Saturday, July 8, 2017

गुरुर्देवो नमः

सक्काळी सक्काळी आईचा, बाबांचा फोन आला की धडकायला होतं,त्यामुळे कितीही घाई गडबडीत असले तरी ती आई वडिलांचा किंवा ज्येष्ठ नातेवाईकांचा फोन चुकवत नाही.
एका हातानी भाजी परतत, दुसऱ्या हातानी कणकेचा डबा काढत, फोन कानापाशी दुमडत तिनी आईला विचारलं,
‘काय गं सगळं नीट आहे ना, आज इतक्या सकाळी फोन केलास.काही महत्वाचं असलं तर आत्ता बोलू, नाहीतर मी तुला थोड्या वेळानी फोन करते ना.’
‘सगळं नीट आहे, तसं काही अर्जंट नाही पण म्हणलं आज आमच्या गुरूंना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा द्याव्यात. म्हणून सकाळी फोन केला. ‘
तिला काहीच कळेना, म्हणजे आई ही पहिली गुरु असते असं शिकलेलो आणि आता तिला फोन केला नाही म्हणून तीच फोन करून त्याची आठवण करून देत होती की काय असं वाटलं एकदम. तसं तिला लक्षात होतं आजच्या गुरुपौर्णिमेच, पण जरा दुपारून आवरून सावरून फोन करणार होती ती.
स्वतःला सावरून ओशाळून ती म्हणाली, ‘ हो हो लक्षात आहे मला आज गुरु पौर्णिमा आहे ते, मी तुला करणारच होते फोन पण अग थोड्या वेळानी, सकाळची वेळ थोडी घाईची असते ना.’ आईनी इतकं काय फोन करून आठवण करून द्यायला हवी होती, थोडा रागच आला होता. तो बहुतेक बोलता बोलता स्वरात आला असावा.
‘अग नाही ग बेटा,तुला आठवण करून देण्यासाठी नाही केला फोन, उलट तुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी केला फोन, म्हणजे तू आमची शिक्षक झाली आहेस ना आता.’
कानाचा फोन सरळ करत, एका हातानी फोन धरत, दुसऱ्या हातानी चहा गाळत तिनी विचारलं,
‘म्हणजे काय मी समजले नाही.’
‘अग राणी, आत हा स्मार्ट फोन, कॉम्पुटर, झालंच तर फेसबुक, आणि हे वेगवेगळे अॅप्स आम्ही वापरू शकतोय ते तुझ्यामुळेच ना. तूच तर शिकवलंस ना आम्हाला, आजही काही अडलं, काही लागलं तर हक्कानी तुला विचारतो, आणि तू पण आम्हाला न थकता ते सांगतेस, समजावतेस. आम्हाला कळेल अशा शब्दांमध्ये सांगतेस. हे सगळं शिकल्यामुळे किती तरी जुन्या मैत्रिणी नव्याने भेटल्या, नव्या मैत्रिणींची ओळख झाली, फोटोंमुळे सगळे जवळ असल्यासारखे वाटतात बघ. जो कोणी आपल्याला आयुष्यात काही तरी शिकवून जातो तो आपला गुरूच झाला ना ग. आपण अनुभवाला गुरु म्हणतो, आई वडिलांना गुरु म्हणतो, मग तू पण गुरूच झालीस ना’
आई काय बोलत होती आणि आपण काय समजून घेत होतो, क्षणभर तिला स्वतःचीच लाज वाटली,
‘आई अग त्यात काय एवढं, मला येत होतं, माहीत आहे ते मी तुला, बाबांना शिकवलं, आता तुम्ही नाही का लहानपणी आम्हाला बोटाला धरून चालायला शिकवण्यापासून ते स्वतःच्या पायवर उभं राहण्यापर्यंत शिकवलं?’
‘ती आमची जबाबदारी होती, पण तू जे करतीयेस ती, काही तुझी जबाबदारी नाही, कर्त्यव्य देखील नाही, पण तरीही तू करतेस ना. चल तुझी ही सकाळची वेळ आहे, पण तरीही तुझ्याशी हे बोलून दिवसाची सुरुवात करावीशी वाटली म्हणून फोन केला, दुपारी मस्त व्हिडीओ कॉल करूयात बघ. आता आता जमायला लागलंय बघ.बरं आज काही तरी गोड करून खा, जवळ असतीस तर मीच करून खायला घातलं असतं बघ.’
‘आई तुला आणि बाबांना पण गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा. आम्ही आज जे काही आहोत ते तुमच्यामुळेच, मी करेनच ग गोड काहीतरी, पण तुम्ही पण काहीतरी करा गोड, तुम्ही पण आमचे गुरूच ना. दुपारी बोलूया निवांत.’
तिनी फोन ठेवला आणि विचारात पडली, आई वडिलांना आपण गुरु मानतो, म्हणतो, पण आपली मुलं ही देखील एका प्रकारे आपले शिक्षकच असतात ना, मी आई बाबांना नवीन काही तरी शिकवलं. पण माझी मुलं मला मी कसं वागावं हे रोजच शिकवतात, म्हणजे त्यांनी जसं वागावं असं मला वाटतं, तसं जर मी वागले, तरच मी त्यांना काही सांगू शकते, जर त्यांनी टीव्ही जास्त बघू नये असा माझा आग्रह असेल तर मी आधी माझा टीव्ही टाईम कमी केला पाहिजे. त्यांनी घरात संवाद वाढवला पाहिजे असं जर मला वाटत असेल तर मी देखील माझा मोबाईल सोशल नेटवर्किंग वरचा वेळ कमी करून त्यांना दिला पाहिजे. त्यांनी ओरडू नये असं सांगताना मी देखील माझे ओरडणं कमी केलं पाहिजे, त्यांना चार गोष्टी याव्यात म्हणून झटताना मी पण त्यांच्या बरोबर बसून दोन गोष्टी केल्या पाहिजेत. ते जसं वागवेत असं मला वाटतं तशी मी तरी वागते ना हा विचार करायला मुलांनी मला भाग पाडलं. म्हणजे आई म्हणते तसं जे कोणी आपल्याला काही शिकवतं ते आपले गुरूच ना, एकदम मुलांकडे ती वेगळ्याच दृष्टीने बघायला लागली.

मग खास मुलांना आवडतो तसा शिरा करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्याव्या म्हणून तिनी तुपावर मस्त शिरा भाजायला घेतला. आधी शिष्य म्हणून आणि नंतर गुरु म्हणून दोन वाट्या शिरा फस्त करताना सुंदर असलेलं हे आयुष्य अजूनच सुंदर वाटायला लागलं होतं.  

मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment