Wednesday, August 31, 2016

नाळेचा प्रवास



लग्नासाठी अटी सांगताना तिनी स्पष्ट सांगितलं होतं, "मला एकाच गावतलं सासर नकोय!" आईला न सांगता कारण कळलं, पण बाबांना मात्र सांगूनही ते कारण पटत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की लेक लांब नको, रोज बघता आलं पाहिजे. पण मुलीच्या हट्टापुढे ते ही शेवटी हो म्हणाले. अगदी, फोटो, पत्रिका, चहा-पोहे सारं काही साग्रसंगीत होऊन लग्न ठरलं. तो अगदी बाहेरच्या देशातला नाही, पण जरा पलीकडच्या पलीकडचा राज्यातला... भाषा त्यांचीच बोलणारा, पण जिथं जन्मला तिथला धागा जोडून ठेवलेला होता.
लग्नानंतर गावच नव्हे तर भाषा, संस्कृती बदलली होती. सुरुवातीच्या दिवसांत किती तरी वेळा असे प्रसंग आले, की तिला खरंच वाटलं, आपण घेतलेला हा निर्णय बरोबर होता ना...? आई वडिलांपासून, आपल्या गावापासून लांब राहणं, खरंच गरजेचं होतं का? ज्या ज्या वेळी हा विचार मनात यायचा तेव्हा लहानपणचा एक प्रसंग आठवायचा आणि ती स्वतःलाच समजवायची, 'नाही नाही... आपण जे केलंय ते बरोबरच आहे.'

तिचं आजोळ गावातच होतं. एक मामा, एक मावशी - त्याच गावात, एक आत्या, ती देखील त्याच गावात दिलेली होती. आत्या कधी निवांत राहायला यायची नाही, आणि तशीच आई पण आजीकडे कधी राहायला अशी जायची नाही. भेटणंसुद्धा अगदी ठरवून व्हायचं. मोकळा वेळ आहे, म्हणून उभ्या उभ्या भेटून जायची आई आजी आजोबांकडे; तसंच आत्याचं होतं. प्रत्येक घरात असतात तशा कुरबुरी त्यांच्या घरातही होत्या, पण म्हणून काही घरातल्या भांड्याला भांडं लागून त्यांचा ऑर्केस्ट्रा झाला नव्हता. सगळ्यांनी आपापल्या पदराखाली सारं काही झाकून ठेवलं होतं. आताशा पदरच नसतात, त्यामुळे नात्यातले काटे उघड झालेत इतकंच.
ती पाचवी-सहावीत असताना, कधीतरी अगदी ठरवून आई आजीकडे आणि आत्या आमच्या घरी राहायला गेल्या होत्या. दुपारचा स्वैपाक करून दोघी आपापल्या माहेरी गेल्या होत्या. पण नेमकं त्या दिवशी आत्याचा नवऱ्याचा छोटासा अपघात झाला आणि ती तिच्या घरी परत गेली आणि आई आमच्या घरी. आईला इकडची आजी काही म्हणाली नसती, पण जबाबदारी ओळखून तिची तीच धावली. त्यानंतर आत्यानी कधी तोंडातून शब्द काढला नाही आणि आईनी पण ! तिच्या मैत्रिणी माहेरपणाला आल्या की महिना-महिना राहून जायच्या, तेव्हा एखादी रेष हलायची, पण नंतर तर तिला ते ही सवयीचं झालं होतं. पुढे पुढे आईलाही वाईट वाटेनासं झालं होतं; सवयीचं झालं होतं. बाकीच्यांसारखं तिला वर्ष-वर्ष आईच्या हातचं खायला काही थांबावं लागायचं नाही. एखाद्या दिवशी स्वैपाकाचा कंटाळा यायचा आणि बरोबर त्या दिवशी सांगितल्यासारखा आईकडून डबा यायचा. गर्भात जुळलेली नाळ तुटली तरी गर्भात असतेच ना!

कधीतरी अशीच तिची एक शाळूती(शाळूसोबती?) खूप वर्षांनी भेटायला आली होती. जाताना ती तिच्या आईला सोबत घेऊन जाणार होती. आईला काही आठवडे स्वत:कडे ठेवून घेऊन तिचं माहेरपण करणार होती. खूप उत्साहानं ती सांगत होती, तिच्या आईनी कसं घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून माहेर तुटलं, मग सासरी सगळं चांगल होतं, सगळं व्यवस्थित झालं, पण तरीही आयतेपणाचं सुख कित्येक वर्षांत मिळालं नाही. एखाद दुसरा दिवस आराम मिळाला, पण त्यातही एक अपराधी भाव, गंड असायचा - अरे बापरे! आपण बसून खातोय. आईच्या  मैत्रिणीनी तिच्या आईला माहेरपणाला घेऊन जाणार म्हणाल्यावर आई पटकन बोलून गेली, "खरंच गं, मी कधी असा विचारच केला नव्हता." आणि मग एकदम खाली बघत डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली, "मला पण आवडेल हं असं करायला, पण बाकीचे काय म्हणतील.??" ती मैत्रीण जरा जगाला फाट्यावरच मारणारी होती... तीच काय, तिचं आख्खं घरच तसं होतं, त्यामुळे असं काही तिलाच सुचू शकत होतं. "तू काय बाई झाशीची राणीच आहेस, असं तूच करू शकतेस" म्हणत आईनी तो विषय तिथेच थांबवला, पण पुढचे काही दिवस प्रत्येक मैत्रिणीला ती हे अगदी आठवणीनं सांगायची.

लग्न होऊन घरात रुळेपर्यंत, माणसं कळेपर्यंत ५, ६ महिने गेले. मग काय सण, सुरु झाले, मग आईकडे काही ना काही निघत राहिलं, गडबडीत दोन वर्षं निघून गेली, मग चिमुकला जीव त्यांच्या आयुष्यात आला, आईपण आत्ता कुठं नीट समजायला लागलं होतं. तेव्हा नोकरीमुळे आईनीच तिच्याकडं येऊन बाळंतपण केलं होतं. आई होता होता अपेक्षा आणि प्रत्यक्ष या तारेवरच्या सर्कशीची मजा कळायला लागली होती. आई राहून गेली होती, पण आई म्हणून; 'लेक' म्हणून नाही. रुखरुख सलत होती तिच्या मनात.
मग कधीतरी जेव्हा तो सल खूपच डाचायला लागला, तेव्हा तिनी सरळ आईला फोन केला आणि सांगितलं 'सामान भर आणि माझ्याकडं ये. घरच्या सगळ्यांना मी सांगितलंय, तुझी तिकीट पण पाठवलीत, आणि हो तू एकटीच येतीयेस, बाबा मागाहून येतील.' आईला खरं तर कानकोंड होत होतं, लग्नानंतर अशी ती फारशी एकटी कुठं गेलीच नव्हती. लग्नाला गेली तर सोबत कोणी न कोणी असायचंच. उगाच लेकीचा हट्ट, आपल्याला जमेल की नाही, तिला रडायला येत होतं, पण कुठेतरी आत जीव सुखावला होता, असं कोणीतरी तिच्यासाठी खास काहीतरी करत होतं.

आई आली, त्या क्षणी तिनी आईला बजावून सांगितलं, "आई हे लेकीचं घर नाही, तर तुझं माहेर आहे! आजपासून तू निघेपर्यंत मी तुला सारं काही हातात देणार... तू मला देतेस तसं! तुला जेव्हा जे करायचं आहे ते तू कर. कोण काय म्हणतील, याचा बाऊ आता तरी करू नकोस. इतकी वर्षं मनात दाबून ठेवलेलं सगळं करून घे! जगून घे!" आणि मग शब्दाला जागत, तिनी आईला स्वैपाक घरात पाऊल टाकू दिलं नाही, खरेदीला नेऊन जीन्स घेऊन दिली, रस्त्यावरची पाणीपुरी स्पर्धा लावत खाल्ली, रात्री जागून पिक्चर बघितले. कॉलेजच्या मुली जे जे करतात ते ते सगळं करून पाहिलं.  मग तिनी सवाष्ण म्हणून आईला गरम गरम पुरणपोळी खायला घातली, त्या क्षणी तिला आईच्या जागी खरच एक छोटी दोन वेण्या घातलेली मुलगी दिसली. त्या दिवशी न जेवताच तिचं पोट भरलं होतं.

लेक व्हावी म्हणून आईनी नवस बोलला नव्हता, पण पहिला लेक झाल्यावर ती हिरमुसली होती, दुसरी लेक झाली तेव्हा आई खऱ्या अर्थानं खुश झाली होती. आज त्याच लेकीकडे माहेरपण घेताना तिला आयुष्य जगल्यासारखं वाटलं, लेकीलाच कळू शकतं आणि जमू शकतं, अशी गर्भात तुटलेली नाळ अशी परत जुळवून देणं; आईपणाचा उलटा प्रवास घडवून आणणं !!!!!


Sunday, August 7, 2016

सहवेल



अनोळखी शहर, अनोळखी देश आणि आपण तिथे जाऊन भुतासारखं राहायचं. लेकीची अडचण नसती तर चुकूनही इकडे कधी आलो नसतो, फिरायला जाणं गोष्ट वेगळी, आणि हे असे काही महिन्यांसाठी राहायला येणं गोष्ट वेगळी. तसे इथं सारे काही मशिनाधारित. आयुष्याचेच एक मशीन होऊन जाते, त्यात वीकचा, वीकेंडचा, लाँग वीकेंडचा असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. सगळ्यांचे जगणं एका साच्यातल्या गणपती सारखं वाटतं मला... काहींचा रंग वेगळा, कुठे उंदीर पिटुकला, कुठे उंदीर डावीकडे, कधी सोंड मध्ये कधी सोंड उजवीकडे, कधी हातात मोदक, कधी लाडू. बाकी हात पाय, भाव तोच. लेकीला सगळा अनुभव आहेच इथं राहण्याचा, तशी ती पहिलटकरीण त्यामुळे थोडे घाबरेल असा हिचा अंदाज, तर लेकीचं म्हणणं अग मी इथं क्लासेस ला जाऊन आलीये, मला माहिती आहे सगळं. मग आईपणातून आलेल्या अनुभवातून तिनी तिच्या हो ला हो म्हणलं.

३८ आठवड्यापर्यंत लेक जाणार होती कामाला. तशी ती अगदी आधी नाही पण तारखेच्या ३ आठवडे आधी आली होती. मग डोहाळजेवणाचा सोहळा देखील पार पडला. लेकीच्या नजरेत आई किती करतेस असं कौतुक तर हिच्या नजरेत बाई ग आई होणार तू याचं कौतुक. जावई कायम भलाच होता, असतो आणि राहणार, त्याच्या होणाऱ्या कौतुकाची आता त्यालाही सवय झाली होती. आईशी सतत भांडणारी मुलगी आता आईचं थोडं ऐकायला लागली पाहून तिला मनातल्या मनात हसायला यायचं. म्हणजे आपण रूढी परंपरा म्हणून सांगायचं आणि तिनी पहिले ह्या काहीही तुझं म्हणत ते मोडून काढायच मग इंटरनेटवर बघत त्यातलं विज्ञान, कारण समजून आपल्यालाच सांगायचं सगळं कसं शिस्तीत चाललं होतं. बाप आला नाही म्हणून रुसवे फुगवे काढून झाले, पण आई आल्याच्या आनंदाला कर्तव्याची झाक होती.  

अगदी मनाला हज्जारदा समजावलं होतं तोंडातून कुठलाही शब्द काढायचा नाही, त्यांचे, घर, त्याचं मूल, त्याचं आयुष्य आहे. आपण फक्त काळजीवाहू! लहानपणापासून आपण कित्ती प्रयत्न केला होता, हिला समजून घ्यायचा. आपल्या आईनी जे केलं नाही ते आपण करायचा प्रयत्न केला होता. पण ही बया कायम बाबा एके बाबा. तिच्यासाठी सगळं आपण केलं तरी बाबाची टेप कधी थांबायची नाही. सुरुवातीला वाटणारं कौतुक, नंतर त्रागा झालं, पण तिला त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. वयात येताना आपण अगदी जवळ घेऊन सगळं समजावलं तर हिनी खांद्यावर हात ठेवून, अग मला माहित आहे हे सगळं सांगून आपला सगळा फुगा फुस्स करून टाकला होता. शहाणी झाल्यावर, हो आई हाच शब्द वापरायची, त्यामुळे कधी आपण शहाणी होतोय असं वाटायचं तेव्हा, त्यानंतर तरी ही बाबा पार्टी सोडून आई पार्टी मधे येईल असं वाटलं होतं, पण तेव्हा तिला मैत्रिणी मिळाल्या होत्या.
पुस्तकं, सिनेमे पाहून तिला कायम त्यातल्या सारखी मैत्रीण आई व्हावंसं वाटायचं, पण मैत्रीण व्हायचा प्रयत्न करतानाही आई मध्ये मध्ये लुडबुड करायचीच, म्हणजे मग एखाद्या मुलाचे नाव ३, ४ दा आलं की त्याचा सगळा इतिहास विचारून व्हायचा, उशीर होणार म्हणल्यावर किती वाजतील, कोणाकडे, मध्येच एखादा चुकून लागलेला फोन यायचा, जरा चांगला कपडे केले तर का, केले आणि जरा गबाळा वेश असला की अग हे काय, प्रेमभंग झालाय का? तिच्यातली मैत्रीण किती वेळा भांडायची तिच्यातल्या आईशी, पण या सगळ्याचाच परिणाम एकच बाबा+मैत्र पार्टी नंबर १, आई पार्टी नंबर २. कॉलेजला गेल्यावर , नोकरी करायला लागल्यावर तर आई पार्टी अजूनच रसातळाला जात होती. लग्नाच्या नुसत्या विषयानीदेखील फोन कट केला जायचा, मग एक दिवशी बाबा कडूनच आईला होणाऱ्या जावयाबद्दल कळाल. आईला वाईट वाटलं आपण पण आपल्या आई सारखंच झालो की काय, कडक, शिस्तीच्या! लेकीनं घाबरून आपल्याला न सांगता बाबाला आधी सांगावं? आईचं मन जरा खट्टूच झालं.आधी नाही पण किमान सोबत बसवून तरी सांगायचं होतं तिनी लेकीला कधीतरी खंत बोलून दाखवली. त्यावर ती फक्त हसली, हात हातात घेऊन म्हणाली, असं काही नाही गं, घरी आल्यावर बाबा पहिले दिसला म्हणून मी आधी त्याला सांगितलं. जावई मात्र लाखात एक शोधून काढला तिनं लेकीपेक्षा जास्त गुळपीठ जमायचं त्याच्याशी. आता निवांत वेळ असताना तिला जाणवत होत्या तिच्या आणि तिच्या आईच्या आयुष्यातलं सारखेपण. तिच्या बाबांशी काही मैत्री नव्हती पण आईपेक्षा कांकणभर प्रेम बापावर जास्त केलं गेलं होतं. पोरींनी पण बरोबर तेच जनुक उचलले होते.

शेवटच्या दिवशी कामाला जातानाच लेकीचा चेहरा जरा मलूल वाटत होता, पोटही उतरलेलं दिसत होतं. पण कामावर जायचा तिचा हट्ट होता, शेवटी तोडगा म्हणून ती म्हणाली, मी पण येते तुझ्यासोबत, मी जवळपासच्या बागेत नाहीतर कुठेतरी बसून राहेन , मला काय इथं बसायच्या ऐवजी तिथं बसेन. हो नाही करता करता तयार झाली. आईपणाच्या म्हणून काही खास खुणा असतात, जोडलेल्या नाळेच्या काही खुणा अजूनही उदरात असतात, त्या सुप्तपणे जाणीव करून देत असतात लेकरांच्या खुशालीची. कसाबसा तिनी शेवटचा दिवस ढकलला, आणि खाली आल्याबरोबर आईला सांगितलं, आपण सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊ. नवऱ्यालाही तिकडचं यायला सांगितलं.  
रस्त्यात आईनी तिचा, की तिनी आईचा हात घट्ट धरला होता कोणास ठाऊक. मग पुढचा काही काळ कळा सोसण्यात गेला. आईपणाच्या दारात पाउल टाकताना मात्र तिला तिच्या हक्काच्या मित्राची सोबत हवी होती. ती पिटुकली बाहुली घेऊन जावई बाहेर आला तेव्हा तिच्या अश्रुनी तिनी त्या बाळाला तीट लावली. पण ती आसुसली होती लेकीला भेटायला. हाच क्षण होता परत एकदा मैत्रीचा धागा बांधायचा, श्रांतलेल्या लेकीचा हात हातात घेऊन तिनी शब्दात मांडता न येणारं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवलं होतं.

आईपणाच्या धाग्यात दोघी आता गुंफल्या गेल्या होत्या. त्या धाग्यातला मैत्रीचा पदर आता तरी लेकीला कळावा म्हणून ओळखीचं जग सोडून धडपडत ती आली होती या अनोळखी लोकांमध्ये! आपल्याच पोटच्या गोळ्याला न कळलेली आपली मैत्री दाखवून द्यायला.

बाळंतपण नेटानी सुरु होतं, आजी नातीचं खास जग बसत होतं, लेकीशी मैत्री होता होता, नातीशी सहवेल मात्र आपोआपच साधली जात होती. लेकही आईच्या भूमिकेत गेली होती आणि आता आईतली मैत्रीण तिला नव्यानं उलगडत होती. मैत्रीला वय नसतं, नातं नसतं, भाषा नसते, अपेक्षा नसतात, मैत्रीत नेहमीच सगळं आलबेल नसतं, मैत्रीत फक्त गोडवा नसतो, असं खूप सगळं नसूनही खूप काही असतं, सगळं काही असतं तेच बहुदा मैत्री असावं...!!!!

Sunday, July 31, 2016

इनसाईड आऊट

त्या शाळेतला पहिलाच दिवस होता, बाबांच्या या अशा सारख्या बदल्यांना खरच ती आता कंटाळली होती. तसे बाबा ही बदली रद्द करायचा प्रयत्न करत होते, पण तसे काही झालं नाही, ती ८ वीत होती, बदलीचे शहर आधीच्या गावापेक्षा मोठं होतं जिल्ह्याचं गाव होतं, आजीचे गाव पण तिकडून तासभराच्या अंतरावर होतं, त्यामुळे हो नाही करता करता त्या गावात जायचं ठरलं. मग बँकेतल्याच लोकांच्या सल्ल्यानी घर आणि शाळा ठरवून टाकली. इकडचं घर अगदी मोकळं ढाकळ होतं, पुढे अंगण, मागे झाडं, जवळपास पाच, सहा वर्ष वर्ष कशी गेली कळलंच नव्हतं. त्या वर्षात ती, तिची बहिण झाडावर चढायला शिकल्या, पोहायला शिकल्याहोत्या कैऱ्या, चिंचा पाडण्यात तरबेज झाल्या होत्या. त्या गावात त्यांना खरा भारत, लोकं बघायला मिळत होती, शेती कशी करतात हे टीव्ही वर किंवा पुस्तकात वाचायची गरजच पडली नव्हती. निसर्गाचं शिक्षण घेत होत्या त्या. शाळेत पहिला नंबर तिचा ठरलेला होता, मग ती परीक्षा असो व स्पर्धा, पण मैदानावर मात्र ती खूप काही शिकत स्पर्धेच्या बाहेरच होती, ते सगळं तिला आवडत होतं, न आणि ण च्या शुद्ध भाषेच्या गुंत्यात न पडणारी मैत्री तिला खुणावत होती, कोणाच्याही घरून येणाऱ्या वासाबरोबर वानोळा ही यायचा, घराचा स्वैपाक फक्त एका घरापुरता नाही तर शेजार पाजारच्या साऱ्यांसाठी असायचा, हे ती बघत होती. आयुष्य शिकत होती. रात्रीचे दिवे, असो नसो, माणसं मात्र हाक मारल्यासरशी धावून येतात हे पाहत होती. आणि तिकडून एकदम काडेपेटीसारख्या बिल्डींगमध्ये राहायला गेल्यावर तिला रडूच कोसळलं. ह्या अशा घरात राहायचं? रांगोळी काढायला जागा नाही, फुलांसाठी जागा नाही. आपण परत आपल्या जुन्या घरी जाऊ, तिनी आणि तिच्या बहिणीनी एकच घोष लावला होता. तिथल्या मैत्रिणींची नावं काढत काढत रात्र कशी तरी काढली. सकाळी बाबांना तिनी जाऊन सांगितलं, तुम्ही सगळे रहा इथे, मी त्या गावात राहते माझ्या मैत्रिणीच्या घरी. आई नवीन घर लावता लावता आधीच वैतागली होती, तिला तिनी एक धपाटा घातला आणी परत तिच्या कामाला गेली. त्याच दिवशी तिच्या शाळेचा पहिला दिवस होता, नकोच वाटतं होतं सगळ. बाबांनी जवळ घेतलं, आणी समजावलं काहीतरी, मग म्हणाले, चाल एक चक्कर मारून येऊ स्कूटर वर. आणि मग तिला एका दुकानात नेऊन छान पेन, कंपास बॉक्स घेऊन दिला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आतापर्यंत झिरपत नव्हतं.
शाळेची मोठी इमारत बघूनच तिला दडपायला झालं, आपला वर्ग कसा ओळखायचा? शाळा घराजवळ होती म्हणून किमान रस्त्यात हरवायची तरी भीती नव्हती. कशी बशी विचारत शोधात ती वर्गात पोहोचली, आपल्यापेक्षा चटपटीत मुलं, मुली पाहून ती अजूनच बुजली, तशीच खाली मान घालून जो बाक रिकामा दिसला तिथं जाऊन बसली,  कोणी विचारलं तर जेम तेम पुटपुटत्या स्वरात नाव सांगायची. शिक्षकांपैकी काहींनी तिची दखल घेतली काहींनी विचारलंही नाही, तशीही शाळा सुरु होऊन दोन आठवडे झाले होतेच. तिला जुन्या शाळेची बचकभर आठवण आली, दुपारी एकटीच बसून डबा खाताना तिला भयंकर रडू कोसळत होतं. उत्तर माहीत असूनही द्यायचं नाही असा तिनी चंगच बांधला होता, कोणत्याही गोष्टीत भाग घ्यायचा नाही, विचारल्याशिवाय बोलायची नाही, इतर कोणाशी मैत्री तर बिलकुल नाहीच नाही, ती जशी नव्हती तशी ती व्हायचा प्रयत्न करत होती. उगाचच चिडत होती, आधी किती छान गायची इथे गाण्याच्या क्लास ला जायला पण नाही म्हणाली. छोट्या छोट्या गोष्टीवरून हिचं वाद घालणं, आईचे रागावणं, मग चिडणं, त्यावर उतारा म्हणून हिचं रडणं हा त्यांच्या घरातला रोजचाच कार्यक्रम होत चालला होता. बाबा मध्ये पडून सावरू बघत होते पण ती काही बधायला तयार नव्हती. तेरा, चौदा वर्षाच्या तिच्या वर्गातल्या मुली कशा छान केसांचे भंग पाडायच्या, शाम्पू, पिना, पावडर अशा कशाबद्दल बोलायच्या, पण तिला ते काही माहिती ही नव्हतं आणि त्याबद्दल बोलावसं वाटायचंही नाही. तिच्या लांब वेण्या नको वाटायच्या, गायला नको वाटायचं, सगळ्या जगावर रागवावस वाटायचं.
मग कधी तरी एका मोकळ्या तासाला त्या बाई त्यांच्या वर्गावर आल्या, त्या म्हणे मोठ्या वर्गाना शिकवायच्या. खांद्यापर्यंत रुळतील असे मोकळे सोडलेले कुरळे केस, त्यावर दोन छोट्या पिना, एका पिनेत गजरा माळलेला, आकाशी रंगाची साडी घट्ट चोपून बसवलेली, कपाळावर छोटीशी चंद्रकोर लावलेली. आणि तोंडभर हसू.  तिला त्यांच्याकडे बघतच बसावसं वाटलं. का कोणास ठाऊक तिला त्यांच्याशी नाळ जुळल्यासारखी वाटली. त्या दिवशी त्यांनी वर्गात कविता सांगायला सुरुवात केली, आणि तिच्याही न नकळत तिचा हात वर गेला,जवळ जवळ महिना दीड महिन्यांनी तिला वर्गात काही तरी बोलावसं वाटलं. या नव्या बाई शेतकऱ्यांची कैफियत सांगत होत्या कविता, कथा, अनुभव सारे अनुभव देत होत्या, तिनी एकदम हात वर करून बाई मी काही बोलू का?
आख्ख्या वर्गानं मागं वळून पाहिलं ही आता काय बोलणार, बाई इतक्या छान सांगताहेत आणी आता हिचं काय मधेच, सारा वर्ग तिला शिष्टाम्बिका म्हणायचा. बाईनी तिला बोलायला सांगितलं, मग ती त्यांचे आधीच गाव, तिथल्या मैत्रिणी, त्या कशा शेतात काम करायच्या, त्यांच्या वडिलांना कसा कधीच नीट मोबदला मिळायचा नाही, मग वर्गातल्या एका मुलीच्या वडिलांनी केलेली आत्महत्या, हे सगळं सांगताना तिचा सगळा बांध फुटला. आणि मग ती रडतच खाली बसली, बाईं तिच्यापर्यंत आल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, त्या स्पर्शामुळे तिला अजूनच आश्वस्त वाटत होतं. त्या दिवशी पहिल्यांदा तिला मोकळ वाटलं. मग हळू हळू सगळंच गाड रस्त्यावर आलं, ३, ४ दिवसात कधी तरी तिला पहिलं न्हाण देखील आलं. आणि मग सगळाच गुंता सुटल्यासारखं वाटलं. ती गायला लागली होती, मैत्रिणी जमवायला लागली होती, कोशातून फुलपाखरासारखी बाहेर पडली होती.  हे गाव, घर , ही शाळा सगळं तिला आवडायला लागलं होतं.
खूप वर्षांनी मुलीसोबत इनसाईड आउट पिक्चर बघताना तिला वाटलं अरे ही तर माझीच गोष्ट आहे, यांना कशी कळली. मीच तर आहे ती मधेच हसणं, खुश होणं विसरलेली मुलगी. मीच तर होते ना अशी सगळ्या भावनांचा गुंताडा करून जगावर रुसलेली मुलगी. आउटसाईड काहीही असलं तरी इन सगळं एकच असतं, सगळ्यांची गोष्ट येऊन जाऊन एकच असते.
तुकाराम म्हणतात तेच खरं आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरू कोटी कोटी, परि अंती ब्रह्म एकले... !!!!!!



संदर्भ : इनसाईड आऊट 
https://en.wikipedia.org/wiki/Inside_Out_(2015_film)
     

Thursday, July 28, 2016

जुनी कोणी तरी

सखे ग ,
धावत ये पूर्वीसारखी,
आणि मार मिठी पूर्वीसारखीच,

जेव्हा,
आपल्या दोघींव्यतिरिक्त जगच नव्हतं तेव्हा,
प्रत्येक क्षण सोबत असावासायचा तेव्हा,

निःशब्दतेतही भगवदगीता सापडायची तेव्हा,
माझ्याआधी तुझं नाव आठवायचं तेव्हा,
फार पूर्वी नाही पण,
आपण पहिल्या प्रेमात होतो तेव्हा,

जेव्हा,
शब्दांचे अर्थ नव्याने कळत होते, तेव्हा,
फुलपाखरांचे रंग आपण चोरत होतो तेव्हा,
आरश्यांची नव्यानं ओळख झाली होती तेव्हा ,
स्वतःच स्वतःला नव्यानं भेटत होतो तेव्हा,

या सगळ्या तेव्हांना भेटायचीस ना तशीच भेट कधीतरी..

आताही भेटतेस तू कधीतरी
पण आता ना
आपल्या जगात तू आणि मी सोडून सगळे असतो,
प्रत्येक क्षणावर नात्यांचे हिशोब असतात,
शब्दांमध्ये अर्थही दडलेले असतात,
बोलतो आपण अर्थाचं पण त्यातून शब्द निसटलेले असतात,

जुन्या प्रेमाच्या कथा कधीच विसरतात,
फुलपाखराचे रंग उडून जातात,
आरसा फसवतो हे लक्षात येतं,
सोबतच्या आठवणीही विरतात

आताही भेटतेस तू त्याच मैत्रिणीच्या हक्कानं
गळ्यातही येऊन पडतेस पूर्वीसारखीच
समोर फक्त मी असले तरी
विचारात मात्र मी नसते.






Sunday, July 24, 2016

कागदावरच प्रतिबिंब

ती तेव्हा एक चौदा पंधरा वर्षाची असावी, घरी कोणी नव्हतं, अभ्यास करून झालेला होता. मोठ्या जबाबदारीनं तिच्यावर घर सोडलं होतं. तिच्या आईचं म्हणणं होतं, ही तर अगदी सद्धी गोष्ट आहे, आपल्या घरात आपल्याला कसली भीती?, त्यामुळे अगदी १० वर्षांची असल्यापासून आई तिला अशी एकटी सोडून जायची, कधी गरज म्हणून तर कधी एक नवीन अनुभव शिकवण्यासाठी. त्यावेळी टीव्ही वर आजच्या सारखं २४ तास कोणी ना कोणी नाचत, बोलत नसायचं, जेवायच्या, झोपायच्या वेळेसारखा टीव्ही पण ठराविकच वेळ असायचा.
त्या दिवशी दुसरं काही करण्याचा मूड नव्हता म्हणून तिला घर आवरण्याची हुक्की आली. अशी फार कमी वेळी तिलिया हुक्की यायची, पण आली तर मग इकडचं घर तिकडं व्हायचं. त्या ही दिवशी तिनी तिच्या कपाटापासून सुरु केलं, कपडे सगळे नीट ठेवून झाल्यावर, आज आई बाबांचे कपाट ही आवरावं असं तिला वाटलं. आईच्या साड्या नीट घडी केलेल्याच होत्या, तिच्या कपाटासारखा सावळा गोंधळ नव्हता तिथं, पण मग साडीच्या कप्प्याच्या खालचा कागद बदलताना तिला तिथं काही दहा , वीस रुपयांच्या नोटा मिळाल्या आणि अगदी हसूच आलं, तिच्या दप्तरात कधी कधी तिला असेच आठ आणे, एखादा रुपया मिळायचा तो ही तिनीच कधी तरी टाकलेला असायचा, पण अनपेक्षितपणे असे पैसे मिळण्यातला आनंद वेगळाच होता. तिच्या या सवयीचं मूळ आता तिला कळल होतं. साड्या नीट लावून झाल्या मग ब्लाऊजचा कप्पा लावता लावता तिला एक पिशवी मिळाली, अगदी उत्सुकतेनं तिनं ते उघडलं, त्यात काही पत्र दिसत होती. खरंतर आई नी खूप वेळा सांगितलं होतं अशी कोणाचीही पत्र, डायरी न विचारता वाचू नये, पण आईच्या कप्प्यात अशी कोणाची पत्र असावीत. ती पण अशी जपून ठेवलेली. तिनी मनातल्या मनात देवाची माफी मागून ती पत्र वाचायला सुरुवात केली. लग्नाच्या आधी तिच्या बाबांनी तिच्या आईला लिहिलेली, ४, ५ पत्रं होती ती. किती वेगळे होते बाबा त्या पत्रांमध्ये, अगदी एखाद्या प्रियकारासारखेच, तिला खूप भारी वाटलं. त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या पेन नी ती पत्रं लिहिली होती, मग कुठे फुलं होती, एका पत्रावर तर मोगऱ्याचे अत्तर लावलेलं होतं, आईला अत्तरं आवडतात हे तिला त्या दिवशी नव्यानंच कळत होतं.
आई वडील म्हणून आपण आपल्या आई वडिलांना अगदी गृहीत धरून चालतो, ते एकमेकांशी किराण सामान, नातेवाईक, मुलं, पाहुणे यावरच बोलत असतील असा आपला ठाम विश्वास असतो, पण मग ते प्रियकर प्रेयसी नसतात का? फक्त समाजानी गाठ बांधून दिली म्हणून एकत्र राहायचं बंधन त्यांनी स्वीकारलं असतं का? हे काही कळण्याचं ते वयही नव्हतं, पण तिला अगदी फुलावर झुलल्यासारखं वाटत होतं.   आई वडिलांना एक वेगळीच ओळख त्या दिवशी होत होती. प्रत्येक गोष्टीत प्रेम शोधण्याचेच दिवस होते ते, आई वडिलांवर अजून जास्त प्रेम वाटायला लागलं होतं.
कोणाला कळायच्या आधीच तिनी तो सगळा मौल्यवान ऐवज परत जशाचा तसा ठेवला, आणि आईचे कपाट लावल्याच्या सगळ्या खुणा मिटवून दिल्या. पण आपण पण आपल्या नवऱ्याला अशी पत्रं लिहायची, आणि त्याच्याकडून लिहून घ्यायची असं तिनी ठरवलं होतं.
प्रेमात पडायचं वय आहे ह्याची सगळीकडून जाणीव झाल्यावर सिने अभिनेते, क्रिकेटपटू असा आसपासच्या तमाम मदनांवर भाळून झाल्यावर तिला कॉलेजमधल्या प्रेमाची आठवण झाली, कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, कोणाबरोबर तरी फिरणं म्हणजे प्रेम, कोणालातरी आपण आवडणं म्हणजे प्रेम, सारखं बघत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम अशा प्रेमाच्या अनेक व्याख्या अनुभवून होईपर्यंत कॉलेज संपलं होतं, पण हात अजूनही मोकळेच होते.
ठरायच्या वयात लग्न ठरलं, इंटरनेट वरून फोटो पाहिले, एकमेकांशी chat करून मत जाणून घेतली, आणि मग भेटून बोलून सावरून हो म्हणलं. साखरपुडा, लग्न यामध्ये असलेल्या ४, ५ महिन्यात फोन वर सतत बोलणं होतंच, भेटणं तर must होतं. लग्न अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपल आणि तिला एकदम घरी कपाट बघून आठवण आली आई बाबांच्या लग्नाआधीच्या पत्रांची. अरे हे तर करायचंच राहिलं.  पत्र फक्त परीक्षेत नाहीतर सरकारी ऑफिसमध्ये लिहिली जात होती तेव्हा, पण तरीही तिनी निश्चयान एक तरी पत्र लिहायचा चंग बांधला. काळ किती बदलला होता, बाबा साखरपुड्यानंतर आईला थेट लग्नात भेटले होते, आणि फोन वगैरे तर तेव्हा फक्त चित्रपटांमध्येच दिसायचे. बाबांनी त्यांच्या अपेक्षा, घराच्या माणसांची ओळख असं काय काय लिहिलं होतं पत्रात, पण आता आपण काय लिहायचं, जवळपास रोज त्याला भेटणं होत होते, बोलणं तर स्वतःशी होत नाही इतकं त्याच्याशी होत होतं, मग आता या सगळ्यातून असं उरलेलं काय आहे जे आपण पत्रात लिहायचं? मोठ्ठा प्रश्न घेऊन ती पत्र लिहायला बसली. पण जसं लिहायला सुरु केलं तसं अगदी सहज सुचत गेलं, लिहित राहिली इमेल राहील कॉम्पुटर मध्ये कदाचित जगाच्या अंतापर्यंत मिटणारही नाही, पण त्याला गंध नसणार हाताचा, त्याला स्पर्श नसणार प्रेमाचा. आपली मुलं मोठी झाल्यावर विचारणार नाहीत आपल्याला आपली गोष्ट, आपल्या लग्नाची गोष्ट, किंवा कदाचित आपणच त्यांना सांगू how I met your mother. जगातल्या ९९.९९ % सर्वसामान्यांसारखी आपली सामान्यळू गोष्ट. फोटो जपतात काही खास क्षण तशीच पत्रही जागवतात जुन्या आठवणी, ती मजा नसते इमेल, मेसेज त्यातल्या स्माईलीमध्ये. माझं तुझ्यावरच प्रेम दाखवायचा एक मार्ग असेही समज या पत्राला. अक्षर पुसत होतील, पान पिवळ पडेल, पण पत्राची आठवण मात्र कधीच संपणार नाही...
ती लिहित होती, खूप वर्षांपासून साचलेले, आत मध्ये दाटलेलं प्रेम ती कागदावर उतरवत होती आपल्या पोरांना रोमिओ ज्युलीएट आई बापामध्ये दिसावेत म्हणून लिहित होती.....    


Monday, July 18, 2016

वेण्यांचे झाड


मैत्री म्हणजे हे कळायच्या आधीच किंवा मैत्री हा शब्द उच्चारायच्या आधीपासूनच होती तिची माझी गट्टी. ती माझी आणि मी तिची असा आमचा मंत्र होता तेव्हा. बहिणी म्हणा मैत्रिणी म्हणा, सख्या म्हणा काही फरक न पडण्याचं वय होतं ते. कोणतेही रुसवे फुगवे २ मिनिटांच्या वर न उरण्याचा काळ होता तो. आता वयही वाढलीत आणि निरागसता कधीच हरवलीये, पण तरीही काही हळव्या आठवणी आजही मनात पिंगा घालतात आणि डोळ्यात पाणी आणतात.
मैत्रीण माझी लांब सडक केसांची. मस्त मोठ्या दोन वेण्या मिरवणारी. कमरेपर्यंत रुळणाऱ्या लांब वेण्या हीच खरी तिची ओळख होती. कित्येक क्षण गुंतलेले होते तिच्या त्या लांब वेण्यांमध्ये. कधी व्हायच्या त्या वेण्या शेपूट , कधी असायच्या झाडू, कधी असायच्या ओढण्या, कधी असायच्या जोड साखळी. मोकळ्या केसांपेक्षाही जास्त आवडायच्या त्या वेण्या, अगदी जवळच्या वाटायच्या त्या वेण्या. एखादा मान मिरवावा तश्या मिरवल्या त्या वेण्या तिनी आणि मी ही.....
आज इतक्या वर्षांनंतरही आठवतंय मावशी तिचे केस किती निगुतिनी सांभाळायची.आज असंही वाटतं की तिचे लांब केस बहुदा मावशीचीच हौस होती. शनिवारी वाटीभर तेल सहज तिच्या केसात मुरून जायचं, मग रविवारी शिकेकाईच्या पाण्यानी आंघोळ, ती शिकेकाई डोळ्यात जातीये म्हणून तिचा आरडओरडा, आणि मग केस वाळल्यावर फणीनी ती शिकेकाई काढून टाकणं. अगदी आवडीनं आणि सहज करायची मावशी. आज फणी बघायलाही मिळत नाही, आणि शिकेकाई चे नाव फक्त शाम्पू मध्ये वाचायला मिळत.  
आयुष्याच्या अशाच कुठल्यातरी अल्लड वेळी खेळता खेळता मी तिला म्हणलं,’ जमिनीत बी पुरलं की मग झाड येतं आपल्याला शाळेत शिकवलंय ना, मग आपण तुझी वेणी जमिनीत पुरुयात ना आणि बघुयात काय होतंय ते. त्या वेणीचही कदाचित झाड येईल मग आपण अशी झाडं सगळ्यांना देऊयात. पहिलं झाड मी मला घेणार. दर तीन महिन्यांनी बाबांबरोबर सलून मध्ये जाऊन केस कापून यायचा खरंतर मला कंटाळा यायचा, पण का कोणास ठाऊक ते केस सत्र थांबवण्यासाठी रडावं, नको म्हणावं असेही कधी वाटलं नाही. केस सांभाळण्याची आपली क्षमता मी चांगलीच ओळखून होते त्या मुळे असेल कदाचित, पण तिच्या वेण्या बघून मी खुश होते, त्यामुळे मला केस कापण्याच दुःख नव्हतं, किमान असं आत्ता तरी वाटतं.
मग एक दिवस दोघींनी हिय्या करून ठरवलं आज आपण वेण्यांची झाडं लावायची म्हणून. दुपारची जेवणं झाल्यावर आम्ही दोघी गुपचूप बागेत जाऊन बसलो, मग एक छोटा खड्डा खणला आणि त्यात वेणी पुरली. आणि मग दर ५ मिनिटांनी माती थोडीशी उकरायची आणि बघायचं झाड फुटलं का. तास झाला, दोन तास झाला, पण नवीन वेणीच कुठेच चिन्ह दिसेना, संध्याकाळ झाली, अंधार दाटायला लागला तशी मैत्रीण रडवेली झाली, झाड तर आलंच नाही आणि केसही असे मातीत बरबटलेले.. कसेतरी केस सोडवले त्या चिखलातून. घरी जाताना तिला सोबत म्हणून गेले राणी लक्ष्मीबाईच्या आवेशात, पण वेण्यांकडे, चिखलाकडे पाहिल्यावर लक्ष्मीबाई गळून पडली आणि भित्री राणी तेवढी उरली. मावशी घराचे सगळे रागावतील असे वाटलं, म्हणून ओरडून घेण्यासाठी खोटी कारण काही सांगण्याऐवजी आम्ही सगळी खरी खरी गोष्ट सांगितली आणि त्या सगळ्यांच्या हसू बघून आम्हाला अजूनच रडायला आलं.
त्यानंतर कित्येक दिवस सगळे आम्हाला विचारायचे वेण्यांच्या झाडाबद्दल, वाईट्ट मोठ्या माणसांचा राग येऊन मी म्हणायचे तुमच्या सारखी चिडवणारी, अविश्वासी माणसं असतात ना म्हणून आलं नाही आमचं वेण्यांचे झाड, नाहीतर नक्की आलं असतं.

वर्ष सरली, आणि सरत्या वर्षांबरोबर आम्हीही बदललो, मैत्रीचे संदर्भ बदलले. अंतर वाढली तरी धागा अजूनही कुठे तरी कायम होता. मैत्रीण भेटली त्याच ओढीनं भेटली आणि जाणवलं काहीतरी सुटलंय, गायब झालेल्या वेण्यांनी जणू सोबत नेलं होतं आमचे बालपण. वयात येताना, बाकीच्या सगळ्यांसारख दिसायच्या नादात, तिनीही त्या वेण्यांना टाटा केला होता. 
निरागसतेच्या ज्या जगाला आम्ही निरोप देऊन आलो होतो, त्याच जगात शांत पहुडलेल्या असाव्यात त्या वेण्या. वाट पाहत असाव्यात परत दोन मैत्रिणींची ज्यांच्या चांगुलपणाच्या जोरावर त्या वेण्यांची झाडं येणार आहेत अशा दोन घट्ट मैत्रिणींची. !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Sunday, March 6, 2016

स्वयम्

नेहमीसारखा मी पळत पळत बस स्टॉप गाठला. सकाळी घाईत आरशात बघायला वेळच मिळाला नव्हता. टिकली लावली होती की नाही हे ही आठवत नव्हते. आपण स्वतःकडे किती दुर्लक्ष करतो याचंच मला हसू फुटलं. घड्याळाकडे पाहिलं आणि नंतर नेहेमीचे चेहरे शोधात बसस्टॉपवरून नजर फिरवली. कोपऱ्यात उभा असलेला तो माझ्याकडे पाहून प्रसन्न हसला. मला काहीच कळेना, ओळखीचा म्हणावा तर चेहरा आठवत नव्हताआणि अनोळखी असेल तर उगा कशाला स्माईलदेऊन त्याला भाव द्यायचा. परत मनात आलं. आपल्या गबाळग्रंथी वेशाकडे पाहून तर हसला नसेल ना, आणि मी जवळपासच्या गाडीचा आरसा शोधायला लागले, चेहरा तर ठीक होता, रोजच्यासारखाच, आरशात बघताना काही वेगळ तरी वाटलं नव्हतं, माझा रोजचाच  ओळखीचा चेहरा आरशात दिसला होता. मग तो का हसला? मी प्रश्नावर विचार करत बसची वाट पहात होते. तो ही तिथेच त्याच्या स्मित हास्यासह बसची वाट पाहत होता. त्याचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते, संवादाची आस लावत होते, या सगळ्यात बस आली आणि गच्च भरलेल्या बस मध्ये मी त्याला विसरूनही गेले.

ऑफिस मध्ये काम करतानाही मनात कुठेतरी काहीतरी वेगळे वाटत होते.   एक अस्वस्थता वाटत होती, मन ओढून आणलं तर कामात लागत नव्हतं मग सरळ हाफ डे टाकून ऑफीसबाहेर पडले, कुठे जायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हत, मोकाट सुटलेल्या मनाच्या मागे मी हि चालत चालले होते. मग पाय वळतील तिकडे वळवायचे, विचारांचे रस्ते बंद केले, तर आज असे का वाटतंय याचं उत्तर बापुडा मेंदू शोधात होता. सकाळच्या त्या एका अनोळखी स्मितहास्याचा हा परिणाम असावा असा निष्कर्षही मग निघाला. चालता चालता अचानक नाव्याव्ने उघडलेल्या मॉलपाशी पाय थबकले. जरा गार झुळूक घ्यावी म्हणून आत शिरले.

मग शांतपणे कॉफीचे दोन घुटके घशाखाली उतरल्यावर वाटलं, असा ब्रेक हवाच आयुष्यात, काहीच न ठरवता, असे काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठीचे क्षण जोडायला हवे. मग एक दहा पंधरा मिनिट गप्पा मारत कॉफी पिणारी, बिझनेस च्या गप्पा मारणारी, मस्ती करणारी अ लॉट कॅन हॅपन हे वाक्य सार्थ करणारी लोकं बघून कंटाळा आला तेव्हा मात्र मी बाहेरचा रस्ता धरला. असेच फिरता फिरता एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सुंदरशा नारिंगी-पिवळ्या रंगाच्या कुर्त्याने माझं लक्ष खेचलंखरंतर. मला हे असलं विंडो शॉपिंग कधीच आवडत नाही, कोणीतरी ते मुद्दाम तुंच्याकडून करवून घेतं असे वाटतं. पण एखादा दिवसा वेगळा असतो, मी आत जाऊन विचारलं आणि चक्क तो अंगाला लावून बघावा म्हणून मागितला, एकटीनं खरेदी करायला मला आवडत नाही, कारण आपण घेतलेलं आपल्याला नंतर परत कधी आवडेल याचाही खात्री नसते, पण दुअसार्या कोणी सांगितले छान दिसतंय तर त्या आवडण्यावर एक प्रकारची मोहर बसते. मी चेंजिंग रूम मध्ये जाऊन बघ्यानाऐवजी, फक्त मापाला बरोबर आहे ना बघत होते, तेवढ्यात कोणीतरी मागून म्हणाले वाह सुपर्ब, मस्त दिसतोय, घेच तू हा कुर्ता.' मला एकेरीवर येऊन सांगणारा कोणता मित्र आत्ता इथे येऊन टपकला म्हणून माग पाहिले तर चक्क बसस्टॉप वाला. जाम तिडीक आली, नकोच घ्यायला हा कुर्ता, सरळ जाऊन त्याला विचारावं काय चाललंय काय?
 पण का कोणास ठाऊक त्या कुर्त्याची भुरळ जास्त पडली होती. हा रंग आपल्याकडे असावे असे प्रकर्षानं वाटत होत त्यामुळे पैसे देऊन सरळ बाहेर पडले. 'एक्सक्युज मी, जस्ट अ मिनिट, कॅन वी हॅव अ कप ऑफ टी , कॉफी?
आगाऊपणाची हद्द झाली होती, मी न वळताच चालता चालता सांगितलं मी चहा घेत नाही,
बर मग आपण कॉफी घेऊ, हा लोचट सोडायलाच तयार नव्हता.
दोन सेकंद मी थांबले, तर लगेच म्हणाला हे बघा इथेच आहे शेजारी
ही काय जबरदस्ती? मला नकोय आत्ता कॉफी.
मग मला कंपनी द्या.
एरवी कोणाचा एक शब्द खाली पडू न देणारी मी चक्क त्या अनोळखी माणसाला कंपनी देण्यासाठी कॉफी शॉप मध्ये गेले. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती, पण ती ही मानभावीपणे! टेबलवर मी त्याला निरखून पाहत होते, आणि मनाशी काही आडाखे बांधत होते, उंच म्हणावा असाच होता, रंग सावळाच पण त्याला शोभून दिसत होता. नाक डोळे अगदी तरतरीत होते. हसल्यावर उजव्या गालावर पडणारी खळी पाहून याच्या मागे पोरीच काय बायका सुद्धा लागत असणार हे नक्की कळत होतं. वयाचा मात्र अंदाज बांधता येत नव्हता, एखाद दुसरा पंधरा केस चमकत होता, पण ते सोडलं तर फार काही वयाची जाणीव करून देणारे दिसत नव्हते, वागण्यात, बोलण्यात एक आदब, सौजन्य होतं. कुठेही थिल्लरपणा, उथळपणा  नव्हता. पण मग तरीही हा असा अनोळखी पोरींशी कसा काय बोलत असेल. माझा गोंधळ वाढतच होता.
'झालं का  निरीक्षण पूर्ण? मग काय वर्णन करणार पोलिसांकडे?' त्याने हसत हसत विचारलं
'वय अंदाजे २७-२८, उंची सुमारे ५ फुट ९ इंच, उजव्या गालावर खाली पडते, डाव्या भुवईच्या वर एक खोक पडल्याची खूण आहे. असा वर्णनाचा इसम दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
मुलींच्या फसवणुकीच्या अनेक प्रकरणात या इसमाचा हात आहे. कितीही गोड बोलला, आग्रह केला तरी याच्या सोबत कॉफी प्यायला जाऊ नका. असं वर्णन करते पोलिसांकडे. काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? माझा राग शब्दाशब्दातून ठीपकत होता.
'ह्म्म्म बाकी तसं सगळ ठीक आहा,ए वय थोडाफार कमी जास्त चालतंच म्हणा उंचीचा अंदाज मात्र २ इंचांनी चुकला, आईस टी घ्या आणि शांत व्हा.' तो शांतपणे म्हणाला.
'पहिले मला तुमचं नाव सांगा, माझा पाठलाग का करताय ते सांगा, मग मी ठरवेन इथं थांबायचं की नाही आणि हा आईस टी घ्यायचा की नाही ते.
'तुमचा पाठलाग वगैरे काही करत नाहीये, अगदीच योगायोगाने, आजच्या दिवसात आपली दोनदा भेट झाली इतकंच. या शहरातल्या लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी अशक्य कोटीतली घटना. पण घडली खरी. आणि माझ नाव म्हणाल तर त्या दिवशी, त्या क्षणी जे वाटेल ते सांगतो. नाव ही आपली खरच ओळख असते का? बहुतेक ठिकाणी आपण नावाशिवायच वावरत असतो, मग माझ नाव मी तुम्हाला सांगून खरच फरक पडेल? आत्ता तुमच्याशी बोलताना मला वाटल माझं नवा स्वयम असत तर छान झालं असते, त्यामुळे आपण हे च नाव ठेउयात. म्हणजे माझं नाव घेता घेता स्वतःलाही साद घालता येते.
२१व्या शतकातला खराखुरा लखोबा लोखंडे म्हणायच वाटत याला. ' मी मनात म्हणलं.
'मग आता तुला वाटत असेल माझा तपकिरीचा धंदा आहे म्हणून' स्वयम म्हणाला. माझ्या चेहऱ्यावरचे  बारा वाजलेले कोणालाही वाचता आले असते, स्वयम् कसा काय त्याला अपवाद असेल.
'तुला कसं कळल मी मनातल्या मनात काय बोलले ते?' मी माझ्याही नकळत बोलून गेले.
'हे बघ ' त्याने अगदी गांभीर्याने बोलायला सुरुवात केली. ,' तू विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस पण मी तुला काही इथ इम्प्रेशन मारण्यासाठी किंवा फ्लर्टीग करण्यासाठी बोलावलं नाही, तुझे डोळे खूप बोलके आहेत, पारदर्शी आहेत. तुझं हसणं मोकळं आणि मनमोहक आहे. इतके सुंदर संवाद साधणारे डोळे, क्षणात आपलंसं करणारं हसू मी याआधी बघितलं नव्हतं, तुला हे सकाळीच सांगावस वाटलं, पण, सांगितलं नाही, किंवा राहून गेलं. तू काहीतरी चुकीचा अर्थ काढशील म्हणूनही कदाचित मी गप्प राहिलो असेन पण आवडलेल्या अनोळखी माणसाची एकाच दिवसात दोनदा भेट झाली तेव्हा मात्र राहवलं गेलं नाही मला. आणि हे तुला सांगितलेच पाहिजे म्हणून मग तूला इकडे घेऊन आलो.'
या त्याच्या बोलण्यावर काय बोलावं हेच मला कळेना  मी मख्खपणे त्याच्याकडे बघत राहिले.
'आणि अजून एक सांगायचंराहिलं, मला तुझं नाव माहित नाही, आणि माहित करून घेण्याची गरजही वाटत नाही, कारण मला जे सांगायचं होतं ते मी सांगितले.
'मला हे सांगून तुला काय मिळालं? सॉरी तुम्हीवरून तू वर आले. पण हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? कितीही नाकारलं तरी मला हा मुलींना फूस लावण्याचाच प्रकार वाटतो. मि. सौन्दर्यौपासक. 'जगाची ही रीतच मला कळत नाही, प्रत्येक गोष्टीला, कारण, प्रत्येक नात्याला लेबल लावायची काय गरज आहे, साधं चांगल म्हणायला,अॅप्रिशिएट करायलाही  वेळ ओळख का हवी?' जरा घुश्यातच तो बोलला. ती उलटून काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, 'माझ्या कॉफीचे बिल मी दिलंय, तुझ्या आईस टी च तू दे, मी दिले तर तू परत त्याचे काहीतरी अर्थ शोधायला जाशील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव कोणीतरी तुला तुझे डोळे, हसन सुंदर, निरागस असल्याचे सांगितले होतं. आणि हो माझ्या रिक्वेस्टला हो म्हणल्याबद्दल  थंक्स. आयुष्यात मोकळेपणानी जगायला शीक.
त्यादिवशीआरशात बघताना पहिल्यांदा जाणवलं की खरेच माझे डोळे नितळ आहेत. कुणाशीही बोलायची उर्मी त्यांच्यात ठासून भरली आहे. पण कोणा स्वयम नावाच्या अनोळखी माणसाने संगे पर्यंत मला का कळली नाही ही गोष्ट?, चार शब्दांनी जे काम होणार नाही ते माझ्या एका हास्यानी होतं हे ही मला नव्यानेच कळल. माझ्या आजू बाजूच्या लोकांना हे कधी कळलचं नाही की त्यांनी हे कधी मला सांगितलं नाही? दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा माझ्या मलाच या गोष्टी का कळू नये? थेट वर्मावरच घाव घालणारा प्रश्न माझी डोळ्यांनी मला विचारला होता, उत्तर माहीत नाही, पण किमान प्रश्न उभे केल्याबद्दल थँक्यू स्वयम्!
एखादं वादळ येतं आणि जातपण जाताना आपल्या खुणा ठेवून जातं. तसाच त्या अपरिचित स्वयम् नावाच्या वादळाच झालं होतं. माझ्या वागण्यात, बोलण्यात, देहबोलीत एक वेगळच फरक होता. पण या फरकाला देखील कारणाच बंधन नको होतं.
विचारांमध्ये बदल झाले की आपोआप ते वागण्यातही येतात याचा अनुभव मी घेत होते. त्यामुळेच की काय वाढदिवसाला स्वतःच स्वतःला काहीतरी भेट द्यावीशी वाटली. आपण सगळेच स्वतःचे उत्तम टीकाकार, समीक्षक, मित्र असतो. किमान वाढदिवशी तरी या टीकाकाराला खुश करूया म्हणून पुस्तक खरेदीला गेले, तशी घ्यायच्या पुस्तकांची यादी तयार होती, पण तरीही पुस्तकंचे भांडार समोर असले की पुस्तक किमान चाळायचा तरी मोह होतोच. त्यामुळे यादीत नसलेली दोन पुस्तकही सोबत येऊ घातली होती. निघता निघता सीडीज सेक्शन मध्ये जरा पाय थबकले, लताच्या शास्त्रीय गाण्यांची एक डीव्हीडी अगदी हाक मारत होती, पण मी डोळे मिटून तिथून काढता पाय घेतला. आणि मोहाच्या त्या एक क्षणाच्या विजयाचं कौतुक करत काउंटरवर आले. बिल घेता घेतानाही, ती सीडीच समोर दिसत होती, शेजारच्या काउंटरवर कोणीतरी घेत असावं,
एक मिनिट ही सीडी पण मॅडमचीच आहे, मी चमकून बघितलं तर स्वयम्.
'तू इथे?'
'का कलंदर, चक्रम लोकांना इथे प्रवेश नसतो का?तू पण  कमालच करतेस, आणि हो ऑस्कर वाइल्ड म्हणतो, माणसानं मोहाला शरण जावं, त्यामुळे तुला हि सीडी गिफ्ट.'
'ह्म्म्म'
'बर घाईत नाहीस ना? माझ्याबरोबर येतेस भटकायला? इथेच चालत फिरुयात, हा त्या दिवशी घेतलेला ड्रेस ना? मी म्हणालो नव्हतो, तुला छान दिसेल. माझी निवड सहसा चुकत नाही.'
'अॅक्चुअली तुझं बरोबर आहे, मला या कुर्त्यामुळे खूप कॉम्पलीमेंटस मिळाल्या. त्यामुळे मनापासून धन्यवाद, असं मी म्हणाले खरं पण मनात धाकधूक होतीच हा आता काय म्हणेल याची. अगदी आपलं मन वाचल्यासारखी त्यांनी ती सीडी दिली. कसं वागावं तरी कसं. त्या सगळ्या गोंधळात मी बोलून गेले, अशा सीडीज, गिफ्ट्स देऊन किती जणींना फिरायला नेतोस रे?'
'छे परत तेच. तू पण कठीणच आहेस, मला वाटलं बदलली असशील. ती सीडी मी गिफ्ट दिली म्हणण्यापेक्षा तुझ्यातल्या बदलासाठी बक्षीस दिलं असं मी म्हणेन. बसस्टॉपवरची तू आणी आजची तू खूप फरक वाटला मला, छान वाटलं मला. आपल्यातलं नेमकं काय बदलायचं याची जाणीव झाली की होणारा बदल सुखावह असतो. पण दुर्दैवाने बऱ्याच जणांना त्यांच्याकडे काय आहे, याची जाणीवच नसते, पिसाऱ्याची ऐत सांभाळणारा मोर, अंगावरचे पत्ते मिरवणारा वाघ, स्वतःच्या आवाजाची जान असणारा कोकीळ यांची गोष्टच निराळी. खरतर त्या दिवशी मला तुझ्याशी बोलायची काहीच गरज नव्हती. आजही नाही. त्यादिवशी तुझ्या बोलक्या डोळ्यांचे, हसण्याचे कौतुक मनातच ठेवलं असते, तर कदाचित हा आजचा दिवस उगवलाही नसता, माझी प्रौढी नाही पण सत्य आहे हे. एखादी सुंदर कलाकृती, रांगोळी, निसर्गाचा अविष्कार बघितला की आपण म्हणून जातो, वाह काय सुंदर आहे, त्यावेळी आपल्याला त्याच्या निर्मिकाच्या ओळखीची गरज भासत नाही, मग ईश्वरनिर्मित , निसर्गनिर्मित मनुष्यकलाकृतीच्या सौदार्याबद्दल बोलतानाच का आपल्याला ओळख लागते? मी पुरुष आहे म्हणून एखाद्या स्त्रीच्या केलेल्या कौतुकाला प्रत्येक वेळी हेतू लावायची काय गरज आहे? मी जाणीव करून देईपर्यंत तू स्वतः तरी कधी स्वतःच्या सौंदर्याची दखल घेतली होतीस का? हिऱ्याला मातीत असताना किंमत नसते, खाणीतून काढून त्याला पैलू पाडावे लागतात, पण तुला मी फक्त हिरा आहे सांगितले आणि तुझे तूच पैलू पाडून घेतलेस. याबद्दल कॉम्प्लिमेंट म्हणून मी तुला ही सीडी दिली. माझ्याकडे एक व्यक्ती, पुरुष म्हणून न बघता एक प्रवृत्ती म्हणून बघ. आग कदाचित तुला माझे वागण समजेल. कारणाशिवाय काही घडत नाही आणि काही नात्यांना नाव नसत. या आडन गोष्टी लक्षात तेह्वाल्यास तरी पुष्कळ. भेटूयात असेच परत कधी तरी अनपेक्षितपणे. माझ्या उत्तराची वाट ही न पाहता स्वयम् निघून गेला, मला पुन्हा नव्या विचारांच्या रस्त्यावर सोडून!

नकळत त्या मार्गावर चालत असताना माझी मीच मला नव्याने भेटत होते. काळात होतं. स्वयम् ने सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे उमगत नव्हत्या पण थोड्या थोड्या समजत होत्या. भोवतालाच सौंदर्य आता माझ्याही नजरेत भरायला लागले होते. अशाच काळात कधीतरी हॉटेलमध्ये शेजारच्या तेबाल्वाराच्या बाळाला पाहून नकळत बोलले, किती सुंदर आहेत याचे डोळे, नाव काय बाळाचे? आणि स्वयम् ची आठवण झाली.
मग कधीतरी बसस्टॉपवरच्या एका षोडशेला म्हणलं, काय सुंदर केस आहेत तुझे. तेव्हा खरच वाटल, स्वयम् ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. कोणाला चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी खरच ओळख लागते का?
(चारचौघी २००७)