Wednesday, July 12, 2017

एका टकल्या मुलाची गोष्ट.... !

चित्रपट आवडण्यासाठी कधीही चित्रपटाची भाषा हा अडसर ठरत नाही. किंबहुना भाषेचा अडथळा दूर सारून जो चित्रपट तुमच्या मनात घर करतो तो नक्कीच चांगला चित्रपट समजला पाहिजे. चांगल्या चित्रपटाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते, कधी कधी जगाने नावाजलेल्या चित्रपटात दहाव्या मिनिटाला तुम्ही घोरत असू शकता, आणि तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटाचं नाव ऐकताक्षणी नाक मुरडणारी लोकं तुमच्या आजूबाजूला असू शकतात. आणि अशी वेगवेगळी अभिरुची असणारी लोकं आहेत म्हणूनच वेगवेगळे प्रयोग चित्रपट क्षेत्रात होत असतात, आणि निराळ्या प्रकारचे चित्रपट आपल्यासमोर येत असतात. सच्च्या चित्रपट रसिकाला कोणताही वेगळं काही देणारा चित्रपट आवडतो.
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बघितलेला नवीन कन्नडा चित्रपट ‘वंदू मोट्टेय कथे’. इंग्लिश मध्ये एगहेड असं नाव असणारा हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे एका टकल्या मुलाची. सौंदर्य हे फक्त बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं हे वाक्य बोलून, लिहून अगदी गुळगुळीत झालंय, पण तरीही ते खरं आहे. भोली सुरत दिल के खोटे म्हणणाऱ्या मास्टर भगवान ला देखील लोकांनी डोक्यावर घेतलं पण नायक म्हणून नाही. नायक काय किंवा नायिका हे कायम सुंदर, हुशार तरुण, सडसडीत असलेच हवे.जाडे , टकले लोक हे फक्त हसवण्यासाठीच असतात असा एक गंभीर समज आहे. ७० , ८० च्या दशकात प्रायोगिक सिनेमांनी नायकांना खऱ्या प्रतिमेच्या जवळ न्यायला सुरुवात केली, म्हणजे ते नोकरीला जायचे, ट्रेन नी प्रवास करायचे, आपल्यातले वाटायचे, पण तरीही कोणताही नायक कधीच टकला नसायचा. नायिका देखील बदलत होत्या, पण तरीही जाड नायिका दिसली ती दम लगा के हैशा मध्ये.
या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नावापासूनच ज्याला कायम अंड म्हणून चिडवलं जातंय अशा मुलाची गोष्ट बघायची उत्सुकता होती. हा २८ वर्षाचा मुलगा आहे, जो एका कॉलेज मध्ये कन्नडा शिकवतो. त्याच्या लग्नासाठी हालचाली सुरु आहेत, पण दरवेळी आडवं येतं असतं त्याचं टक्कल. टकला असला तरी त्याच्या स्वतःच्या काही अपेक्षा आहेत, एखादी सुंदर, देखणी मुलगी त्याला हवी आहे. जेव्हा आई वडिलांकडून होणारे प्रयत्न कमी पडतात तेव्हा तो स्वतःच ठरवतो मीच शोधेन मुलगी. या सगळ्याला मस्त जोड दिली आहे कन्नडा चित्रसृष्टीचे सुपरस्टार राजकुमार यांच्या चित्रपटांची, गाण्यांची. अगदी मस्त प्रसंगोपात गाणी येतात.  नायक हा राजकुमार यांचा भक्त आहे , दिवसरात्र त्याच्या डोक्यात राजकुमार यांचही, गाणी, चित्रपट असतात. इन फॅक्ट त्यामुळेच राजकुमार यांचा वावर पूर्ण सिनेमाभर एखादी मार्गदर्शकासारखा आहे. जेव्हा जेव्हा तो एखाद्या द्विधेत सापडतो, राजकुमार त्याच्या मदतीला धावून येतात. राजकुमार आजही इथल्या सिनेरसिकांच्या नसानसात भरून राहिलेले आहेत.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचा प्रश्न मांडणारा आहे, तो ही विनोदी अंगाने, म्हणजे लग्नाळू टकला मुलगा ज्या पद्धतीने आजुबाजूला लग्नाळू मुलीचा शोध घेत असतो, त्याच्या अपेक्षा, समाजातलं वास्तव, मुलींच्या अपेक्षा या सगळ्यावर प्रचारकी थाटात भाष्य करण्याऐवजी सहज जाता जाता संवादातून वाचा फोडली आहे. चित्रपटात जाता जाता प्रादेशिक भाषा, आणि प्रादेशिक भाषा शिकवणारे शिक्षक यांचे वास्तव हे भारतातल्या जवळपास प्रत्येक भागात सारखंच आहे. फेसबुक वरचे प्रोफाईल फोटो, मेसेंजर चा वापर याचा मस्त वापर करून घेतला आहे. मुळात हा चित्रपट राज शेट्टी यानी स्वतःच लिहिला, दिग्दर्शित केला आणि प्रमुख भूमिका देखील केली, हा चित्रपटात मेंगलोर कडची कन्नडा बोलली जाते. पहीलाच प्रयत्न असल्याने आणि मार्केटिंग बद्दल फारशी माहिती नसल्याने हा चित्रपट फक्त मेंगलोर आणि जवळपास च्या भागत प्रदर्शित करणार होते, पण हा चित्रपट बेंगलोर मधल्या काही चित्रपटदर्दींनी पाहिला, आणि मग कन्नडा चित्रसृष्टीतल्या यशस्वी दिग्दर्शकानी त्याच्या बॅनर खाली याला फक्त देशात नव्हे तर परदेशातही प्रदर्शित केला.
उगाच काहीतरी संदेश देत आहे असं सांगणाऱ्या किंवा मनोरंजनासाठी म्हणून काहीही दाखवणाऱ्या सिनेमांपेक्षा दोन्हीचा योग्य मिलाफ या सिनेमात साधला आहे, उत्तरार्ध अजून एक दहा मिनिटं कमी केला असता तर सिनेमा अजून नेटका झाला असता, इतकं मात्र खरं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलं, तर आपल्या आयुष्यात तरी आपण हिरो असूच शकतो. नायक नायिकांना त्यांच्या टिपिकल सौदर्याच्या परिमाणामधून बाहेर काढून गर्दीचा भाग असलेला एखाद्याची कथा मोठ्या पडद्यावर बघताना आपण जास्त गुंगतो, हे मात्र खरं. चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असं म्हणतात त्यामुळेच हृषीकेश मुखर्जींचे सर्वसामान्य नायक असणारे चित्रपट आजही आवडीने बघितले जातात, ‘वंदू मोट्टेय कथे’ नक्कीच अशा सिनेमांची आठवण जागवून जातो एवढं निश्चित !

(मुद्दाम कन्नडा शब्द सगळीकडे वापरला आहे, कारण कन्नडिगा त्यांच्या भाषेला कन्नड नव्हे तर कन्नडा म्हणतात. ज्या पद्धतीने मराठी भाषेत कोल्हापुरी, वैदर्भीय, पश्चिम महाराष्टातली मराठी वेगळी आहे त्याच पद्धतीने कन्नडा मधेय देखील बेंगलोर कन्नडा, मैसूर कन्नडा, मेंगलोर कन्नडा, नॉर्थ कर्नाटका कन्नडा अशा वेगवेगळी बोलीभाषा आहेत. )

मानसी होळेहोन्नुर

https://www.youtube.com/watch?v=UXv-9QdR3s8


No comments:

Post a Comment