Saturday, January 13, 2018

बटाट्याचा शिरा - आठवणींचा पेटारा



काही पदार्थ काही आठवणींशी जोडले गेलेले असतात. 

जवळपास 12,13 वर्षांपूर्वी मी एका घरात भाड्याने राहत होते. खरंतर ते एका बिल्डिंगच आऊट हाऊस होते. माझ्या आयुष्यात मी अनुभवलेलं ते अतिशय सुरेख घर होतं. पहिल्यांदाच मी एकटी राहत होते, स्वतःच्या हाताने रांधून खात होते, त्याचवेळी वन डिश मील चे खूप सारे प्रयोग मी करून बघितले होते, एकाच किंमतीच्या दोन तीन भाज्या एकत्र करून पाव किलो भाजी आणून एक आठवडाभर सहज स्वैपाक होत होता. खूप प्रयोग तेव्हा स्वैपाकघरात आणि मित्र मैत्रिणींवर होत होते. सुरुवातीला एक मैत्रीण सोबत राहायची, मग दोघी मिळून स्वैपाक लवकर आणि चांगला करण्याच्या निरनिराळ्या पध्दती सोडून काढत होतो. 
स्वतःच स्वतःसाठी स्वैपाक करण्यात एक वेगळीच मजा असते, त्यातही अनेकवेळा, दुध जास्त आहे, म्हणून ज्यात त्यात दुध घालून दुधाचे  पदार्थ कर, दुध नाही म्हणून बिनदुधाचे काय पदार्थ करता येईल हा विचार केला जायचा. हाताशी असलेल्या सामानात काय काय करता येईल, हे सगळे मी नव्याने शिकत होते. भातुकली सारखा एवढासा भात पिटुकल्या वाटीत वरण अशी सगळी चंगळ करून घ्यायचे. कित्येक वेळा तर तेव्हा मी लोकांच्या घरी भाज्या घेऊन जायचे त्यांना सांगायचे, मला १ च वांग हवंय, उरलेली तुम्ही ठेवून घ्या. मग पालेभाज्यांचंही तसेच. घरी आणलेलं दुध नासेल म्हणून मी रंगलेली गप्पांची मैफिल सोडून घरी पळत जायचे. त्या घराच्या अशा सांगू तेवढ्या आठवणी कमी आहेत.

त्या घरी राहायला जाऊन जास्त दिवस झाले नव्हते, कोणतातरी मोठा उपवास होता. बहुदा आषाढी एकादशीचा उपवास होता. शाळेपासून त्या दिवशी खिचडी, पापड्या, भगर, चिक्की असे सगळं आवडीचं खायला मिळायचं म्हणून उपवास करायची सवय लागली होती. त्यामुळे एकटी असले तरी उपवास ठेवावासा वाटला. मग असच काहीतरी फराळाचे करायची हुक्की आली. पटकन होईल,असं सोप्पं काय करावं असा विचार करत असताना एकदम बटाट्याचा शिरा आठवला. मग काय झटपट बटाटे  उकडून घेतले. मंद तुपावर परतून घेतले आणि मग त्यात साखर घातली, वासासाठी एकाच एका वेलदोड्याची पूड घातली, घरभर वास पसरला होता. मीच खूप हौसेने केलेला शिरा एकदम मला एकटीला खावासा वाटेना. बहुतेक अजून कोणी तरी त्याला चांगलं म्हणावं अशी सुप्त इच्छा असावी, पण मला तो कोणाला तरी द्यावासा वाटला. नव्याने आलेल्या त्या जागी अशी फारशी कोणाशी ओळख नव्हती. बरं मित्र मैत्रिणींना फक्त बटाट्याचा शिरा खाण्यासाठी घरी बोलावणं बरोबर वाटत नव्हतं. मग कोणाला द्यावा असा विचार करत असताना पटकन डोळयांसमोर त्या घराच्या पुढच्या बाजूला एक आजी राहत होत्या त्याच डोळ्यासमोर आल्या. माझ्या घराच्या रस्त्यावर त्या आजींच्या खोलीची खिडकी होती. संध्याकाळचा मालिकांचा वेळ सोडला तर बहुत करून त्या आज्जी त्या खिडकीतच बसलेल्या असायच्या. त्या आजी कायम बोलायला उत्सुक असायच्या, त्यांच्या सुनेकडून कळलं होतं त्या 86,87 वर्षांच्या होत्या, एक कानातल श्रवणयंत्र सोडलं तर त्या एकदम मस्त टकाटक होत्या. त्यांच्या कडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज नक्कीच येत नव्हता. सतत थांबून काहीतरी विचारू पहायच्या, त्यांना बोलायचं असायचं, त्यामुळे हमखास थांबवून काही ना काही विचारायच्या. म्हणून नंतर  कंटाळून आम्ही त्यांच्यासमोर फोन वर बोलायचं आभास करत पुढे जायचो. तेव्हासुद्धा  त्या प्रसन्न डोळ्यांनी संवाद साधायच्या. त्यामुळेच का कोणास ठाऊक तो गोड आनंद त्यांच्याबरोबर वाटून घ्यावासा वाटला. 

मी जेव्हा एका छोट्या वाटीत तो शिरा घेऊन गेले तेव्हा त्यांना काय बोलू किती बोलू झालं होतं. तो संवाद आता काही आठवत नाही पण त्यांचे एक वाक्य मात्र आजही आठवतंय अग हे तर
आमचे जुने पदार्थ ,आजही करतात का हे? छान वाटलं हं बघूनच. नंतर त्या वाटीतून त्यांनी मला छान लाडू दिले आणि ती देवाणघेवाण मी तिथे राहत असेपर्यंत सुरूच राहिली. त्या समाधानी आज्जींना फक्त बोलण्याचं सुख हवं होतं.  आता त्या आजी पण नाहीत पण तरीही इतक्या वर्षानंतरही बटाट्याचा शिरा केला की आजीची आठवण आली नाही असे होत नाही. श्रवणयंत्राचा घर घर आवाज, थांबून थांबून त्यांचं बोलणं, आणि ,मग पाठीवरून फिरणारा त्यांचा मायेचा हात या सगळ्या गोड आठवणींमुळे माझा बटाट्याचा शिरा नेहमीच जास्त गोड होतो. 

मानसी होळेहोन्नुर


No comments:

Post a Comment