Tuesday, January 8, 2019

भेट माझी माझ्याशी ...

फ्री झालीस की फोन कर.’
जान्हवीने तिच्या BF ला मेसेज केला आणि ती निवांत फोन वर नेटफ्लिक्स बघत बसली.  आज कितीतरी महिन्यानंतर छे वर्षांनंतर ती एवढी निवांत बसली होती, की काही सेकंद या मिळालेल्या मोकळ्या वेळेचं काय करायचं हेच तिला कळेना. नवीन चित्रपट ,शोचा तिचा बॅंकलॉग एवढा जास्त होता, की कुठून सुरु करावं हेच तिला कळत नव्हतं. रिया झाल्या नंतर ते आता ती शाळेत रुळली आहे तोपर्यंत तिला असा तिचा वेळ मिळालाच नव्हता. मूल झाल्यावर त्याला किमान वर्ष तरी द्यायचं हे तिने आणि किरण ने आधीच ठरवलं होतं. त्यामुळे रिया झाल्यावर तिने ब्रेक घेतला, पण एक वर्षानंतरही तिला परत कामावर जावसं वाटलं नाही, त्याच वेळी किरणला एक वर्षासाठी लंडन ला जायची संधी मिळाली, मग काय त्या निमित्ताने तिथे ही राहता येईल म्हणत तिने नोकरीचा विचार लांब सारला. वर्षाचा प्रोजेक्ट दीड वर्षाने संपला , तोवर रिया पण मोठी झाली होती, शाळेत अॅडमिशन पण झाली होती. आता आपलं बूड एका जागी स्थिरावलं आहे तर आपण काही तरी सुरु करू या याची जान्हवीच्या मनाने उचल खाल्ली होती.
वन्स अगेन या चित्रपटाबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि मितालीने, तिच्या BF ने पण त्यावर फेसबुकवर पोस्टले होते त्यामुळे आज हा अर्धा तरी बघूया असे म्हणत तिने सिनेमा बघायला सुरुवात केली आणि तेवढ्यात मितालीचा फोन आला.
मिताली आणि तिची मैत्री हा तिलाच नव्हे सगळ्या जगाला पडणारा प्रश्न होता. जान्हवी म्हणजे आपण बरे आपले काम बरे, सतत आजू बाजुच्यांचा विचार करून वागणारी, हसतानासुद्धा माजून मोपून हसणारी. नोकरीच काय आयुष्यात देखील कोणतेही ध्येय न ठेवणारी, सतत सेकंड सीट घ्यायला तयार असणारी. जो पहिला मुलगा बघितला, आई वडीलांना आवडला आणि ती लग्न करून मोकळी झाली. आयुष्य हे सरळ सोट असते आणि ते तसेच जगायचं असतं, हा तिचा आजवरचा फंडा होता. पण कॉलेज मध्ये हा मिताली नावाचा किडा भेटला, आणि ती बदलली नाही पण तिला असे बंडखोरीचेपण एक जग असते याचाही जाणीव झाली. तिने ते जग लांबून बघितले, ती स्वतःला त्या सारखे करू शकली नाही, पण तरीही मिटली, तिच्या गोष्टी ऐकल्या की तिला एक धीर यायचा. कधी कुठला निर्णय घेताना तिला पुरेशी खात्री नसली, विश्वास नसला तर ती सरळ मितालीशी बोलायची, तिच्याशी बोलता बोलताच आपला प्रश्न सुटतो असे जान्हवीला वाटायचं. आजही जेव्हा तिला मोठा निर्णय घ्यायचा होता तेव्हा तिला मितालीशीच’ बोलायचे होते.
‘मीतू तुझा सल्ला पाहिजे मला.’
‘ते तर मला माहीतच होते, तू काम असल्याशिवाय मला कधी फोन लावतेस का?   
'पण कामाच्या वेळी तरी मला तुझीच आठवण येते ना. मग झालं की. आता भांडायचं आहे की  आधी बोलून घ्यायचं आहे ?'

'बोल बाई बोलआज मी डस्ट बिन  आहे किपोस्टाची पेटी आहे की  कन्फेशन बॉक्स आहे?'
'नाही गाइडिंग स्टार आहे  '
'म्हणजे काय कळले नाही? '

'सोप्पी गोष्ट आहेमी आता काय करू हे तू मला सांगणार आहेसम्हणजे रिया आता शाळेत जायला लागली आहेकिरण लपुढचे दीड  दोन वर्ष तरी बाहेरचकाही चान्स नाहीजर त्याने नोकरी बदलली  तरच काही शक्यता  असू शकतात,बाकी आई बाबा येऊन जाऊन असतात. त्यामुळे मला परत काही तरि सुरु करायची इच्छा आहे,मला आता फक्त हाऊस वाइफ व्हायचं  नाही आहे. '

'वाह माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर साक्षात्कार झाला की  तुला. '
'आता तू हे असेचबोलत राहणार आहेस की  काही सल्ला पण देणार आहेस?

'माझी फी माहीत आहे नाबघ देऊ शकणार असशील तर मी बोलते नाहीतर राहू देते.'

'गर्ल्स नाईट आउट नाडन  तू म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तिथे. पण सांग ना मी काय करू?'
'
'गर्ल फ्रेंड मी सांगते पण मला सांग तुला नक्की काय करायचं आहे?'

'बघ तूच तीतुझ्याशी बोलताना मला आरशात स्वतःशी बोलल्या सारखे वाटत. खरं  सांगू मला इंजिनीअर वगैरेंकही व्हायचं नव्हतंमला बेकर  व्हायचं  होतं केक्स,कुकीज करताना मी अगदी स्वतःला सुद्धा विसरून जातंय,पण बाबा म्हणाले चांगले मार्क्स आहेत हो इंजिनीअर मी झाले इंजिनिअर. पण आता असे वाटतंय देवी तेवी दुसरी समाधी मिळतच आहे तर काय हरकत आहे हेअसे काही करायला. परत हे करताना रियाकडे पण दुर्लक्ष होणार नाही,किंवा दुसऱ्या कोणाचेही रुटीन बिघडणार नाही .’
‘अग जानू तू कधीतरी फक्त स्वतःचा विचार करायला शिकणार आहेस का ग? आता पण काहीतरी करायचं आहे तेव्हाही आधी सगळ्यांचा विचार करून मग त्यातून मिळालेल्या वेळेत काहीतरी करणार.’
‘सोड ग ते सगळं मी नाही बदलू शकणार, मी आहे ही अशीच आहे, मला आवडते सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांच्या बरोबर राहायला. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींना सुध्दा मग मी तयार असते आणि मला त्यात वाईट नाही वाटत.’
‘कधी तरी मला तुझ्यावर चिडावे की तुझे कौतुक करावे हेच कळत नाही. तू किती सॉर्ट आऊट आहेस, तुझ्या अपेक्षा क्लीअर आहेत, उगाच सगळ्याचा हव्यास धरत तू स्वतःलाच हर्ट नाही करत. मला तुझ्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते एवढ्या गोष्टीवर आपले अपोझिट पोल अजूनही एकमेकांना धरून आहेत बहुतेक.’
‘काय हे, मी तुला सल्ला विचारायला फोन केला आणि तू मला हे भलतेच काय ऐकवतेस.’
‘बरं हे कौतुक मी आपल्या नाईट आउट साठी राखून ठेवते. कमिंग बॅक टू युअर प्रॉब्लेम. तुलाच दोन्ही माहित आहे. गो अहेड गर्ल, तुला जे मनापासून करावसं वाटते ते कर ग, मला नाही वाटत किरणला हे आवडणार नाही, आणि नाही आवडले तरीही तुला आवडते आहे ना मग तू कर, तुझा आनंद बघून त्यालाही कदाचित ते आवडेल. अग त्याला स्वतंत्र दुसऱ्या शहरात राहणारी जान्हवी तर आवडली होती, तो कशाला नाही म्हणेल. तू काही लगेच दुकान काढणार नाहीस ना, पहिले होम ऑर्डर्स घेशील जम बसवशील आणि नंतर हा व्याप वाढवशील हो ना. मग तो कशाला नाही म्हणेल. इन्व्हेस्टमेंट पण फारशी नसणार आहे. आणि जर तुला पैसे लागणार असेल तर सांग मी देते. तू मस्त बनवतेस यार केक, पहिली ऑर्डर मीच देते हवे तर. ‘
‘याच साठी मला तुझ्याशी बोलायचे होते बघ, पैशाचा काही प्रश्न नाही ग,आणि किरणशी बोलले तर त्याला काय वाटते ते कळेल ना, मी अजून त्याच्याशी बोललेच नाहीये, त्याच्याशी बोलण्या आधी मला माझा आत्मविश्वास वाढवायचा होता, जो मला या फोन मधून मिळणार होता  आणि मिळाला पण. जेव्हा केव्हा सुरु करेन तेव्हा पहिली ऑर्डर तुझीच घेईन बरे का ग ठमे. बाकी कशी आहेस?’
‘मी मजामा गं, आता एक प्रेसेंटेशन आहे, अर्ध्या तासात त्याची तयारी करत आहे.’
‘अग मग माझ्याशी बोलत काय बसलीस, जा काम कर, आणि जेव्हा फ्री होशील तेव्हा फोन कर.’
त्या दोघींनी फोन ठेवला, पण जान्हवीला एक नवा उत्साह या फोन मुळे आला होता. आयुष्यभर जे करायची इच्छा होती, ते करायचे तिने ठरवले होते. बाबांना तिने सांगितलेच नव्हते तिला काय करायचं होते, आता नवऱ्याला सांगून ती तिचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार होती. कोणीतरी तू हे करू शकतेस हे सांगायची गरज होती, आणि तिच्यासाठी हे काम मितालीने केले होते. तिला तिच्याशी भेटवायचे काम याही वेळी मितालीने केले होते. आरसा होऊन स्थिर उभे राहणे म्हणजे पण मैत्रीच असते ना !!!    

मानसी होळेहोन्नूर

Saturday, November 24, 2018

पत्रं...

पत्र मुळात पत्र म्हणजे काय असते? कधी मनात राहिलेलं, कधी सांगता न आलेलं किंवा कधी खूप काही बोलायचं आहे पण बोलायची संधीच न मिळालेलं बोलणं. हो ना.
तुला माहीत आहे मला पत्रं किती आवडतात, लहानपणी तर मी माझी मलाच पत्रं लिहायचे. मग कोणतेही कारण मिळालं तर पत्र लिहायला तयार असायचे. शाळेत पत्र लेखन हा इतरांसाठी कंटाळ्याचा पण माझ्यासाठी आनंदाचा प्रश्न असायचा. पत्र कसे भरवू हा प्रश्न पडायचाच नाही, उलट आता अजून जागा कुठून आणू असा प्रश्न पडायचा. सुट्टीत मामाकडे गेलं की छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मला लिहायच्या असायच्या, आई बाबांना कळवायच्या असायच्या, आणि शाळा असताना मग याच सगळ्या गंमती आजीला कळवायच्या असायच्या. मग ऐकलेली नवीन गोष्ट, नवीन गाणे सांगायचे असायचे, ऐकलेली नवीन म्हण, नवा वाक्प्रचार वापरायचा असायचा. एकदा दोनदा तर मी मला कुठे कुठे भेटलेल्या लोकांचे पत्ते गोळा केले होते आणि त्यांना पत्रं पाठवली होती.
नाशिक मध्ये भेटलेल्या आसामच्या मुलीचे मला इतके अप्रूप वाटले होते कि मी तिचे नाव, पत्ता लिहून घेतला होता, एका इन लँडवर तिला जागोजाग पत्र लिहिले होते, तिला ते पत्र पोहोचलेच नाही की तिने ते वाचून रद्दीत टाकले माहीत नाही, मग एका बस मध्ये भेटलेल्या माणसाला कधी तरी पत्र पाठवली होती, काही वर्षे त्याने पण उत्तरे दिली, परत त्याला भेटलो, पण मग ते सगळे का थांबले माहित नाही. एका शिबिरात भेटलेल्या एका मुलाला पत्र लिहिली होती, त्याने पण दोन चार उत्तरं पाठवली, पण मग थांबलं सगळंच. असे एक ना अनेक किस्से. सुरुवातीला ईमेल करणे म्हणजे पण पत्र लिहिणेच की या आनंदात दोन दोन पाने भरून सॉरी टाईप करून मेल पाठवल्या होत्या. मग हळू हळू टाईप करण्याचा कंटाळा या सबबीखाली मेलचे आकार छोटे होत गेले, आणि आता तर कामाच्या शिवाय कोणाला मेल केली तर ते काय म्हणतील असा पहिला प्रश्न पडतो.
पत्र काय मेल काय तो असतो वाचवून साचवून, ठरवून केलेला संवाद, म्हणजे बोलण्याच्या ओघात विसरले गेलेलं खूप काही लिहिता लिहिता आठवतं, आणि ते लिहून झाल्यावर आठवलं तरी परत त्यात घालून वाढवता येते. संवादाचे मात्र तसे नसते, एकदा का कोणत्या तरी रस्त्याला गाडी लागली की परत ती त्याच रस्त्यावर आणणं महा कठीण काम असते, आणि ती गाडी वळवून आणली तरी ते वळण कधीच परत येत नसते, पत्राचे मात्र तसे नसते. एखादे वळण पुरवून पुरवून तिथेच ठेवते येते, त्याच्या भोवती पिंगा घालून त्याला तिथेच थांबवून ठेवता येते.
काहीजण याला एकतर्फी संवाद म्हणून नाकं मुरडतात, पण संवादात दोन माणसं असली म्हणजे कुठे तो दोघांचा संवाद होत असतो. एक जण बोलत असतो, ते दुसरा ऐकत असतो, कधीतरी त्यावर प्रतिक्रिया देत असतो, म्हणजे एकाचाच मुद्दा पुढे जात असतो ना? मग पत्रातून सुद्धा तर तेच होत असतं ना, वाचणारा वाचत असतो, मध्येच थांबून स्वतःला काही तरी सांगत असतो, मनातल्या मनात काहीतरी जोडत असतो. क्वचित कधीतरी लिहिलेल्या अक्षरांवरून हात फिरवून स्पर्शाची उब जाणवून देतं, तर कधी टाईप केलेल्या शब्दांतून दिलेल्या वेळाचे मोल...
पत्रांमध्ये संवाद साधण्याची शक्ती असते, बिघडलेला, बंद पडलेला संवाद सुरु करण्याची ताकद असते.
पत्र फक्त शब्द नसतात, त्यांनाही भावना असतात,
पत्र एकतर्फी नसतात त्यांना त्यांच्या वाटा माहीत असतात
पत्र शिळी होत नसतात, त्यांना एक्सपायरी डेटच नसते.
कोरड्या पत्रावर भिजलेले स्टँप असतातच.ना
पत्रांना पत्ता असतो, स्वतःची ओळख असते
ते कधीच हरवून जात नाहीत,
हरवले तरी कुठल्या तरी पत्त्यावर जाऊन धडकतातच,
पत्र बोलकी असतात, हसरी असतात,
रडकी असतात पण कधीही एकटी नसतात.
© मानसी होळेहोन्नूर

अमर्त्य

मृत्यू नेमका कधी झाला?
मेंदू ठरवतं आता बास झालं,
नाही कोणतेही निर्णय घ्यायचे
असा शेवटचा निर्णय घेतं तेव्हा?
की जेव्हा हृदय त्याचं काम करायचं थांबवतं तेव्हा?
की जेव्हा डॉक्टर म्हणतात
सॉरी तेव्हा?
की डेथ सर्टिफिकेट बनवलं जातं तेव्हा,
की शरीर शव होऊन जातं तेव्हा?
की बॉडी ला हार घालून शेवटच्या दर्शनासाठी
ठेवलं जातं तेव्हा,
की सरणावर चढवलं जातं तेव्हा,
की आपलं माणूस फोटोत जाऊन बसतो तेव्हा
की आपण त्याच्या नावाने आंघोळ करतो तेव्हा
की आपल्या बोलण्यात त्या माणसाचे संदर्भ
धूसर व्हायला लागतात तेव्हा,
की हळूहळू आपण आपलं आयुष्य
आपल्या माणसाशिवाय जगायला लागतो तेव्हा?
मृत्यू ही थोडीच एका क्षणाची गोष्ट असते,
ती तर निरंतर, निर्वातीत, गोष्ट असते,
ती वेळ काळा च्या चिमुटीत बसवणारे
आपण सगळे मर्त्य असतो,
अमर्त्य असतो तो फक्त मृत्यू
©मानसी होळेहोन्नूर

Saturday, November 10, 2018

गंध


Saturday, October 20, 2018

परफेक्ट चहाची रेसिपी

टीव्ही वर काहीतरी बघत असताना एक चहाची जाहिरात लागली होती. एक शिक्षक त्याच्या विद्यार्थाकडे खूप दिवसांनी सॉरी वर्षांनी जातात. आता तो विद्यार्थी खूप मोठा अधिकारी झाला असतो, म्हणून बिचारा शिक्षक दाबून असतो. विद्यार्थ्याची बायको कामवालीला चहा  करायला सांगते तेवढ्यात हा विद्यार्थी म्हणतो, थांब मीच करतो चहा. हॉस्टेलवर असताना सरांना माझ्या हाताचा चहा आवडायचा. नवऱ्याला अगदी प्रेमाने बघत ती मनात नक्कीच म्हणत असणार, मला नाही आजपर्यंत कधी चहा करून दिला, पण दिग्दर्शकाने तसे काही सांगितले नसल्याने ती फक्त प्रेमाने बघत राहते. मग हा विद्यार्थी त्याच्या सरांना त्याने बनवलेला चहा आणून देतो. पहिल्या घोटानंतर लगेच विचारतो सर कसा झाला. त्यावर ते सर म्हणतात कॉलेजमध्ये जे म्हणायचो तेच म्हणून का? इंजिनिअरींग सोड आणि चहाची टपरी काढ. दर वेळी हि जाहिरात बघताना माझ्या पोटात गोळा येतो. इतक्या वर्षानंतर करूनही याचा चहा तसाच कसा लागतो?
चहा ही अगदी सोपी गोष्ट आहे असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला मी साष्टांग नमस्कार घालते. म्हणजे एका कपाला अमुक इतके पाणी, तमुक इतकी साखर मग तमुक चहा पावडर असे अगदी कितीही ठरवून घेतलं, तरी माझा सलग दोन दिवसांचा चहा कधी सारखा होत नाही. बरं एकदा तर मी किती वेळ उकळायचा हे सुद्धा लावून बघितलं, तर त्या दिवशीचा चहा अगदीच भुक्कड झाला. मग कधी तरी आलं घालून बघूया, असं म्हणत आलं घालून चहा केला, पहिल्या दिवशी आल्याची चव नव्हती तर दुसऱ्या दिवशी फक्त आल्याची चव होती. तिसऱ्या दिवशी आल्याचा चहा लागत होता पण चहाची चव आवडली नव्हती.
रेड लेबल देखा, गिरनार देखा , ब्रूक ब्रांड देखा, देखा वाघ बकरी भी, पण माझा वाला ब्रँड मात्र मला आजतागायत सापडला नाही. अमुक एकाने रंग छान येतो असे वाटते, तर दुसऱ्याने कडकपणा, तिसऱ्यात घट्टपणा असतो. सगळे कधीच एकातच मिळतच नाही. कधी तरी मसाला घातलेला चहा घेतला, तर त्या मसाल्यामुळे आपण काढा पितोय की काय असेच वाटते. त्यामुळे चांगल्या चहाच्या शोधात मी नेहेमीच वेगवेगळे प्रयोग करून बघते, आणी त्या प्रयोगाच्या नादात आज सापडलेली रेसिपी उद्या विसरून जाते. एकदा कोणीतरी म्हणलं दुधाने खूप फरक पडतो, म्हशीच्या दुधाचा चहा छान घट्ट होतो, त्यावर मी फक्त आता एक म्हैस दारात उभी करायची बाकी आहे असं मनातल्या मनात म्हणत मुंडी हलवली. तरी त्यातल्या त्यात जवळ जाणारा प्रयोग म्हणून मिल्क पावडर घालून चहा करून प्यायले, तर मला घरातल्या घरात विमानात बसल्या सारखं वाटायला लागलं. इतकी जीभेवर विमानातल्या मिल्क पावडरच्या चहाची आठवण घट्ट होती.
नव्याने उठलेल्या चुलीच्या चवीच्या वादळात, चुलीवरचा चहाचा चुलत भाऊ असलेला तंदूर चहादेखील मिळायला लागला आहे. व्होडका घातलेला चहा हे एक अफलातून कॉकटेल शॉट म्हणून प्रसिद्ध आहे. चॉकलेट टी हे मुळातलं डेझर्ट ड्रिंक पण आता व्यवस्थित रुळले आहे. ग्रीन टी तर उंचे लोग उंची पसंद म्हणत आपला रंग टिकवून आहे. चहाचे अनेक प्रकार जन्माला आलेत. असं म्हणतात, बदल हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून तर ही चहाची सारी रूपं मी चाखून, ओरपून पाहिलीत. चहा पावडर, साखर, पाणी, दुध या चार जिन्नसातून रोज होणाऱ्या वेगळ्या चवीच्या चहामुळे मी थ्री हंड्रेड अँड  सिक्स्टी फाईव्ह शेड्स ऑफ टी अशा नावाचे पुस्तक लिहावं की काय अशाच विचारात आहे. मग फोन वर टाईप करण्याच्या नादात जास्त उकळलेला चहा, गॅसवरून उतू गेलेला चहा, भांड्यातलं दुध संपवायचं म्हणून थोडं जास्तच दुध घालून केलेला चहा, सकाहर घालायची विसरलेला चहा, अर्धवट झोपेत चहात मीठ घालून केलेला चहा, खरंतर वर्षाच्या दिवसांपेक्षा खूप जास्त रेसिपी प्रत्येक घरातून नक्कीच मिळू शकतात.
त्याच त्या चवीचा चहा रोज करणाऱ्या अमृत तुल्यचे मूल्य माझ्या मते त्यामुळेच जास्त आहे. शेवटी काय आहे चहाने चार माणसे जोडली जातात, गप्पा खुलतात, कधी वाईट चवीचा विसर पडतो, तर कधी चांगली चव लक्षात राहते. मला तर आजवर एकाच चवीचा चहा करणं कधी जमलं नाही जर तुम्हाला जमत असेल तर नक्कीच कळवा, अगदी, गॅसची शेगडी कोणती आहे, यापासून, पाणी किती डिग्रीला उकळायचं ते, साखर कितव्या मिनिटाला घालायची आणि गार दुध घालून चहा परत उकळायचा, कि गरम दुध घालून चहा बंद करायचा असे छोट्यातले छोटे बारकावे देखील सांगालच. तोवर मी माझ्या चहाच्या चवीचा नवीन प्रयोग करते. तसा चहा करणं सोपेच आहे, फक्त चवीचे तेवढं आपण बाजूला ठेवूया, हो ना.
मानसी होळेहोन्नुर
पूर्व प्रसिद्धी : mitrmandal -katta.blogspot.com  

Tuesday, October 2, 2018

लक्ष्मीची पावले


‘बाबा हो आत्ता तुम्हालाच फोन लावणार होते. तुमचे पार्सल सुखरूप पोहोचलं.’
...
‘ हो हो हर्षल त्यांना घ्यायला गेला होता, घरी सोडून तसाच खालच्या खाली ऑफिसला गेला आहे तो, मी मात्र आज घरूनच काम करेन.’
...
‘ हो हो सांगते त्यांना. त्या आत्ता आंघोळीला गेल्या आहेत. आल्या की मग आम्ही दोघी एकत्रच नाश्ता करू. तेव्हा करतो तुम्हाला फोन.’

हर्षलच्या आईपेक्षा हर्षलच्या बाबांशी बोलणे स्वातीला नेहेमीच आवडायचे. सासूबाई कडक लक्ष्मी म्हणूनच प्रसिद्ध होत्या. जरा जास्तच शिस्तीच्या भोक्त्या होत्या. त्यामुळे आत्ता सुध्दा आईंच्या ऐवजी बाबांनी किंवा त्या दोघांनी एकत्र अयावे हे त्यांनी अप्रत्यक्ष सुचवलं होते, पण त्यांचे काहीतरी काम निघाल म्हणून मग सासूबाई एकट्याच पुढे आल्या आणि चार दिवसानंतर ते येतो म्हणाले. आता चार दिवस यांच्याशी जुळवून घेतलं की झाले. तशी ही दोघींचीही पहिलीच वेळ होती, म्हणजे सासूचे स्वतःच्या घरी स्वागत करायची स्वातीची पहिली आणि सुनेच्या घरी जाऊन राहायची तिच्या सासुचीही पहिलीच वेळ होती.

‘घर छान लावलं आहेस की.’ अगदीच गेल्या गेल्या चुका काढायला नको म्हणून सासुबाईंनी सूनबाईंना बरे वाटेल अशी प्रतिक्रिया दिली.

‘आवडले तुम्हाला, हर्षल म्हणालाच होता आईला नक्की आवडेल. आता जरा नाश्ता करू या मी पण थांबली आहे तुमच्यासाठी.’

‘मग बेंगलोर स्पेशल नाश्ता का आज?’

‘ हो ना इडली आणि सांबार केला आहे, बघा बरं तुमच्यासारखा झाला आहे का?’ स्वाती अंदाज घेत घेत बोलत होती.

‘ इडल्या मस्त लुसलुशीत झाल्या आहेत ग, काय प्रमाण घेतलेस? सांबार मात्र थोडा तिखट आणि वेगळा आहे.’ दोन गृहिणी भेटल्यावर बोलतात तशा त्या सासुसुना बोलत होत्या. लग्नाला जेमतेम चार महिने झाले होते. आणि एक दिवसाआड फोन लग्नाच्या वेळेसचा १० दिवसांचे वास्तव्य मध्ये एक दोन दिवसांची धावती भेट इतकाच काय तो त्यांचा आजवरचा संवाद होता. त्यामुळे दोघीही एकमेकींचा अंदाजच घेत होत्या.

‘नाही पीठ मी विकतच आणते, आई. ग्राइन्डर मध्ये पीठ छान होते असे इथल्या मैत्रिणी म्हणतात, पण तोवर हे पीठ खूप सोयीचे पडते, परत आम्ही दोघेच इथे त्यातही निम्मे दिवस हा तरी बाहेर खातो नाहीतर मी तरी, ऑफिस गेट टुगेदर, पार्टी काही ना काही तरी असतेच. ‘ उगाच आपण आळशी आहोत असा ठपका बसायला नको म्हणून सुनबाई सारवासारवी करत होत्या.

‘हो ग माझ्या लेकाला पहिल्यापासून बाहेर खायला खूप आवडते. तुम्ही दोघेही सकाळीच निघता मग कामवाली बाई कधी येते.’
‘लक्ष्मी ती तर सकाळीच ७ वाजता येते आणि काम संपवून साडे सातला जाते पण. हे एवढुसे घर, त्यात राहतो आम्ही दोघेच, भांडी पण फार नसतात. कपडे मशीनला आम्हीच लावतो, आणि वाळत घालतो.’

‘पण या बायका फार वरवरचे काम करतात बर का, त्यांच्यावर जरा लक्ष द्यावे लागते, सांदीकोपऱ्यातून त्याच्याकडून झाडून घ्यावे लागते. तसे करत असावीस कारण फारशी धूळ नाही दिसली घरात.’ आपण एकदम सासू मोड मध्ये जातोय हे लक्षात घेऊन त्यांनी जरा मग थोडा खालचा सूर लावला.

‘हो शनिवारी किंवा मी जर एखाद दिवशी वर्क फ्रॉम होम करत असेल तर मी करून घेते तिच्याकडून नीट कामा, पण रोज मात्र तिच्या कामाकडे बघायला वेळच नसतो.’  

 ‘आता मी आली आहे तर जरा तिच्याकडून काम करून घेऊ का? येईलच ना ती उद्या?’

स्वाती भयंकर गोंधळली होती, सासूला सांभाळावं की कामवालीला,
‘चालेल पण ती आता थेट सोमवारीच येईल. आणि तशी चांगली आहे लक्ष्मी पण तुम्ही शाळेत मुलं सांभाळायचा तसेच तिलाही सांभाळून घ्या.’

‘वाह बोलायला एकदम हुशार आहेस की, तुझी बाई पळून जाणार नाही एवढी काळजी घेऊन मी, पण उद्या परवा का येणार नाही ती? तिला पण तुमच्यासारखा फाईव्ह डेज वीक असतो का ग?’ सासुबाईंनी एकदम टोमणा मारला.

‘फाईव्ह नाही पण सिक्स डेज बरं का आई, इकडे बरेच जण त्यांच्या कामवाल्या बायकांना रविवारी सुट्टी देतात. आता हे कोणी कधी कसे सुरु केले माहीत नाही, पण आम्ही इथे आलो तेव्हाच लक्ष्मीने हे सांगितले. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला काहीतरीच वाटले, रविवार मस्त सुट्टीचा दिवस आणि त्या दिवशी आम्हीच घरी काम करायचे का, पण मग तिच्या दृष्टीकोनातून विचार केला आणि जाणवले, जशी सुट्टीची आम्हाला गरज आहे तशीच गरज तिलाही असेलच ना. आणि या व्यतिरिक्त तिला सुट्ट्या हव्या असतील तर ती व्यवस्थित आधी सांगते, चार दिवसापेक्षा जास्त सुट्टी घेणार असेल तर चक्क बदली कामवाली देऊन जाते. गंमत म्हणजे आई पण जर कोणाकडे रविवारी काही कार्यक्रम असेल तर ही बया स्वतःहून सांगते, या रविवारी मी कामाला येईन पण फक्त तुमच्याकडे. कारण या बिल्डींगमध्येच तिच्याकडे सहा कामे आहेत, आणि पलीकडच्या बिल्डींगमध्ये चार. सकाळी सहा वाजता येते झट झट कामे करून दोन वाजता ही तिच्या घरी. खालच्या मजल्यावरच्या नायर आँन्टीकडे पाच वर्षापासून कामाला आहे ती. त्यांच्या घराची एक किल्ली हिच्याकडे असते, त्या नसल्या तरी ही काम करून जाते. पलीकडच्या बिल्डींगमध्ये एक मराठी फॅमिली आहे त्यांच्याकडे पण ही लक्ष्मी चार वर्षांपासून आहे, पण उगाच माझ्या घरचे तिला सांग, तिच्या घरचे मला सांग नाही हिचे.’

‘स्वाती मी पहिल्यांदाच असे काही ऐकतीये म्हणजे चार वर्षांपूर्वी माझ्या सासूबाई घरातच घसरून पडल्या तेव्हापासून आमच्या घरी कामवाली बाई म्हणजे निर्मला आली. त्या आधी आम्ही दोघी मिळूनच सगळे काही करत होतो. त्यामुळे या बायकांचे नखरे, तोरा मी फक्त इतरांच्या बोलण्यातूनच ऐकायचे. निर्मलाच्या पण काही गोष्टी आहेत, ज्या मला आवडत नाहीत पण आईंना शेवटच्या काळात तिने जेवढे सांभाळले, त्यांचे अगदी हागणेमुतणे काढले आणि तेही तोंडातून चकार शब्द न काढता तेव्हापासून तिच्या न आवडणाऱ्या गोष्टींकडे मी काना डोळा करायला लागले. पण तू म्हणतेस ते ही बरोबर आहे ग. यांना पण वाटत असेलच ना आपण एखाद दिवशी सुट्टी घ्यावी.’
‘आमची लक्ष्मी इतकी छान टापटीप राहते ना आई, तुम्ही बघलाच म्हणा तिला सोमवारी, तोडके मोडके हिंदी बोलते, मला अक्का आणि हर्षलला अण्णा म्हणते. मुलगा पाचवीला आणि मुलगी तिसरीला आहे. हिला तेलगु, कन्नड तर येतेच पण दोन तीन मराठी घरी काम करते त्यामुळे मराठी पण समजते बर का.’

‘ आपण नेहेमी कसा फक्त आपलाच विचार करतो ना, म्हणजे तू आज हे सांगेपर्यंत मला कामवालीला देखील साप्ताहिक सुट्टीची गरज असू शकते याची जाणीवच नव्हती. उलट मी रविवारी निर्मलाकडून जादाची कामे करून घ्यायचे. अर्थात मग माझ्या जुन्या साड्या, ड्रेस, किंवा कधीतरी नाश्ता, काही जास्तीचा घरी आलेला खाऊ, जुना झालेला खाऊ सुद्धा देते. राग येणार नसेल तर एक विचारू का?’
‘विचारी का त्यात काय एवढे?’

‘तुम्ही तिला पगार किती देता ग? तुझ्या सासरेबुवांनी मला अगदी दम देऊन पाठवले होते, त्यांचे घर आहे, त्यांचे खर्च आहेत, तू उगाच तुझ्या खर्चांशी त्याची तुलना करत बसू नकोस, पण तरीही राहवले नाही म्हणून मी विचारतीये.’

 ‘आई बाकीचे किती देतात मी विचारायला गेले नाही, पण आमच्याकडून ही झाडू फरशी आणि भांडी घासायचे दीड हजार घेते. पण नियमितपणे येते, खाली पडलेलं सोन्याचे जरी असले तरी उचलून ठेवते, त्यामुळे मला तरी पटले बाबा तिचे काम. तशा दुसऱ्या पण कामवाल्या आहेत पण तिच्या सारखी दुसरी मिळेल की नाही कोणास ठाऊक. सहज म्हणून सांगते, दोन आठवड्यापूर्वी मला बरे नव्हते, त्यामुळे ही आली त्य दिवशी मी झोपूनच होते, तर हिनेच सकाळी चहा करून दिला आम्हाला दोघांना. खरेतर रांगोळी काढायला मी तिला सांगितले नव्हते पण तरीही रोज नित्य नेमाने तुळशीपुढे रांगोळी काढते. ’ अप्रत्यक्षपणे या बाईला त्रास देऊन पळवून लावू नका असाच सूर होता स्वातीच्या बोलण्याचा.


‘सून बाई आम्ही नाही येणार हा तुमच्या आणि तुमच्या लक्ष्मीच्यामध्ये. तसेही आम्ही चार दिवसांचे पाहुणे आहोत ग, तुमचे घर तुम्हीच सांभाळायचे, उगाच आम्ही येऊन त्याची घडी कशाला विस्काटायची? काळजी करू नकोस.’ सासुबाईंनी सूनबाईंच्या हातावर हात ठेवत एका नव्या नात्याची सुरुवात केली होती. त्यांचा हात हातात घेत स्वाती म्हणाली,

‘हर्षल म्हणालाच होता, आई जराशी कडक, तापट आहे, पण नवीन गोष्टी समजून घेते, आणि एकदा तिला पटलं तर मग उगाच विरोध करत नाही. तरीही तुम्ही येणार म्हणून खूप टेन्शन होते, खोटे कशाला सांगू मी आजची सुट्टीच काढली होती, कारण कामात लक्षच लागले नसते. पण आता खूप मोकळे सुटल्यासारखे वाटत. थँक्स आई आता सुट्टी घेतली असली तरी लॉग इन करून बघते, काही काम असले तर संपवून टाकते.’

‘स्वाती तू जर कामावर येणाऱ्या बाईचादेखील एवढा विचार करत असशील तर घरातल्या माणसांचा नक्कीच विचार करशील. एवढी खात्री मी आता बाळगू शकते. भांड्याला भांडे लागतच, त्याचा आवाज होतोच, पण तो आवाज लांबवर जाऊ न देण्याचे प्रयत्न मात्र दोघीही करूया. आता खूप गोड बोलून तोंड दुखायला लागले बाई, तू जा तुझ्या कामाला, मी हे जसे जमेल तसे आवरते आणि माझे सामान लावून घेते,’

खळखळून हसून स्वातीने आल्यापासून पहिल्यांदा सासूला वाकून नमस्कार केला. तेव्हा तिला ती पावले लक्ष्मीची पावले वाटली.
मानसी होळेहोन्नुर
पूर्वप्रसिद्धी : सनविवी ( ऑगस्ट २०१८)


Friday, September 28, 2018

चिमुटभर

‘आह काय मस्त वातावरण आहे ना, चल ना मस्त भटकायला जाऊ.?’ अंगावरचे पांघरूण बाजूला सुद्धा न करता अमेय ओरडला, त्याला नॉर्मल माणसांसारखे हळू बोलताच येत नाही म्हणून प्रियंका आधी कुरकुरायची आता कितीही सांगितलं तरी हा काही बदलणार नाही कळल्यावर तिने ते ही बोलणे सोडून दिले. हातातला चहाचा मग त्याचा हाताला हळूच लावत ती म्हणाली, ‘आधी त्या मलमली दुलईतून उठून दाखव आणि मग बघ स्वप्न बाहेर फिरायला जायची.’
‘कशी बायको आहेस, नवरा एवढा फिरायला घेऊन जातो म्हणतोय आणि तू त्याला पाठींबा द्यायचा सोडून असे टोमणे काय मारतेस.’
‘बायकोला काम आहे त्याच दिवशी बर तुला बाहेर फिरायचा मूड येतो रे.’
मगातला चहा संपवत तिने  टेबलवरचा लॅपटॉप उचलला आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली.
‘काय हे बायको , खरेच काम आहे तुला आज? चल ना जरा भटकून येऊ मस्त बाहेरच खाऊ आणि मग दुपारी झोपायला मस्त परत घरी येऊ. संध्याकाळी कर की तुझे काय काम आहे ते.’
त्याच्याकडे वळून पण न बघता ती म्हणाली,
‘पूर्ण टीम ऑफिस मध्ये आहे, मला किमान घरून काम करायची तरी परवानगी मिळाली आहे. संध्याकाळच्या आत सगळं काम संपवून पाठवायचं आहे क्लाएंटकडे. ऑन साईटची टीम सुद्धा काम करतीये. त्यामुळे आत्ता नाही पण जर आमचे काम नीट पार पडलं तर आपण संध्याकाळी जाऊ या फिरायला चालेल’
तोंड पाडून पूर्ण जागा होत एकदम उठून बसत तो म्हणाला,
‘ मागचा पूर्ण विकेंड मी काम करत होतो त्याचा वचपा काढतीयेस का?’  
हातातल टायपिंग थांबवत ती एकदम म्हणाली,
‘ बरा आहेस ना, सकाळी सकाळी हे काय सुरु केलेस? काम असे काय ठरवून विकेंडपर्यंत लांबवता येते का? आणि तुझ्यापेक्षाही जास्त भटकायची हौस मला आहे हे सोयीस्कर विसरलास वाटतं. ‘
आता ही चिडली कि चहा पण देणार नाही आधीच मूड खराब झालेला म्हणून जरा बॅंकफूट वर जात तो म्हणाला,
‘तसे नाही ग पियू, पण मस्त पावसाळी हवा, जुळून आलेला शनिवार म्हणून जरा वाटल आणि मी बोललो. जाऊ देत ते सगळं मला किमान तुझ्या हातचा चहा तरी दे ना म्हणजे दिवस कसा मस्त सुरु होईल. आणि नाश्त्याचे काय करायचे?’
 ‘वाटलंच चहासाठी तरी मला मस्का लावशीलच. मावशी येतील १५ मिनिटात त्यांना सांग काय हवंय ते. आणि ९ ते ११ मी कॉल वर असेन तेव्हा बेडरूम बंद करून बसेन प्लीज मध्येच येऊन खुडखुड करू नकोस.’
 चहा येईपर्यंत काहीच तक्रार करायची नाही चहा आला की पुढचे पुढे बघू म्हणत तो उठून बाल्कनीकडे गेला, बेडरूमच्या बाल्कनीपेक्षा हॉलच्या बाल्कनीतून दिसणारा नजारा जास्त चांगला होता, मस्त पैकी पेपर हातात घेऊन तो चहाची वाट बघत अपार्टमेंटच्या आसपासची हिरवळ बघत होता. पाऊस पडून गेलेला होता, काही चुकार मुलं शाळा सुटली तरी शाळेपाशी रेंगाळतात तसे काही काळे ढग अजूनही आकाशात रेंगाळत होते, सूर्य देखील आळसावलेला होता, ढगांच्या दुलईतून मधेच डोकावत होता, मधेच गुडूप होत होता.  एक सुखद गारवा हवेत होता. प्रेम वगैरे होण्यासाठी, प्रकट करण्यासाठी हीच ती योग्य वेळ, हाच तो योग्य दिवस हे सगळं वाटणे एकीकडे आणि पैसा हवा म्हणून नोकरी आणि त्या नोकरीसाठी स्वतःला गहाण ठेवणं ही अपरिहार्यता दुसरीकडे. मागच्या शनिवारी तो काम करत होता, आणि आज ती काम करतीये.
‘घे तुझा चहा, आणि मी पळते माझ्या कामाला. नऊ वाजतच आलेत. मावशी येतील काय हवं ते करून घे. आणि प्लीज मला पण नाश्ता रूममध्येच आणून देशील.
‘चहाचा पहिला घोट घेऊन तरतरी आल्यामुळे, तिच्यापुढे झुकत तो म्हणाला,’ जो हुकुम मेरे आपा’
आता काय बाकीचा दिवस असाच इथे बसून टाईमपास करत घालवावा, आठवड्याचे साचलेले फोन करून घ्यावेत, जमला तर एखादा पिक्चर बघून घ्यावा असा सगळ्या विचारात असतानाच एकदम मावशींचा फोन आला.
मावशींचा फोन फक्त एकाच कारणासाठी येतो, मी येत नाही सांगायला. तेच याहीवेळी झाली. महिनाअखेर होती, आणी या महिन्यातली सुट्टी घेतली नव्हती म्हणून त्या येत नव्हत्या, हे ही त्यांनीच सांगीतले वर परत आज काय ताई असतीलच घरी मग त्या बघून घेतील हे ही आगावपणे ऐकवले.
आता खरा प्रश्न होता, पियु कामात होती, मावशींच्या भरवश्यावर होती. मग आता नाश्ता जेवण बाहेरून आणणे नाहीतर मी करणे एवढे दोनच पर्याय होते. दुसरा पर्याय इतका भयंकर आणि कल्पनेच्या पलीकडचा होता की त्यावर त्याने लगेच फुली काट मारली. पण आता बाहेर जायचे म्हणजे कपडे बदलायचे, मग बेडरूम मध्ये जावं लागेल, ऑर्डर केली तरी तिला लगेच काळे. हे सगळं करताना मावशी आल्या नाहीत हे ही पियुला कळेल मग तिची अजून चिडचिड होईल. नकोच त्यापेक्षा आपणच काहीतरी करून बघू या का? त्याच्या डोक्यात उगाच किडा वळवळायला लागला. करून तर बघुयात आजवर न केलेली गोष्ट करून बघण्यात पण एक थ्रिल असतेच ना. गाडी बुंगाट वेगात पळवताना जेवढा आनंद मिळतो तसाच काहीसा वेगळा आनंद पण स्वैपाक करताना मिळू शकेल असं उगकॅह त्याचे एक मन त्याला पटवत होते, तर दुसर मन अरे आजवर केले नाहीस ते कशासाठी करून बघायचं, सरळ विकत आन, ऑर्डर कर आणि मस्त लोळत एखादा पिक्चर बघ, एकदा करशील आणि फसशील.
पोट, मेंदू, आणि पाकीट यांच्या मारामारीत सरतेशेवटी पोट जिंकल आणि तेही मेंदूला सोबत घेऊन, पाकीट वाचल. मस्त पोहे करून तर बघुयात म्हणून त्याने लगेच फोनवर तुनळी उघडली आणि कांदेपोहे सर्च करायला सुरुवात केली. घराबाहेर तो कधीही राहिला नव्हता, आणि जेव्हा राहिला तेव्हा सोबतच्या लोकांना स्वैपाका करता यायचा, हा आपली भांडी घासायचे काम तेवढे करायचा. तसे किचन फार ओळखीचे नव्हते, पण शोधलं तरीही सापडणार नाही इतकेही अनोळखी नव्हत. आज लग्नानंतर तब्बल वर्षभराने का होईना पण बायकोला काहीतरी हाताने बनवून खायला घालूयात. बाकीच्याना करताना खूप वेळा पाहिले होते, आपण आज स्वतःही करून बघूया म्हणत अमेय चक्क किचन मध्ये घुसला. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते म्हणून त्याने सरळ कांद्याऐवजी बटाटा पोहे करायचे ठरवले. बायकोने सगळ्या डब्यांवर नावे लिहून ठेवली होती त्यामुळे पोहे सापडायला काही वेळ लागला नाही. मध्येच आईला फोन करत शंका निरसन करून घेतले होते. आईला शंका आली पण त्याने काहीतरी बोलून वेळ मारून नेली.
मसाल्याचा डबा, मिरच्या, दाणे सगळे जवळ ठेवत त्याने तूनळी बघत बघत पोहे फोडणीला घातले. अरे हे वाटते तेवढे काही अवघड काम नाही असे म्हणत त्याने तो व्हिडीओ संपायच्या आधीच बंद केला. मग एका प्लेट मध्ये मस्त पोहे काढून ठेवत, त्यावर कोथिंबीर, आणि किसलेले खोबरे , ते ही बायकोने एका डब्यात ठेवले होते ते भुरभुरत त्याने झोकात रुममध्ये एन्ट्री घेतली. फोनवरचा माईक बंद करत ती म्हणाली ‘वाः पोहे. मस्तच. पण मावशींच्या नेहेमीच्या पोह्यांसारखे नाही दिसत आहेत, काही तरी वेगळे केलंय बहुतेक. तू आलाच आहेस तर तुला सांगते बग सुटलाय, त्यामुळे अजून अर्ध्या पाऊन तासात मी मोकळी होऊ शकेन. सकाळी बाहेर जायचे काय म्हणत होतास ते तर अजूनही मूड असला तर जाऊयात.’
स्वतः केलेल्या पोह्यामुळे तो आधीच खुश होता, त्यात बायको बाहेर यायला हो म्हणाली म्हणून अजूनच खुश होता. हसत हसत रूममधून बाहेर पडला.
पोह्याची सजवलेली प्लेट घेतली, आणि परत बाल्कनीत जाऊन बसला.
पहिल्याच घासाबरोबर लक्षात आले मीठच घातल नाही, छ्या एक घास खाऊन मग तिला द्यायला हवे होते. आता परत मीठ घेऊन जावे तर तिचे निम्मे  खाऊन पण  झाले असेल.
मग त्याने पण तसेच बिन मिठाचे पोहे खायला सुरुवात केली तेव्हा आठवले सुरुवातीचे दिवस, तिच्या घरची स्वैपाकाची पध्दत आणि त्याला आवडणारा स्वैपाक खूप फरक होता, त्यावेळी तो भरपूर भडकायचा पण तिने हळूहळू त्याला हवा तसा स्वैपाक शिकून घेतला, रांधायला लागली, तिला तसा स्वैपाक आवडतो की नाही हे पण त्याने कधी विचारले नव्हते, दोघांसाठी काही ते दोन वेगळ्या गोष्टी करणार नव्हती, क्वचित कधी केलेच तर तो लगेच नाक उडवून नापसंती दाखवायचा.  छोट्या गोष्टी तिने कधी मोठ्या होऊ दिल्या नव्हत्या. उद्यापासून कशाला आता ती आली की लगेच या कधीच न उमगलेल्या गोष्टी आपण बोलूया त्याची माफी मागुया  असे त्याने ठरवलं तेवढ्यात तिचा मेसेज आला.
‘स्वतःची ओळख चिमुटभर विसरून नात्यात विरघळल की नातं जास्त बहरतं, तसेच मिठाचे असते, चिमुटभर का होईना पण लागतेच. पहिलाच प्रयत्न झकास होता.’
या मेसेजवर रिप्लाय देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीतच मोबदला आणि बोनस द्यावा म्हणून तो आता आतुरतेने तिची वाट पाहत होता, अळणी झालेलं दोघांचेही  तोंड त्याला आता गोड करायचे होते.
मानसी होळेहोन्नूर 
पूर्व प्रसिद्धी :(सनविवि स्त्री सूक्त)जुलै २०१८