Tuesday, March 21, 2017

तळहातावरच्या रेषा

एका अगदी निवांत क्षणी
त्यानी धरला होता तिचा हात
बघत होता तळहातावरची रेष न रेष
तिचे डोळे वाचले होते आधी
आता हात वाचू पाहत होतास
तेव्हाची गोष्ट...

उगाच रेषांवर बोट गिरवून
बहुदा घेत होतास अंदाज
किती खोलवर काय काय घुसलं आहे याचा
मग तळहातावरचा एक एवलुला तीळ
बघत बसलास कैक मिनीट
मग असे डोळे बंद करून समाधीस्थ
झाल्यासारखं करून झाल्यावरही
निरखत राहिलास तिचा तळहात,
त्याच्यावरच्या रेषा, फुटलेले फाटे,
दाबत राहिलास बोटांनी, उंचवटे,
वाकवत राहिलास बोटांची पेरं,
मग हुं म्हणत आठवत राहिलास काहीतरी
मग हात सोडून देऊन
डोळ्यात डोळे घालून म्हणालास
खूप प्रेम आहे तुझ्या आत,
लुटत राहा प्रेम,
न संपणारा प्रेमाचा झरा फुटलाय आत
त्याला आता थांबवता येत नाही
प्रेम लुटायचं थांबलीस
तर हळू हळू गळून पडतील
नखं, बोटं, हात, केस,
पापण्या, डोळे, पाय,
उरेल फक्त एक हृदय...

बुडेपर्यंत प्रेम घेतल्यावर
तो ही गायब झाला एक दिवस
तरीही ती प्रेमातच होती,
त्याच्या, त्यानी सांगितलेल्या भविष्याच्या,
हातावरच्या रेषांच्या...

तेव्हापासून ती भेटलेल्या प्रत्येकावर
उधळून करत आहे प्रेम,
प्रत्येक पुरुषाला वाटतं ती त्याची आहे,
प्रत्येक स्त्रीला वाटतं ती वेडी आहे,
जगाला ती वाटते व्यभिचारी,
तिला ती वाटते दमलेली...

रागाचा, द्वेषाचा, अपेक्षांचा
गाळ नकळत साचायला लागला,
झऱ्यावर शेवाळं जमायला लागलं,
तिचं प्रेम समाजचौकटीत धडपडायला लागलं.

आता आता बिन बोटांनी ती
लोकांना कुरवाळते तेव्हा
तेव्हा लोकांना खुपत तिचं प्रेम
पण तरीही ती प्रेमत असते
स्वतःसाठी, जगासाठी, प्रेमासाठी!


Thursday, March 16, 2017

जादूची वही

रपरपत्या पावसात गाडीवरून
गेलो होतो रस्त्याच्या मागे मागे
रस्ता संपला, पाउस संपला,
आठवण ही हरवली होती कुठे तरी
पण परवा पाहिले दोन वेडे,
तुफान पावसात घट्ट बिलगून चाललेले
आणि आठवली आपली जादूची वही

तुझी माझी होती एक जादूची वही
प्रत्येक आठवण लिहून ठेवायचो आपण त्यात,
आणि पान संपलं म्हणून उलटलं की
नाहीशी होऊन जायच्या त्या आठवणी

खूप मज्जा वाटायची तेव्हा त्या वहीची
कधीतरी मी तुला विचारलं होतं
जातात तरी कुठं या साऱ्या आठवणी
नेहेमीसारखा प्रेमभर हासत तू म्हणालास,
जात असतील तिच्या मुलीच्या गावाला,
तूप रोटी खाऊन , जाडजूड होऊन
केस पिकवून भेटतील आपल्याला परत

आता माझ्या पिकल्या केसांनी
तुझ्या थरथरत्या हातांना धरून बाहेर जाते,
तेव्हा एकेक आठवणी येऊन भेटतात
आपल्या जादूच्या वहीतल्या.


Tuesday, March 7, 2017

ती आहे पूर्णत्व…पुरूषाचं....

१. 

लहानपणी आजीकडून त्यांनी एक गोष्ट ऐकली होती, बृहन्नडेची. अर्जुनासारखा शूरवीर , धनुर्धारी, महापुरुष एका वर्षासाठी स्त्री होतो त्याची कथा. दहा बारा वर्षाचा असताना ऐकलेली ती गोष्ट. राम, कृष्ण यांच्या मैत्रीच्या , पराक्रमाच्या गोष्टीनी भारून जायचं वय होतं ते. तोपर्यंत प्रत्येक खेळात त्याला राम किंवा कृष्ण व्हायचं होतं. कृष्णच जास्त. त्याची ती बासरी वाजवणं, गोपिकांसोबत मस्ती करणं हे सारंच आगळावेगळ वाटायचं. त्याचा धोरणी चतुरपणा, सोयीस्कर सबबी  सारं काही मानवी वाटायचं. मग अशातच कधी तरी पांडवांची, त्यांच्या कथाविश्वात एन्ट्री झाली.  पाच भावांमध्ये मिळून एकच बायको. पाच भाऊ पण.  प्रत्येकाचा जन्मदाता वेगळा कसा, असा प्रश्न पडायचा. पण आजी पुढे विचारायची हिंमत कधी झाली नाही. मग अशातच एकदा कधी तरी आज्जीनी बृहन्नडेची गोष्ट ऐकवली आणि मग पुढचे कित्येक दिवस महिने ती डोक्यातच घुमत होती. उर्वशीनी शाप दिला म्हणून अर्जुनाला एक वर्ष स्त्रीवेश घालून स्त्रियांच्या अंतःपुरात राहायचं, नृत्य, शिकवायचं सोपं नक्कीच नव्हत. मग कसं काय त्यानी निभावून नेलं असेल. काय विचार आले असतील त्याच्या मनात, बाईच्या आयुष्याची कल्पना आली असेल का? त्या एका वर्षाच्या अनुभवामुळे अर्जुनाचा स्त्रियांकडे बघायचा दृष्टीकोन बदलला असेल का? हे प्रश्न त्या वयात पडले नाहीत. पण एक बालसुलभ प्रश्न पडला होता,अर्जुनाकडे फक्त त्याचे कपडे होते मग त्यानी मुलींचे कपडे कुठून आणले? या प्रश्नावर आजी खूप हसली होती आणि तिनी पुढचे आठ दहा दिवस येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला ऐकवलं होतं. मुलगा म्हणून वागत असताना देखील कुठे तरी ती गोष्ट आत होतीच. अर्जुनाला स्वतःच्या रूपाचा,पौरुषत्वाचा अभिमान होता, तो गळावा म्हणून तर दिला गेला नसेल ना हा शाप? असंही कधी कधी मनात उगाचच डोकावून जायचं.
समाजरितीप्रमाणे शिक्षण, नोकरी, लग्न सारं झालं. एक मुलगा भाऊ, नवरा, वडील सारं काही निभावून नेताना त्याच्या डोक्यात ती बृहन्नडा असायचीच. कित्येक वेळा त्याला निर्णय घेताना ती बृहन्नडा अप्रत्यक्षपणे मदत करायची. त्याच्या बायकांबद्दलच्या हळव्या कोपऱ्यामुळे त्याला बाईल्या म्हणूनही कधी हिणवलं गेलं, कधी बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हटलं गेलं, पण त्याला माहीत होतं, पुरुषामध्ये दडलेल्या स्त्रीचा सन्मान जपला तरच माणूस म्हणवून घेण्यात अर्थ आहे.
त्यामुळेच स्त्री म्हणून जगुनही अर्जुनाच्या पुरुषत्वाला कोणी कधी बोल लावला नाही.

२.
आपण वेगळे आहोत हे त्याला जसं जसं उमगत गेलं, तसा तो त्याच्या चित्रांमध्ये जास्त रमत होता. आपलं दिसणं जेव्हा आपल्याला चुकीचं वाटतं. आपल्या ओळखीचा शोध घेत असताना काहीतरी वेगळंच कळत जातं. स्वतः बद्दल नवे शोध लागत असताना तो सगळ्याच आघाड्यांवर लढत होता. पहिले स्वतःशी, मग कुटुंबाशी, समाजाशी, अनेक समजांशी. एक हात मदतीसाठी मिळत असताना दहा हात उगारले जात होते.  त्या सगळ्या मंथनातून एक होत होतं स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात तो अभ्यासात अव्वल येत होता. सोबतीला चित्रं होतीच. खूप छोट्या छोट्या इच्छा तो मारत होता पुढचा विचार करून. घरात कोणीही नसताना एकदा तो आईची साडी नेसला. हातात बांगड्या घातल्या, छोटीशी टिकली लावून पाहिली. हलकासा मेक अप सुद्धा केला. बोटांवर नेल पॉलिश लावताना जणू तो स्वतःलाच पॉलिश करत होता. स्वतःला तयार करत असताना त्याचा रोम रोम फुलत होता. आरशामाधलं स्वतःच प्रतिबिंब पाहून स्वतःशी नव्यानं ओळख करून घेत होता. लहानपणापासून त्याला हे  आईसारखे कपडे घालावेसे वाटायचे. नटावंसं वाटायचं, स्वतःला एकदा तरी मुली सारखं तयार करून आरशात बघायचं हे त्याचं वर्षानुवर्षाचं एक छोटंसं स्वप्न होतं. ते एक छोटंसं स्वप्न पूर्ण करायला त्याला काही वर्ष लागली होती. आपल्याला जे वाटतं ते नक्की काय आहे हे समजण्यात त्याची पौगंडावस्थेतील वर्ष गेली होती. आणि जेव्हा ते कळलं तेव्हा बाकीचे हे कसं काय स्वीकारतील याची भीती होती. पण हळू हळू स्वतःलाच तो कणखर बनवत गेला. स्वतःबद्दल जे वाटत होतं त्याबद्दल लाज सोडून सगळं काही वाटत होतं त्याला. पुरुषाच्या आत स्त्री लपलेली असतेच ना. मग मला आतून वाटणाऱ्या या हाकेला मी का नाही उत्तर द्यायचं. ही केवळ विचारांच्या पातळीवर राहिलेली बंडखोरी त्याला पुरेशी वाटत नव्हती. एकदा तरी पूर्ण स्त्री वेशात त्याला स्वतःला भेटायचं होतं. आपण आहे तसचं राहावं, पेहराव बदलावा की शस्त्रक्रिया करावी, या साऱ्या खूप पुढच्या गोष्टी होत्या. त्याला फक्त एक इच्छा पूर्ण करायची होती. जेव्हा ती इच्छा पूर्ण झाली तेव्हा त्याचं स्वतःवरच, जगावरच प्रेम अजूनच वाढलं होतं.
आपल्याला जे वाटतंय त्यात अनैसर्गिक काहीही नाही. कणखरपणा, भावना हे सारे लिंग विरहित असतात, पण तरीही काही भावनांना स्त्रीत्वाचं लेबल लावून वेगळ बसवलं जातं. पण निसर्गतः सगळे सारखेच असतात. स्त्रीच्या आत पुरुष दडलेला असतो तर पुरुषांच्या आत स्त्री असते च कारण ह्या दोन जाती नाहीत तर त्या अंतःप्रेरणा असतात.

३.

तिनी विचारलं," बाबा women’s day असतो तसा men’s day का नसतो?"

निरागसतेच्या सुखी वयातून पार होत अल्लड तारुण्याच्या अधल्या मधल्या टप्प्यावर येत असलेल्या आपल्या लेकीला खर सांगावं की गोल गुळगुळीत, थातूर मातुर उत्तर द्यावं या संभ्रमात बापानी दोन क्षण घालवले आणि मग तिचा हात हातात घेऊन म्हणाला.


“अग बाई होणं काही सोपं नसतं. सतत दुसऱ्याचा विचार करून जगणं म्हणजे असतं बाई पण. कोणत्याही परिस्थितीत उभं राहणं म्हणजे असतं बाईपण, शून्यातून नव्याची सुरुवात करून विश्व वसवणं म्हणजे असतं बाई पण, उद्याचाच नाही तर परवाचा तेरवाचा विचार करून निर्णय घेणं म्हणजे असतं बाई होणं, नाती जन्माला घालून ती जोपासणं असतं बाईपण, सृजनाचा शोध घेत राहून आयुष्य सुंदर करणं असतं बाईपण,विश्वासावर विश्वास ठेवून विश्वास सार्थक करणं म्हणजे असतं बाईपण, कितीही अंधार असला तरी प्रकाशाचे कान शोधणारी असते ती बाई,स्वतःची क्षमता माहित असूनही कमी लेखण म्हणजे असते बाईपण. पण कधीतरी स्त्री स्वतःची ओळख विसरते, स्वतःवरच्या अन्यायाला समाजव्यवस्थेचा न्याय समजायला लागते, कर्तव्य पार पाडता पाडता हक्क विसरून जाते तेव्हा तिला जागं करावं लागतं, तिला सांगावं लागतं. बाई तू कमी नाहीस. सृष्टीचा आधार आहेस तू. तुझ्या पायावर तर उभा आहे हा सारा डोलारा. तुझी सहनशक्ती हा तुझा कमकुवतपणा नाही तर शक्ती आहे, तुझं समर्पण तुला इतरांपेक्षा वेगळ ठरवतं. तुझा सृजनाचा शोध हा खरंतर कारण आहे आपल्या सुखी जीवनाचं. पुरुषाशी बरोबरी करणं म्हणजे सगळं मिळवणं नसतं, पुरुषाच्या बरोबरीनं उभं राहणं म्हणजे असतं बाईपण. स्त्री फक्त बाई नसते ती बाई माणूस असते. त्या बाईमाणूस पणाला जगणं म्हणजे असतं बाईपण. बयो सोप्प नसतं बाई होणं, बाई व्हावसं वाटणं. ती एक जबाबदारी असते माणूस पण समृद्ध करण्याची, आयुष्य सुंदर करण्याची, जगात सुख फुलवण्याची. ही सगळी स्वप्न पाहणाऱ्या, ती प्रत्यक्षात उतरवण्याचा ध्यास घेणाऱ्या राकट कणखर हातांवर उब धरण्यासाठीचा हा एक दिवस. बाई असण्याचा अभिमान जागवण्याचा एक दिवस.”
बाप बोलतच होता, काही लेकीसाठी काही स्वतःसाठी, तिला कितपत कळत होतं माहित नाही, पण त्याला International Women’s Day नव्यानी कळत होता इतकं नक्की.
“बाबा म्हणजे हा day तुमचा पण आहे की, बघ women मधे men आहेच किंवा female मधे male आहेच की. म्हणजे बाई माणसाला पूर्ण करते असंच तुला मगाचपासून म्हणायचं होतं ना. “
इतक्या साध्या  सोप्या शब्दात आयुष्याचं सार मांडू शकणाऱ्या, जगणाऱ्या, तमाम स्त्रियांना, स्त्रीत्वाचं भान असणाऱ्यांना सगळ्यांना  जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा....   

Tuesday, February 14, 2017

प्रेमानी जुळलेली नाळ

सुमारे १९५१ च्या वेळेसची गोष्ट आहे. नव्या आलेल्या सून बाईंना सासू बाईनी पोळ्या करायला सांगितल्या होत्या आणि त्या बाहेर गेल्या होत्या. दुसऱ्या मुलखातून आलेली पोरगी, त्या काळी शाळेत जाऊन इंग्रजी शिकलेली वगैरे, पुस्तक वाचायची माहिती, स्वैपाक घरात मात्र जेमतेम कधी तरी पाउल टाकलेलं. भात करता यायचा, पण पहिल्याच दिवशी पोळ्या करायला सांगितल्या, पार दांडी उडली होती. परातीत आधी पाणी घालायचं की पीठ हे ही माहित नव्हतं. घर, घरातली माणसंच काय आजूबाजूची भाषा सुद्धा ओळखीची नव्हती. काय करायचं कसं करायचं काहीच सुचत नव्हतं. फक्त रडू कोसळत होतं. सगळा पसारा मांडून मग ती नवी सून रडत बसली होती. थोड्या वेळानी सासू बाई आल्या आणि सून बाईना अशा रडताना पाहून म्हणाल्या ,सुनबाई काय झालं. रडत रडत सून बाईनी सांगितलं मला पोळ्या कशा करतात माहित नाही. रडणाऱ्या सून बाईंना थोपटत सासूबाई म्हणाल्या, अहो एवढच ना. मग रडता कशाला सांगायचं आम्हाला. आता आम्ही शिकवू हो तुम्हाला पोळ्या करायला. सून बाईंची कळी खुलली आणि त्यांनी सासू बाईंकडून फक्त साध्या पोळ्याच नाही तर पुरण पोळ्या सुद्धा इतक्या सहज शिकून घेतल्या की खाणारा त्याची चव कधी विसरू शकायचा नाही. अहो जाहो म्हणल्यावर अंतर वाटतं असंच नसतं तर ते एकमेकांना आदर देणं असतं, एकमेकांच्या चुकांवर हसण्यापेक्षा त्यांना मदत करणं हा एखाद्या नात्याचा सुंदर पाया असू शकतो हे मी माझ्याच घरात पाहीलं. १९व्या वर्षी लग्न होऊनही ( त्या काळात घोडनवरीच) स्वैपाक न येणाऱ्या माझ्या आजीला तिच्या सासूनी एक नवा माणूस म्हणून घडवलं की आज ती गेल्यानंतरही गावात कोणाच्या ना कोणाच्या घरात , सहज म्हणून, कारणासाठी म्हणून आजीची आठवण नक्कीच निघत असते.

ज्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा नवा प्रघात सुरु झाला आहे त्याच दिवशी आजीचा वाढदिवस असणं हा नक्कीच फक्त एक योगायोग नव्हता. कर्नाटकातून एक दिवस लग्न करून पुण्या जवळच्या एका खेड्यात आली, खेडच ते फक्त फरक एवढाच होता की त्या गावातून रेल्वे लाईन जायची. मराठी बोलता यायचं पण ते ही तोडकं मोडकं, कन्नड मात्र अस्खलित लिहिता वाचता बोलता यायचं. इंग्रजीची देखील ओळख होती, पण आता एक वेगळी भाषा समोर येऊन ठाकली होती. पण तिनी ती भाषाच नाही तर ते गाव तिथली माणसं इतकी सहज आपलीशी केली की जणू ती त्याच मातीत जन्माला आली होती.

आजी म्हणल्यावर ज्या अनेक गोष्टी आठवतात त्यातली एक गोष्ट म्हणजे विष्णू सहस्त्रनाम, गावातल्या विठोबाच्या देवळात सेवा करता करता ती कधी विष्णुदास झाली होती तिलाच कळल नव्हतं. गीतेचे अठरा अध्याय, विष्णू सहस्त्रनाम, तुकोबांचे अभंग तिच्या तोंडी सहज असायचे. ज्ञानेश्वरी, भागवताची किती पारायणं केली होती याची काही गणतीच नव्हती. मी तिला कधीच शांत निवांत बसलेलं पाहील नाही अर्थात शेवटचे दोन वर्ष जेव्हा ती अंथरुणाला खिळून होती तेव्हाचे सोडून. सतत कोणता तरी श्लोक, अभंग, नाहीतर किमान नामस्मरण तर सुरूच असायचं, बसल्या बसल्या फुलवाती तर कर, गजरे, हार गुंफत बस, वृत्तपत्र वाच, नवीन पुस्तक वाच, कोणाला तरी काहीतरी नवीन शिकव, एक ना अनेक गोष्टी पण ती सतत स्वतःला गुंतवून ठेवायची. देवळामध्ये बसून काकडा करताना , किंवा सहज दर्शनाला जाऊन रोजचे अभंग श्लोक म्हणताना ती अगदी तल्लीन होऊन जायची. देऊळ हे काही फक्त तिच्यासाठी देव दर्शन नव्हतं, तिथं येणाऱ्या प्रत्येकाशी दोन वाक्य तरी बोलून प्रत्त्येकाची संवादाची गरज भागवायची. एखाद्या सासुरवाशिणीला मायेनी आईचा आधार द्यायची, कोणाला धीर, कोणाला उमेद, कोणाला प्रेरणा साध्या शब्दातून ती अवघड, अगम्य गोष्टी साध्या करून सांगायची.  त्यामुळेच आजी म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर देवाच्या गाभाऱ्यात शांत तेवणारी समईच डोळ्यासमोर येते.

आजीला वाचनाची दांडगी हौस होती, कोणताही विषय तिच्या वाचनात वर्ज्य नसायचा. माझ्या मामा कडचं पुस्तकाचं वेड हे आजीकडूनच मिळालेलं बाळकडू होतं. नवीन पुस्तक हातात आलं की कधी संपेल याची इतकी घाई असायची की मग त्या वेळी घरात फक्त भात आमटी किंवा खिचडीचा स्वैपाक व्हायचा. आजोबांचं पुस्तकांशी वाकडं नव्हतं, पण त्यांना इतकं पुस्तकांच्या आहारी गेलेलं आवडायचं नाही, त्यामुळे त्यामुळे वादावादी व्हायची पण अशा वेळी आजीला ते काही ऐकूच यायचं नाही. वृत्तपत्र वाचून तिची स्वतःची अशी ठाम मत होती. पूर्वीची कॉग्रेसवासी असलेली आजी हळू हळू जनसंघ मग भाजपा कडे सरकली. पण तरीही कोणी चुकीचे वागतंय दिसलं तर तितकीच बोलूनही दाखवायची. राजकीय पक्षांवर आंधळं प्रेम तिनी कधीच केलं नव्हतं, पण राजकारणाचा अनुभव घ्यावा म्हणून ती एकदा चक्क नगरपालिकेच्या निवडणुकांना देखील उभी राहिली होती, पण नंतर त्या विषयावर कधी विचारलंच तर जाऊ दे गं कधी कधी थोडा वेडेपणा करायचा असतो, सारखं काय शहाण्या सारखं वागायचं.

आजीच्या आठवेन तितक्या आठवणी आहेत, वृत्तपत्र वाचून माझं मत विचारणारी आजी, मी काय लिहिते ते वाचून कधी कधी हे कसं सुचतं विचारणार, एखाद्या ज्वलंत प्रश्नांवर मला काय वाटतं ते विचारणारी, मऊसुत पुरणपोळ्या शिकवणारी, केसांना तेल पाणी करते म्हणत जवळ बसवून घेत तेलानी पार माखून टाकणारी, कधी कधी जुन्या विचारांची भासणारी, भावाला भेटून लहान मुलीसारखी खुश होणारी, कोणतीही साडी कोणत्याही ब्लाऊज वर घालून मला म्हातारीला कोण बघतंय म्हणणारी, होत नसतानाही हौस भागवायची म्हणून पतवंडाला न्हाऊ माखू घालणारी, वय साथ देत नसतानाही जावयासाठी म्हणून अधिक मासाची तयारी करणारी, नवीन मालिका अगदी आवडीनी बघणारी, कोणतीही नवीन गोष्ट करून तरी बघू म्हणणारी, आजी माझी आजी. तिला विमानात बसायची खूप इच्छा होती, मग तिच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाला मी तिला भेट म्हणून विमानाचं तिकीट दिलं होतं. ज्या प्रवासाला तिला १८, २० तास लागायचे तो प्रवास दीड तासात संपला, त्यामुळे उतरताना ती म्हणायची बस संपला पण इतक्यात. मग पुढचे काही दिवस तो छोटासा विमान प्रवास तिच्या सगळ्या गप्पांचा केंद्र बिंदू होता. वय वाढता वाढता तिच्यातली लहान मुलगी अजून जास्त उफाळून वर येताना दिसत होती. शेवटच्या भेटीत ती जेव्हा गाऊन घालून होती तेव्हा मला बघून म्हणाली बघ हे घालायचं राहिलं होतं, आता ते ही घालून पाहिलं.

आज आजी जिवंत असती तर ८५ वर्षांची तरुणी असती. आजीच्या आठवणी हाच एक आयुष्याचा खास ठेवा असतो, तिनी सांगितलेल्या गोष्टी आयुष्यभर पुरवून पुरवून वापरताना तिचं आपल्या आयुष्यात असणं हे देखील सुखावणारं असतं. ती सासू म्हणून आई म्हणून वेगळी असू शकते, चुकू शकते पण आजी बनताना मात्र ती मेणाहून मऊ झालेली होती. वडिलांच्या आईपेक्षा काकणभर माया आईच्या आई वर जास्त असते कारण कुठे तरी नाळेची नाळ जुडलेली असते किमान माझ्या बाबतीत तर असंच होतं ! आजीचं गोष्टी ऐकणं, सांगणं हा देखील एक आनंदच असतो. त्या गोष्टीबरोबर आपण आजचं आयुष्य ताडून बघत असतो, भूतकाळात डोकावणं म्हणजे एक प्रकारे ते परत जगून घेणंच असतं ना. मुलीची मुलगी म्हणून एक खास नातं आधीच तयार झालेलं होतं, असं म्हणतात काही खास अनुवांशिक जनुक ही आईकडून फक्त लेकीला जातात, मला कायम कौतुक वाटायचं आजीच्या सहज कोणतही मिसळून जायचं, स्वतःला विसरून घेऊन  इतरांसाठी काही करण्याचं, जे मी माझ्या आई मध्ये देखील पाहिलं आयुष्यात मी मागितलेलं काही मिळणार असेल तर मला आजीला आजी बनवणारी ती खास जनुक हवी आहेत. कोणत्याही परिस्थितीत समाधान शोधणारी, स्वतःचे आनंदाचे क्षण स्वतः निर्माण करायचे असतात, त्यासाठी कोणावर अवलंबून राहायचं नसतं सांगणारी, सर्वांवर प्रेम करता करता काहींवर थोडं जास्त प्रेम करणारी, माणूस परिपूर्ण कधीच नसतो, तो ही चुकतो, देवच चुकतो तर आपली माणसांची काय बात असं सांगत चुका करण्याचा अधिकार देणारी आजी, माझी आजी !

मला खात्री आहे स्वर्ग वगैरे काही असेलच तर तिथे जाऊन ती तिच्या आवडत्या लेखकांना नक्की भेटली असेल, त्यांनी तिथेही काही नवीन लिहिलं असेल तर त्याचा फडशा तिनी कधीच पाडला असेल. नवीन विद्यार्थी शोधून त्यांना गीतेचे अध्याय, विष्णू सहस्त्रनाम शिकवत असेल. मऊसुत पुरणपोळ्या, खमंग बेसनाच्या लाडवांची कृती कोणाला तरी सांगत असेल, एखाद्या हळव्या जीवाला आधार देत असेल. आणि जर स्वर्ग नसेल तर जिथे कुठे जाईल तिथे ती नवा स्वर्ग तयार करत असेल. प्रेम दिवसाच्या दिवशी जन्मलेल्या माणसाकडून अजून दुसरी काय अपेक्षा करता येईल कारण प्रेम चिरायूच असतं.      

Saturday, January 14, 2017

काटेरी हळवा हलवा...

हा घ्या तुमचा चहा , असं म्हणत बायकोनी आदळून जेव्हा चहाचा कप समोर ठेवला तेव्हा त्याला कळलं की पारा अगदी वर गेलाय.
आता यात चिडण्यासारखं काय आहे , त्यानी बोलून आगीत अजून तेल ओतलं.
मग त्यावर परत काही पुटपुटते वाग्बाण त्याच्या कानावर पडत होते. पण चहा पिता पिता त्याचे कान बंद होत असल्यामुळे त्याला ते काहीच ऐकू आले नाही. पण त्याला अजूनही कळत नव्हतं हिचं बिनसलंय तरी काय? शनिवारी निवांत पांघरूण ओढून झोपावं, सकाळी पेपर चाळत गरम पोहे खात चहाचे किमान दोन कप तरी रिचवावेत, ते सगळं सोडून हिच सकाळी उठल्यापासूनआवरा आवरा सुरु झालं होतं. मग काय याचा एक बाण तर दोन बाण, दोनदा तीनदा वाकयुद्ध झालं. मग आंघोळीवरून परत कटकट. तिचा मात्र तोंडाबरोबर हात ही चालत होते, काय सुरेख वास घरभर पसरला होता. कशाचा वास असावा तो अंदाज लावत असताना काही तरी पड झड झाली आणि परत तिची चिडचिड सुरु झाली. त्याला खरंच कळत नव्हतं घर आवरायची काय गरज? मग जरा लक्ष वळवण्यासाठी त्यानी फोन हातात घेतला तेव्हा १०० हून जास्त मेसेज बघून अंदाज आला आज काहीतरी विशेष दिन असावा बहुतेक.
सकाळी सकाळी त्यांनी फोन असा हातात घेतला की पुढचे दोन तास हा व्हाटस अप, फेसबुक यावर वेळ घालवणार हे सांगायला तिला ज्योतिषाची गरज नव्हती. त्यामुळे तिनी बाहेर येऊन परत तो कसा काहीही कामा करत नाही, पोरानी सुनेनी तो स्मार्ट फोन घेऊन दिल्यापासून तो कसा सतत त्याच्यावरच वेळ घालवतो, हे आजवर हज्जारदा सांगितलेलं हज्जार एकदा सांगितलं. अशावेळी तो सोयीस्कर कान बंद करून घ्यायचा म्हणजे श्रवणयंत्रच काढून ठेवायचा, ते बघून तर तिनी शेवटी सांगितलं आज मी बोलणारच नाही तेव्हा मात्र त्याला  जरा काहीतरी वाटलं.
मग अगदी शहाण्या बाळासारखं वागून अंघोळ करून, देव पूजा करून तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला
आज सूनबाईंचा संक्रातीचा सण करायचा आहे ना. कशाला सगळ घरी करायचा घाट घातलास. चांगलं बाहेर जेवलो असतो, आणि मग सगळे जण त्यांच्या घरी गेले असते, आपण आपल्या घरी आलो असतो, जे काही द्यायचं घ्यायचं तिथंच करून टाकलं असतं, उगाच तू कशाला दमून घेतेस.
त्यांनी अगदी समजावणीच्या स्वरात तिला विचारलं.
घरी स्वतःच्या हातानी गुळपोळी करून लेकाला खायला घालण्यात वेगळच आनंद असतो हो. थोडं दमायला होईल पण आपल्या माणसासाठी करण्यातला आनंद हि मिळेल. मी बाहेर सगळं  नेउन ठेवलं आहे बघा जरा., तुमच्या लाडक्या सुनबाईना आवडेल ना ते.
एकुलत्या एका मुलगा सुनेला त्यांनी स्वतःहूनच सांगितलं होतं, तुमचं ऑफिस आणि हे घर खूपच लांब पडेल तुम्ही कामाच्या जवळच एखादं घर बघून राहा. त्यात कोणताही राग भांडण नव्हतं, फक्त सोय होती. तसेही ते दोघेही अजून धडधाकट होते, त्यांच्या त्यांच्या व्यापात होते, उद्या मूल झालं, त्याला सांभाळायची गरज पडली तर तेव्हा बघून घेऊ हा सगळ विचार होता. जवळ राहून रोज तोंडाला तोंड लावून आपटबार उडवण्यापेक्षा लांब राहून रोषणाई केलेली परवडली सगळ्यानाच पटलं होतं ते. लग्नाच्या आधीपासून सून घरी यायची त्यामुळे अवघडलेपण असं कोणातच नव्हतं.
आई आणि बायको च्या मध्ये पोराला आपल्यासारखा त्रास होऊ नये अशी त्याची मनोमन इच्छा होती, म्हणून त्यानी हा लांब राहायचा त्याचा प्लन पहिले बायकोच्या आणि मग पोराच्या सुनेच्या गळी उतरवला होता. सुनेसाठी तिनी काळ्या साडी ऐवजी सुरेख कुर्ता ठेवला होता, आणि हलव्याच्या दागिन्याऐवजी हलके साधे मोत्याचे दागिने ठेवले होते.
अग हे ग काय?
काळानुसार बदलायला नको का?  माझ्या समाधानासाठी घालेल ही कदाचित ती ते हलव्याचे दागिने, फोटो पुरती नेसेल ही काळी साडी पण ते काहीही मनापासून नसेल, मग काय अर्थ राहील त्या सगळ्याचा.
त्याला बायकोच्या समजूतदारपणाचं खरं कौतुक वाटलं. तिच्या या हौशी मौजी कधी झाल्याच नव्हत्या, त्याच्या आईनी त्यांच्या लग्नातला कसलासा मानपान डोक्यात ठेवून तिला आयुष्यभर छळलं होतं, कोणत्याही सणाला गोडाच्या आधी भांडणाचा एक घास तिच्या तोंडात पडलाच होता, तिनी तेव्हा त्याबद्दल त्याच्याकडे तक्रार, चिडचिड, भांडण सगळ करून झालं होतं, पण तो या कानांनी ऐकून त्या कानानी सोडून देतो कळल्यावर तिनी ते सांगायचं पण सोडून दिलं. नंतर त्या सगळ्याचं काहीच वाटेनासं झालं आणि लक्षात आलं अपेक्षा ठेवल्याच नाही की दुःख पण कमी होतं.
सून मुलगा तिचे आई वडील, अजून एक दोन चार नातेवाईक आले, जेवणं झाली मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरु होणार तेवढ्यात तो जरा आत गेला. तिच्या कपाळावर परत आठी पडली. आताच याला आत जायची काही गरज होती का.
एक पिशवी घेऊन आला, आणि म्हणाला, जरा थांबतेस आधी हे घे. आणि हळदी कुंकवाचं बोट लावून तिच्या हातात दिलं.
आत हे काय नवीन म्हणत तिनी पिशवी उघडून बघितली , अय्या चंद्रकळा, कोणासाठी?
गेली तीस वर्ष सोबत आहोत आपण, माझ्या आई मुळे तुझी कोणतीही हौस मौज नीटशी करू शकलो नव्हतो, लग्ना नंतर कधी तरी तू विचारलं होतंस तुमच्याकडे काळ्या रंगाचे घालतात का? मला तेव्हा त्याचा संदर्भ काहीच कळला नव्हता, मग नंतर हळू हळू गोष्टी कळायला लागल्या,  पहिल्या संक्रांतीच्या दिवशी तुला नक्की काळी साडी घेऊन द्यायची असं ठरवलं होतं, पण त्याच दिवशी घरात कशावरून तरी वाद भांडणं झाली आणि त्या रागाच्या भरात ते सारं विसरून गेलो, आणि मग ते तसंच राहिलं. विचार केला, मुलाच्या लग्नानंतर आपलंही आयुष्य नव्यानं सुरु झालंच ना, म्हणजे ही तशीच आपली पण पहिली संक्रांत. मग तेव्हा जे जमलं नाही ते आत्ता करावं.
भरल्या डोळ्यांनी तिनी ती साडी तेव्हाच नेसली आणि सुनेचा सण केला.
हलव्याचे काटे जिभेला बोचत नाहीत, आणि तोंडावर विरघळतात, नवरा बायकोमध्येही असंच तर असतं ना, सकाळचं भांडण संध्याकाळी शिळ झालं असतं, आणि रात्री झोप येत नाही म्हणणाऱ्या बायकोच्या पायाला लावलेलं तेल सकाळी उडून गेलेलं असतं. तिळगुळ देऊन गोड बोला असं बोलायची गरज पडत नाही बहुदा काही वर्षानंतरच्या सहवासानंतर!   

  

Wednesday, December 28, 2016

दंग(ल) करणारा अनुभव...

सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं कायम म्हणलं, लिहिलं जातं. म्हणजे आपल्याला जे बघायचं आहे ते त्यात दिसतंच पण त्याच वेळी जे नजरेआड आहे ते देखील समोर आणतं. कधी कधी आपल्याला जे मान्य करायचं नसतं ते देखील आरशासमोर उभं राहून आपण मान्य करतो.सिनेमा हा स्वप्नी, आभासी जग जगण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे. तर कधी सिनेमाच आपल्याला आपल्या आयुष्यात न घेतलेल्या वळणाच्या पुढचं आयुष्य कसं असू शकलं असतं दाखवतो. कधी जुन्या आठवणी ताज्ज्या होतात, कधी काही जखमांवर मलम लावलं जातं.
दंगल सिनेमा बघताना असाच काहीसा अनुभव आला. गाणी आणि ट्रेलर मुळे खूपच उत्सुकता होती. सिनेमा, क्रिकेटवेड्या आपल्या देशात खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण मोडणाऱ्या या सिनेमामुळे माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या सिनेमावर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळया माध्यमांवर लिहिलं, पण मला हा पूर्ण सिनेमा पाहताना माझा भाऊ, अहमदनगरमधला सिद्धी बागेतला ज्युदोचा हॉल, धोपावकर सेन्से, आणि खूप काही डोळ्यासमोर तरळत होतं.
एक २० वर्षापूर्वीचा काळ असेल, माझा भाऊ प्रचंड मस्ती खोर, त्याच्या अंगातली रग कमी करण्यासाठी कोणीतरी आई वडिलांना सुचवलं याला ज्युदोच्या क्लास ला घाला. नव्यानं सुरु झाला होता तो. दोन तास पोरगा बाहेर खेळायला जाईल, आपल्याला त्याला बघावं लागणार नाही या सुटकेच्या विचारांनी आई वडिलांनी त्याला वेक दिवशी यंगमेन्स ज्युदो असोशिएशनच्या एका छोट्याशा हॉल मध्ये नेऊन उभं केलं. नव्या पांढऱ्या ड्रेसवर माझा भाऊ खूपच खुश होता. दोन तास तुला इथं खेळायचं आहे , यावर तो अजूनच खुश होता. मग सुरुवातीचा रन अप, एक्सरसाईज सगळं करून मग मॅट वर जाणं ह्याची इतक्या लवकर सवय झाली की एक दिवस सुद्धा सुट्टी आवडायची नाही त्याला. मॅट बघितली की सगळं विसरलं जायचं. स्पर्धांच्या आधी तासनतास केलेली प्रॅक्टिस, वजन कमी जास्त करण्यासाठी घेतलेले कष्ट, आज इतक्या वर्षांनंतरही मला आठवतात. एका वर्षी उन्हाळ्यात आमच्याकडे आंबे आणले नव्हते, कारण माझ्या भावाला वजन कमी करायचं होतं, मग तो आंबा खाणार नाही तर आम्ही त्याच्या समोर कसे खाऊ? हा त्याग नव्हता, आम्ही तुझ्याबरोबर आहोत ही भावना होती. मग एका स्पर्धेच्या आधी परत वजन तेवढंच ठेवण्यासाठी म्हणून तो भाकरी खायचा तर त्याला सोबत म्हणून आई पण त्याच्याबरोबर भाकरी खायची. मग कधी वजन थोडं कमी भरत म्हणून ऐन वेळी खाल्लेली केळी असोत हा सारा खेळाचाच भाग होता.
७, ८वर्षाचा म्हणून त्याला सरावात काही वेगळी सूट सवलत नव्हती. अनेक वेगवेगळ्या वयाची मुलं क्लास मधे होती. सुट्ट्यांमध्ये दहा दहा तास चालणारा सराव मदत करत होता बक्षिस मिळवायला. शहर पातळीवर, मग जिल्हा पातळीवर, त्यानंतर राज्य पातळी मग राष्ट्रीय स्तरावर एकेक नाव गाजत होती. त्यात जेवढा यश ज्युदोकांच होतं, तेवढीच किंवा त्याहून जास्त मेहनत सेन्सेंची होती. नगर सारख्या छोट्या शहरात, जे आजही महानगरपालिका असूनही मोठ्ठ्या खेड्यासारख आहे तिथे २० वर्षांपूर्वी एक आपल्या मातीतला नसलेला खेळ त्यांनी फक्त आणला नाही तर रुजवला, फुलवला. एक दोघांची नावं घेऊन मला उरलेल्यांना विसरायचं नाहीये. शहर, जिल्हा पातळीवर काय हा खेळ खेळणारे कमीच असतात, त्यामुळे बक्षिसं सहज मिळतात, म्हणणाऱ्यांची तोंड बंद झाली जेव्हा राज्य पातळीवर पुण्या-मुंबई, विदर्भ, कोल्हापुरातल्या मुलांना हरवून नगरच्या मुलांनी सुवर्ण पदकांची लय लुट केली. अनेकांना अनेक वर्ष पतियाळाची राष्ट्रीय क्रीडा अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली होती. तेव्हा सुद्धा राष्ट्रीय पदक विजेत्यांना राज्य सरकार कडून फक्त अभिनंदनाचे शब्द ,वृत्तपत्रात फोटो सह नाव एवढंच झळकायचं. त्याच वेळी इतर राज्यांच्या स्पर्धकांना राज्य सरकार कडून आर्थिक मदत देखील करायचे. नगरचे काही ज्युदोका अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत देखील गेले होते.
माझा भावानी जवळपास त्याची दहा वर्ष या खेळासाठी दिली होती, आणि या दहा वर्षात तो खूप जागा फिरला, खूप नवीन शिकला, आपल्याला फक्त जिंकण्यासाठी खेळायचं असतं. आणि त्यासाठी सगळं पणाला लावायची तयारी ठेवायची असते. एका राष्ट्रीय स्पर्धेच्या आधी भावाला पायाला जखम झाली होती, स्पर्धेला तर तो जाणारच होता, पण आईनी त्याला सांगूनही त्यानी मॅच जिंकण्यासाठी त्या पायाचाच वापर केला. पदक जिंकलं, पण त्यापुढचे दहा दिवस ड्रेसिंग ही करून घेतलं. अशा एक ना अनेक आठवणी आहेत. ज्युदो हा त्याच्यासाठी फक्त एक खेळ नव्हता, त्याचं पहिलं प्रेम होतं ते. त्यामुळे अगदी आयर्लंड मध्ये जाऊन सुद्धा त्यानी संधी मिळताच खेळून घेतलं.खेळाची परंपरा नसलेल्या घरातल्या अनेकांना या खेळानी तेव्हा झपाटून टाकलं होतं. तेव्हा त्यात मुलगा, मुलगी असा भेदभाव नव्हता. माझ्या आठवणीतली अनेक घर या खेळानी बांधली गेली होती. अनेक भावा बहिणींच्या जोड्या तेव्हा प्रसिद्ध होत्या. मुलगी म्हणून कमी प्रॅक्टीस असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळेच या खेळानी अनेकांना नोकरी, छोकरी सुद्धा मिळवून दिली. काहींना शिवछत्रपती सुद्धा मिळवून दिला.
कोणताही खेळ हा एकट्याचा नसतो, तो खेळ खेळत असताना एक अख्खं घर त्याच्यामागे उभं असतं. त्या खेळाडूच्या डोळ्यात फुललेलं, फुलवलेलं स्वप्न कधी त्याच्या आई वडिलांचं, मार्गदर्शकाचं असतं, जे नंतर त्याचं होऊन जातं. दुसऱ्या गावात स्पर्धा असताना मुलांना, मुलींना सोबत म्हणून अनेक पालक जायचे, आणि मग त्या स्पर्धेच्या काळात ते सोबतच्या साऱ्याच मुली मुलांचे पालक होऊन जायचे. फक्त आपल्या मुलाचा विचार न करता, त्याच्या सोबत खेळणाऱ्या इतर मुलांची काळजी घेणं, त्याचं तात्पुरतं पालकत्व निभावणं तेव्हा अनेकांकडून अगदी सहज झालं होतं, आणि त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही खेळ सुटला तरी या जुन्या ओळखी, मैत्र, तुटलेले नाहीत. मला आजही आठवतंय आम्ही दिल्ली मध्ये फिरता असताना असाच एक जण अचानक रस्त्यात भेटला आणि माझ्या आईला बघून त्यानी काकू तुम्ही इथं मारलेली उडी त्या तात्पुरत्या पालकत्वातून आलेली होती. आजही आईचे फेसबुकवरचे फोटो पाहून अनेकांच्या त्या जुन्या आठवणी ताज्या होतात.

खूप नावं, आठवणी आहेत, लिहिण्यासारखं खूप आहे. पण दंगल बघताना मला आठवली ती खेळाडू तयार होण्यातली मेहनत. एका रात्रीतून हिरो तयार होत नसतात. हिरो तयार होत असताना अनेक जण कारण ठरत असतात. खेळ म्हणजे फक्त क्रिकेट, हॉकी यापेक्षाही वेगळे असतात, मुलगा मुलगी असे भेदभाव न करता तयार झालेले अनेक ज्यूदोपटू, जुळलेले मित्र मैत्रिणी, कुटुंब. राष्ट्रीय स्तरापर्यंत जिंकलेली पदकं, सर्टिफिकेट आजही कित्येकांच्या घरात आहेत. ती आहेत तोवर सगळ्यांना आठवण करून देत राहतील त्यांनी जगलेल्या त्या वर्षांची. अशा छोट्या गावांमधल्या अनेक जणांच्या प्रवासाची गोष्ट असू शकते दंगल. दंगल चित्रपटा मधले काही प्रसंग, NSA मधल्या प्रशिक्षकाचं केलेलं चित्रण मला व्यक्तिशः आवडलं नसलं तरी स्वप्नांचा प्रवास हा नेहेमीच सुरेख असतो. आणि जेव्हा तो चाकोरी मोडून मिळवलेल्या यशाचा असतो तेव्हा कुठेतरी डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असतो.  


Monday, December 19, 2016

डार्क चॉकलेट आणि ट्रृटीफ्रुटी केक

त्यांची ती तिसरी चौथीच भेट असावी. पहिल्या भेटीत उत्सुकतेपेक्षा जास्त टेन्शन होतं. म्हणजे फोटो, इमेल्स मधून तरी बरा वाटला, आता प्रत्यक्षात कसा असेल कोणास ठाऊक. त्यात परत त्यांनी विचारलं होतं, घरीच भेटू या का? आणि ती काही बोलायच्या आधीच सांगितलं होतं, म्हणेज सगळेच आधी भेटूया मग वाटलं तर आपण भेटूया. तिला जरा विचित्र वाटलं, कारण काही पुढं घडलं नाही तरी उगाच त्या भागातून जाताना ते घर बघून आठवण येणार. ती माणसं बघून कदाचित आज हे आपले नातेवाईक असू शकले असते असं वाटणार. पण त्याच वेळी आधी घर, घरातले सारे भेटलो, तर खरंच निर्णयापर्यंत यायला मदत होईल असंही वाटलं. किमान बाहेर कोणत्या हॉटेल मधे भेटलो, तिथं कोणी ओळखीचं अचानक भेटलं तर काय सांगायचं हा प्रश्न तरी येणार नाही म्हणून तिला हायसं वाटलं. अशा कोणत्या मुलाच्या घरी जाण्याची  ते ही आई बाबांसोबत ही काही पहिली वेळ नव्हती. पण तरीही दडपण येतच होतं. साडी कि सलवार की सरळ जीन्स. मधला मार्ग म्हणून तिनी कुर्ता आणि लेग इन घातले. तसा फोटो वरून तो खूप शामळू वाटला होता पण फोटो काही सगळंच खरं सांगत नाहीत. फोटो पेक्षा तिला इमेल्स मधला तो जरा जवळचा वाटत होता. एकाच शहरात असलो तरी लगेच भेटण्याऐवजी आपण आधी इमेल्स वर बोलूयात. मग प्रत्यक्ष भेटूयात, दोघांनाही असेच हवं होतं. कधी कधी प्रश्नांची लगेच  दिलेली उत्तर वेळ मारून नेण्यासाठी असतात, त्यात फार विचार नसतो हे तिला तिच्या नोकरीमुळे आणि गेल्या दोन वर्षात १०, १२ मुलांना भेटून मिळालेलं ज्ञान होतं.

जवळपास दोन महिने एकमेकांना भरपूर इ पत्र लिहून सुरुवातीला घाबरवून, मग कोण किती पाण्यात आहे जोखून आता भेटायचं ठरलं होतं. फोन वरून फक्त आवाज ऐकून काही तरी मत ठरवण्याऐवजी समोरासमोर भेटलेलं बरं म्हणून दोघांनीही ठरवून नंबर एकमेकांना दिला नव्हता. तसं पत्रांवरून तरी तो तिच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळा वाटत होता. पण तरी फोटो वरून वाटला तसा बोलण्यात तरी शामळू वाटत नव्हता. त्याची स्वतःची ठाम मत होती. आणि त्यासाठी तो वाद सुद्धा घालायला तयार असायचा, पण त्याच वेळी समोरच्याच बोलणं पूर्ण ऐकून घ्यायचा देखील. आणि वाद घालताना समोरचं पूर्ण ऐकूनही घेत होता. मत भेद असले म्हणजे समोरचा टाकाऊ असं त्याला बिलकुल वाटत नव्हतं, ते बघून तिला खरंच बरं वाटत होतं. तिला पहिल्यापासून दिसण्यापेक्षा वागणं महत्वाचं वाटायचं. दिसणं आपल्या हातात नसतं, मात्र वागणं आपण ठरवू शकतो. आणि हेच तिच्या आजू बाजूच्या अनेक लोकांना कळत नव्हतं.  दोन वर्षात अनेक नमुने भेटून, पाहून झाल्यावर तिला स्वतःचाच संशय यायला लागला होता. आपण काही भलत्याच अपेक्षा धरून बसलोय की काय?

साधं त्यांच्या घरासारखं घर, नजरेला पडणारी काही पुस्तकं, भरपूर बोलणारी त्याची आई, तिला मनापासून आवडत होतं, फोटोतल्या पेक्षा तो खूपच वेगळा वाटतं होता. नशीब आपण फोटो बघून लगेच नाही म्हणालो नाही, तिनी मनातल्या मनात स्वतःलाच म्हणलं. घरात असलेल्या भार्पूर खिडक्या, खेळणारी हवा बघून मगाशी आलेलं दडपण अगदी पळून गेलं होतं. लग्न फक्त काही मुलाशी होत नसतं, त्याच्या घराशी, त्याच्या घरातल्या लोकांशी सगळ्यांशीच होत असतं, त्या दोघांची ए पत्र तिला पटकन आठवली. तिथं भरपूर बोलणारा इथं मात्र अगदी मुग गिळून गप्प होता, त्यामुळे ती पण शांतच होती. एकूण सगळं चांगल होतं पण परत फक्त त्याच्याशी एकट्याशी बोलावं असं वाटतं असतानाच त्याची आई म्हणाली, तुम्ही दोघं बोला, आयुष्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ममाज बॉय एकदम तिच्याकडे बघत म्हणाला ठीक आहे आम्ही भेटू बाहेर कुठे तरी!

मग दुसरी भेट पण अशीच कुठे तरी झाली, दोघांच्या सोयीनं जागा, वेळ ठरवली.  खरं तर त्याच्या घरीच दोघांचा निर्णय झाला होता , पण तरीही तो निर्णय योग्य  आहे ना याची खात्री म्हणून ही भेट होती. काय खाल्लं यापेक्षा काय बोलतोय हे तेव्हा महत्वाचं वाटत होतं. जमेल ना आयुष्यभर या माणसासोबत राहायला. असा प्रश्न दोघांच्याही मनात डोकावत असताना, समोरच्याची अजून एक नवीन बाजू दिसत होती. आयुष्याचा कंटाळा येऊ द्यायचा नसेल आजूबाजूच्या माणसांचा कंटाळा न येणं जास्त गरजेचं असतं. पक्का निर्णय दोघांनी घरी सांगितलं तेव्हापासून दोन्ही घराचं वातावरणाच बदललं होतं. फोन, तारखा, खरेदी याखेरीज विषयच सुचत नव्हते.

तिसऱ्यांदा भेटले तेव्हा त्यांचे नातं बदललं होतं, संदर्भ बदलले होते, त्यामुळे थोडा अवघडलेपणा आला होता. एक कळत नकळत ताण होता. आता मी काही बोलले तर त्याचा दुसराच अर्थ निघणार नाही ना. याला काही वाटणार नाही ना, पत्र, प्रत्यक्ष भेट, फोन, गप्पा साऱ्याची सांगड लावून एक नातं तयार होत होतं, जशी ती घाबरत होती, त्यापेक्षा जास्त तो घाबरत होता, आजवर मैत्रिणी चिक्कार होत्या, पण अशी खास मैत्रीण कोणीच नव्हती, आई सोडली तर घरात कोणी मुलगी पण नव्हती, त्यामुळे मुलींना नक्की काय हवं असतं त्याला कळतंच नव्हतं. तिनी भेटायला येताना काहीतरी गिफ्ट आणलं होतं ते पाहून त्याच्या पोटात एकदम खड्डा पडला, बाप रे आपण अगदी विसरलोच की असं काही गिफ्ट वगैरे द्यायचं असतं. तिनी अगदी सहज ते त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं मला आवडतं काही क्षण खास करायला, आजच्या भेटीची आठवण म्हणून हे एक छोटंसं गिफ्ट. त्याला आवडेल की नाही म्हणून आतून घाबरत पण वरून अगदी सहज बोलल्याचा आव आणत तिनी instrumental cd चा पॅक त्याच्या हातात ठेवला. हसून काहीतरी बोलून त्यानी वेळ मारून नेली. आणि त्याच्याकडे ती सगळी, गाणी, जवळपास 1 gb चं साऱ्या पध्दतीच संगीत असूनही खोटं हसून अगदी नव्यानं हे बघतोय असा आव आणत खूपच छान आहे, मी गाडीत नक्की लावेन म्हणाला, तेव्हा त्याच्या आवाजत उसनं अवसान होतं. खाऊन पिऊन झाल्यावर त्यानी तिला एकदम एका दुकानात नेऊन तुला काय गिफ्ट हवं ते तूच ठरव सांगितलं, तेव्हा तिचं मन खट्टू झालं, माझं गिफ्ट मीच घ्यायचं?, मग त्यात काय गंमत, ते गिफ्ट नाही खरेदी होऊन जाते, मनाला आवर घालत तिनी एक किमतीच्या टॅग कडे बघत एक कुर्ता घेतला.

चौथ्या वेळी मात्र मित्राच्या सूचनेवरून तो आधीच फुलं आणि चॉकलेट घेऊन आला होता, तर त्या दिवशी तिनी घरून केक करून आणला होता. त्याच्या हातात मिल्क चॉकलेट पाहून पडलेला चेहरा तिनी एका सेकंदात सरळ केला, आणी ट्रृटीफ्रुटी घातलेला केक पाहून त्यानी पण आंबट पडलेला चेहरा गोड केला. पहिल्या घासा नंतर मात्र तिनी त्याला मला मिल्क चॉकलेट आणि त्यानी तिला मला ट्रृटीफ्रुटी घातलेला केक आवडत नाही असं सांगितलं तेव्हा दोघं सुटल्यासारखं  जोर जोरात हसत सुटले आणि हसता हसता एक मेकांचा हात घट्ट दाबला तेव्हाच बहुतेक त्यांच्यातल्या नवरा बायकोच्या’ नात्याची सुरुवात झाली...


आजही तो तिच्या वाटची पण मिल्क चॉकलेट खातो पण आठवणीनं तिला डार्क चॉकलेट आणतो, आणि ती केक करताना त्याच्यासाठी काहीही घालत नाही, आणि बाकीच्या सगळ्यांसाठी म्हणून मग वरून डेकोरेशन करून ट्रृटीफ्रुटी, बदाम, अक्रोड असं काही काही घालते. आपल्याला आवडतं ते न सोडता, आपल्या आवडत्या माणसाला जे आवडतं ते ही करणं म्हणजे पण प्रेमच असतं ना....!