Wednesday, December 28, 2016

दंग(ल) करणारा अनुभव...

सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं कायम म्हणलं, लिहिलं जातं. म्हणजे आपल्याला जे बघायचं आहे ते त्यात दिसतंच पण त्याच वेळी जे नजरेआड आहे ते देखील समोर आणतं. कधी कधी आपल्याला जे मान्य करायचं नसतं ते देखील आरशासमोर उभं राहून आपण मान्य करतो.सिनेमा हा स्वप्नी, आभासी जग जगण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे. तर कधी सिनेमाच आपल्याला आपल्या आयुष्यात न घेतलेल्या वळणाच्या पुढचं आयुष्य कसं असू शकलं असतं दाखवतो. कधी जुन्या आठवणी ताज्ज्या होतात, कधी काही जखमांवर मलम लावलं जातं.
दंगल सिनेमा बघताना असाच काहीसा अनुभव आला. गाणी आणि ट्रेलर मुळे खूपच उत्सुकता होती. सिनेमा, क्रिकेटवेड्या आपल्या देशात खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण मोडणाऱ्या या सिनेमामुळे माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या सिनेमावर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळया माध्यमांवर लिहिलं, पण मला हा पूर्ण सिनेमा पाहताना माझा भाऊ, अहमदनगरमधला सिद्धी बागेतला ज्युदोचा हॉल, धोपावकर सेन्से, आणि खूप काही डोळ्यासमोर तरळत होतं.
एक २० वर्षापूर्वीचा काळ असेल, माझा भाऊ प्रचंड मस्ती खोर, त्याच्या अंगातली रग कमी करण्यासाठी कोणीतरी आई वडिलांना सुचवलं याला ज्युदोच्या क्लास ला घाला. नव्यानं सुरु झाला होता तो. दोन तास पोरगा बाहेर खेळायला जाईल, आपल्याला त्याला बघावं लागणार नाही या सुटकेच्या विचारांनी आई वडिलांनी त्याला वेक दिवशी यंगमेन्स ज्युदो असोशिएशनच्या एका छोट्याशा हॉल मध्ये नेऊन उभं केलं. नव्या पांढऱ्या ड्रेसवर माझा भाऊ खूपच खुश होता. दोन तास तुला इथं खेळायचं आहे , यावर तो अजूनच खुश होता. मग सुरुवातीचा रन अप, एक्सरसाईज सगळं करून मग मॅट वर जाणं ह्याची इतक्या लवकर सवय झाली की एक दिवस सुद्धा सुट्टी आवडायची नाही त्याला. मॅट बघितली की सगळं विसरलं जायचं. स्पर्धांच्या आधी तासनतास केलेली प्रॅक्टिस, वजन कमी जास्त करण्यासाठी घेतलेले कष्ट, आज इतक्या वर्षांनंतरही मला आठवतात. एका वर्षी उन्हाळ्यात आमच्याकडे आंबे आणले नव्हते, कारण माझ्या भावाला वजन कमी करायचं होतं, मग तो आंबा खाणार नाही तर आम्ही त्याच्या समोर कसे खाऊ? हा त्याग नव्हता, आम्ही तुझ्याबरोबर आहोत ही भावना होती. मग एका स्पर्धेच्या आधी परत वजन तेवढंच ठेवण्यासाठी म्हणून तो भाकरी खायचा तर त्याला सोबत म्हणून आई पण त्याच्याबरोबर भाकरी खायची. मग कधी वजन थोडं कमी भरत म्हणून ऐन वेळी खाल्लेली केळी असोत हा सारा खेळाचाच भाग होता.
७, ८वर्षाचा म्हणून त्याला सरावात काही वेगळी सूट सवलत नव्हती. अनेक वेगवेगळ्या वयाची मुलं क्लास मधे होती. सुट्ट्यांमध्ये दहा दहा तास चालणारा सराव मदत करत होता बक्षिस मिळवायला. शहर पातळीवर, मग जिल्हा पातळीवर, त्यानंतर राज्य पातळी मग राष्ट्रीय स्तरावर एकेक नाव गाजत होती. त्यात जेवढा यश ज्युदोकांच होतं, तेवढीच किंवा त्याहून जास्त मेहनत सेन्सेंची होती. नगर सारख्या छोट्या शहरात, जे आजही महानगरपालिका असूनही मोठ्ठ्या खेड्यासारख आहे तिथे २० वर्षांपूर्वी एक आपल्या मातीतला नसलेला खेळ त्यांनी फक्त आणला नाही तर रुजवला, फुलवला. एक दोघांची नावं घेऊन मला उरलेल्यांना विसरायचं नाहीये. शहर, जिल्हा पातळीवर काय हा खेळ खेळणारे कमीच असतात, त्यामुळे बक्षिसं सहज मिळतात, म्हणणाऱ्यांची तोंड बंद झाली जेव्हा राज्य पातळीवर पुण्या-मुंबई, विदर्भ, कोल्हापुरातल्या मुलांना हरवून नगरच्या मुलांनी सुवर्ण पदकांची लय लुट केली. अनेकांना अनेक वर्ष पतियाळाची राष्ट्रीय क्रीडा अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली होती. तेव्हा सुद्धा राष्ट्रीय पदक विजेत्यांना राज्य सरकार कडून फक्त अभिनंदनाचे शब्द ,वृत्तपत्रात फोटो सह नाव एवढंच झळकायचं. त्याच वेळी इतर राज्यांच्या स्पर्धकांना राज्य सरकार कडून आर्थिक मदत देखील करायचे. नगरचे काही ज्युदोका अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत देखील गेले होते.
माझा भावानी जवळपास त्याची दहा वर्ष या खेळासाठी दिली होती, आणि या दहा वर्षात तो खूप जागा फिरला, खूप नवीन शिकला, आपल्याला फक्त जिंकण्यासाठी खेळायचं असतं. आणि त्यासाठी सगळं पणाला लावायची तयारी ठेवायची असते. एका राष्ट्रीय स्पर्धेच्या आधी भावाला पायाला जखम झाली होती, स्पर्धेला तर तो जाणारच होता, पण आईनी त्याला सांगूनही त्यानी मॅच जिंकण्यासाठी त्या पायाचाच वापर केला. पदक जिंकलं, पण त्यापुढचे दहा दिवस ड्रेसिंग ही करून घेतलं. अशा एक ना अनेक आठवणी आहेत. ज्युदो हा त्याच्यासाठी फक्त एक खेळ नव्हता, त्याचं पहिलं प्रेम होतं ते. त्यामुळे अगदी आयर्लंड मध्ये जाऊन सुद्धा त्यानी संधी मिळताच खेळून घेतलं.खेळाची परंपरा नसलेल्या घरातल्या अनेकांना या खेळानी तेव्हा झपाटून टाकलं होतं. तेव्हा त्यात मुलगा, मुलगी असा भेदभाव नव्हता. माझ्या आठवणीतली अनेक घर या खेळानी बांधली गेली होती. अनेक भावा बहिणींच्या जोड्या तेव्हा प्रसिद्ध होत्या. मुलगी म्हणून कमी प्रॅक्टीस असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळेच या खेळानी अनेकांना नोकरी, छोकरी सुद्धा मिळवून दिली. काहींना शिवछत्रपती सुद्धा मिळवून दिला.
कोणताही खेळ हा एकट्याचा नसतो, तो खेळ खेळत असताना एक अख्खं घर त्याच्यामागे उभं असतं. त्या खेळाडूच्या डोळ्यात फुललेलं, फुलवलेलं स्वप्न कधी त्याच्या आई वडिलांचं, मार्गदर्शकाचं असतं, जे नंतर त्याचं होऊन जातं. दुसऱ्या गावात स्पर्धा असताना मुलांना, मुलींना सोबत म्हणून अनेक पालक जायचे, आणि मग त्या स्पर्धेच्या काळात ते सोबतच्या साऱ्याच मुली मुलांचे पालक होऊन जायचे. फक्त आपल्या मुलाचा विचार न करता, त्याच्या सोबत खेळणाऱ्या इतर मुलांची काळजी घेणं, त्याचं तात्पुरतं पालकत्व निभावणं तेव्हा अनेकांकडून अगदी सहज झालं होतं, आणि त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही खेळ सुटला तरी या जुन्या ओळखी, मैत्र, तुटलेले नाहीत. मला आजही आठवतंय आम्ही दिल्ली मध्ये फिरता असताना असाच एक जण अचानक रस्त्यात भेटला आणि माझ्या आईला बघून त्यानी काकू तुम्ही इथं मारलेली उडी त्या तात्पुरत्या पालकत्वातून आलेली होती. आजही आईचे फेसबुकवरचे फोटो पाहून अनेकांच्या त्या जुन्या आठवणी ताज्या होतात.

खूप नावं, आठवणी आहेत, लिहिण्यासारखं खूप आहे. पण दंगल बघताना मला आठवली ती खेळाडू तयार होण्यातली मेहनत. एका रात्रीतून हिरो तयार होत नसतात. हिरो तयार होत असताना अनेक जण कारण ठरत असतात. खेळ म्हणजे फक्त क्रिकेट, हॉकी यापेक्षाही वेगळे असतात, मुलगा मुलगी असे भेदभाव न करता तयार झालेले अनेक ज्यूदोपटू, जुळलेले मित्र मैत्रिणी, कुटुंब. राष्ट्रीय स्तरापर्यंत जिंकलेली पदकं, सर्टिफिकेट आजही कित्येकांच्या घरात आहेत. ती आहेत तोवर सगळ्यांना आठवण करून देत राहतील त्यांनी जगलेल्या त्या वर्षांची. अशा छोट्या गावांमधल्या अनेक जणांच्या प्रवासाची गोष्ट असू शकते दंगल. दंगल चित्रपटा मधले काही प्रसंग, NSA मधल्या प्रशिक्षकाचं केलेलं चित्रण मला व्यक्तिशः आवडलं नसलं तरी स्वप्नांचा प्रवास हा नेहेमीच सुरेख असतो. आणि जेव्हा तो चाकोरी मोडून मिळवलेल्या यशाचा असतो तेव्हा कुठेतरी डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असतो.  


Monday, December 19, 2016

डार्क चॉकलेट आणि ट्रृटीफ्रुटी केक

त्यांची ती तिसरी चौथीच भेट असावी. पहिल्या भेटीत उत्सुकतेपेक्षा जास्त टेन्शन होतं. म्हणजे फोटो, इमेल्स मधून तरी बरा वाटला, आता प्रत्यक्षात कसा असेल कोणास ठाऊक. त्यात परत त्यांनी विचारलं होतं, घरीच भेटू या का? आणि ती काही बोलायच्या आधीच सांगितलं होतं, म्हणेज सगळेच आधी भेटूया मग वाटलं तर आपण भेटूया. तिला जरा विचित्र वाटलं, कारण काही पुढं घडलं नाही तरी उगाच त्या भागातून जाताना ते घर बघून आठवण येणार. ती माणसं बघून कदाचित आज हे आपले नातेवाईक असू शकले असते असं वाटणार. पण त्याच वेळी आधी घर, घरातले सारे भेटलो, तर खरंच निर्णयापर्यंत यायला मदत होईल असंही वाटलं. किमान बाहेर कोणत्या हॉटेल मधे भेटलो, तिथं कोणी ओळखीचं अचानक भेटलं तर काय सांगायचं हा प्रश्न तरी येणार नाही म्हणून तिला हायसं वाटलं. अशा कोणत्या मुलाच्या घरी जाण्याची  ते ही आई बाबांसोबत ही काही पहिली वेळ नव्हती. पण तरीही दडपण येतच होतं. साडी कि सलवार की सरळ जीन्स. मधला मार्ग म्हणून तिनी कुर्ता आणि लेग इन घातले. तसा फोटो वरून तो खूप शामळू वाटला होता पण फोटो काही सगळंच खरं सांगत नाहीत. फोटो पेक्षा तिला इमेल्स मधला तो जरा जवळचा वाटत होता. एकाच शहरात असलो तरी लगेच भेटण्याऐवजी आपण आधी इमेल्स वर बोलूयात. मग प्रत्यक्ष भेटूयात, दोघांनाही असेच हवं होतं. कधी कधी प्रश्नांची लगेच  दिलेली उत्तर वेळ मारून नेण्यासाठी असतात, त्यात फार विचार नसतो हे तिला तिच्या नोकरीमुळे आणि गेल्या दोन वर्षात १०, १२ मुलांना भेटून मिळालेलं ज्ञान होतं.

जवळपास दोन महिने एकमेकांना भरपूर इ पत्र लिहून सुरुवातीला घाबरवून, मग कोण किती पाण्यात आहे जोखून आता भेटायचं ठरलं होतं. फोन वरून फक्त आवाज ऐकून काही तरी मत ठरवण्याऐवजी समोरासमोर भेटलेलं बरं म्हणून दोघांनीही ठरवून नंबर एकमेकांना दिला नव्हता. तसं पत्रांवरून तरी तो तिच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळा वाटत होता. पण तरी फोटो वरून वाटला तसा बोलण्यात तरी शामळू वाटत नव्हता. त्याची स्वतःची ठाम मत होती. आणि त्यासाठी तो वाद सुद्धा घालायला तयार असायचा, पण त्याच वेळी समोरच्याच बोलणं पूर्ण ऐकून घ्यायचा देखील. आणि वाद घालताना समोरचं पूर्ण ऐकूनही घेत होता. मत भेद असले म्हणजे समोरचा टाकाऊ असं त्याला बिलकुल वाटत नव्हतं, ते बघून तिला खरंच बरं वाटत होतं. तिला पहिल्यापासून दिसण्यापेक्षा वागणं महत्वाचं वाटायचं. दिसणं आपल्या हातात नसतं, मात्र वागणं आपण ठरवू शकतो. आणि हेच तिच्या आजू बाजूच्या अनेक लोकांना कळत नव्हतं.  दोन वर्षात अनेक नमुने भेटून, पाहून झाल्यावर तिला स्वतःचाच संशय यायला लागला होता. आपण काही भलत्याच अपेक्षा धरून बसलोय की काय?

साधं त्यांच्या घरासारखं घर, नजरेला पडणारी काही पुस्तकं, भरपूर बोलणारी त्याची आई, तिला मनापासून आवडत होतं, फोटोतल्या पेक्षा तो खूपच वेगळा वाटतं होता. नशीब आपण फोटो बघून लगेच नाही म्हणालो नाही, तिनी मनातल्या मनात स्वतःलाच म्हणलं. घरात असलेल्या भार्पूर खिडक्या, खेळणारी हवा बघून मगाशी आलेलं दडपण अगदी पळून गेलं होतं. लग्न फक्त काही मुलाशी होत नसतं, त्याच्या घराशी, त्याच्या घरातल्या लोकांशी सगळ्यांशीच होत असतं, त्या दोघांची ए पत्र तिला पटकन आठवली. तिथं भरपूर बोलणारा इथं मात्र अगदी मुग गिळून गप्प होता, त्यामुळे ती पण शांतच होती. एकूण सगळं चांगल होतं पण परत फक्त त्याच्याशी एकट्याशी बोलावं असं वाटतं असतानाच त्याची आई म्हणाली, तुम्ही दोघं बोला, आयुष्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ममाज बॉय एकदम तिच्याकडे बघत म्हणाला ठीक आहे आम्ही भेटू बाहेर कुठे तरी!

मग दुसरी भेट पण अशीच कुठे तरी झाली, दोघांच्या सोयीनं जागा, वेळ ठरवली.  खरं तर त्याच्या घरीच दोघांचा निर्णय झाला होता , पण तरीही तो निर्णय योग्य  आहे ना याची खात्री म्हणून ही भेट होती. काय खाल्लं यापेक्षा काय बोलतोय हे तेव्हा महत्वाचं वाटत होतं. जमेल ना आयुष्यभर या माणसासोबत राहायला. असा प्रश्न दोघांच्याही मनात डोकावत असताना, समोरच्याची अजून एक नवीन बाजू दिसत होती. आयुष्याचा कंटाळा येऊ द्यायचा नसेल आजूबाजूच्या माणसांचा कंटाळा न येणं जास्त गरजेचं असतं. पक्का निर्णय दोघांनी घरी सांगितलं तेव्हापासून दोन्ही घराचं वातावरणाच बदललं होतं. फोन, तारखा, खरेदी याखेरीज विषयच सुचत नव्हते.

तिसऱ्यांदा भेटले तेव्हा त्यांचे नातं बदललं होतं, संदर्भ बदलले होते, त्यामुळे थोडा अवघडलेपणा आला होता. एक कळत नकळत ताण होता. आता मी काही बोलले तर त्याचा दुसराच अर्थ निघणार नाही ना. याला काही वाटणार नाही ना, पत्र, प्रत्यक्ष भेट, फोन, गप्पा साऱ्याची सांगड लावून एक नातं तयार होत होतं, जशी ती घाबरत होती, त्यापेक्षा जास्त तो घाबरत होता, आजवर मैत्रिणी चिक्कार होत्या, पण अशी खास मैत्रीण कोणीच नव्हती, आई सोडली तर घरात कोणी मुलगी पण नव्हती, त्यामुळे मुलींना नक्की काय हवं असतं त्याला कळतंच नव्हतं. तिनी भेटायला येताना काहीतरी गिफ्ट आणलं होतं ते पाहून त्याच्या पोटात एकदम खड्डा पडला, बाप रे आपण अगदी विसरलोच की असं काही गिफ्ट वगैरे द्यायचं असतं. तिनी अगदी सहज ते त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं मला आवडतं काही क्षण खास करायला, आजच्या भेटीची आठवण म्हणून हे एक छोटंसं गिफ्ट. त्याला आवडेल की नाही म्हणून आतून घाबरत पण वरून अगदी सहज बोलल्याचा आव आणत तिनी instrumental cd चा पॅक त्याच्या हातात ठेवला. हसून काहीतरी बोलून त्यानी वेळ मारून नेली. आणि त्याच्याकडे ती सगळी, गाणी, जवळपास 1 gb चं साऱ्या पध्दतीच संगीत असूनही खोटं हसून अगदी नव्यानं हे बघतोय असा आव आणत खूपच छान आहे, मी गाडीत नक्की लावेन म्हणाला, तेव्हा त्याच्या आवाजत उसनं अवसान होतं. खाऊन पिऊन झाल्यावर त्यानी तिला एकदम एका दुकानात नेऊन तुला काय गिफ्ट हवं ते तूच ठरव सांगितलं, तेव्हा तिचं मन खट्टू झालं, माझं गिफ्ट मीच घ्यायचं?, मग त्यात काय गंमत, ते गिफ्ट नाही खरेदी होऊन जाते, मनाला आवर घालत तिनी एक किमतीच्या टॅग कडे बघत एक कुर्ता घेतला.

चौथ्या वेळी मात्र मित्राच्या सूचनेवरून तो आधीच फुलं आणि चॉकलेट घेऊन आला होता, तर त्या दिवशी तिनी घरून केक करून आणला होता. त्याच्या हातात मिल्क चॉकलेट पाहून पडलेला चेहरा तिनी एका सेकंदात सरळ केला, आणी ट्रृटीफ्रुटी घातलेला केक पाहून त्यानी पण आंबट पडलेला चेहरा गोड केला. पहिल्या घासा नंतर मात्र तिनी त्याला मला मिल्क चॉकलेट आणि त्यानी तिला मला ट्रृटीफ्रुटी घातलेला केक आवडत नाही असं सांगितलं तेव्हा दोघं सुटल्यासारखं  जोर जोरात हसत सुटले आणि हसता हसता एक मेकांचा हात घट्ट दाबला तेव्हाच बहुतेक त्यांच्यातल्या नवरा बायकोच्या’ नात्याची सुरुवात झाली...


आजही तो तिच्या वाटची पण मिल्क चॉकलेट खातो पण आठवणीनं तिला डार्क चॉकलेट आणतो, आणि ती केक करताना त्याच्यासाठी काहीही घालत नाही, आणि बाकीच्या सगळ्यांसाठी म्हणून मग वरून डेकोरेशन करून ट्रृटीफ्रुटी, बदाम, अक्रोड असं काही काही घालते. आपल्याला आवडतं ते न सोडता, आपल्या आवडत्या माणसाला जे आवडतं ते ही करणं म्हणजे पण प्रेमच असतं ना....!  

Sunday, December 11, 2016

गंध सांगतो काही...

सकाळी सकाळी अलार्म वाजायच्या आधी जाग यावी, मस्त एक आलं घातलेला वाफाळता चहा पिऊन मस्त फिरायला जावं. बाहेर धुकं बिकं पडलेलं असावं, फुलांचे वास सगळीकडे घमघमत असावेत. आपल्याच तंद्रीत सुर्यकिरणांबरोबर पावलं टाकत स्वतःशीच संवाद साधत चालत चालत दिवसाची सुरुवात करावी असं तिला नेहेमी वाटायचं. सकाळची वेळ तिला तिची वाटायची, एका बाजूला स्वैपाकाची गडबड, डबे बांधायची धावपळ पण त्यातही वेळ काढून ती स्वतःसाठी अर्धा तास काढून एक प्रभात फेरी मारून यायचीच. ती प्रभात फेरी चुकली की दिवस सुरूच झाला नाही असं तिला वाटायचं. काही वर्षांची सवय झाली होती ती, अशी जुनी सवय आयुष्याचा एक भागच बनून जात असते मग.

तिला कायम वाटायचं सकाळी उठल्या उठल्या एक प्रसन्नता सगळ्या नसानसांतून फिरत असते, रात्रीच्या झोपेमुळे सारे अवयव, अगदी मेंदू देखील कामाला लागलेला असतो, रात्रीत सुचलेले नवे विचार नव्या दिवसाची झक्कास सुरुवात करून देत असतात. मग फिरता फिरता आज काय काय करायचं याची एक यादी ती मनातल्या मनात तयार करायची, काल करायच्या राहिलेल्या कामांची वेगळी यादी मांडायची, मग त्या कामांचा क्रम सारा दिवस ती मनातल्या मनात आखून टाकायची, मग आजू बाजूला चालणाऱ्या लोकांकडे बघायची, ऐकायची, पहायची. ओळखीच्या चेहऱ्यांना हसू दाखवायची, कुठे ओळख शोधायची. मग आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधायची, असे छोटे मोठे कित्येक गुंते तिनी या सकाळच्या अर्धा तासात संपवले होते.

आज चालता चालता ती एक दोन मिनिटं थबकली, ३, ४ सेकंद अंगावर येऊन धडकलेल्या त्या वासानी ती एकदम काही वर्ष मागे गेली. त्याच्या परफ्युम चा वास तो. कायम त्याच्या आधी तो वासच तिच्यापर्यंत पोहोचायचा. त्याच्याशी मैत्री व्हायच्या आधीच तिची त्या वासाशी मैत्री झाली होती. तसे अनेक वासाचे परफ्युम, अत्तर याआधी हुंगले होते, पण हा गंध खोल आतवर कुठे तरी उतरला होता. कॉलेज मध्ये असताना, त्याच्याशी घट्ट मैत्री व्हायच्या आधी पण त्याच्या वासाचं अस्तित्व ती शोधून काढायची. जेव्हा पुढं ती वासाच्या नंतर त्याच्याही प्रेमात पडली तेव्हा तिनी त्याला सांगितलं पण होतं, काय सुंदर वास येतो रे तुझा, तुझ्या परफ्युम चा. परदेशातून त्याला कोणीतरी आणून दिलं होतं ते. सोबतची प्रेमाची काही वर्ष गेली, थोडे ते दोघेही बदलत होते, बदलला नव्हता तो त्याचा परफ्युम. त्याच्या कारणानी का होईना पण तीही अत्तर वापरायला शिकली होती. खरं तर त्याला खूप आवड होती वेगवेगळे वास लावून बघायची, पण ती अडून राहिली होती त्याच वासावर, म्हणून त्यानी तिला एक दोनदा अत्तरवाल्या गल्लीतून फिरवून आणलं होतं. तिथल्या त्या वासांच्या घमघमाटात तिला भाजी मंडईत ताज्या भाज्या बघून जशास आनंद होतो तसा आनंद झाला होता.

नोकरी सुरु झाली, भेटी कमी होऊ लागल्या आणि मग न आवडण्याची एकेक कारणं समोर दिसायला लागली. इतकी वर्ष जे चालवून घेत होतो, ते सगळं पुढं रेटायला नको असं वाटायला लागलं. एका छान वळणावर एकमेकांच्या हातात हात घेऊन त्यांनी एकत्र घेतलेल्या शपथा, आणा भाका मोडल्या, आणि दोन वेगळ्या रस्त्यानी चालायचं ठरवलं. एकत्र राहणं जमत नव्हतं, तेव्हा हे असं वेगळ राहून पाहूया म्हणत दोघ वेगळ्या वाटेने गेले. सोप्प काहीच नसत, ना नवीन नातं बांधण ना नातं टिकवणं. आयुष्याचा धडा मिळेपर्यंत पार पुढे चालत आली होती. आता माग वळण शक्य नव्हतं, कोणास ठाऊक पुढं भेटेलही तो म्हणत चालत राहिली, मग कधी तरी त्याच्या दोन चार गोष्टींचे भास घडवणाऱ्या एका मित्रासोबत लग्न करून मोकळी झाली. याला सुरुवातीला अत्तर देऊन तिनी जोखलं, पण तो दुकानात पहिले दिसणारा, परफ्युम घेणाऱ्यातला आहे कळल्यावर त्रागा चिडचिड न करता त्याच्या बदलत्या वासांना आपलंसं केलं.

तसं सगळ चाकोरीतल्या सारखं चाललं होतं. कमीत कमी अपेक्षा ठेवल्या की छोट्या छोट्या गोष्टींमधले आनंद अगदी डोंगराएवढे जाणवतात. वळणावरून पुढच्या रस्त्यावर खूप काही शिकायला मिळालं होतं. त्यामुळे आता कोणतही वळण नको सरळ साधा रस्ता धरत ती चालत होती. सुख, दुःख प्रेम सगळे आपलेच असतात, आपल्याच सोबत असतात, आपण त्यांना पाहू शोधू तसे ते आपल्याला सापडतात, प्रत्येक प्रसंगाचा एक गंध असतो, आठवणी उडून गेल्या तर गंध कायम राहतात. दिवाळीतला, उटण्याचा गंध, आईचा साडीचा गंध, पहाटेचा गंध, तव्यावरच्या पोळीचा गंध, नव्या पुस्तकांचा गंध, ओल्या मातीचा गंध, एक ना अनेक, आठवणी, माणसं सारी उरतात गंधापुरती. अशा माणसांच्या सहवासानी तयार होतो नात्यांचा , घराचा गंध. प्रत्येक घराला वेगळ अस्तित्व देणारा असतो हा गंध.


वळणावरती तिचा हात हातात धरून तो म्हणाला होता, प्रयत्न केला तर कदाचित धगून जाईल सारं काही, पण त्यात निखळ आनंदापेक्षा असेल टिकवून ठेवण्याचं दडपण. त्रास करत, भांडत रोज एकमेकांना सोबत करण्याएवजी ठरवून निरोप घेतला तर आपल्या नात्याचा सुगंध कायम राहील. प्रेम असलं तरी नातं टिकवणं अवघडच! आज इतक्या वर्षांनी परत तोच वास, वळून बघेपर्यंत आठवणी, गंध सारंच दूर गेलं होतं. पायांना जबरदस्ती घरी वळवून आणत तिनी सत्यात आणलं, घरी येऊन तिच्या कपाटातल्या अर्धवट संपलेल्या अत्तराच्या डब्यांचा वास श्वासासरशी आत भरून घेत, त्याच्या परफ्युमचा घट्ट डोक्यात बसलेला वास तिनी तिथंच सोडला, आणि घरात कामाला लागली, नव्या गंधाचा भरत नवा दिवस सुरु करायला.  

Wednesday, December 7, 2016

एक आहे गुड्डी....

एका चित्रपट महोत्सवात खूप दिवसांनी परत गुड्डी सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बघूनही हा चित्रपट बघताना कंटाळा आला नाही, चित्रपट बिलकुल शिळा वाटला नाही. जेव्हा पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा मी देखील गुड्डीच्याच वयाची असेन. अगदी साधी सरळ एका चित्रपट वेड्या मुलीची गोष्ट म्हणजे गुड्डी. जया भादुरी आजची जया बच्चन हिचा पहिला चित्रपट हा. माझ्या आवडत्या अभिनेत्रीचा आणि दिग्दर्शकाचा हृषिकेश मुखर्जींचा हा सिनेमा मला आपल्या सगळ्यांचीच गोष्ट वाटते.

एका छोटाश्या गावातल्या मुलीचा आवडता नायक धर्मेंद्र, त्याचा प्रत्येक चित्रपट तिला पाठ! शाळा बुडवून सिनेमा बघायचं तिला वेड. आयुष्य म्हणजे एक सिनेमा मानून चालणाऱ्या लाखो भारतीयांचं प्रतिक म्हणजे गुड्डी. सिनेमातली वाक्य, प्रसंग, माणसं खरी मानून आपण एक समांतर आयुष्य जगत असतो. सिनेमातल्या, मालिकांमधल्या पात्रांमध्ये आपण शोधात असतो स्वतःलाच. त्यांच्या सारखेच कपडे करून, त्यांची भाषा बोलून, त्यांच्यासारखा विचार करून आपण ते स्वप्नी जग आणि सत्यीत जग एकाच करायचा प्रयत्न करत असतो. शाळा बुडवून सिनेमाचं शुटींग बघायला गेलेल्या गुड्डीला सही देताना with love म्हणून लिहिणाऱ्या धर्मेंद्र च्या प्रेमात पडलेली गुड्डी स्वतःला मीरा आणि धर्मेंद्र ला कृष्ण समजायला लागते. मग तिला पडद्यावरचा धर्मेंद्र खरा खरा तिचा देव वाटायला लागतो, गुंडांशी भांडणारा, पियानो वाजवणारा, कधी डॉक्टर, कधी क्रांतिकारक, कधी कवी, कधी प्रोफेसर जेवढे सिनेमे तेवढी रूपं, एक माणूस जे जे काही स्वप्नात, कल्पनेत करू इच्छितो ते ते हे नायक मोठ्या पडद्यावर अगदी सहज करत असतो. गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात असते, आणि गुड्डीच्या प्रेमात नवीन, तिच्या वहिनीचा भाऊ असतो. गुड्डी चित्रपटांमध्ये इतकी रंगलेली असते की रडताना तिच्यासमोर आदर्श असतो मीनाकुमारीचा, तिला कपडे हवे असतात माला सिन्हा सारखे. भावना प्रगट करताना देखील तिला सिनेमाचा आधार लागायचा.  
जेव्हा नवीनला कळतं की गुड्डी धर्मेंद्र च्या प्रेमात आहे तेव्हा तो खरंच खचतो, पण मग मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेले त्याचे मामा त्याल समजावून सांगतात, अरे तिला जे वाटतंय ते प्रेम नाही तर आकर्षण आहे. प्रत्येकाच्या मनात अशी एक छबी रुतून बसते, मग मोठ्या पडद्यावर ते सारं बघून आपण त्या माणसाच्या नव्हे तर प्रतिमेच्या प्रेमात असतो.

गुड्डी ज्याच्या प्रेमात असते त्या धर्मेंद्र च्या मदतीने नवीन चे मामा, गुड्डीला सिनेमाच्या फसव्या जगाचं दर्शन घडवतात. प्रत्यक्ष सिनेमात संवाद लिहिणारा कथा/ संवाद लेखक , ते संवाद कशा प्रकारे बोलायचे हे दाखवणारा दिग्दर्शक, आणि हे सगळं चित्रित करणारा कॅमेरामन हे आणि यांच्या सारखे अनेक जण मेहनत करतात तेव्हा जाऊन एक स्टार जन्माला येत असतो. अगदी साध्या सरळ भाषेत , दृश्यांमध्ये हृषीकेश मुखर्जींनी कित्येकांना त्यांच्या भ्रमातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. जवळपास ४६ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट आजही तेवढाच खरा वाटतो, पटतो. ह्या नाटकी दुनियेचा अनुभव घेतल्यावर गुड्डीला साक्षात्कार होतो तिच्या अवती भोवती घुटमळणाऱ्या प्रेमाचा .. आपण स्वप्नांच्या मागे पळता पळता, अप्राप्य गोष्टींचा ध्यास घेता घेता आपल्याला जे सहज शक्य आहे ते सुद्धा मिळवत नाही. गुड्डीला झालेल्या नव्यानं झालेल्या प्रेमाच्या साक्षात्कारावरच हृषिदा हा चित्रपट संपवतात आणि आपण परत येतो वास्तवात.
  
आजही नायक नायिकेच्या पडद्यावरच्या छबीलाच खरं मानणारे अनेक जण आहेत, नायक नायिकेसाठी काहीही करायला तयार असणारे आजही आहेत, फक्त धर्मेंद्रच्या जागी, शाहरुख खान, सलमान खान, ह्रितिक रोशन ,रणबीर कपूर, शहीद कपूर अशी फक्त नावं बदलली आहेत, आजही लोकांना फक्त पडद्यावर चमकणारे तारेच भुरळ घालतात, त्यांना चमकवणाऱ्या हातांचे कष्ट, आणि प्रतिमा आजही दुर्लक्षितच असतात.

जितकं गुड्डी मधलं हम को मन की शक्ती देना डोक्यात गात राहत तशीच सिनेमामधली सिनेमावरची दिग्दर्शकाची टिप्पणी लक्षात राहते. आपण प्रत्येक जण आयुष्यात एक फँटसी शोधत असतो. एकाच जन्मात आपल्याला अनेक जन्म जागून घ्यायचे असतात. जे जे उत्तम उद्दात्त ते ते आपल्याला आपल्याकडे हवंसं असतं. आपल्या सुखाच्या, आनंदाच्या कल्पना आपण दुसऱ्यांकडून प्रेरित होऊन घेत असतो. आपल्या प्रियकरामध्ये आपल्याला आपला आवडतो ‘हिरो’ दिसत असतो, तर आपल्या आवडत्या ‘हिरोईन’ चे भास अनेकांना त्यांच्या प्रेयसी मध्ये होता असतात. नवरा बायको देखील एकमेकांच आयुष्य फिल्मी पद्धतीनं जोडायचा प्रयत्न करत असतात. हे वागणं जगावेगळ बिलकुल नसतं, मुळात हे असतं, आपल्या आयुष्यातले प्रश्न विसरण्याचा, किंवा असुरक्षितता विसरण्याचा सोप्पा मार्ग. सिनेमातलं बघून लग्नामधले विधी जेव्हा बदलायला लागतात, जेव्हा कपड्यांची फॅशन बदलते, फिरायला जाण्याची ठिकाणं बदलतात तेव्हा सिनेमातल्या आपल्या आयुष्यावरच्या प्रभावाची जाणीव होते. सिनेमाला समाजमनाचा आरसा समजलं जातं. पण हा आरसा अगदी गंमतीशीर असतो, म्हणजे ही खरतर काच असते, ज्यामध्ये दोन्ही बाजूचं दिसत असतं.


चित्रपट हा एक उत्तम कलाप्रकार मानला जातो. आपण आपली जागाही न सोडता एका वेगळ्या जगात सैर करून येत असतो, माहीत असलेली गोष्ट वेगळ्या पद्धतीनं बघत असतो, अनुभवत असतो. त्यामुळेच ४६ वर्षापूर्वी बनवलेल्या सिनेमा आजही तेवढाच valid ठरतो. माझा ५ वर्षाचा मुलगा जेव्हा मालिकेतलं, जाहिरातीतलं जग खरं मानून मला काही विचारतो , त्या त्या वेळी मला त्याच्यात गुड्डा दिसतो. मी वाट बघतीये त्याच्यासोबत बसून गुड्डी बघायची, कदाचित त्याला दाखवता दाखवता मीच परत काही तरी शोधेन, मला काय हवं आहे याचा परत एकदा मला साक्षात्कार होऊ शकेल.