Wednesday, July 19, 2017

आठवणींचा डब्बा गुल....


घरात काम सुरु असताना एका बाजूला रेडीओ लागला पाहिजे ही तिच्या आजीची सवय तिच्या आईने आणि तिच्या आईची सवय तिने उचलली होती. म्हणजे एका बाजूला गाणी, कार्यक्रम सुरु असतातच, त्या ऱ्हीदम मध्ये कामांची पण एक लय जुळली जाते आणि कळत नकळत वेळेचं भान पण राहिलं जातं. म्हणजे दोन गाण्यानंतर कुकर बंद केला तरी चालेल, किंवा हा कार्यक्रम संपेपर्यंत स्वैपाक संपला पाहिजे, मिनिटामिनिटांची गणितं ही त्या रेडीओवर ठरलेली असायची. आणि आज सकाळी जेव्हा ताल मधलं नही सामने ये अलग बात है आणि हात तसेच थांबले.

नुकतेच कुठे मोबाईल फोन आले होते तेव्हा, फेसबुकच्याही आधी जेव्हा सगळ्यांना ऑरकुट चं वेड लागलं होतं तेव्हाची गोष्ट ! कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं बहुतेक, अनेक मैत्रिणींची एकेक, दोन प्रेम प्रकरणं झालेली होती, ती मात्र अजूनही प्रेमव्हर्जीनच होती. तिला भयंकर कॉम्प्लेक्स यायला लागल होता, पण कॉलेज मधली मुलं, मैत्रिणींचे भाऊ कोणीच तिला आवडत नव्हते, आणि कोणालाही ती आवडत नव्हती, कधी अपेक्षा जास्त होत्या, तर कधी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होतं. प्रेम करतानाही बिचारीच्या अपेक्षा होत्या. दिसायला तशी बरी होती, स्मार्ट होती, मित्रांची काही कमी नव्हती पण प्रियकर तेवढा अजून भेटला नव्हता. मग अशातच कधी तरी ऑर्कूट आयुष्यात शिरलं. नवीन मित्र नवे ग्रुप असे काय काय माहिती झाले.

फोटो, शिक्षण, प्रोफाईल बघून मित्र शोधत होती, कधी संवाद पुढे जात होते, कधी थांबत होते. त्यातले काही जण मैत्रीच्या रेषेच्या पुढे डोकावू पाहत होते. आणि गंमत म्हणजे हा सगळा न बघतानाचाच मामला होता, त्यातला एक मित्र कुठेतरी कोचीन ला होता. ऑर्कुट वरून इमेल वर संभाषणाची गाडी गेली होती, पण फोन नंबर द्यावा की नाही द्यावा अशा सगळ्या तळ्यात मळ्यात मध्ये शेवटी एकदाचा तिने त्याला  नंबर दिला.  त्या काळात जग अजून स्मार्ट झालं नव्हतं त्यामुळे सगळं काही एसमेएस आणि फोन वरच चालायचं. उगाच लास्ट सीन कधीचा, माझा मेसेज डीलीव्हर झाला तरी अजून वाचला नाही असल्या भंपक गोष्टी अजून जन्माला यायच्या होत्या, थापा मारण्याचं आणि पचण्याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा.

मित्राशी काही कारण काढून बोलूनही झालं होतं, आपण काय करतोय हे समजण्याचं वय, आणि बुद्धी नक्कीच तेव्हा नव्हती. उठलास का, जेवलास का, अभ्यास केलास का, असे काहीही मेसेज पाठवायला वेळही होता, आणि इच्छाही! तसंही मोबाईल कंपन्या तेव्हा ठराविक वेळेला कमी चार्जेस आणि मेसेजस फुकट वाटायच्या तेव्हा. मग अशातच एकदा कधीतरी मला बघून तुला कोणतं गाणं आठवतं असा थेट दगड मारणारा मेसेज तिने त्याला पाठवला आणि उत्तरादाखल त्याने विचारलं ‘चिडणार नाहीस ना गाणं सांगितलं  तर.’
‘तू सांग तर’.
तेव्हा त्याने पाठवलं होते, ‘नही सामने ये अलग बात है.’

तो मेसेज वाचून आयुष्यात पहिल्यांदा ती लाजली, पोटात गुदगुल्या होणं म्हणजे काय हे तिला कळलं. पाच मिनिटं ती फक्त तो मेसेज बघून ते गाणंच गुणगुणत बसली, त्यातली ओळ न ओळ तिला तशीही पाठ होती, पण आता त्याला एक वेगळा अर्थ मिळत होता.

तेवढ्या वेळात त्याचे चार मेसेज आले रागावलीस, प्लीज, सॉरी, सॉरी मला जे वाटलं ते मी सांगितलं.
शेवटी तिने फोनच लावला, आणि त्याला सांगितलं नाही रे रागावले वगैरे नाही पण तरीही आपण अजून भेटलो पण नाही आणि तू हे गाणं सांगितलं म्हणून जरा वेगळ वाटलं. मग ते गाणं, रेहमान यावर पुढची दहा मिनिटं बोलल्यावर तिला लक्षात आला, तिचा टॉक टाईम संपत आला होता, खरंतर अजून खूप बोलायचं होतं, पण तोवर फोन चा बॅलन्स संपला आणि फोन बंद पडला. परत लगेच त्यानी फोन लावला. आणि मग काय गप्पा जणू थांबल्याच नव्हत्या अशा सुरु झाल्या. मग तिनी मिस कॉल द्यायचा आणि त्याने कॉल करायचा असा सिलसिला सुरु झाला. मैत्रीच्या नक्कीच पुढे जात होतं हे नातं. इतके काही बोलून झाली होते की आता भेटणे ही फक्त फॉर्मलिटी वाटायला लागली होती. मग कधीतरी भेटायचं ठरलं. तो काहीतरी कारण काढून तिच्या गावात आला, दोघं भेटले. पण फोनवर जेवढे कम्फर्टेबल होते तेवढे भेटल्यावर नव्हते. काय कुठे चुकत होतं कळत नव्हतं. पण तिला फोन वर तो जेवढा जवळचा वाटला तेवढा प्रत्यक्ष भेटल्यावर नाही वाटला.

आपोआपच मेसेज, फोन कमी झाले. नंतर तर नावं सुद्धा मागे पडली. आयुष्यात प्रेम आलं, नवरा आला, संसार आला. पण त्या गाण्यासोबतची ती आठवण कधी नाही पुसली गेली. प्रेमाचा एक हलका अनुभव येता येता राहून गेलेलं ते गाणं. कुठे असेल तो, कसा असेल? बोलेल का आपल्याशी परत. आपण चुकीचं वागलो, प्रेम नाही पण मैत्री टिकवायला काय हरकत होती, कदाचित त्या मैत्रीतून पुढे घडलं ही असतं काही. १०, १५ वर्षांनी पण आपल्याला त्याची आठवण येते म्हणजे नक्कीच आतवर काहीतरी घुसलेलं होतंच. गाणी काय माणसं काय आत रुतून बसतात. अशी कुठल्या कुठल्या वळणावर भेटलेली माणसंच खरं आयुष्य घडवत राहतात.

मस्त चहाचा कप नवऱ्याच्या हातात देत तिने विचारलं, ‘मला एखादं गाणं डेडीकेट करायचं असेल तर कोणतं करशील?’ 

पृथ्वी गोल आहे तशा आठवणीही गोल असल्या पाहिजेत ना, जुन्या आठवणींवर नव्या गुंफता आल्या कि समजायचं आपल्याला आजही हसून जगता येतंय.

©मानसी होळेहोन्नुर  






1 comment: