Tuesday, November 15, 2016

तरीही फुलतो आहे.....

काही काही वासाशी, झाडांशी आपल्या आठवणी निगडीत असतात. आणि मग त्या आठवणी इतक्या घट्ट होऊन जातात, की ते वास आणि त्या आठवणी एकच होऊन जातात. मग कधी या आठवणी वय विसरायला लावतात तर कधी या आठवणी कातर करून सोडतात. आयुष्य म्हणजे तरी काय असतं, आठवणींची पुरचुंडी तर असते. बऱ्याचशा आठवणी मेंदूत जागृत, निद्रित साठवलेल्या असतात, पण काही आठवणी मात्र मनात खोल रुतून बसलेल्या असतात.

लहानपणी कधी तरी आजीच्या मांडीवर बसून कृष्णाच्या गोष्टी ऐकताना नरकासुराची गोष्ट ऐकली होती. मग नरकासुराला मिळालेलं वरदान, आणि मग त्याचा गैरवापर टाळण्यासाठी मिळालेला शाप. तेव्हा कायम वाटायचं हे राक्षस लोकंच का कायम तपश्चर्या करायचे. मग ही एवढी साधना करून पण यांची वृत्ती का बदलायची नाही? आणि दर दर वेळी हे राक्षसच का वाईट असायचे. कधी तरी एकदा आजीला तसं थेट विचारल्यावर ती म्हणाली, अग या गोष्टी म्हणजे साऱ्या प्रतिकं असतात. आपल्याच आत देव पण असतो आणि राक्षस ही. राक्षसाला देवापेक्षा मोठं व्हायचं असतं म्हणून तो तपश्चर्येच्या मागे लागतो. देवाला अशी कोणाशीही स्पर्धा करायचीच नसते. आणि वाईट गोष्टीना मारणं गरजेचं असतं ना त्यासाठी शाप देतात. मग त्या नरकासुराच्या गोष्टीतली सत्यभामा मस्त हिरोईन सारखी वाटायची. कृष्ण तर पहिल्यापासून हिरो होताच, पण नरकासुराला मारताना त्याला मदत करणारी त्याची बायको मनापासून आवडली होती.

तीच सत्यभामा दुसरऱ्या एका कथेमध्ये नवऱ्यावर हक्क गाजवणारी म्हणून दिसते. मग त्याला दान म्हणून सोडतानाही तिला लक्षात येत नाही आपण काय करतो आहोत. अति प्रेम , आंधळं प्रेम असंच आपल्याकडून काहीही करून घेतं असतं. आपल्याही नकळत आपण वहावत असतो. . पण या सगळ्यापेक्षाही मला आवडते ती पारिजात फुलाची आणि सत्यभामेची कथा. कृष्णाची पट्टराणी खरं तर रुक्मिणी त्यामुळे आपण कायम दुसऱ्या क्रमांकावर या खंतेत सत्यभामा, खरंतर ती सौंदर्यवती, त्यात परत नरकासुर वध केला म्हणून तिला मिळालेलं  अमर सौंदर्याचं वरदान बर माहेरचं घराणं देखील मोठं त्यामुळे त्याचा ताठा वेगळा. मग एकदा फुरंगटून तिनं म्हणे कृष्णाला सांगितलं मला पारिजातकाचं झाड माझ्या अंगणात हवं. पारिजात म्हणजे स्वर्गीय झाड, थेट समुद्रमंथनातून मिळालेलं. बायकोचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला काहीही करावं लागतो ह्याचा पहिला धडा गिरवला कृष्णानं. जिथं कृष्ण काही करू शकला नाही तर बाकीच्या सामान्य नवऱ्यांची काय कथा! नवऱ्यानं बायकोचा हट्ट पूर्ण करत झाड लावलं खरं. पण फुलं मात्र पडायला लागली रुक्मिणीच्या अंगणात. ह्यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं.

जेव्हा केव्हा पारिजातकाची फुलं, झाड बघते तेव्ह तेव्हा मला सत्यभामा डोळ्यासमोर येते, आणि नकळत नरकासुराची पण आठवण येते. हे पारिजातकाचं पिटुकल फुल, त्याचा तो केशरी रंगाचा दांडा, कधी पाच, कधी सहा क्वचित कधी आठ पाकळ्या. सूर्यास्तानंतर उमलायला सुरु होणारं आणि सूर्य परत हजेरी द्यायला आल्यावर हळूहळू कोमेजणाऱ्या या फुलाच्या झाडाला  इंग्लिश मध्ये ‘ट्री ऑफ सॉरो’ म्हणतात, आणि गंमतीची गोष्ट म्हणजे याचं जे शास्त्रीय नाव आहे, निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस त्याचा अर्थ देखील ‘दुःखी झाड ‘ असा होतो. पारिजातकाची एक दंतकथा पण अशी सांगितली जाते की हे झाड एकदा सूर्याच्या प्रेमात पडलं, आणि त्यानी त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण सूर्यानी त्याला नकार दिला म्हणून ही फुलं सूर्य असताला गेल्यावर फुलांमधून अश्रू ढाळायला सुरुवात करतात ते थेट सूर्याचं परत दर्शन होईपर्यंत.


स्वतंत्र वास असणारी ही पारिजातकाची झाडं खरंच अंगणाची शान असतात. प्राजक्त, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक या नावांनी पण ओळखलं जातं. जमिनीवर पडताक्षणी हिरमुसून जाणारी ही फुलं गोळा करण्यात देखील एक आनंद होता. जेव्हा कधी प्राजक्ता अशी हाक कानावर पडते तेव्हा पारिजातकाचा परिमळ दरवळून जातो, हेच असावं कदाचित आठवण आणि वास एकच होऊन जाणं.  आपले अश्रू ढाळता ढाळता सुवास पसरवणारं दुःख इतक्यांना सुखी करून जातं, की दुःखालाही त्याच्या दुखण्याचा विसर पडावा. आयुष्यात एवढं जमलं तरी पुष्कळच म्हणावं लागेल. ...!  

Thursday, November 10, 2016

घरोघरी साड्यांची म्युझियम

“ अगं मी यावर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या साड्याच्या निमित्ताने मी एक मस्त गुलाबी रंगाची पैठणी घेतली आणि दिवाळी साठी म्हणून काळी चंद्रकळा. तू काय घेतलेस नवीन?” एक बस मध्ये एक जण दुसरीला विचारत होती.
“हो ग मी पण  नऊ दिवस त्या नवरात्रीच्या रंगांच्या रेशमी साड्याच नेसते, यावेळी पांढरी साडी नेमकी नव्हती बघ, आणि कित्ती दिवसापासुन एक संबळपूर सिल्क घ्यायची होती मग काय एक पांढरी किरमिजी बॉर्डर ची संबळपूर सिल्क घेऊन आले. दिवाळीला बाई आम्ही सोनेच घेतो.” माझा स्टॉप आल्यामुळे मी उतरले आणि माझी पुढची साडी खरेदी, रेशमी साड्यांचे प्रकार, नवरात्रीचे नऊ रंग, सोन्याची खरेदी अशी मिळणारी वेगळी माहिती माझी हुकली.

लग्नामध्ये मिळणाऱ्या ५ मानाच्या साड्या, आहेरात मिळणाऱ्या साड्या यापासून कित्येक जणींच्या साड्यांचा प्रवास सुरु होतो, तसं त्या आधी हौस म्हणून, किंवा जवळच्या कोणत्या तरी लग्नासाठी म्हणून घेतलेल्या साड्या असतात, पण बहुतांश जणींच्या रेशमी साड्यांच्या संग्रहाची सुरुवात मात्र होते ती लग्नापासूनच! सध्याचा जमाना डिझाईनर साड्यांचा असला, तरी पारंपारिक रेशमी, सुती  साड्या आजही त्यांचे महत्व टिकवून आहेत. मग चेन्नईला गेलं की कांची सिल्क किंवा कांजीवरम घेणं हे मरीना बीच बघण्यापेक्षाही महत्वाचं काम असतं. पैठणी अगदी नाक्यावरच्या दुकानात मिळत असली तरी येवल्यावरून आणलेल्या पैठणीची बातच न्यारी असते. आपल्याकडे नाही बाई मिळत एवढे रंग आणि प्रकार पैठण्यांचे म्हणत एखादी सहज ३, ४ पैठण्या येवल्यावरून येता जाता घेते.

साडी हा साडी नेसणाऱ्या आणि ना नेसणाऱ्या सगळ्याच जणींचा अगदी खास चर्चेचा विषय असतो, न नेसणाऱ्या  हे एक काहिअतरी अवघड जटील प्रकरण आहे म्हणून बघतात, रोज घालणाऱ्या आमचाच जास्त हक्क याच्यावर बोलण्याचा म्हणून बोलून घेतात, आणि कधी मधी साडी नेसणाऱ्या, मिरवणाऱ्या #100dayssareepact करतात, किंवा परदेशात साडी नेसून लक्ष वेधून घेतात. त्या अमुक अमुक अभिनेत्रींनी परदेशात नेसलेल्या साड्यांचे तर भारतातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत असते. साडी नेसल्याचा पहिला पुरावा सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये मिळाला, म्हणजे ख्रिस्त पूर्व २८००-१८०० च्या सुमारास, सुरुवातीस फक्त सुती साड्या होत्या, नंतर रेशमाचा शोध लागल्यावर रेशमी साड्या तयार होऊ लागल्या, गेल्या शतकापासून तर कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या साड्यांची देखील चलती सुरु झाली आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, आणि क्वचित ठिकाणी श्रीलंकेमध्ये सुद्धा साड्या वापरल्या जातात.

भारतात प्रत्येक राज्याची अशी स्वतंत्र साडी संस्कृती आहे, म्हणजे फक्त साड्यांचा प्रकार नव्हे तर साडी घालण्याच्या पद्धती देखील, महाराष्ट्रीयन, बंगाली, गुजराथी, कोंकणी, केरळी, माडीसार( तमिळ अय्यांगरी ९ वारी साडी), निवी (आंध्र प्रदेशातली), कोडगू (कुर्गी पद्धतीची ), आसामी, मणिपुरी, खासी असे अनेक पारंपारिक प्रकार तर आहेतच पण डिझाईनर साड्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या पदधतीने आजकाल नेसवल्या जातात.  

जसं तामिळनाडू म्हणल्याबरोबर बायकांना कांजीवरम, उत्तरप्रदेश म्हणाल्यावर बनारसी, लखनवी साड्या, आंध्र प्रदेश म्हणल्यावर नारायणपेट, धर्मावरम, मंगलगिरी, उप्पडा, वेंकटगिरी सिल्क, गडवाल, मध्य प्रदेश मधील चंदेरी, माहेश्वरी साड्या, राजस्थान गुजराथ मधील बांधणी, गुजराथ मधीलच पटोला, बंगाल मधील सुती साड्या, कांथा सिल्क साड्या, बांगलादेश मधील मलमलच्या साड्या, टसर सिल्क, आसाम मधील मूगा सिल्क,  संबळपूर, बेहरामपूर सिल्क, इक्कत या ओरिसा मधील साड्या, कर्नाटकातील म्हैसूर सिल्क, आणि इरकल, केरळ मधील पारंपारिक ऑफ व्हाईट, सोनेरी काठाच्या साड्या काश्मीर मधील सिल्क साड्या, पंजाब मधील फुलकारी किंवा हातानी विणकाम केलेल्या साड्या, बघावी तेवढी यादी वाढत जाते. यातल्या प्रत्येक ठिकाणी भेट दिल्यावर एखादी साडी घेणं हे भारतीय एकात्मतेसाठी गरजेचंच असतं.

भारतामध्ये पर्यटन किंवा गावोगावी लागणाऱ्या मेळाव्यांमध्ये गेला बाजार आपल्या शहरांमधल्या दुकानांमध्ये यातल्या बऱ्याचशा प्रकारच्या साड्या मिळतातच, आणि याखेरीज अनेक प्रकारच्या साड्यांनी दुकानं कायम भरलेली असतात, मग कधी रंग आवडला म्हणून, कधी काठ आवडले म्हणून, कधी पदरावरची नक्षी आवडली म्हणून, कधी हा रंगच माझ्याकडे नाही, किंवा ही रंगसंगती नाही. कधी सगळ्या जणी एक सारख्या साड्या घेऊ म्हणून घेतलेली, कधी, ( बऱ्याच वेळा ?) भेट म्हणून आलेल्या साड्या, अशा साऱ्या साड्यांनी कपाट वाहून चाललेलं असतं, तरीही साडीचा मोह हा कधी सुटत नसतो, रस्त्यावर सहज फिरताना, किंवा कोण एकीच्या अंगावरची साडी आवडली म्हणून साडीची खरेदी कधीच थांबत नसते.

साड्या बायकांना एकत्र जोडतात,  त्यांच्यात संभाषणं तयार करवतात, नैसर्गिक औत्सुक्याला खतपाणी घालतात भौगोलिक, भाषिक अंतर मिटवतात, पुरुषांना बायकांचं मन जिंकण्याची सोपी संधी देतात, संस्कृती जपण्याचे, जोपासण्याचे कामा करतात, हस्त शिल्प कारागिरांना उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देतात, बायकांचे सौंदर्य खुलवतात. इतकं सगळं करणाऱ्या बहुगुणी साड्या जरा चुकून जास्तच असल्या घरात तर काय झालं, शेवटी मनाजोगती साडी मिळाली तर बाई खुश, बाई खुश तर घर खुश आणि घर खुश तर दुनिया सलामत. सहा वारांमध्ये लपलेली असतात किती तरी गुपितं, वर्षे गेली, साडी विरली तरी तशीच जपलेली त्यामुळेच घरोघरची साड्यांची कपाट फक्त कपाट नसतात ती असतात साड्यांची म्यूझियम.


Monday, November 7, 2016

गोष्ट एका 'केस' ची

मैत्रीण खूप वर्षांनी भेटत होती. फोटो मधून एकमेकींचे दर्शन घडत होतं, पण फोटो मधेय बऱ्याचदा आपण आपल्याला जे आवडतं, जे दाखवायचं असतं तेच दाखवतो. कॉलेज च्या दिवसापासुनची ही मैत्रीण, म्हणजे अगदी एखादा मुलावर टप्पे टाकण्यापासून घरी वेळ मारून नेण्यापर्यंत सारे काही सोबत केलेली. कॉलेज च्या दिवसात असे मित्र मैत्रिणी असतातच ज्यांच्यामुळे आयुष्यात पुढे आठवणीना वेगळा रंग, गंध, स्पर्श असतो. आयुष्य व्यापून उरतात त्या आठवणी. त्यामुळे हे मैत्र उघडं नागडं असतं, तिथं काही लापवाछपवी नसते. प्रत्यक्षात बघितल्यावर मैत्रीण एकदम बोलून गेली
‘अग हे काय? एवढेसे केस?’
माझ्या झड झड झडणाऱ्या केसांकडेच तिचं पहिलं लक्ष गेलं. हाय रे दैवा, इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य शेवटी समोर आलंच होतं. मीच मग पलटवार करत म्हणलं,
‘अग एवढे तरी केस राहिलेत बघ अजून , पूर्ण टकली व्हायला वेळ आहे.’ आणि मग हा हा हा करत वेळ मारून नेली.
वेगवेगळे विषय निघत गेले, गप्पा रंगत गेल्या, पण तिच्या डोक्यातून काही माझे केस जात नव्हते, आणि केसांबद्दल विचार करून करून माझे केस गळून गेले होते. वाढत्या वयाबरोबर माझे केस माझी सोबत सोडत चालले होते. वयाबरोबर पांढरे होत जाणारे केस माहीत होते, पण वयाबरोबर साथ सोडणारे केस मी पहिल्यांदाच पाहत होते. प्रत्येक वेळी काही तरी नवीन कारण मिळायची केस गळायला, मग त्यावरती नवीन काही तरी उपाय.
शाळेत कॉलेजात असताना आईच्या शाळेच्या धाकानी तरी तेल पाणी व्हायचं, पण मग शाळेतून कॉलेजात गेल्यावर शिंग फुटतात त्यामुळे, केस कापून शिंगाना खास जागा केली, मग एकदा लागलेली कात्री सहज सुटत नाही म्हणत ती कात्री दर सहा महिन्यांनी आगत गेली, कधी कात्री कधी रंग. केस म्हणजे एक प्रयोग शाळा होत होती. मग प्रयोग कमी कमी होत गेले आणि केसांचा आकार, घनता देखील.
मग कामाचा, आयुष्याचा ताण, नानाविध कारणं लागत गेली, गावं बदलली, देश बदलले, खाणं बदललं, साध्या साध्या सवयी बदलत गेल्या आणि केशरचना देखील! मग तेल बदललं, शाम्पू बदलले, कधी कुठल्या पावडरी लावून पाहिल्या, कडीपत्ता, ते मेथ्या, अंड ते दही सारं काही खावून, लावून, वापरून झालं, पण केसांनी मात्र वाढायला पसरायला पूर्णपणे नकार दिला होता. कधी वर बांधून , कधी वेणी मध्ये लपवून त्यांचं अस्तित्व मी लपवू पाहत होते. जेवढे जास्त प्रयत्न तेवढ जास्त दुःख! जाहिरातीना भुलून वापरलेल्या तेल, शाम्पू नी बिलाचा आकडा वाढायचा पण केस मात्र जिथे आहेत तिथे.
लहानपणी आईकडे केस कापू दे, छोटे करायचेत म्हणून हट्ट करावा लागायचा आणि आता केस वाढावेत म्हणून हट्ट धरावा लागतोय. आयुष्य बहुदा हेच असतं, जेव्हा जे असतं, तेव्हा त्याची किंमत कळत नाही, आणि मग जेव्हा ते हातातून (डोक्यावरून) निसटून जायला लागतं तेव्हा मात्र त्याला घट्ट धरून ठेवण्याची खटपट केली जाते. कधी कधी शांतपणे विचार केला तर वाटतं, का करायची ही खटपट, द्यावं सोडून सारं, सुंदर दिसण्याची एक पायरी म्हणजे सुंदर केस, पण मग बिनाकेसांच्या सौंदर्याच्या काय? वर्षानुवर्षे मांडत असलेल्या गृहितकांना, मापकांना कुठेतरी छेद दिलाच पाहिजे ना? सौंदर्याच्या कल्पनाच जर आपण किमान आपल्यापुरत्या तरी बदलल्या तर? काही कारणानी गमावले केस तर? आयुष्य थांबत तर नाही ना तिथं? सौंदर्याच्या कल्पना जेव्हा बदलून जातात तेव्हा बदल असते आपली प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची नजर. आणि मग न दिसलेल्या अनेक गोष्टी दिसायला, जाणवायला लागतात.
गळणाऱ्या केसांमुळे मिळालेलं हे शहाणपण जेव्हा मैत्रिणीबरोबर वाटत गेले तेव्हा  ती सहज  बोलून गेली, ‘टकले, बहुदा केस गेल्यामुळे मेंदूला छान ऊन मिळत असावं, त्यामुळे, विचारांचं पीक जरा बरं वाढतंय!’ आणि मला बाल बाल बचावल्याच नवं समाधान मिळालं!



टीप: बिनाकेसांच्या सौंदर्याच्या एका सुंदर जाहिरातीची लिंक सोबत जोडत आहे. जेव्हा जेव्हा ही जाहिरात बघते तेव्हा तेव्हा हे सौंदर्य मला अजूनच भावतं...




Friday, October 28, 2016

दिवा जळो, पीडा टळो...

आजच सगळ्या क्लाएंटला दिवाळीच्या  भेटवस्तू द्यायच्याच होत्या, तर मग ती तिची दिवाळी आनंदात साजरी करू शकणार होती. तिची नुसती धावपळ उडाली होती. कितीही ठरवलं, तरी कुठे तरी दोन पाच मिनिटं निसटतात, आणि मग पुढचा सगळा हिशोब कोलमडायचा. तिनी खरंतर निम्म्याहून जास्त भेटवस्तू द्यायचं काम हाताखालच्या लोकांवर सोडलं होतं, पण अशी काही जण होती ज्यांना प्रत्यक्ष भेटून ह्या वस्तू देणं गरजेचं होतं. सकाळी ९ ला जेव्हा ती घरातून बाहेर पडली होती तव्हा तिनी सगळा वेळेचा हिशोब मांडून आपण ६ पर्यंत मोकळे होऊ असा अंदाज केला होता. पण पहिल्याच ठिकाणी तासभर थांबावं लागलं आणी मग तिची आतल्या आत चिडचिड सुरु झाली. आज लवकर जाऊन किमान लाडू तरी करूयात असं अगदी मनापासून ठरवलं होतं. किती दिवसात तिनी स्वतःला आवडत असूनही बेसन लाडू केले नव्हते. स्वैपाकवाल्या काकूच स्वैपाक करायच्या. रविवारी मात्र ती अगदी ठवून एखादा तरी पदार्थ करायचीच.

विकत आणलेल्या फराळ कदाचित घरच्या पेक्षा जास्त चांगला असेल, पण घरी फराळ करताना जो वेळ, प्रयत्न, प्रेम घातलं जातं त्यामुळे त्या फराळाची चव बाहेरच्या अगदी घरच्या सारख्या लागणाऱ्या फराळाला कधीच येत नाही. कितीही कामा असलं, तरी ती दर दिवाळीला लाडू चिवडा तरी घरी करायचीच. वेळ असला तर चकली, करंज्या. तासभर वाट बघता बघता ती दोन चार खाद्य पदार्थांचे ब्लॉग चाळत होते. फेसबुकवरचे फोटो पाहून आपण केलेच पाहिजे मन अजून ठामपणे सांगत होतं. एका ठिकाणहून दुसरीकडे पळत पळत ती तिचं दिवाळीच टारगेट पूर्ण करत होती. जेवण ही असंच एका टॅक्सीमध्ये बसून तिनं संपवलं होतं. तशी तर मुंबई रोजच पळत असते, पण दिवाळीच्या दोन चार दिवस आधी ती उसेन बोल्टच्या वेगानं धावते असं तिला वाटायचं.

दिवाळी एका नाही दोन नाही तब्बल पाच दिवसांचा सण! निवांत साजरे करा तुमच्या कुटुंबीयांसोबतचे क्षण. आपण पैसे कमावतो ते जगण्यासाठी, आणि जगतो ते जीवाच्या माणसांसोबत, दिवाळी असते ती याचीच जाणीव करून द्यायला. एकत्र राहणं, मिठाई तयार करणं, खाणं, गप्पा मारणं ही खरी दिवाळी असते. मनाच्या गप्पा रंगल्या की समाधानाचे दिवे आपोआपच लागतात. ह्या भेटवस्तू देणं घेणं एक निमित्त भेटण्याचं, आपले संबंध असेच राहोत, आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत सांगण्याचं एक निमित्त. दर वर्षी या भेटवस्तू निवडायचं काम तिनी तिच्याकडे ओढून घेतलं होतं. तिला आवडायचं ते. दर वेळी काही तरी वेगळा विचार करून कुठून कुठुन काय काय शोधून काढायची. या वेळी तिनी पूर्वी घरी बनवायचे तसे कापडाचे मोर चिमण्या,वेगवेगळे पक्षी एका आश्रमातून मिळवले होते. हातांमधली कला हृदयाला साद घालायची. जुनं सारं काही फिरून परत येतंच असतं. घरात, दारावर, गाडीत कुठेही टांगता येतील असे ते हँगिंग होते.

शेवटची भेट आटोपता आटोपता सात वाजून गेले होते, परत लोकल, बस पकडणं तिच्या अगदी जीवावर आलं होतं. तसे घर जास्त लांबही नव्हतं. एक्सप्रेस वे नि गेलं तर जेमतेम ३०, ३५ मिनिटात घरी पोहोचली असती, म्हणून तिनी सरळ उबर बोलावली. दोन मिनिटात ड्रायव्हर आला देखील. गाडीत बसल्यावर एक दोन चार मिनिटं बोलून ती नेहेमी ड्रायव्हर चा अंदाज घ्यायची. हा पठ्ठ्या विदर्भातला एका छोट्या गावातला होता. गावाकडं तशी फारशी शेती नव्हतीच. बापानी आत्महत्यांचं पीक यायच्या कैक वर्ष आधीच आत्महत्या केली होती. एक छोटी बहिण आणि आई गावाकडे होते. तू दिवाळीला गेला नाहीस घरी. तिनी सहज विचारलं. जरा भरल्या डोळ्यानीच त्यांनी सांगितलं बहिणीचं लग्न आहे, पुढच्या महिन्यात, तेव्हा पैसे लागतील आणि रजा सुद्धा म्हणून आत्ता नाही गेलो. त्याच्या आवाजात विषादही होता, आनंदही होता. पुढंच संभाषण तो बोलत होता आणि ती ऐकत होते. तिला माहित असलेलं पण तिनी कधी न पाहिलेलं जग तो तिला दाखवू पाहत होता.


उतरताना एक जादाचं असलेलं मोराचं हँगिंग आणि तिला मिळालेला मिठाईचा एक बॉक्स तिनी जेव्हा त्याच्या हातात ठेवला तेव्हा त्यानी मनापासून धन्यवाद देऊन घ्यायला नकार दिला, पण मग जेव्हा ही एका बहिणीकडून दिवाळीची भेट म्हणल्यावर त्याला तिचा आग्रह मोडवेना, तिथं भर रस्त्यात त्यानी भरल्या डोळ्यांनी मला वाकून नमस्कार केला तेव्हा उगाचच आपण दुसरे कोणी तरी आहोत असं तिला वाटलं. दिवाळी चा दिवा अजून घरी लावला नसला तरी तिच्या आतला दिवा आपोआप लागला होता. ही दिवाळी नक्कीच आठवणीतली दिवाळी ठरणार होती. 

Thursday, October 27, 2016

दिन दिन दिवाळी....

त्यांच्या भावकीतलं कोणीतरी गेलं म्हणून त्यांच्या घरी यंदा दिवाळी नव्हती एवढंच त्याला कळल होतं. तसंही दिवाळीला बापाकड पैसा असला, तो प्यायला नसला , त्याचा मूड बरा असला तर नवा कपडा यायचा, नाहीतर मामा शहरातल्यांचे कपडे आणायचे तेच त्याचे नवीन कपडे. आई चिवडा, लाडू क्वचित शंकरपाळे करायची, पण गावभर उंडारायला मिळायचं, कोणाच्याही घरी गेलं तर काही तरी खायला नक्की मिळायचं त्यामुळं त्याला दिवाळी आवडायची. त्यात किल्ला करण्यात त्याचा कोणी हात धरायचं नाही. प्रत्येकाला वेगळ काही तरी तो करून द्यायचा त्यामुळे त्याला खास भाव होता. मग त्या बदल्यात कधी दोन चार टिकल्यांची बंडल, नाग गोळ्याचं पाकीट, फराळाचा जादा खाऊ असं काही काही तो वसूल करायचा. बघून बघून आकाश कंदील पण करायला शिकला होता, यावर्षी त्यांच्या घरावर तो स्वतःच केलेला आकाशकंदील लावणार होता, पण सगळंच फिस्कटल होतं.

गणपतीत त्याला १३ पूर्ण झाली होती. मामाकडे शहरात जायची त्याला खूप इच्छा होती. मामा दर वेळी त्याच्या सोसायटीच्या गंमती सांगायचा, तिथल्या मुलांबद्दल सांगायचा तेव्हा त्याला कित्येकदा वाटायचं, मामा ढील सोडतोय. पण मग मामा जुने कपडे, पुस्तक आणायचं तेव्हा त्याचा विश्वास बसायचा. त्याला ते जगच वेगळ वाटायचं. या सुट्टीत तरी मामाकडे जायचंच त्यानी मनाशी खुणगाठ बांधली होती. आणि आत्ता दिवाळीच्या निमित्ताने ती संधी पण चालून आली होती.
शहरात पैसे कमवायला गेलेला त्याचा मामा मुंबईमध्ये  एका सोसायटीमध्ये कामाला होता. एक छोटीशी खोली पण दिली होती त्या लोकांनी त्याला राहायला. गावात छोटी मोठी कामं करून साचवलेल्या पैशातून या सुट्टीत मुंबईला जायचंच त्यानी पक्क केलं होतं, त्यामुळे सण नाही हे त्याच्या पथ्यावर पडलं होतं. आईचा प्रश्न नव्हता, बापाला कसं पटवायचं हा खरा प्रश्न होता. नशेत असलेल्या बापाचे पाय दाबून त्यानी हळूच प्रश्न सोडून दिला होता, बाप आपण कशाला हो म्हणतोय हे कळण्याच्या धुंदीतच नव्हता. सकाळी त्यानी बापाला आठवण करून दिली त्याच्या शब्दाची तेव्हा चक्क तो शुद्धीत असूनही हो म्हणाला तेव्हा त्याच्या त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता.

जेव्हा त्यानी मुंबईचे मोठे रस्ते, लोकच लोकं पाहिली तेव्हा त्याला अगदी सशासारख वाटलं. तो भांबावलेल्या नजरेनीच सगळं पाहत होता. आपण इथं हरवलो तर त्यांनी मामाचा हात अजून घट्ट पकडून ठेवला. मामाच्या कामाच्या ठिकाणी तर त्या मोठ्या इमारती , मोठ्या गाड्या पाहून त्याला आपण दुसऱ्याच कुठल्या जगात आलो की काय असे भास होत होते.  सगळ्यांच्या घराची रोषणाई, झगमगणारे दिवे, आकाशकंदील त्याला प्रत्येक गोष्टीचं अप्रूप वाटत होतं. रात्री जेव्हा सारे जण फटाके उडवायला खाली आले तेव्हा तर त्याला वाटलं सगळ्या गावातले फटाके इथे आलेत की काय.

फटाक्यांचे इतके प्रकार त्यानी कधीच पाहिले नव्हते. दिवाळीला शकून म्हणून फटके उडवायचे, शहरातलं पाहून पाहून भुईनळी, भुईचक्र, बाण असे काय काय मिळायचं. पण इथं तर बघावा तो प्रत्येक फटका त्याला नवीन वाटत होता. त्याला हे सारं कधी घरी जाऊन सांगेन सगळ्या मित्रांना सांगेन असं झालं होतं. ती फटाक्यांची रोषणाई बघत बघत तो कधी पुढे गेला होता त्यालाच कळलं नव्हतं. मामानी फटके लांबून बघ सांगितलं होतं, पण संमोहित झाल्यासारखा तो वर बघत समोर बघत फटाके उडवतात त्या जागेपाशी जाऊन पोहोचला होता. खरं तर ती जागा मोठ्या माणसांची, त्यांच्यासारख्या नोकर माणसांची नाही, मामानी सांगितलं होतं, पण ते फटाक्यांच्या आवाजात कुठेच विरून गेलं होतं. त्याला तिथल्या काही फटाक्यांना हात लावायचा मोह होत होता. मामानी फटाके आणून देईन सांगितलं होतं पण मनाला धीर कुठे असतो, आकाशात जाऊन वेगवेगळ्या रंगाची उधळण करणारा बाण असतो तरी कसा बघावा म्हणून त्यानी बिचकत बिचकत तिथल्या एका लांब नळीच्या बाणाला हात लावला.

‘कोण रे तू?’ कोणीतरी हटकलेच.
‘मी ..’ त्याची बोलतीच बंद होत होती. खरं बोलावं की खोटं बोलावं संभ्रम सुटता सुटत नव्हता. तो मान खाली घालून मामाचा धावा करत होता.
धावा ऐकल्यासारखं मामा तिथं पळत आला.
‘ माफ करा हा माझा भाचा आजच गावावरून आलाय. त्यांनी कधी हे असे मोठे फटाके पाहिले नाहीत म्हणून चुकून हात लावला असेल.’
‘लेका अरे आणतो म्हणालो होतो ना मी, आधी त्यांना सॉरी म्हण. परत असं नाही ना करणार?‘
तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो सॉरी म्हणाला आणि मान खाली घालून तिथेच उभा राहिला.
‘बाबा माझे हे रॉकेट मी याला देऊ, आम्हाला शाळेत सांगितलंय, you should spread happiness by giving. मी खुप फटाके उडवलेत, यानी अजून काहीच उडवले नाहीत ना.’


ते वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पसरला होता. जेव्हा त्यानी पहिल्यांदा त्या नवीन दोस्ताच्या मदतीने पहिल्यांदा तो मोठ्ठा बाण आकाशात सोडला तेव्हा त्याला सगळं आकाश त्याच्या आनंदात न्हाहून निघाल्यासारखं वाटतं होतं. त्या नवीन दोस्तानी आणि यानी मिळून अजून काही फटाके उडवले आणि दिवाळीचे दिवे एकमेकांच्या हृदयात लावले होते.       

Sunday, October 23, 2016

पणतीचं वलय

माईंनी मुलांना त्यांच्या खोलीत बोलावलं तेव्हा सारेच जरा गोंधळले होते. आता काय सांगायचं असेल माईला? आपलं कोणाचं काही चुकलं तर नाही ना? सगळेच जण दोन चार दिवसात आपण कोणाला काही बोललो नाही ना आठवत होते. नाना अचानक गेले म्हणून सगळेच धावत घरी आले होते. असे खूप वर्षांनी तिन्ही भाऊ आणि बहिण घरी जमले होते. चालते बोलते नाना गेले याचे दुःख तर होतेच पण स्वाभिमानी नानांना जर दुसऱ्या कोणाकडून सेवा करून घ्यावी लागली असती तर मारान यातनांपेक्षा जड गेले असतं, त्यामुळे आलं ते मरण चांगलंच आलं असं सगळ्यांना वाटत होतं. माई पण शांत स्थिर होत्या. नानांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी करायचे नव्हते. त्यामुळे एक दोन दिवसात सगळेच आपापल्या घरी जायचं ठरवत होते. अशात माईंनी कशाला बोलावलं असेल, सगळ्यानांच प्रश्न पडला होता.

तिघा भावांपैकी एक जण माई नानांबरोबर राहायचा तर दुसरा त्याच गावाच्या दुसऱ्या बाजूला राहायचा. धाकटा असूनही सर्वात श्रीमंत असलेला भाऊ जरा लांबच होता, फारसा यायचा नाही, बहिण जवळच्या गावात दिलेली होती. माईच्या एका फोन सरशी सारे बायको मुलांसह आले होते. नाना माई मध्ये नाना कायम कर्मवादी होते. देव धर्म या निव्वळ संकल्पना आहेत म्हणायचे. त्या उलट माई कायम देव सण वारात बुडलेली.  नाना रागीट तापट तर माई एकदम शांत. नाना बोलघेवडे तर माई जरा घुमीच. दोघे दोन वेगळ्या पध्दतीचे होते, पण तरीही त्यांचे वाद मुलांनी कधी पाहिले नव्हते. नानांची इच्छा म्हणून माईंनी मंगळसूत्र देखील उतरवलं नव्हतं.
तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की मी असं तुम्हाला माझ्या खोलीत का बोलावलं म्हणून ना. माईनी बोलायला सुरुवात केली.

आमच्या दोघांपैकी कोणी तरी आधी जाणार हे नक्कीच होते. माझी खूप इच्छा होती सवाष्ण जाण्याची पण नानांची कर्मश्रद्धा माझ्या श्रद्धेपेक्षा वरचढ ठरली. जशी जन्म ही नैसर्गिक गोष्ट आहे तशीच मृत्यू देखील. मी काय नाना काय आम्ही अगदी समृद्ध आयुष्य जगलो. समाधानी आहोत आम्ही. आमची मुलं व्यवस्थित धडधाकट आहेत. आई वडील म्हणून पार पाडायच्या कोणत्याही कर्तव्यात आम्ही कमी पडलो नाही असं आम्हाला तरी वाटतं. त्यांची इच्छा म्हणून आपण कोणतेही विधी केले नाहीत. आणि दुखवटा पण नाही पाळणार. मुलांनो खरंच आत्ताही आणि मी गेल्यावरही दुःख करू नका. आमची कोणतीही आशा अपेक्षा तुमच्याकडून आयुष्याकडून उरलेली नाही. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी सण साजरा करा. केवळ हाच नाही तर इतर सारे सण समारंभ देखील साजरे करा.

‘माई अग पण लोकं काय म्हणतील, अजून पंधरा दिवस पण झाले नाहीत आणि आम्ही सण साजरा कसा करायचा ‘ भीत भीत लेक म्हणाली.

‘ तुझ्या प्रेमविवाहाच्या वेळी जर नाना असंच वाक्य बोलले असते तर तुझं लग्न झालं असतं का? हे बघा मुलांनो काही रूढी परंपरा चालत आल्या म्हणून आंधळ्या सारख्या पाळू नका. नाना ८० वर्ष जगले, आता ते गेले तर तर आपण वर्षभर शोक म्हणून सण करायचे नाहीत, अमकं करायचं नाही वगैरे मलाही पटत नाही. जर नानांची तुम्हाला आठवणच ठेवायची असेल तर त्यांना आवडायच्या त्या गोष्टी करा, त्यांच्या नावानी गरजूंना मदत करा. आठवण ही सहज आली पाहिजे, त्यागातून, काही गोष्टी सोडण्यातून आली तर तो जबरदस्तीचा राम राम असतो. दिवाळीचा सण हा तर खरा अंधारातून रस्ता काढण्याचा. आपल्या दुर्गुणांवर विजय मिळवण्याचा उत्सव! आपल्या घरात मुलबाळ आहेत, त्यांना नाराज ठेवून नानांची आठवण काढलेली नानांनाही चालणार नाही आणि मलाही. आयुष्याचा जोडीदार गमावल्याच दुःख मलाही आहे, पण ते दुःख सतत उगाळल्याने कमी होणार नाही. शरीराने गेले तरी नाना आपल्यातच आहेत, त्यांच्या आठवणी, विचार शिकवण आपल्या सोबत कायम असणार आहेत.’


माई बोलत होती, अगदी मनापासून बोलत होती. आणि मुलांना तिच्या आवाजात, तिच्या चेहऱ्यात नानांचा आभास होत होता. तिच्या चेहऱ्यावर दिवाळीतल्या पणतीचे तेज पसरलं होतं. 

Thursday, October 20, 2016

निखळ आनंदाचा मंत्र

दसरा आणि दिवाळी मधल्या पंधरा दिवसांची मजाच वेगळी असते. एकीकडे नवरात्र, दसऱ्यातून मोकळं होता होता वेध लागत असतात, फटाके, आकाशकंदील, पणत्या, किल्ला, फराळ, नवीन कपड्यांचे. पूर्वी फराळाचे सगळं दिवाळी सोडून क्वचितच वर्षाकाठी केलं जायचं, त्यामुळे दिवाळीला ते करण्यातलं आणी खाण्यातलं नावीन्य टिकून राहिलेलं असायचं. आता वर्षभर दिवाळी असल्यामुळे नवीन कपडे आणि लाडू, चिवडा, चकली, अनारसं चं फारसं कौतुक उरतच नाही. नशिबानं रोजच आकाशकंदील लावत नाही किंवा पणत्या लावत नाहीत म्हणून त्याचं तर ओत्सुक्य अजून टिकून आहे. किल्ला देखील अनेक प्रशिक्षित बालसंगोपनतज्ञांच्या मुलांनी मातीत, पाण्यात खेळल्यामुळे त्यांची मानसिक जडण घडण नीट होण्यास मदत होते  असं ठासून सांगितल्यामुळ परत ‘डिमांड’ मध्ये आले. तरीही माती कुठून मिळणार, सगळं घाण होईल त्यापेक्षा आपण विकत किल्ला आणूया म्हणणारे ही असतातच.

दिवाळी साठी घर साफसूफ करताना अगदी माळे सुद्धा आवरायला काढले. या माळ्यांमध्ये एक जादूची पोतडी असते. अनेक आठवणी, अडगळी, मोसमी सामान शेजारी शेजारी दाटीवाटीन गुण्यागोविंदान राहत असतं. कधी खोक्यात कधी गाठोड्यात असलेल्या या सामानात अनेक तुटक्या, फाटक्या वस्तू असतात. खरंतर आठवणी पुसता येत नाहीत, विसरता येत नाहीत पण आपल्याला उगाच वाटत असतं या गोष्टींशी निगडीत आठवणी विरून जातील, हरवून जातील जर आपण हे टाकून दिलं तर... मग जुनी सांगाडा उरलेली बाहुली, कुठल्यातरी मैत्र दिनाला मिळालेली छोटेशी पोर्सेलीनची भेट वस्तू,  कुठल्यातरी प्रदर्शनातून आणलेल्या काही शोभेच्या वस्तू, जुनी हस्तलिखित, आजीच्या, आजोबांच्या जपून जपून ठेवलेल्या गोष्टी, जुन्या पाईपचा एक तुकडा, कुठला तरी बॉक्सचा उरलेला थर्माकोलचा तुकडा, एक्स्ट्रा म्हणून वर ठेवलेली बादली, फिरायला गेल्यावर तिकडून कोणी तरी आणून दिलेले शंख, आणि असंच काय काय, अजून जपून ठेवलेली शाळेतली कंपासपेटी, भेट म्हणून मिळालेल्या देवी देवतांच्या मुर्त्या, कशाकशावर फ्री म्हणून मिळालेल्या टिनपाट गोष्टी सारी अडगळ दर वर्षी उघडली जाते, प्रत्येक गोष्टीवरून हात फिरवला जातो, काही आठवणींचा उजाळा केला जातो, आणि मग नावापुरत्या दोन चार गोष्टी बाहेर काढून टाकून, झाडू फिरवून घेऊन , आवश्यक तिथं पुसून घेऊन उठत असताना, लेक आला. त्याच्या दृष्टीने हा सारा खजिनाच होता. आजवर त्याला या साऱ्या पसाऱ्या पासून लांब ठेवलं होतं. पण आज त्यांनी घुसखोरी करून प्रवेश मिळवला होता. आणि हा हल्ला परतवण अवघडच नव्हे तर अशक्य होतं. त्याच्या छोट्या डोळ्यात मला जणू विश्वाचं दार उघडल्याचा आनंद दिसत होता. तिथला रिकामं खोकं, पाण्याचा पाईपचा तुकडा, मुर्त्या, काही डबे, काठी, थर्माकोल जुने तुटके आकाशकंदीलकाय काय तरी त्यांनी उचललं त्यानी आणि मी नको नको म्हणत असताना खेळायला घेतलं. खरं तर तो कचराच पण मला टाकवत नव्हता आणि ठेववत ही नव्हतं. पण मुलानी तो प्रश्न काही सेकंदात सोडवला होता. मुलांसाठी आयुष्य किती साधं सरळ असतं. त्यांना कधीच कुठे कचरा दिसत नाही. जे काही मिळेल त्यातून ते नवा खेळ मांडतात. महाग मोलाची खेळणी त्यांना जेवढी प्रिय असतात तेवढीच ही टाकाऊ खेळणी.

थोड्यावेळानी मुलांनी त्या कचऱ्यातून वसवलेलं एक गाव बघून वाटलं. आपल्या मनातल्या कचऱ्यातून, द्वेषातून, रागातून आपण असंच काही का नाही करू शकत? किती गोष्टी धरून ठेवतो. मनाचा माळा भरून वाहत असतो, आपण उगाचच अपमानाचे, भांडणाचे क्षण मनात धरून ठेवून बसलेलो असतो. कधी तरी ते साफ करावे लागतात, नाहीतर जाळी जळमट साचून, धूळ बसून मनाचा पोट माळा भरून रहाटू, तिथे मग चांगल्या आठवणी, भारलेले क्षण, कौतुकाची फुलं काही काही ठेवायला जागाच शिल्लक राहत नसते. मग या दिवाळीला हा मनाचा माळा साफ करायला सुरुवात करूया? कदाचित ही अशी साफसफाई केल्यावर मिळणारा दिवाळीचा आनंद हा निखळ आनंद असू शकेल.