Monday, October 10, 2016

तू झाली आकाशाएवढी....

ती जन्मली तीच विमानाच्या आवाजात, घड्याळ बघण्यापेक्षा त्यांना आकाशातल्या विमानांनीच वेळ कळायची. उठता बसता ऐकू येणारे ते विमानांचे आवाज त्यांच्या आयुष्याचा जणू भाग होते. ते आवाज नसले तर त्यांना काही तरी चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं. लहानपणाचा त्यांचा आवडता खेळ होता विमानाच्या आवाजावरून कोणते विमान असेल हे ओळखायचं. मग खेळ खेळताना सुद्धा ते सगळे वेगवेगळ्या विमानाच्या कंपन्यांच्या नावानीच खेळायचे. तिला विमान बघण्याचं कुतूहल आता उरलं नव्हतं. विमानं बघणं सरावाचं झालं होतं. आकाश व्यापून राहणारी विमानंच तिच्या स्वप्नात यायची. 

आई जवळच्या टॉवर मध्ये कामाला जायची. बाप शुद्धीवर असला तर विमानतळावर जायचा कामाला साफसफाईच्या, ती आईसोबत कधी कधी जायची कामाला, तेव्हा वरून सगळं खालचं इतकं छोटं छोटं दिसायचं की तिला ते सगळं एखाद्या खेळण्याचा भाग वाटायचा. आई ला शाळेचं महत्व माहीत होतं, त्यामुळे ती मारून मुटकून तिला शाळेत पाठवायची. बाप दिसायला अगदी गोरागोमटा पण तिची आई मात्र जरा सावळेपणाकडे झुकलेली. तिनी बापाचा रंगही घेतला नव्हता आणि स्वभावही नाही. त्यामुळे आईचं सांगणं पटायचं पण कधी कधी वस्तीतल्या मुलांबरोबर खेळावस वाटायचं. पण मग आईनी पाठीवरून हात फिरवला नीट समजून सांगितलं की ते ही पटायचं.

सगळ्यांच्याच घरासारखं त्यांच्या घरातही अधूनमधून भांडणं व्हायचीच. महिन्याच्या अखेरीला ओढ गस्ती असायचीच. तिची आई शाळेच्या पायऱ्या चढली होती, लग्न झालं नसतं तर ती देखील अजून काही तरी आयुष्यात बरं करू शकली असती. पण आई वडिलांच्या हट्टापुढे काही चाललं नाही तिचं. लग्न झालं, दारुडा नवरा गळ्यात पडला, त्याला सुधरवायचा तिनी लाख प्रयत्न केला पण सारे प्रयत्न पाण्यातच जात होते. कसं तरी करून तिनी या एका मुलीवर थांबवलं होतं. एकाच मुलाला व्यवस्थित शिक्षण द्यावं, उगाच मुलांची भाऊ गर्दी काय कामाची. तसंही तो घरी काही पैसे देतच नव्हता त्यामुळे त्याला तर बरंच वाटत होतं. नशिबानं त्याला मुलगा मुलगी असं काही वाटत नव्हतं. त्यामुळे त्यानी कधीही तिला त्यावरून बोल लावला नव्हता. तसा तो ही बरा होता, पण आयुशायातल्या नकोशा गोष्टी विसरण्यासाठी त्याल दारूचा आधार घ्यावासा वाटत होता. आणि आधी थोडी कधी माद्धी लागणारी दारू नंतर सवयीची कधी झाली होती, त्यालाच कळलं नव्हतं. मग त्याच नशेत मारलेलं त्याला दुसऱ्या दिवशी आठवलं की वाईट वाटायचं मग तो बायकोला मुलीला सुधारण्याची स्वप्न दाखवायचा, आकाशाएवढी.

ती ७, ८ वी मध्ये असताना कधी तरी बाप गेला, पण आई होतीच खंबीर, तिनी तिची स्वप्न रुजवली होती पोरीच्या डोळ्यांमध्ये. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा आत्मविश्वासही मिळवून दिला होता आईनी. रंग रूपापेक्षा शिक्षण महत्वाचं, शिक्षणाच्या जोरावर काय वाट्टेल ते मिळवता येतं. तिला कायम विमानांचा आवाज भुरळ पाडायचा. तिला कायम वाटायचं विमान आतून कसे दिसत असतील. विमानात बसल्यावर आपण जेव्हा आकशात उडत असू तेव्हा पक्ष्यांसारखं मोकळं, स्वतंत्र वाटत असणार. जग अगदी छोटं इवलालं वाटतं असणार. विमानातून उडणाऱ्या माणसांबद्दल तिला कायम हेवा वाटायचा. कसे नशीबवान असतील हे लोक. मोठ्ठी मोठ्ठी श्रीमंत लोकच जातच असतील अशा विमानांमधून. आपण एकदा तरी विमानातून प्रवास करावा वाटायचं तिला. आणि गंमत म्हणजे हेच स्वप्न तिची आईपण बघायची.

आई कष्ट घेत होती, आणि ती शिकत होती. आईचं आणि तिचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं, आकाशाला साद घालायची होती. जेव्हा स्वप्न मनापासून बघितलं जात, जोपासलं जातं, त्तेव्हा त्याच्या वाटा माहीत नसल्या तरी वाटाडे मिळून जातात, स्वप्न कधी एकाचं नसतं, त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, वातावरणामध्ये, घरादारात सगळे मिळून ते स्वप्न बघत असतात. त्यामुळे स्वप्न पूर्ण होताना आधार असतो या साऱ्यांचाच. आत्मविश्वासाच्या जोरावर तिनी शिक्षण पूर्ण केलं आणि आकाशाला गवसणी घालण्यासाठी तिनी तिचे प्रयत्न सुरु केले, विमानतळाच्या शेजारच्या झोपडपट्टीतली एक मुलगी जेव्हा विमानतळावर हवाईसुंदरी म्हणून जाते, तेव्हा तिनी आधीच जग जिंकलेलं असतं. आकाशाचा रंग तिच्या डोळ्यात उतरलेला असतो. ती एक मुक्त पक्षी झालेली असते. जगण्यातला खरा आनंद तिला उमगलेला असतो, आयुष्याची सार्थकता तिला कोणत्याही पुस्तकात वाचल्याशिवाय माहित झालेली असते.


सारं आकाश व्यापून अवकाशाएवढा झालेला आकाशी रंग म्हणजे स्वप्नपूर्तीचा रंग. आत्मविश्वासाचा रंग, जग जिंकल्याचा रंग असतो.   

Sunday, October 9, 2016

मन जाम्भूळले......

तू गेलास तेव्हा कलती उन्ह होती, आणि मी खिडकीपाशी बसलेली होते,
तू काहीच बोलला नाहीस, भांडला पण नाहीस, साधा फोन पण केलास नाहीस
खरं तर आपलं भांडण मुळी झालंच नव्हतं,
अबोला कोणी धरलाच नव्हता, तरी सगळे संवाद गळून पडले.
पूर्णविराम ना तू दिलास ना मी दिला तरी वाक्य संपूनच गेली
मला तुला सांगायचं होतं आपल्या घरात व्यालेल्या मांजरीच्या पिल्लांबाबत,
दाखवायची होती गुलाबाला आलेली कळी,
पाठवायचे होते माझे मीच काढलेले फोटो,
घालायचा होता वाद अनंतातल्या अणुरेणूंचा,
पुरणपोळीची पैज तू विसरला असलास तरी मी नव्हते विसरले,
पुढच्या वेळी करू म्हणून करायच्या कित्येक गोष्टी राहिल्या की रे तशाच...
तरी मी प्रत्येक वेळी सांगायचे असं उद्यावर काही ढकलू नाही
पण तू उद्यालाच उद्यावर ढकलणारा
तुला कधीच फिकीर नव्हती परवा काय होईल याची
आताचा क्षण ताबडतोब जगणारा तू,
आणि मी पुढच्या कित्येक जन्मांचे आराखडे बांधणारी
मी मुळातून, जन्मजात घाबरट आणि तू शूर वीर सीमेवर जाऊन लढणारा.
मी भाळले तुझ्यावर, तुझ्या शौर्यावर, तुझ्या मोकळ्या हसण्यावर,
तुझ्या प्रेमावर, तुझ्या गालावरच्या खळीवर, तुझ्या रुबाबदार युनिफॉर्मवर
कशावर मी भाळले मला आजपर्यंत कळलंच नाही.
अशाच एका सरत्या संध्याकाळी याच खिडकीत बसून,
फुलत्या जॅकरँडाच्या साक्षीनं आपण वचनं दिली होती एकमेकांना
मी आहे, खिडकी आहे ,आणि रस्त्यावर पसरलेला आहे
जॅकरँडाच्या फुलांचा गालीचा..

मी नाही ढाळले अश्रू, अगदी तू असा समोर शांत झोपलेला होतास,
मी तुझ्याकडे एकटक बघत होते पण तरीही पाण्याचा एक थेंबही नाही पडू दिला.
तू आहेसच अरे इथे माझ्यासोबत, माझं अस्तित्व नाही तुझ्याखेरीज
खिडकीत बसून मी न गाळलेले अश्रुकढ ऐकले जॅकरँडानी
तेव्हापासून तो दर वर्षी वसंतात फुलतो, झुरतो आणि
मग रस्त्यावर जांभळे अश्रू सांडतो...

लाल आणि निळा रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा जन्मतो जांभळा रंग. लाल रंग उष्ण आणि निळा रंग शीत रंग समजले जातात. आधुनिक समजानुसार पुरुषांसाठी निळा रंग तर स्त्रियांसाठी गुलाबी रंग समजला जातो, जांभळा रंग आहे या दोन्ही रंगांचे बेमालूम झालेले मिश्रण. म्हणजे या जांभळ्या रंगाला साऱ्या मानव जातीचा रंग म्हणलं तरी चालेल.


Saturday, October 8, 2016

मनमोराचा पिसारा फुलला...

एकेक करत सगळे मित्र मैत्रिणी उठून गेले आणि ते दोघेच राहिले होते. तशा गप्पा संपतच नव्हत्या. पण असे सगळे एकामागे एक निघून जात होते, तिला जरा विचित्र वाटत होतं, पण तो एकदम कूल होता. आतापर्यंत तिच्या दोन कॉफी आणि त्याचे तीन चहा पिऊन झाले होते. सगळे असे एकदम गेल्यामुळे जरा गप्पांना ब्रेक लागला होता. त्याला काहीच त्यात गैर वाटत नव्हतं. तिनी आपलं दोनदा आटोपतं घ्यायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी अजून एक चहा मागवून तिला थांबवून घेतलं होतं.
तो: बस ना ग काय घाई आहे जायची?
ती: तशी घाई काही नाही, पण असे आपण दोघंच काय गप्पा मारायच्या.
तो: का मी इतका बोअरिंग आहे. बाई मला उत्तम गप्पा मारता येतात हे तुला गेल्या ४ वर्षात कळलं नाही का?
ती: अरे तसं नाही काही पण आपण दोघेच असे गप्पा मारत कधी बसलो नाही ना त्यामुळे म्हणलं तसं. आणि तू तर आपल्या ग्रुपचा CG आहेस.
तो: CG? हे काय नवीन
ती: चीफ गप्पाड्या
तो अगदी खळखळून हसला, की त्याला ठसकाच लागला. तेव्हा तिनी त्याच्या पाठीवर हात फिरवला तेव्हा त्याला अगदी मोरपीस फिरवल्यासारख वाटलं.
ती: मग आता काय पुढच्या महिन्यात ट्रेनिंग सुरु ना?
तो: हो ना आजवर कधी घर सोडून राहिलो नाही आणि आता एकदम नवीन नोकरी, नवीन गाव नवीन माणसं कसं होईल काय माहिती.
ती: तुला काहीच प्रश्न येणार नाही रे, तू असा मित्र जमा करून तिथेही तुझे जग तयार करशील.
तो: तू किती सहज या नव्या गावात आमच्यात मिक्स झालीस. आम्हाला कळलंच नाही, खरंतर तुझी बहिण आमची मैत्रीण पण तू कधी आमच्यात आलीस आमची मैत्रीण झालीस कळलंच नाही.
ती: बर बर. आता मग मैत्रीण म्हणूनच सांगते हा चहा संपला की निघुयात.
जरा इकडे तिकडे बघत चहाचा घोट घेत त्यानी घसा खाकरला आणि शेवटी हिम्मत केलीच,
“ चहाला सोबत दिलीस तशीच सोबत आयुष्यभर देशील का?”
एकदम एखादा बॉम्ब गोळा पडावा तसे त्याचे शब्द तिच्या कानावर आदळले,
“क्काय?” खुर्चीतूनच ती ओरडली.
तो: अग हळू लोकांना वाटेल बिल मी तुला द्यायला सांगितलं आहे.
ती: अरे काहीही काय.
तो: म्हणजे हे माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की दुसऱ्या?
त्याच्या हृदयातली धडधड तिला शब्दातही जाणवत होती. पाण्याचा एक घोट घेत ती त्याच्या नजरेला नजर लावत होती.
ती: अरे म्हणजे तू इतकं अनपेक्षित विचारलं आहेस की मला काहीच उत्तर आत्ता सुचत नाहीये. तुला उत्तर लगेच हवं आहे का?
तो: नाही काही हरकत नाही, तू विचार करायला १० मिनिटं घे, तोवर माझा चहा देखील संपेल.
तिनी जरा वैतागानीच त्याच्याकडे पाहिलं, आणि म्हणाली,
“अरे दहा मिनिटं काय? हा काय शाळेतला एखादा प्रश्न आहे का? सांगेन ना दोन दिवसात?”
“क्काय? दोन दिवसात?” आता ओरडायची पाळी त्याची होती.
कसे बसे दोन दिवसातले ४८ तास त्यानी काढले, आणि त्याच ठिकाणी, तयच टेबलवर तिची वाट पहात बसला होता.
सुरेखसा मोरपिशी रंगाचा कुर्ता घालून, कानात मोरपिसाचे कानातले घालून ती अगदी ठरल्या वेळेला आली होती. त्या दिवशी तिला बघून आपल्या निर्णयाची खात्री त्याला पटत होती, आता ती काय म्हणेल याची त्याला खूप भीती वाटत होती. आयुष्यात आजवरचे कोणतेही निर्णय चुकले नव्हते, शिक्षण ,मग नोकरी सारं कसं आखल्या सारखं चाललं होतं. घरच देखील सारं व्यवस्थित होतं, नाही म्हणण्यासारखं काहीच कारण नव्हतं, पण तरीही पोरींचा काही भरवसा नाही म्हणून तो काळजीत होता.  
नेहेमीसारखा तो चहाचा कप घेत बसलाच होता.
ती: अरे वाह
तो: आता यात वाह काय? मग काय ठरवलास? एकटाच चहा घेऊ कि?
ती: फक्त एका अटीवर की तू चहा पीत असताना मी कॉफी पिईन चालेल ना?
तिचा हात हातात घेतला तेव्हा तिच्या ड्रेसवरच्या मोरपिशी रंगातले मोर त्याच्या डोळ्यात उतरले होते. आता आयुष्यभर प्रेमाचा मनमोर त्याचे रंग त्या दोघांच्या आयुष्यात खुलवत राहणार होता.

मन प्रसन्न असलं की मनमोर फुलतोच, मोराचा पिसारा फुलला की सारे रंग आसमंतात उधळले जातात. जेव्हा लांडोरीला साद घालायची असते तेव्हा मोराला माहित असतं कोणालाही भुरळ घालायची तर पाहिजेत अस्सल रंग, हा घेऊ की तो घेऊ असंच लांडोरीच होत असणार. आयुष्य तरी काय असतं , हे करू की ते करू या प्रश्नांची उत्तरं शोधण तर असतं. रंग तर निमित्त असतात आपल्या भावना दाखवणारे. मोराच्या पिसाऱ्यावर एक रंग नसतो, ती असते रंगाची बेमालूम रंगारंग, म्हणून मोरपंखी रंग हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, तसाही प्रत्येकाचा मनमोर वेगळा असतो.. आजचा मोरपंखी रंग अशा साऱ्या मोरपिशी आठवणींसाठी...    

Friday, October 7, 2016

हळवा हिरवा

मस्त मनासारखी हिरवी गर्द इरकल  साडी नेसून गळ्यात सासू बाईंनी खास घालायला दिलेली मोहनमाळ, आईनी दिलेली ठुशी, इकडच्या स्वारीनी आणलेली नथ, मनसोक्त घातलेलं गजरे, कपाळावर लावलेली चंद्रकोर, कानात सोन्याची कुडी  कशी अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती ती. कौतुकाच्या सोहळ्यात ती तर अगदी गुंगून गेली होती. त्या क्षणी जगातली सर्वात सुखी स्त्री तीच होती. सजवलेल्या झोपाळ्यावर बसून परडी भरवून घेताना तिला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं होतं. हलकेच पोटात होणाऱ्या गुदगुल्यांनी चेहऱ्यावरचं तेज अजूनच वाढत होतं. हातात परडी घेऊन जेव्हा ती टवरलेल्या पोटानी ओटी भरायला बसली होती तेव्हा एखाद्या देवीचं तेजच तिच्या चेहऱ्यावर होतं. नवव्या महिन्यातली भरल्या दिवसांची गर्भारशी ही एक वेगळीच स्त्री असते. ओटी भरायला आलेल्या प्रत्येकिनी आईला, सासूला तिची दृष्ट काढायला सांगितली होती.  

तशी ती सुखीच होती, बाकीच्या मैत्रिणीसारखा तिला सासुरवास काही खास नव्हता, अगदी सासुरवास म्हणावा असं काहीच नव्हत. सासरी कोणी मुलगीच नव्हती त्यामुळे मुलीशी कसं वागायचं ते सासूबाई सोडून कोणाला माहीतच नव्हतं, त्यामुळे लाड ही भरपूर झाले आणि कुचंबणाही बऱ्याच वेळा झाल्या. पण सगळं तसं चांगलच होतं. मग त्यात हे सुख दाराशी आलं, दिवस गेले हे कळल्यापासून तर घरीदारी निव्वळ कौतुक सोहळाच होता. मागच्या दोन पिढ्यात कोणी मुलगीच नव्हती आणि सासूबाईच्या लग्नाआधीच त्यांची सासू गेली होती त्यामुळे सासूचे डोहाळे जेवण काही झाले नव्हते. म्हणूनच त्यांनी सुनेच्या डोहाळजेवणाचा घाट घातला होता. स्त्री मुळातच हौशी असते, त्यात संसाराला फुटणाऱ्या नव्या पालवीचे कौतुक करण्यात कोणत्याही नात्याचे अडसर येत नाहीत. पहिलेपणा असेल तर साऱ्या कुरबुरी , हेवे दावे देखील विसरले जातात. कोंबाला फुटणारी कोवळी पानं मातीतून जेव्हा डोकं वर काढतात तेव्हा तो हिरवा रंग आयुष्यातल्या संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणा देत असतो.

डोहळेजेवणाचा सगळा सोहळा संपून दुसरा दिवस सुरु होण्याच्या आधीच तिला कळा सुरु झाल्या, आणि सुरु झाला एका नव्या जीवाच्या जन्माचा सोहळा. पण ते बाळ रडलंच नाही आणि त्यामुळे नंतर सारे रडले. ते बाळ रडलं असतं तरी सारं घरदार त्याला शांत करायला धावलं असतं पण काही क्षणासाठी देखील ते बाळ रडलंच नाही आणि जीवनाच्या सोहळ्याला मुकलं. मग सारे तिचं रडणं थांबवायला धावले. पहिल्या गोष्टीचं अप्रूप जास्त असतं, इथं तर पहिलं मातृत्वचं गळून पडलं होतं. नंतर सुद्धा कित्येक दिवस तिच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. नंतर काही महिन्यानंतर निसर्गधर्मानी त्याचं काम चोख केलं होतं, दुसरा डाव तिच्या ओटीत पडला होता. पण यावेळी सासुबाईनी सारी सूत्र हातात घेऊन पाच महिन्यापर्यंत कोणालाच कळू दिलं नव्हतं. दुसऱ्या डोहाळेजेवणाची पद्धत नसल्यामुळे यावेळी ते ही करण्याचा प्रश्न नव्हता. घरीच ओटी भरताना त्यांनी सक्त ताकीद दिली होती, हिरव्या रंगाची साडी, चोळी काहीच नको. यावेळी मातृत्व, नशीब जे काही असेल ते बलवत्तर होतं, त्यामुळे मूल रडलं आणि सारं घरदार हसलं.  त्यानंतर घरात अजून दोन मुलं आणि शेवटी घरपण पूर्ण करणारी मुलगी देखील झाली. पण सासुबाईनी तिची ती हिरवी इरकल आतच ठेवून दिली, आणि सक्त हुकुम दिला, यापुढे या घरात ना मुलीचं, ना सुनेचं डोहाळेजेवण होणार. हिरवी साडी कोणीही विकत घेणार नाही, आली तर नऊ महिने कोणीही घालणार नाही. प्रत्येक वेळी विषाची परीक्षा घ्यायची गरज नसते, आधीच्यांनी घेतलेल्या परीक्षेतून आपण शिकायचं असतं.

ती हिरवी रेशमी इरकल कपाटातून काही काळ उन खाण्यासाठी तेवढी बाहेर याची, त्याच्यासोबत जागायच्या तिच्या आठवणी. मुलं मोठी झाली, सुना आल्या, लेकही लग्नकरून  तिच्या घरी गेली पण घरात हिरवी साडी, कापड कधी घेतलं नाही. मुलांना मुलं झाली पण डोहाळेजेवण नाही झालं, मुलीच्या वेळीस तिला लेकीचा कौतुक करावं खूप आतून वाटलं, पण तिच्याबरोबर जे काही झालं ते आठवून ती शांतच बसली. नंतर कधीतरी तिनी ती हिरवी साडीच लेकीला देऊन टाकली, नकोच ती साडी घरात, नकोच त्या आठवणी आणि आतून एक खोटं समाधान आपण लेकीला हिरवी साडी देऊन तिची ओटी भरल्याचं. लेकीनीही आई आजीचा मान ठेवत ती साडी तशीच कपाटात ठेवली होती. आईसारखं ती देखील कधीतरी ती साडी उन्ह दाखवायला बाहेर काढायची, आणि न जगलेल्या भावासाठी भावूक व्हायची आणि ती साडी परत आत ठेवून द्यायची. चांगल्या रेशमी साड्यांना कधीही मरण नसतं. त्या विस्मृतीत जातात, विरतात पण मरत नाहीत. आजीची साडी नातीपर्यंत प्रवास करून आली होती. तशीही ती साडी नेसली गेली होती एकदाच, तिच्यावरचं हळदी कुंकू तसाच होतं, अगदी ५०,५५ वर्षानंतरही त्या नऊवारी साडीची शान टिकून होती.


नातीनं हट्ट केला मी माझ्या डोहाळजेवणाला नेसणार तर हीच साडी. आईनी परोपरीनं विनवलं नको पण ती नव्या काळाची बाप दाखव नाही तर श्राद्ध दाखव मताची. तिनी हट्टानी तीच साडी अगदी आजी सारखीच नेसली, चार ठसठशीत दागिने घातले, तशीच चंद्रकोर लावली, नाकात नथ घातली, अंबाडा बांधून त्यावर वेण्या गुंफल्या. अगदी बघत राहावंसं वाटत होतं, आईनं डोळ्यात काजळ भरताना मुद्दाम विस्कटवलं होतं, आणि एक मोठा काळा ठिपका मानेवर ही ठेवला होता. सगळा सोहळा कौतुकात न्हाहून निघत होता. आजीच्या साडीनी जणू समारंभ जिंकून घेतला होता. तिला मात्र ते आजीचे आशीर्वाद वाटत होते. तिला खात्री होती, कोणत्याही रंगात उद्ध्वस्त करण्याची ताकद नसते, आणि त्यातही हिरव्या रंगात तर शक्यच नाही. सृष्टीतला सगळ्यात अभिजात रंग वाटायचा तिला हिरवा! साऱ्या सृष्टीच्या सृजनाचा रंग. त्यामुळेच नव्या जन्माचा सोहळा साजरा करताना मुद्दाम हा रंग निवडला असणार, अन कधी तरी आपण एखादा प्रसंग त्या रंगाशी जोडतो आणी त्या रंगाशी कायमची कट्टी, किंवा बट्टी करून टाकतो. लेकीची नीट सुटका होऊन बाळ रडेपर्यंत आईच्या जीवात जीव नव्हता. पण यावेळी हिरव्या रंगानी त्याचं निरागसत्व सिद्ध केलं. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप होते, तेव्हा ती साडी हातात घेऊन नवीन आजी तिच्या आईच्या आठवणीनं रडली. तिच्या आईचं अस्तित्व अजूनही त्या साडीत होतं, एकदाच अंगाला लागलेल्या त्या हिरव्या साडीत तिला आई परत भेटत होती. त्या नऊवारीची सहावारी करून तिनी उरलेल्या कापडाची हौशीनं दुपटी केली आणि त्या बाळाला पणजीच्या प्रेमात घट्ट लपेटून घेतलं...!!!!!!!!!!!!!!    

Thursday, October 6, 2016

कथा एका रंगाची...

तिला कायम प्रश्न पडायचा आपल्या आईला माहेर कसं नाही. लहानपणी मामाच्या गावाला जाऊ या हे गाणं ऐकताना तिनी विचारलं होतं, आई माझ्या मामाचं गाव कोणतं? आई काहीच बोलली नव्हती पण तिच्या डोळ्यातला लपलेला अश्रू मात्र तिला आज इतक्या वर्षानंतरही आठवतो. मग कधी तरी एका निबंधात तिनी मला मामा नाहीत आणि माझ्या आईला माहेर नाही असं लिहिलं होतं, तेव्हा बसवून आईनी सांगितलं होतं की तिला पण माहेर आहे, तिलाही भाऊ बहिण आहेत फक्त ते सारे आता दुरावलेत, परत असं कधी लिहू पण नकोस आणि त्या बद्दल विचारू पण नकोस, मला जेव्हा वाटेल की तुला सगळं समजेल तेव्हा मी स्वतःच तुला सांगेन.

बाकीच्या मुलांसारखे आपल्या घरी जास्त नातेवाईक येत नाहीत, क्वचित कधी आले तर वडिलांचेच, बाकी घरी जास्त राबता असायचा मित्र मैत्रीणींचाच, हे जेव्हा तिला आणि तिच्या भावाला लक्षात यायला लागलं तेव्हा ही ते गप्प राहिले होते, कारण त्यांचे आई बाबा बाकीच्या आई बाबांसारखे नव्हतेच. घरात कोणाला कोणाचीही चूक दाखवायचा हक्क होता, लहान मोठे पणा प्रत्येक गोष्टींबाबत केला जात नव्हता. आई बाबाला नावानी हाक मारत होती, आई वर मंगळसूत्र घालायची सक्ती नव्हती, बाबानीच किती तरी वेळा त्यांना अंघोळी घातल्या होत्या, आणि हो आईपेक्षा तोच स्वैपाक चांगला करायचा. आई साड्या, पंजाबी ड्रेस घालायची पण चुकूनही कधी आईकडे पिवळ्या रंगाचे काही नसायचं.

मग आता मुलांना समजेल असं जेव्हा आईला वाटलं तेव्हा आईनी सांगितलं होतं, तिचा आणि बाबाचा प्रेम विवाह होता. दोघांच्याही घरून विरोध होता, पण बाबानी स्पष्टच सांगितलं होतं, तुम्हाला जर हे मान्य नसेल तर तुम्ही अंतर ठेवू शकता, पण बाबाची आर्थिक मदत त्या घराला हवी असल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष अंतर ठेवलं होतं, आईचे मात्र माहेर या लग्नामुळे पूर्णच तुटलं होतं. दोन भावांची लाडकी बहिण होती ती, वडिलांची सगळ्यात लाडकी लेक होती, तिच्या दोन बहिणीपेक्षा हिला कायम प्रत्येक गोष्टीत झुकतं माप मिळायचं, त्यामानाने श्रीमंतीतच वाढली होती, आणि कॉलेज मध्ये बाबा भेटला आणि त्याच्या प्रेमात पडली, प्रेमात पडताना जात, श्रीमंती थोडीच बघितली जाते. तिला वाटलं होतं, तिचे पारंपारिक बाबा तिच्यासाठी बदलतील, पण तिच्या एका निर्णयानी तिचं आयुष्य बदललं पण बाबा नाही बदलले.

लग्नात पिवळी साडी मामा कडून येते, पण तिच्या आई बाबांच्या लग्नात असल्या साऱ्या प्रथा पाळायला कोणीच नव्हतं, तिच्या हट्टाखातर त्याचा विश्वास नसतानाही त्यानी विधी केले होते, पण तेव्हाही त्यांचे काही मित्र मैत्रिणी त्याची आई , आणि लग्न लावणारे गुरुजी इतकेच लोक होते. मग आयुष्यभर आई बाबांची आठवण म्हणून अग्नी सारखाच धगधगता जिवंत असा पिवळा रंग नेसायाचाच तिनी सोडला. आई वडिलांची आठवण विसरली जात नाही पण तरीही आपण आपल्या आनंदासाठी त्यांना दुखावलं याची बोच सलत राहावी म्हणून तिनी स्वतःलाच शिक्षा दिली होती. आईला तिच्या निर्णयाचा कधी पश्चाताप बाबानी होऊ दिला नव्हता पण तरीही एक घर आपल्यामुळे तुटलं याचा त्यालाही त्रास व्हायचा.

तिचं लग्न तिनीच ठरवलं होतं, समाज २०,२५ वर्ष पुढे गेला होता, घरातून विरोधाची शक्यता नव्हतीच बाहेरून कुठून पण तिला फारसे काही ऐकावं लागलं नव्हतं. त्याच्या घरून फक्त एकच अट होती लग्न विधीवत झालं पाहिजे. आपल्याला पटत नाही म्हणून कोणावर आपलं म्हणणं लादणं तिच्या घरी कोणालाच मान्य नव्हतं, त्यामुळे तिच्या बाबानी याहीवेळी माघार घेतली. बायकोला जो त्रास झाला तो लेकीला होऊ नये म्हणून ते जपत होते. तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. आपण लग्नाला पिवळ्या साडीत उभ्या राहू तेव्हा आईच्या जखमेवरची खपली निघेल असं तिला वाटता होतं, तर आईनी एका मानलेल्या भावाला सांगूनही ठेवलं होतं, लेकीला पिवळ्या साडी घेण्यासाठी, आपल्याला जे मिळालं नाही ते लेकीला मिळावं म्हणून.
तिनी जुनं पानं शोधून काढून मामाचा पत्ता मिळवला, मग काहीतरी कारण सांगून त्या गावाला गेली, आणि दत्त म्हणून दारात उभी राहिली. काळ सगळ्या जखमा भरून काढतो, इथं तर व्याज आजीच्या समोर उभं राहिलं होतं. सारं काही विसरायला सगळे तयार होते फक्त प्रश्न होता पुढच्या पावलाचा, जे तिनी तिच्या आईसाठी उचललं होतं. आजोबादेखील मावळले होते. लेकीला भेटायला उत्सुक होते, तिच्या नावाने सोडलेलं तर्पण विसरले होते. मामांच्या घराचा पहिला पाहुणचार घेवून ती तिच्या घरी गेली ती मामाला घरी गेली. आई तर किती तरी वेळ निःशब्द दारातच उभी होती. तिला सुचतच नव्हतं काय बोलावं. ओळख पटली होती पण सुरुवात कुठून करावी हेच माहित नव्हतं.

मग तिच्या लग्नासाठी म्हणून दोन पिवळ्या रंगाच्या साड्या घरात आल्या. आईचा मामा नव्हता पण माहेरची साडी तिनी घेतली आणि त्या धगधगत्या पिवळ्या रंगात तिला सोन्याचं झळाळत सुख मिळालं. बोहोल्यावर जेव्हा ती पिवळ्या साडीत उभी होती तेव्हा तिची आई देखील पिवळ्या साडीत दिमाखात तिच्या आईचा हात हातात धरून उभी होती. एका लग्नात सारं तुटलं होतं, तर दुसऱ्या लग्नात सारं जुळून येत होतं. आयुष्यभर पिवळ्या रंगाची धग आईनी डोळ्यांनी अनुभवली होती, आता पिवळ्या रंगाची उब अंगावर अनुभवत होती.


जाळणारा देखील पिवळा रंगच असतो, आणि सृष्टीचा रथ हाकणाऱ्या सूर्याचा रंग देखील पिवळाच, झळाळणाऱ्या सोन्याचा रंगही पिवळा, पिकल्या गळणाऱ्या पानाचा रंगही पिवळा, हळद ही इवली, डाळही पिवळी, सुर्यफुलही पिवळ, मोहरीचं फुलही पिवळ , पिवळ्या रंगाच्या छटांनी व्यापून राहिलंय आपलं आयुष्य. प्रत्येकीच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सोनेरी होवो असं सांगणारा पिवळा.... !!!!!!!!!!!!!! 

Wednesday, October 5, 2016

निळवाणी

आकाशापासून ते पाण्यापर्यंत व्यापून राहिलेला निळा रंग म्हणजे जगनरंग. डोळ्यांना एक सुखद जाणीव करून देणारा निळा रंग. त्याच्या छटा त्या किती. प्रत्येक निळा दुसऱ्यापेक्षा वेगळा. प्राचीन काळापासून माणसांना सोबत करत आलाय हा रंग... इतका उतरलाय हा रंग जनामनात की कृष्णाला, रामाला देखील रंगलेत निळाईत. सायंकाळ झुकता झुकता घेऊन येणारा निळा रंग, पहाटेला सोबत करणारा निळा रंग, आकाशाच्या अधे मध्ये डोकावणारा निळा रंग, शब्दांना रंगवणारा शाई निळा, मोरापिसातला निळयाचा पसारा सौंदर्य भरून वाहणारा निळा रंग.
निळ्या रंगावर मी बापुडी काय बोलणार, आज केवळ निळ्या रंगाच्या सुरेख कविता...

निळीये मंडळी निळवर्ण सावळी
तेथे वेधलीसे बाळी ध्यानरुपा!
वेधू वेधला निळा पाहे घन निळा
विरहिणी केवळ रंग रसने!
निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ
वेधे वेधू न लाभे वैकुंठीचा!
ज्ञानदेव निळी हृदयी सावळी
प्रेमरसे कल्लोळी बुडी देत!
ज्ञानेश्वर

आज ही ज्ञानदेवांच्या शब्दांमधली जादू कमी झालेली नाही.

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनीळातला एक गोड राजबिंड निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा,

असे नानागुणी निळे किती सांगू त्याचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे,
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग!!
बा भ बोरकर

बोरकर इतक्या सहजतेनं आयुष्यातला निळा रंग समोर आणतात की परत एकदा त्यांच्या कवितेच्या आणि निळ्या रंगाच्या प्रेमात पडतो आपण. त्या निळ्या शब्दांच्या जादूतून बाहेर पडता पडता ग्रेसचे हे शब्द भूल घालतात.

असे रंग आणि ढगांच्या किनारीनिळे उन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचेकिती अर्ध्य देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा?
निळे गार वारे जळाची शिराणी, निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाउले
निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी
किती खोल आणि किती ओल वक्षी, तुझा सूर्य आणि तुझे चांदणे
प्राणातले ऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे....
ग्रेस   

आज सर्वव्यापी निळा रंग जाणीव करून देतो एकाच आभाळाखाली अथांग पसरलेल्या पाण्यासारख्या प्रवाही आयुष्याची.. आयुष्य चालतच असतं, ते काही थांबत नसत, त्यात सोबत करायला सारे भाव, रंग, शब्द असतातच. त्याच शब्दांचे प्रतिबिंब म्हणजे या कविता.

तुमच्याही काही आवडत्या निळ्या रंगात न्हाहिलेल्या कविता असतील तर नक्की टाका प्रतिक्रियेत. 

Tuesday, October 4, 2016

ये लाल रंग कब मुझे छोडेगा.....

मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी काही दिवसांची आणि ती खूप साऱ्या वर्षांची होती. तिचं नाव काढल्याबरोबर आमच्या घरात सारे जण जरा सावरूनच बसायचे. तिचा दबाबा म्हणा, आदर म्हणा किंवा भीती म्हणा पण आजोबांपासून ते माझ्यापर्यंत सारेच काहीही बोलताना, वागताना दोन सेकंद विचार करायचे आणि मगच वागायचे. तिच्यामुळे घर सांधल गेलं होतं. तिच्यात आणि माझ्यात तब्बल दोन पिढ्यांचं अंतर होतं. ती गेली तेव्हा मी काही वर्षांची होते, पण तरीही तिची ती लाल साडीतली पिटुकली मूर्ती डोळ्यातून काही हलत नाही.

तिचं लग्न झालं तेव्हा ती १०,१२ वर्षाची होती, त्या काळात त्याच वयात तर व्हायची तर लग्न. तिचं नशीब चांगलं म्हणून तिला वैद्यकीय शिक्षण घेणारा नवरा मिळाला होता. एका छोट्याशा गावात ती आपलं काचापाणी खेळण्यात, शेगडीवर स्वैपाक शिकण्यात, सोवळ ओवळ शिकत असताना साथीच्या तापाचं निमित्त झालं आणि तिच्या कुंकवाचा धनी अचानक गेला. लग्नात फक्त त्याला बघितलं होतं, आणि न्हाण झाल्यावर एक दोन वर्ष सासरी काढली तेवढाच काय संसाराशी तिचा संबंध आलेला. पहिल्यांदा तिचं केशवपन केलं तेव्हा ती १६ वर्षांचीच होती. आज आत्ता हे लिहिताना देखील माझे हात थरथराताहेत आणि तिनी तर आयुष्यभरासाठी लाल साडी जवळ केली होती.

ती खरं तर माझ्या आजोबांची आत्या, पण तिला भविष्यात कोण बघणार म्हणून मग आजोबा तिला दत्तक गेले आणि तिचा भविष्यकाळ सुरक्षित झाला. समाजात स्थान मिळवण्यासाठी ते टिकवून ठेवण्यासाठी आता तिला आधार होता तिच्या सोवळेपणाचाच. शक्य तेवढे उपवास, देवाचं भजन कीर्तन, कमीत कमी जेवण, तीर्थटन( ते ही स्वतःच्याच शिध्यासह , किंवा देवळांमध्ये जेवायच्या सोयीवर ), केशवपन आणि लाल आलवण तर जगण्याचाच एक भाग होता तिच्या. काळ बदलला तरी तिनी बदलणं शक्य नव्हत कारण तिच्या आयुष्यात काही बदल घडणं शक्यच नव्हतं, तो पर्याय जणू तिच्यावरच्या संस्कारांनी कधीच संपवला होता.

निर्जळी एकादशी करणं चातुर्मासाचे नेम पाळणं, नवनवीन भजनं गाणी म्हणणं हाच त्यांच्या आयुष्याचा परिक्रम होता. साधं सात्विक खाताना, आपली साधनशुचिता आजूबाजूच्या साऱ्यांवर लादणं ह्यात त्यांना कधीच काही गैर वाटलं नाही. मला मिळालं नाही म्हणून दुसऱ्यांना मिळू नये असा भाव नव्हता त्यात तर हे असंच जगायचं असतं अशी त्यांची ठाम धारणा होती. या मानलेल्या मुलाचा संसार त्यांनी त्यांचा मानला होता. त्यामुळे त्या संसारासाठी शक्य होईल तेवढी मदतही त्यांनी केली होती, त्यामुळे आश्रिताचं जीवन त्यांच्या नशिबी आलं नव्हतं. त्यांच्या त्या कष्टाची जाण घरातल्या मुलांनीच नव्हे तर घरात येणाऱ्या सुनांनीदेखील ठेवली होती. कुरबुरी थोड्या अनिच्छेनेच पण घरात पणजी असेपर्यंत तिचे सोवळेओवळे, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी घरात पाळल्या जात होत्या. त्या बरोबर होत्या कि नव्हत्या या पेक्षाही त्या सवयी, प्रथा पाळल्या तर पणजीला आनंद होतो म्हणून पाळल्या जायच्या. तेवढा मान तिनी तिच्या त्या लाल अलावण मधून कमावला होता.

आज सांगून खऱ्या वाटणार नाही अशा लाल साडीतल्या बायकांच्याबद्दल मी नंतर कन्नड साहित्यिक अनंतमूर्थी, भैरप्पा यांच्या पुस्तकांमधून वाचलं. तेव्हापासून तो लाल रंग डोक्यातून जाताच नाही. आजही जेव्हा जेव्हा पणजी आजीची जपून ठेवलेली लाल साडी हातात धरते तेव्हा तिचे न सांडलेले अश्रू मला हाताला लागतात. न जगलेल्या आयुष्याचे खरखरीत स्पर्श अंगावर काटा उभा करतात, अपूर्ण इच्छा आकांक्षाचे कढ हाताला लागतात, मारलेल्या मनाचे ओरखडे कुठे कुठे बोचतात. समाजाने भाग पाडायला लावलेल्या या सक्तीच्या आयुष्याची बोचही कुठे कधी जाणवते. पण तरी या सगळ्याला पुरून उरलेलं समाधान मायेच्या उबेनी बाकी सारं झाकून टाकत!


मला लाल रंग कधी मनापासून भावला नाही कारण माझ्या आजूबाजूचा हा लाल रंग मला कायम आठवण करून देतो अशा आयुष्यांची. खरं तर लाल रंग हा उत्तर भारतात अतिशय शुभ मानतात, नव्या जीवनाची सुरुवात समजला जातो. पण याच लाल रंगात आयुष्य संपवणाऱ्या अनेक विधवा, सधवांसाठी आजचा लाल रंग.....!!!!!!!!!!!!