Wednesday, July 12, 2017

एका टकल्या मुलाची गोष्ट.... !

चित्रपट आवडण्यासाठी कधीही चित्रपटाची भाषा हा अडसर ठरत नाही. किंबहुना भाषेचा अडथळा दूर सारून जो चित्रपट तुमच्या मनात घर करतो तो नक्कीच चांगला चित्रपट समजला पाहिजे. चांगल्या चित्रपटाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते, कधी कधी जगाने नावाजलेल्या चित्रपटात दहाव्या मिनिटाला तुम्ही घोरत असू शकता, आणि तुम्हाला आवडणाऱ्या चित्रपटाचं नाव ऐकताक्षणी नाक मुरडणारी लोकं तुमच्या आजूबाजूला असू शकतात. आणि अशी वेगवेगळी अभिरुची असणारी लोकं आहेत म्हणूनच वेगवेगळे प्रयोग चित्रपट क्षेत्रात होत असतात, आणि निराळ्या प्रकारचे चित्रपट आपल्यासमोर येत असतात. सच्च्या चित्रपट रसिकाला कोणताही वेगळं काही देणारा चित्रपट आवडतो.
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बघितलेला नवीन कन्नडा चित्रपट ‘वंदू मोट्टेय कथे’. इंग्लिश मध्ये एगहेड असं नाव असणारा हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे एका टकल्या मुलाची. सौंदर्य हे फक्त बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं हे वाक्य बोलून, लिहून अगदी गुळगुळीत झालंय, पण तरीही ते खरं आहे. भोली सुरत दिल के खोटे म्हणणाऱ्या मास्टर भगवान ला देखील लोकांनी डोक्यावर घेतलं पण नायक म्हणून नाही. नायक काय किंवा नायिका हे कायम सुंदर, हुशार तरुण, सडसडीत असलेच हवे.जाडे , टकले लोक हे फक्त हसवण्यासाठीच असतात असा एक गंभीर समज आहे. ७० , ८० च्या दशकात प्रायोगिक सिनेमांनी नायकांना खऱ्या प्रतिमेच्या जवळ न्यायला सुरुवात केली, म्हणजे ते नोकरीला जायचे, ट्रेन नी प्रवास करायचे, आपल्यातले वाटायचे, पण तरीही कोणताही नायक कधीच टकला नसायचा. नायिका देखील बदलत होत्या, पण तरीही जाड नायिका दिसली ती दम लगा के हैशा मध्ये.
या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नावापासूनच ज्याला कायम अंड म्हणून चिडवलं जातंय अशा मुलाची गोष्ट बघायची उत्सुकता होती. हा २८ वर्षाचा मुलगा आहे, जो एका कॉलेज मध्ये कन्नडा शिकवतो. त्याच्या लग्नासाठी हालचाली सुरु आहेत, पण दरवेळी आडवं येतं असतं त्याचं टक्कल. टकला असला तरी त्याच्या स्वतःच्या काही अपेक्षा आहेत, एखादी सुंदर, देखणी मुलगी त्याला हवी आहे. जेव्हा आई वडिलांकडून होणारे प्रयत्न कमी पडतात तेव्हा तो स्वतःच ठरवतो मीच शोधेन मुलगी. या सगळ्याला मस्त जोड दिली आहे कन्नडा चित्रसृष्टीचे सुपरस्टार राजकुमार यांच्या चित्रपटांची, गाण्यांची. अगदी मस्त प्रसंगोपात गाणी येतात.  नायक हा राजकुमार यांचा भक्त आहे , दिवसरात्र त्याच्या डोक्यात राजकुमार यांचही, गाणी, चित्रपट असतात. इन फॅक्ट त्यामुळेच राजकुमार यांचा वावर पूर्ण सिनेमाभर एखादी मार्गदर्शकासारखा आहे. जेव्हा जेव्हा तो एखाद्या द्विधेत सापडतो, राजकुमार त्याच्या मदतीला धावून येतात. राजकुमार आजही इथल्या सिनेरसिकांच्या नसानसात भरून राहिलेले आहेत.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचा प्रश्न मांडणारा आहे, तो ही विनोदी अंगाने, म्हणजे लग्नाळू टकला मुलगा ज्या पद्धतीने आजुबाजूला लग्नाळू मुलीचा शोध घेत असतो, त्याच्या अपेक्षा, समाजातलं वास्तव, मुलींच्या अपेक्षा या सगळ्यावर प्रचारकी थाटात भाष्य करण्याऐवजी सहज जाता जाता संवादातून वाचा फोडली आहे. चित्रपटात जाता जाता प्रादेशिक भाषा, आणि प्रादेशिक भाषा शिकवणारे शिक्षक यांचे वास्तव हे भारतातल्या जवळपास प्रत्येक भागात सारखंच आहे. फेसबुक वरचे प्रोफाईल फोटो, मेसेंजर चा वापर याचा मस्त वापर करून घेतला आहे. मुळात हा चित्रपट राज शेट्टी यानी स्वतःच लिहिला, दिग्दर्शित केला आणि प्रमुख भूमिका देखील केली, हा चित्रपटात मेंगलोर कडची कन्नडा बोलली जाते. पहीलाच प्रयत्न असल्याने आणि मार्केटिंग बद्दल फारशी माहिती नसल्याने हा चित्रपट फक्त मेंगलोर आणि जवळपास च्या भागत प्रदर्शित करणार होते, पण हा चित्रपट बेंगलोर मधल्या काही चित्रपटदर्दींनी पाहिला, आणि मग कन्नडा चित्रसृष्टीतल्या यशस्वी दिग्दर्शकानी त्याच्या बॅनर खाली याला फक्त देशात नव्हे तर परदेशातही प्रदर्शित केला.
उगाच काहीतरी संदेश देत आहे असं सांगणाऱ्या किंवा मनोरंजनासाठी म्हणून काहीही दाखवणाऱ्या सिनेमांपेक्षा दोन्हीचा योग्य मिलाफ या सिनेमात साधला आहे, उत्तरार्ध अजून एक दहा मिनिटं कमी केला असता तर सिनेमा अजून नेटका झाला असता, इतकं मात्र खरं आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारलं, तर आपल्या आयुष्यात तरी आपण हिरो असूच शकतो. नायक नायिकांना त्यांच्या टिपिकल सौदर्याच्या परिमाणामधून बाहेर काढून गर्दीचा भाग असलेला एखाद्याची कथा मोठ्या पडद्यावर बघताना आपण जास्त गुंगतो, हे मात्र खरं. चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असं म्हणतात त्यामुळेच हृषीकेश मुखर्जींचे सर्वसामान्य नायक असणारे चित्रपट आजही आवडीने बघितले जातात, ‘वंदू मोट्टेय कथे’ नक्कीच अशा सिनेमांची आठवण जागवून जातो एवढं निश्चित !

(मुद्दाम कन्नडा शब्द सगळीकडे वापरला आहे, कारण कन्नडिगा त्यांच्या भाषेला कन्नड नव्हे तर कन्नडा म्हणतात. ज्या पद्धतीने मराठी भाषेत कोल्हापुरी, वैदर्भीय, पश्चिम महाराष्टातली मराठी वेगळी आहे त्याच पद्धतीने कन्नडा मधेय देखील बेंगलोर कन्नडा, मैसूर कन्नडा, मेंगलोर कन्नडा, नॉर्थ कर्नाटका कन्नडा अशा वेगवेगळी बोलीभाषा आहेत. )

मानसी होळेहोन्नुर

https://www.youtube.com/watch?v=UXv-9QdR3s8


Saturday, July 8, 2017

गुरुर्देवो नमः

सक्काळी सक्काळी आईचा, बाबांचा फोन आला की धडकायला होतं,त्यामुळे कितीही घाई गडबडीत असले तरी ती आई वडिलांचा किंवा ज्येष्ठ नातेवाईकांचा फोन चुकवत नाही.
एका हातानी भाजी परतत, दुसऱ्या हातानी कणकेचा डबा काढत, फोन कानापाशी दुमडत तिनी आईला विचारलं,
‘काय गं सगळं नीट आहे ना, आज इतक्या सकाळी फोन केलास.काही महत्वाचं असलं तर आत्ता बोलू, नाहीतर मी तुला थोड्या वेळानी फोन करते ना.’
‘सगळं नीट आहे, तसं काही अर्जंट नाही पण म्हणलं आज आमच्या गुरूंना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा द्याव्यात. म्हणून सकाळी फोन केला. ‘
तिला काहीच कळेना, म्हणजे आई ही पहिली गुरु असते असं शिकलेलो आणि आता तिला फोन केला नाही म्हणून तीच फोन करून त्याची आठवण करून देत होती की काय असं वाटलं एकदम. तसं तिला लक्षात होतं आजच्या गुरुपौर्णिमेच, पण जरा दुपारून आवरून सावरून फोन करणार होती ती.
स्वतःला सावरून ओशाळून ती म्हणाली, ‘ हो हो लक्षात आहे मला आज गुरु पौर्णिमा आहे ते, मी तुला करणारच होते फोन पण अग थोड्या वेळानी, सकाळची वेळ थोडी घाईची असते ना.’ आईनी इतकं काय फोन करून आठवण करून द्यायला हवी होती, थोडा रागच आला होता. तो बहुतेक बोलता बोलता स्वरात आला असावा.
‘अग नाही ग बेटा,तुला आठवण करून देण्यासाठी नाही केला फोन, उलट तुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी केला फोन, म्हणजे तू आमची शिक्षक झाली आहेस ना आता.’
कानाचा फोन सरळ करत, एका हातानी फोन धरत, दुसऱ्या हातानी चहा गाळत तिनी विचारलं,
‘म्हणजे काय मी समजले नाही.’
‘अग राणी, आत हा स्मार्ट फोन, कॉम्पुटर, झालंच तर फेसबुक, आणि हे वेगवेगळे अॅप्स आम्ही वापरू शकतोय ते तुझ्यामुळेच ना. तूच तर शिकवलंस ना आम्हाला, आजही काही अडलं, काही लागलं तर हक्कानी तुला विचारतो, आणि तू पण आम्हाला न थकता ते सांगतेस, समजावतेस. आम्हाला कळेल अशा शब्दांमध्ये सांगतेस. हे सगळं शिकल्यामुळे किती तरी जुन्या मैत्रिणी नव्याने भेटल्या, नव्या मैत्रिणींची ओळख झाली, फोटोंमुळे सगळे जवळ असल्यासारखे वाटतात बघ. जो कोणी आपल्याला आयुष्यात काही तरी शिकवून जातो तो आपला गुरूच झाला ना ग. आपण अनुभवाला गुरु म्हणतो, आई वडिलांना गुरु म्हणतो, मग तू पण गुरूच झालीस ना’
आई काय बोलत होती आणि आपण काय समजून घेत होतो, क्षणभर तिला स्वतःचीच लाज वाटली,
‘आई अग त्यात काय एवढं, मला येत होतं, माहीत आहे ते मी तुला, बाबांना शिकवलं, आता तुम्ही नाही का लहानपणी आम्हाला बोटाला धरून चालायला शिकवण्यापासून ते स्वतःच्या पायवर उभं राहण्यापर्यंत शिकवलं?’
‘ती आमची जबाबदारी होती, पण तू जे करतीयेस ती, काही तुझी जबाबदारी नाही, कर्त्यव्य देखील नाही, पण तरीही तू करतेस ना. चल तुझी ही सकाळची वेळ आहे, पण तरीही तुझ्याशी हे बोलून दिवसाची सुरुवात करावीशी वाटली म्हणून फोन केला, दुपारी मस्त व्हिडीओ कॉल करूयात बघ. आता आता जमायला लागलंय बघ.बरं आज काही तरी गोड करून खा, जवळ असतीस तर मीच करून खायला घातलं असतं बघ.’
‘आई तुला आणि बाबांना पण गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा. आम्ही आज जे काही आहोत ते तुमच्यामुळेच, मी करेनच ग गोड काहीतरी, पण तुम्ही पण काहीतरी करा गोड, तुम्ही पण आमचे गुरूच ना. दुपारी बोलूया निवांत.’
तिनी फोन ठेवला आणि विचारात पडली, आई वडिलांना आपण गुरु मानतो, म्हणतो, पण आपली मुलं ही देखील एका प्रकारे आपले शिक्षकच असतात ना, मी आई बाबांना नवीन काही तरी शिकवलं. पण माझी मुलं मला मी कसं वागावं हे रोजच शिकवतात, म्हणजे त्यांनी जसं वागावं असं मला वाटतं, तसं जर मी वागले, तरच मी त्यांना काही सांगू शकते, जर त्यांनी टीव्ही जास्त बघू नये असा माझा आग्रह असेल तर मी आधी माझा टीव्ही टाईम कमी केला पाहिजे. त्यांनी घरात संवाद वाढवला पाहिजे असं जर मला वाटत असेल तर मी देखील माझा मोबाईल सोशल नेटवर्किंग वरचा वेळ कमी करून त्यांना दिला पाहिजे. त्यांनी ओरडू नये असं सांगताना मी देखील माझे ओरडणं कमी केलं पाहिजे, त्यांना चार गोष्टी याव्यात म्हणून झटताना मी पण त्यांच्या बरोबर बसून दोन गोष्टी केल्या पाहिजेत. ते जसं वागवेत असं मला वाटतं तशी मी तरी वागते ना हा विचार करायला मुलांनी मला भाग पाडलं. म्हणजे आई म्हणते तसं जे कोणी आपल्याला काही शिकवतं ते आपले गुरूच ना, एकदम मुलांकडे ती वेगळ्याच दृष्टीने बघायला लागली.

मग खास मुलांना आवडतो तसा शिरा करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्याव्या म्हणून तिनी तुपावर मस्त शिरा भाजायला घेतला. आधी शिष्य म्हणून आणि नंतर गुरु म्हणून दोन वाट्या शिरा फस्त करताना सुंदर असलेलं हे आयुष्य अजूनच सुंदर वाटायला लागलं होतं.  

मानसी होळेहोन्नुर

Tuesday, July 4, 2017

रुक्मिणीचा पांडुरंग

‘आये जायलाच हवं काय तुला?’
सामान भरत असलेल्या रुक्मिणी बाईंना पोरगा विचारत होता.
‘आरं बाबा इतकी वर्स जातीये, यावर्षी न्हाई जाऊन कसं होईल.’
‘दे रं सोडून, म्हातारीनं ऐकलंय व्हय कुणाचं की आज तुज ऐकेल.’
‘जसं काय तुम्ही लैच ऐकत्यात ना सगळ्यांच,’ फुत्कारून म्हातारी बोलली.
‘अग आये असं न्हाई, डाक्तरांनी साखरेची बिमारी सांगितली ना तुला मंग कसं जमवशील तू, रस्त्यात काई झालं तर?’
‘असं कसं काई होऊ दील माजा इठू? आन ह्ये बग, समद्या गोळ्या सोबत घेतल्यात. अन ह्यो फोन बी सोबत घेऊन जातीये, वाटलं काई तर फोन करून सांगेन की.’
‘जाऊ द्यात की त्यास्नी, वर्सातून एकदा तर एवडा हट्ट करून जात्यात की आत्याबाई.’ सून बाई आतून बोलल्या.
‘आज गंगा उलटी कशी वाहायला लागली रे निवृत्ती?’ सासऱ्यानी चावी फिरवायचा प्रयत्न केला.
‘माझी सून हाये ती चुकून बोलली येकाद एळेला तर तुमचं काय जातय? आनी घेऊ द्या की तिला बी घराची जिम्मदारी, वर्सभर तर मंग असतेच की मी.’
‘ बुढ्ढे आता उमर झाली तुझी, तुज्या काळजीपोटीच बोलतोय ना आम्ही.’ शेवटच अस्त्र वापरलं तिच्या नवऱ्यानी
‘आली म्हन माजी काळजी, इतकी काळजी असती तर शेतात नीट लक्ष दिलं असतं, असेल माजा हरी तर देईल खाटल्यावरी करत बसला नसतासा. ती तंबाकू आदी सोडली असती बगा, एक वरस नीट पाहिलं जरा घरात चार पैसे आले की सुटलेच तुमी, गावात लष्कराच्या भाकऱ्या भाजायला.’ गाडी कोणत्या वळणावरून जाणार हे कळलं म्हणून ती गाडी थांबवण्यासाठी एकदम पोरगा बोलला,
‘आये फोनचा चार्जर घेतला न्हव.’
गाडीला एकदम ब्रेक लागल्यामुळे जरा सेकंद लागला त्यांना प्रश्न समजायला, आणि मग हे ही कळल यकदम यांनी हा प्रश्न का विचारला,
‘तू बी त्यांचाच ल्योक ना, बसावा गप मला म्हातारीला, त्यो इठू सोडला तर कोणी न्हाई बागा मला. माहेरचा गोतावळा कधीच संपला, भाऊ हितं वळख दाखवत न्हाई आय बाप तर कदीच गेले, ही वारीची लोकंच ती माझी, आणि त्यो काळूराम माजी आय न बाप, आन तुम्ही म्हणतात त्याला बी भेटाया जाऊ नको. तुझी उमर हाये त्याच्या आदीपासून जायचे बग मी, तू झाल त्यावर्सी काय खंड पडला तो. माजी सासू बगून घायची, मंग अडल्या नडल्याला कोन तरी यायचं आता सून बगते, पन माजी वारी काई चुकत न्हाई. जित्ती हाये तोवर माजी वारी काई चुक्नार न्हाई.’
शेवटी स्वतःचच म्हणणं खरं करत म्हातारी गेली वारीला.
अधून मधून फोन करत ख्याली खुशाली कळवत राहिली.
आणि मग आषाढी एकादशीच्या सकाळी नेहेमीप्रमाणे घरी आली.
‘काय ग म्हातारे यावर्षी बी न्हाई घेतलंस दर्सन?’
‘न्हाई तिथे काय अन हितं काय पांडुरंगच तर हाये ना. मग तिथं दर्शन घेतलं काय अन इत दर्शन घेतलं काय. माज्या इठ्ठलाला कळतं की.’
‘अग हे बरय तुजं इतकी वर्स झाली वारीला जातेस, मोप पंढरपूरपर्यंत चालत जातेस आणी मंग दर्शन न घेताच परत फिरतेस, तुजं मला काई कळतच न्हाई बघ. ‘
‘मी जाते ते माझ्या लोकांना सोबत करायला, लई बायका असत्यात हो, काय काय त्यांचे प्रश्न असत्यात, सगळ्या मोकळ्या होतात बगा तिथ येऊन, मला बी जरा मोकळं वाटतं, घराला इसरून सोतासाटी जगाया मिळत बगा, नवरा न्हाई, घराची काळजी न्हाई, सैपाकाची काळजी न्हाई आपण निस्त चालायचं, फुगड्या घालायचं, इठ्ठलाच नाव घ्यायचं, गाणी म्हनायची, म्हायेरम्हायेर ते अजून एगळ काय असतं. आन लग्नानंतर तुमीच माजी लक्ष्मीची रुक्मिणी केली न्हावं, मग ती एक पंढरपूरची रुक्मिणी तिच्या इठ्ठलापासी नसते, म्हनून तर ही रुक्मिणी तिच्या इठ्ठलाच्या सेजारी बसून फराळ करायला पार पंढरपुराहून येते बगा.’
आणि मग पांडुरंग त्याच्या रुक्मिणी कडे बघतच राहिला, हातची तुळसीमाळ ओढत पांडुरंग पांडुरंग म्हणायच्या ऐवजी रुक्मिणी रुक्मिणी म्हणायला लागला, आणि ती तुळसीला पाणी घालत हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणत राहिली.
    
   


Monday, July 3, 2017

कार्स ३ रेसिंगच्या पुढची गोष्ट

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, तो काळ गेला की आपण परत आणू शकत नाही, पण तो काळ वेगवेगळ्या मार्गानी परत अनुभवू मात्र शकतो. कोणाही प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या व्यक्ती साठी निवृत्ती हा एक नाजूक प्रश्न असतो. त्यांनी आजवर जे करून यश मिळवलं ते करण्यासाठी वय साथ देत नसतं आणि ते कायमचं सोडण्यासाठी मन तयार नसतं. याखेरीज इतरांच्या, चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं असते ते वेगळचं. सन्मानाने निवृत्त व्हायचं की आपल्या खालावत जाणाऱ्या कामगिरीवर लोकांनी सतत बोट ठेवत आपल्याला प्रवृत्त करेपर्यंत सोडायचं नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो. one has to take that call. अगदी हाच विषय आहे डिस्नेच्या नव्या कार्स ३ या चित्रपटात.
अॅनिमेशन चित्रपट हे काही फक्त मुलांना समोर ठेवून तयार केलेलं नसतात, जसं अॅलीस इन वंडरलंड हे काही लहानांचे पुस्तक नाही, अगदी तसंच! वेगळा विचार, वेगळा दृष्टीकोन हा अशा चित्रपटांमधून इतका सहज दाखवला जातो की आपल्याही नकळत आपण त्याच्यावर विचार करायला सुरुवात करतो. मग कुंग फु पांडा सिरीज मधल्या चित्रपटांमधून दत्तक मुलांबद्दल केलेली भाष्ये असोत किंवा डीस्पेकेबल मी या त्रयी मधून वाईट माणसांमधला चांगुलपणा शोधण्याचा केलेला प्रयत्न असो, फ्रोजन मधून आपल्या शक्ती, सामर्थ्यापासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरे जाणे जास्त गरजेचे असते, दैवदत्त देणगी मिळालेल्या गोष्टींचा चांगला उपयोग करून घेणं आपल्याच हातात असतं. कोणतीही गोष्ट फक्त शाप किंवा फक्त वरदान असू शकत नाही, ती शाप ठरवायची की वरदान हे आपल्या हातात असतं, तशीच गोष्ट इनसाईड आउट ची, पौगंडावस्थेत मुलांचे प्रश्न एकदम अवघड का होतात, याचं सोप्पं उदाहरण आहे ते. आपल्या आठवणी हेच आपलं आयुष्य असतं, त्यामुळे चांगल्या वाईट आठवणी जपणं, त्यातून शिकणं हे गरजेचं असतं.
कार्स च्या आधीच्या दोन भागांमधून अशीच एका कार च गोष्ट सांगितली होती, रेसिंग कारच्या दुनियेतली, स्वतःला मोठा खेळाडू समजणारा लाईटिंग मॅक्वीन चुकून एका गावात येतो, तिथे त्याच्याकडून एक चूक होते, त्याची शिक्षा म्हणून त्याला तिथे काही दिवस राहून रस्ता तयार करावा लागतो, त्या गावात राहता राहता त्याची तिथल्या लोकांशी ओळख होते, तिथे असणारी एक कार ही नामांकित स्पर्धा जिंकलेली पण आता विस्मृतीच्या गर्तेत गेलेली असते, हे कळल्यावर कार्स चित्रपटाच्या नायकाचा लाईटिंग मॅक्वीन चा दृष्टीकोनच बदलून जातो. स्पर्धा ही फक्त जिंकण्यासाठी नसते, आणि येनकेनप्रकारेण जिंकणाऱ्या पेक्षा इतर स्पर्धकांना मान देऊन, खिलाडूवृत्ती दाखवत हरणारा स्पर्धक जास्त मनावर राज्य करतो हे सांगत पहिला चित्रपट संपला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी दुसरा भाग आला, ह्या भागात लाईटिंग मॅक्वीन ला अमेरिके बाहेर नेऊन डिस्नेनी जपान, इटली, युके मधल्या प्रेक्षकांनासुद्धा आपलंसं करण्याचा प्रयत्न केला होता, या भागात हेर गिरी, बरोबरच खेळांच्या स्पर्धांच्या आडून चालणारं राजकारण यावर संयत भाष्य केलं होतं. जाता जाता खेळाडू जिंकतो तेव्हा ते त्याचं एकट्याचं यश नसतं तर त्याच्या बरोबर असणारे मार्गदर्शक, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारे,डॉक्टर, मित्र, अशा सगळ्यांचेच यश असतात, खेळणाऱ्याचा जेवढा स्वतःवर विश्वास असतो तेवढाच या सपोर्ट सिस्टीम वर देखील विश्वास असावा लागतो हा मोलाचा सल्ला या भागातून दिला होता. त्यामुळेच आता तिसऱ्या भागात अजून काय नवीन सांगतील याची खूप उत्सुकता होती.
मुळात या चित्रपट सीरीज चे भाग ५, ६ वर्षांनंतर येतात कारण त्यात अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर सुद्धा मेहनत घेऊन काम केलं जातं, अॅनिमेशन तर आहे, मुलांच्या साठी तर आहे अशा सबबी देण्याऐवजी अजून जास्त चांगलं कसं देता येईल हा विचार असतो. या भागात इतकी वर्ष स्पर्धा जिंकणारा लाईटिंग मॅक्वीन स्पर्धा जिंकता जिंकता हारतो. त्याला हरवणारा नवीन खेळाडू हा नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर त्याला सारून पुढे जातो. अनुभव आणि तंत्रज्ञान यामध्ये तंत्रज्ञान जिंकतं, पण त्याचा अर्थ अनुभव कमी असतो असं नाही. नवीन खेळाडूला मात देण्याच्या नादात लाईटिंग मॅक्वीन स्वतःलाच इजा करून घेतो, मग त्यानंतर तो स्वतःलाच उभारी देऊन परत स्पर्धेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतो, मग त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यायची तो ठरवतो, पण त्याच्या उतावळेपणा मुळे तो नवीन मशीन तोडून टाकतो. या सगळ्यामुळे त्याला आर्थिक सहाय्य करणारा कंपनीचा प्रमुख त्याला सांगतो, तुझे दिवस संपले, आता तू खेळाच्या मैदानावर जाण्याऐवजी जाहिरातीच्या व्यासपीठावर जा. आता तू काही खेळू शकणार नाहीस, आता तुझ्या नावावर जाहिरातीतून पैसे कमावण्याचे दिवस आता आहेत. मनातून कुठे तरी दुखावलेला पण तरीही जगज्जेता असलेला लाईटिंग मॅक्वीन म्हणतो, मला फक्त एक शेवटची संधी हवी आहे, जर मी ती स्पर्धा जिंकली तर मी ठरवेन कधी रिटायर व्हायचं, आणि जर ती संधी मी हरलो, तर तुम्ही म्हणाल तसं मी करेन, हे आव्हान त्यानी स्वतःलाच दिलं होतं. या सगळ्यामध्ये त्याच्या सोबत असते त्याची ट्रेनर जी आहे नव्या दमाची, जिला फक्त बंदिस्त खोल्यांमध्ये घाम गाळून प्रॅक्टिस करायची माहीत आहे,  तिला सांभाळून स्वतःला हवा तसा सराव करून घेणं त्याला जमत नसतं. त्यात त्याचा गुरु ज्याच्या मदतीने त्याने आधीच्या काही स्पर्धा जिंकल्या होत्या, त्याने जिंकलेली एक वेगळ्या धर्तीची स्पर्धा खेळायला लाईटिंग मॅक्वीन जातो, अर्थात तिथे त्याची ट्रेनर क्रूझ देखील असतेच, तिला सांभाळून घेता घेता तो मागे पडतो आणि मग अशी वेळ येते की तीच पुढे जाऊन स्पर्धा जिंकते. यामुळे दुखावलेला लाईटिंग मॅक्वीन तिला बोलतो, आणि मग ती तिचं मन मोकळं करते, मला खरंतर आयुष्यात हेच करायचं होतं. रेसिंग स्पर्धेत भाग घेणं हेच माझं स्वप्न होतं, पण माझा माझ्यावर विश्वास नव्हता आणि त्यामुळे मी कधी भागच घेऊ शकले नाही.
स्वतःवरचा विश्वास गमावत चाललेला लाईटिंग मॅक्वीन जेव्हा जिवलग मित्राला मीटर ला फोन लावतो तेव्हा तो सांगतो, तुला डॉक नी शिकवलं, तो आता नाही, पण त्याचा गुरु तर आहे ना. आणि मग तो निघतो त्याच्या गुरूला घडवणाऱ्या गुरूच्या शोधात, आणि एका क्षणी क्रुझ ची माफी मागून तिलाही सोबत घेतो.
अनुभव हा नेहेमीच काही ना काही शिकवून जात असतो, आपण जेव्हा जिंकतो तेव्हा फक्त आपणच जगज्जेते आहोत असा अभिनिवेश ठेवला तर आपण त्याक्षणीच स्वतःच्या विस्मृतीच्या वाटेकडे वाटचाल करत असतो, पण त्याचवेळी जर आपल्या पूर्वसुरींचा आदर ठेवला तर एक खेळाडू म्हणून आपण मोठे होत असतो, याची जाणीव असल्यामुळे मॅक्वीन जेव्हा तिथे जुन्या दिग्गज लोकांना भेटतो तेव्हा तो त्यांना त्याला शिकवायची विनंती करतो. मग नवीन तंत्रज्ञानाला हरवण्यासाठी त्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान हवं नाहीतर अनुभवाच्या जोरावर मिळणारं शहाणपण चलाखी हवी. त्यामुळे तो हे अनवट शहाणपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि अर्थात त्याचा फायदा क्रुझ ला देखील होत असतो, जी त्याच्यासोबत सावलीसारखी असते. एका क्षणी मॅक्वीन म्हणतो, परत रेस न करायला मिळण्यासारखं दुःख नाही, त्यावर त्याचा नवा गुरु स्मोकी म्हणतो, हे काही अंतिम सत्य नाही, आपल्यासारखा किंवा आपल्यापेक्षा चांगला विद्यार्थी घडवणं हे ही तेवढंच सुखकारक असतं.
शेवटची स्पर्धा सुरु होते, ज्याच्या जिंकण्याची शक्यता ९६ % आहे असा स्पर्धक स्पर्धेत असताना देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी मॅक्वीन स्पर्धेत उतरतो, पहिल्या दहापर्यंत पोहोचतो. आणि तेव्हाच क्रुझ जी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिथेच थांबलेली असते, तिला तिचा बॉस सांगतो, तू इथे काय करतेस, हे काही बायकांचं काम नाही, जा निघून तुझ्या ट्रेनिंग च्या कामाला. हिरमुसलेली ती निघते, पण हे सारे शब्द गाडी चालवत असलेल्या मॅक्वीनच्या कानावर पडतात, आणि त्याच क्षणी त्याला स्मोकी नी सांगितलेलं आठवतं, आणि जाणवतं हाच क्षण आहे ती संधी मिळवण्याचा, आणि तो क्रुझ ला बोलावून घेतो आणि सांगतो, माझ्याऐवजी आता तू पळणार आहेस या स्पर्धेत, मानसिकरीत्या तयार नसलेल्या क्रुझ ला तो कसा तयार करतो, एका क्षणात स्पर्धकाच्या भूमिकेतून मार्गदर्शकाच्या भूमिकेत कसा जातो हे सगळं मुळातून पाहण्यासारखं आहे. चित्रपटाचा शेवट हा अर्थात अपेक्षित वाटेनी जातो, पण तरीही अजूनही खेळाच्या मैदानावर असलेल्या स्त्री पुरुष भेदभावावर काहीच न बोलता खूप काही बोलून जातो.
आजही अनेक गोष्टींवर पुरुष, स्त्री अशी लेबलं चिकटवलेली आहेत, ती कधी तरी कोणी तरी काढावीच लागतात. खेळ हा फक्त  शारीरिकदृष्ट्या खेळायचा नसतो तर तो मानसिकदृष्ट्या खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे, अगदी हेच चक दे मधून कबीर खान सांगतो किंवा दंगल मधून महावीर सिंग फोगट सांगतो. कोणत्याही खेळाचा सराव हा ठराविक पद्धतीनेच केला पाहिजे असं नसतं, तर तुमच्याकडे असणाऱ्या साधनसुविधांचा वापर करून, कल्पकतेनी तुम्ही नवीन गोष्टी आत्मसात करून त्या कशा अमलात आणता हे जास्त महत्वाचं असतं. शिखरावरून कधी ना कधी खाली यावंच लागतं मग ते  कधी उतरायचं हे तुम्ही ठरवलं तर तुम्ही शिखरावरून उतरलात तरी तुम्ही शिखरावरच असता. डिस्ने अनेक वेळा या कठीण गोष्टी अशा सोप्प्या करून सांगतं. त्यामुळेच कार्स हा फक्त गाड्यांचा सिनेमा उरत नाही, त्यातल्या भाव भावना, नाते संबंध, सहज जाता येत केलेली भाष्य यामुळे तो आजचा सिनेमा ठरतो. आज मुलांना तो कार्स च्या रेसिंग साठी आवडेल, पण वय वाढता वाढता त्यातली गंमत, नव्याने काळात जाईल आणि मग जगण्यातली गंमत देखील कळायला लागेल.

संदर्भ :https://en.wikipedia.org/wiki/Cars_(film)
        https://en.wikipedia.org/wiki/Cars_2
            


Thursday, June 29, 2017

गंध प्रेमाचा

मी असते बसलेली माझ्या खिडकीत,
बाहेरच्या जाईला सांगता असते, दरवळायला,
तिचा वास हवेत मिसळून जाऊन पोहोचेल तुझ्यापर्यंत
आणि मग श्वास घेता घेता तू ओढून घेशील मलाही तुझ्या आत

आह तुझ्या आत मी विरघळून जाईन अशी की
जणू त्वचिका, परत परत येणारी,
शरीरात तादात्म्य पावणारी
मग जपत राहीन तुझाच जप
तुझ्याच हृदयात!
आणि तुला खुळ्यागत वाटत राहील
ते करतंय लब डब डब लब  ....


मग तुझ्या वाहिन्या धमाण्यामधून जे रक्त वाहत असेल त्यालाही लागेल माझच वास
आणि मग तू पडू लागशील माझ्या प्रेमात
आणि मग त्या वासाचा मग काढत येऊन थांबशील माझ्या खिडकीच्या खाली
त्याच जाईच्या वेलीखाली, उचलशील एक पडलेलं फुल
गंधवशील तू ही, सुरर्कन येशील खिडकीच्या गजावर
आणि चांदणं बघता बघता ऐकवशील
हृदयात लपलेली गाणी,
जी मीच गुंफून लपवली होती
त्या नादात हरवून गेल्यावर
चंद्रही देईल त्याची सावली आपल्याला
त्या सावलीत बसून तुझी त्वचिका होत
राहील पांढरी फिटूळ,
आणि मी गात राहीन गाणी
जन्माजन्माची
जेव्हा आपण जन्मायचे होतो,
भेटायचे होतो,
प्रेमायचे होतो,
तू तू असताना, मी मी असताना पासून सुरु झालेली गाणी,
अंतापर्यंत वाजत राहणारी गाणी
त्याचा सूर ही ठरलेला आणि तालही
आपण फक्त प्रेम मात्र।

Monday, June 5, 2017

गावातल्या मातीची फ्रेम

खूप वर्षांनी गावाकडे आलेल्या मित्राला
बघायचं असतं सारं काही.
म्हणजे ते सगळे जे आम्ही दोघांनी एकत्र बघितलेलं
अनुभवलेलं, तयार केलेलं, मनात वसलेलं गाव

सायकल वर टांग मारून आखे गाव फिरून व्हायचं त्या काळात
नाक्यावरच्या दुकानदाराला आमच्या घरात कोणत्या ब्रँड असतो
हे माझ्या तोंडाकडे बघूनही कळायच
रस्त्यावरच्या खड्ड्यांसकट गावचा नकाशा पाठ असायचा तेव्हा,
गुगल ची गरज प्रत्येक घरात बायकांकडून भागवली जात होती,
चुलीवरचा स्वैपाक फक्त एका घरापुरता कधीच मर्यादित नव्हता.
आजूबाजूच्या साऱ्या घरांच्या आवडीनिवडीचा विचार व्हायचा तेव्हा
रस्त्यावर कोणालाही हटकायचा कोणालाही परवाना होता,
गावातला प्रत्येक जण प्रत्यक्ष्यात एकमेकांना ओळखत होता,
आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीची दवंडी
घरी पोहोचायच्या आधीच पिटली गेलेली असायची.
वानोळा, हा रोजचाच होता, प्रत्येक गोष्टीचे कौतुक होते.
स्पर्धा फक्त शाळेच्या परीक्षांमध्ये होती,
असे खूप काय काय आदीमानवाच्या काळातीत होतं तेव्हा

मित्र वेड्यासारखा बोलत होता, आणि
समुद्रात मोहरी शोधावी तस सगळं शोधू पाहत होता,
मी त्याच्या डोळ्याला डोळा भिडवत ,म्हणालो
गड्या तू तरी आता कुठे अर्धी चड्डी घालून,
रस्त्याच्या बाजूला उभा राहून धार सोडशील?
फोपश्या आता झाडाच्या खाली उभं राहिलं तरी धाप लागते तुला
माणसांकडे बोलायच्या आधी त्यांचे कपडे पाहतोस तू,
तोंडातल्या बोलीला लिलावाच्या बोलीपेक्षा जास्त
महत्व देणारी भाषाशुद्धिष्ट तुम्ही
इंग्रजी बोललं नाही, चित्रपटांचे अनुकरण केले नाही
तर ऐतिहासिक संग्रहालयात पाठवण्याची भिती दाखवणारे
लोक तुम्ही...

पाव्हण तुम्ही बदलायचं, घरान बदलायचं,
गावानं बदलायचं, देशानं बदलायचं, जगानं बदलायचं
आणि मग आपणच गळे काढायचे जुनं कसं चांगलं,
नव्या कोऱ्या कातीतून सगळ्या जगाला बघायचं
नाळ तोडायची नाही पण स्वतंत्र होऊ पाहायचं!

मोठ्या गाडीतून एसी मधून फिरणाऱ्या मित्राला म्हणलं
तो नाक्यावरचा चहावाला आजही मुन्सिपाल्टीच्या नळाच्याच पाण्याचाच,
गावात मिळणाऱ्या चहा पावडर घालून,
अस्सल देशी गाईनी दिलेलं दुध वापरून केलेला चहा पचवण्याची तयारी
असेल तर चल, गाव बदललं. पण याची गाडी सुद्धा बदलली नाही,

मित्रानी खिशातला मोबाईल काढला,
आणि मला सांगितलं यावेळी घरी येणं जमेल असे वाटत नाही,
तुला नाक्यावर सोडून तसाच जाईन म्हणतो,
काम खोळबलीत पुढची...

वाढलेल्या गावाच्या पुढे तो निघून गेला,
जुन्या गावाची लागेलेली माती गाडीतच राहिली,
त्या मातीतून येणारे हसण्याचे आवाज,

आपणत्व, मात्र त्याचे आयुष्य भरून राहतील
ही खात्री पण याच मातीचीच....

Monday, May 22, 2017

शोध स्वतःचा !

सुट्टी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातही काम करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या साऱ्याच बायकांना ही उन्हाळ्याची सुट्टी अगदी हवीहवीशी वाटत असते ती अनेक कारणांनी. मुलांच्या अभ्यासाचं, शाळेचं असं कोणतंच कारण नसतं. माहेरपण अनुभवण्यासाठी, भटकण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. मग काही जण कुटुंबाची एकत्र अशी एखादी सहल काढतात, ह्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी म्हणून एखादे थंड हवेचे ठिकाण मग ते भारतातील असो व परदेशातील सहल.काही जन तिर्थस्थळाना भेट देतात. पण उन्हाळ्यात एखादी तरी सहल होतेच. रोजच्या त्याच त्या रुटीन पासून थोडा बदल म्हणून काही तरी हवेच असतं. हा असा स्थान बदल, एक नवीन तरतरी मिळवून देतो. या अशा सहलींमध्येच एक नवा ट्रेंड रुजत आहे बायकांच्या एकटीच्या सहली !
कुटुंबासोबत सहलीला गेलं तरी बायकांच्या मागच्या अनेक गोष्टी सुटत नाहीत, मुलांना वेळेवर खायला देणं, सामान नीट लावून घेणं, मुलांकडे बघणं अशा एक न अनेक गोष्टी असतातच त्यामुळे अनेक बायकांसाठी हे असं फिरायला जाणं म्हणजे फक्त जागेचा बदल असतो, घरामध्ये जे करतो तेच बाहेरही येऊन करायचं, फरक एवढाच की इथे स्वैपाक आयता मिळतो आणि कामवाली आज येईल की नाही याची फिकीर करावी लागत नाही. कितीही घरात, मुलांमध्ये जीव असला तरी बाईला थोडा स्वतःचा वेळ देखील हवाच असतो. त्यामुळेच फक्त बायकांच्या सहली जशा जोर धरू लागल्या आहेत तशाच एकट्या प्रवास करणाऱ्या बायकांची संख्या देखील वाढत आहे.
खरंच सतत दुसऱ्यांचा विचार करत जगणाऱ्या बाईला स्वतःच्या मनासारखं जगायला मिळतं का? कुटुंबासोबत सहलीला जाताना बायकांना विचारलंदेखील जात नाही, अगदी साधं हॉटेल मध्ये गेल्यावर सुद्धा आईला, बायकोला काय हवं आहे, तिला काय खायचं आहे हा प्रश्न येतंच नाही, अनेकदा मुलंच हे सारे प्रश्न सोडवतात किंवा उरलेल्या ठिकाणी घरातले पुरुष! अनेक कमावत्या बायका, मुली एकटं फिरायला आजकाल बाहेर पडतात याचं कारण हे देखील असावं. सारी माहिती ऑन लाईन मिळवून, वेगवेगळ्या ब्लॉगच्या आधाराने अनेक जणी स्वतःच स्वतःच्या सहलींच आयोजन करतात. सावधानी बाळगण्यासाठी अनेकवेळा b&b मध्ये राहणं पसंत करतात. b&b म्हणजे बेड आणि ब्रेकफास्ट ची सोय देणारी घरं. अशा अनेक वेबसाईटस आहेत ज्यावर आपण ही बुकिंग करू शकतो. या अशा ठिकाणी शक्यतो कुटुंब रहात असल्या कारणाने सुरक्षेचा फारसा प्रश्न येत नाही. त्याच बरोबर स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेता येतो. आणि हे हॉटेल मधे राहण्यापेक्षा किफायतशीर देखील पडतं.
साऱ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून एकट , किंवा ग्रुप मध्ये फिरताना अनेक गोष्टी नव्यानी कळतात. स्वतःशी एका वेगळ्या पद्धतीने संवाद साधला जातो. स्वतःमधल्या क्षमतांची नव्याने ओळख होते. त्याचबरोबर एक अहंकार देखील गळून पडतो. अनेक वेळा बायकांना वाटत असतं त्यांच्याशिवाय घर चालूच शकणार नाही. पण आपल्या गैरहजेरीत घराची घडी विस्कटते पण तरीही घर सुरु असतं. त्यामुळे माझ्यावाचून कोणाचं काही अडत नाही हे कळतंच पण आपण नसल्याचा परिणाम घरावर झाला आहे हे देखील दिसत असतं. अनेक टूर्स कंपन्या देशातच नव्हे तर परदेशातही अशा फक्त बायकांच्या सहली आयोजित करतात, आणि तिथे बायका आपली वय विसरून धमाल गंमती करतात. आयुष्यात राहून गेलेल्या अनेक गोष्टी करण्याची मजा अनुभवतात.
परदेशात अनेक जण एकेकटा प्रवास करत असतात, लोनली प्लॅनेट सारखी पुस्तके हाताशी धरून पुरुष, बायका वेगवेगळे खंड, वेगवेगळे देश फिरतात. भाषा येत नसलेल्या प्रांतात जाऊन तिथली संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. नवे नवे अनुभव गाठीला बांधतात. अनेकदा असा एकटा प्रवास करणाऱ्यांना तुम्हाला भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारून लोकच जास्त घाबरवतात. एकटे फिरताना अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावं लागतं पण त्याचबरोबर माणुसकीचे वेगवेगळे रंग, पुस्तकाबाहेरचे अनुभव देखील अनुभवता येतात हे ही तितकंच खरं. असं एकट फिरणाऱ्याना कोणत्याही गायडेड टूर शिवाय प्रवास करणाऱ्यांना लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून फिरावं लागतं. अनेकदा अपेक्षा नसलेल्या ठिकाणी जास्त आपुलकी बघायला मिळते. एकट्या फिरणाऱ्या बायकांबद्दल तर समाजात कुतूहलाबरोबरच एक प्रकारचं प्रश्नार्थक आश्चर्य पण असतं. म्हणजे एखादी बाई अशी एकटी सगळ्या गोष्टी कशा करू शकेल इथ पासून ते तुम्हाला कोणी काही केलं तर इथपर्यंत.
क्वीन चित्रपटामुळे तर एकट्या फिरणाऱ्या महिलांना जणू ग्लॅमरच मिळालं. जर एखादी लग्न तुटलेली सामान्य मुलगी एकटीच युरोप फिरू शकते तर आपण आपला देश का नाही? मग ट्रीपलिंग सारख्या वेब सीरिअल मुळे याला अजून खात पाणी मिळालं. कधी सोबत नाही म्हणून, कधी नवा अनुभव घ्यायचा म्हणून, कधी गरज म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी पहिला सोलो प्रवास होतो, आणि मग त्यातली मजा आवडायला लागते आणि मग सुरु होतो एकट्यानी प्रवास करण्याचा नवा प्रवास. स्वतःला शोधण्यासाठी, नव्यानी भेटण्यासाठी, स्वतःवर, आयुष्यावर नव्यानी प्रेम करण्यासाठी एकदा तरी घराचा उंबरठा एकटीनी ओलांडून पहा, परत तुमच्या जगात याल तेव्हा अजून जास्त प्रेम, अनुभव, नात्यांचे दोर जास्त घट्ट करतील.

जग फिरणं, नवीन माणसांना भेटणं हे एक प्रकारचं शिक्षणचं असतं. या शिक्षणाला कोणताही अभाय्साक्रम नसतो, पदोपदी परीक्षेची वेळ असते, आणि पास नापास असा कोणताच पर्याय नसतोच, तुम्ही फक्त पुढे जायचं असतं. एक स्त्री जेव्हा असा प्रवास एकटीने करते तेव्हा तिला सोबत करत असतात तिच्या आतल्या अंतःप्रेरणा, आणि एक व्यक्ती म्हणून त्या तिला अजून जास्त समृद्ध करत असतात. हे स्वानुभवाचे बोल आहेत. मग हा अनुभव घेण्यासाठी कधी करताय तुमची बॅग पॅक? सुट्टीचे दिवस अजून संपलेले नाहीत, तेव्हा टेक अ ब्रेक, अँड मीट युअरसेल्फ...  
(महाराष्ट्र टाईम्स २२ मे २०१७ )