Wednesday, February 17, 2016

पारणं

कधीतरी मी बोलून जाते वेडेवाकडे काहीतरी, आणि तू फक्त चमकून बघतोस माझ्याकडे,
मग मी समजून जाते काय ते,
 आता असेल तोंडावर कारल्याची चव, डोळ्यात  पिवळट लाल झाक आणि ओठ होऊन जातील मलूल,
मी वाट बघत असेन तुझ्या मौनाच्या पारन्याची आणि तू धुमसत असशील आतल्या आत,
राग येतो म्हणून स्वतावरच चिडत असशील आणि आणि राग उतरत नाही म्हणून अजून जास्त पेटत असशिल… 

भीतीच वाटते मला तुझ्या या मौनाच्या उपवासांची,
बोल रे काहीतरी, शिव्या घाल, मार झोड कर, तुझे माझे नाते संपले असे खोटे खोटे तरी म्हण 
पण 
हे उपवास म्हणजे न तपासणे तुला आणि मला, 
जमवून आणावे लागते परत पहिल्या पायरीपासून, 
जिथे तू मला सांगितली होतीस मेथीची भाजी परतून कशी करायची 
आणि तिथेच मी तुला सांगितले होते संध्याकाळच्या उतरणीला तुझी दाढी झक्कास दिसते…। 

बसते मग मी एकेक पायऱ्या चढत, आठवते मग तू ऐकवलेली बापटांचि कविता, साहिरच्या गजला , 
आणि भसाड्या आवाजात तू गायलेली तलत, मुकेश ची गाणी,

चायला पायऱ्या संपायची भीतीच वाटते, कारण आठवणीतला तू तरी असतोस बोलत माझ्याशी, 
डोळे होतात आपोआप बंद, आणि नकळत मी देवालाच साकडे घालू लागते, संपव बाबा याचा उपवास आता,

आणि मग देवासारखा तूच येतोस धावून मारतोस एक मिठी आणि म्हणतोस राणी प्रसाद दे, उपवास सोडायची वेळ झाली … 

Monday, February 15, 2016

प्रेम

हृदयात प्रेम घेऊन आपण
चालत असतो प्रेमाच्या शोधात,
अजून जास्तीचा हव्यास आपल्याला
आणून सोडतो आयुष्याच्या अंतात

आपल्याला प्रेम मोजायचे असते
काळाच्या, वेळेच्या हिशोबामध्ये,
पण प्रेमाला राहायचे असतं
अविनाशी क्षणांच्या कोंदणामध्ये

केवळ घेतच राहिल्यामुळे
अडगळीच्या खोल्या भरून जातात
नंतर कधीतरी लक्षात येतं
कोठीच्या खोल्या रिकाम्याच असतात

आपल्याला आपल्या सोयीने
प्रेम करायला वेळ हवा असतो,
बंधनापलीकडच्या चौथी मितीच्या
कायम प्रेम शोधात असतो

एकाच एक सुखी रंग
आपल्याला प्रेमात हवा असतो,
 प्रेमाला मात्र आयुष्यात
रंगोत्सव फुलवायचा असतो

आपण आपल्या इच्छा आकांक्षा
घेऊन प्रेम करू पाहत असतो
आणि प्रेम मात्र
स्वतंत्र अस्तित्वासाठी झगडत असतो

खरतर आयुष्य असतो
आपल्याच हृदयापर्यंतचा प्रवास
जमला तर प्रेमाची सार्थकता
नाही तर जन्मभराची तगमग त्रास

Friday, January 29, 2016

जन्नतचे शिलेदार

शाळेला जाताना तू होतास चिडलेला
झोपेतुन उठवलेले म्हणून
स्वप्नात फिरत होतास शांततेच्या जन्नतमधे
तिथे नव्हते कोणतेही बंदुकीचे आवाज,
रात्रीची काळोखी शांतता, विमानांचे भीषण आवाज
कोणी घाबरत नव्हते कोणाला
सगळे फ़क्त हसत होते
छान गाणी म्हणत होते
नाचत होते,
बिर्यानी, खिमाच्या नदया वाहत होत्या

आणि तू मला ओरडलास स्वप्न मोडले म्हणून
मी कर्मदरिद्री स्वप्न मोडेल म्हणून कधी बघतच नाही
तुला म्हणाले झोपुन राहिलास तर स्वप्न कसे पूर्ण होईल
आणि मग तुला तयार करून पाठवले स्वप्न पूर्ण करण्याच्या
रस्त्याकडे, शाळेकडे.....

तुझी स्वप्न ,इच्छा बहुदा खुपच तीव्र होती,
स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ झालीच होती
गेलास तू साऱ्या आवाजांच्या पल्याड,
भीतीच्या नदया, रक्ताचे समुद्र ओलांडताना
घाबरला नाहीस ना,
प्रत्यक्ष्य सैतानांचेच दूत आले होते
तुला न्यायला,

तुझ्या बिर्याणीच्या, खीमाच्या नदया नक्की
मिळतील तुला फ़क्त त्या सैतानाच्या दुतांना
घेऊ देऊ नकोस तुझी स्वप्ने, तुझा अल्ला वरचा विश्वास

तुझ्या कपद्याना, पुस्तकांन्ना, खेळण्यांना, घरभर पसरलेल्या अस्तित्वाला
कवेशी धरून मी ही वाढवतीये माझा अल्ला वरचा विश्वास आणि स्वप्न बघतिये
तुला जन्नत मधे भेटायचे


Thursday, January 28, 2016

फोसिल्स




रस्त्याने जाता जाता थबकले दोन मिनिट,
चाफ्याची वेणी विकणारी ती म्हातारी अजून तिथेच होती 
अजून जास्त म्हातारी झाली होती 
पण तिचयाकडची फुले मात्र तेव्हढीच ताजी होती. 

न चुकता रोज आणायचास माझ्यासाठी वेणी तिथून,
एक वेळ आईच्या हातची पोळी फुगणार नाही, 
पण तुझा नेम कधी चुकला नाही… 

मला आवडते म्हणून तुझ्या ऑफीस शेजारची भेळ 
क्या बात हैं , आठवणीने अत्ताच पाणी  सुटले तोंडाला,
मला देता यावी म्हणून तू आणायचास आख्या घरासाठी 

चाफ्याच्या वेण्या सुकल्या, भेळ खाण्याची इच्छा संपली 
आहोत तू आणि मी आणि आठवणी पण… 
फ़ुल्यांसारख्याच आठवणी पण ताज्या राहिल्या असत्या तर!!!!!!!!!!

हृदय गीत

सरत्या संध्याकाळी काही किरणे, रेंगाळती क्षितिजावरती,
तुझी वाट पहात थांबती , काही क्षण माझ्यासोबती

लागता तुझी चाहूल, संधिप्रकाशाचे डोले झुंबर,
विनवून फुलास वारा, सांगे गालीचा अंथर

जाई जुई सायली, लावी सफेद दिवे नाजूक
महरून तुझ्या आठवाने, गंध वाटत सुटती हरेक

हृदयाच गीत माझ्या पक्षी गाती किलाबिलाटातून,
शब्द माझे ऐकून, येशील तू दुनिया विसरून

Sunday, January 24, 2016

अल्प मृत्यू

आता येणार नसतो फोन,
आता येणार नसतो एखादा आपुलकीचा मेसेज,
आता होणार नसते भेट
आता खरे तर वाटत नसते भीती, कोणीतरी कान उपटण्याची
आता आदर बाळगावा असे उरलं नसते फारसे
आता संपली असते उत्सुकता पहिल्या प्रतिक्रियेची
आता उडून गेलं असतं बालपण एका क्षणात
आता आता उरलेलं असतात शब्द
जपलेल्या आठवणी, काढलेले फोटो
असं कसं जाऊ शकतं कोणी
ही शुद्ध फसवणूक आहे, 
एक मृत्यू सोबत घेऊन जातो कित्येक जणांच्या आयुष्यातील येऊ न शकलेले कित्येक सोनेरी क्षण,
आणि कित्येकांचा नकळत झालेला अल्प मृत्यू


मासिक कथा

एकेक इमले जोडत जातात
नवी नवी स्वप्ने रचत जातात
पळे, घटिका सेकंद, मिनिट
काळाचे हिशोब सुरूच असतात
मग असे होईल, आणि आपण असे करू
मग त्यासाठी ती तयारी करू
सगळे काही घडत असते एका आपुर्तीसाठी
स्वप्नाचा ध्यास इतका मजबूत असतो
कि त्यासाठी त्याचाही अपघात घडवायचीही तयारी असते

मग कळते शक्य नाही स्वप्नपूर्ती
मग धडाधड कोसळतात सारे इमले,
उलगडून येते सारे अस्तर
फाटतात सारे विणलेले धागे
होतो कल्लोळ मूक हुंदक्यांचा
आणि वाहतो पाट रक्ताचा


स्त्राव होत राहतो निष्फलनिर्मितीचा