Friday, January 29, 2016

जन्नतचे शिलेदार

शाळेला जाताना तू होतास चिडलेला
झोपेतुन उठवलेले म्हणून
स्वप्नात फिरत होतास शांततेच्या जन्नतमधे
तिथे नव्हते कोणतेही बंदुकीचे आवाज,
रात्रीची काळोखी शांतता, विमानांचे भीषण आवाज
कोणी घाबरत नव्हते कोणाला
सगळे फ़क्त हसत होते
छान गाणी म्हणत होते
नाचत होते,
बिर्यानी, खिमाच्या नदया वाहत होत्या

आणि तू मला ओरडलास स्वप्न मोडले म्हणून
मी कर्मदरिद्री स्वप्न मोडेल म्हणून कधी बघतच नाही
तुला म्हणाले झोपुन राहिलास तर स्वप्न कसे पूर्ण होईल
आणि मग तुला तयार करून पाठवले स्वप्न पूर्ण करण्याच्या
रस्त्याकडे, शाळेकडे.....

तुझी स्वप्न ,इच्छा बहुदा खुपच तीव्र होती,
स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ झालीच होती
गेलास तू साऱ्या आवाजांच्या पल्याड,
भीतीच्या नदया, रक्ताचे समुद्र ओलांडताना
घाबरला नाहीस ना,
प्रत्यक्ष्य सैतानांचेच दूत आले होते
तुला न्यायला,

तुझ्या बिर्याणीच्या, खीमाच्या नदया नक्की
मिळतील तुला फ़क्त त्या सैतानाच्या दुतांना
घेऊ देऊ नकोस तुझी स्वप्ने, तुझा अल्ला वरचा विश्वास

तुझ्या कपद्याना, पुस्तकांन्ना, खेळण्यांना, घरभर पसरलेल्या अस्तित्वाला
कवेशी धरून मी ही वाढवतीये माझा अल्ला वरचा विश्वास आणि स्वप्न बघतिये
तुला जन्नत मधे भेटायचे


No comments:

Post a Comment