Thursday, December 5, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा १८

आफ्रिका हा खंड नेहमीच एक कोडे बनून राहिला आहे. इथली वाळवंटं प्रसिद्ध आहेत, पण त्याच वेळी इथल्यासारखे वन्यजीव वैविध्यही क्वचितच दुसरीकडे सापडते. इथले संगीत हा आजही अभ्यासाचा विषय समजला जातो. इथल्या भटक्या लोकांची स्थानिक वाद्यं, सुरावटी, संगीत हे अजूनही पूर्णपणे जगाच्या समोर आलेले नाही. टय़ुरेग जमातीचे लोक सहारा वाळवंटाच्या आसपासच्या माली, अल्जेरिया, नायगर, टय़ुनिशिया, फासो बक्रीणो  फासो या देशांमध्ये राहतात. या लोकांचे स्वत:चे असे वेगळे संगीत आहे. काही वाद्ये  ही खास त्यांनीच तयार केलेली आहेत. या समाजातल्या स्त्रियादेखील त्यांच्या खास गाण्यांसाठी ओळखल्या जातात. फॅटू सदी घाली या नायजर देशातल्या टय़ुरेग समाजातल्या स्त्रीने मात्र गिटार वाजवत स्वत:चा एक बँड काढून इतिहास रचला आहे.
फॅटू सदी घाली दहा वर्षांची असताना तिच्या भावाने लिबियामधून गिटार आणली होती. या वाद्याने तिला भुरळ घातली आणि ती स्वत:च स्वत:ची शिक्षक बनून शिकायला लागली. आसपास कोणी नसताना एकटय़ानेच सुरू असलेला तिचा सराव अर्थातच घरातल्यांच्या समोर आलाच. तिच्या वडिलांनी तेव्हा तिला स्पष्ट सांगितले, ‘‘हे तुझे काम नाही, तू जाऊन गाई वळ, उगाच यात वेळ वाया घालवू नकोस.’’ पण तरीही तिने तिचा हट्ट सोडला नाही आणि ती गिटार वाजवतच राहिली. कष्टाला नशिबाची साथ मिळाली की यश लांब नसते. फॅटू सदी घालीच्या बाबतीतही हेच झाले. २०१० मध्ये ख्रिस्तोफर कर्कले हा अमेरिकन संगीतवेडा, आफ्रिकन संगीताच्या शोधात नायजरमध्ये आला. त्याने या संगीताच्या प्रसारासाठी ‘सहेल साऊंड्स’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून तो आफ्रिकी गायकांना, वादकांना जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून देतो आहे. त्याने फॅटू सदी घालीला एका लग्नात गिटार वाजवताना पाहिले आणि शोध घेत तिच्या गावापर्यंत, इलीघादादपर्यंत जाऊन पोहोचला.
२०१६ मध्ये ‘लेस फिलीस दे इलीघादाद’ या नावाने फॅटू सदी घालीने अलमनौ अक्रोनी आणि मरियम सलाह आसवान या दोघींना घेऊन स्वत:चा बँड सुरू केला. मरियमची जागा आता फातीमताने घेतली आहे. या सगळ्या जणी विशीतल्याच आहेत. संगीत हा त्यांचा श्वास आहे आणि त्यांना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. त्यांच्या यशाने लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. जगभरात अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिकेतल्या प्रख्यात ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’मध्येदेखील त्यांचा कार्यक्रम आहे.
संगीत ही एक दैवी देणगी असते. दु:ख विसरायला लावण्याची शक्ती त्यात असते. त्याला जात, धर्म, देश, भाषा या कशाचीही बंधने नसतात. आताच्या स्मार्ट युगात जग एका क्लिकवर आले आहे.
काही दिवसांपूर्वीच बंगालमधल्या राणू मोंडल या रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या स्त्रीची कथाही अशीच नाटय़मय आहे. तिचे गाणे ऐकून त्याचा व्हिडीओ बनवत अितद्र चक्रबर्तीने तो फेसबुकवर टाकला. त्यानंतर तिचे गाणे इतके व्हायरल झाले की राणू मोंडल यांना आता अनेक मोठमोठय़ा संगीत मंचांवरच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलावले गेले आहे.
असे लपलेले संगीत जेव्हा बाहेर येते तेव्हा त्यातला अस्सल सच्चा सूर जास्त भावतो, हेच फॅटू सदी घाली, राणू मोंडल यांच्यासारख्या उदाहरणांमधून समोर येते.
पुरुषांचीही पंच
१४ ऑगस्ट २०१९ ला इस्तंबुलमध्ये झालेल्या ‘लिव्हरपूल विरुद्ध चेल्सा’ या सामन्याने एक वेगळाच इतिहास घडवलाय. या सामन्यात दोन्ही संघांनी दोन-दोन गोल केले होते. अगदी वाढीव वेळेतही सामन्याचा निकाल ठरला नव्हता, मग पेनल्टी शूटआऊटमध्ये लिव्हरपूलने पाच गोल नोंदवले, तर चेल्साने चारच. त्यामुळे लिव्हरपूलने हा सामना जिंकला; पण मग यात काय विशेष, ऐतिहासिक आहे, असा प्रश्न मनात येत असेल तर तो रास्तच आहे. या सामन्याचे वेगळे वैशिष्टय़ होते या सामन्याचे पंच. स्टेफनी फ्रॅपोर्ट ही पुरुषांच्या लीग १ श्रेणीतल्या सामन्यातली पहिली स्त्री पंच होती.
फुटबॉलच्या नव्वद मिनिटांच्या खेळात संपूर्ण शारीरिक कसोटी लागत असते. क्रिकेट किंवा टेनिसच्या पंचांसारखा फुटबॉलचा पंच एका जागी थांबून नसतो. तोदेखील खेळाडूंच्या मागे पळत असतो. त्यामुळे या खेळात पंच हादेखील शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अतिशय कणखर असावा लागतो. छत्तीस वर्षीय स्टेफनी यांनी २०११ पासून महिला फुटबॉलच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जुलमधल्या स्त्रियांच्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यातही पंच म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडली होती. याआधी २०१५ पासून त्या पुरुषांच्या लीग २ या श्रेणीमध्ये पंच म्हणून कामगिरी पार पाडत आहेतच. यंदा एप्रिलमध्ये लीग १ या श्रेणीतही त्यांची निवड झाल्यापासून १४ ऑगस्टचा हा त्यांचा पहिलाच मोठा सामना होता. फ्रेंच नागरिक असलेल्या स्टेफनी यांनी स्त्रियांच्या अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे. आता त्या पुरुषांच्या सामन्यांमध्येसुद्धा त्यांची कामगिरी कायम ठेवतीलच.
स्त्रियांच्या खेळात पुरुष पंच असतात. स्त्री-पुरुषांचे मिश्र असे सामनेदेखील असतात. मग आता पुरुषांच्या खेळात स्त्री पंचदेखील लवकरच जास्त संख्येने दिसायला लागतील, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
तिच्यासाठी ‘लिटल’ घर
एका बाजूला विविध शहरांत अनेक घरे रिकामी आहेत, त्यात कोणीही राहत नाही, त्यामुळे त्या घरांची नीट देखभालही होत नाही, पण त्याच वेळी त्याच शहरात अशा अनेक जणी, अनेक जण आहेत ज्यांना घर हवे आहे, पण त्यांच्याकडे जास्त पसे नाहीत. हे आजच्या जगातले विरोधाभासी चित्र आहे. अशा ठिकाणी स्वप्नवत परिस्थिती म्हणजे गरजूंची त्या रिकाम्या घरांमध्ये राहण्याची सोय होणे. जपानमध्ये ‘लिटल वन्स’ या सामाजिक संस्थेने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. एकल माता किंवा घटस्फोटित मातांवर समाजाने आधीच एक वेगळेपणाचा शिक्का मारलेला असतो, त्यात त्यांची आर्थिकक परिस्थितीदेखील फारशी उत्साहवर्धक नसते. आर्थिकक, सामाजिक दडपणाखाली असलेल्या स्त्रियांना अनेकदा अनेक सामाजिक संस्था नोकरी मिळविण्यासाठी, मुलांना काही काळ सांभाळण्याची मदत करतात. भाडय़ाने घर मिळवून देण्याची मदत मात्र आजवर कुठेही झाली नव्हती. ‘लिटल वन’ ही संस्था तशी मदत जपानमध्ये करत आहे.
जपानमध्ये एकल, घटस्फोटित स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही बहुतांश वेळेला मुलांचा ताबा साधारण आईकडेच जातो. अशा घटस्फोटित मुलांची जबाबदारी असलेल्या स्त्रिया, कुमारी मातांची संख्याही जपानमध्ये गेल्या काही वर्षांत वाढत आहे. अशा स्त्रियांना पटकन घर मिळत नाही, कारण बरेचदा त्यांना कोणी गॅरंटर नसतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘लिटल वन’ या संस्थेने बिनवापराच्या घरांच्या मालकांशी संपर्क साधला आणि त्यांना घर रिकामे ठेवण्यापेक्षा ते कमी किमतीमध्ये गरजूंना देण्याची विनंती केली. त्याचबरोबर ही संस्था गॅरंटर राहील याची खात्री दिली, म्हणजे जर कोणी घराचे भाडे देऊ शकले नाही, तर संस्थेमार्फत ते दिले जाईल. या शब्दामुळे जवळपास दोनशेहून अधिक गरजू स्त्रियांना टोकियो आणि इतर काही शहरांमध्ये राहण्यासाठी घर मिळाले.
यातली अनेक घरे ही सुरुवातीला वापरण्यायोग्य नव्हती; पण ‘लिटल वन’ने त्यांची डागडुजी करून घेतली. एकटय़ा टोकियो शहरातच ८० लाख रिकामी घरे आहेत, तर दहा लाखांहून अधिक गरजू स्त्रिया आहेत. सरकार, घरांचे मालक, रिअल इस्टेट एजंट अशा सगळ्यांशी चर्चा करून रिकामी घरे परवडू शकतील अशा भावाने गरजू लोकांना देण्यात आलीत. एकल, गरजू मातांपासून सुरू करून नंतर वृद्ध, अपंग, निराश्रित लोकांनादेखील या योजनेत सामील करून घेण्यात आले. मेट्रो शहरांमध्ये नोकरी मिळणे घर मिळण्याच्या तुलनेत सोपे असते. याच शहरांमध्ये घरांची भाडी जास्त असतात, त्यामुळे लोकांना भाडय़ाचे घरसुद्धा परवडत नाही.
घरे आहेत, पण भाडे परवडत नाहीत म्हणून ओस पडली आहेत, तर घर हवे आहे, पण भाडे परवडत नाही म्हणून रस्त्यांवर, झोपडपट्टीमध्ये राहावे लागणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही अशा दोन टोकांमध्ये समन्वय घडवून आणणे खूप गरजेचे आहे. ते काम ‘लिटल वन’ने सुरू केले आहे. अजूनही त्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही; पण कुठे तरी सुरुवात झाली ही मोलाची गोष्ट.
स्वातंत्र्य तिच्या हाती?
२०१९ हे वर्ष सौदी अरेबियातल्या स्त्रियांसाठी अगदी खास म्हटले पाहिजे. सौदीचे नवीन युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून सौदीमध्ये अनेक चांगले बदल घडून येत असल्याचे दिसते आहे. अनेक वर्षांपासून स्त्रियांनी स्वतंत्रपणे गाडी चालवण्याच्या हक्काची मागणी केली होती. ती यंदा मान्य झाली. याच निर्णयाबरोबर आणखी एक महत्त्वाचा निर्णय नुकताच युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला आहे. हा निर्णय आईसोबत राहणाऱ्या, कायद्याने सज्ञान न झालेल्या मुलांच्या पारपत्रासंदर्भातला आहे.
सौदीमध्ये आत्ताआत्तापर्यंत स्त्रियांना कोणत्याही पुरुषाच्या संमतीशिवाय कुठेही बाहेर जाता येत नव्हते, की साधे पारपत्रसुद्धा बनवता येत नव्हते. अशातही एखादी स्त्री जर घटस्फोटित असेल आणि मुलं तिच्या ताब्यात असतील किंवा नवरा वारला असेल तर त्या मुलांच्या पारपत्रासाठी तिला कुटुंबातल्या पुरुषाची संमती घ्यावीच लागत असे. आता मात्र अशी संमती लागणार नाही. स्त्रिया स्वत:च स्वत:च्या पारपत्राचा अर्ज करू शकतात. तशी ही खूप काही मोठी सुधारणा नाही. मात्र जगभरात स्त्रिया सगळ्याच क्षेत्रांत पुढे असताना, सौदीमधली स्त्रियांची परिस्थिती पाहिली तर त्यांच्यासाठी या छोटय़ा गोष्टींचे मोलदेखील खूप मोठे आहे.
स्त्रियादेखील आपल्यासारख्याच असतात. त्या आपल्याहून कमी नसतात, आपल्या गुलाम नसतात, त्यांनाही जगण्याचा आपल्याएवढाच हक्क आहे याची जाणीव जेव्हा पुरुषवर्गात प्रामुख्याने होईल, अंमलबजावणी जगभरात सगळीकडे होईल तेव्हा मनुष्यप्राणी खरोखर सुसंस्कृत झालेला असेल.
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग ३१ ऑगस्ट 

पृथ्वी प्रदक्षिणा १७

अिहसक मार्गाने केला जाणारा सत्याग्रह ही भारताने जगाला दिलेली देणगी समजली जाते. उपोषण हे या सत्याग्रहातले एक प्रमुख हत्यार समजले जायचे. भारताबरोबरच आर्यलडला देखील उपोषणाचा खूप जुना इतिहास आहे. रशियामध्ये ल्युबोव्ह सोबोल या गेल्या महिन्याभरापासून उपोषण करत आहेत. कदाचित लेख छापून येईपर्यंत त्यांचे उपोषण रशियन सरकारने जोरजबरदस्ती करून सोडायलाही लावलेले असू शकेल. पण सध्याच्या काळात रशियन जनतेला रस्त्यावर येऊन त्यांचा असंतोष व्यक्त करण्याची संधी मात्र ल्युबोव्हच्या निमिताने नक्कीच मिळते आहे.
ल्युबोव्ह सोबोल ही रशियात एका मध्यमवर्गीय घरात नव्वदच्या दशकात आलेली तरुणी. सोवियत युनियन कोसळले तेव्हा शाळेतही न गेलेल्या पिढीचे ती प्रतिनिधित्व करते. तिने पाहिलेला, अनुभवलेला रशिया आधीच्या पिढीच्या अनुभवांपेक्षा नक्कीच जास्त मोकळा होता. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या ल्युबोव्हला सरकारी स्तरावर वेगवेगळ्या पातळीवर होणारा भ्रष्टाचार दिसला, तेव्हा तिने ‘आता शांत बसून चालणार नाही.’ अशीच भूमिका घेतली. २०१२ पासून तिने तिला दिसणाऱ्या गैरप्रकारांबद्दल मौन न पाळता जाहीर निषेध केला. काही वर्षांपूर्वी शाळांमधून दिलेल्या अन्नातून मुलांना विषबाधा झाली होती. हे प्रकरण दाबण्याचे खूप प्रयत्न झाले, पण ल्युबोव्हने हे प्रकरण उघडकीस तर आणलेच पण त्याचबरोबर त्यातील पीडित मुलांच्या पालकांना न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी कायदेशीर मदत देखील केली.
स्थानिक निवडणुकीला उभे राहण्यासाठी ५००० सह्य़ा अवश्यक असतात. ८ सप्टेंबरला मॉस्कोच्या स्थानिक पातळीवरच्या या निवडणुका आहेत. रशियात लोकशाही केवळ नावापुरती उरलेली आहे. विरोधकांना सरळ तुरुंगवासात तरी जावे लागत आहे किंवा काही विरोधक अचानक गायब होत आहेत.
याआधीही एकदा ल्युबोव्हने निवडणुकीला उभे राहण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी तिने स्वत:हूनच माघार घेतली होती. यावेळी मात्र न घाबरता निवडणुकीला उभे राहण्याचे ठरवले आणि त्यामुळेच त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
ती ज्यांच्याकडे सही घेण्यासाठी जायची, त्या लोकांना घाबरवले जायचे, त्यांनी जर सही दिलीच तर त्या सहीवर पाणी टाकणे, तो कागद खराब करणे असले उपद्रव केले जायचे. ल्युबोव्ह आणि तिच्या नवऱ्याचा, साथीदारांचा पाठलाग केला जायचा. त्यांच्यावर हल्ले केले जायचे. या सगळ्याला पुरून उरून जेव्हा त्यांनी ५००० सह्य़ा मिळवल्या तेव्हा निवडणूक आयोगाने ‘यातल्या काही सह्य़ा बनावट आहेत.’ असे म्हणून त्यांचा अर्ज बाद केला, या सगळ्याचा विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
पूर्वीपेक्षा समाजमाध्यमामुळे आता लोकांपर्यंत बातम्या, मग त्या खऱ्या असोत वा खोटय़ा, खूप लवकर पोहोचतात लोक त्यावर व्यक्तदेखील होतात. पोलीस ल्युबोव्ह यांना त्यांच्या घरातून घेऊन जात असताना अक्षरश: त्या ज्या सोफ्यावर बसल्या होत्या, त्याच्यासहित घेऊन चालले होते आणि त्या स्वत: फोनमध्ये त्याचे चित्रीकरण करत होत्या. हा व्हिडीओ गाजला नसता तर नवल होते.
त्यामुळेच त्यानंतरच्या शनिवारी अनेक जण मॉस्कोच्या रस्त्यांवर त्यांना समर्थन देण्यासाठी बाहेर पडले. अर्थात, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केलीच. रशिया हा कायम जगासाठी एक पोलादी पिंजराच राहिलेला आहे. आता किमान समाजमाध्यमांमुळे तिथली थोडी-बहुत झलक बघायला मिळत आहे. अशा वेळी ल्युबोव्हसारखीचे प्रयत्न प्रामाणिक असल्याची खात्री पटते. ‘हा जनतेचा पसा आहे, चुकीच्या ठिकाणी खर्च करू नका’, असे म्हणत भ्रष्टाचारविरोधी ठाम भूमिका घेणाऱ्या ल्युबोव्ह यांच्यासारख्यांची सध्या जगात अनेक ठिकाणी गरज आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
‘स्टॅच्यू फॉर इक्वॉलिटी’
तुमच्या शहरात किती पुतळे आहेत कधी मोजले आहेत का? त्यातही स्त्रियांचे किती आहेत याची कधी नोंद घेतली आहे का? न्यूयॉर्क शहरातले स्त्री पुतळ्यांचे प्रमाण तीन टक्क्यांहूनही कमी आहे, सिडनी आणि लंडनमध्ये हेच प्रमाण ४ टक्के, ३ टक्के असे आहे. ही सगळी आकडेवारी जिली आणि मार्क या जगातील सुप्रसिद्ध कलाकार दाम्पत्याच्या निदर्शनास आली. न्यूयॉर्क, सिडनी, सिंगापूर अशा मोठय़ा शहरांमध्ये या दोघांनी उभारलेले पुतळे अनेक ठिकाणी बघायला मिळतात.
एके दिवशी काम करता करता त्यांना लक्षात आले, त्यावेळेपर्यंत त्यांनी शंभरहून अधिक पुतळे उभारले असले तरी त्यातला केवळ एक पुतळा स्त्रीचा होता. मग त्यांनी पुतळ्यांमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर ताडून बघायचे ठरवले. तेव्हा त्यांना जे निष्कर्ष बघायला मिळाले त्यातूनच त्यांनी अधिकाधिक स्त्रियांचे पुतळे तयार करायचे ठरवले. याच भावनेतून मग जन्माला आली एक वेगळी चळवळ, ‘स्टॅच्यू फॉर इक्वॉलिटी.’
जिली आणि मार्क हे दोघेही कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘स्टॅच्यू फॉर इक्वॉलिटी’ वर काम करण्याच्या आधी त्यांनी बनवलेले ‘डॉग मॅन अ‍ॅण्ड रॅबिट वुमन’ यांचे पुतळे देखील तेवढेच प्रसिद्ध आहेत. हे पुतळे करण्याबद्दल त्यांचे म्हणणे होते की, कुत्रा आणि ससा एकत्र येऊ शकतात अशी कल्पनाही आपण कधी करत नाही. पण प्रत्यक्षात असे दोन वेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र येऊन जन्मोजन्मीचे बंध निर्माण होतात हे दाखवण्यासाठीच त्यांनी हा प्रयोग केला होता. समानतेचे कट्टर समर्थक असलेले जिली आणि मार्क यांनी जगभरात स्त्रियांचे पुतळे उभारण्याचा विडा उचलला.
२६ ऑगस्ट हा दिवस अमेरिकेत ‘स्त्री समानता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून न्यूयॉर्क शहरात जिली आणि मार्क यांनी बनवलेल्या जगप्रसिद्ध अशा दहा स्त्रियांच्या ब्राँझच्या पुतळ्यांचे अनावरण होणार आहे. केवळ न्यूयॉर्कपुरताच त्यांचा हा प्रकल्प सीमित नाही, सिडनी, वॉशिंग्टन,
सॅन फ्रान्सिस्को, लंडन, बीजिंग, शिकागो, ह्यूस्टन, टोरांटो, मेलबर्न, दिल्ली अशा इतर ठिकाणी देखील प्रसिद्ध स्त्रियांचे पुतळे उभारण्याची योजना आहे. ‘कोणत्या शहरात कोणते पुतळे उभारले जावेत असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कळवा,’ अशी सूचना देखील जिली आणि मार्क यांनी त्यांच्या संकेतस्थळावर टाकली आहे.
निकोल किडमन, केट ब्लँचेट, ट्रेसी डायसन, गॅबी डग्लस, जेन गुडविल, टेरेराय ट्रेंट, शेरील स्ट्रेड, जेनेट मॉक, ओप्रा विन्फ्रे, पिंक या त्या पहिल्या दहा मानकरी आहेत. हे केवळ प्रतिनिधित्व आहे. त्यातही आफ्रिकी वंशाच्या स्त्रियांना यात झुकते माप दिलेले आहे.
२६ ऑगस्टला हे दहा पुतळे समोर आल्यावर इतर शहरांमध्ये तयार असलेले पुतळे उभे केले जातील, त्याचबरोबर लोकांकडून आलेल्या सूचनांनुसार इतर नवीन पुतळे बनवले जातील. जिली आणि मार्क हे काम त्यांना महत्त्वाचे वाटते म्हणून करतात. हे जग घडवण्यात अनेक स्त्रियांचादेखील मोलाचा वाटा होता, आहे आणि असेल. त्याची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक साधन म्हणून जिली आणि मार्क या पुतळ्यांकडे बघतात.
स्त्रियांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, केवळ पुतळे उभारून काय होणार आहे, असा विचार करण्याऐवजी कदाचित हे पुतळे स्त्रियांच्या समाजातल्या योगदानाची आपल्याला आठवण करून देत राहतील असा विचार करून बघू या.
आहे कर्करोगग्रस्त तरीही..
समाजमाध्यमांमुळे प्रत्येकाला आपले आयुष्य अतिशय महत्त्वाचे वाटायला लागले आहे. काही जण केवळ पोस्ट, फोटो टाकून थांबतात तर काही जण व्हिडीओ करतात, स्वत:चे यूटय़ूब चॅनल चालवतात. लोकप्रिय यूटय़ूब चॅनेल्स हे साधारणत: पाकशास्त्राशी, नाहीतर सौंदर्यशास्त्राशी निगडित असतात. साधा ‘मेक-अप कसा करावा’ याचे लाखो व्हिडीओ यूटय़ूबवर सापडतात. दक्षिण कोरियामधल्या डाऊन ली हिने पाच वर्षांपूर्वी असेच स्वत:चे मेक-अप आणि त्याच्याशी संबंधित व्हिडीओ टाकण्यासाठी स्वत:चे यूटय़ूब चॅनल सुरू केले. त्याच्या लोकप्रियतेनंतर तिला मॉडेलिंगची कामेदेखील मिळायला लागली. कुणाला वाटेल तिच्यासारख्या अनेक जणी असतात, त्यात काय विशेष. पण यावर्षी फेब्रुवारीपासून डाऊनने तिचे वेगळेपण दाखवून दिले.
फेब्रुवारी २०१९ मध्ये डाऊनला कर्करोग झाल्याचे समजले. तोपर्यंत छोटय़ा-मोठय़ा खरेदीपासून घरात ब्रश करणे, केस विंचरणे अशा सगळ्या गोष्टींचे व्हिडीओ करणाऱ्या डाऊनने या आजारपणाच्या उपचारांचे देखील व्हिडीओ करायचे ठरवले. व्हीब्लॉगर म्हणून डाउन लीचे नावही गाजत होतेच. त्यामुळे तिने केमोथेरपी करतानाचा स्वत:चा अनुभवसुद्धा कॅमेऱ्यात टिपून ठेवला. हाताला नळ्या लावलेल्या असतानादेखील तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कमी झाले नव्हते. त्यानंतर जेव्हा केस गळायला लागले तेव्हाचे अनुभव देखील तिने असेच व्हिडीओबद्ध केले. मग गळणारे केस कमी दिसावेत म्हणून काळी चादर, गादी अंथरली, पण तरीही ते गळणारे केस थोडेच थांबणार होते? तेव्हा तिने जाऊन सरळ पूर्ण केस कापून टक्कल केले. त्यावेळीसुद्धा जोपर्यंत केस छोटे होते तोपर्यंत तिला स्वत:च्या चेहऱ्यात काही वेगळेपण जाणवत नव्हते, पण जसजसे टक्कल दिसायला लागले तेव्हा, ‘आपण आता इतरांपेक्षा वेगळ्या झालोत.’ या जाणिवेने तिला एकदम भरून आले. तिच्या प्रियकराने तिला या भावनेतून बाहेर पडायला मदत केली. आज तिचे सहा लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे व्हिडीओ ३० लाखांहून जास्त लोकांनी पाहिलेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात या आजारपणातून बाहेर पडल्यावर जवळपास वर्षभराने तिने एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले. त्याआधी तिने तिच्या शैलीत स्वत:चा व्हिडीओ करून अपलोड केला.
कर्करोगाचे उपचार सुरू आहेत म्हणून आयुष्य काही थांबत नाही. त्यावर रडत बसण्याऐवजी त्यात येणारे अनुभव जगभरातल्या लोकांबरोबर वाटून डाऊन लीने स्वत:चे वेगळेपण दाखवून दिले. आजारी लोकांनी मेक-अप करू नये असे कुठे असते, स्वत:ला ज्यातून आनंद मिळतो ते करणे महत्त्वाचे.
विकेशा डाऊन लीने ती कोणकोणते विग वापरते हेसुद्धा एका व्हिडीओमध्ये सांगितले. अशा व्हिडीओमधून तिच्याही नकळत ती तिच्यासारख्या अनेक जणींना या आजाराला, त्याच्या उपचारांना सामोरे जाण्याची शक्ती देत होती. हे सगळे बघताना सोनाली बेंद्रेचीदेखील आठवण होणे साहजिकच. केवळ बा सौंदर्याच्या तथाकथिक मानकांना बळी पडून स्वत:चे आयुष्य न्यूनगंडात घालवण्यापेक्षा ‘मी जशी आहे तशी मला आवडते.’ हे म्हणून पुढे जाणे जास्त महत्त्वाचे. डाऊन लीसारख्या अनेकजणी आपल्या अवतीभोवती असतात. डाऊन लीच्या निमित्ताने सौंदर्याची मानके बदलवणाऱ्या, आंतरिक सौंदर्य मिरवणाऱ्या सगळ्या जणींचे अभिनंदन. त्यांच्यामुळेच निखळ सौंदर्य अजूनही टिकून आहे.
(स्त्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे.)
चतुरंग १८ऑगस्ट 

पृथ्वी प्रदक्षिणा १६

‘स्त्रियांना नेमके काय हवे असते?’ हा तसा जागतिक आणि कायमच एक अवघड व गूढ प्रश्न म्हटला जातो. या प्रश्नाची अनेक उत्तरे असली तरीही स्त्रियांना सुखावणारे एकच उत्तर आहे ते म्हणजे, ‘स्त्रियांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे स्वातंत्र्य हवे असते.’
एकविसाव्या शतकातली दोन दशके संपत आलेली असतानादेखील अनेक ठिकाणी अनेक बाबतींत स्त्रियांना स्वत:शी निगडित निर्णयसुद्धा घेता येत नाहीत. गर्भपात हा त्यातला एक कळीचा विषय आहे. मातृत्व हे स्त्रीवर लादलेले असू शकते. आई होण्यासाठी स्त्री केवळ शारीरिकदृष्टय़ा नव्हे तर मानसिकदृष्टय़ासुद्धा तयार असावी लागते. परंतु कधी तरी गफलतीने राहिलेला गर्भ असू शकतो. क्वचित कधी तरी गर्भ वैद्यकीयदृष्टय़ा निरोगी नसतो, तर कधी ती गर्भधारणा आईच्या जिवासाठी धोकादायक असते. परंतु असे असूनही धर्म मान्यता देत नाही म्हणून काही प्रगत देशांमध्ये आजही गर्भपाताला विरोध होत आहे.
उत्तर आर्यलड हा युनायटेड किंगडमचा एक भाग. आयरिश रिपब्लिक हा स्वतंत्र देश असला तरीही १९२२ मध्ये उत्तर आर्यलडने यूकेबरोबर राहणेच पसंत केले होते. अनेक बाबतीत या प्रांताला स्वातंत्र्य आहे, जसे की, इथे राहणाऱ्यांमधील अनेक लोकांकडे आयरिश पासपोर्ट आहे, काही क्रीडा स्पर्धामध्ये त्यांचा स्वतंत्र चमू असतो. त्यांचे अनेक कायदे यूकेपेक्षा वेगळे आहेत. नुकतेच ब्रिटिश पार्लमेंटने उत्तर आर्यलडमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा आणि समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा असे दोन्ही ठराव मोठय़ा बहुमताने संमत केले. अजून याचे कायद्यात रूपांतर व्हायचे आहे, पण त्यात कोणतीही कायदेशीर अडचण आता उरलेली नाही.
दक्षिण आर्यलड म्हणजे आयरिश रिपब्लिकमध्ये गेल्या वर्षीच सार्वमत घेऊन गर्भपाताला ‘काही परिस्थितींमध्ये’ कायदेशीर मान्यता देण्यात आली. दक्षिण काय किंवा उत्तर काय, आर्यलडमध्ये परंपरावादी ख्रिश्चन जास्त आहेत. धर्माचा हवाला देऊन ते म्हणतात, ‘गर्भपात ही हत्या आहे. त्यामुळे गर्भपाताला कायदेशीर संमती मिळू नये.’ याच विचारधारेमुळे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’मधील काही राज्यांमध्येही गर्भपाताला कायदेशीर मान्यता नाही. काही ठिकाणी अपवाद म्हणून आईच्या जिवाला धोका होऊ शकतो, या एका कारणामुळे गर्भपाताला परवानगी देतात. धर्माच्या नावाखाली अशा गोष्टी केल्या जातात तेव्हा त्या आजच्या काळाशी सुसंगत आहेत की नाही, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे; जो अनेक प्रगत देशांमध्येही होताना दिसत नाही. ‘शिक्षणामुळे धर्म समजून घेता येईल’, या धारणेलाच तडा जातो आहे.
मातृत्व ही खूप मोठी जबाबदारी असते, त्यामुळे समजून-उमजून त्याबाबतचा निर्णय घ्यायचा असतो. गर्भधारणा, अपत्यजन्म, त्याचे संगोपन हे सगळे स्त्रीच्याच आयुष्याशी निगडित असतात, त्यामुळे त्यासंबंधीचा निर्णय तिचाच असला पाहिजे. कोणताही धर्म जगण्याचा हक्क नाकारत नाही, मग तो जन्माला आलेल्या स्त्रीचा असो वा पुरुषाचा!
‘युरोपियन युनियन’चा बदलता चेहरा
गेल्या दोन-तीन वर्षांत जगात राजकीयदृष्टय़ा लक्षणीय बदल घडून येत आहेत. अनेक देशांमध्ये प्रमुखपदी स्त्रियांची नियुक्ती झालेली दिसते. कदाचित २०२० मध्ये अमेरिकेतही पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष निवडून येऊ शकते. जगातील सर्वात प्रगत देश म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेत अजूनही कुणी स्त्री राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. त्याच वेळी युरोपमध्ये मात्र प्रमुख पदांवर स्त्रियांची नियुक्ती झालेली बघायला मिळते. आजघडीला युरोपमध्ये अनेक महत्त्वाच्या जागांवर स्त्रिया कार्यरत आहेत.
विसाव्या शतकात साठच्या दशकात युरोपमधील काही देशांनी एकत्र येऊन ‘युरोपिअन युनियन’ची पायाभरणी केली. १९९९ पासून आजपर्यंत एकोणीसहून अधिक युरोपियन देश युरो हे चलन त्यांच्या देशात वापरत आहेत. २०१९ हे वर्ष ‘युरोपियन युनियन’साठी विशेष म्हणावे लागेल. कारण याच वर्षी उर्जुला व्होन डर लायन यांची ‘युरोपियन कमिशन’च्याअध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच स्त्री आहेत. ‘युरोपियन युनियन’च्या कामाचे व्यवस्थापन, देशादेशांमधील समन्वय अशी महत्त्वाची कामे ‘युरोपियन कमिशन’च्या अखत्यारीत येतात. या वर्षी जुल महिन्यात ‘युरोपियन पार्लमेंट’ने उर्जुला यांची या पदासाठी बहुमताने निवड केली.
उर्जुला यांनी २००५ ते २०१९ अशी चौदा वर्षे सलग जर्मनीच्या प्रमुख अ‍ॅन्जेला मर्केल यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवलेले आहे. ब्रसेल्समध्ये जन्मलेल्या पण जर्मन भाषिक उर्जुला यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर काही वर्षांनी वैद्यकीय पदवीदेखील मिळवली. त्यांना जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजी भाषा अस्खलित बोलता येतात. हॅनोव्हरमधील इस्पितळात त्यांनी काही काळ असिस्टंट डॉक्टर म्हणूनदेखील काम केले होते. २००१ पासून त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला. सुरुवातीला हॅनोव्हरमध्ये स्थानिक पातळीवर काम केल्यानंतर २००३ मध्ये त्या पार्लमेंटमध्ये निवडून गेल्या. २००५ मध्ये त्यांना मर्केल यांच्या मंत्रिमंडळात ‘महिला, कुटुंब-कल्याण, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकमंत्री’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याच काळात त्यांनी पितृत्व रजाही सुरू केल्या. यावर अनेक वाद-विवाद झाले, पण त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या. याच काळात त्यांनी जर्मनीमध्ये ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’वर बंदी घातली होती. २००९-२०१३ या काळात त्यांनी कामगार आणि सामाजिक विभागमंत्री म्हणून कार्य केले. त्या काळात त्यांनी कंपन्यांमध्ये स्त्रियांचे प्रतिनिधित्व वाढावे म्हणून प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. २०१३ ला मर्केल यांनी उर्जुला यांच्यावर अधिक महत्त्वाची जबाबदारी टाकली, ती संरक्षण खात्याची. उर्जुला या जर्मनीच्या पहिल्या स्त्री संरक्षणमंत्री होत्या.
उर्जुला सुधारणावादी विचारांच्या असल्याने वादाचे प्रसंग त्यांना नवीन नव्हतेच, २०१६ मध्ये सौदी अरेबियाला सरकारी भेट देतानाही त्यांनी हिजाब घालण्यास नकार दिला. ‘मला ही गोष्ट पटत नाही, त्यामुळे मी हे करू शकत नाही.’ हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ट्रम्प यांनी जर्मन-रशियन संबंधावर ट्वीट केले तेव्हाही त्यांनी ‘हा आमचा प्रश्न आहे, आम्ही बघून घेऊ’ अशा आशयाचे उत्तर दिले होते. ब्रेक्झिटच्या वाटाघाटी अजूनही सुरूच आहेत, युरोपातील अनेक देशांना विस्थापितांचा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर भेडसावतो आहे. आजवर शांत असलेल्या युरोपलादेखील आता दहशतवादाची झळ पोहोचते आहे. या भूमीवरदेखील आता रक्तपात घडत आहेत. ‘युरोपियन युनियन’चे एकूणच अर्थकारण, भूगोल बदलतो आहे. अशा वेळी उर्जुला यांच्यासारखी उच्चशिक्षित, ठाम, खंबीर, धोरणी स्त्री ‘युरोपियन कमिशन’ची प्रमुख होते आहे ही निश्चितच उत्साहवर्धक गोष्ट आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर स्वत:ची ओळख करून देताना ‘युरोपियन युनियनची प्रमुख’ बरोबरच ‘सात मुलांची आई’ हे लिहिणाऱ्या उर्जुला यांनी कार्यालयीन आयुष्याबरोबरच आपल्या खासगी आयुष्यालादेखील महत्त्व दिले आहे हेच लक्षात येते. येत्या १ नोव्हेंबरपासून आपल्या कामाची सुरुवात करणाऱ्या उर्जुला यांना शुभेच्छा!
लग्नाआधी वैद्यकीय तपासणी
‘कन्या वरयते रूपं, माता वित्तं, पिता श्रुतं’ हे सुभाषित आजही अनेक बाबतींत खरे आहे. लग्न ठरवताना आजही रूप, शिक्षण आर्थिक परिस्थिती या सगळ्यांचाच प्रामुख्याने विचार होतो. पत्रिका बघण्याचे प्रमाण आता कमी झाले असले तरी लग्नाआधी दोघांच्याही आरोग्य तपासणीचा आग्रह आजही धरला जात नाही. काही वेळा अर्धवट माहितीतून मुलगा-मुलगी एकाच रक्तगटाचे असले तर नकार दिला जातो, पण वैद्यकीय सल्ला फारच क्वचित घेतला जातो.  या सगळ्याचा परिणाम पुढच्या पिढीवर नक्कीच होत असतो.
नायजेरियामध्ये ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ अथवा ‘सिकल सेल डिसीज’ (एससीडी)चे प्रमाण दर चारांतील एका व्यक्तीला, इतके जास्त आहे. जगात एससीडीचे सर्वाधिक रुग्णदेखील नायजेरियामध्येच आढळतात. नवजात अर्भकांमध्येही दर शंभरमधल्या दोन बालकांना यांची जन्मत:च लागण झालेली असते. या सगळ्यामुळेच नायजेरियामध्ये सिकल सेलवर खास संशोधन केले जाते आहे. या आजारामुळे गर्भधारणा होण्यास किंवा झालीच तर गर्भावस्थेत, प्रसूतीवेळीदेखील अनेक प्रकारची गुंतागुंत होऊन गर्भवती स्त्री किंवा अपत्याचा मृत्यू होऊ शकतो. हा आजार विशिष्ट गुणसूत्रे असलेल्या व्यक्तींना होतो. आई-वडील अशा दोघांमध्येही ती गुणसूत्रे असतात तेव्हा पुढच्या पिढीत या आजाराची गुणसूत्रेदेखील जातात. त्यामुळे लग्नाआधीच स्त्री-पुरुष दोघांनीही स्वत:ची गुणसूत्रे तपासली तर या आजाराचे पुढच्या पिढीतील संक्रमण थांबवता येऊ शकते.  या सगळ्या माहितीचा परिणाम म्हणूनच नायजेरियामध्ये अनेक तरुणी लग्नाआधी ‘डेटिंग’ करताना तरुणांकडे त्यांच्या गुणसूत्रांच्या तपासणीची मागणी करतात. अनेक सेवाभावी संस्थादेखील तरुणांमध्ये या आजाराविषयी समुपदेशन करत आहेत. या वर्षी मे महिन्यात नायजेरियाच्या पूर्व भागात लग्नाआधी सिकल सेलची तपासणी करणे अनिवार्य केलेले आहे. काही चर्चनीदेखील ‘वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याखेरीज लग्न होणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेतली आहे.
डेटिंग करताना गुणसूत्रे विचारणे हा त्या अर्थाने मी या नात्याला पुढे नेऊ इच्छिते, असाच अर्थ आहे. आपल्याकडेदेखील ही सजगता यावी आणि लग्नाआधी वैद्यकीय चाचणीचे महत्त्व पटायला हवे. ही अपेक्षा.
(स्रोत – इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे)
चतुरंग 
३ ऑगस्ट २०१९

पृथ्वी प्रदक्षिणा १५

सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच विषय चर्चिला जात आहे. ‘जगातल्या सगळ्या देशांना भेट देणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री कोण?’ अमेरिकेत जन्मलेल्या ५५ वर्षीय वोनी स्पॉट यांनी अलीकडेच, मेमध्ये ७ खंडांतील १९५ देशांना भेट दिल्याचे जाहीर केले. त्याच वेळी जेसिका नबोंगो या अमेरिकेत जन्मलेल्या पण मूळ युगांडाच्या असलेल्या कृष्णवर्णीय स्त्रीनेही ‘मीच जगातील प्रत्येक देशाला भेट देणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री असेन,’ असा दावा केलाय.
३४ वर्षांच्या जेसिकाचे जगभ्रमण तिच्याही नकळत तिच्या आई-वडिलांबरोबर सुरू झाले होते. २९ मार्च २०१८ मध्ये तिने बालीमधून तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिले होते, की तिने आजवर १०६ देशांना भेट दिली आहे, आणि तिला अजून ८९ देशांना भेट द्यायची आहे. मे २०१९ पर्यंत हे पूर्ण करून तिला ‘जगातील प्रत्येक देशाला भेट देणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री’ व्हायचे होते. तिने आजवर भेट दिलेल्या प्रत्येक देशातला फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर टाकला होता. त्याचबरोबर ब्लॉगवर ती तिच्या प्रवासाबद्दलही लिहीतच होती. अमेरिकेत जन्मलेल्या जेसिकाचे शिक्षण ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये झाले. त्यानंतर काही काळ तिने ‘युनो’मध्येदेखील काम केले. अमेरिकी पासपोर्ट बरोबरच तिच्याकडे युगांडाचा पासपोर्टदेखील आहे. हा लेख लिहून होईपर्यंत तिने १८० देशांना भेट दिली होती. सीरिया, येमेनसारख्या युद्धग्रस्त देशांना भेट द्यायला तिच्या ‘युनो’मधल्या ओळखीचा तिला फायदा झाला. तिने ठरवलेले उद्दिष्ट मे मध्ये नाही पण ऑक्टोबर २०१९ मध्ये पूर्ण होईल. पण त्याआधीच वोनीने दावा केला आहे, की तिने जेसिकाच्या आधीच १९५ देशांना भेट दिलेली आहे.
वोनीने अनेक वर्षांपूर्वीच विविध देशांची भ्रमंती सुरू केली. निमित्त होते एका माहितीपटाचे. ९०च्या दशकात अनेक देशांमध्ये तिने फिरायला सुरुवात केली होती. पण त्या माहितीपटाच्या दिग्दर्शकाचे अकाली निधन झाले आणि तो प्रकल्प तिथेच थांबला. पण तिचे फिरणे काही थांबले नव्हते. २०१४-२०१८ या काळात तिने उरलेल्या ३३ देशांनादेखील भेट दिली. तिच्याकडे या भेटींचेच फक्त फोटो आहेत. भेटींशिवाय जुने कोणतेच फोटो नाहीत. तिने कधी कोणत्याही सोशल मीडियावरदेखील तिच्या भेटींचे वृत्तांत प्रसिद्ध केले नाहीत. तिच्या मते हे माझ्या स्वत:च्या आनंदासाठी करत होते, त्यामुळे मला याची माहिती जपून ठेवावी, कोणाला तरी सतत सांगावीशी वाटली नाही.
एक आहे जेसिका, जिने प्रवास करताना सगळे फोटो, पुरावे म्हणून ठेवले आहेत तिच्यावर विश्वास ठेवायचा की पहिल्यांदा कामानिमित्त आणि नंतर स्वांतसुखाय प्रवास करणाऱ्या, त्याचे पुरावेही मागे न ठेवलेल्या वोनीवर? वोनीने आपण कृष्णवर्णीय आहोत हे दाखवण्यासाठी स्वत:चा डीएनए अहवालसुद्धा प्रसारमाध्यमां- समोर ठेवलाय. वोनी म्हणते, ‘‘मी हे आत्ता केवळ जेसिकाचे श्रेय हिरावून घेण्यासाठी बोलले असे नाही. जेसिकाने नक्कीच एक चांगले उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. माझे सातही खंड फिरून झाले असले तरीही मला अजून फिरायचे आहे.
प्रवासाने माणसाला अनुभव मिळतात आणि अनुभवाने चातुर्य. वोनीचा दावा मान्य होईल, की जेसिकाचा, हा तसा वादाचा आणि पुराव्यांचा मामला. पण जगभ्रमणाने त्यांचे आयुष्य समृद्ध केले असणार हे नक्की.
यशस्वी लढा
‘‘आयुष्यात सगळ्यात जास्त भीती वाटायची ती कर्करोगाची. २००६ ची ही गोष्ट आहे. माझ्या एका जवळच्या मित्राच्या बायकोला कर्करोग झाला होता. त्याच वेळी माझ्या नात्यातल्या एका काकांनादेखील कर्करोग असल्याचे कळले. माझ्याच शहरात राहणाऱ्या माझ्या दोन जवळच्या लोकांना कर्करोगाने गाठले होते हा योगायोग नसावा, असा माझा ठाम विश्वास होता. मी यामागे काय कारण असू शकते हे शोधायचा प्रयत्न केला तेव्हा मला आमच्या गावाच्या जवळच असलेले कचऱ्याचे डिम्पग ग्राऊंड आठवले. त्या ठिकाणी रासायनिक कचरा आणि वैद्यकीय कचरा वेगळा करून पुरला जायचा आणि त्यावर नवीन कचरा यायचा. या कचऱ्यामुळे आमच्या भागात कर्करोगाचे प्रमाण वाढले होते, हे आम्ही ३५ वर्षांची माहिती मिळवून सिद्ध केले. अशा वातावरणात खासकरून ८ प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते, हे आम्ही शास्त्रीयदृष्टय़ा दाखवून दिले. न्यायालयात या लढय़ाचे काय होईल याची फिकीर न बाळगता आम्ही पूर्ण शक्तीने लढलो, अर्थात निकाल आमच्याच बाजूने लागला. त्या जागेवरती फक्त आमच्याच नव्हे तर आजूबाजूच्या देशांतून येऊन टाकला जाणारा कचरा न्यायालयाच्या आदेशाने थांबला होता.’’ २०१६ मध्ये ‘गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल फाउंडेशन’चा पुरस्कार मिळवणारी झुझुना कॅपिटोव्हा तिने दिलेल्या लढय़ाबद्दल अशी भरभरून बोलते. आता झुझुनाकडे बोलायला आणि करायला खूप गोष्टी आहेत, कारण वयाच्या केवळ ४५व्या वर्षी ही जबाबदारी सांभाळणारी ती स्लोव्हाकियाची पहिली स्त्री आणि तरुण राष्ट्राध्यक्ष झाली आहे. स्लोव्हाकिया कम्युनिस्ट रशियाचा भाग असताना जन्मलेली, महाविद्यालयामध्ये असताना आवश्यक ती कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यामुळे तिला मानसशास्त्राऐवजी कायद्याचा अभ्यास करावा लागला होता. बेकायदेशीररीत्या मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्याविरुद्ध तिने न्यायालयात कायदेशीर लढाई केली. त्याआधी निदर्शने केली, लोकांचा पाठिंबा मिळवला, माहिती गोळा करून पुरावे शोधले. या सगळ्या गोष्टी करताना तिच्या विरोधातले माफियाही शांत नव्हते, त्यांनी साम, दाम, दंड, भेद सगळे प्रकार वापरून बघितले, पण झुझुना बधली नव्हती. तिने ज्या पद्धतीने कचरा माफियांविरुद्ध यशस्वी लढा दिला, तसाच लढा ती देशातला भ्रष्टाचार संपवायलादेखील देईल, असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटतो. त्यामुळेच कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसतानाही या वर्षी झालेल्या निवडणुकीत ५८ टक्के मते मिळवून ती जिंकली. आता तिच्यापुढे फक्त एक गाव, त्याचा लढा नाही तर पूर्ण देश आणि त्याचे प्रश्न असणार आहेत. समलैंगिक संबंधांना पूर्ण संमती देणारी, युरोपमध्ये असल्याचा अभिमान बाळगणारी, झेन योगा गेल्या १३ वर्षांपासून करणारी झुझुना ही स्लोव्हाकियाच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक देशांसाठी एक नवे प्रेरणास्रोत ठरणार आहे. स्त्रियांमध्ये कोणतीही गोष्ट नेटाने करण्याची उपजत शक्ती जास्त असते, त्याच वेळी ‘आपल्या मुलाबाळांचे भविष्य आपणच जपले पाहिजे’ ही मातृत्वाची भावना प्रबळ असल्यामुळेच कदाचित जेव्हा स्त्री नेतृत्व पुढे येते तेव्हा सुधारणा झालेल्या दिसतात. किमान सुधारणा होतील हा विश्वास तरी लोकांमध्ये आलेला असतो. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी झुझुनाला अनेक शुभेच्छा!
ब्युटी विथ अ डिफरन्स
१९९४ मध्ये एकाच वेळी भारतीय स्पर्धकांनी ‘मिस युनिव्हर्स’ आणि ‘मिस वर्ल्ड’चा सन्मान मिळवल्यानंतर अशा सौंदर्य स्पर्धाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात झाली. त्यातही हा किताब जिंकणाऱ्या सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या असल्यामुळे अशा स्पर्धा केवळ श्रीमंत, अतिश्रीमंत मुलींसाठीच असतात हा समज मोडीत निघाला. या स्पर्धामध्ये सगळ्याच स्पर्धकांना प्रश्नदेखील विचारले जातात, या प्रश्नांच्या आधाराने या स्त्रिया केवळ सुंदर नसून स्वतंत्र विचार करणाऱ्यादेखील आहेत ना याचा शोध घेतला जातो. आता अशा सौंदर्य स्पर्धामध्ये ‘शो युअर टॅलेंट’ अशीही एक फेरी काही ठिकाणी सुरू झालेली आहे.
मागच्या महिन्यात, जून २०१९ मध्ये अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या या वर्षीच्या सौंदर्यवतीचा शोध घेण्यासाठी स्पर्धा झाली. त्यात फक्त बाह्य़ सौंदर्याचे मापक लावण्यापेक्षा स्पर्धकांच्या इतर कलागुणांची माहिती करून घेण्यासाठी एक खास फेरी ठेवली होती. या फेरीत काही स्पर्धकांनी नृत्य करून दाखवले, तर काहींनी ऑपेरा पद्धतीचे गाणे म्हटले, काहींनी पियानो वाजवून दाखवला, काहींनी पपेट शो करून दाखवला. या फेरीत सगळ्यात वेगळी ठरली ती कॅमिल श्रॉयर! २४ वर्षांच्या या तरुणीने सौंदर्यस्पर्धेत आजवर कोणीही केले नसेल असे काहीतरी करून दाखवले. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असणारी कॅमिल सध्या जीवरसायनशास्त्रामध्ये पीएच.डी. करत आहे. पांढरा कोट, रबरी हातमोजे घालत, डोळ्यांवर गॉगल चढवून तिने काही मिनिटांसाठी तिची प्रयोगशाळा त्या स्टेजवर आणली. तीन वेगवेगळ्या काचेच्या भांडय़ांमध्ये तिने वेगवेगळी रसायने भरून ठेवली होती. हायड्रोजन पॅरॉक्सॉइड आणि पोटॅशिअम आयोडाइड यांचे मिश्रण केले तर विघटन होते आणि फोम तयार होतो हे तिने सर्वाना दाखवले.
‘‘मला लहानपणापासून वैज्ञानिक गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी त्याचेच शिक्षण घेत आहे. जेव्हा माझ्या आईने मला असा काही प्रयोग या स्पर्धेत करण्याचे सुचवले तेव्हा मी जरा साशंक होते, पण हे आजवर कोणीही केलेलं नसल्यामुळे वेगळे नक्कीच ठरेल याची मला खात्री होती.’’ स्पर्धा जिंकल्यानंतर कॅमिलने तिच्या भावना अशा व्यक्त केल्या. तिच्या या जगावेगळ्या प्रयोगाने तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी नक्कीच मदत केली असणार. ‘विज्ञान हे फक्त प्रयोगशाळेत नसून आपल्या अवतीभोवती सगळीकडे असते.’ हेच तिला यातून दाखवून द्यायचे होते. आता ‘मिस अमेरिका’च्या स्पर्धेत ती काय करून दाखवेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
‘सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा संगम दुर्मीळ असतो,’ हे पूर्वीचं गृहीतक आजच्या सौंदर्यवतींनी खोटं ठरवलं आहे. तर दुसरीकडे ‘सौंदर्यस्पर्धा म्हणजे शरीराचे प्रदर्शन नव्हे,’ हेदेखील रूढ होत आहे. याआधीदेखील अनेक कृष्णवर्णीय स्त्रियांनी ‘मिस युनिव्हर्स’, ‘मिस वर्ल्ड’सारखे किताब जिंकून ‘गोरा रंग हा सौंदर्याचा निकष नसतो.’ हेच दाखवून दिले होते. आपल्याकडेदेखील कॅमिलसारख्या वेगळा विचार करणाऱ्या सौंदर्यवती पुढे येवोत, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे.
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग 
२० जुलै २०१९

Sunday, July 14, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा १४'

कार्यालयीन पार्टीत मुद्दाम जास्त खाद्यपदार्थ मागवून नंतर घरी घेऊन जाणारे किती तरी महाभाग असतात. ‘ऑफिसच्या बिलांमध्ये घरच्या खर्चाची एखाद् दोन बिले घुसवली तर काय मोठा फरक पडणार आहे?’ असे म्हणणारेही  बरेच असतात. असेच काहीसे सारा नेत्यानाहू अर्थात इस्रायलच्या पंतप्रधानांच्या पत्नीला देखील वाटले असावे. त्यामुळे त्यांनी घरी स्वयंपाकी असतानाही बाहेरून जेवण मागवले आणि त्याचे बिल इस्रायलच्या सरकारी बिलांमध्ये लावून टाकले. घरी जेऊन खोटी हॉटेलची बिले सादर केली. त्यांचा पती,  बेंजामिन नेत्यानाहू हा इस्रायलचा पंतप्रधान म्हणजे देशाची जबाबदारी पूर्ण त्यांच्यावर, त्यामुळे थोडे फार लोकांचे पैसे घेतले तर त्यात काय चूक? असे मानत सारा नेत्यानाहू वागल्या. पण नुकताच तिथल्या न्यायालयाने हा सरकारी पैशांचा गैरवापर आहे असे सांगून  पंतप्रधानांच्या या पत्नीलाच आर्थिक दंड सुनावला. सरकारी पैशांतूनच नेमलेला स्वयंपाकी घरी असताना सारा यांनी अनेक वेळा घरगुती पाटर्य़ासाठी बाहेरून खाणे मागवले आणि स्वयंपाकी गैरहजर आहे, असे सांगून ती बिले सरकारी पैशांनी भरली. ही प्रकरणे बाहेर आली तेव्हा त्यांनी यावर सोयीस्कर मौन धारण केले, जेव्हा सखोल चौकशी झाली आणि पुरावे मिळाले तेव्हा त्यांनी त्याचे खापर हिशोब ठेवणाऱ्या लोकांवर फोडले. जवळपास एक लाख अमेरिकन डॉलरचा (६९ लाख ४ हजार रुपये ) हा घोटाळा होता, पण प्रकरण दाखल होई होईतो ५० हजार डॉलरवर येऊन पोहोचला आणि शिक्षा सुनावता सुनावताना जेमतेम १५,३०० डॉलरचा आर्थिक दंड सारा नेत्यानाहू यांना सुनावला गेला. अर्थात त्याआधी त्यांनी न्यायालयात आपली चूक मान्य केली होतीच. सप्टेंबरमध्ये इस्रायलमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच वेळी नेत्यानाहू यांच्यावरदेखील लाच घेतल्याचे, पदाचा गैरवापर केल्याचे आरोप झालेले आहेत. ते पंतप्रधान असतानाही आणि वेळोवेळी ‘माझी पत्नी निरपराधी आहे,’ असे ठासून सांगूनही त्यांच्या पत्नीला न्यायालयाने दोषी ठरवले हा तसा त्यांनाही एक धक्काच असणार. यानिमित्ताने एक गोष्ट समोर आली की इस्रायलमधली न्यायव्यवस्था इतकी निष्पक्ष आहे, की सत्तेत असणाऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा सुनावली गेली. सरकारी मालमत्तेचा उपयोग सत्तेत असतानाच नव्हे तर सत्ता सोडतानादेखील करणारे आपल्याकडे भरपूर आहेत, न करणारा एखादा विरळाच. पण इस्रायलमध्ये होऊ शकते तर आपल्याकडे का नाही या हेतूने जर कोणी जनहित याचिका केली तर कोणा कोणाची नावे पुढे येतील हे बघावे लागेल.
नावाच्या पलीकडे
‘मेरीजुअना पेप्सी’ म्हटल्यावर डोळ्यांसमोर मादक पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक येते, पण अशा नावाची एखादी व्यक्ती असू शकेल असे चुकूनही वाटत नाही. अमेरिकेत शिकागोमध्ये अशी व्यक्ती आहे आणि तिने नुकतीच ‘नेम्स इन व्हाइट क्लासरूम्स : टीचर बिहेवियर्स अ‍ॅण्ड स्टुडन्ट परसेप्शन्स’ असा प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली आहे. त्यासाठी कारणीभूत ठरलं ते तिचं बालपण. लहानपणापासून सगळीकडे तिच्या नावाची थट्टाच केली गेली. एकदा तर शिक्षिकेने तिचे नाव बदलून मेरी ठेवले आणि त्याच नावाने तयार केलेलं प्रमाणपत्र ती घरी घेऊन आली. त्याबद्दल आईने विचारताच आपल्याला या नावाने चिडवत असल्याचे तिने सांगितले. त्यावेळी आईने तिला सांगितले, ‘‘तुझे नाव मेरीजुअना आहे, मेरी नाही. हेच नाव तुझी ओळख आहे, लोक हसतात म्हणून वेगळे नाव घेण्याची गरज नाही. हेच नाव तुला पुढे घेऊन जाईल.’’ त्या दिवसापासून ती लोकांना तिचे नाव ठासून सांगायला लागली.
तिच्या आईप्रमाणेच अमेरिकेत अनेकदा कृष्णवर्णीय किंवा रेड इंडियन समाजातल्या मुला-मुलींची नावे वेगळी असतात, अगदी सर्वसामान्य, मेरी, जेन, क्रिस, बॉब यापेक्षा वेगळी. त्यामुळे अनेकदा नाव ऐकूनच हा मुलगा किंवा मुलगी गोरी नसणार असा अंदाज लावला जातो. स्वत: शिक्षिकेची नोकरी केलेल्या मेरीजुअनानेही हा अनुभव घेतला. तिच्या सहशिक्षिका वर्गात जायच्या आधीच मुलांची नावे बघून त्यातल्या अशा वेगळ्या नावांची टिंगल करायच्या. त्या मुलांबरोबरच्या वागण्यात देखील हा टिंगलीचा सूर कायम असायचा. अनेक जण तो विद्यार्थी कसा आहे हे जाणून घ्यायच्या ऐवजी केवळ त्याच्या नावामुळे त्याला वेगळी वागणूक द्यायच्या. पण या सगळ्याचा त्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो हे त्यांच्या खिजगणतीतही नसायचे. त्यामुळे जेव्हा पीएच.डी.ची संधी मिळाली तेव्हा तिने हाच विषय निवडला. जेव्हा एखादा शिक्षक/ शिक्षिका नावामुळे मुलांना वेगळी वागणूक देतात तेव्हा तो त्या शिक्षकांचा पराभव असतो. कोणालाही त्यांच्या नावामुळे वेगळी वागणूक देण्याऐवजी त्या नावामागचा अर्थ, त्याचं कारण समजून घेतले पाहिजे. जसे मेरीजुअनाच्या आईने केले आणि तिनेही स्वत:च्या आईचा हा विश्वास सार्थ ठरवत स्वत:चे नाव जगभर पोहोचले.
लोकसत्ता, पृथ्वी प्रदक्षिणा, चतुरंग ६ जुलै २०१९
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे.)

पृथ्वी प्रदक्षिणा १३

कोणत्याही गोष्टीची सक्ती झाली की त्याचे बंधन वाटायला लागते आणि जेव्हा या बंधनाची जाणीव होते तेव्हा ते झुगारावेसे वाटते. असेच काहीसे जपानी स्त्रियांच्या बाबतीत होत आहे. कामावर येताना उंच टाचेच्या चपला वा बूट घालणे सक्तीचे आहे. त्याविरुद्ध तिथल्याच एका अभिनेत्रीने, युमी इशिकावा हिने #KuToo असा हॅशटॅग वापरत आवाज उठवला आहे. #MeToo वरून प्रेरित होऊन #KuToo सुरू केले असले तरी त्यातला #Ku हा कुत्सू या शब्दावरून आला आहे. जपानी भाषेत कुत्सू म्हणजे शूज. आपल्याकडेदेखील उंच टाचेचे बूट हे अभिमानाने मिरवले जातात. मॉडेल्स, चित्रतारका, उच्चपदस्थ स्त्री अधिकारी या सगळ्यांमध्ये देखील उंच टाचेची पादत्राणे घालणे हा जणू अलिखित नियम असतो. केवळ उंची वाढवण्यासाठी म्हणून उंच टाचा वापरल्या जात असतील तर पाश्चिमात्य जगात देखील स्त्रियांनी उंच टाचेच्या चपला, बूट घालणे हा एक सामाजिक संकेतच समजला जातो.
इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी निकोला थॉर्प हिला उंच टाचेच्या चपला न घातल्यामुळे नोकरीला मुकावे लागले होते. मग ज्या ठिकाणी जिने चढा-उतरायचे असतात, सामान खाली-वर करायचे असते अशा ठिकाणी देखील स्त्रियांना उंच टाचेच्या चपला घालाव्याच लागतात. २०,००० स्त्रियांनी निकोलाला पाठिंबा देऊनही तिथल्या सरकारने याविषयी काही करण्याचे टाळले.
त्यांचे म्हणणे आहे २०१० मध्ये झालेल्या कायदा बदलात या गोष्टीचा समावेश केला जाऊ शकतो, त्यासाठी वेगळ्या कायदा बदलाची गरज नाही. पण आज तीन वर्षांनंतरही अशा अनेक निकोला असूच शकतात ज्यांची नोकरी केवळ उंच टाचेच्या चपला घातल्या नाहीत म्हणून गेली आहे.
‘कान्स’ या चित्रपटांची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठिकाणीसुद्धा २०१५ पर्यंत उंच टाचेची पादत्राणे न घातलेल्या स्त्रियांना प्रवेश दिला जात नव्हता. त्याबद्दलची नाराजी दाखवण्यासाठी पुढच्या वर्षी, २०१६ ला ज्युलिया रॉबर्ट रेड काप्रेटवर चक्क अनवाणी चालत गेली होती. मुळात ज्या गोष्टी आरामदायक नाहीत त्या वापरण्याचा खटाटोप का करावा? गबाळे राहणे वेगळे आणि सामाजिक संकेत आहे म्हणून न साजेसे, न सांभाळता येणारे कपडे, पोशाख करणे वेगळे. वैद्यकीयदृष्टय़ा उंच टाचेच्या चपला घालणे स्त्रियांच्या आरोग्याला घातक आहे हे अनेक डॉक्टर सांगतात. पण तरीही सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेचे मानक बनलेल्या उंच टाचेच्या चपलांना खाली खेचण्याच्या प्रयत्नांना अजून तरी यश आलेले नाही हेच खरे.
भगिनीभाव
गोष्ट २०१७ मधली गोष्ट. नाओमी ही पश्चिम ऑस्ट्रेलियामधली एक सर्वसामान्य स्त्री. नियम तोडला म्हणून तिला दंड झाला होता. पण तिच्याकडे दंड भरायला पैसेच नव्हते. त्यामुळे तुरुंगात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच तिच्याकडे नव्हता. ती सांगते, ‘‘ते तीन दिवस तिच्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस होते.’’ नाओमी ही त्या भागातली ‘अ‍ॅबओरिजिनल’ म्हणजे मूळ रहिवासी आहे. नाओमीसारख्या अनेकजणी पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे ठोस साधन नाही, पदरी मुलेच नव्हे तर नातवंडेदेखील आहेत. अशा वेळी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण होतो. पश्चिम ऑस्ट्रेलियात आजही आर्थिक दंड न भरल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे.
नाओमीसारख्या अनेक जणींचे तुरुंगवास वाचवण्यासाठी ‘सिस्टर्स इनसाइड’ ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने लोकांमधून पैसे जमवायला सुरू केले आणि ते पैसे अशा गरजू स्त्रियांचे दंड भरण्यासाठी वापरले जातात. आजवर या संस्थेने ४ लाख डॉलर्सहून अधिक निधी गोळा केलाय. ही संस्था डेबी किलरोय हिने सुरू केलेली आहे. या डेबीची स्वत:चीसुद्धा अशीच शोकांत कहाणी आहे. तिला १९८९ मध्ये अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली ६ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तेव्हा तिने हे तुरुंगातले जीवन अगदी जवळून पाहिले. तुरुंगात जाण्यापूर्वी डेबीला स्वत:चे घर, कुटुंब, मुलं होती. हे सगळे अर्थातच या तुरुंगवासानंतर तिने गमावले. तुरुंगात तिने एक खूनही पाहिला. या सगळ्या अनुभवानंतर बाहेर आल्यावर तिने कायद्याचे शिक्षण घेतले आणि आता ती मानवी हक्कांसाठी लढणारी ऑस्ट्रेलियामधली एक धडाडीची वकील म्हणून ओळखली जाते. दंड भरला नाही म्हणून तुरुंगात जाणाऱ्या स्त्रियांचे विश्वच उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव असल्यामुळे तिने तिच्या ‘सिस्टर्स इनसाईड’ संस्थेमधून आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली आहे.
ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी निश्चितच दंड भरावा. पण ‘दंड भरता येत नाही म्हणून तुरुंगवास’ हा निव्वळ अन्याय आहे, हा कायदा बदलला पाहिजे, ही मागणी जोर धरत आहे. सरकारनेदेखील आम्ही लवकरच या कायद्यात दुरुस्ती करू, असे म्हटले आहे.
स्वत:ला आलेल्या अनुभवातून इतरांना शहाणे करणे स्त्रियांना जास्त सहज जमते. डेबीने संस्था उभारली. त्याद्वारे ती अनेक जणींना मदतही करते आहे आणि तिलादेखील अनेक जणी आर्थिक, भावनिक मदत करत आहेत. भगिनीभाव प्रत्येकीकडे असतो. प्रत्येक जण कळत-नकळत तो जोपासतच असतो. हेच डेबी तिच्या ‘सिस्टर्स इनसाईड’च्या माध्यमातून आपल्याला दाखवते.
उबदार ‘वॉर्मलाइन’
कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याची मायेने विचारपूस करून त्याला त्याचा निर्णय बदलवणारे लोक केवळ पुस्तकात, चित्रपटांमध्येच असतात असा जर तुमचा समज असेल तर ‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीने तो मोडून काढला आहे. २-३ वर्षांपूर्वी ‘इंटेल’ला लक्षात आले की अनेक स्त्रिया, अल्पसंख्य समूहातले त्यांचे कर्मचारी काम सोडून जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यावर काही तरी केले पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटले. बार्बरा व्हे या त्यांच्या व्हाइस प्रेसिडेंटने ‘वॉर्मलाइन’ची कल्पना मांडली. माणसाला कायम स्थर्य हवे असते, मग हातातली पक्की नोकरी सोडून जेव्हा लोक जायचा निर्णय घेतात तेव्हा त्यामागे नक्कीच कुठली तरी असुरक्षितता असणार. हा कयास करत बार्बरा यांनी एका ‘हॉटलाइन’ची संकल्पना समोर ठेवली. कंपनीतल्याच वेगवेगळ्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असतो. ज्या कोणा कर्मचाऱ्याला काही खटकत असेल, नोकरीत काही असमाधान असेल किंवा ते तणावात असतील तर त्यांनी या सेवेचा लाभ उठवत या फोनवर आपला असंतोष व्यक्त करावा, अशी यामागची संकल्पना आहे.
ही सेवा कंपनीच्या उपयोगाचीच ठरली, कारण इथे तक्रार नोंदवलेल्या १० जणांपैकी ८ जणांचे समाधान झाले आणि त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय बदलला. ते आजही कंपनीत नोकरी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा, वास्तव, कंपनीच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा या सगळ्यांचा मेळ घालणे या हॉटलाइनमुळे सहज शक्य झाले. सध्या अमेरिका आणि कोस्टारिकापुरतीच मर्यादित असलेली ही सेवा ‘इंटेल’ लवकरच त्यांच्या जगभरातल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. या हेल्पलाइनमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून घेत ‘इंटेल’ने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वाना एकत्र घेऊन काम कसे करता येऊ शकते यासाठी खास प्रशिक्षण देखील दिले. असे करणे एखाद्या स्त्रीलाच सुचू शकते.
कोणतीही कंपनी ही फक्त मालकाच्या भूमिकेतून किंवा कर्मचाऱ्याच्या भूमिकेतून चालत नसते. जेव्हा त्या दोघांचेही दृष्टिकोन जुळतात आणि ही आपली कंपनी आहे असे त्यांना वाटायला लागते तेव्हा कामाचा दर्जा सुधारत असतो. हीच गोष्ट बार्बरा यांनी हेरली आणि नाराज लोकांची नाराजी कोणत्या कारणासाठी आहे हे जाणून घेतले. त्यानंतर ती नाराजी दूर करायचा प्रयत्न केला. त्यामुळेच कंपनी सोडून जाणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. घर चालवताना घरातली स्त्री अगदी हेच तर करत असते. काम टाळणाऱ्या कुटुंबीयांना ते काम आवडत नाही हे समजून घेऊन त्यांना जे काम आवडते ते काम देते त्यामुळे काम अगदी सहज होऊन जाते. याच कारणामुळे कदाचित बार्बरा यांना ‘वॉर्मलाइन’ची कल्पना सुचली असावी. ‘सेल्स फोर्स’ या सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रेसिडेंट आणि चीफ पीपल ऑफिसर सिंडी रॉबिन्स देखील म्हणतात, ‘‘जास्तीत जास्त स्त्रिया मोठय़ा पदांवर आल्या पाहिजेत. स्वयंपाक करताना, फोनवर बोलता बोलता मुलांचा अभ्यास घेणाऱ्या स्त्रिया आपल्याला घराघरांत दिसतात. सहजगतीने चार कामे करणे स्त्रियांना नैसर्गिकरीत्या जमते, त्यामुळे संधी मिळाली तर स्त्रिया नक्कीच त्याचे सोने करून दाखवतात. इंद्रा नुई, ‘आयबीएम’ची सीईओ जिनी रोमेटी, ‘ओरॅकल’ची सीईओ साफ्रा कात्झ अशी अनेक बोलकी उदाहरणेदेखील आहेतच.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा २२ जून २०१९
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा १२

मायकेल जॉर्डन, रॉजर फेडरर, टायगर वूड्स, सेरेना विलियम्स यांच्यामध्ये काय साम्य आहे? हे सगळे जण ‘नायके’चे अ‍ॅम्बॅसॅडर आहेत. खेळाडूंचे कपडे, बूट आणि खेळाशी संबंधित वेगवेगळ्या इतर अनेक गोष्टींचे उत्पादन ही कंपनी करते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या मोन्तानो आणि गौचर या धावपटूंनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’कडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. या दोघींनाही अपत्य जन्मानंतर लगेचच मैदानात उतरावे लागले. त्यांच्या निमित्ताने हा सगळा प्रश्नच नव्याने समोर आला. कंपनीने आम्ही जी स्पॉन्सरशिप देतो ती गुणवत्ता आणि खेळातले प्रदर्शन यावर आधारित असते त्यामुळे गर्भावस्थेत आणि त्यानंतर काही काळ स्त्री खेळाडू खेळू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे मानधन कमी करू, अशी भूमिका घेतली होती.
सेरेना विल्यम्स हिने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते जेव्हा ती ८-९ आठवडय़ांची गर्भवती होती. सप्टेंबर २०१७ मध्ये मुलीला जन्म दिल्यावर डिसेंबरमध्ये सेरेनाने परत खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने ‘विम्बल्डन’ आणि ‘अमेरिकन ओपन’च्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. गर्भारपणात किंवा प्रसूतीनंतरही सेरेनाने तिच्या खेळावर कोणताही परिणाम होऊ दिला नव्हता. तिच्यासारख्याच इतरही अनेक खेळाडू आहेत ज्यांनी गर्भारपणात किंवा प्रसूतीनंतरही आपली क्रीडा कारकीर्द सुरू ठेवलेली आहे. जर ‘नाइके’ने त्यांची अट शिथिल केली नसती तर सेरेनासारखा मोठा मोहरा गमवायची शक्यता होती. ते त्यांना नको होतं, त्यामुळेच त्यांनी ‘आम्ही नवीन करारात स्त्री खेळाडूंसाठी गर्भारपणात आणि प्रसूतीपश्चात काही महिने गुणवत्ता आधारित स्पॉन्सरशिपची अट शिथिल करत आहोत,’ असे जाहीर केले. त्यामुळेच या पूर्ण नाटय़ावर सेरेनाने ‘त्यांना त्यांची चूक कळली हे चांगले झाले. देर आए दुरुस्त आए,’ एवढीच प्रतिक्रिया दिली. खेळाडू होण्यासाठी शारीरिक मेहनतीबरोबरच मानसिक तयारी देखील लागते. त्यामुळे अनेकदा अनेक स्त्री खेळाडू त्यांचे लग्न लांबवतात आणि अर्थातच त्यानंतर येणारे मातृत्वही. त्यात जर त्यांना आर्थिक साहाय्य करणाऱ्या संस्थांनी प्रतिकूल भूमिका घेतली तर मातृत्वाचा निर्णय घेणे अनेकींसाठी नक्कीच अवघड होते. पण सेरेनासारख्या यशस्वी खेळाडूने यावर नापसंती दाखवल्यामुळे कंपनीला त्यांचा निर्णय बदलावा लागला.
आपल्या देशातही मॅटíनटी बेनीफिटचा कायदा आहे, ज्याअंतर्गत स्त्री कर्मचाऱ्यांना सहा महिने पगारी रजा देण्याची तरतूद असते. पण अनेकदा खासगी कंपन्यामध्ये, असंघटित कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळत नाहीत. एकीकडे घरची आर्थिक जबाबदारी आणि दुसरीकडे नैसर्गिक जबाबदारी यामध्ये अनेक स्त्रियांची कुतरओढ होते. फक्त ‘फायदा’ हे लक्ष्य ठेवण्याऐवजी ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून फायदा’ असे लक्ष्य ठेवल्यास लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची नायकेसारखी वेळ इतर कंपन्यांवर नक्कीच येणार नाही.
बीजं जगवताना..
प्रत्येक देशाचं, तिथल्या मातीचं एक वेगळेपण असतं साहजिकच अनेक पिकं त्या त्या ठिकाणीच उगवतात, भरघोस पिकं देतात आणि अनेकांचा घास बनतात. पण तीच पिकं इतर देशांतही रुजतात, वाढतात, त्या देशाची होतात. जसं आपल्याकडेही परदेशांतून आलेली मिरची, बटाटा आपली कधी झाली आपल्यालाही कळलंच नाही.
स्लोव्हाकिया हा युरोपमधला एक छोटासा देश. या देशातली झुझुना पास्त्रोकोव्हा ही अगदी सर्वसामान्य स्त्री. ७ वर्ष नौकेवरून जगभ्रमण केल्यावर तिला शांतपणे गावात राहून शेती करावीशी वाटली. लहान असताना तिने ज्या भाज्या खाल्ल्या होत्या ते सगळे परत खावेसे वाटले. ते सहज मिळेना म्हणून तिनेच गावातल्या लोकांकडून बियाणे मिळवून त्याची शेती करायला सुरुवात केली. त्याच्याच सोबत तिने जगभर फिरत असताना ठिकठिकाणाहून जमा केलेली बियाणेदेखील तिच्या शेतात पेरली. त्यामुळे स्लोव्हाकियामध्ये झुझुनाच्या शेतात आर्यलडच्या बीन्स, रोमानियाचे कांदे, सायप्रसचे भोपळेसुद्धा उगवतात. जशी पोर्तुगालमधून आलेली मिरची, टोमॅटो आपल्याकडे इतके रुळले, तसाच हा बाहेरच्या देशातला भाजीपाला स्लोव्हाकियामध्ये सहजच रुळून जाईल की काही वर्षांनी हा बाहेरचा आहे यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीत कदाचित.
झुझुनाची गोष्ट युरोपमधली आहे. तशीच एक वेगळी गोष्ट आहे मारिया लोरेथाची. इंडोनेशियाची रहिवाशी असलेली मारिया लोरेथाने गावोगाव फिरून आपली जुनी पिके काय होती याचा शोध घेतला तेव्हा तिला ज्वारीच्या पिकाची माहिती मिळाली. त्यांच्या भागात कैक दशकांपूर्वी ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणावर घ्यायचे, पण तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना पांढऱ्या तांदळाचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहन दिले आणि त्याचबरोबर ज्वारीचे जे स्थानिक पीक होते ते माणसांना खाण्यास योग्य नाही, ते फक्त प्राण्यांना खायला घातले पाहिजे असा समज पसरवला. त्यामुळे झपाटय़ाने ज्वारीची शेती कमी झाली. तांदळाच्या शेतीमुळे पाणी जास्त लागू लागले. त्यामुळे मारियाने कमी पाणी घेणारे पण श्रम जास्त असणारे ज्वारीचे पीक घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिला फार कोणाचे प्रोत्साहन नव्हते. अर्थात यासाठी तिने सोबतीला घेतल्या होत्या स्थानिक स्त्रिया. वेगवेगळ्या संशोधनात ज्वारीचे महत्त्व नव्याने समोर आले आहे. त्यामुळे कमी पाण्यात येणारे पण अत्यंत गुणकारी ज्वारीचे पीक या स्त्रियांना आर्थिक स्थर्य देखील मिळवून देत आहे.
ज्याप्रमाणे राहीबाई पोपेरे आपल्याकडे वेगवेगळ्या बियाण्यांची बँक करत आहेत त्याच पद्धतीचे काहीसे काम झुझुना, मारिया त्यांच्या देशात करत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेतीकडे वळत आहेत ही नक्कीच आशादायक गोष्ट आहे. त्याचबरोबर शेतीची गणिते घरात बसून सोडवायची नसतात. त्यासाठी माती, पाणी, आधुनिक शास्त्र आणि पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाचीदेखील सांगड घालायची असते. नाहीतर आपल्याकडच्या भगर, राजगिरा, राळ, नाचणी अशा मिलेटवर्गातील धान्याची महती इतर देशांतले आपल्याला सांगतील आणि आपल्याच मातीतील पिके, आपले पूर्वज जे खात होते ते, आपण ‘बाकीचे सांगतात चांगलं आहे’ म्हणून परत खायला सुरू करू. या मधल्या काही वर्षांमध्ये, किती तरी भाज्या, फळं, धान्यं दुर्मीळ किंवा नामशेष झालेत. किमान यापुढे तरी असे होऊ नये एवढी काळजी आपण घेतली तरी ही धरतीआई लेकरांवर खूश होईल.
विद्यार्थिनीसाठी वरदान
कोणतीही मुलगी स्त्री केव्हा होते, तर तिला मासिक धर्म सुरू होतो तेव्हा. पण मासिक धर्म, मासिक पाळी या गोष्टीकडे खूपच संकुचित दृष्टीने पाहिले जाते, अगदी भारतातही. पण या गोष्टीचा परिणाम जेव्हा मुलींच्या विकासावर होत असेल तर ती गंभीर बाब ठरते, जे कित्येक वर्षांपासून आपल्याकडेही होत आले आहे. आजही ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमध्येही शाळकरी मुलींमध्ये ‘त्या’ चार दिवसांत शाळा बुडवण्याचे प्रमाण जास्त आहे. जगभरात सगळीकडेच हे वास्तव बघायला मिळते. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या मालाची जाहिरात करण्यासाठी म्हणून शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वाटतात. पण कितीतरी जणी हा जादाचा खर्च दर महिन्याला करू शकत नाहीत. जुने कापड सर्रास वापरले जातात, पण ते स्वच्छ उन्हात वाळवण्याची साधी सुविधाही अनेकींना उपलब्ध नसते. या सगळ्या समस्येच्या मुळाशी जाऊन एक वेगळा प्रयोग मालावी या आफ्रिकेतल्या एका छोटय़ा देशातल्या शाळांमध्ये केला गेला.
मालावीतल्या शाळेत मुलींना बसवून त्यातल्या कोणाकोणाला मासिक पाळी येते हे विचारले आणि ज्या ज्या मुलींनी हात वर केले त्यांना एकेक ‘मेनस्ट्रएशन कप’, ते उकळण्यासाठीचे भांडे आणि एक पिशवी दिली. लुसी न्कोह्मा या मालावीमधील शाळांमध्ये जाऊन मेनुस्ट्रेशन कपबद्दलची माहिती देतात आणि त्याचे वाटप करतात. एकदा घेतलेला कप जास्तीत जास्त दहा वर्षे वापरता येत असल्यामुळे पशाची बचत होतेच पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील शून्य कचरा होत असल्यामुळे हे कप वरदान ठरत आहेत. ‘पहिल्यांदा हे कप वापरत असताना आम्हाला भीती वाटत होती, पण नंतर ते वापरणं खूप सोयीचं वाटू लागलं. त्यामुळे आमचे कपडे खराब होत नाहीत, आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो, खेळू शकतो,’ असे अनुभव तिथल्या मुलीच नव्हे तर शाळेतल्या इतर शिक्षिकांनीदेखील सांगितला.
पहिल्यांदा १९३२ मध्ये ‘मेनस्ट्रएशन कप’ची संकल्पना मांडली गेली मात्र त्याचा आकार थोडा वेगळा होता. नंतर १९३७ मध्ये लिओना चाल्मर्स यांनी विक्रीयोग्य कपची संकल्पना मांडून पेटंट मिळवले. १९६० च्या सुमारास टासअवे नावाच्या कंपनीने रबरी कप बाजारात आणले होते, पण त्याला काही यश मिळाले नाही. १९८७ मध्ये ‘लेटेक्स’ने तयार केलेले मेनस्ट्रएशन कप अमेरिकेच्या बाजारात आले, जे अजूनही मिळतात. २००१ मध्ये युकेमधल्या कंपनीने सिलिकॉनने बनवलेला मोनोकप बाजारात आणला. हे हलकेही होते आणि वापरायला सोपेदेखील त्यामुळे हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढायला लागली. अनेक बिगर सरकारी संस्था याच्याबद्दल जनजागृती करतात. भारतात देखील याचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे.
‘पॅडमॅन’ चित्रपटामुळे किमान आपल्याकडे सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल बोलायला तरी सुरुवात झाली. शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेनस्ट्रएशन कपबद्दल कुजबुजत्या आवाजात का होईना, पण चर्चा सुरू झाल्यात, एकमेकींच्या अनुभवावरून एकदोघी हे वापरायलादेखील लागल्या आहेत. या कपमुळे आर्थिक बचतीबरोबरच सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नसुद्धा लगेच सुटतो. या कपाच्या निमित्ताने मालावीतल्या शाळांमधल्या मुलींच्या हजेरीचे प्रमाण तर वाढलेच पण त्याचबरोबर त्यांचे शारीरिक आरोग्यदेखील जपले गेले. हे सर्व करताना पर्यावरणाचा देखील ऱ्हास झाला नाही. असे तिहेरी फायदे एका छोटय़ा कपामुळे झाले. आपल्याकडे पण लवकरच शासकीय, बिगर शासकीय पातळीवर हे पाऊल उचलले जावे अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा ८ जून २०१९
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)