणि तिला त्या चार दिवसात त्यांना काय खायला देऊ नि काय नको, असं होऊन जायचं, जणू काही वर्षानुवर्षांचे साचलेलं सारं तिला असं एका झटक्यात देऊन टाकावस वाटायचं. ते आले की जणू रोजच्या स्वयंपाकात एखाद दोन जास्तीच्या पदार्थांची भर हमखास पडायची. यावेळी त्यांना निघतानाही तिने हट्टाने डबा बांधून दिला. पोळी भाजी ,दही भात, दारातल्या अळूच्या पानांच्या वड्या, लोणचं, आणि थोडंसं गोड म्हणून लाडू. सोबत चमचा, हात पुसायला नॅपकिन असे सगळं बांधून तिने आईच्या हातात ठेवलं. रात्री कधीतरी त्यांना फोनवर जेवलात ना, पुरलं ना विचारलं आणि ती परत तिच्या रुटीनला लागली. दुसऱ्या दिवशी वडिलांचा मेसेज आला, ‘ तुझ्या हातात चव आहे अगदी तुझ्या आईसारखी अन्नपूर्णा झाली आहेस. ’ शक्य असतं तर या मेसेजचे मोठे सर्टिफिकेट करून तिने लावलं असतं, इतकी ती खुश झाली होती. आपल्या स्वैपाकाचं कौतुक यापेक्षा ते वडिलांकडून आलेलं कौतुक जास्त मोलाचं होतं. त्यावेळी तिला जेवण गेलंच नाही, त्या मेसेजनेच पोट भरलं होतं. 
तिच्या लग्नात द्यायला म्हणून आईने जेव्हा अन्नपूर्णा विकत घेतली होती तेव्हा तिने आईला, आजीला विचारलं होतं, हि कशासाठी त्यावर आजीने सांगितलं होतं, अन्नपुर्णेश्वरी, वसे घरोघरी! देवघरातल्या त्या पळी घेतलेल्या अन्नपुर्णेची तिने रोज पूजा केली नव्हती, पण घरी आलेल्या कोणालाही उपाशी पाठवलं नव्हतं, अन्नाचा, अन्न तयार करणाऱ्या कृषकाचा नेहेमीच मान ठेवला होता. अन्न वाया घालवले नव्हते, किंवा फेकून दिले नव्हते. अन्न आहे तर आपण आहोत, हि जाणीव कायम मनात जागती ठेवली होती. अन्नपूर्णेची पूजा म्हणजे तरी दुसरे वेगळे काय असते?

No comments:

Post a Comment