Friday, January 22, 2016

श्वासांचे ठसे

तुझ्या एका शब्दाने फुलत जातो
फुलांचा मळा
आणि मग मी हरवून जाते
आपल्या जगात


एकेका पाकळी वर आपण लिहित
असतो एकेक आठवण
आणि सोडून देत असतो
इंद्रधनुच्या पल्याडच्या
चालता येणाऱ्या सुवासिक समुद्राकडे


शब्द हरवत जातात,
तेव्हा नजरा वेध घेतात
पापण्या मिटत च नाहीत,
तुझे माझे सारे गोठुन् जाते
त्या बाहुल्यांमधे


तुझा आवाज थांबतो
आणि सुळळ करून
येतात सारे शब्द, तुझी आठवण
माझा पाठलाग करत


मी अर्धवट शब्दात हरवलेली,
पूर्ण तुझ्यात गुंतलेली,
स्वतःला सोडवून घ्यायला


परत येते तुझ्या श्वांसांचे ठसे शोधत

अमृत पोळी

आजी असते तेव्हा असते पुरणपोळी,
आणि आता असते फ़क्त आठवण
खरपुस भजलेली, तुपात भिजलेली,
तोंडात घातल्याबरोबर विरघळणारी


तिच्या तोंडून ऐकलि,
वहीत लिहून घेतली,
जशीच्या तशी करून पाहिली
अगदी चिमुटभर सुद्धा फरक नाही,


खमंग झाली, चाँगली झाली,
आवडली पण ती चव् नाही
आजी समोर उभे राहून करून पाहिले
पण ती चव मिळाली नाही


सायीचे हसत,मेतकुटाच्या हातानि
तिने पाठीवर हात ठेवला
आणि म्हणाली बयो सोप्प आहे ग सगळे
फ़क्त त्यासाठी सोसाव्या लागतात
स्त्रीजात खुणावा , सुनेच्या कळा,
लेकिच्या वेणा
सगळे डाग, चटके, पडले हातावर
की आपोआप येते चव हाताला,
झाले मनावर आघात की
होते उतरते गोडी हातात


स्वतःला विसरून जगण्याची होते सवय
आणि मग जमत जातात एकेक पदार्थ


तोवर तोंडातल्या पुरणपोलीचे अमृत
उतरले असते जिव्हांग्रंवर
लागली असते समाधि
विरुन गेलेले असतात आजीचे शब्द,


मिळून जाईल तिला मोक्ष,
सफल होईल तिची तपश्चर्या
आणि मी करत राहीन तिच्यासारखी साधना
भाजत राहीन पोळ्या चव येईपर्यंत
जळत राहीन स्वाद येइपर्यंत,
स्त्रैत्वाच्या खुणा जमवत राहीन
कध्धितरि नातीला अमृतपोळी खायला घालेपर्यंत

अनंताच्या पलीकडे

तू असा समोर असतोस,
एक टक बघत असतोस,
शोधत असतोस दिसतय का कुठे
आपले जग,


मग तुला घेऊन मी बुडी मारते
माझ्याच डोळ्यात


आणि मग 17 जन्म,
15 युगे लोटून आपण
जातो एका वेगळ्याच जाग्गात


तिथे सुरर्कन मासे आणून देतात मोती,
तुझे माझे नाव असलेले,
आणि झाडे आपल्या मागे येतात सावली धरून


तुझी मिठी कधी सैल पडायचीच नाही,
तुझे ओठ कधी ओठातून निसटायचेच नाहीत,


जगण्यासाठी पुरेसे होते एकमेकांचे श्वास,
स्वर्गाचे होते तिथे आभास,


तिथे थांबत होता काळ,
सरकतच नव्हती वेळ


सावल्याना तिथे जागा मिळत नव्हती म्हणून
त्या ही घुटमळत होत्या आपल्याच डोळ्यात
निळ्या पाण्याच्या काठावर्
सोनेरी रेतीवर थांबला होता सूर्य
मावळतीच्या वळणा वर
आणि चंद्र डोकावत होता पापणीच्या
टोकावर


किती काळ होतो तिथे तुलाच ठाऊक
लवली कोणाची तरी पापणी
आणि बुडले जग आपले


जेव्हा परत सापड़तील आपल्या
सावल्याना त्यांचे रंग तेव्हा परत
मिळेल आपल्याला आपले जग

Sunday, March 13, 2011

पुस्तकाचा कोपरा : उत्तम- मध्यम

लेखनातील दैवी मध्यम
मानसी होळेहोनूर - रविवार १३ मार्च २०११
शास्त्रीय संगीतात सात स्वर मानलेले आहेत. त्यातला मध्यम हा फक्त नावाने नव्हे तर खरोखर मधला स्वर. बरं नुसताच मधला नव्हे तर जरा हटकेदेखील. म्हणजे इतर स्वर शुद्ध तरी राहतील किंवा स्वत:चे स्थान सोडून खाली तरी उतरतील पण हा एकमेव स्वर स्वत:पेक्षाही मोठा होणारा, अगदी तसेच काहीसे म्हणता येईल. श्री. बा. जोशींच्या ‘उत्तम- मध्यम या पुस्तकाबद्दल!
एक व्यासंगी वाचक, संग्राहक म्हणून श्री. बा. प्रसिद्ध आहेतच, पण वृत्तपत्रांमधील विविध सदरांमधून त्यांनी ही ‘गंगाजळी’ जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. गंगाजळीचे चारही भाग सुज्ञ वाचकांच्या ग्रंथसंग्रहात कधीच जाऊन बसले आहेत, त्याच परंपरेचा वारसा सांगणारं श्रीबांचं पुढचं पुस्तक आहे. ‘उत्तम- मध्यम’. वस्तुत: १९८८ साली श्री.बांनी केलेल्या स्फुटलेखनाचे हे संपादित रूप. पण लेखकाच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘उपवर मोठय़ा मुलीच्या आधी धाकटीचं लगीन जुळून यावं असा सुयोग कधीकधी अनुभवास येतो. तसेच काहीसे या थोरल्या लेकीला उजवण्याबाबत घडून आले. कनिष्ठ ‘गंगाजळीचे’ शुभमंगल अगोदर झाले आणि नंतर ज्येष्ठा ‘मध्यमा’ बोहल्यावर चढली. श्री.बां.चा हा मिस्कीलपणा पूर्ण पुस्तकभर जाणवत राहतो.
पाश्चिमात्य चित्रपटांचे, दूरवाहिनीवरील मालिकांचे भारतीयीकरण हे सध्याचे चलनी नाणे आहे. पण २२ वर्षांपूर्वी श्री.बां.नी लंडन टाइम्समधल्या ‘थर्ड लिडर्स’ च्या धर्तीवर वर्षभर ‘मध्यम’ हे सदर लिहिले होते. जडभारी समस्यांचे विवेचन करणाऱ्या आणि भारदस्त भाषेत रखडलेल्या दोन अग्रलेखांचा भार हलका करण्याचे काम हे ‘थर्ड लीडर्स’ करत असत. नंतर यथावकाश ‘थर्ड लीडर्स’ ‘फोटो लीडर्स’ झाले. या दोन्हीचे संग्रह वाचनात आल्यावर नकळत त्यांच्या प्रेरणेने, त्याच्या धर्तीवर ‘मध्यम’ हे सदर लिहिले गेले. श्री. बा. जोशी त्या काळी कलकत्त्यामध्ये वास्तव्यास होते. पण हे सदर मात्र त्यांनी ‘मधुमंत’ या टोपणनावाने लिहिले होते आणि कोण हा मधुमंत यावर त्या काळी वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. वेगवेगळे तर्क, वितर्कही लढवले जात होते.
एखाद्या विशिष्ट तारखेच्या निमित्ताने, एखाद्या पुरस्काराच्या निमित्ताने कधी किंवा कधी कुठल्याही कारणाशिवाय लिहिलेले असे स्फुट लेख या संग्रहात आहेत. कधी एखाद्या वाचलेल्या लेखाच्या पुस्तकाच्या निमित्ताने श्री. बा. वाचकांना लंडनच्या लायब्ररीत फिरवून आणतात तर कधी टीकेचे, उपेक्षेचे धनी झालेल्या शेवटच्या बाजीरावांबद्दल रोचक माहिती देतात. कधी टिनटिन या जगभर गाजलेल्या कॉमिक्सबद्दल लिहून बालसाहित्य हे फक्त काळापुरते मर्यादित नसते किंवा कॉमिक्ससुद्धा अभ्यासपूर्वक लिहिली जातात हेही त्यानिमित्ताने ते सांगून जातात. एका लेखामध्ये ग्रंथ, ग्रंथसंग्राहक आणि गृहिणी या व्यस्त त्रराशिकाबद्दल सांगताना देशविदेशातल्या अट्टल ग्रंथसंग्राहकांबद्दल सांगून जातात, तर कधी मराठी लोकांच्या विस्मरणात गेलेल्या, पण  मराठीच असलेल्या पं. केशवराम भट्ट, तुलसीसाहेब, बापूदेव म्हणजेच एन. नृसिंग सीताराम परांजपे यांबद्दल लिहून या विस्मृतीत गेलेल्यांचा यथोचित सन्मान करतात. वस्तुत: या पुस्तकातील स्फुट लेख, त्या लेखांवरून झडलेल्या पत्रांच्या फैरी हे एका स्वतंत्र लेखाचे विषय होऊ शकतील.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सु. रा. चुनेकर म्हणतात, त्याप्रमाणे ज्ञानकोश आणि शब्दकोश यांच्यामधला हा एक वेगळाच प्रकार आहे. पण हे पुस्तक वाचत असताना प्रत्येक वाक्यागणिक आपल्याला जाणवत राहते श्री. बां. ची माहिती आणि पुस्तकांची श्रीमंती. त्याचबरोबर  आपण किती खुजे आहोत, हेही लक्षात येत राहते. स्वत: लेखकाला मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच गुजराथी, बंगालीदेखील अवगत असल्या कारणामुळे त्या त्या भाषेतील संदर्भही सहजगत्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याचबरोबर लक्षात राहते ती श्री. बां. ची ज्ञानशूरता. श्री. बां. मधले परीसत्व, त्यांच्या स्पर्शामुळे दगडाचे सोन्यात रुपांतर होते आणि आपल्याला ‘घरबसल्या’ या सोन्याचा उपभोग घेता येतो. ज्ञानाचा अहंकार बाळगणारे, मिरवणारे अनेकजण असतात पण इतक्या सहजतेने ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या श्री. बां. ना ‘ग्रंथोपजीवी’ हे विशेषण शोभून दिसते.
खरे तर १९८८ हे स्फुटलेखन, पण त्याला वाचकांपर्यंत पोहोचायला उजाडले २०१० साल. जसे माणसांच्या पत्रिकेत ‘उशिरा भाग्योदय’, किंवा ‘कष्टाचे फळ मिळेल पण काही काळाने’ असे लिहिलेले असते, त्याप्रमाणे पुस्तकांची कुंडली मांडायची ठरवली तर ‘उत्तम मध्यम’बद्दल सर्व गुण उत्तम पण तरीही भाग्योदय उशिरा असेच म्हणावे लागेल. ‘मध्यम’ नावाच्या सदराचे पुस्तक येताना ‘उत्तम मध्यम’ झाले; पण तेही एक प्रकारे उत्तमच म्हटले पाहिजे. अनेक लेखांवरील आक्षेप किंवा भलामण करणारी अनेक पत्रे शेवटी छापली आहेत. ती वाचतानाच कळू शकतं या सदराने त्याकाळी वृत्तपत्रसृष्टीतच नव्हे तर जाणकार लेखक वाचकांमध्ये किती धुरळा उडवला होता. पद्मगंधा प्रकाशनच्या अरुण जाखडेंनी केवळ लेखच न छापता ही पत्रेसुद्धा छापून एकप्रकारे श्री. बां.चे, त्यांच्या लेखनाचे ‘मोठेपण’च नीटपणे पोचवले आहे.
गाण्यामध्ये स्वर्गीय, दैवी असा मध्यम लागणे हा साक्षात्कार समजला जातो, अनेकजण या साक्षात्काराचे साक्षीदार झाले असतील. परंतु असा दैव मध्यम लेखनातही लागू शकतो याचा प्रत्यय हे पुस्तक देते.

Monday, November 15, 2010

प्लीज साइन इन!


काही वर्षांपूर्वी एका गाजलेल्या चित्रपटात संवाद होता, ‘इस वल्र्ड में दो ही
टाईप के लोग होते है, एक ‘बनाने’वाले और दुसरे ‘बिगाडने’वाले. आता हाच संवाद थोडासा बदलून म्हणता येईल, ‘इस वल्र्ड में दो ही टाईप के लोग होते है, एक ‘सोशल नेटवर्किंग साइट्स’ देखनेवाले और दुसरे ‘सोशल नेटवर्किंग साइट्स नहीं देखनेवाले.’

पूर्वी चार लोक जमले की चर्चा व्हायची ती हवा-पाण्याची. वयोमानानुसार किंवा स्त्री-पुरुष अशा फरकाने शाळा, कॉलेज, राजकारण, घर-संसार, सासू असे विषय चर्चेत असायचे. पण आता मात्र चार लोक भेटले की आधी चौकशी करतात ती facebook, orkut बद्दल. किंबहुना दोन बिल्डिंगपलीकडच्या घरात आज ‘भरले वांगे’ आहे किंवा ‘आत्याच्या दिराच्या मुलाचे लफडे आहे’ किंवा ‘शाळेतल्या वर्गमैत्रिणीला मुलगा झाला’ अशा बातम्या पूर्वी गप्पांमधून कळायच्या, आता मात्र त्या कळतात facebook वरच्या वॉलवरून किंवा orkut वरच्या स्टेटस अपडेटवरून! Twitter हाही त्यातलाच एक प्रकार, फक्त थोडय़ाशा वेगळ्या वळणावरचा!

‘सोशल नेटवर्किंग साइट्स’ या गोंडस नावाखाली अमेरिकेमध्ये या वेगवेगळ्या प्रयोगांना सुरुवात झाली. या दशकाच्या सुरुवातीला ‘फ्रेडस्टर ही सोशल नेटवर्किंग साइट गुगलला विकत घ्यायची होती, पण तो सौदा फसला म्हणून ‘ऑर्कुट’ जन्माला आले. ही गोष्ट २००२ सालातली. ३० जानेवारी २००४ पासून आजतागायत ‘ऑर्कुट’ आपली लोकप्रियता टिकवून आहे. सुरुवातीला फक्त ‘आमंत्रण’ असेल तरच तुम्ही सभासद होऊ शकत होता. आता मात्र तशी काही अट नाही, पण वयाचे बंधन नक्कीच आहे. ऑर्कुटचे सभासद होण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे. (किमान आपली जन्मतारीख ‘त्या पद्धतीने’ सांगणे गरजेचे आहे!) भारतामध्ये ऑर्कुट येऊन चार-पाच वर्षे होऊन गेली असल्यामुळे त्याने चांगलेच बाळसे धरले आहे. किंबहुना ऑर्कुटवर ओळख होऊन लग्न ठरणे, हीदेखील आता कुतूहलाची बाब राहिली नाही.

खरं तर स्क्रॅप म्हणजे कचरा! परंतु ऑर्कुटवर स्क्रॅप म्हणजे एकमेकांना संदेश पाठवणे. ऑर्कुटवर आपण आपल्या ‘प्रोफाईल’मध्ये आपले स्क्रॅप सगळ्यांना दिसावेत की नाही हे ठरवू शकतो, पूर्वी मात्र कोणीही कोणाचेही स्क्रॅप वाचू शकायचे. ऑर्कुट काय किंवा फेसबुक, Hi5, ट्विटर काय सगळीकडे जे ‘प्रोफाईल’ असते, ते म्हणजे आपली ओळख जगासमोर मांडणे! आपल्या स्वत:च्या आयुष्यातला झरोकाच म्हणता येईल त्याला. म्हणजे जे पहिल्यापासून ओळखतात त्यांना ओळख पटावी आणि जे कोणी नवे मित्र-मैत्रिणी असतील त्यांना ओळख व्हावी हा उद्देश. मग त्यात स्वत:चा फोटो, आवडीनिवडी, शाळा, कॉलेज, नोकरीचे ठिकाण इ. माहिती टाकून स्वत:च्या प्रोफाईलमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणता येते. आता ही माहिती किती खरी, खोटी हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. माहितीची पडताळणी शक्य नसल्याने फसवणुकीचे प्रकार ऑर्कुटवर सर्रास आढळून येतात. फेक प्रोफाईल तयार करणे, चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणे, फसवणूक करणे याबाबत ऑर्कुटवर भारतात कायदेशीर खटलेदेखील भरले आहेत. ऑर्कुटवर वेगवेगळ्या ‘कम्युनिटीज’ असतात. ज्यांचा साधा अर्थ विशिष्ट विषयाशी संबंधित गप्पा मारण्याची, अधिक माहिती मिळवण्याची जागा, असा होतो. ब्राझिलखालोखाल भारतात सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जात असलेल्या ऑर्कुटची लोकप्रियता सध्या भारतातही उतरणीला लागली आहे. त्यामुळे 'Bye Bye Orkut, Welcome facebook' हे अनेकांचे ऑर्कुटवरचे ‘स्टेटस’ सध्या बघायला मिळते. वरवर बघायला गेले तर ऑर्कुटवर मित्र-मैत्रिणींशी संबंध हे जास्त वैयक्तिक पातळीवर ठेवता येतात. मित्र-मैत्रिणींमध्ये जवळचे, ओळखीचे, नातेवाईक अशी वर्गवारी करता येते. एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगता येते; परंतु मोबाइलचा जमाना आल्यावर पेजर जसे मागे पडले, तसेच facebook आल्यावर ऑर्कुट मागे पडले आहे.

काही दिवसांपूर्वी एक विनोद सगळीकडे लोकप्रिय होत होता. एक मरणासन्न आजी आपल्या नातीला जवळ बोलावून सांगते, ‘पोरी, मी आता मरायला टेकली आहे, पण मरण्यापूर्वी तुला सांगायचे होते, मी मेल्यावर माझं शेत, बैल, गाई, म्हशी यांची काळजी घेशील ना? थोडीबहुत पिकेही मी काढली आहेत!’ नातीला भयंकर धक्का बसतो, ‘पण आजी, आहे कुठे तुझी जागा? आम्हाला कोणालाच याबद्दल माहीत नाही, नात विचारते. त्यावर ती म्हातारी म्हणते, ‘अगं फेसबुकवरच्या फार्मव्हिलेमधल्या माझ्या शेतीविषयी बोलत आहे मी.’ फेसबुक, आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय होण्याचे एक महत्त्वाचे कारण, त्यावरचे ‘गेम्स’ आणि ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ आहेत. (मुद्दाम गेम्स आणि अ‍ॅप्लिकेशन्स ठेवले आहे, नाहीतर साराच ‘खेळखंडोबा’ व्हायचा.) फार्मव्हिले, फिशव्हिले, व्हॅम्पायर वॉर, आयटी गर्ल्स, माऊसहंट असे अनेक वेगवेगळे खेळ तिथे खेळता येतात. ‘सोशल नेटवर्किंग’ म्हणजे फक्त मनातले बोलायचेच नसते तर दोन-चार मौजेचे क्षण, निवांत क्षणही हवे असतात. कधी अशा व्हर्चुअल खेळांमधून पुन्हा बालपणीचा, तरुणपणीच्या आठवणी ताज्या होतात. तरीही फेसबुक ही मूलत: सोशल नेटवर्किंग साइटच, एखाद्या चाळीप्रमाणे! चाळीत कोणाकडे कोण येतो-जातो, काय स्वयंपाक होतो, भांडणे होतात हे जसे सगळ्यांना कळते तसेच फेसबुकवर तुमचे मित्र-मैत्रिणी काय करत आहेत, म्हणत आहेत. कुठे जाणार आहेत, त्यांनी कुठे फोटो काढले. अशी सगळी माहिती (फोटोंसह) तुम्हाला मिळते. तुमच्या स्वत:च्या भिंतीवर (wall) तुम्हाला हवं ते खरडू शकता, मनातला सल, आयुष्यातला आनंद, प्रतिक्रिया काहीही लिहू शकता. जगातल्या दर चौदा माणसांमधला एक फेसबुकवर असतो, इतक्या मोठय़ा प्रमाणात हे जाळं जगभर पसरलेलं आहे. यावर जसे जुने मित्र-मैत्रिणी भेटू शकतात तसेच सेलेब्रिटी आपले मित्र-मैत्रिणीसुद्धा होऊ शकतात. पाकिस्तान, चीन, व्हिएतनाम, इराण, उत्तर कोरिया या देशांनी मात्र फेसबुकला हद्दपार केले आहे. फेसबुकबद्दल बोलताना असे नेहमीच म्हटले जाते, ‘जे तुम्हाला बोलायचे आहे, पण बोलता येत नाही किंवा कुठे बोलावे हे उमगत नाही, त्यांच्यासाठीचे ते व्यासपीठ आहे.’ प्रत्येकाला याच्या वर्तुळातील मित्र-मैत्रिणींची माहिती देण्याच्या सुविधेचे ‘पेटंटही’ फेसबुकने मिळवलेले आहे. कदाचित भविष्यात त्यावरून फेसबुक, ट्विटर आणिोत्सम साइट्समध्ये वादही होतील!

सध्या चलती असलेलं दुसरं नाणं आहे ‘ट्विटर’. मुळात त्याची संकल्पना ही काही मित्रांच्या एसएमएस ग्रुपमधून जन्माला आली. ‘सोशल नेटवर्किंग’पेक्षाही ट्विटर प्रसिद्ध आहे ती मायक्रोब्लॉकिंगसाठी! फेसबुक, ऑर्कुटवर लिहिण्यासाठी शब्दसंख्येचे बंधन नाही. मात्र, ट्विटरची मूळ संकल्पनाच रटर मधून आलेली असल्याकारणाने तिथे आपले म्हणणे १४० अक्षरांमध्ये मांडण्याचे बंधन असते. त्यामुळे त्याचा वेग आणि सहजता जास्त आहे, असे अनेक ट्विटकरांना वाटते. मुळात ट्विटरवर असणे, ट्विट करणे हे आपल्याकडे गरजेपेक्षा फॅशन झाली आहे. आवडत्या नट- नटींना, राजकीय नेत्यांना follow करायचे या भावनेनेही अनेक जण ट्विटरवर असतात. मुळात भारतातच नव्हे तर जगभरात सगळ्यांनाच इतरांबद्दल, त्यातही प्रसिद्ध लोकांच्या खाजगी आयुष्याबद्दल चघळून बोलायला आवडते. ट्विटरवर जेव्हा कोंकणा सेन-शर्मा आपल्या लग्नाबद्दल सांगते किंवा अमिताभ एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देतो; तेव्हा ही माणसे हे आपल्याला सांगताहेत किंवा जगाला कळण्याआधी हे मला माहिती होते आहे, असा एक सुप्त आनंद होतो. ट्विटर हे संवाद वाढवण्यापेक्षा बोलण्याला, माहिती सांगण्याला जास्त महत्त्व देते.

प्रस्तुत लेखात जरी मुख्यत: ऑर्कुट, फेसबुक, ट्विटरविषयी सांगितले असले तरी याव्यतिरिक्त Hi5 (हायफाईव्ह), फ्रेडस्टर, मायस्पेस, निंग अशा अनेक सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत. प्रामुख्याने या तीन साईट्स विषयीच बोलण्याचे कारण म्हणजे या तीन चांगल्या पक्क्या रुजल्या आहेत. मुळात संवाद ही माणसांची प्राथमिक गरज आहे. संवाद साधण्यासाठी भाषेचा शोध लागला, मग तेही पुरेसे वाटले नाही म्हणून नंतर लिपी आली. आणि मग संपर्काची, संदेशवहनाची वेगवेगळी माध्यमे शोधून काढली गेली. पत्र, ई-मेल, पेजर, मोबाइल, एसएमएस असे किती वेगवेगळे मार्ग, पण ईप्सित एकच, एकमेकांशी संवाद!

‘तुका म्हणे आम्हावरी जो रुसला,
त्याचा अबोला आकाशासी!’

संवादाशिवाय माणूस जगू शकत नाही. आपण समाजात एकमेकांना ‘धरून राहतो’ कारण कितीही एकटेपणाची ओढ असली तरीही त्या एकटेपणाचे मूक साक्षीदार तरी हवेच असतात. पुलं म्हणाले होते त्याप्रमाणे मुंबई, पुणे, नागपूर ही तीनच गावे अशी आहेत ज्यांच्यापुढे कर जोडून विचारावे, ‘तुम्हाला कोण व्हायचे’ मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?’ तसेच या इंटरनेटच्या जमान्यात ऑर्कुट, फेसबुक की ट्विटर यापैकी कोणाचे ‘साईन इन’ करायचे हे मात्र शेवटी तुम्हीच ठरवायचे आहे!

Tuesday, June 22, 2010

पुस्तकाचा कोपरा : पावसाच्या मैफलीत.. गावझुला

पाऊस जेव्हा संततधार लावून काहीतरी सांगत असतो तेव्हा आपण मूकपणे ते ऐकण्याचे काम करायचे असते. सोबतीला फक्त घ्यायचे असते एक जीवाभावाचे पुस्तक आणि मग ऐटीत जमवायची असते मैफल तिघांची, पुस्तक आपण आणि पाऊस! या अशा मैफिलीसाठी सोबत लागते ती जरा वेगळ्या पुस्तकांची, म्हणजे जीवनानुभव सांगणारे लघुनिबंध, कविता तत्सम पुस्तकांची. कारण एका पानावरून दुसऱ्या पानाकडे वळताना क्षणभर आपल्याला एका सरीवरून दुसऱ्या सरीकडे जाणाऱ्या पावसालाही सोबत करायची असते. श्याम पेठकरांचे ‘गावझुला’ हे पुस्तक अशी मैफल जमण्याची खात्री देणारे पुस्तक आहे.

साप्ताहिक ‘लोकप्रभा’मधल्या सदराचे हे पुस्तकरुप. त्यातील लेख हे सारे आहेत ललितबंध. (या ललित निबंधासाठी लेखकानेच ललीतबंध हा सुंदर शब्द वापरलेला आहे) कधीकधी पूर्ण पुस्तक सलगपणे वाचायला वेळही नसतो आणि इच्छाही. कुठलेही पान काढून स्वत:ला त्या पानांमध्ये बुडवायचे असते. ‘गावझुला’ ती गरज पूर्ण करतं. हे पुस्तक, यातले ललितबंध हे मुळीच हलकेफुलके, वाऱ्याच्या झुळकीसारखे उडून जाणारे नाहीत. ते वाचून विरून जात नाहीत, ते उद्युक्त करतात याचा विचार करायला. किंबहुना गोष्टींचा सुसंगतपणे विचार करायला भाग पाडतात. गावागावातून प्रवास करणाऱ्या बैराग्याचे अनुभव हे फक्त त्याचेच राहात नाहीत ते वैश्विक होऊन जातात. कित्येकवेळा लेखकाने बैराग्याच्यामाध्यमातून रुपककथाही मांडल्या आहेत. इतिहास, पुराणकथांचाही सर्वसामान्यांच्या नजरेतून दिसणारा आकृतीबंध मांडून मग वाचकांनाच पेचात टाकले आहे, वेगळा विचार करण्यास भाग पाडले आहे। नावावरून जाणवतं तसं यात गाव आहे किंवा असंही म्हणात येईल की अनेक गावे आहेत.

वाचताना अनेकवेळा प्रश्नही पडून जातो; बैराग्याचा हा प्रवास दोन गावांमधला आहे की, दोन मनांमधला? ‘पावलं नेहमीच प्रश्नात अडकलेली असतात, म्हणून त्यांचा आकार प्रश्नचिन्हासारखा असतो’ हे अफलातून निरीक्षण. किंवा ‘सुरक्षेच्या परिघातले जगणे म्हणजे स्वातंत्र्य समजतो आपण किंवा ‘या जगातली सगळीच नाती शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधांसाठी निर्माण झालेली असतात. मित्र हे एकमेव मनाचं मनाशी असलेलं नातं आहे,’ ही वाक्ये फक्त पुस्तकातली राहात नाहीत, ती मनाचा ठाव घेऊन आत आत रुंजी घालत राहातात. त्यांना प्रतिभेचा स्पर्श आहे. यासारखी अनेक वाक्ये, अनेक विचार या पुस्तकात भेटतात, पण तरीही जाणवतं की हे पुस्तक आडवळणाने जरासे अध्यात्माच्या वाटेकडे जाणारे आहे. हे पुस्तक पूर्णपणे वैचारिकही म्हणता येत नाही आणि पूर्णपणे तत्वज्ञानात्मकही म्हणता येत नाही.

प्रत्येकाला ते वेगळं भासू शकतं. कोणाला ते जडही वाटू शकतं तर कोणाला ते आत्मसंवादाचे माध्यम वाटू शकतं. वस्तुत: यातल्या सगळ्या लेखांना ललितबंध असं नाव दिलेलं आहे. ललितलेख हे सहज-सरळ दीर्घ रस्त्यासारखे असतात, त्यात एखाद-दुसरं वळण असू शकतं आणि ते आजुबाजूच्या सर्वाचा, निसर्गाचा हात हातात घेऊन चालतात. या पुस्तकातले लेख हे मात्र सरळ रस्त्यासारखे नाहीत ते आहेत घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यांसारखे. काहींना त्यात रोमांचक अनुभव येतील तर काहींना शांतपणे डोळे मिटून हा प्रवास करावासा वाटेल.

लेखकाच्या अनुभवाच्या मर्यादांची कुंपणे अशा लेखांना आपसूकच पडतात, तशीच विषयांचीही. अनेकवेळा लेखांमधला शाब्दिक फुलोरा बाजूला सारला तर तेच ते परत वाचल्यासारखे वाटते. त्याचे कारण हेच असावे. विदर्भातले असल्यामुळे नकळत काही लोभस वैदर्भीय शब्द येऊन जातात, ते मात्र घाटात अचानक पिसारा फुलवून सामोऱ्या येणाऱ्या मोरासारखे मोहक वाटतात. ग्रामीण भागाचे झपाटय़ाने शहरीकरण होते आहे. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत ‘गावातील’ अनेक गोष्टी गडप होताना दिसतात. जगण्याची निवांत लय. समाजाकडे पाहण्याचा एक निरागस दृष्टिकोन, हिरव्या निसर्गाची बदलती रुपे आणि त्या बदलत्या रुपाशी जडणारे नाते, गावरहाटीचा भाग असलेले अनेक घटक हळूहळू ‘विस्मरणा’च्या तिजोरीत बंद होत आहेत। अशावेळी ‘गावझुल्या’वर बसून निवांत झोके घ्यावेत. हरवत चाललेल्या गोष्टींविषयीची ही खंत भाबडेपणाची असली तरी
त्याचे शब्दवेल्हाळ रुप वाचकांना धरून ठेवते.

Thursday, March 25, 2010

सांस्कृतिक कट्टा : मंद सुगंधी फुलोरा..

कित्येक वेळा आपल्याला कविता माहीत असतात, आपण आपल्या परीने त्यांचा अर्थही लावलेला असतो. स्वत:च स्वत:ला ती कविता समजावून सांगितलेली असते. परंतु अचानक एखादे वेळी कोणीतरी आपला हात धरतं आणि त्याच कवितेचा एका नवा चेहरा दाखवतं; तिचं नवं सौंदर्य दृष्टीसमोर उलगडवून अर्थाचे, शब्दांचे नवे पदर दाखवतो. मग आपण स्वत:च स्वत:ला म्हणतो, ‘अरे! हे आधी का दिसलं नाही आपल्याला?

‘चतुरंग’मध्ये गेल्या वर्षी अरुणा ढेरे यांचे ‘कवितेच्या वाटेवर’ हे सदर वाचताना वारंवार हा अनुभव आला. संपताना एक हूरहूर लावून संपलेल्या या सदराचे आता ‘पुस्तकरूप’ आले असून तोच अनुभव वाचकांना आता समग्रपणे घेता येणार आहे. या सदरासाठी केवळ मराठी कवितांच्या प्रांतातच मुशाफिरी करण्याचे बंधन न
स्वीकारता अरुणाताईंनी संस्कृत, इंग्रजी, हिंदी कविता, विविध प्रांतातील लोकगीते अशा विविध माध्यमातून रसिकांना कवितांच्या वाटेवर नेले. ‘पुसी कॅट, पुसी कॅट’ची गंमत सांगतानाच त्या लंडनला जाऊन आलेल्या, राणीच्या सिंहासनाखालच्या उंदराला घाबरवणाऱ्या मांजराची गंमत सांगतात. ‘ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, त्यांच्या सम्राज्ञीच्या सिंहासनाला एक उंदीर खालून कुरतडू शकतो’ अशी मार्मिक टिप्पणीही त्याच वेळी करतात. लाला टांगेवाला आणि लीलाची कविता सांगत अगदी शिशूवर्गाचीही आठवण करून देतात. ‘चाफ्याच्या झाडा’, ‘मधुघट’ आणि ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ या कवितांवरील लेख वाचताना हे सर्व ओळखीचे होते तरी किती अनोळखी होते हे लक्षात येते. असाच एक प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या ‘विरहणी’ वरचा! ‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा। भवतारक वो कान्हा, वेगी भेटवा का। अनेकदा ऐकलेली, वाचलेली ही विराणी, पण अरुणा ढेरेंनी जेव्हा त्यावर लिहिताना त्याला ‘मिनीएचर पेंटिंग’ची उपमा दिली होती तेव्हा मात्र इतके दिवस, वर्षे न दिसलेले मिनीएचर पेंटिंग, ज्ञानेश्वरांचे स्त्री मन, सगळे लख्ख दिसू लागलं. लोकगीतं हा तर या पुस्तकाचा आत्मा म्हणावा लागेल. अनेकवेळा संदर्भासाठी किंवा सहज त्या विषयाच्या वाटेवर जाता जाता अरुणा ढेरेंनी दोन-दोन ओळी लोकगीतांच्या वापरल्या आहेत. मग तुकाराम जिजाबद्दल असो, गंगेची कहाणी असो, सीतेच्या दुसऱ्या वनवासाची कथा असो किंवा सवतीमत्सराची कथा असो. विशेषत: सवतीमत्सराबद्दल बोलताना त्या लिहून गेल्या की, रुक्मिणी-सत्यभामा, रुक्मिणी-जनी- तुळशीच्या निमित्ताने लिहिताना स्त्रियांनी स्वत:च्या दु:खालाच वाचा फोडली आहे. किती वेगळे निरीक्षण आहे हे!

लेखिकेनं लोकगीतांचे संदर्भ घेतानाही भिल्ल लोकगीते ज्यांचा अनुवाद रणधीर खरेंनी केलाय ती किंवा माळवा प्रांतातल्या लोकगीतांचेही उल्लेख केलेत। नवरात्राच्या वेळेस खेळल्या जाणाऱ्या भोंडला, हादगा किंवा विदर्भातल्या
भुलाबाईबद्दल आपल्याला माहिती असते. पण तशाच पद्धतीच्या मध्य प्रदेश, माळवा प्रांतातल्या ‘सांझी’बद्दल त्यांनी ‘सांझी’मध्ये लिहिलं आहे. इंदिरा संतांची ‘कुब्जा’ असो किंव ना. घ. देशपांडेंची ‘अजून’ कविता असो. मुळातूनच त्या कविता सुंदर आहेत; पण अचानक कागदावर जेव्हा त्या भेटतात तेव्हा खरोखरच त्यांना कडकडून मिठी मारावीशी वाटली. मीरेच्या भजनांबद्दल लिहिताना अरुण ढेरेंची त्या भजनांच्या सौंदर्यापेक्षा मीरेतलं सौंदर्य दाखवताना लिहिलं आहे, ‘मीरेने केलेला स्थैर्याचा त्याग हा खरा त्याग! सगळं सुस्थित असूनही अदृश्याच्या मागे
जाणं हे मीरेचं वेगळेपण!’ कवितेबद्दल लिहितानाच त्यांनी कृष्णा जे. कुलकर्णी या अकाली मिटलेल्या कवीबद्दलही लिहिलं आहे.

शाळेच्या दिवसांत किंवा कॉलेजमध्ये सुटलेला कवितेचा हात आपण मध्येच कधीतरी धरतो, मासिकांतून, दिवाळी अंकामधून, पण जेव्हा एखादा मर्मज्ञ मार्गदर्शक आपल्याला त्या प्रदेशातून पुन्हा फिरवून आणतो तेव्हा खरी त्या खजिन्याची ओळख होते. गोडी लागते. कवितांच्या आशयापलीकडचा आशय समजून घेण्यासाठी तरी ‘कवितेच्या वाटेवर’ जायलाच हवे! बहुधा दरम्यानच्या काळात आपल्याही जाणिवा अधिक समृद्ध होतात त्यामुळे हे सदर अधिक भावले असावे. सर्वोत्तम लेख लेखिकेने निरोपासाठी राखून ठेवला होता. हे सदर संपविताना अरुणा ढेरेंनी लिहिलेला ‘निरोप’ हा जसा वाचकांचा होता, तसाच तो कवितेच्या वाटेवरच्या आनंदयात्री सुनीताबाईंसाठीही होता. स्वत: कविता न लिहिताही कविता हा सुनीताबाईंचा श्वास होता आणि कदाचित त्यामुळेच या लेखात कुठेतरी सुनीताबाईंचे अस्तित्वही जाणवून जातं. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूएवढीच त्याला वाहिलेली श्रद्धांजली चटका लावून जाणारी असू शकते हे हा लेख वाचल्यावर प्रकर्षांने जाणवले, आरती प्रभूंच्या या ओळी सुनीताबाईंसाठी आणि त्या सर्वासाठी ज्यांचा ‘निरोप’ घेता येत नाही,

‘अखेरच्या वळणावर यावा, मंद सुगंधी फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे, आणि सरावा प्रवास सारा..’

असे हे पुस्तक ‘मंदी सुगंधी फुलोरा’ फुलविणारे! रविमुकुल यांच्या देखण्या मुखपृष्ठासह.