Monday, July 31, 2017

ब्रुकलीन मधला शहाणा...

एक पन्नाशीतला माणूस गाडी चालवत असतो, सिग्नल ला थांबतो, आणि सिग्नल सुटल्यावर निघतो तर दुसऱ्या बाजूनी एक गाडी येऊन त्याच्यावर आदळते, आधीच गाडीमध्ये वैतागलेला, आता तर त्याचा स्वतःवरचा ताबा सुद्धा सुटतो आणि तो त्या टॅक्सी ड्रायव्हरशी अगदी हमरी तुमरीवर येऊन भांडायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून तो दाखवून देत असतो सगळ्यात जास्त चिडणारा माणूस आहे तो. त्याच दिवशी त्याची हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट असते, तिथे जाऊन त्याला कळतं त्याचा नेहेमीचा डॉक्टर नाही तर दुसरीच कोणती तरी बाई आलेली आहे, जरा थांबलेला राग परत त्याला गाठतो, आणि तो त्याच रागाच्या भरात प्रश्नांची फैरी झाडतो त्या डॉक्टरवर. ती डॉक्टर स्वतःच गोळ्या खाऊन स्वतःला शांत करायचा प्रयत्नात असताना त्या चिडणाऱ्या पेशंट कडे डॉक्टर म्हणून बघूच शकत नसते हे आपल्याला कळत असते, पण त्या दोघांनाही ते उमगत नसतं. तो खरतरं गंभीर आजारी आहे, त्याच्या डोक्यातला ट्युमर फुटून रक्तस्त्राव सुरु झालेला आहे, तो कधीही कोसळू शकतो, ती डॉक्टर ही सगळी तांत्रिक माहिती त्याला अगदी निर्विकारपणे देत असते, आणि मृत्यू असा फारसा लांब नाही हे उमगून तो अजूनच वैतागतो, चिडतो, आता तो चिडलेला असतो, स्वतःच्या आयुष्यावर, चाहूल लागलेल्या मृत्यूवर. मृत्यूला आपणा हरवू शकत नाही हे माहीत असतं, त्यामुळे किमान हातात अजून किती वेळ आहे हे कळल तर किमान आपण ते उरलेले महिने, दिवस तास चांगले घालवू उगाच एक भाबडी आशा मनाशी बाळगत तो त्या डॉक्टरला छळत राहतो, विचारत राहतो किती वेळ आहे माझ्याकडे? स्वतःच्या वेळेत अडकलेली ती डॉक्टर एकाच सांगत राहते, किती वेळ ते मी नाही सांगू शकत. शेवटी कंटाळून वैतागून समोर पडलेल्या मासिकावरचा आकडा बघत ती म्हणते ९० मिनिटं राहिलीत, झालं समाधान तुझं.
आकडा कळेपर्यंत धडपडणारा तो माणूस आकडा ऐकल्यावरही क्षणभर लटपटतो, फक्त ९० मिनिटं. आणि मग ठरवतो जवळच्या माणसांना एकदा शेवटचं भेटायचं. आपण ९० मिनिटानंतर या जगात नसू कल्पनाच किती भयंकर असू शकते, किती तरी गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात, किती तरी गोष्टी अनुभवायच्या असतात आणि असा ९० मिनटात आपल्याला निरोप घ्यायचा आहे सगळ्यांचा सोपं बिलकुल नसतं. त्याचवेळी आपण काय बोलून गेलो आहोत हे त्या डॉक्टरला तिचे सिनिअर डॉक्टर लक्षात आणून देतात, जर तो माणूस मेला, त्यानी कोणाला या सगळ्याबद्दल सांगितलं तर तिचं लायसन्स जप्त होऊ शकतं याची जाणीव झाल्यावर सुरु होतो एक पकडापकडी चा खेळ. मृत्यू भेटण्याआधी जवळच्या माणसांना गाठण्याची त्या माणसाची धावपळ, आणि मृत्यू त्या माणसाला गाठण्याआधी त्याला पकडून हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी त्या डॉक्टरची पळापळ.
द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन ची कथा ही. आपलं आयुष्य फक्त आपलं नसतं. आजूबाजूच्या ओळखीच्या अनोळखीच्या लोकांमुळे ते घडत असतं. एक पेशंट, आणि डॉक्टरची ही गोष्ट फक्त तेवढीच नाही. प्रत्येकाच्या वागण्यामागे काहीतरी कारण असतं, आपण ते कारण समजून घेण्याचा प्रयत्न न करता सरळ हल्ले चढवून, सूचना देऊन, सल्ले सांगून मोकळे होत असतो! दोन वर्षापूर्वी तरुण मुलगा मेल्यामुळे सैरभैर होऊन चिडचिड्या झालेल्या नवऱ्याला बायको समजून घेत नाही, स्वतःच्या मर्जीचं करिअर करू पाहणाऱ्या मुलाला बाप समजून घेत नाही, विवाहित प्रियकर धोका देत आहे हे शिकलेली डॉक्टर तरुणी समजून घेत नाही. जगात प्रत्येकाला चिडायला प्रत्येक सेकंदाला एक कारण मिळत असतं, आणि तो एक चिडका क्षण जन्म देत असतो पुढच्या चिडक्या क्षणांना. छोट्या मोठ्या गोष्टींवर चिडत असताना आपण जगणं हरवत चाललोय हे आपल्याला लक्षातच येत नसतं. किंवा लक्षात आलं तरी तोवर वेळ निघून गेलेली असते.
हातात १९ मिनिट राहिलेली असताना भाऊ, बायको, मुलगा या तिघांशी शेवटचा भांडून, मनात असलेलं प्रेम अव्यक्तच ठेवून तो चिडका माणूस आत्महत्या करायला निघतो, त्यावेळी त्याला ती डॉक्टर गाठते, त्याला विनवते किमान माझ्यासाठी तरी आत्महत्या करू नकोस, पण स्वतःच्या आत्मसन्मानाची काळजी करणारा हेन्री आल्टमन पुलावरून खाली उडी मारतो. मे २०१४ मध्ये आलेला हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन मध्ये नायक आत्महत्या करायचा प्रयत्न करतो पण त्याची डॉक्टर त्याला वाचवते, पण खऱ्या आयुष्यात मात्र असं कोणीच वाचवायला आलं नाही रॉबिन विल्यम्सला! आत्महत्या करून त्यानं स्वतःला संपवलं. उत्तमोत्तम चित्रपटात काम करून एकापेक्षा सरस एकेक सरस भूमिका करणारा हा अभिनेता देखील रागाच्या एका सेकंदात, स्वतःवरचा ताबा विसरून शरण गेला रागाला, मृत्यूला. हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या चांगल्या चित्रपटांमध्ये गणला जात नाही, समीक्षकांनी पण याला नाकं मुरडली होती. पण तरीही मला वाटतं, यातले योगायोग नाट्य सोडलं तरीही हा चित्रपट ब्रुकलिन मधल्याच नव्हे तर जगातल्या सामान्य माणसाच आयुष्य दाखवतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून जगण्यातली गंमत विसरलेल्या माणसाला आरसा समोर धरून त्याच्या आयुष्यात काय हरवत चाललंय हे सांगत.

आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाच उत्तर नसतं. आणि कोणत्याही वयोगटासाठी, कोणत्याही स्तरातील, समाजातील माणसांसाठी ते भूषण असू शकत नाही. मृत्यू सगळीकडेच फिरत असतो, त्याला शोधत जाण्यापेक्षा हसणाऱ्या क्षणांना शोधत आयुष्य जगणं जास्त धैर्याच, साहसाचं आणि समाधानकारक असतं. रागावून चिडून आपण मनात असलेलं बोलतच नाही, भावना व्यक्त करतच नाही. ब्रुकलिन मध्ये राहणाऱ्या एका चिडक्या माणसाने सांगेपर्यंत हे मला कळलं नव्हतं असं नव्हतं, पण काही गोष्ट दुसऱ्यांच्या बघूनच आपण लवकर शिकतो हे मात्र मला परत एकदा कळलं.   
मानसी होळेहोन्नुर

https://en.wikipedia.org/wiki/The_Angriest_Man_in_Brooklyn

No comments:

Post a Comment