Wednesday, July 4, 2018

वळणाचे पाणी


सहावी अ च्या वर्गातल्या चिमण्या नुसत्या चिव चिव करत होत्या. हा वर्ग आख्ख्या शाळेत बडबडा म्हणून प्रसिद्ध होता. हर प्रकारे या वर्गाला समजावून, धमकावून, शिक्षा देऊन झाले होते. पण तरीही चिवचिवाट मस्ती काही कमी व्हायची नाही. त्यामुळे सगळे जुने अनुभवी शिक्षक त्यांचा अनुभव पणाला लावून हा वर्ग सांभाळायचे. अति हुशार मुलांचे पाणी जरा नीट वळवायची गरज होती.  

वर्गात कोणी शिक्षक यायला दोन मिनिटांचा उशीर झाला की संपले या चिमण्या आणि चिमणे बडबड करायला लागलेच म्हणून समजायचे.
‘अग आपल्या मराठीच्या पाटील बाई आता येणार नाहीत.’
‘त्यांना बाळ होणार आहे ना? मला माझ्या ताईने सांगितले’
‘मग आता आपल्याला मराठी कोण शिकवणार? काळे सर? नको बाबा. ते शिकवतात कमी ओरडतात जास्त.’
‘नाही नाही एक नवीन बाई येणार आहेत.  एकदम छान आहेत दिसायला, डिट्टो माधुरी, केस पण तसेच कुरळे आहेत. ‘
‘तुला कसे हे सगळे कळते ग?’
‘अग मी काल स्टाफ रूम मध्ये गेले होते तर तीच चर्चा चालली होती आपल्या बाकीच्या बाईमध्ये म्हणून मला कळले.’
एक चिमण्यांचा थवा त्यांच्या आकाशात विहरत होता.
‘अरे तू कालची मॅच पाहिलीस ना? अजय जाडेजा काय भारी खेळला ना?’
‘छोड रे चुकून काल चांगला खेळला तो, माझा दादा म्हणतो तो वशिल्याचे तट्टू आहे, पण म्हणजे काय ते मला कळलेच नाही.’
‘कोणी आले नाहीये वर्गावर तोवर चल विमान करू, कोणाचे लांब जाते बघू?’
‘ज्याचे लांब त्याला एक पेप्सीकोला मधल्या सुट्टीत.’
‘चालेल.’
चिमणेसुध्दा चिवचिवाट मागे नव्हते.
ठप ठप एकदम वर्गात डस्टर मारायचा आवाज आला.
जेमतेम २२, २३च्या आसपास असलेल वय,  उंच, कुरळ्या केसांची, साडी नव्हे तर चक्क पंजाबी ड्रेस घातलेली एक बाई वर्गावर येऊन थांबलेली होती, एक हलका मंद वास सुद्धा होता त्यांच्या येण्याबरोबर वर्गात पसरला होता.  

सगळा वर्ग एकदम फळ्याकडे बघायला लागला होता. त्याचबरोबर त्यांच्या टेबलवर त्यांचे स्वागत करणारे एक विमान पण.
‘मी उर्मिला तुमची नवीन मराठी टीचर. आणि हो मला हे विमान आवडले, ज्या कोणी केले आहे तो मला प्लीज शिकवेल का हे कसे करायचे’
तोवर शाळेत फक्त बाई आणि सर म्हणायचे असते, फार तर फार शिक्षक असे संबोधन होते, आणि यांनी आल्या आल्याच टीचर सांगितले. मस्ती करणाऱ्या मुलाला शिक्षा वगैरे सोडून विनंती हे पाणीच वेगळे होते.  

रंग गव्हाळ आणि गोराचा मधला होता, केस खरेच माधुरीसारखे कुरळे होते, डोळे अगदी मोठ्ठे पाणीदार होते, की काजळ लावून मोठे केले होते कोणास ठाऊक. हिरवा कुर्ता आणि गुलाबी रंगाची सलवार आणि ओढणी घेतली होती. ओढणी छान पिन अप केलेली होती. हसताना एका गालावर खळी पडायची. शाळेत तोवर सुंदर दिसणाऱ्या शिक्षिका नव्हत्या असे नाही पण त्या सगळ्या साडीमध्ये येणाऱ्या आई काकू टाईप वाटायच्या, या टीचर मात्र मोठी ताई असल्यासारख्या वाटल्या.  आवाज सुध्दा अगदी नाजूक पण गरजेच्या वेळी जोरात व्हायचा.
‘अय्या किती छान आहेत ना या बाई दिसायला.’
चिमण्यांची कुजबुज सुरु झाली.
‘अरे ही माधुरी दीक्षित तर चिडलीच नाही, उलट मला विमान शिकवा म्हणाली, आता काय करायचे.’
चिमणे काही मागे नव्हते.
बाईंनी कुठलीशी कविता शिकवायला सुरुवात केली, त्यांच्या आवाजात चालीवर म्हणताना वर्गातला प्रत्येक जण अगदी गुंगून गेला होता.  या आधी कोणी अशी चाळीत कविता शिकवली नव्हती असे नाही पण वयाचा, आवाजाचा की आणखीन कशाचा माहीत नाही पण वर्ग पूर्णपणे त्या नव्या शिक्षिकेला शरण गेला होता एवढे नक्की. धडे म्हणजे गोष्टीच असतात फक्त ते गोष्टी सारखे वाचून दाखवावे लागतात. आपली भाषा आपल्या ओळखीची असते पण त्यातले साहित्य नाही ही गोष्ट नव्याने समोर येत होती.

मराठी शिकवणाऱ्या या मॅमला चक्क इतिहास शिकवायला सुध्दा सांगीतले, आणि मुले खुश झाली या अजून एका विषयाला येणार म्हणून आणि बाकीचे शिक्षक आता यांचा इतिहास कसा करतात मुले बघू म्हणून खुश. पण इतिहास हा काही फक्त सन सनावळ्यामध्ये नसतो तो घटनांमध्ये असतो हेच त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि अनेकांचा इतिहास आवडता विषय झाला.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विश्वास, आदर याशिवाय मैत्रीचे ही नाते तयार होत होते. त्यांच्याशी गट्टी होऊन एका चिमणीने तर त्यांना चक्क तिची स्लॅम बुकच भरायला दिली त्यांना. त्यांनी पण तिचा मान राखत त्यातल्या बोबड्या बालिश प्रश्नांची उत्तरे दिली. मराठी हा विषय इतका रंजक असू शकतो हे सगळेच जण नव्याने शिकत होते. उर्मिला मॅम हो, त्यांना बाई म्हणून कसे चालेल, त्या मॉडर्न मॅम होत्या, शाळेत पंजाबी ड्रेस , गॉगल लावून येणाऱ्या सेंट मारून येणाऱ्या मॅम.

एक धरणग्रस्तांची कविता शिकवता शिकवता त्या त्यात इतक्या गुंगून गेल्या की वर्गातल्या सगळ्यांचे डोळे पाणावले. आजवर धरण म्हणजे मजा वाटणाऱ्या सगळ्यांना धरणाची खोली, त्याचे पायाचे दगड बोचले होते. अशाच एका फ्री पिरेडला त्यांनी त्यांची कविता म्हणून दाखवली आणि वर्गातल्या एका चिमणीने जाऊन त्यांना थेट विचारले, ,’ कविता कशी करतात?’
त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले, ‘ मनात जे येतं ते कागदावर उतरवायचं,  कधी शब्द जुळून येतात तर कधी भावना व्यक्त होतात. लिहायची उर्मी सच्ची असेल तर त्याची कविता, कथा नक्कीच होते. आणि हो महत्वाचे म्हणजे स्वतःसाठी लिहायचं. शब्द म्हणजे दुसरे तिसरे काही नसतात आपलेच सखे सोबती असतात, त्यांच्याबरोबर बोलायला , खेळायला ,भांडायला यायले लागले की बास.’
ज्या शिक्षिकेच्या जागी त्या आल्या होत्या त्या शिक्षिका परत आल्या. शाळेत तात्पुरते आलेलं हे वादळ पण गेलं. पण जाताना काही चांगल्या आठवणी ठेवून गेलं.

नुसते एक अडलेलं पाणी त्यांनी वाहते केले होते असे नाही तर  ४०, ४५ जणांची एक तुकडी त्यांनी वळणावर आणून ठेवली होती. मुला मुलींच्या कोणत्याही प्रश्नांना नाही, नको चा पाढा न लावता त्यांनी उत्तरे दिली होती. शिक्षक कसे शिकवतात, किती वर्ष शिकवतात, यापेक्षा काय शिकवतात हे नेहेमीच लक्षात राहते. तो वर्ग, ती चिमणी त्या वळणावरून इतके पुढे गेले, की मागचे सारेंच धूसर झाले. आठवणी राहिल्या पण त्याही धुक्यात विरलेल्या. कदाचित ती चिमणी मीच असेन किंवा नसेन, कदाचित माझ्याच आयुष्यात असेच काही घडल असेल किंवा नसेलही. पण लिहायची उर्मी सच्ची असेल तर त्याचे साहित्य होते एवढे मात्र नक्की. 
  
मानसी होळेहोन्नुर

Wednesday, June 27, 2018

ती आणि त्या #६


ती 

पायाखालची जमीन हादरणे  म्हणजे काय हे मला आज जाणवले. सकाळी तर सगळे काही नीट होते, आणि आता येताना लक्ष्मी भेटली आणि म्हणाली मी उद्यापासून कामाला  येणार नाही . आता एकदम काय झाले, विचारल्यावर म्हणाली तुमच्या सासुबाईंनाच विचारा. जरा तिची मनधरणी केली, अजून दोनच आठवडे कळ  काढ मग त्या जाणार आहेत परत सांगितले तर ही  मला  म्हणते ताई मग त्यागेल्यावरच मला बोलवा ,त्या असताना मला जमणार नाही . कटकटच जास्त त्यांची. भांड्यात साबणच राहिला, दाराच्या मागची जाळी साफ केली नाहीस, फरशी वरचा  डागच  गेला नाही. एक ना दोन. बरं  हे सगळं  मी ऐकून घेतलं  असते पण आज तर त्यांनी कहरच  केला, मी किती घरी जाते,किती कमावते, मग माझे जेवण नाश्ता बाहेरच होतो, कपडे सुद्धा कामवाल्या बायकाच देतात, मुलांचे कपडे सुद्धा तसेच मिळतात, स्वतःचे घर आहे म्हणजे भाडे सुद्धा नाही मग मला खर्च काय, सगळे तर सेविंग  होत असणार म्हणायला लागल्यावर माझे डोकेच सटकले. ह्यांचा काय संबंध मी कुठे खाते, कोण मला कपडे देते नाःई देत. मी काय खर्च करते काय करत नाही. ताई मला लावालाव्या करायला आवडत नाहीत, पण आता निघालेच आहे तर सांगते, दरवेळी ती म्हातारी माझ्या भुणभुण करते, पण मी आपली कानामागे टाकायचे,जाऊ दे दोन दिवस तर राहतील म्हणून. पण आतापासून नाही म्हणजे नाही. आणि हो तुम्ही नसताना अन्वीला  टायटीव्ही बघू देतात, चॉकलेट देतात, परत फोनवर कोणाकडे तरी तुमच्याच बद्दल बोलत असतात.मी तर म्हणते तुम्ही त्यांना आज रात्रीच त्यांच्या गावाला पाठवून द्या. महा भांडकुदळ, कजाग आहे ती महामाया. गेले कित्येक दिवस मला जी भीती ती शेवटी खरी ठरली. नोकरी करायची, मुलांचा अभयस घ्यायचा, घर, बाजार हाट करायची आणि घरात सुद्धा काम करायचे, तिला आगद गळून गेल्यासारखे झाले. लक्ष्मी कशी आहे, कसे कामा करते सगळे तिला माहीत होते, पण ती कधीही खाडा करत नाही, पैशावर नजर ठेवत नाही, प्रामाणिक आहे एवढ्या दोन गोष्टींवर मी तिला तीन वर्ष टिकवून ठेवली होती, आणि या माझ्या सासूने तिला तीन दिवसात पळवून लावली. त्या येणार दोन दिवस तेव्हा करतील थोडी फार मदत पण मग बाकीचे दिवस कोण करणार आहे सगळे? त्यांच्या पोराने एक दिवस कपडे वाळत घातले तर त्यांच्या आख्या गावात बातमी होते, मग स्वतः इथे राहणार नाहीत, पोराला काम करू देणार नाहीत मग कामवाली ठेवली तर यांना काय प्रॉब्लेम आहे? ती जशी आहे तशी मी सांभाळून घेत होते ना. कळत नाही की कळून मुद्दाम तशा वागतात देवच जाणे. आता मी घरी जाऊन चीड चीड केली तर मला ऐकवतील त्यांचा टेंभा कसे त्यांनी सगळे केले, यावेळी मी म्हणणार आहे, मला नाही बाई जमत, तुम्हीच राहता का इथे आणि करता का सगळी मदत म्हणजे लक्ष्मी नको की दुसरे कोणी नको, राहता का कशाला, रहाच इथे, म्हणजे तुमच्या लेकाला पण रोज जरा बरे आईच्या हातचे जेवण मिळेल.



त्या

बाई बाई काय आळशी आहे ही आमची सून. घरात वरकामाला बाई, पोरीला शाळेतून आणायला बस. नोकरी करते पण ते ही जवळच्या शाळेतच आहे, खूप काही करीअरिस्ट  आहे असेही नाही, महिन्याला कमावते त्यातले निम्मे कामवाल्या बाईवर उडवत असणार. बर पैसे देते तर मग जरा काम नीट तरी करून घ्यायचे ना? दर वेळी आले की मी बघते ही लक्ष्मी सगळे काम हातचे राखून करते. बर रोज नाश्ता आमच्या घरीच करते, मग पुढच्या घरी जाऊन जेवते, बऱ्याचदा कोणी ना कोणी तरी काहीतरी उरलेले तिला देतातच घरी घेऊन जायला. तिच्या मुलांना जुने कपडे देतात, खेळणी देतात. आमच्या सून बाई तर दरवर्षी तिच्या पोरांना शाळेची पुस्तके घेऊन देतात. आता एवढे करतात तर मग त्या बाईकडून एखादे काम जास्तीचे करून घेतलं तर काय हरकत आहे? तिच्याकडून काम नीट करून घेतलं तर काय बिघडलं. रोज एखाद्या तरी ग्लासात साबण तसाच असतो, मग काय मी सगळे नीट बघून तिच्याकडून परत विसळून घेते. आपण पैसे मोजतो मग काम पण चोख करून घेतले पाहिजे.  या बायकांना अधून मधून ओरडावंच लागते, नाहीतर त्या डोक्यावर चढून बसतात. आता मी आपले सहज चौकशी करण्यासाठी म्हणून लक्ष्मीला विचारले बाई तुला पगार किती, काय काय कमावते, कुठे सेव्हिंग वगैरे आहेत की नाहीत. तर भडकलीच माझ्यावर मग मी काय ऐकून घेईन हो तिला, मी पण म्हणले जा, तुझ्यासारख्या दहा जणी मिळतील.
आता मी नोकरी नव्हती केली पण चार पोरे, सासू सासरे, येणारे जाणारे सांभाळलेच ना. तेव्हा कुठे होते बाई. सासूबाई गेल्यावर सासरे ५ वर्ष गादीवर होते तेव्हा त्यांचे सुद्धा सगळे केले. अगदी शी शू काढण्यापासून सगळे. आणि तरीही माझे घर स्वच्छ लख्ख असायचे. कधी विकतचे काही आणायचो नाही. आणि आता हिला एक पोरगी आणि नोकरी घर अशी सर्कस करता येत नाही. बिच्चारा माझा पोरगा करतो कधी कधी मदत तेव्हा मलाच वाईट वाटते, घरी साधा चहाचा कप उचलायचा नाही आणि आता भांडी काय विसळतो, कपडे काय वाळत घालतो. पुरुषांनी अशी कामे केलेली मला नाही आवडत बाई. हा काय याच्या छोट्या भावाला, वडिलांना पण मी कधी त्यांचे ताट उचलू दिले नाही. मी केले तर मग हिला का जमत नाही?
आता घरी आल्यावर ही आरडओरडा करेलच, तेव्हा मी सरळ म्हणेन, तुमचे घर आहे काय करायचे ते करा, मी जाते बाई माझ्या घरी.   
©मानसी होळेहोन्नुर


Wednesday, June 20, 2018

शेजारच्या काकू


गोष्ट तशी जुनीच, पण काही जुन्या गोष्टी इतक्या आत जाऊन बसलेल्या असतात, की आपण विसरूनच जातो त्यांच्याबद्दल, पण त्या गोष्टी आपल्याला  विसरत नाहीत. मग एकदम कधीतरी काही तरी घडतं आणि त्या गोष्टींची आठवण उफाळून येते. असंच काहीसं झालं परवा, कोणीतरी त्यांच्या बागेतल्या पेरूची आठवण काढली आणि मला आठवलं आमचं शेजारचं घर. एक सोडून पाच पाच पेरूची झाडं, आठ दहा वेगवेगळे गुलाब असलेलं. शेवगा, सीताफळाचं झाडही होतंच, येत जाता लावलेल्या, आपोआप उगवलेली, झेंडू, शेवंती, तगरीची झाडं पण होती. खूप खूप वर्ष झाली, त्यामुळे झाडं सुद्धा धूसर आठवताहेत, पण शेजारच्या काकू मात्र आजही तशाच समोर उभ्या राहतात.

फ्लॅट मधून नुकतेच आम्ही राहायला आलो होतो आमच्या बंगल्यात. जिना नाही, मागे पुढे पळायला मोठ्ठी जागा, कुंडीत नाही तर आपण थेट जमिनीत झाडं लावू शकतो अशा अनेक गोष्टींचा आनंद होता. त्यात हे शेजारचं मस्त झाडांनी डवरलेलं घर बघून तर अजूनच वाटायचं आपला पण असा बगीचा पाहिजे. मग हळू हळू ओळखी होत गेल्या, आणि त्या काकूंना नाव पडलं शेजारच्या काकू. सुरुवातीच्या दिवसात पाण्याची माहिती देणं, आजू बाजूच्या लोकांची ओळख करून देणं, ही सगळी शेजार धर्माची कर्तव्य त्यांनी प्रेमाने पार पाडली होती. मुळात २०, २५ वर्षांपूर्वी त्या भागात जास्त घरही नव्हती आणि माणुसकी सुद्धा आत्ताच्या पेक्षा कैक जास्त प्रमाणात होती. बहुदा घरांची संख्या वाढल्यावर माणुसकी शेजारधर्म कमी होत जातो.

आज इतक्या वर्षानंतरही मला काकूंचं नाव आठवत नाही पण चेहरा असा समोर उभा राहतो. कपाळावर असलेलं गोंदण, हातात २, ४ काचेच्या बांगड्या, सिंथेटिकच्या साडीचा एक कमरेला खोचलेला. अर्धवट कुरळ्या केसांचा मागे बांधलेला बुचडा. सतत कामात, कुठेतरी जायच्या घाईत असणाऱ्या काकूंच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालेलं मी कधी पाहिलं नाही, म्हणजे ते घर सोडून जाताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं ते प्रसन्न हसू तसचं होतं. आपल्या मुलांचं जन्म बालपण जिथे पाहिलं ते घर सोडताना सुद्धा त्या तेवढ्याच तटस्थ होत्या. संसाराला हातभार म्हणून त्या घरगुती शिकवण्या घ्यायच्या. पण त्यात पैसे कमवण्यापेक्षा, वेळेचा उपयोग करून घेणं,  अडल्या नडल्याला मदत करणं हा हेतू जास्त होता. दर वर्षी वारीला जाणाऱ्या लोकांना फळं , फराळाचं द्यायला काकू नेहेमी पुढं असायच्या.

मला त्यांच्या घरच्या भाज्या आवडायच्या म्हणून खास काही केलं की एक वाटी हमखास आमच्या कडे यायची. कधी तरी सणासुदीला, दारावरच्या जाईचा गजरा गुंफून द्यायच्या. कधी खूप गुलाबाची फुलं आली म्हणून आणून द्यायच्या. पेरू तर न मागता मिळायचेच. हा सगळा व्यापार चालायचा आमच्या तारेच्या कुंपणामधून. आम्ही आमचं घर त्यांच्या भरवशावर सोडून किती तरी वेळा बाहेरगावी जायचो. मी लक्ष देईन तुमच्याकडे तुमच्या घराकडे म्हणणारी माणसं दुर्मिळ झालीत एवढं मात्र खरं.

आज इतक्या वर्षानंतरही खूप काही बदलूनही काकू, त्यांचं घर, ती बाग डोळ्यासमोरून जात नाही. आता तिथे आलेले नवे शेजारी, त्यांचा सुरेख बंगला , शेजारपण सगळं चांगलं असूनसुद्धा जुन्या आठवणी पुसल्या जात नाहीत एवढ मात्र खरं. काकूंच्या करण्यात, देण्यात घेण्यात कोणताच कधी स्वार्थ नव्हता. सहजभाव होता. आता जेव्हा प्रत्येकाचं जगणं वागणं घड्याळ हेतूशी जुळलेलं असतं तेव्हा हे असे निर्भेळ क्षण देणारे लोकं आठवण करून देत रहातात आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदी क्षणांची. शेवटी काय या क्षणांनीच आयुष्य सुंदर होत असतं ना ?
 © मानसी होळेहोन्नुर

Tuesday, June 12, 2018

ती आणि त्या ५



ती

कोणताही सण  आला की  मला आनंद व्हायच्या ऐवजी टेन्शनच  येते. माझी उगाच चिडचिड व्हायला सुरु होते. नवरोबा तर काय मोठं  झालेलं बाळ आहे. रोज रोज नाही ना राहावे लागत मग एखादा दिवस कर कि सहन आईला हे त्याचे नेहेमीचे वाक्यतो दर वेळी न चुकता माझ्या तोंडावर मारतो. त्यामागे तुझ्यासाठी , तुझ्यामुळे आपण वेगळे राहतो ना मग एवढं ऍडजस्ट  केलं तर काय फरक पडेल असे न बोललेलं वाक्य देखील असत. लग्नानंतर वर्ष दोन वर्षातच मला लक्षात आलं  मी नाही  जुळवून घेऊ शकत यांच्यासोबत, नशिबाने नोकरी पण मिळाली आणि आम्हाला दोघांना घरापासून ऑफिस लांब पडायला लागले त्यात परत अभि लहान होता, मग आम्ही सरळ ऑफिसजवळ घर घ्यायचा निर्णय घेतला, गुंतवणूकही  झाली आणि आमची आम्हाला प्रायव्हसी पण मिळाली. येण्याजाण्यातला वेळ वाचायला लागला. तसेही ते  घर आम्हाला लहान पडायला लागले होते, म्हणजे घरात सामान जास्त आणि हलायला जागा कमी, त्यामुळे काहीही नवीन आणताना शंभरवेळा विचार करावा लागायचा. नशिबाने नवऱ्यालाही  ते जाणवले, तसेही त्याच सुमाराला त्याची बहीण पण वेगळी राहायला लागली होती, त्यामुळे सासूबाई फारसे काही बोलू शकल्या नाही, पण आम्ही घर घेतल्यापासून तिथे राहायला जाईपर्यंत रोज एकदा तरी पाणी डोळ्यात आणायच्याच. त्याच वेळी बोली झाली होती  सणाला मात्र आपल्या याच घरी यायचं. 

 दर वेळी सण  आला की  आम्ही निघालो हेड क्वार्टरला. गेल्या १५ वर्षात त्यात काही बदल झाला नाहीपण आता अभि पण मोठा झालाय त्याला त्याचे क्लासेस, मित्र असतात तो कुरकुरतो यायला. मलाही तिथे काही करायचे म्हणले की ऊर धपापतो आणि केलं नाही तर नवऱ्याची बोचरी नजर डाचते. त्यांच्या घरात त्यांच्या पद्धतीने करताना थोडे पुढे मागे झाले की इतकं ऐकावं लागत की त्यापेक्षा ते करणेच नको वाटते. यावेळी मात्र मी धीर धरून म्हणणार आहे आता आता तुमच्याने होत नाही आपण काही सण आमच्याकडे करत जाऊयात.


त्या

मी मुद्दाम सून जरा आमच्यापेक्षा खालच्या परिस्थितीतली करून घेतली होती, म्हणजे कसे तिला शिस्तीत ठेवता आले असते, पण ही थोडी नाही चांगलीच हुशार निघाली. नोकरी करायची त्यामुळे की काय पण न बोलून शहाणी होती. दोन वर्ष काय ती राहिली सोबत आणि नंतर पोराचे, नोकरीचे कारण काढून वेगळे झाले. माझा पोरगा बिचारा तिच्या या असल्या कारणांपुढे काहीच बोलू शकला नाही. दिसायला सुंदर असली म्हणून काय झाले, घराचे काम मी होते म्हणून नीट व्हायचे नाहीतर हिला कुठे जमते काही. हिचा स्वैपाक म्हणजे वरण केलं पातळ झाले, पोळ्या केल्या करपून गेल्या. आता थोडे फार करते नीट पण वाया फार घालवते. काटकसर अशी माहितीच नाही, तरी बर माहेरी तेच करावे लागायचे.

प्रत्येक वेळी माझ्या लेकीची बरोबरी करायला जाते ही. तिने काही केलं त्याचे मी कौतुक करून काही बोलले की झालेच या बाईसाहेब तसेच काहीतरी करून दाखवणार. माझ्या लेकीला बिचारीला सासू सासरे, दीर जाऊ सगळ्यांचे करावे लागायचे म्हणून ती वेगळी झाली, लगेच चार महिन्यात ही पण पडली की बाहेर. तरी बर मी हिंडती फिरती आहे म्हणून पूर्वी ही कामे करायचे आणि आताही करते. त्यामुळेच वेगळे होताना पण मी माझी लेकाला सांगितले काहीही झाले तरी सण सगळे आपल्या याच घरी करायचे. म्हणजे तरी ते इकडे येत जात राहतील आणि माझ्या मुलाला नातवाला किमान सणाच्या दिवशी तरी चांगले खायला मिळेल.

पण आता नातवाला काय पढवून ठेवलंय माहित नाही, इकडे यायलाच तयार नसतो, आला तरी निघायची घाई करतो. आता या वेळी मी निक्षून सांगणार आहे आम्ही असे पर्यंत तरी करा की सण इकडेच मी गेल्यावर करायचेच आहे सगळे सण , कुळधर्म तुमच्याच घरी. माझा लेक समजून घेईल आणि पोरालाही समजावेल. त्या निमित्ताने हे घर भरून जाते, आम्हाला जगल्यासारख वाटत. या घरात जरा तरी गप्पा गाणी होतात, नाहीतर या घरात फक्त टीव्ही बोलतो. दोघांच्यासाठी पथ्याचे करताना जिभेचे चोचले पुरवणारे काही करायला इच्छाच होत नाही. तसे आजू बाजूचे येऊन जाऊन असतात, लेक येते पण मुलाचे त्याच्या मुलाचे लाड पुरवणे ह्यात वेगळेच सुख असते. ते सुख माझ्या सुनेला बहुतेक तिची सून आल्यावरच कळेल.
©मानसी होळेहोन्नुर  



Wednesday, May 30, 2018

ती आणि त्या ४


ती

भारतात जायचं म्हणलं की एका डोळ्यास आसू आणि एका डोळ्यात हासूच असतं. मुळात जायला मिळणार जेमतेम तीन, चार आठवड्यांसाठी, तिथे जाऊनही काम करायचं ठरवलं तर अजून एक ८, १० दिवस जास्त घालवता येतील. त्यात सासर, माहेर, बँका, डॉक्टर, खरेदी, मित्र मैत्रिणी, नवीन नवीन हॉटेल्स, एखादी दुसरी लग्न कार्ये, घराची, किंवा तत्सम इन्व्हेस्टमेंट, मग त्याची धावपळ, एखादे गेट टुगेदर कम पूजा किती काय काय करायचं असत आणि ते ही अगदी कमी वेळात. परत एवढ सगळं होता होता एखादे आजारपण मग ते आमचं असो वा मुलांचे निघाले नाही म्हणजे मिळवली. दर वेळी आल्यावर गोष्टी राहतातच करायच्या. पुढच्या वेळी करू म्हणून ठरवते पण होतच नाही. तिथेही मीच करायचं, आणि इथे आल्यावरही मीच करायचं.
मुळात बुकिंग करतानाच मी सासरी किती राहायचं आणि माहेरी किती याचे सगळेच जण गणित मांडत असतात.  सासरी पोरांना नाही आवडत ते आजारी पडतात, आजी आजोबा सारखे हे करू नका ते करू नका म्हणतात. मग ते कंटाळतात  म्हणून मी आईकडे गेले की सासूबाई बसणार तोंड फुगवून. लग्नाला आता बारा वर्ष झाली आणि आम्हाला अमेरिकेला जाऊन दहा वर्ष. या दहा वर्षात ही आमची आठवी खेप पण गेल्या सात खेपांप्रमाणे यावेळी सुद्धा नेहेमीचे नाट्य घडणार, मला अपराधी वाटणार आणि अमेरिकेत आल्यावर काही दिवस अम्या आणि माझी चिडचिड भांडणं होणार. मग तो सासू बाई, सासऱ्यांना अमेरिकेत बोलावून घेणार, चार सहा महिने महिने ते आमचा चांगला पाहुणचार घेणार. अम्याला सगळं कळत पण आई बाबांना सांगता येत नाही. दादा वहिनी एकाच गावात वेगळं घर घेऊन राहतात ते चालत पण आम्ही लांब राहतो म्हणजे कर्तव्यात आम्हीच चुकतो. मग ती भरपाई करायला नको का?
पण मग कर्तव्य फक्त मुलाचे, सुनेचच असते का? मुलीचे नसते का? माझा भाऊ पण बाहेर असतो. आई बाबा दोघेच असतात भारतात. मी भारतात आलेल्या दिवसांचा हिशोब ठेवून मी चार दिवस माहेरी जास्त राहिले यावरून आमच्याकडे शीतयुद्ध असते. पण मला माहेरी राहण्याचा हक्क नाही का? माझ्या आईवडिलांना त्यांच्या मुलीबरोबर नातवंडांबरोबर रहावस वाटत नसेल का? या दहा वर्षात ते दोनदाच येऊन गेलेत. त्यातलं एकदा सान्वी च्या बाळंतपणात आणि दुसऱ्यांदा मी माझ्या नोकरीतल्या पैशांनी त्यांना बोलावून घेतलं होतं तेव्हा. आई बाबांची आत्ता आत्ता पर्यंत नोकरी होती, त्यामानाने सासूबाई सासरे रिकामेच होते, त्यामुळे ते नेहेमीच येऊन जाऊन असायचे, तरीही मुलांना त्यांची ओढ नाही लागली. आता यावेळी मी ठरवलं आहे, एक आठवडा काय ती मुलांबरोबर सासरी राहणार आहे, आणि उरलेले दिवस आईकडे. सतत जगाची आणि आमची तुलना, पण मी मात्र त्यांची तुलना साधी माझ्या आईशी पण करायची नाही.   
त्या काही बोलल्या तरी मी उलटून बोलणार नाही, पण मला जे करायचं आहे ते मात्र करणार आहे. झाले आता वनवासाचे एक तप. आणि यावेळी जातानाच आई बाबांना सोबत घेऊन जाणार आहे. वाघ म्हणल तरी खातो, वाघोबा म्हणल तरी खातोच ना मग वाघच म्हणते.

त्या
आता येणार हे काही दिवसांचे पाहुणे. घर आता यांच्या कलाने चालणार किमान काही दिवस तरी. सून बाई तर अगदी आल्या दिवसापासून दिवसच काय तास मोजत असते कधी एकदा माहेरी राहायला जाईन याचे. इथे राहत असले तरी निम्मे दिवस हे जातात बाहेरच खायला प्यायला. मुळात आल्यावर चार दिवस तर हे अर्धवटरावच असतात, जेट लॅग झालेले असतात, रात्र सकाळ कळतच नाही. मग यांचे डॉक्टर , बँका अशी सगळी काम इथे असतानाच आठवतात. यांच्या खाण्याच्या तऱ्हा वेगळ्या, आवडी वेगळ्या. एखाद दिवशी आवडीने पोहे खातील, की दुसऱ्या दिवशी नेहेमीचे फ्लेक्स पाहिजे नाहीतर बाहेर जाऊन खातील. आम्हा दोघांना सोसत नाही ते सारखे सारखे बाहेरचे खाणे. पण बोललं की परत तिकडे मीच करते, मलाही जरा आराम हवा असतो म्हणून सांगायला बाईसाहेब मोकळ्या.
आम्ही अमेरिकेत गेल्यावर सुद्धा नातवंडांना काही बोलू शकत नाही , कारण त्यांचे जागाच वेगळं असतं. आता तर काय भाषा पण वेगळी झाली. आणि इथे आले तर बोलायची सोयच नसते कारण त्यांच्या आईला आवडत नाही. आमच्या पोरं नव्हती बाई यांच्यासारखी नाजूक, हट्टी. जरा हवा पाणी बदललं की पडले आजारी. आमचं म्हणजे पडो झाडो माल वाढो. म्हणून तर अमित एवढा अमेरिकेत सुद्धा कधी म्हणून आजारी पडत नाही. आलोक सुध्दा सारखा फिरत असतो पण आजारी म्हणून नाही पडत. त्याला त्याच्या बायकोला लांब पडत म्हणून त्यांनी दुसरे घर केलं. पण तरीही रोज फोन तरी करतात, १०, १५ दिवसातून एकदा चक्कर मारतात. त्यांची लेक सुध्दा सहज येऊन राहते कधी मधी. पण तिचे नखरे नसतात, आम्ही जे खातो तेच खाते, पण हे अमेरीकेवाले मात्र वेगळेच. तिखटच आहे, कांदाच आहे, हे च नाही म्हणत जवळपास प्रत्येक गोष्टीला नाकं मुरडतात.  तिचे आई बाबा करतील ती प्रत्येक गोष्ट चांगली. मुलांना जरा काही नाही नको म्हणल तर झालं, बाईंच्या चेहऱ्यावर आठ्या. मग दोन दिवसात पाय आपटत जाणार माहेरी, ती थेट उगवणार जायच्या दिवशी. अध्ये मध्ये काही कार्य पूजा असली तर पाहुण्यांसारखी येऊन जाणार. मग तिकडे जाऊन गरज लागली कि आम्हाला बोलावणार. मग काय मुलं सांभाळायला आम्ही आहोतच की घरचेच कामगार. दहा वर्ष केलं सगळ आता नाही होत बाई. ही मुलं काय बोलतात ते ही नाही कळत आता. यावेळी अमितला स्पष्ट सांगणार आहे, आम्ही आता म्हातारे झालो, आता नाही जमणार तुझ्याकडे यायला.
यांच्या मदतीला जात होतो, यांच्या प्रत्येक गोष्टीत आनंद मानत होतो, पण तरीही तिच्या कुरकुरी, तक्रारी काही थांबत नाहीत. लग्नाच्या नंतर बारा वर्षांनी पण तिच्या वागण्यात कर्तव्याचा, उरकल्याचा भागच’ जास्त असतो. कशाला ठेवायचीत मग असली नाती घट्ट धरून, हळू हळू त्यातून बाहेर पडणेच चांगले.

मानसी होळेहोन्नुर

Tuesday, May 22, 2018

पत्र १


प्रिय,
आज अचानक इतकी आठवण आली तुझी की काही सुचेनासं झालं, मन उगाच ओढ घेत राहिलं जुन्याच आठवणींकडे. मन पण कसं खुळं असतं ना, सुतावरून स्वर्ग गाठतं. कुठलातरी एक छोटासा बिंदू आणि मग त्यावरून आठवणींची मालिका एखादा चेंडू उतारावर घरंगळत जावा तशी समोर जात राहते. आता यात एकामागोमाग येणाऱ्या दोन आठवणींचा सबंध असेलच असे नसतं. कधी कधी तर काळ वेळेचं गणित सुध्दा या आठवणी धुडकावून टाकतात. पिंगा घालत राहतात, फेर धरतात, जोवर आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांना आंजारत गोंजारत नाही तोवर त्या काही हलत नाहीत.

बहुदा कॉलेज मधलं दुसरं वर्ष होतं, पहिल्याची नवलाई ओसरली होती, नवीन कंपू जमले होते, सगळ्याच गोष्टींचा थोडाफार अंदाज यायला लागला होता. राहत्या जागेपेक्षा कॉलेज जास्त आवडायला लागलं होतं, कॉलेजमधून पाय निघायचा नाही. कोणता कोपरा कोणाचा, कोणत्या झाडामागे कोण बसले असेल किती वाजता कोण कुठे असू शकेल याचे सगळेच अंदाज खरे ठरायला लागले होते. मास्तर लोकांचेही पाणी कळलं होतं. त्यामुळे तर कॉलेज जास्त आपलंसं वाटत होतं. शिक्षण काय वर्गात, पुस्तकात, बाहेर, जगात मिळतच असतं. परीक्षेच्या काही दिवस आधी वाचून पाट्या टाकून बरे मार्क्स मिळवता येतात हे ही नव्याने कळलं होतंच.  घाबरायचं कोणतही कारण नसतानाही तुला बघितलं की मात्र भीती वाटायची.

तुला बघून वाटायची भीती हे मी कधीच कोणालाही सांगू शकले नाही. तू देखणा, मुडी, हुशार, बोलका गडी. सतत काहीतरी करत राहणारा. तुझ्या आसपास पोरींचाच काय पोरांचाही राबता कमी नसायचा, तुझा खाली पडणारा उःश्वास सुद्धा झेलायला पोरीबाळी तयार असायच्या. तुझ्या गालावरच्या त्या खळीने किती जणींना घायाळ केले होती याची गणतीच नव्हती. तशी मी तुमच्याच ग्रुप मध्ये विसावलेली, पण तरीही तुझ्याशी अंतर राखून ठेवलेली. मी अशी का याचे कारण कोणी विचारू नये म्हणून इतकी धडपडायचे, कारण मला तू आवडतोस हे तेव्हा मला स्वतःशीसुध्दा मान्य करायचे नव्हते, त्यामुळे ते तोंडावर सुध्दा आणायचे नव्हते.

अशातच त्यादिवशी चहाची तल्लफ आली म्हणून मी कॅन्टीन मध्ये येऊन बसलेली होते, एकदम सुरु झालेल्या पावसाच्या सरीत एकटीच शून्यात नजर लावत चहा पीत बसले होते. मला आजही असे एकटीने बसून चहा प्यायला आवडते, स्वतःलाच स्वतःची कंपनी देत घोट घोट चहा पिणं ही आजही माझी सुखाची परमावधी आहे. त्यादिवशी पण मी अशीच बसलेली असताना तुझा आवाज ऐकू आला आणि माझी समाधी भंगली. कोपऱ्यात बसून तू सिमॉन द बुआचं पुस्तक वाचत होतास हे आजही आठवतंय, मला आजही त्या बाईचे नाव घेता येत नाही,आणि तू मात्र अगदी तल्लीन होऊन पुस्तक वाचत होतास, आवडलेलं वाक्य मोठ्यानं बोलायची तुझी सवय तेव्हा मला पहिल्यांदा कळली. मी सहज उठून तुझ्या टेबलवर येऊन बसले. तू पुस्तकाची शेवटची पाने अगदी आधाशासारखी संपवत होतास, तुझ्या डोळ्याची बुब्बुळ, हात, चेहऱ्यावरचे हावभाव सगळे सगळे टिपत होते मी. पहिल्यांदा आणि शेवटचेच मी तुला अशी बघत होते. तूच हात डोळ्यासमोर फिरवून मला जगात ओढून आणलेस, तू बुआबद्दल काहीतरी बोलत होतास, आणि मी तुझ्याबद्दल काहीतरी विचार करत होते. तू तेव्हा खूप काय काय बोलला होतास, मात्र त्यातलं एक वाक्य तेवढं लक्षात राहिलं होतं  माझ्या.

दुपारी पाऊस कोसळत होता, नवऱ्याने, पोराने विस्कटवलेल घर मी परत जागेवर आणत होते. रोजच्याच सवयीच्या गोष्टी करत होते. चाकोरी पाळत गेली तर त्याच चाकोरीत अडकून पडता येतं. सरावाने चाकोरीची सवय होऊन जाते. तक्रारच उरत नाही. आयुष्य कसं साच्याच होऊन जातं. नवीन काही तयार होत नाही आणि त्यामुळे उद्धवस्त होण्याची भीती सुद्धा राहत नाही. तरीही दुपारी पाऊस ऐकताना, चहा पिताना तंद्री लागताना तुझी आठवण आली. marriage almost always destroys women. हे तू सांगितलेले वाक्य तेवढं आजही डोक्यात फिट्ट आहे. तू आवडू नयेस म्हणून तुझ्याशी बोलणं टाळणारी मी, तुझ्या प्रेमात पडेन म्हणून कॉलेज बदलणारी मी, सगळ्यापासून लांब पळू शकले, पण या वाक्यापासून नाही. स्वतःला उद्धवस्त होताना बघणं ही सुध्दा एक मजा आहे, ते मी तुलाच सांगू शकले असते, तूच ती समजून घेऊ शकतोस, म्हणून आज तुझी अशक्य आठवण आली.

जिथे कुठे असशील, उचक्या थांबत नसतील तर सिमॉन द बुआचंच नाव घे, माझं नाव कदाचित  तुला आठवणारच नाही, मी मात्र तुमच्या दोघांची नावं घेत आयुष्य चहाच्या घुटक्यासारखं संपवत राहीन. ‘

©मानसी होळेहोन्नुर

Wednesday, May 9, 2018

चहाबाज , कॉफीकर की इतर काहीही ???


तुम्ही चहा घेणार की कॉफी? या एका प्रश्नाने जगात तीन वर्ग तयार होतात, चहा कॉफी आणि इतर काही. मुळात जगभरात कुठेही गेलात तरी आदरातिथ्य करताना हा प्रश्न समोर येतोच. अनेक जण तुम्ही काय निवडता यावरून तुमची पहिली परीक्षा सुरु करतात. काही जण तर म्हणे त्यावरून भविष्य सुद्धा वर्तवतात. एक मात्र आहे चहा कॉफी वरून स्वभावाचा अंदाज लावता येतो आणि जो चक्क बरोबरही निघू शकतो. 
चहावाले जमात म्हणजे काळा, हिरवा, पिवळा, केशरी, पांढरा अशा कोणत्याही रंगाचे पाणी असलेला द्रव पदार्थ आवडणारे अशी जगाची व्याख्या आहे भारतात मात्र ही जमात थोडी बदलते, आणि एकाच रंगाशी इमान राखते. चहा भारतात हंड्रेड शेड्स ऑफ ब्राऊन म्हणून ओळखला जातो. मुळचा भारताचा नसून भारतात एकरूप पावलेल्या बटाट्याप्रमाणे चहाही इथल्या मातीत माणसांमध्ये मिसळून गेला आहे. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, उत्तर प्रदेश-केरळ असे अनेक भेद केवळ एक कप चहा वर मिटवले जातात. आता अस्सल चहाबाज दिवसातून कितीही आणि कसाही चहा पिऊ शकतो. चहा लाईट आहे, चहा पातळ आहे, चहा गोड बासुंदी आहे अशा कोणत्याही सबबी तो देत नाही. पण त्याचबरोबर चहाचे असेही काही दर्दी असतात जे चहाच्या कंपनीशी इमान साधून असतात. म्हणजे मग त्यांना ब्रूक बॉंडचा चहा टाटा टी पेक्षा कमी कडक वाटतो. पण हे ब्रँड प्रेम कॉफीकरांमध्ये पराकोटीचे असते. चहा वाले कुरकुर करत का होईना पण समोर येईल तो चहा पितात.
चहा पिणाऱ्यांमध्ये चहा कसेही कधीही पिणारे अट्टल चहाबाज असतात, त्यांच्याकडे कायम चहा पिण्यासाठीचे कारण तयार असतं. त्यांना कितीही चहा प्यायला तरी त्रास होत नाही, उलट शरीरातलं चहाचं प्रमाण कमी झालं तर त्यांना टीडिप्रेशन होतं. याच पंथातले काही लोकं असेही असतात ज्यांना दिवसातून ठराविक वेळा चहा मिळाला नाही तर हायपो’टी’सिस होतो. काही चहाबाज असेही असतात ज्यांचं क्वॉन्टीटीपेक्षा क्वालिटीवर जास्त प्रेम असतं. अशा लोकांना चहा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनेच लागतो. मग काहींना उकळलेला घट्ट, तर काहींना बासुंदीचा, काहींना मसाल्याचा, काहीना लाईट तर काहींना स्ट्राँग लागतो. व्यक्तिगणिक चहाची पध्दत आणि चहाची चव बदलत जाते पण तरीही चहाचे प्रेम कमी होत नसतं.
चहा पोहयावर लग्न ठरतात, मंत्रीमंडळ बनतात, पडतात, लोकं एकत्र येतात, नवीन ओळखी होतात, एवढंच काय चाय पे चर्चा करत देशाचा पंतप्रधान सुध्दा या चहामुळे ठरला जातो. चहामुळे त्रास होतो हे चहा न पिणारे लोकंच म्हणतात, हे लोकं म्हणजे कॉफी पिणारे किंवा इतर काही वाले. जसे चहा पिणारे चहाबाज असतात तसे कॉफी पिणारे कॉफीकर असतात. कॉफी हा जरा पैसेवाल्यांचा शौक. चहा कसा दुध असलं, नसलं तरी चालत. कॉफीचे मात्र तसे नाही.
कॉफी हे तासे साधं सुध प्रकरण नाही, घरंदाज नजाकतीची गोष्ट आहे ती. त्यामुळेच की काय कॉफी पिणारा हा स्वतःला या सगळ्या उतरंडीत सगळ्यात वरती ठेवून बघत असतो. कॉफी ही जेवढी प्यायची गोष्ट आहे तेवढीच ती अनुभवायची गोष्ट आहे. कॉफी उकळताना तिचा जो घमघमाट पसरतो त्यानेच कॉफीकराला नशा चढायला लागते. भारतामध्ये खास करून दक्षिण भारतात कॉफीला ज्या काही मायेच्या हातांनी या पेल्यातून त्या पेल्यात फिरवतात, की कॉफीलाही भरून येतं आणि ती पेल्याच्या काठोकाठ येते. बाकीच्या भारतात इंस्टट कॉफीला मान असतो, तर दक्षिणेत कॉफीलाही डिग्री असते. जसा अनेक घरांमध्ये एखादी परंपरा असते, तशी अनेक घरांमध्ये कॉफीच्या प्रमाणाची, ताज्या दळून आणलेल्या कॉफी पावडरची, ठराविक दुकानाची परंपरा असते. घरातल्या एखाद्या माणसाप्रमाणे कॉफीचे भांड, पावडरचा डबा यांचा मान असतो. इंस्टट कॉफी या सुरु झाल्या ते रात्रीच्या जागरणांना सोबत करण्यासाठी, गप्पा रंगवत हॉटेलमध्ये अड्डा जमवण्यासाठी. कॉफीचे भक्त कॉफीसाठी काहीही करतील असे काही नाही नसतं. कॉफीचे मग रिचवत काम करणारे अनेक असतात, कॉफी ही तशी आब राखून असणारी असल्यामुळे तिला उगाच ग्रीन टी, लेमन टी सारखे फाटे फोडले जात नाहीत, कॉफीसाठी कॉफी पावडरही आवश्यकच असते. अगदी डीकॅफे पिणारे सुद्धा कॉफीसदृश्य, आणि सुवासाची पावडर घालूनच कॉफी करतात. जगभर जरी हिची मिजास जास्त असली, तरी भारतीय मनावर खरी भुरळ आहे ती चहाचीच.
जर तुम्ही इतर काही गटातले असाल म्हणजे दुध, किंवा काहीच न पिणारे तर तुम्हाला सतत तुमच्या अल्पसंख्याक असल्याची जाणीव करून दिली जात असते. मुळात इतर काही पिणारेसुध्दा अनेकदा छुपे चहाबाज किंवा कॉफीकर असतातच. फक्त त्यांना ठरवता येत नसतं आपण कोणत्या बाजूने जायचे म्हणून ते मधला मार्ग धरून असतात.
चीनमधून आलेल्या चहाने भारतात मूळ धरलं, आफ्रिकेतल्या कॉफीने जगभर हात पाय पसरवले, चहा असो वा कॉफी किंवा इतर काही संवादासाठी शब्दांबरोबर हे ही आवश्यकच आहेत. दररोज चहा प्यायल्याने अमके होते, तमके होते, कॉफीचे दुष्परिणाम , असे हजारो निष्कर्ष येत राहतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत विसरलेही जातात. कारण चहा असो, व कॉफी किंवा इतर काही माणसांना जोवर बोलण्याचे , संवादाचे एक कारण देत आहेत तोवर आचंद्रसूर्य या जगतावर चहा आणि कॉफी अनभिषिक्त साम्राज्य करतच राहणार कारण च हाच काफी आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.    

©मानसी होळेहोन्नुर
पूर्व प्रसिद्धी : झी दिशा