Monday, May 22, 2017

शोध स्वतःचा !

सुट्टी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातही काम करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या साऱ्याच बायकांना ही उन्हाळ्याची सुट्टी अगदी हवीहवीशी वाटत असते ती अनेक कारणांनी. मुलांच्या अभ्यासाचं, शाळेचं असं कोणतंच कारण नसतं. माहेरपण अनुभवण्यासाठी, भटकण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. मग काही जण कुटुंबाची एकत्र अशी एखादी सहल काढतात, ह्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी म्हणून एखादे थंड हवेचे ठिकाण मग ते भारतातील असो व परदेशातील सहल.काही जन तिर्थस्थळाना भेट देतात. पण उन्हाळ्यात एखादी तरी सहल होतेच. रोजच्या त्याच त्या रुटीन पासून थोडा बदल म्हणून काही तरी हवेच असतं. हा असा स्थान बदल, एक नवीन तरतरी मिळवून देतो. या अशा सहलींमध्येच एक नवा ट्रेंड रुजत आहे बायकांच्या एकटीच्या सहली !
कुटुंबासोबत सहलीला गेलं तरी बायकांच्या मागच्या अनेक गोष्टी सुटत नाहीत, मुलांना वेळेवर खायला देणं, सामान नीट लावून घेणं, मुलांकडे बघणं अशा एक न अनेक गोष्टी असतातच त्यामुळे अनेक बायकांसाठी हे असं फिरायला जाणं म्हणजे फक्त जागेचा बदल असतो, घरामध्ये जे करतो तेच बाहेरही येऊन करायचं, फरक एवढाच की इथे स्वैपाक आयता मिळतो आणि कामवाली आज येईल की नाही याची फिकीर करावी लागत नाही. कितीही घरात, मुलांमध्ये जीव असला तरी बाईला थोडा स्वतःचा वेळ देखील हवाच असतो. त्यामुळेच फक्त बायकांच्या सहली जशा जोर धरू लागल्या आहेत तशाच एकट्या प्रवास करणाऱ्या बायकांची संख्या देखील वाढत आहे.
खरंच सतत दुसऱ्यांचा विचार करत जगणाऱ्या बाईला स्वतःच्या मनासारखं जगायला मिळतं का? कुटुंबासोबत सहलीला जाताना बायकांना विचारलंदेखील जात नाही, अगदी साधं हॉटेल मध्ये गेल्यावर सुद्धा आईला, बायकोला काय हवं आहे, तिला काय खायचं आहे हा प्रश्न येतंच नाही, अनेकदा मुलंच हे सारे प्रश्न सोडवतात किंवा उरलेल्या ठिकाणी घरातले पुरुष! अनेक कमावत्या बायका, मुली एकटं फिरायला आजकाल बाहेर पडतात याचं कारण हे देखील असावं. सारी माहिती ऑन लाईन मिळवून, वेगवेगळ्या ब्लॉगच्या आधाराने अनेक जणी स्वतःच स्वतःच्या सहलींच आयोजन करतात. सावधानी बाळगण्यासाठी अनेकवेळा b&b मध्ये राहणं पसंत करतात. b&b म्हणजे बेड आणि ब्रेकफास्ट ची सोय देणारी घरं. अशा अनेक वेबसाईटस आहेत ज्यावर आपण ही बुकिंग करू शकतो. या अशा ठिकाणी शक्यतो कुटुंब रहात असल्या कारणाने सुरक्षेचा फारसा प्रश्न येत नाही. त्याच बरोबर स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेता येतो. आणि हे हॉटेल मधे राहण्यापेक्षा किफायतशीर देखील पडतं.
साऱ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून एकट , किंवा ग्रुप मध्ये फिरताना अनेक गोष्टी नव्यानी कळतात. स्वतःशी एका वेगळ्या पद्धतीने संवाद साधला जातो. स्वतःमधल्या क्षमतांची नव्याने ओळख होते. त्याचबरोबर एक अहंकार देखील गळून पडतो. अनेक वेळा बायकांना वाटत असतं त्यांच्याशिवाय घर चालूच शकणार नाही. पण आपल्या गैरहजेरीत घराची घडी विस्कटते पण तरीही घर सुरु असतं. त्यामुळे माझ्यावाचून कोणाचं काही अडत नाही हे कळतंच पण आपण नसल्याचा परिणाम घरावर झाला आहे हे देखील दिसत असतं. अनेक टूर्स कंपन्या देशातच नव्हे तर परदेशातही अशा फक्त बायकांच्या सहली आयोजित करतात, आणि तिथे बायका आपली वय विसरून धमाल गंमती करतात. आयुष्यात राहून गेलेल्या अनेक गोष्टी करण्याची मजा अनुभवतात.
परदेशात अनेक जण एकेकटा प्रवास करत असतात, लोनली प्लॅनेट सारखी पुस्तके हाताशी धरून पुरुष, बायका वेगवेगळे खंड, वेगवेगळे देश फिरतात. भाषा येत नसलेल्या प्रांतात जाऊन तिथली संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. नवे नवे अनुभव गाठीला बांधतात. अनेकदा असा एकटा प्रवास करणाऱ्यांना तुम्हाला भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारून लोकच जास्त घाबरवतात. एकटे फिरताना अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावं लागतं पण त्याचबरोबर माणुसकीचे वेगवेगळे रंग, पुस्तकाबाहेरचे अनुभव देखील अनुभवता येतात हे ही तितकंच खरं. असं एकट फिरणाऱ्याना कोणत्याही गायडेड टूर शिवाय प्रवास करणाऱ्यांना लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून फिरावं लागतं. अनेकदा अपेक्षा नसलेल्या ठिकाणी जास्त आपुलकी बघायला मिळते. एकट्या फिरणाऱ्या बायकांबद्दल तर समाजात कुतूहलाबरोबरच एक प्रकारचं प्रश्नार्थक आश्चर्य पण असतं. म्हणजे एखादी बाई अशी एकटी सगळ्या गोष्टी कशा करू शकेल इथ पासून ते तुम्हाला कोणी काही केलं तर इथपर्यंत.
क्वीन चित्रपटामुळे तर एकट्या फिरणाऱ्या महिलांना जणू ग्लॅमरच मिळालं. जर एखादी लग्न तुटलेली सामान्य मुलगी एकटीच युरोप फिरू शकते तर आपण आपला देश का नाही? मग ट्रीपलिंग सारख्या वेब सीरिअल मुळे याला अजून खात पाणी मिळालं. कधी सोबत नाही म्हणून, कधी नवा अनुभव घ्यायचा म्हणून, कधी गरज म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी पहिला सोलो प्रवास होतो, आणि मग त्यातली मजा आवडायला लागते आणि मग सुरु होतो एकट्यानी प्रवास करण्याचा नवा प्रवास. स्वतःला शोधण्यासाठी, नव्यानी भेटण्यासाठी, स्वतःवर, आयुष्यावर नव्यानी प्रेम करण्यासाठी एकदा तरी घराचा उंबरठा एकटीनी ओलांडून पहा, परत तुमच्या जगात याल तेव्हा अजून जास्त प्रेम, अनुभव, नात्यांचे दोर जास्त घट्ट करतील.

जग फिरणं, नवीन माणसांना भेटणं हे एक प्रकारचं शिक्षणचं असतं. या शिक्षणाला कोणताही अभाय्साक्रम नसतो, पदोपदी परीक्षेची वेळ असते, आणि पास नापास असा कोणताच पर्याय नसतोच, तुम्ही फक्त पुढे जायचं असतं. एक स्त्री जेव्हा असा प्रवास एकटीने करते तेव्हा तिला सोबत करत असतात तिच्या आतल्या अंतःप्रेरणा, आणि एक व्यक्ती म्हणून त्या तिला अजून जास्त समृद्ध करत असतात. हे स्वानुभवाचे बोल आहेत. मग हा अनुभव घेण्यासाठी कधी करताय तुमची बॅग पॅक? सुट्टीचे दिवस अजून संपलेले नाहीत, तेव्हा टेक अ ब्रेक, अँड मीट युअरसेल्फ...  
(महाराष्ट्र टाईम्स २२ मे २०१७ )

No comments:

Post a Comment