Tuesday, July 4, 2017

रुक्मिणीचा पांडुरंग

‘आये जायलाच हवं काय तुला?’
सामान भरत असलेल्या रुक्मिणी बाईंना पोरगा विचारत होता.
‘आरं बाबा इतकी वर्स जातीये, यावर्षी न्हाई जाऊन कसं होईल.’
‘दे रं सोडून, म्हातारीनं ऐकलंय व्हय कुणाचं की आज तुज ऐकेल.’
‘जसं काय तुम्ही लैच ऐकत्यात ना सगळ्यांच,’ फुत्कारून म्हातारी बोलली.
‘अग आये असं न्हाई, डाक्तरांनी साखरेची बिमारी सांगितली ना तुला मंग कसं जमवशील तू, रस्त्यात काई झालं तर?’
‘असं कसं काई होऊ दील माजा इठू? आन ह्ये बग, समद्या गोळ्या सोबत घेतल्यात. अन ह्यो फोन बी सोबत घेऊन जातीये, वाटलं काई तर फोन करून सांगेन की.’
‘जाऊ द्यात की त्यास्नी, वर्सातून एकदा तर एवडा हट्ट करून जात्यात की आत्याबाई.’ सून बाई आतून बोलल्या.
‘आज गंगा उलटी कशी वाहायला लागली रे निवृत्ती?’ सासऱ्यानी चावी फिरवायचा प्रयत्न केला.
‘माझी सून हाये ती चुकून बोलली येकाद एळेला तर तुमचं काय जातय? आनी घेऊ द्या की तिला बी घराची जिम्मदारी, वर्सभर तर मंग असतेच की मी.’
‘ बुढ्ढे आता उमर झाली तुझी, तुज्या काळजीपोटीच बोलतोय ना आम्ही.’ शेवटच अस्त्र वापरलं तिच्या नवऱ्यानी
‘आली म्हन माजी काळजी, इतकी काळजी असती तर शेतात नीट लक्ष दिलं असतं, असेल माजा हरी तर देईल खाटल्यावरी करत बसला नसतासा. ती तंबाकू आदी सोडली असती बगा, एक वरस नीट पाहिलं जरा घरात चार पैसे आले की सुटलेच तुमी, गावात लष्कराच्या भाकऱ्या भाजायला.’ गाडी कोणत्या वळणावरून जाणार हे कळलं म्हणून ती गाडी थांबवण्यासाठी एकदम पोरगा बोलला,
‘आये फोनचा चार्जर घेतला न्हव.’
गाडीला एकदम ब्रेक लागल्यामुळे जरा सेकंद लागला त्यांना प्रश्न समजायला, आणि मग हे ही कळल यकदम यांनी हा प्रश्न का विचारला,
‘तू बी त्यांचाच ल्योक ना, बसावा गप मला म्हातारीला, त्यो इठू सोडला तर कोणी न्हाई बागा मला. माहेरचा गोतावळा कधीच संपला, भाऊ हितं वळख दाखवत न्हाई आय बाप तर कदीच गेले, ही वारीची लोकंच ती माझी, आणि त्यो काळूराम माजी आय न बाप, आन तुम्ही म्हणतात त्याला बी भेटाया जाऊ नको. तुझी उमर हाये त्याच्या आदीपासून जायचे बग मी, तू झाल त्यावर्सी काय खंड पडला तो. माजी सासू बगून घायची, मंग अडल्या नडल्याला कोन तरी यायचं आता सून बगते, पन माजी वारी काई चुकत न्हाई. जित्ती हाये तोवर माजी वारी काई चुक्नार न्हाई.’
शेवटी स्वतःचच म्हणणं खरं करत म्हातारी गेली वारीला.
अधून मधून फोन करत ख्याली खुशाली कळवत राहिली.
आणि मग आषाढी एकादशीच्या सकाळी नेहेमीप्रमाणे घरी आली.
‘काय ग म्हातारे यावर्षी बी न्हाई घेतलंस दर्सन?’
‘न्हाई तिथे काय अन हितं काय पांडुरंगच तर हाये ना. मग तिथं दर्शन घेतलं काय अन इत दर्शन घेतलं काय. माज्या इठ्ठलाला कळतं की.’
‘अग हे बरय तुजं इतकी वर्स झाली वारीला जातेस, मोप पंढरपूरपर्यंत चालत जातेस आणी मंग दर्शन न घेताच परत फिरतेस, तुजं मला काई कळतच न्हाई बघ. ‘
‘मी जाते ते माझ्या लोकांना सोबत करायला, लई बायका असत्यात हो, काय काय त्यांचे प्रश्न असत्यात, सगळ्या मोकळ्या होतात बगा तिथ येऊन, मला बी जरा मोकळं वाटतं, घराला इसरून सोतासाटी जगाया मिळत बगा, नवरा न्हाई, घराची काळजी न्हाई, सैपाकाची काळजी न्हाई आपण निस्त चालायचं, फुगड्या घालायचं, इठ्ठलाच नाव घ्यायचं, गाणी म्हनायची, म्हायेरम्हायेर ते अजून एगळ काय असतं. आन लग्नानंतर तुमीच माजी लक्ष्मीची रुक्मिणी केली न्हावं, मग ती एक पंढरपूरची रुक्मिणी तिच्या इठ्ठलापासी नसते, म्हनून तर ही रुक्मिणी तिच्या इठ्ठलाच्या सेजारी बसून फराळ करायला पार पंढरपुराहून येते बगा.’
आणि मग पांडुरंग त्याच्या रुक्मिणी कडे बघतच राहिला, हातची तुळसीमाळ ओढत पांडुरंग पांडुरंग म्हणायच्या ऐवजी रुक्मिणी रुक्मिणी म्हणायला लागला, आणि ती तुळसीला पाणी घालत हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणत राहिली.
    
   


No comments:

Post a Comment