Friday, January 29, 2016

जन्नतचे शिलेदार

शाळेला जाताना तू होतास चिडलेला
झोपेतुन उठवलेले म्हणून
स्वप्नात फिरत होतास शांततेच्या जन्नतमधे
तिथे नव्हते कोणतेही बंदुकीचे आवाज,
रात्रीची काळोखी शांतता, विमानांचे भीषण आवाज
कोणी घाबरत नव्हते कोणाला
सगळे फ़क्त हसत होते
छान गाणी म्हणत होते
नाचत होते,
बिर्यानी, खिमाच्या नदया वाहत होत्या

आणि तू मला ओरडलास स्वप्न मोडले म्हणून
मी कर्मदरिद्री स्वप्न मोडेल म्हणून कधी बघतच नाही
तुला म्हणाले झोपुन राहिलास तर स्वप्न कसे पूर्ण होईल
आणि मग तुला तयार करून पाठवले स्वप्न पूर्ण करण्याच्या
रस्त्याकडे, शाळेकडे.....

तुझी स्वप्न ,इच्छा बहुदा खुपच तीव्र होती,
स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ झालीच होती
गेलास तू साऱ्या आवाजांच्या पल्याड,
भीतीच्या नदया, रक्ताचे समुद्र ओलांडताना
घाबरला नाहीस ना,
प्रत्यक्ष्य सैतानांचेच दूत आले होते
तुला न्यायला,

तुझ्या बिर्याणीच्या, खीमाच्या नदया नक्की
मिळतील तुला फ़क्त त्या सैतानाच्या दुतांना
घेऊ देऊ नकोस तुझी स्वप्ने, तुझा अल्ला वरचा विश्वास

तुझ्या कपद्याना, पुस्तकांन्ना, खेळण्यांना, घरभर पसरलेल्या अस्तित्वाला
कवेशी धरून मी ही वाढवतीये माझा अल्ला वरचा विश्वास आणि स्वप्न बघतिये
तुला जन्नत मधे भेटायचे


Thursday, January 28, 2016

फोसिल्स




रस्त्याने जाता जाता थबकले दोन मिनिट,
चाफ्याची वेणी विकणारी ती म्हातारी अजून तिथेच होती 
अजून जास्त म्हातारी झाली होती 
पण तिचयाकडची फुले मात्र तेव्हढीच ताजी होती. 

न चुकता रोज आणायचास माझ्यासाठी वेणी तिथून,
एक वेळ आईच्या हातची पोळी फुगणार नाही, 
पण तुझा नेम कधी चुकला नाही… 

मला आवडते म्हणून तुझ्या ऑफीस शेजारची भेळ 
क्या बात हैं , आठवणीने अत्ताच पाणी  सुटले तोंडाला,
मला देता यावी म्हणून तू आणायचास आख्या घरासाठी 

चाफ्याच्या वेण्या सुकल्या, भेळ खाण्याची इच्छा संपली 
आहोत तू आणि मी आणि आठवणी पण… 
फ़ुल्यांसारख्याच आठवणी पण ताज्या राहिल्या असत्या तर!!!!!!!!!!

हृदय गीत

सरत्या संध्याकाळी काही किरणे, रेंगाळती क्षितिजावरती,
तुझी वाट पहात थांबती , काही क्षण माझ्यासोबती

लागता तुझी चाहूल, संधिप्रकाशाचे डोले झुंबर,
विनवून फुलास वारा, सांगे गालीचा अंथर

जाई जुई सायली, लावी सफेद दिवे नाजूक
महरून तुझ्या आठवाने, गंध वाटत सुटती हरेक

हृदयाच गीत माझ्या पक्षी गाती किलाबिलाटातून,
शब्द माझे ऐकून, येशील तू दुनिया विसरून

Sunday, January 24, 2016

अल्प मृत्यू

आता येणार नसतो फोन,
आता येणार नसतो एखादा आपुलकीचा मेसेज,
आता होणार नसते भेट
आता खरे तर वाटत नसते भीती, कोणीतरी कान उपटण्याची
आता आदर बाळगावा असे उरलं नसते फारसे
आता संपली असते उत्सुकता पहिल्या प्रतिक्रियेची
आता उडून गेलं असतं बालपण एका क्षणात
आता आता उरलेलं असतात शब्द
जपलेल्या आठवणी, काढलेले फोटो
असं कसं जाऊ शकतं कोणी
ही शुद्ध फसवणूक आहे, 
एक मृत्यू सोबत घेऊन जातो कित्येक जणांच्या आयुष्यातील येऊ न शकलेले कित्येक सोनेरी क्षण,
आणि कित्येकांचा नकळत झालेला अल्प मृत्यू


मासिक कथा

एकेक इमले जोडत जातात
नवी नवी स्वप्ने रचत जातात
पळे, घटिका सेकंद, मिनिट
काळाचे हिशोब सुरूच असतात
मग असे होईल, आणि आपण असे करू
मग त्यासाठी ती तयारी करू
सगळे काही घडत असते एका आपुर्तीसाठी
स्वप्नाचा ध्यास इतका मजबूत असतो
कि त्यासाठी त्याचाही अपघात घडवायचीही तयारी असते

मग कळते शक्य नाही स्वप्नपूर्ती
मग धडाधड कोसळतात सारे इमले,
उलगडून येते सारे अस्तर
फाटतात सारे विणलेले धागे
होतो कल्लोळ मूक हुंदक्यांचा
आणि वाहतो पाट रक्ताचा


स्त्राव होत राहतो निष्फलनिर्मितीचा

शून्य सहचर

सकाळ सुरु होते एका अनामिक स्पर्शाने
मी सहजच बदलते कूस, आणि सरकवते
हात स्पर्शाकडे
तेव्हा लागतो एक शून्य सहचर
डोळे आपोआप उघडले जातात
शोधत राहतात
नेहमीच्या आकृती
तेव्हा दिसतो एक शून्य सहचर
हलक्या सुरु होतात रोजच्या हालचाली
जुने संदर्भ घिरट्या घालतात सभोती
नवीन आठवणी वाट पाहतात समोर यायची
तेव्हा फक्त सापडतो एक शून्य सहचर
असूनही नसूनही असते एक चाहूल
जपलेली मिठी, सांडलेली दिठी,
विखुरलेले सुखासीन श्वास

शून्यातून उभे राहिलेले आपले सहचर 

Friday, January 22, 2016

सहोदरा

तुला कशी कळते रे माझी प्रत्येक धडधड
माझ्या प्रत्येक विचार कृतीच्याही आधी


कित्येक वेळा प्रश्न पडतो मला,
आधी मी काहीतरी वागते आणि मग
तू तेच मला सांगतोस का आधी तू विचार करतोस
आणि मग मी तशीच वागते


किती सारखे असत आपले वागणे
म्हणजे अगदी एकाच साच्यातून काढल्यासारखे
साचा असेल वेगळे पण गाभा तर एकाच आहे ना


कधी कधी  माझ्याही आधी येतो तुझा विचार,
माझ्या प्र्ताय्के कृतीला असत तुझे परिमाण,
त असतोच ना माझ्या पुढे प्रत्येकवेळी


सहोदरा, माझ्या सहोदरा,
भासतोस तू मला माझ्यामधेच,
आईच्या उदरात सोडला होतास
तू तुझा एक श्वास, जगण्याचा एक क्षण, मायेचे अस्तर
माझ्यासाठीच


आईचा गर्भ अजूनही भरलेला आहे
तुझ्या अस्तित्वाने,
आणि त्याच वातावरणात वाढले मी सहोदरा
तुझ्याशिवाय पण तुझ्याच वासात, सहवासात, गंधात, बंधात


श्वासांचे ठसे

तुझ्या एका शब्दाने फुलत जातो
फुलांचा मळा
आणि मग मी हरवून जाते
आपल्या जगात


एकेका पाकळी वर आपण लिहित
असतो एकेक आठवण
आणि सोडून देत असतो
इंद्रधनुच्या पल्याडच्या
चालता येणाऱ्या सुवासिक समुद्राकडे


शब्द हरवत जातात,
तेव्हा नजरा वेध घेतात
पापण्या मिटत च नाहीत,
तुझे माझे सारे गोठुन् जाते
त्या बाहुल्यांमधे


तुझा आवाज थांबतो
आणि सुळळ करून
येतात सारे शब्द, तुझी आठवण
माझा पाठलाग करत


मी अर्धवट शब्दात हरवलेली,
पूर्ण तुझ्यात गुंतलेली,
स्वतःला सोडवून घ्यायला


परत येते तुझ्या श्वांसांचे ठसे शोधत

अमृत पोळी

आजी असते तेव्हा असते पुरणपोळी,
आणि आता असते फ़क्त आठवण
खरपुस भजलेली, तुपात भिजलेली,
तोंडात घातल्याबरोबर विरघळणारी


तिच्या तोंडून ऐकलि,
वहीत लिहून घेतली,
जशीच्या तशी करून पाहिली
अगदी चिमुटभर सुद्धा फरक नाही,


खमंग झाली, चाँगली झाली,
आवडली पण ती चव् नाही
आजी समोर उभे राहून करून पाहिले
पण ती चव मिळाली नाही


सायीचे हसत,मेतकुटाच्या हातानि
तिने पाठीवर हात ठेवला
आणि म्हणाली बयो सोप्प आहे ग सगळे
फ़क्त त्यासाठी सोसाव्या लागतात
स्त्रीजात खुणावा , सुनेच्या कळा,
लेकिच्या वेणा
सगळे डाग, चटके, पडले हातावर
की आपोआप येते चव हाताला,
झाले मनावर आघात की
होते उतरते गोडी हातात


स्वतःला विसरून जगण्याची होते सवय
आणि मग जमत जातात एकेक पदार्थ


तोवर तोंडातल्या पुरणपोलीचे अमृत
उतरले असते जिव्हांग्रंवर
लागली असते समाधि
विरुन गेलेले असतात आजीचे शब्द,


मिळून जाईल तिला मोक्ष,
सफल होईल तिची तपश्चर्या
आणि मी करत राहीन तिच्यासारखी साधना
भाजत राहीन पोळ्या चव येईपर्यंत
जळत राहीन स्वाद येइपर्यंत,
स्त्रैत्वाच्या खुणा जमवत राहीन
कध्धितरि नातीला अमृतपोळी खायला घालेपर्यंत

अनंताच्या पलीकडे

तू असा समोर असतोस,
एक टक बघत असतोस,
शोधत असतोस दिसतय का कुठे
आपले जग,


मग तुला घेऊन मी बुडी मारते
माझ्याच डोळ्यात


आणि मग 17 जन्म,
15 युगे लोटून आपण
जातो एका वेगळ्याच जाग्गात


तिथे सुरर्कन मासे आणून देतात मोती,
तुझे माझे नाव असलेले,
आणि झाडे आपल्या मागे येतात सावली धरून


तुझी मिठी कधी सैल पडायचीच नाही,
तुझे ओठ कधी ओठातून निसटायचेच नाहीत,


जगण्यासाठी पुरेसे होते एकमेकांचे श्वास,
स्वर्गाचे होते तिथे आभास,


तिथे थांबत होता काळ,
सरकतच नव्हती वेळ


सावल्याना तिथे जागा मिळत नव्हती म्हणून
त्या ही घुटमळत होत्या आपल्याच डोळ्यात
निळ्या पाण्याच्या काठावर्
सोनेरी रेतीवर थांबला होता सूर्य
मावळतीच्या वळणा वर
आणि चंद्र डोकावत होता पापणीच्या
टोकावर


किती काळ होतो तिथे तुलाच ठाऊक
लवली कोणाची तरी पापणी
आणि बुडले जग आपले


जेव्हा परत सापड़तील आपल्या
सावल्याना त्यांचे रंग तेव्हा परत
मिळेल आपल्याला आपले जग